एस्केप टु व्हिक्टरी : एक आगळा क्रीडा - युद्ध (कैदी) पट

युद्धपटांवरील लेखमाला : 10

‘एस्केप टु व्हिक्टरी’! म्हणजे स्वातंत्र्याकडे किंवा स्वातंत्र्यासाठी पलायन. या चित्रपटाला क्रीडा युद्धपट असे म्हटले जाते, कारण तो एका आगळ्यावेगळ्या परिस्थितीत खेळवण्यात आलेल्या फुटबॉल सामन्यावर आधारित आहे. अशाच प्रकारचे काही सामने प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने युक्रेनवर आक्रमण करून तेथे जम बसवल्यानंतर खेळले गेले होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते सारे सामने युक्रेनने जिंकले होते. जर्मन संघाला एकही विजय मिळवता आला नव्हता.

युद्धपटांचे अनेक प्रकार आहेत. युद्ध म्हणजे केवळ गोळीबार, हॅन्ड ग्रेनेडस् तसेच बॉम्ब्सचा वर्षाव, भूसुरुंग, हवाई तसेच सागरी हल्ले आणि हातघाईची समोरासमोरील लढाई एवढेच नसते. युद्धात कोणाची सरशी होते तर कोणी पराभूत होतो. कोणी आगेकूच करतात तर कुणी माघार घेतात. माघार कधी तात्पुरती आणि नंतर जोरदार प्रतिहल्ला चढवण्यासाठीही असू शकते. अशा या लहान मोठ्या चकमकी, लढायांत अनेकदा पराभूत सैनिकांना पकडण्यात येते आणि कैदेत ठेवले जाते. त्यांना युद्धकैदी असे म्हणतात. आणि त्यांच्या तुरुंगांना युद्धकैद्यांच्या छावण्या असेही म्हटले जाते. अर्थात जातिवंत सैनिक त्या कैदेतून निसटण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारतात, युक्त्या लढवतात, धोकाही पत्करतात. अगदी प्राण पणाला लावतात कारण त्यांना स्वातंत्र्याची ओढ असते. आपल्या देशात परतायचे असते. त्यासाठी ते अनेक मार्ग अवलंबतात, वेगवेगळ्या युक्त्या योजतात आणि आपला बेत यशस्वी करतात. अशा घटनांवरील काही चित्रपटही आले आहेत.

अशा युद्धपटांत लक्षात राहण्याजोगा, एक वेगळ्याच प्रकारचा युद्ध (कैदी) पट आहे. त्याचे नावही लक्षणीय आहे. ‘एस्केप टु व्हिक्टरी’! म्हणजे स्वातंत्र्याकडे किंवा स्वातंत्र्यासाठी पलायन. या चित्रपटाला क्रीडा युद्धपट असे म्हटले जाते, कारण तो एका आगळ्यावेगळ्या परिस्थितीत खेळवण्यात आलेल्या फुटबॉल सामन्यावर आधारित आहे. अशाच प्रकारचे काही सामने प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने युक्रेनवर आक्रमण करून तेथे जम बसवल्यानंतर खेळले गेले होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते सारे सामने युक्रेनने जिंकले होते. जर्मन संघाला एकही विजय मिळवता आला नव्हता.

दंतकथा अशी की, डेथ मॅच म्हणूनच प्रसिद्ध झालेल्या अशाच एका सामन्यात युक्रेनमधील फुटबॉल क्लब डायनॅमो कीव्हने युक्रेनवर ताबा मिळवलेल्या जर्मन फौजांच्या संघावर विजय मिळवला होता आणि त्यानंतर जर्मनीने युक्रेनच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना मारून टाकले. प्रत्यक्षात मात्र जर्मनीच्या गेस्टपोंनी त्यांना पुन्हा युद्धकैद्यांच्या छावणीत ठेवले होते. तशी त्यांनी जर्मनांनी चार खेळाडूंना मारल्याची नोंदही आहे, पण ती घटना या फुटबॉल सामन्यांच्या मालिकेनंतर अनेक दिवसांनी घडली होती. या कथेच्या अनुषंगाने 1962 मध्ये हंगेरीमध्ये एक चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे नाव ‘टू हाफ टाइम्स इन हेल’. त्याचा दिग्दर्शक होता झाल्टन फॅब्री. टू हाफ टाइम्स इन हेल या चित्रपटाला समीक्षकांचे पारितोषकही मिळाले होते. याच चित्रपटाच्या आधारे एस्केप टु व्हिक्टरी हा चित्रपट 1981 मध्ये तयार करण्यात आला. त्याचा दिग्दर्शक होता जॉन ह्यूस्टन.

एस्केप टु व्हिक्टरी या चित्रपटामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, जर्मन अधिकाऱ्याने दिलेल्या प्रस्तावावरून, दोस्त राष्ट्रांच्या सैन्यातून लढलेले आणि पकडले गेलेले युद्धकैदी जर्मन संघाबरोबरच्या या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात खेळण्याचे मान्य करतात, पण लवकरच त्यांना हा सामना म्हणजे केवळ जर्मनीच्या प्रचाराचा प्रॉपोगंडाचा भाग आहे हे उमगते. तरीदेखील ते हा सामना खेळण्याचा आपला निर्णय बदलत नाहीत. युद्धकैद्यांच्या या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी इंग्लिश सैन्यातील कॅप्टन जॉन कोल्बी याच्याकडे आहे. कारण युद्धापूर्वी तो व्यावसायिक खेळाडू या नात्याने वेस्ट हॅम युनायटेड या इंग्लंडमधील संघाकडून खेळला आहे. त्याच्याबरोबर बोलताना जर्मन अधिकारी सहजपणे ही ओळख देतो, त्यावरून त्या जर्मन अधिकाऱ्याचे फुटबॉलप्रेम दिसून येते. जर्मनीने एकदाही इंग्लंडला हरवलेले नाही, अशी त्याची खंतही तो बोलून दाखवतो. कॅप्टन जॉन कोल्बी हा कर्णधारपदाबरोबरच मुख्यतः युद्धकैद्यांच्या संघाचा व्यवस्थापक म्हणूनही काम बघतो आहे. त्यामुळे तोच संघातील खेळाडूंची निवड करतो, हे ओघानेच आले. पण त्याच्या युद्धकैद्यांच्या संघात तो कॅप्टन रॉबर्ट हॅच (सिल्वेस्टर स्टॅलन) या कॅनेडियन फौजांकडून लढणाऱ्या अमेरिकन सैनिकाची सुरुवातीला निवड करत नाही. पण त्याच्या नकारामुळे हार न मानता हॅच, अगदी चिवटपणे सुरुवातीला त्याची निवड करण्यास तयार नसणाऱ्या कोल्बीला अखेर त्याचा युद्धकैद्यांच्या संघातील खेळाडूंत समावेश करण्यास भाग पाडतो. त्याने जाणीवपूर्वकच हे केलेले असते. कारण युद्धकैद्यांच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर राहण्याची हॅचला नितांत गरज असते, कारण त्यामुळे त्याचा पलायनाचा मार्ग सुकर होणार असतो.

त्याच छावणीतील, जर्मनीच्याच कैदेत असलेले कोल्बीचे वरिष्ठ अधिकारी त्याला या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याचा सुटकेची संधी म्हणून वापर करण्याचा वारंवार आग्रह करून ते त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पण आडमुठेपणाने कोल्बी त्यांना ठामपणे नकार देतो. कारण त्याला वाटत असते की, यामुळे त्याचे खेळाडू मारले जातील. पण एकाकी सुटकेचा प्रयत्न करणारा हॅच या वरिष्ठांबरोबर संपर्क साधतो आणि ते त्याला त्याचा पलायनाचा बेत अमलात आणण्यासाठी मान्यता देतात. पण त्याच वेळी ते एक अट घालतात. हॅचने त्याला त्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या साहाय्याच्या बदल्यात पॅरिसला जाऊन तेथील जर्मनांना प्रतिकार करत असलेल्या फ्रेंच रेझिस्टन्स या संघटनेशी संपर्क साधावा आणि त्यांनी युद्धकैद्यांच्या फुटबॉल संघातील सर्वच खेळाडूंच्या सुटकेसाठी मदत करण्याची जरुरी आहे, असे त्यांना पटवून द्यावे.


हेही वाचा : जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग : प्रेक्षकांवर स्वार होणारा चित्रपट - नीलांबरी जोशी


त्यांच्या मदतीने कैद्यांच्या छावणीतून निसटण्यात हॅच यशस्वी होतो. पॅरिसला जाऊन तो फ्रेंच रेझिस्टन्स या संघटनेशी संपर्क साधतो. प्रथम हॅचने सांगितलेल्या कैद्यांच्या संघटनेला सुटकेच्या या प्रयत्नात मोठाच धोका आहे, अशी भीती संघटनेला वाटते. पण नंतर ज्यावेळी त्यांना कळते की, हा सामना कोलंबस स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. तेव्हा ते पॅरिसमधील सांडपाण्याच्या व्यवस्थेतून भुयार खणून ते स्टेडियममधील खेळाडूंच्या कपडे बदलण्याच्या जागेतील शॉवररूमपर्यंत म्हणजे स्नानगृहापर्यंत पोहोचू शकतात, हे त्यांच्या ध्यानात येते. ते हॅचला सांगतात की, आता तू पुन्हा जर्मनांकडून पकडला जा. कारण त्यामुळेच तुला ही सारी माहिती तेथील कैदेत असणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना देता येईल.

नंतर हॅच खरोखरच जर्मनांकडून पकडला जातो आणि अर्थातच छावणीतून पलायन केल्यामुळे, आता तो पुन्हा सापडल्यावर त्याला एकांतवासाची शिक्षा फर्मावण्यात येते. या एकांतवासामुळे युद्धकैद्यांना ते भुयार आणि त्यांच्या पलायनाच्या व्यवस्थेबाबत काहीच कळत नाही. ही मोठीच अडचण ध्यानात आल्यानंतर कोल्बी जर्मन अधिकाऱ्यांना सांगतो की, आमच्या संघात हॅच असण्याची आवश्यकता आहे. कारण तो आमचा केवळ प्रशिक्षकच नाही, तर राखीव गोलरक्षकही आहे आणि आमच्या नियमित गोलरक्षकाचा हात मोडला आहे, त्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे. हॅचला संघात सामावून घेतले नाही, तर सामना होण्याची शक्यताच नाही. तरीही जर्मन अधिकारी त्याच्या या कळकळीच्या विनंतीला सहजी बधत नाहीत. ते सांगतात की, आम्हाला तो मूळचा गोलरक्षक खरोखरच जखमी झाल्याची शहानिशा करायची आहे. तो खरोखरच जखमी झाला असेल, अर्थात जर त्याचा हात मोडला असेल तर ते कोल्बीची गोलरक्षक बदलण्याची मागणी मान्य करतील, अर्थात हॅचला संघात समाविष्ट होण्याची परवानगी देतील. त्याबरोबरच युद्धकैद्यांना हे देखील सांगितले जाते की, केवळ या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यासाठीच त्यांना छावणीबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. सामना संपल्यानंतर त्यांना पुन्हा युद्धकैदी म्हणूनच छावणीत आणले जाईल.

रॉबर्ट हॅचचा संघात समावेश होणे महत्त्वाचे असल्याने कोल्बी एक धाडसी निर्णय घेतो. मूळ गोलरक्षकाचा हात खरोखरच मोडला आहे का, याची जर्मन अधिकारी तपासणी करणार असल्याने कोल्बीला खरोखरच त्या गोलरक्षकाचा हात मोडावा लागतो. आणि अखेर गोलरक्षक या नात्याने हॅचचा संघात समावेश करायला परवानगी मिळते. दरम्यानच्या काळात त्याने पलायनाची योजना सर्वांना सांगितलेली असते आणि मध्यंतराचे वेळी म्हणजे पूर्वार्ध/फर्स्ट हाफ संपल्यानंतर त्यांनी तेथून निसटायचे असा बेत ठरलेला असतो.

सामन्याचा दिवस येतो. सामना सुरु होतो. जर्मनीला या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याद्वारे प्रचारच करायचा असल्याने त्यांनी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिलेली असते. त्या परवानगीचा फायदा उठवून हा आगळा वेगळा सामना बघण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले असतात आणि ते युद्धकैद्यांच्या संघाला उत्तेजन देत असतात. सामना सुरू होतो आणि स्टेडियमवरील प्रेक्षक (आणि चित्रपटगृहातील प्रेक्षकही) सरसावून बसतात. सामना सुरू होतो खरा, पण थोड्याच काळात त्यांची निराशा होते कारण पाहता पाहता जर्मन संघाने आघाडी घेतलेली असते. इतकेच नाही, तर फर्स्ट हाफ म्हणजे सामन्याचा पूर्वार्ध संपतो तेव्हा ही आघाडी चार-एक अशी भक्कम वाढवलेली असते. मध्यंतराच्या काळात पलायनाचा विषय निघतो. हॅच खेळाडूंना घाई करायला सांगतो पण रसेल उस्मान हा इतर खेळाडूंना पटवून देतो की, आपण अजूनही विजय मिळवू शकतो आणि तेही त्याच्याशी सहमत होतात आणि हॅचलाही सामना पुढे खेळण्यासाठी विनवण्या आग्रह करतात. अखेर अजूनही आपण सामना जिंकू शकतो हे त्यालाही पटते आणि तो त्यांच्या विनंतीला मान्यता देतो.

उत्तरार्धाचा खेळ सुरू होतो आणि आता युद्धकैद्यांच्या संघातील खेळाडू नव्या जोमाने खेळू लागतात. सामना जिंकण्याच्या जिद्दीने, सामन्याचे अधिकारी लक्षात यावे एवढ्या उघडपणे जर्मन संघाच्या बाजूने असतात आणि सतत त्यांच्याच बाजूने कौल देत असतात. त्यामुळेच जर्मन खेळाडू युद्धकैद्यांच्या संघातील बऱ्याच खेळाडूंना जाणून बुजून, दांडगाईचा खेळ करून जखमी करतात, तरीही हे सामनाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. इतके होऊनही युद्धकैद्यांचा संघ प्रचंड प्रयत्न करून सामना 4-4 अशा बरोबरीत आणतो. नंतर दोस्त राष्ट्रांतील युद्धकैद्यांनी मोठ्या प्रयत्नाने विजयी गोल केला, तरीही सामनाधिकारी तो जाणून बुजून तो मान्य करत नाहीत. सामना पुढे सुरू झाल्यावर रॉबर्ट हॅच पुन्हा एक अप्रतिम बचाव करून चेंडू थोपवतो आणि गोलचे रक्षण करतो. सामना संपतो. पण यामुळे प्रेक्षकांना हा सामना युद्धकैद्यांच्या संघानेच 5-4 असा जिंकला असता अशी खात्री असते. त्यामुळे ते विजयोत्सव साजरा करू लागतात. मैदानावर खेळाडूंभोवती घोळका करतात. खेळाडूंना पलायनासाठी मदत करतात तसेच त्यांची ओळख पटू नये म्हणून वेश बदलण्यासाठीही सहाय्य करतात आणि प्रेक्षकांच्या गर्दीबरोबरच खेळाडूही स्टेडियमबाहेर निसटतात. त्यांनी स्वातंत्र्य मिळवलेले असते.

अशा या चित्रपटात मायकेल केन आणि सिल्वेस्टर स्टॅलन यांचा अपवाद करता सारे खेळाडू हे कोणत्या ना कोणत्या संघातील व्यावसायिक फुटबॉल खेळाडू होते. आणि या चित्रपटात काम करण्यासाठी ते आनंदाने तयार झाले. ब्राझीलचा ब्लॅक पर्ल म्हणून ओळखला जाणारा पेले (चित्रपटातील लुई फर्नांडिस), ब्रिटनचा आवडता बॉबी मूर (चित्रपटातील टेरी ब्रँडी), यांच्याप्रमाणे अर्जेंटिनाचा ओस्वाल्डो आर्डिल्स (चित्रपटातील कार्लोस रे), काझीमीर्झ डेन्या, पॉल व्हॅन हिम्सट, माइक समरबी हाल्वर थोरेसन वेर्नर रॉथ असे खेळाडू होते. शिवाय इस्पविच टाउनमधील अनेक खेळाडूही सहभागी होते, त्यात जॉन वार्क, रसेल ओस्मान, लॉरी सिबेल, रॉज्वन टर्नर आणि केविन ओ कॅलॅहन यांचाही समावेश होता. काही खेळाडू सामन्याच्या चित्रीकरणाचे वेळी अभिनेत्यांच्या डमीचे काम करत होते. केविन बीट्टीने मायकेल केनसाठी तर पॉल कूपर हा सिल्वेस्टर स्टॅलनसाठी डमी होते.

या चित्रपटाची कथा याबो याब्लोन्स्की, दोर्य मिलिसेविक आणि जेफ मॅख्युरी यांनी बनवली आणि पटकथा याबो याब्लोन्स्की आणि इव्हान जोन्स यांनी तयार केली होती. त्यात वास्तवापासून थोडी फारकत घेतली गेली, तरीही दिग्दर्शक आणि पटकथाकारांनी जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पेलेला ब्राझीलचा न दाखवता त्रिनिदादचा दाखवण्यात आले. कारण चित्रपटाचा काळ 1941-42 चा आहे. त्यावेळी ब्राझीलने युद्धात भाग घेतला नव्हता. नंतर 1944 मध्ये ब्राझील दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरला आणि त्या देशाचा ब्राझिलियन एक्स्पिडिएटरी फोर्स इटलीमध्ये दाखल झाला होता. अर्जेन्टिनाच्या कार्लोस रेच्या भूमिकेतील ओस्वाल्डोलाही कोणत्या एका ठराविक देशाचा दाखवण्यात आले नव्हते. ओस्वाल्डो हा खरे तर अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू. पण तो म्हणाला की, या चित्रपटात काम हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता. चित्रीकरणादरम्यान माइक समरबीची मायकेल केनशी मैत्री झाली. ती एवढी की, नंतर समरबीने शर्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यावर मायकेल केन हा त्याचा ठरलेला ग्राहक होता.

चित्रपटाच्या यशात प्रत्यक्ष चित्रीकरण करणारा जेरी फिशर याचा वाटा मोठा आहे. त्याने सुरुवातीला जवळपास अंधारात केलेले युद्धकैद्यांच्या छावणीचे चित्रण अप्रतिम आहे. छावणीचे वास्तवच जणू तो प्रेक्षकापुढे ठेवतो. फुटबॉल सामन्याचे आणि सामना संपल्यानंतरच्या प्रेक्षकांच्या गोंधळाचे चित्रीकरणही वाखाणण्याजोगे आहे. बिल काँटीने त्याच्या संगीताने सुरेख वातावरणनिर्मिती साधली आहे. त्यासाठी त्याने अनेक रचनांचा/सिम्फनींचा आधार घेतला असला तरी आवश्यक तो परिणाम साधला आहे.

शेवटी एक गमतीची गोष्ट ध्यानात राहते. मायकेल केन सुरुवातीला फळ्यावर आकृती काढून खेळाडूंना योग्य व्यूहरचना करून गोल कसा करायचा हे सांगतो. नंतर तो पेलेला विचारतो, “तू काय करशील?” त्यावर पेले त्याच फळ्यावरील तू आकृतीतील प्रतिस्पर्धी खेळाडूंना हूल देऊन त्यांच्या बाजूने, नागमोडी वळणे घेत गोलसमोर जाऊन गोल करीन, असे म्हणतो. मायकेल केनप्रमाणे प्रेक्षकही थक्क होतात. पेले ही काय चीज आहे हे सर्वांना उमगते.

असा हा चित्रपट आवर्जून बघावा असा आहे.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


एस्केप टु व्हिक्टरी या सिनेमाचा ट्रेलर :

 

Tags: मराठी सिनेमा युद्ध रशिया युक्रेन चित्रपट फुटबॉल Load More Tags

Add Comment