जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग : प्रेक्षकांवर स्वार होणारा चित्रपट

युद्धपटांवरील लेखमाला : 8

प्रत्येक माणसाच्या मनात काही पूर्वग्रह असतात, मनं दूषित झालेली असतात अशावेळी नि:पक्षपातीपणा ही केवळ संकल्पनाच आहे का? अशा मूलभूत प्रश्नांनाही हा चित्रपट हात घालतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नरसंहार केल्यानंतर काय? याबद्दलचे प्रश्न ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ या चित्रपटाआधी इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही चित्रपटात उपस्थित झाले नव्हते. गुंतागुंतीचे प्रश्न मांडणारा, सोपी उत्तरं शोधायला नकार देणारा आणि प्रेक्षकांना विचारात पाडून माहिती मिळवायला भाग पाडणारा जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग हा एक अत्युत्तम चित्रपट आहे.

“आमच्या देशात एक प्रकारचा आजार पसरला होता. बदनामी, संताप, बेरोजगारी, उपासमार यांचा तो आजार होता. लोकांच्या मनात एक सर्वात प्रमुख भावना होती – भीती. सर्वत्र भीती पसरली होती. आजची भीती, उद्याची भीती, शेजाऱ्याबद्दल भीती, स्वत:बद्दल भीती.

हे तुम्हाला समजू शकलं तर आमच्यासाठी हिटलर काय होता ते तुम्हाला कदाचित समजू शकेल. तो म्हणायचा, “ताठ मानेनं उभे रहा. जर्मन असल्याचा अभिमान बाळगा. आपल्यामध्येच काही दुष्ट लोक आहेत. उदाहरणार्थ, कम्युनिस्टस्, ज्यू, जिप्सी! या सगळ्यांचा विनाश झाल्यानंतर तुमची दैन्यावस्थाही संपेल”.

हे शब्द धादांत खोटे आहेत आणि खोट्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत हे आम्हाला कळत नव्हतं का? तरी आम्ही गप्प का बसलो? त्या सगळ्या (नरसंहारात) भाग का घेतला? तर आमचं आमच्या राष्ट्रावर प्रेम होतं. काही टोकाच्या विचारसरणीचे लोक राजकारणातून हद्दपार झाले तर काय बिघडेल? विशिष्ट वंशाच्या काही लोकांना (जगण्याचे) हक्क नाकारले तरी काय होईल? असा आम्ही विचार केला. हे सगळं फक्त काही काळापुरतं आहे. एका टप्प्यातून आम्ही काही काळ जाणार आहोत. नंतर तशी ती सगळी विखारी विचारसरणी आम्ही बाळगणार नाही. पण “आत्ता मात्र देशाला धोका आहे, (या लोकांना मारुन) तो धोकादायक टप्पा ओलांडून आपला देश पुढे जात आहे हे जास्त महत्त्वाचं आहे” असा आमच्या मनात तेव्हा विचार होता.

आम्ही या विचारसरणीबाबत किती यशस्वी झालो त्याला इतिहास साक्ष आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता इतकं भव्य यश आम्हाला सुरुवातीला मिळालं. द्वेष आणि सत्तालालसा यांच्या संयोगानं हिटलरनं जर्मनीला मंत्रमुग्ध केलं. आम्हाला आमच्या सामर्थ्याची गहिरी जाणीव झाली. आम्ही सुडेटनलॅंड बळकावलं, ऱ्हाईनलॅंड बळकावलं, लष्करी सामर्थ्य वाढवलं, ऑस्ट्रिया काबीज केला.. पुढे गेलो. आता धोका संपत चालला होता.

मग एक दिवस आम्ही मागे वळून पाहिलं, भोवताली पाहिलं.. तर आम्ही आधीच्यापेक्षाही भयंकर धोकादायक स्थितीत पोचलो होतो. या कोर्टात ज्या गोष्टींची चर्चा झाली, त्या गोष्टी आमच्या देशात घाणेरड्या आजारासारख्या पसरल्या होत्या. जी गोष्ट फक्त काही काळापुरती असणार होती, ती आता जीवनशैलीच झाली होती.”

‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ या चित्रपटातला बुध्दिमान जर्मन वकिल जानिंग जर्मन नाझी अधिकाऱ्यांनी हिटलरला का साथ दिली आणि ते कसं चुकलं हे या शब्दांमध्ये अखेरीस कोर्टासमोर मान्य करतो. तो या भाषणात कोर्टातल्या ज्या केसेसचा उल्लेख करतो, त्या काही केसेस या चित्रपटात तपशीलवार दाखवल्या आहेत.

1945 ते 1949 या काळात दोस्तराष्ट्रांनी नाझी जर्मनीतल्या व्यवस्थापन आणि लष्कर या विभागातल्या ज्या जर्मन अधिकाऱ्यांनी ज्यूंवर अत्याचार केले त्यांच्यावर ‘न्यूरेंबर्ग खटला’ चालवला होता. त्यापैकी जर्मनीतल्या न्यायाधीशांवरचा खटला 1947 मध्ये चालला होता. त्या जर्मन न्यायाधीशांच्या खटल्यावर 1961 सालचा ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ हा कृष्णधवल चित्रपट आधारित होता. जर्मनीतल्या ज्या चार न्यायाधीशांवर हा खटला चाललेला असतो, त्यापैकी जानिंग हा वकिल तर ‘मिनिस्टर ऑफ जस्टिस’ असतो.

60 लाख ज्यू लोकांची नाझी राजवटीत कत्तल झाली. या कत्तलीमध्ये या न्यायाधीशांची जबाबदारी किती? त्यांनी जर्मनीतल्या तेव्हाच्या कायद्यांची अंमलबजावणी कशी केली? असे काही प्रश्न चित्रपटात सुरुवातीपासून मांडलेले दिसतात. राज्य किंवा देश यांच्या आज्ञेनुसार केलेल्या गुन्ह्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर किती जबाबदारी आणि अपराधी भावना व्यक्तीच्या मनात असावी? असा प्रश्नही यात दिसतो. या चित्रपटातले सगळेच वकील आणि न्यायाधीश स्वत:च नैतिक मूल्यं बाजूला ठेवून देशहिताच्या नावाखाली चुकीचे निर्णय देतात. मात्र मानवतावादी दृष्टीकोनातून हे अयोग्य ठरतं असा संदेश या चित्रपटात मिळतो.

चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यांमध्ये 1948 साली डॅन हेवूड हा अमेरिकन न्यायाधीश न्यूरेंबर्गला पोचतो. शहरातल्या उध्वस्त झालेल्या इमारतींच्या दृश्यांमधून चित्रपट सुरु होतो. हेवूड मोटारगाडीतून त्या भग्न शहरातल्या रस्त्यांवरुन जाताना दिसतो. वृध्दत्वाकडे झुकलेला हेवूड संवेदनशील आहे. तो या खटल्यासाठी पोचतो तेव्हा हिटलर, गोबेल्स, गोरिंग हे ज्यूंच्या नरसंहारातले ‘मास्टरमाईंडस्’ मरण पावलेले असतात. महत्त्वाचे नाझी अधिकारी आधीच मारले गेल्यामुळे हेवूडच्या वाट्याला सुनावणीसाठी आलेले या खटल्यातले नाझी अधिकारी तुलनेनं दुय्यम आहेत. त्यामुळे हा खटला फारसा प्रतिष्ठित नाही हे जाणून तो चालवायला बऱ्याच अमेरिकन न्यायाधीशांनी नकार दिलेला असतो. हेवूडला हे सगळं नीट ठाऊक असतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले अभिनेते / अभिनेत्री हे ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यापैकी हेवूडचं काम स्पेन्सर ट्रेसी या वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अभिनेत्यानं उत्कृष्ट केलं आहे.

चित्रपटात पुढच्या दिवशी कोर्टात खटला सुरु होतो. डॉ. अर्न्स्ट जानिंग, एमिल हान यांच्यासह चार न्यायाधीशांवरचा हा खटला हेवूडसमोर चालतो. या सगळ्यांनी नाझी राजवटीत निरपराध माणसांना मृत्यूदंडापर्यंत कसं पोचवलं त्याच्या कहाण्या या चित्रपटात उलगडत जातात.

टॅड लॉस हा अमेरिकन वकील समोरच्या चार आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी या हेतूनं एक भावनेनं ओथंबलेलं ओपनिंग स्टेटमेंट करतो. नाझींनी केलेल्या छळवणुकीत सामील असलेले सर्व जबाबदार धरावेत आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशा मताचा तो असतो.

बचावपक्षाचा जर्मन वकील हान्स रॉल्फ हा त्या आरोपांवरचं आपलं स्टेटमेंट चतुराईनं करतो. हान्सची स्टेटमेंटस् दुसऱ्या महायुध्दातल्या हत्याकांडाच्या जबाबदारीबद्दल उत्तम भाष्य करतात. “न्यायाधीश कायदे तयार करत नाहीत. ते फक्त कायदेपालन करायला मदत करतात. माझा देश चूक का बरोबर हे देशभक्ती या भावनेपुढे फिकं पडलं. तसंच हिटलरच्या आज्ञांचं उल्लंघन करणं हे देशभक्ती आणि देशद्रोह अशाच पर्यायांमध्ये तेव्हा विभागलेलं होतं. या सगळ्या आरोपींनी त्यांच्या देशातला कायदा पाळला. त्यामुळे त्यांना अपराधी ठरवता येत नाही. त्यांना आरोपी ठरवणार असलात तर सगळ्याच जर्मन लोकांना यासाठी जबाबदार मानून त्यांच्यावर खटला चालवावा लागेल” अशी भूमिका हान्स घेतो. अमेरिकेची जबाबदारी तो या स्टेटमेंटमध्ये सतत दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपली भूमिका मांडताना स्वत:ची पोळी या युद्धात भाजून घेणाऱ्या अमेरिकन कंपन्या आणि इंग्लंड या देशांनाही जबाबदार धरावं असं मत तो मांडतो. हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं बॉंबहल्ल्यामुळे कशी बेचिराख झाली त्याचे फोटो तो दाखवतो. हे बॉम्बहल्ले घडवून आणणाऱ्या माणसांची नीतीमूल्यं उच्च दर्जाची होती का? असा प्रश्नही तो करतो.

हा खटला चार जर्मन न्यायाधीशांवर चालू असला तरी सगळ्यांचं लक्ष एकवटलेलं असतं ते जानिंगवर. ‘मॅन आॉफ द लॉ’ या उपाधीनं जानिंग जगभरात प्रसिद्ध असतो. त्याची पुस्तकं कायद्याच्या पाठ्यक्रमात असतात. नाझी राजवटीत काळात तो ‘मिनिस्टर ऑफ जस्टिस’ असतो. त्या पदावर पदोन्नती होण्याआधी जानिंगचा समाजाच्या सर्व स्तरात आदर केला जात असतो. त्याच्यावर या खटल्यात खून, छळ, अमानुष अत्याचार हे आरोप असतात. मानवतेच्या इतिहासातलं सर्वात भीषण हत्याकांड रचण्यासाठी त्याला जबाबदार धरलेलं असतं. फ्रॅंझ शेलेजेलबर्जर या प्रत्यक्षातल्या नाझी वकिलावर जानिंगची व्यक्तिरेखा आधारित होती. योग्य तो न्याय करणारा हा अधिकारी नाझी राजवटीत खरंच बदलला होता. त्यानं अनेक निरपराध ज्यूंच्या फाशीच्या शिक्षांवर सह्या केल्या होत्या. उदाहरणार्थ, केवळ अंड्यांचा साठा केला या गुन्ह्याबद्दल त्यानं एका ज्यू माणसाला मृत्यूदंड ठोठावला होता.


हेही वाचा : बॅटलशिप पोटेमकिन : आयझेन्स्टाईनचा 100 वर्षानंतरही लक्षात राहणारा मूकपट - अच्युत गोडबोले


‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मध्ये दोन प्रमुख खटले दाखवले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे, रुडॉल्फ पीटरसन या व्यक्तिरेखेला सक्तीनं नसबंदीला सामोरं जावं लागलेलं असतं. रुडॉल्फचं काम माँटगॉमेरी क्लिफ्ट या अभिनेत्यानं उत्तम साकारलं आहे. कम्युनिस्ट विचारसरणीच्या पीटरसन कुटुंबावर हिटरलचा मुळात राग असतो. त्यांना त्रास देण्याच्या घटना पूर्वी घडलेल्या असतात. तशातच रुडॉल्फला काहीतरी कारण काढून कोर्टात खेचतात. त्याला एक चाचणी द्यायला लावून मंदबुद्धी ठरवतात. अशा मंदबुद्धी लोकांनी पुढची पिढी जन्माला घालू नये यासाठी त्याला सक्तीची नसबंदी करायला लावलेली असते.

या आरोपावर बचावपक्षाचा वकील हान्स चक्क अमेरिकेतला गाजलेला न्यायाधीश आॉलिव्हर वेंडेल होम्स यांनही अशाच नसबंदीला कशी मान्यता दिली होती असा बचाव करतो. 1927 साली ‘बक विरुध्द बिल’ या गाजलेल्या खटल्यात होम्सनं तसा आदेश खरोखर दिलेला होता या घटनेचा तो आधार घेतो. अमेरिकेत युजेनिक्स म्हणजे विशिष्ट वंश, वर्ण असलेल्या लोकांना कमी प्रतीचं लेखून सक्तीची नसबंदी करण्याच्या उदाहरणांबाबत सिध्दांत मुखर्जी यांच्या ‘द जीन’ या पुस्तकातही वाचायला मिळतं.

‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मध्ये अशा पध्दतीनं - एखाद्याला कमी प्रतीचं ठरवणं, नाझींनी केलेले अत्याचार - हे मुद्दे बाजूला ठेवून बचावपक्षाचा वकील रुडॉल्फ मंदबुद्धी आहे की नाही हे तपासणारे उलटसुलट प्रश्न उपस्थित करतो. या दृश्यात मूळ मुद्दा बाजूला ठेवून खटला भलतीकडेच कसा नेला जातो ते पाहायला मिळतं.

या चित्रपटातली दुसरी महत्त्वाची केस आयरीन हॉफमन या महिलेची असते. स्वत: आर्यन असून फेल्डेनस्टाईन या ज्यू पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवले, यासाठी फेल्डेनस्टाईनला फाशी दिली गेलेली असते. आयरीनलाही हे कृत्य केल्याबद्दल दोन वर्षांचा तुरुंगवास सोसावा लागलेला असतो. कॅटझेनबर्गर या प्रत्यक्षातल्या केसवर आयरीनची केस बेतलेली आहे.

फेल्डेनस्टाईन हा आयरीन राहत असलेल्या इमारतीचा घरमालक असतो. तिच्या लहानपणापासून आयरीनला ओळखणाऱ्या फेल्डेनस्टाईनला तिच्याबद्दल वडिलांसारखं ममत्व असतं. तिला वडिलांच्या मायेनं जवळ घेण्याचा अर्थ शारीरिक संबंध असा लावला जातो. ज्या जर्मन नाझी अधिकाऱ्यांसमोर खटला चालतो तिथे वकील असतो एमिल हान आणि न्यायाधीश असतो जानिंग. त्या पूर्वीच्या खटल्याच्या वेळी “तू हे संबंध कितीही नाकारलेस तरी उपयोग नाही. मी फेल्डेनस्टाईनला शिक्षा देणारच आहे” असं एमिल हाननं आयरीनला सांगितलेलं असतं. ती तसं साक्षीत कबूल करते. पण त्याचबरोबर “आपल्याला जानिंगकडून अपेक्षा होती. तो न्यायानं वागणारा होता” असं आयरीन चित्रपटात चाललेल्या खटल्यात सांगते. मात्र जानिंगच फेल्डेनस्टाईनच्या मृत्यूच्या शिक्षेवर सही करतो.

आयरीनवरच्या खटल्यातही हान्स, “आयरीन हॉफमनला न्यूरेंबर्ग कायदा माहिती होता का? त्या कायद्यान्वये आर्यन लोकांनी ज्यू लोकांबरोबर कोणत्याही प्रकारची शारीरिक जवळीक दाखवायला असलेली मनाई माहिती होती का?” असे प्रश्न विचारतो. थोडक्यात आयरीननंच कायदा मोडला आणि जानिंग मात्र तेव्हा फक्त आपलं कर्तव्य निभावत होता अशा प्रकारचं चित्र हान्स रंगवायचा प्रयत्न करतो.

आयरीनचं फेल्डेनस्टाईनबरोबर प्रकरण होतं असं हान्स सिद्ध करायचा प्रयत्न करत असताना जानिंग त्याला अडवतो आणि ‘एकदा आपण पूर्वी केलेली चूक परत करु नये’ असं त्याला बजावतो. संपूर्ण चित्रपटात आपल्या खुर्चीवर शांतपणे बसलेला जानिंग या एकाच प्रसंगात दीर्घकाळ बोलतो. या भाषणात अखेरीस ‘रेल्वेस्टेशनवर कत्तलखान्यात निघालेल्या गुरांच्या गाड्यांमधून निष्पाप लहान मुलं भरुन निघालेली दिसत असताना आपण कुठे होतो’ असा प्रश्न जानिंग विचारतो. एमिल हान तेव्हाही त्याला देशद्रोही म्हणतो. तळागाळातल्या सामान्य लोकांपासून अफाट बुद्धिमत्ता असलेल्या शास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांपर्यंत हिटलरनं ‘आपला देश, जर्मनी ज्यू लोकांपासून वाचवणं हे किती महत्त्वाचं आहे’ हा राष्ट्रवादाचा प्रपोगंडा दुसऱ्या महायुध्दापूर्वी कोणत्या थरापर्यंत केला त्याचं चित्रपटातलं हे भाषण उत्तम उदाहरण आहे. बर्ट लॅंकेस्टर या अभिनेत्यानं यात अप्रतिम अभिनय केला आहे.

(फॉर लव्ह ऑफ कंट्री – जानिंगचं भाषण – युट्यूब लिंक)

चित्रपटात यानंतरच्या दिवशी अमेरिकन वकील टॅड लॉस हा छळछावण्यांमध्ये असलेला प्रेतांचा खच, बुलडोझरनं प्रेतांची विल्हेवाट लावणं, गॅस चेंबरची रचना, भट्ट्यांमध्ये सापडलेले मृतदेह, काही छळछावण्यांमध्ये जिवंत प्रेतांसारखी चिपाडं झालेली ज्यू माणसं आणि हातावर गोंदवलेला कैदी क्रमांक दाखवणारी ज्यू लहान मुलं असे व्हिडिओज दाखवतो. यावरही एमिल हान आपण जबाबदार नसताना हे का दाखवलं यावर रागावतो. मुळात कोर्टात अशी दृश्यं दाखवणं बरोबर नाही असं हान्स हा बचाव पक्षाचा वकील म्हणतो. प्रत्यक्ष छळछावण्यांमधल्या अशा प्रकारच्या चित्रफिती दाखवणारा जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग हा पहिला चित्रपट होता.

शेवटच्या दिवशी जज हेवूड चारही न्यायाधीशांना जन्मठेपेची शिक्षा सुनावतो.

खटला संपल्यावर अमेरिकेला परत जाण्याआधी एकदा हेवूडनं आपल्याला कोठडीत भेटायला यावं अशी इच्छा जानिंग व्यक्त करतो. हेवूड ते मान्य करतो. त्यांच्या भेटीत खटला चांगला चालवल्याबद्दल जानिंग त्याचं अभिनंदन करतो. हेवूड निघत असताना जानिंग म्हणतो, “मला हे (ज्यूंचं शिरकाण) चाललं आहे हे खरंच माहीत नव्हतं”. त्यावर हेवूड म्हणतो, “माणूस निरपराध आहे हे ठाऊक असूनही तू जेव्हा प्रथम त्याला फाशीची शिक्षा दिलीस तेव्हाच तुला ते ठाऊक झालं”. ‘शिंडलर्स लिस्ट’ चित्रपटामधला शिंडलर ‘हूएव्हर सेव्हज वन लाईफ, सेव्हज द वर्ल्ड एंटायर’ असा संदेश देतो. ‘एका निरपराध माणसाला मारणं म्हणजे संपूर्णत: माणुसकीचा नाश करणं आहे’ हा ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मधला संवाद तोच विचार अधोरेखित करतो.

‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मन जनतेची मन:स्थिती काय होती ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, Wenn Wir Marschieren हे जर्मन लोकगीत अनेकदा ऐकू येतं. रेस्टॉरंटस्, पब, काही स्नेहमेळावे चालू असताना हे लोकगीत वाजतं. युद्ध संपल्यानंतर दोन वर्षं होऊन गेली असली तरी सगळ्या जर्मन लोकांकडे दोस्त राष्ट्रांमधले लोक ज्या दूषित दृष्टीकोनातून पाहत असतात त्याविरोधात हे गाणं वाजतं. जर्मन लोकांकडे एकाच दृष्टीकोनातून पाहून त्यांच्या राष्ट्राभिमानाला धक्का लावण्याच्या विरोधात हे गाणं ऐकू येतं. तसंच हे घडत असताना मागे भग्न झालेल्या जर्मनीचे अवशेष सतत दिसतात. आपल्या पूर्वीच्या नेत्यांवरच्या खटल्यात अमेरिकेनं लुडबूड करावी हे जर्मन लोकांना मान्य नसतं. त्यांचा अमेरिकन लोकांवर विश्वास नसतो.

तसंच, मर्लिन डिट्रिच या दिग्गज अभिनेत्रीनं युद्धकाळात केलेल्या गुन्ह्यांसाठी फाशी गेलेल्या एका जर्मन जनरलच्या विधवेचं – मिसेस बर्टहोल्डचं काम केलं आहे. मिसेस बर्टहोल्डच्याच आधीच्या घरात हेवूड या खटल्यासाठी काम करताना राहत असतात. आपल्या वस्तू न्यायला आलेल्या मिसेस बर्टहोल्डशी त्यांची ओळख होते. त्यांच्यातलं एक हृद्य, समजूतदार नातं या चित्रपटात पहायला मिळतं. पियानो कॉन्सर्टसना ती हेवूडला आमंत्रित करते. “आपल्या नवऱ्याची फाशी हा एक राजकीय खून होता” असं ती हेवूडला सांगते. “सामान्य जर्मन लोकांना काय ज्यूंबाबत काय घडतंय ते माहीत नव्हतं” असं तीदेखील हेवूडला ठासून सांगते. ती असं सांगत असतानाच कॅमेरा जर्मन लोक बारमध्ये गात आहेत इकडे वळतो. जर्मन लोकांना आपला भूतकाळ विसरायचा आहे असं या दृश्यातून दिग्दर्शकाला दाखवायचं असावं. 

या चित्रपटाचा दिग्दर्शक होता स्टॅनली क्रॅमर. वर्णभेदावर आधारित ‘द डिफायंट वन्स’ आणि ‘गेस हू इज कमिंग टू डिनर’, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि धार्मिक वादावर आधारित ‘इनहेरिट द विंड’ अशा प्रकारचे वादग्रस्त चित्रपट काढणाऱ्या क्रॅमरनं चित्रपटांमधून कायम सामाजिक आणि राजकीय संदेश दिले होते. ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मध्ये दुसऱ्या महायुद्धात जे घडलं त्याची जबाबदारी फक्त जर्मनीवर नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्याच देशांची कशी आहे त्यावर स्टॅनली क्रॅमर अनेक संवादांमधून अप्रत्यक्ष प्रहार करतो. यासाठी स्टॅनली क्रॅमरला नंतर टीकेला सामोरं जावं लागलं. अमेरिकन असूनही त्यानं अशी विचारसरणी मांडल्याबद्दल ती टीका होती. जर्मनीमध्ये तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्षं चालला नाही. जर्मन लोक थिएटरमधून उठून जायचे. “स्टॅनलीनं हा चित्रपट काढणं हे फार धाडसाचं काम होतं” असे उद्गार करेन क्रॅमर या त्याच्या बायकोनंही काढले होते. मात्र या चित्रपटाला 11 ऑस्कर नामांकनं मिळाली. अ‍ॅबे मान याला पटकथेचं आणि मॅक्समिलियान शेल याला हान्स रॉल्फच्या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचं ऑस्कर पारितोषिक लाभलं.

या चित्रपटाच्या निमित्तानं काही मुद्दे विचारात घ्यावेसे वाटतात. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे प्रपोगंडा. 1937 साली अमेरिकेत ‘कोलंबिया विद्यापीठा’च्या प्राध्यापक क्लाईड मिलर यांनी ‘इन्स्टिट्यूट फॉर प्रपोगंडा अ‍ॅनॅलिसिस-आयपीए’ सुरु केली. युरोपमध्ये चाललेल्या प्रपोगंडामुळे अमेरिका परत एकदा युरोपमधल्या कुरबुरींमध्ये ओढली जाईल असं मिलर यांना वाटत होतं. यावर संशोधन करण्यासाठी मिलर यांना तेव्हा 10000 डॉलर्सची देणगी एका धनाढ्य माणसानं देऊ केली होती.

अमेरिकेत गोऱ्या लोकांनी कृष्णवर्णीय लोकांविरोधात चालवलेली ‘कू क्लक्स क्लॅन’ ही चळवळ, कम्युनिझममधला क्रूरपणा, अंतर्गत फॅसिझम आणि एकांगी जाहिराती हे लोकशाहीला घातक आहे असं वाटणाऱ्यांपैकी मिलर एक होता. युरोपमधला युद्धाबद्दलचा वाढता प्रपोगंडा अमेरिकन लोकांच्या ‘स्पष्ट आणि सरळ’ विचार करण्याच्या क्षमतेच्या आड येतो आहे असं त्यांना वाटत होतं. याचं विश्लेषण करण्यासाठी मिलर यांनी एक समिती तयार केली. समितीनं ‘प्रपोगंडा अ‍ॅनॅलिसिस’ हे मासिक सुरु केलं. त्या मासिकाच्या दुसऱ्या अंकात ‘हाऊ टू डिटेक्ट प्रपोगंडा’ हा लेख छापला होता. प्रपोगंडा कसा ओळखावा याबाबत त्यात सात महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.

त्यातला एक मुद्दा होता, तो म्हणजे प्लेन फोक्स. एखादी संकल्पना, एखादा कार्यक्रम, एखादं उत्पादन किंवा एखादा माणूस आदरणीय किंवा द्वेष करण्याजोगा आहे असं समाजात पसरवायचं. “हे लोकांच्याच भल्यासाठी आहे” असं आपल्या भाषणातून एखादी संकल्पना मांडताना ठासून आणि वारंवार सांगायचं. याला ‘प्लेन फोक्स’ म्हणलं जातं. हिटलरनं प्लेन फोक्स हे तंत्र वापरुन आपण जनसामान्यांचे नेते आहोत हे लोकांच्या मनावर ठसवलं असं ‘इन्स्टिट्यूट फॉर प्रपोगंडा अ‍ॅनॅलिसिस-आयपीए’मधल्या जर्मन फॅसिझमच्या तंत्रांच्या विश्लेषणात मान्य केलं होतं.

‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’वरुन लक्षात येणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेची आता चालू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धातली भूमिका. हा मुद्दा ख्रिस हेजेस या पत्रकारानं आपल्या एका लेखात उत्तमरीतीनं मांडला आहे. 1945 ते 1989 या काळात अमेरिकेचं रशियाबरोबर चाललेलं शीतयुद्ध जगाच्या बुद्धीबळाच्या पटावर सगळ्यांना दिसत होतं. या काळात देशाच्या सुरक्षेच्या कारणाखाली शीतयुद्धात सहभागी झालेल्या सगळ्यांनी – कामगार चळवळी, माध्यमांचं स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि अमेरिकेच्या शस्त्रास्त्रं पुरवठ्यावरच्या अर्थव्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे सर्व - या सगळ्यांना सतत चिरडायचा प्रयत्न केला. रशियाबरोबर शांततापूर्ण साहचर्य या प्रकारानं संपुष्टात येत गेलं. सोव्हिएट युनियनचे तुकडे झाले. शीतयुद्धाच्या काळानंतर नाटोला (North Atlantic Treaty Organization) मध्य युरोपात घुसवणं ही अमेरिकन धोरणांमधली सर्वात मोठी चूक होती असं हेन्री किसिंजरसारख्या मुत्सद्दी राजकारण्याचं मत होतं.

या काळात जर्मनीच्या सीमांबाहेर नाटोचा शिरकाव होऊ देणार नाही हे वचन अमेरिकेनं पाळलं नाही. पोलंड, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, बल्गेरिया, इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, अल्बानिया, क्रोएशिया आणि उत्तर मॅसेडोनिया हे देश पाश्चिमात्य लष्करांच्या युतीत आणले. इतकं पुरेसं नव्हतं म्हणून अमेरिकन फौजांचा समावेश असलेल्या नाटोच्या फौजा पूर्व युरोपमध्ये पोचल्या. वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यात झालेल्या कराराचं ते उल्लंघन होतं. रशियाचं युक्रेनमध्ये घुसणं हा वेडेपणाचा निर्णय याची परिणती ठरला.

‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मध्ये दाखवल्यानुसार दुसरं महायुध्द संपल्यानंतर खटला चालवण्यात अमेरिकेनं सहभाग घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर महायुद्ध घडत असताना अमेरिकेनं किती आणि कधी जबाबदारी घेतली असा प्रश्न मांडला आहे. युक्रेन-रशिया युद्धाच्या बाबतीत हेच घडतं आहे.

‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ या चित्रपटामुळे तिसरा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा. न्यूरेंबर्ग खटल्यानं आंतरराष्ट्रीय न्यायालय या संकल्पनेला चालना दिली. त्याचा कितपत उपयोग होतो असा विचार केला तर 1994 साली झालेला रवांडामधला नरसंहार आठवतो. या देशात यादवी युद्धात पाच ते सहा लाख माणसं मरण पावली. युनायटेड नेशन्सनं यात हस्तक्षेप करुन खटला चालवण्याचा प्रयत्न मात्र फसला.


हेही वाचा : फोर डेज ऑफ नेपल्स : युद्ध येता दारी - आ. श्री. केतकर


देशादेशांमधले राजकीय संबंध ताणलेले असताना ते लक्षात घेऊन नरसंहार आणि त्यानिमित्तानं दिला जाणारा न्याय हे सांभाळणं न्यायाधीशांना कसं कठीण जातं हे ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’मध्येदेखील दिसतं. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धात बर्लिनचा पाडाव झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांना दोन गोष्टी करता आल्या. एक म्हणजे, आंतरराष्ट्रीय कायदे करणं. दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिझमविरुद्धच्या आपल्या लढ्यात जर्मनीला सामील करुन घेता येणं. याचा दबाव असल्यामुळे युद्धकैद्यांना कमी शिक्षा ठोठावणं आणि काहींवर खटलेच न चालवणं असं दोस्त राष्ट्रांना करावं लागलं. “त्यांच्या नेत्यांना तुरुंगात कठोर शिक्षा करुन टाकलं तर जर्मन जनता आपल्याविरोधात जाईल. आपल्याला जर्मन जनतेची मदत हवी आहे” असं चित्रपटात एक अमेरिकन सिनेटर हेवूडला म्हणतो तेव्हा हे जास्त स्पष्ट होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा न्याय राजकारणामुळे झाकोळतो हे स्पष्ट होतं. तसंच, अमेरिका हा आपण नैतिकतेचा मापदंड आहोत असं जगाच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करत असली तर प्रत्यक्षात तसं नक्कीच नाही हे या चित्रपटात दिसतं.

आजही आंतरराष्ट्रीय न्यायालयं राजकीय नेत्यांवर खटले चालवताना संपूर्ण नि:पक्षपाती धोरणं राबवत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारण, स्पर्धा, जनता यांचा कौल लक्षात घेतला जातोच. अमेरिका स्वत: इराक आणि अफगाणिस्तानातल्या युद्धात जे वागली त्याबद्दल काय? आज या सगळ्या प्रश्नांनी उग्र रुप धारण केलं आहे. मानवी हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालय असावं, जगात शांतता नांदण्यासाठी ते गरजेचं आहे पण त्यातले गोंधळ नष्ट व्हावेत अशी भूमिका हा चित्रपट मांडतो.

प्रत्येक माणसाच्या मनात काही पूर्वग्रह असतात, मनं दूषित झालेली असतात अशावेळी नि:पक्षपातीपणा ही केवळ संकल्पनाच आहे का? अशा मूलभूत प्रश्नांनाही हा चित्रपट हात घालतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नरसंहार केल्यानंतर काय? याबद्दलचे प्रश्न ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ या चित्रपटाआधी इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही चित्रपटात उपस्थित झाले नव्हते.

गुंतागुंतीचे प्रश्न मांडणारा, सोपी उत्तरं शोधायला नकार देणारा आणि प्रेक्षकांना विचारात पाडून माहिती मिळवायला भाग पाडणारा जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग हा एक अत्युत्तम चित्रपट आहे. ‘मी लिहिलेल्या नाटकांनी प्रेक्षकांपुढे काही भावनात्मक नाट्य सादर करावं आणि प्रेक्षकांनी नाटक संपल्यावर काही क्षणानंतर त्या भावनांमधून अलगद बाहेर पडावं याऐवजी, त्या नाटकांनी प्रेक्षकांचा गळा पकडावा आणि ती त्यांच्यावर कायमची स्वार व्हावीत अशीच माझी इच्छा आहे’ असं आर्थर मिलर हा नाटककार स्वत:च्या नाटकांबद्दल म्हणाला होता. ‘जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग’ याच पठडीतला चित्रपट आहे. तो तुम्हाला छळत राहतो…!

(नाझी छळछावण्यांची दृश्यं – युट्यूब लिंक)

- नीलांबरी जोशी
neelambari.joshi@gmail.com 
(लेखिका, मुख्यतः संगणकतज्ज्ञ म्हणून परिचित असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची 15हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. त्याचबरोबर जागतिक साहित्य, चित्रपट, मनोविकार, औद्योगिक मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.)

संदर्भ :
Hedges: Waltzing Toward Armageddon with the Merchants of Death


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग या सिनेमाचा ट्रेलर :

 

Tags: लेख मराठी सिनेमा युद्ध रशिया युक्रेन चित्रपट Load More Tags

Comments:

Amartya jaybhaye

really indepth and informative article for a modern cinephile the sound and over the top dramatic acting is a bit jarring and surreal, and also because mainstream movies are so loud and over the top a bit nuanced and subtle movies with silence and less sound and cinematography gimmick's is more of what i prefer but i will try to check out

Add Comment