रविवारी सुरू होणाऱ्या खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत, रोलाँ गॅरोवर कार्लोस काय करतो याकडे टेनिस शौकिनांचे लक्ष असेल, यात शंका नाही. त्याचे काम सोपे असणार नाही कारण त्याने नदाल, झ्वेरेव आणि योकोविचला हरवले असले, तरी हे खेळाडू महत्त्वाच्या ग्राँ-प्री मालिकेतील स्पर्धात आपला खेळ उंचावतात हे सर्वांना ठाऊक आहे. शिवाय आत्ता कार्लोस अल्काराझवर अपेक्षांचे ओझे आहे आणि त्याच्या जोडीला मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा तणाव. या साऱ्याला तो कशा प्रकारे सामोरा जातो हे पाहण्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
टेनिस शौकिनांनी ऐकले असेल, पण बऱ्याच वाचकांनी स्पेनचा युवा टेनिसपटु कार्लोस अल्काराझ हे नाव ऐकले नसण्याचीच शक्यता आहे. पण आता मात्र त्यांना ते वारंवार वाचावे, ऐकावे लागणार आहे. कारण माद्रिद टेनिस स्पर्धेचा विजेता ठरलेला स्पेनचा हा नवोदित खेळाडू खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा रविवारी 22 मे पासून रोलाँ गॅरो, पॅरिस येथे सुरू होत आहे. यंदाची ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकून, ग्राँ-प्री मालिकेत विक्रमी 21 अजिंक्यपदे मिळवणाऱ्या राफेल नदालचे रोलाँ गॅरो हे दुसरे घरच मानले जाते. कारण त्याने येथे तब्बल 13 विजेतीपदे मिळवण्याची इतर कुणालाही कोणत्याही ग्राँ-प्री स्पर्धेच्या ठिकाणी, न साधलेली करामत केली आहे.
यावेळी त्याला विजेतेपद टिकवण्यासाठी आपल्याच या तरुण देशबांधवाचा मुकाबला करावा लागण्याची दाट शक्यता आहे. कारण नदालचा मित्र आणि कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या सिर्बयाच्या नोवाक योकोविच याने कार्लोस अल्काराझकडे लक्ष ठेवा असे सांगितले आहे. इतकेच नाही तर या फ्रेंच खुल्या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणूनच कार्लोस अल्काराझकडे पाहिले जात आहे, असे म्हटले आहे. टेनिसच्या ऑस्ट्रेरियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेत विजेतीपदे मिळवण्याच्या बाबतीत राफा नदाल खालोखाल असलेल्या आणि रॉजर फेडरर एवढीच 20 स्पर्धाची विजेतीपदके मिळवणाऱ्या नोवाक योकोविचच्या सांगण्याकडे गंभीरपणे पाहायला हवे. कारण खुद्द कार्लोस अल्काराझने माद्रिद स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने पाठोपाठ नदाल, योकोविच आणि इवेरेव यांचा पराभव करून आपल्या 19 व्या वाढदिवसाच्या आधी पाच दिवस त्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
योकोविचने ‘परिपूर्ण खेळाडू’ असे कार्लोसचे वर्णन केला आहे. तो म्हणतो, “कार्लोसचे या वर्षीच्या व्यावसायिकांच्या टेनिसपटूंच्या स्पर्धातील हे आजवरचे चौथे विजेतेपद आहे, त्यात दोन मास्टर्स स्पर्धांचा समावेश आहे. या वर्षातील, आतापर्यंत तरी, तो जगातला सर्वोत्तम खेळाडू दिसत आहे. ज्या प्रकारे तो दबावाशी, ताणाशी सामना करत आहे ते खरेच आश्चर्यकारक आहे. माझ्याबरोबरच्या सामन्यात तो कायम अगदी शांत होता. त्याचा प्रभाव माझ्यावरही पडला. वाटले त्याने विजेतेपदाचा करंडक मिळवला तो त्याला मिळायलाच हवा होता. तोच त्याचा हक्कदार होता. आता रोला गॅरो येथेही तो संभाव्य विजेत्यांतील एक असेल यात शंका नाही. आजवर त्याने अशा मोठ्या स्पर्धेत कधीही उपउपान्त्य फेरी गाठलेली नाही तरीही तो त्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत असायलाच हवा.”
कार्लोस अल्काराझने त्याचा देशबांधव तसेच त्याचा आदर्श असलेल्या राफा नदालला माद्रिद स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत हरवले. जणू काही नदालची गादी चालवण्यास आपण सिद्ध आणि लायकही आहोत हेच त्याने नदालवर प्रथमच विजय मिळवून दाखवून दिले. सामन्यानंतर नदाल म्हणाला, “आजघडीला त्याला किती जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि तो कोणती पातळी गाठू शकतो, हे प्रत्येकाला माहीत झाले आहे. त्याच्या कामगिरीमुळे मी खूपच समाधानी आहे. कारण आता आमच्या देशात असा विस्मयकारक खेळाडू पुढील बरीच वर्षे असणार आहे, त्यामुळे स्पेनला टेनिसमध्ये उज्ज्वल भवितव्य आहे. घरच्या मैदानावर असे यश मिळणे हे तर अगदी खासच असते. त्यामुळेच हा आठवडा त्याच्यासाठी अगदी संस्मरणीय आठवडा असेल असे मला वाटते.”
कार्लोस अल्काराझच्या क्रमवारीमध्ये मोठी सुधारणा झाली असून आता त्याने पहिल्या दहा क्रमांकांत स्थान मिळवले आहे. या गोष्टीला माझ्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे, असे कार्लोस म्हणाला. रोम मास्टर्स स्पर्धेत आपण सहभागी होणार नाही, मला घोट्याच्या दुखापतीकडे लक्ष पुरवून रविवारी 22 मे ला सुरू होणाऱ्या खुल्या फ्रेंच स्पर्धेसाठी फिट पूर्णपणे तंदुरुस्त व्हायचे आहे, असे अल्काराझने स्पष्ट केले. मी याकरिता बालपणापासूनच झगडत होतो. दर दिवशी प्रचंड मेहनत घेत होतो, जगातील अव्वल खेळाडूंवर विजय मिळवण्यासाठी हे प्रयत्न होते. तरी केवळ अठराव्या वर्षी मला असे यश मिळेल असे वाटले नव्हते. त्यामुळे या विजेतेपदामुळे मला एक स्वप्न साकार झाल्यासारखे वाटते आहे. क्रमवारीत आता तो नवव्या स्थानावर आहे. योगायोग असा की, ज्या वयाला, ज्या स्पर्धेत, ज्या तारखेला त्याने हे अजिंक्यपद मिळवले, तसेच नदालनेही 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2005 साली मिळवले होते. अल्काराझ म्हणतो, "आमच्या विजयातील हे आश्चर्यकारक साम्य आहे हे खरे. पण हे साम्य म्हणजे केवळ योगायोग असू शकेल, कारण मी फक्त माझ्या खेळावर, सामन्यांवर लक्ष केंद्रित करतो. बाकी कोणत्याही गोष्टीकडे माझे लक्षच नसते. त्यामुळे कुणीतरी सांगितल्यावरच मला हे कळले. अर्थात नदाल माझा आदर्श आहे. त्यामुळे आमच्या विजयांतील या साम्याबद्दल मला अभिमानच आहे."
हेही वाचा : जिद्दीचा महामेरू : राफा नदाल - आ. श्री. केतकर
याआधी या वर्षी कार्लोसने मियामी आणि रिओ द जानेरिओ येथील स्पर्धा जिंकल्या आहेत, तर गेल्यावर्षी जुलैमध्ये तो उमग येथील स्पर्धेचा विजेता झाला होता. केई निशिकोरीने डेलरे बीच स्पर्धेत 2008 मध्ये जेतेपद मिळवले होते. त्याच्यानंतर अल्काराझ हा व्यावसायिक टेनिसपहुंच्या स्पर्धातील सर्वात लहान वयाचा विजेता बनला. आता त्याने आपले लक्ष फ्रेंच स्पर्धेवर केंद्रित केले आहे. मी चांगला खेळत आहे, आणि मला स्वतःबाबत विश्वास आहे. मला प्रथम त्या स्पर्धेच्या शेवटच्या फेऱ्यात म्हणजे उपान्त्यपूर्व, उपान्त्य आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्रमवारीत पहिल्या दहांत स्थान मिळवायचे माझे उद्दिष्ट पुरे झाले आहे. स्पर्धांमध्ये विजेतीपदे मिळवण्याचा आणि त्यायोगे क्रमवारीत यावरचे स्थान मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल.
एकसष्ठ वर्षाचे टोनी नदाल हे राफा नदालचे काका आणि प्रशिक्षकही आहेत. ते म्हणतात, "अल्काराझची जिद्द हेवा वाटण्याजोगी आहे आणि त्याच्या खेळात काही उणीवही नाही. त्याच्या फोरहँडमध्ये वेगाबरोबरच जबरदस्त ताकदही आहे. आता तर त्याने त्याच्या बँक हँड फटक्यांतही सुधारणा केली आहे. आता माझ्या पुतण्याची, राफा नदालची जागा कोण घेऊ शकतो या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि ते कार्लोस अल्काराझ हे आहे. तो ती घेण्यास सज्ज झाला आहे. सध्याच्या पिढीतला एकही खेळाडू त्याला मागे टाकू शकणार नाही, असे मला वाटते.
इटलीचा माजी खेळाडू पाओलो बर्तोलुक्की याने कार्लोसची तुलना त्याच्या देशाचा युवा खेळाडू यान्त्रिक सिन्नरबरोबर केली आणि या दोघांत कार्लोस हाच अधिक परिपूर्ण खेळाडू आहे असे म्हटले आहे. सिन्नर कार्लोसपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. आणि क्रमवारीत त्याचे स्थान 13वे आहे. गेल्या वर्षी त्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले होते. बर्तोलुक्की म्हणतात, “सिन्नरकडे चांगली मनोवृत्ती आणि भक्कम शरीरयष्टी आहे. तरीही अल्काराझएवढी ताकद त्याच्याकडे नाही.” स्वतः सिन्नर म्हणतो की, आमची दोघांची चांगली प्रगती होत आहे, तरीही नोवाक योकोविच आणि नदाल त्यामुळे संकटात येतील असे मला वाटत नाही. स्वतःबाबत बोलताना तो म्हणतो की, मी अल्काराझचा वेग, प्रगती, गुणवत्ता यांचा विचार करत नाही मी फक्त स्वतःचाच विचार करतो, या खेळाडूने क्रमवारीत दहांत स्थान मिळवले तेव्हा तो या शतकात जन्मलेल्या खेळाडूंत अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू होता. आता कार्लोसनेही पहिल्या दहांत स्थान मिळवले आहे. याआधी या दोन खेळाडूंत एकच सामना झाला आहे. तो गेल्या वर्षी पॅरिस ओपन टेनिस मास्टर्स स्पर्धेत झाला होता आणि त्यावेळी कार्लोस अल्काराझने यान्त्रिक सिन्नरचा 7-6, 7-5 असा पराभव केला होता.
कार्लोसविषयी बोलताना अनुभवी माजी खेळाडू जॉन लॉइड म्हणतात, “कार्लोस हा नदालएवढाच टफ आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तो फक्त एकोणीस वर्षांचा आहे. त्याची क्षमता अँड स्लॅम मालिकेतील टेनिस स्पर्धांत दोन आकडी विजेतीपदे मिळवण्याची आहे. इतर अनेक चांगले खेळाडू आहेत, पण त्यांच्यात ही कुवत नाही, असे मला वाटते.” ते पुढे म्हणतात की, बियाँ बोर्ग, जिमी कॉनर्स, जॉन मॅकेनी या खेळाडूंप्रमाणेच त्याच्यात काहीतरी खास गुण, ऑरा आहे. त्याची सर्व्हिस वेगवान नाही, क्वचितच तो 130 मैल वेगाने सर्व्हिस करतो हे खरे, पण तिच्यात सुधारणा होत जाईल. त्याच्या बिनतोड सर्व्हिस म्हणजे एससेसही खूपच कमी असतात हे खरे, तरीही त्याच्या सर्व्हिसनंतर प्रतिस्पर्ध्याला आक्रमक होता येत नाही. बॅक हँडकडे उसळणारी सर्व्हिस हे त्याचे अस्त्र आहे. मुख्य म्हणजे त्याची पहिली सर्व्हिस चुकली तर नंतर करावी लागणारी दुसरी सर्व्हिसही चांगली आहे. याबाबत त्याचे नदालशी साम्य आहे. नदालची सर्व्हिसही याच प्रकारची आहे. इतर बाबतही त्याचे नदालशी साम्य आहे. तो खूप उंच नाही.
या साऱ्या गुणगौरवामुळे आता रविवारी सुरू होणाऱ्या खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत, रोलाँ गॅरोवर तो काय करतो याकडे टेनिस शौकिनांचे लक्ष असेल, यात शंका नाही. त्याचे काम सोपे असणार नाही कारण त्याने नदाल, झ्वेरेव आणि योकोविचला हरवले असले, तरी हे खेळाडू महत्त्वाच्या ग्राँ प्री मालिकेतील स्पर्धात आपला खेळ उंचावतात हे सर्वांना ठाऊक आहे. शिवाय आत्ता कार्लोस अल्काराझवर अपेक्षांचे ओझे आहे आणि त्याच्या जोडीला मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा तणाव. या साऱ्याला तो कशा प्रकारे सामोरा जातो हे पाहण्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: क्रीडा टेनिस रोलाँ गॅरो ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिका आ. श्री. केतकर Load More Tags
Add Comment