भारतीय खेळाडूंना त्यांच्या क्षमतेची जाणीव नव्याने करून द्यावी लागेल

टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया प्रथमच विजेता

फोटो सौजन्य: BCCI/ Twitter

संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या क्रिकेटच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथमच विजेतेपद मिळवले. 2007 मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून दर वेळी त्यांना विजेतेपदाने हुलकावणीच दिली होती. यंदा मात्र काहीही करून विजेता बनण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. आणि त्या-अनुसारच त्यांनी दीर्घ काळ तयारीही केली होती. स्पर्धेआधी पुरेशी विश्रांती मिळावी, म्हणूनच त्यांचे काही खेळाडू आयपीएलपासून दूर राहिले होते, तर काही थोड्या सामन्यांनंतर खेळले नाहीत. त्यामुळे स्पर्धेसाठी ते पूर्णपणे फिट होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच त्यांना इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. तरीही त्यांनी आपले उद्दिष्ट डोळ्यांपुढून हटू दिले नाही. त्यांच्याप्रमाणेच न्यूझीलंडचा संघही विजेता बनू इच्छित होता आणि त्यांनीही मनापासून तयारी केली होती. एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या दोन विश्वचषक स्पर्धांचे विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कसोटी विश्वचषक जिंकून त्यांनी एक पाऊल टाकले होते.

पण... लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाचे विजयाचे प्रमाण या स्पर्धेत अधिक राहिले. त्यात अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागल्याने, त्यांना पराभव पत्करावा लागला. आजवर कोणत्याही स्पर्धेत नाणेफेक जिंकण्याला एवढे महत्त्व आले नव्हते. तरीही त्यांनी जवळजवळ अखेरपर्यंत चांगली लढत दिली. त्यांचा स्पर्धेत चांगला यशस्वी ठरलेला गोलंदाज ईश सोढीच्या फिरकीची जादू या सामन्यात हरवूनच गेली होती. न्यूझीलंडला हा मोठाच धक्का होता आणि त्यांचा विजय दुरावत असल्याचे त्यांना जाणवत असावे. कारण बोल्टशिवाय कोणत्याच गोलंदाजाचा प्रभाव पडत नव्हता. कॉन्वेची अनुपस्थिती त्यांना नक्कीच जाणवली असणार. जोडीला नशिबाची साथही नसल्याने झेल प्रयत्न करूनही क्षेत्ररक्षकांच्या आवाक्यात येत नव्हते. याचाही फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला.

सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने आक्रमक धोरण अंगीकारले आणि पॉवर प्लेनंतरही वेग वाढवतच नेला. दहा षटकांनंतर त्यांनी जवळपास निम्मी मजल पार केली होती, त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे काम सोपे झाले. कारण या स्पर्धेत डावाच्या दुसऱ्या दहा षटकांत धावांचा वेग प्रचंड वाढतो हे उपान्त्य फेरीतही आढळून आले होते. तसेच झाले. वॉर्नर, मार्श आणि मॅक्सवेल हे त्यांच्या फलंदाजीचे मानकरी. त्यांच्या फटकेबाजीला रोखणे एकट्या बोल्टशिवाय कुणालाच जमले नाही, त्यामुळेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन याने संघाला सुरुवातीलाच धक्का बसल्यावर प्रथम सावधपणे खेळ करून दहाव्या षटकानंतर मात्र जोरदार आक्रमण केले. त्यामुळेच त्यांना 172 धावांची मजल गाठता आली. पण सुरुवातीचा त्यांचा संथ वेगच काही प्रमाणात निर्णायक ठरला. अमिरातीत पाठलाग करणाऱ्या संघाला अशा मोठ्या संख्येचे काहीच वाटत नव्हते. कारण पाठलाग करताना गोलंदाजांना अडचणी येतात व त्यामुळे आपले काम सोपे होते, हे त्यांना उपान्त्य सामन्यात पाकिस्तानला हरवताना अनुभवता आले होते.

पाकिस्तान आणि इंग्लंड हे आपापल्या गटाचे विजेते होते आणि त्यात पाकिस्तान तर एकही सामना हरला नव्हता, त्यामुळे त्यांच्याबाबत अपेक्षा वाढल्या होत्या व अंतिम फेरीतच त्यांची गाठ पडेल असे वाटू लागले होते. पण ते दोघेही उपान्त्य फेरीतच बाद झाले. ते दोघेही नाणेफेक हरले. त्यामुळे त्यांनी उभारलेल्या  धावसंख्येचा बचाव करणे खूपच अवघड जाणार होते हे स्पष्ट होते, त्यांनी तरीही जिद्दीने सामना लढवला आणि न्यूझीलंडचा निशॅम व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड यांनी केवळ एका षटकात षटकारांची बरसात करून सामन्याचा नूरच पालटून टाकला होता. अखेरच्या षटकापर्यंत सामन्याचा निर्णय होणार नाही, असे एका वेळी वाटत होते, पण त्या षटकाआधीच उपान्त्य सामने संपले होते. त्या वेळीच स्पर्धेला या वेळी नवा विजेता लाभणार हे नक्की झाले होते. पण तो कोण हे अंतिम सामन्यानंतरच ठरणार होते. त्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि अंतिम सामनाही शेवटच्या विसाव्या षटकापूर्वीच संपला.

या स्पर्धेच्या गटवार साखळीतील भारताच्या पहिल्या दोन सामन्यांनंतरच खरे तर भारत उपान्त्य फेरी गाठू शकणार नाही, हे दिसत होते. कारण भारताला पाकिस्तान आणि पाठोपाठ न्यूझीलंडने सपशेल पराभूत केले होते. भारत कशा प्रकारे उपान्त्य फेरी गाठू शकेल या बाबत जी काही जर...तरची जंत्री देण्यात येत होती, त्या काडीच्या आधारावर चाहते आशा बाळगून होते. मनोमन त्यांना ठाऊक होते की हे होणार नाही, तरीही आशा बाळगण्यात काय वाईट आहे, असा त्यांचा विचार असावा. आणि न जाणो काहीतरी आश्चर्य घडेल आणि भारत उपान्त्य फेरी गाठेल असे त्यांना वाटत होते. पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि साऱ्या आशा मावळल्या. खरे तर जो न्यूझीलंडचा संघ बलाढ्य समजल्या गेलेल्या भारतीय संघाला हरवतो, तो अफगाणिस्तानकडून पराभूत होईल अशी अपेक्षा करणे म्हणजे, एखाद्या भटक्या कुत्र्याच्या मृत्यूबाबत शोक करणाऱ्या महानायकाने शेकडो शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबतही शोक करावा, अशी अपेक्षा बाळगण्याइतकेच फोल होते! तरीही आशा बाळगण्यात काय वावगे, असे त्यांना वाटत असावे.

साखळीच्या अखेरच्या सामन्यात भारताने नामिबियाचा पराभव केला काय किंवा केला नाही काय, आता त्याला काहीच महत्त्व राहिलेले नव्हते, एवढे खरे. मग भले स्कॉटलंडविरुद्धच्या पराक्रमाचा  कित्ता पुन्हा गिरवला, तरी त्यामुळे काहीच फरक पडला नाही! कारण आदल्याच दिवशी न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केल्याने, भारत आधीच या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता.

एखादा विद्यार्थी हुशार असतो, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. पण होते काय की, वार्षिक परीक्षेत नेमक्या ज्या विषयांपैकी (उदा. गणित आणि विज्ञान किंवा गणित आणि इंग्रजी) किमान एका विषयात पास झाले, तरच उत्तीर्ण होता येते असा नियम असतो. पण हा विद्यार्थी नेमका त्या सक्तीच्या दोन विषयांमध्येच नापास होतो. त्याला बाकीच्या विषयांत चांगले मार्क मिळूनही ते फोल ठरतात. अर्थातच त्याला पुढच्या वर्गात जाता येत नाही. भारतीय संघाचे तसेच झाले आहे! आधी अनेक स्पर्धा वा मालिकांत चांगल्या संघांविरुद्ध विजयी होणाऱ्या या संघाकडून अर्थातच मोठ्या अपेक्षा होत्या. क्रमवारीमध्येही तो खूपच वर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या या वेळच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या गटवार साखळीत भारताचा गटही तसा सोपा होता. कारण कसोटीचा दर्जा असलेले पाकिस्तान, न्यूझीलंड आणि तसा नवखा अफगाणिस्तान वगळले, तर गटातील नामिबिया आणि स्कॉटलंड हे इतर दोन संघ साधारण लिंबू-टिंबू म्हणावेत असेच होते. त्यामुळेच भारताला सहज उपान्त्य फेरी गाठता येईल असे सर्वांना वाटत होते. कारण पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकाला हरवले तरी बाकी तिघांवर मात करणे सोपे होते. त्यातच या आधीच्या एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक स्पर्धांत भारताने नेहमीच पाकिस्तानवर मात केल्याचा इतिहास. त्यामुळे तर हे अधिकच सोपे वाटत होते.

पण... प्रश्नपत्रिका सोपी असूनही काही वेळा विद्यार्थ्यांना काहीच आठवत नाही, ऐन वेळी ते ब्लँक होतात. त्याप्रमाणेच काहीसे पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात झाले. भारताच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना आपल्या क्षमतेचाच विसर पडल्यासारखे झाले. आणि आश्चर्य म्हणजे लगेचच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही असेच घडले! दोन्ही सामन्यांत फलंदाजीला सुरुवात खराब झाली आणि सारा संघच ढेपाळला. पाकविरुद्ध हरल्याचे दुःख ओसरण्यापूर्वीच न्यूझीलंडनेही भारताला लोळवले. अर्थातच भल्याभल्यांना धूळ चारणारा पराक्रमी भारतीय संघ तो हाच का, असा प्रश्न पडला. खरे म्हणजे तेव्हाच पुढे काय होणार याचा अंदाज आला होता. तरी न्यूझीलंडही पाकिस्ताकडून हरल्याने, चाहत्यांच्या आशा कायम होत्या. पण हाय! अफगाणिस्तानलाही न्यूझीलंडने सहज हरवले. भारताला हादरवणाऱ्या बोल्टने अफगाणिस्तानलाही नामोहरम केले आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रेमी शोकसागरात बुडाले. अघटित वाटावे असेच हे सारे होते. पण घडू नये ते घडले... चाहत्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला. कारण ते दोन्ही पराभव स्पष्ट होते. तक्रारीला वा कुरकुरायला जागाच नव्हती. जे झाले ते कितीही कटू वाटले तरी, मान्य करावेच लागले.

तसे पाहिले, तर स्पर्धेआधी बऱ्याच खेळाडूंना आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धाचा चांगलाच फायदा झाला होता. कारण जेथे विश्वचषक स्पर्धा होणार होती, त्याच मैदानांवर आयपीएलमधील सामने खेळले गेले होते. जवळपास महिनाभर संघ तेथेच होता. त्यामुळे हवामानाबरोबर जुळवून घेण्याचाही काही प्रश्न नव्हता. कारण एवढ्या काळात खेळाडू कुठेही जुळवून घेऊ शकतात. भारताचे काही खेळाडू त्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत होते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल, असेही वाटत होते. त्यामुळेच आत्मविश्वासाने संघ या विश्वचषक स्पर्धेत उतरणार होता. पण पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने जो धक्का दिला तो न्यूझीलंडबरोबरच्या सामन्यापर्यंतही ओसरला नव्हता, असेच चित्र दिसले. असे का व्हावे?

याचा विचार करताना सारेच अगम्य वाटायला लागते. कुणीही तज्ज्ञ ठामपणे याची कारणे देऊ शकत नव्हता. पण विचार करायचा झाला, तर थोडेफार हाती लागते. आपले खेळाडू दीर्घ काळ दूर देशी खेळत होते, त्यातही जैवसुरक्षित वातावरणातच त्यांना राहावे लागत होते. अर्थातच कोविड-19 मुळे. त्यामुळे त्यांना काहीसे अस्वस्थ वाटायला लागले असण्याची शक्यता असावी, असे म्हणतात. पण आठवड्यापूर्वीपर्यंत आयपीएलमध्ये खेळताना त्यांना असे काही का वाटत नव्हते असा प्रश्न पडतो. शक्यता अशीही आहे की, आपल्या आधीच्या वर्षातील चांगल्या कामगिरीमुळे त्यांना आपल्याला आता कोण रोखू शकतो, असा अति आत्मविश्वास आला असावा. त्यामुळे त्यांना आपल्या खेळाबाबत चिंता वा चिंतन करण्याची आवश्यकताच वाटली नसावी. त्यात काही त्रुटी असतील, असेही त्यांना वाटत नसावे. या स्पर्धेसाठी मेंटॉर म्हणून अनुभवी महेंद्रसिंग धोनीची नेमणूक करण्यात आली होती. तरी त्याचाही काही फायदा झाला नाही.

खरे तर संघ निवडीबाबतच काही चुका झाल्या असे बऱ्याच तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ते पटण्याजोगे आहे. एरवी प्रचंड अनुभव आणि चांगली कामगिरी असलेल्या रविचंद्रन अश्विनसारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवण्यात आले. हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला असावा असेही बोलले जाते. कारण पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला संघाबाहेरच ठेवले गेले होते. नंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला, तोवर खरोखरच फार उशीर झाला होता. त्यामुळेच संघामध्ये सारे काही ठीक नाही, असे बोलले जाऊ लागले. व्यवस्थापक, कर्णधार, मेंटॉर या साऱ्यांचाच हा निर्णय असणार मग त्याची जबाबदारी कोणावर? याचे उत्तर अवघडच आहे.

पाकिस्ताविरुद्धचा सामना अटीतटीचा होईल, अशी अपेक्षा होती. दीर्घ काळानंतर या संघांची गाठ पडत होती. याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानने भारताला हरवून जिंकली होती. भारत त्याची परतफेड करण्याला उत्सुक असेल, असे भारताच्या चाहत्यांना वाटत होते. उलट पाकिस्ताचे चाहते त्या विजयाचीच पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा करत होते. त्यामुळेच सामन्याबाबत उत्सुकता ओसंडून वाहत होती. सामना पाहण्यासाठी लोक घरीच थांबले होते. दिवाळीची धांदल-गडबड असली तरी रस्ते ओस पडले होते. यावरूनच या सामन्याबाबत वेगळे काही सांगायची आवश्यकता नाही.

पण सामना सुरू झाल्यावर काही काळातच भारताची अवस्था खराब झाली. शाहीन अफ्रिदीने आघाडीच्या जोडीपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीलाही बाद केले आणि प्रसंगाचे गांभीर्य साऱ्यांच्या ध्यानात आले. शेवटच्या काही षटकांतील प्रतिकार झाला तोवर संघ सावरण्याच्या पलीकडे गेला होता. तरीही चाहत्यांना अपेक्षा होती. अमिरातीतीलच एका एक दिवसीय सामन्यात भारत 125 धावांत गारद झाल्यावरही कर्णधार कपिल देवनं सहकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले होते ते क्षेत्ररक्षकांची अप्रतिम साथ मिळाल्याने, त्यात गावस्करने चार झेल घेतले होते, पाकिस्ताचा डाव केवळ 87 धावांवर गुंडाळण्यात भारताला यश मिळाले होते. त्यामुळे तसेच काही होईल, ही अपेक्षा केली जात होती. पण तो दिवस वेगळा होता, संघ वेगळा आणि कर्णधारही वेगळा होता!

या संघाकडून वारेमाप अपेक्षा ठेवण्यात आल्याचे दडपण खेळाडूंवर आले होते की काय असे वाटायला लागले. फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाज उसळून उठतील, असे काहींना वाटत होते. पण पाकिस्तानच्या खेळाडूंचा इरादा वेगळाच होता. त्यांनी सुरुवातीपासूनच हल्लाबोल केला. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा अयशस्वी ठरला आणि मग सामना संपेपर्यंत कोणाही गोलंदाजाला यश दिसले नाही. झेल सुटले वगैरे काहीही झाले नाही, त्यांनी भारताला जराही संधी दिली नाही. एकही बळी न गमावता सामना जिंकला. जणू काही या एकाच विजयाने पाकिस्तानच्या खेळाडूंनी अगोदरच्या साऱ्या पराभवांची फेड करून टाकली.

कदाचित त्यांच्यामुळेच न्यूझीलंडलाही विजयाचा मार्ग दिसला असावा. कारण बोल्टनेही सुरुवातीलाच दोन बळी मिळवले. मग आधीच्या सामन्याची पुनरावृत्तीच झाली. फरक एवढाच की, न्यूझीलंडने दोन गडी गमावले. ते दोन्ही बुमराने मिळवले. बाकी गोलंदाजांची पाटी कोरीच. मग हार्दिक पंड्या फिट होता का, मग त्याने गोलंदाजी का केली नाही (नंतरच्या सामन्यात केली तरी त्याचा मारा प्रभावहीनच होता). अश्विनला का वगळले. ईशान किशनला आघाडीला का पाठवले, मुळात शिखर धवनसारख्या अनुभवी आणि बहरात असलेल्या आघाडीवीराला संघात सोडा पण चमूतही स्थान का दिले गेले नाही, असे प्रश्न आले. वाईट बाब म्हणजे पाकिस्तानकडून हरल्यावर काही विकृत लोकांनी हा खेळ आहे, हे विसरून शमीलाच लक्ष्य केलं. सुदैवाने बहुसंख्य चाहत्यांनीच त्यांना सुनावले.

अमिरातीतील मैदानांवर सायंकाळच्या सामन्यात दुसऱ्या डावात खेळताना दवाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे गोलंदाजांच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच नाणेफेकीला महत्त्व येते. पण संघ हरण्याचे ते काही एकमेव कारण होऊ शकत नाही. (नाणेफेकीबाबत लिहिताना एका पत्रकाराने कोहलीने कोणकोणत्या गोष्टींचा सराव-प्रॅक्टिस करायला हवी, त्यात नाणेफेकीचाही उल्लेख होता. हा तर छानच विनोद म्हणायला हवा. ही बाब प्रथमच ऐकली असणार. प्रश्न पडतो की हा सराव कसा करायचा, कारण नाणे तर पंच उडवत असतो. असो.) गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, असेही म्हटले गेले. पण त्यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये उत्तरार्धातच गोलंदाजी करावी लागली. गोलंदाजांनी बळी मिळवण्यासाठी मारा करायचा तर मोठ्या धावसंख्येचे पाठबळ आवश्यक. तसे ते कधी मिळाले? मोजक्या धावांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात ना त्यांना बळी मिळवता आले ना धावा रोखता आल्या. क्षेत्ररक्षणाची, न्यूझीलंड वा पाकिस्तानी गोलंदाजांना साथ मिळाली तशी मिळाली नाही. असे असताना फलंदाज आणि क्षेत्ररक्षक राहतात बाजूला. मग गोलंदाजांनाच बोल का लावायचा?

आता संघाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी पत्करलेल्या राहुल द्रवीडला अशा साऱ्या त्रुटींबाबत योग्य नियोजन करून पुन्हा संघाचा आत्मविश्वास मिळवून द्यावा लागेल. खेळाडूंना त्यांच्या क्षमतेची जाणीव नव्याने करून द्यावी लागेल. टी-20 साठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा आला आहे. म्हणजे एका प्रकारे नवा गडी नवे राज्य असा प्रकार असणार आहे. म्हणजे नव्याने सुरुवात. विराट कोहलीची टी-20 प्रकारातील कर्णधार म्हणून आणि रवी शास्त्रीची व्यवस्थापक म्हणून दीर्घ काळ चाललेली कारकिर्द, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या कोणत्याही विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्याविनाच पण नामिबियावरील विजयाने का असेना, संपुष्टात आली आहे. वाईटात चांगले शोधत राहायचे आणि म्हणायचे की ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड!

आणि जाता जाता : एक बाब खरी की ऑस्टेलिया विजयी झाला तरी इंग्लंड म्हणेल विजेत्यांना हरवणारा संघ केवळ आमचाच. ऑस्ट्रेलिया विजेता झाला तरी तो अजिंक्य नाही. स्पर्धेत कोणताही संघ अजिंक्य राहिला नाही. 1992 मधील एक दिवसीय विश्वचषक सामने संपूर्ण साखळी पद्धतीने झाले होते, तेव्हा इम्रान खानचा पाकिस्तानचा संघ विजेता ठरला. पण तेव्हा साखळीत त्याला हरवणारा एकमेव संघ भारताचा होता!

एक निरीक्षण टिकेविना : भारतीय संघात काही जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्याने इंग्लंडबरोबरची अखेरची कसोटी न घेण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण नंतर आयपीएल सुरू झाल्यावरही एका संघातील काही जणांना लागण झाल्याचे आढळले, तरीही स्पर्धा व्यवस्थित पार पडली. तीच गोष्ट विश्वचषक स्पर्धेची. या स्पर्धेदरम्यानही एका संघातील काहींना बाधा झाल्याची बातमी होती. पण नंतर त्या बाबत काहीच कळले नाही. स्पर्धा व्यवस्थित वेळापत्रकाप्रमाणे सुरू आहे!

आता बुधवारपासून मायदेशातच न्यूझीलंड विरुद्ध मालिका सुरू होईल. तेव्हा भारताला शुभेच्छा.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: क्रीडा आ. श्री. केतकर क्रिकेट ऑस्ट्रेलिया पाकिस्तान न्यूझीलंड भारत Cricket T20 World Cup Australia Pakistan New Zealand India A S Ketkar Sports Load More Tags

Add Comment