वारसास्थळे हीच शहराची शक्तिस्थळे हे पटवून देणारे पुस्तक

महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेले शहर म्हणजे नाशिक. जनमानसाला या शहराच्या प्राचीन इतिहासाच्या उदरात घेऊन जाण्याचा प्रयत्न म्हणजे रमेश पडवळ लिखित 'वारसायण' हे पुस्तक. 

संवेदनशील पत्रकाराच्या मुशाफिरीतून मानवी उत्क्रांतीच्या खुणा उलगडणारे पुस्तक, असे या लिखाणाचे स्वरूप आहे. लेखकाने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आढळणाऱ्या महत्त्वाच्या छत्तीस वारसास्थळांना भेट देऊन, त्यांची प्राचीन ते सद्यस्थिती यावर लिहिलेली लेखमाला या संग्रहात एकत्रित करण्यात आलेली आहे. यातील पंचवीस वारसास्थळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतात, तर केंद्र पुरातत्व विभागाच्या अंतर्गत अकरा वारसास्थळे आहेत.

'वारसायण' वाचताना सर्वप्रथम लेखकाचे मनोगत समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. या लिखाणाविषयी स्वत:चा स्वच्छ दृष्टीकोन समजून सांगताना ते स्पष्ट करतात की, "इतिहासाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा असू शकतो. कोणी इतिहासाकडे धर्म, जात या भावनेतून पाहतो, तर कोणी निरपेक्षपणे. माझा या वारसास्थळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यापेक्षा वेगळा आहे. ही वारसास्थळे नाशिक शहराची शक्तिस्थळे आहेत. या शहराचा खरा इतिहास आहे. या शक्तिस्थळांचा इतिहास सोप्या शब्दांत सर्वांसमोर यावा, हा यामागील हेतू आहे." 

ओघवत्या सहजसुंदर भाषाशैलीत लिहिलेला प्रत्येक लेख नाशिक शहराला अश्मयुग, नव अश्मयुग, ताम्र पाषाणयुग या कालखंडांत संदर्भासह जोडणारा ठरला आहे. मौर्य, सातवाहन या काळातील पांडवलेणी, शिलालेख यांचे या पुस्तकातील संदर्भ त्या काळातील संपन्न इतिहासाचे दर्शन घडवतात. 

या पुस्तकातील लेखांमधून पुरातत्त्वीय, पौराणिक व ऐतिहासिक घटना यांचे अभ्यासपूर्ण संदर्भ देत लेखकाने आपले निरीक्षण मांडले आहे. त्यामुळे हे लेख वाचून वाचकांना वैचारिक आनंदही मिळू शकेल, असा विश्वास वाटतो. संरक्षित वारसास्थळ जपणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी केवळ सरकारनेच नव्हे तर सामान्य जनतेनेदेखील सहकार्य करणे आवश्यक आहे, असे लेखक सुचवत असल्याचे वारंवार जाणवते.

वारसा या शब्दाबद्दल लेखक स्पष्ट करतात की, "वारसा हा मूळ अरबी शब्द आहे. तो आपल्या भारतीय भाषांमध्ये सहजतेने सामावून गेला आहे. 'दाय' हा हिंदू धर्मशास्त्रातील शब्द त्याला समानार्थी आहे. (पितादिधनं दीयते इति दाय:). दाय म्हणजे पित्याकडून अथवा नातेवाईकांकडून मिळणारे धन असा होतो. तसेच वारसा म्हणजे पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट मग ती मूर्त - अमूर्त दोन्ही स्वरूपात असते." यांसारख्या उदाहरणांद्वारे हे पुस्तक आपल्याला भाषा व लोकजीवन या संदर्भातही अगदी सहजपणे विचार करायला लावते.

समाजजीवनाचे स्वरूप काळानुसार बदलत असले तरी लोकजीवनातील काही संदर्भ खूप खोलवर रुजलेले असतात. त्याच लोकजीवनाचा शोध लेखक या पुस्तकातील लेखांमधून घेताना दिसतात. लेखकाकडे या लोकजीवनात डोकावण्याची प्रसन्न व शोधक दृष्टी आहे, असे हे लेख वाचताना जाणवते. त्यामुळे 'आपले संशोधन हे प्राचीन वारसास्थळांची ओळख व त्याविषयीची आस्था वाढविण्यासाठी आहे' असे लेखक प्रत्येक लेखाच्या अखेरीस स्पष्ट करताना दिसतात. इतिहास, पुराणकथा, धर्मस्थळे यांविषयी लेखन करताना ही वैचारिक स्पष्टता राखणे अतिशय महत्त्वाचे असते.

'वारसायण'चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील छायाचित्रे. या पुस्तकात मंदिरातील शिल्पे, लेणी, उत्खननातील वस्तू यांची अनेक कृष्णधवल छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे लेखांची सत्यता व या वास्तूंची वर्तमानातील स्थिती स्पष्ट होण्यात मदत होते. प्राचीन मानवी इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या पांडव लेणींची छायाचित्रेही या पुस्तकात दिली आहेत. या चित्रांमुळे लेणीच्या भव्यतेची जाणीव होते.

महाराष्ट्रात ज्या भागात बेसाल्ट हा खडक अस्तित्वात आहे तिथे लेण्यांची निर्मिती करणे शक्य झाले. त्यामुळे भारतातील सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात असल्याचा त्यांचा भूगर्भशास्त्रीय संदर्भ अभ्यासक म्हणून मांडणे आज उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे अनेक दंतकथांना नकळत छेदही दिला गेला आहे.  

सम्राट अशोक यांच्याबाबत देखील एक महत्त्वाचा संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतो. "अशोकाने सर्व  प्रथम आजीवक पंथाला लेणी बांधण्यासाठी दान दिले होते. विशेष म्हणजे, आजीवक हा पंथ बौद्ध धर्माला अथवा इतर कोणत्याही धर्माला मानणारा नव्हता. म्हणजे सर्वप्रथम जी लेणी बांधली गेली ती निधर्मी लेणी होती, असे मानायला हरकत नाही." ही लेखकाची विधाने अभ्यासक म्हणून मांडलेली मते असल्याची जाणीव होते. 

पांडव लेणीबद्दल काही दंतकथा अस्तित्वात आल्या आहेत. या लेणी मुळात बौद्ध लेणी आहेत, मात्र दंतकथांचे जाळे अद्भुत किमया करीत असते. हिंदू जनमानसात रात्रीत मंदिरे उभारणाऱ्या वरदान विषयक दंतकथा सांगितल्या जातात. तो प्रभाव पांडव लेणी या नावाच्या संदर्भात आहे, असा निर्वाळा लेखक देतात. तेथील लेण्यांवर जैन प्रभावदेखील असल्याचे ते स्पष्ट करतात. बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासासाठी या लेणी कोरल्या गेल्या. इथे नाशिक या शहराचे नाव 'नासिक'असल्याचा एका शिलालेखात उल्लेखही मिळतो. लेखकाने नाशिक जिल्ह्यातील बौद्ध लेणी, जैन लेणी, हिंदू मंदिरे, किल्ले यांचा असा तार्किक आढावा या पुस्तकात घेतल्याचे स्पष्टपणे दिसते. 

नाशिक परिसरातील या लेणी व  मंदिरांना संरक्षित वारसास्थळ घोषित करण्याची ही प्रक्रिया ब्रिटीशांच्या काळात सुरू झाली. लेखकाने ज्या वारसा स्थळांची पाहणी केली त्यांचे महत्त्व ब्रिटीशांनी आपल्या पाहाणीतून त्या काळीच ओळखले होते. एडवर्ड येस्ट, आर्थर बेस्ट व इतर अभ्यासकांनी हा इतिहास 1847 ते 1853 या काळात प्रकाशात आणला. पांडव लेणी ब्रिटीशांच्या काळातच, म्हणजे 1916 मध्ये संरक्षित स्थळ म्हणून घोषित केली गेली. यानंतर 1950-51 मध्ये भारतीय पुरातत्व विभाग व डेक्कन कालेज पुणे यांनी देखील येथील काझी गढी येथील उत्खननात भर घालून अहवाल मांडलेले आहेत. या वारसास्थळांचा इतिहास व सर्वेक्षण असा बहुअंगी वेध लेखकाने 'वारसायण'मध्ये घेतला आहे .

महाराष्ट्रातील पेशवाईची साक्ष असलेल्या नाशिक येथील 'सरकारवाडा' या वास्तूने अनेक राजकीय चढउतार पाहिले आहेत. 1750 ते 1760 या काळात ती बांधली गेली. पेशव्यांच्या माता गोपिकाबाई नाशिकमध्ये असताना इथून कारभार करीत असत, त्यावेळी या वास्तूचे सरकारवाडा व सदर असे नाव पडले. पुढे पेशवाई अस्तास गेली, ब्रिटीशांनी या वाड्याचे रुपांतर तुरुंगात व कचेरीत केले. राजकीय स्थिती बदलल्यास कोणकोणते बदल होतात याची प्रचीती या वास्तूवरील लेख वाचताना येते. 1993 मध्ये लोकचळवळ व राजकीय पाठींबा यांमुळे ही वास्तू संरक्षित वारसास्थळ बनली.

पुस्तकातील शेवटचा लेख आहे भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावर. सावरकरांच्या सशस्त्र चळवळीतील सहभागामुळे ब्रिटीशांनी त्यांचे हे घर ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केला होता. मधला काळ पुन्हा राजकीय बदलाचा व स्वातंत्र्याचा होता. पुढे हे घर राज्य सरकारने विकत घेतले आणि  28 मे 1998 मध्ये त्याला सावरकर स्मारक म्हणून घोषित केले.

प्रत्येक गावाच्या नावाला एक इतिहास जोडला गेलेला असतो. महर्षी भृगु ऋषींनी दंडकारण्यातील या परिसरात तप साधना केली व इथे गुरुकुल सुरू केले. त्यांच्यामुळेच हे गाव भगूर या नावाने प्रसिद्ध झाले, असा या गावाचा लौकिक आहे. प्रत्येक लेखात असे प्राचीन व अर्वाचीन संदर्भ वाचताना एक वेगळाच वाचन प्रवास करीत असल्याची आपल्याला सतत जाणीव होते.
 
या पुस्तकाद्वारे लेखकाने सर्वसामान्य वाचकवर्ग ते संशोधक वर्ग अशा सर्वांनाच नाशिक परिसरातील वैभवाची जाणीव करून दिली आहे. शालेय विद्यार्थीदेखील या पुस्तकाद्वारे आपला ऐतिहासिक वारसा जाणून घेऊन, त्याचे जतन करण्यासाठी क्रियाशील होऊ शकतील. लेखक आपल्या या लेखन प्रवासात हा वारसा जतन करण्याचे काम खूप मोठे असल्याचे वारंवार स्पष्ट करतात. त्याकरिता आपले लेखन पुरेसे नसून त्याशिवायही अधिक काही करण्याची गरज असल्याचे ते स्पष्ट करतात. लेखकाच्या अदम्य इच्छाशक्तीस उदंड यश लाभावे व उत्तरोत्तर अशीच संशोधनपर लेखनप्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहावी असेच 'वारसायण' वाचताना वाटत राहते.

- लतिका जाधव
 latajadhav47@gmail.com

वारसायण 
लेखक व प्रकाशक: रमेश पडवळ 
पृष्ठे: 250
किंमत: 350

Tags: पुस्तक परीक्षण नवे पुस्तक वारसायण रमेश पडवळ Load More Tags

Comments:

RAMESH SURESH PADWAL

आदरणीय सर नवनाथ नागरगोजे, विवेक निवास, पिंगळे नगर, धानोरा रोड, बीड. 431122. मी रमेश पडवळ माझा फोन क्रमांक 8380098107. आपल्या पत्त्त्यावर पुस्तक पाठविता येईल.

नवनाथ भगवानराव नागरगोजे

हे पुस्तक अशा परिस्थितीत पोस्टाने वा कोरियरने मागविता येईल का माझा पत्ता नवनाथ नागरगोजे, विवेक निवास, पिंगळे नगर, धानोरा रोड, बीड. 431122.

Add Comment