एका मार्क्सवादी-आंबेडकरवादी-गांधीवाद्याला आठवताना

The Hindu

जेष्ठ कामगार नेते ए. के. रॉय यांचे नुकतेच निधन झाले. रॉय यांच्या रूपाने एका राजकीय युगाचाच अस्त झाला आहे. झारखंडमधील धनबाद येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत ते तीन वेळा  खासदार म्हणून निवडून आले. कोणत्याही राजकीय पक्षाशी औपचारिक संबंध नसलेल्या रॉय यांच्या निवडणूक प्रचाराची भिस्त खाण-कामगार आणि मध्यमवर्गीय हितचिंतकांकडून मिळालेल्या लोकवर्गणीवरच होती. तहहयात अविवाहित राहिलेले रॉय धनबादमध्ये असले की, (आपल्या मतदारसंघातील जनतेप्रमाणेच) विजेची सोय नसलेल्या एका छपराच्या झोपडीत राहत असत. आज संसदेत आसनस्थ झालेल्या अनेक धनदांडग्या ‘लोकप्रतिनिधीं’च्या तुलनेत त्यांचे राहणीमान आणि व्यक्तिमत्त्व अतिशय साधे होते.       

रॉय यांच्या मृत्युची वार्ता वाचल्यावर माझे मन भूतकाळात गेले, आणि मला तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांची भेट थोडक्यात हुकली होती. अवैध खाणकामामुळे  पर्यावरण आणि समाज यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मंथन करण्यासाठी 1981 साली आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत मी विद्यार्थी स्वयंसेवक होतो. तेव्हा त्यांना आमंत्रण देण्याची जबाबदारी आयोजकांनी माझ्याकडे सोपवली होती. त्यावेळी माझ्या महाविद्यालयीन सहकाऱ्यांपैकी काहींचे निवासस्थान असलेल्या (आणि आता खासदारांनी व्यापलेल्या)  ल्युटन्स दिल्ली परिसरातील बंगल्यांपासून दूर  विठ्ठलभाई पटेल हाऊस येथील त्यांच्या दोन खोल्यांच्या 'खासदार निवासावर'  मी दाखल झालो.

मी दारावर थाप मारली, मात्र काहीच हालचाल न दिसल्यामुळे पुन्हा जोरजोरात दार वाजवू लागलो. कुर्ता पायजम्यात असलेल्या एका उंच्यापुऱ्या गृहस्थांनी डोळे चोळतच दार उघडले. ते रॉय नव्हते, मात्र त्या गृहस्थांना मी पाहताक्षणीच ओळखले. ते होते छत्तीसगडचे महान कामगार नेते शंकर गुहा नियोगी! त्यांच्या ऋजुतेमुळे तर मी आणखीच वरमलो. त्या माणसाला झोपेची सक्त गरज होती. त्यासाठी थोडासाच वेळ त्यांना मिळाला होता, आणि तोही मी हिरावून घेतला होता. त्या प्रसंगाची बोचणी आजही माझ्या मनात आहे.       

रॉय यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर मला गुहा नियोगींची आठवण आली. गेल्या आठवड्यातच, बंगाली लेखक मनोरंजन ब्यापारी यांच्या आठवणींच्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचत असताना गुहा नियोगींची मी पुन्हा आठवण काढली होती. ब्यापारी यांचा गुहा नियोगींच्या सोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव काहीसा माझ्या अनुभवासारखाच होता. फरक इतकाच की, नियोगींसोबतची माझी पहिली भेट आपल्या महान राजधानीत झाली होती; तर ब्यापारींनी नियोगींना सर्वप्रथम पाहिले ते मध्य भारतातील एका खेड्यात. छत्तीसगड मुक्ती मोर्चा (CMM) च्या एका सभेत त्या दोघांची सर्वप्रथम भेट झाली. ब्यापारी म्हणतात, “डोळ्यात चमक असणारा व खादीचा कुर्ता-पायजमा घातलेला एक उंचा-पुरा माणूस इतर मंडळींसोबत गवतावर बसला होता. गर्दीत असूनही त्याचे वेगळेपण जाणवत होते. त्याच्या व्यक्तिमत्वातील  भारदस्तपणा त्याच्या हास्यातून आणि चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होता. इतरांपेक्षा त्याची उंची अधिक होती. अन्यायापुढे न झुकणारे आणि पैशाने विकत घेता न येणारे त्याचे मस्तक एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे भासत होते.”           

ब्यापारी यांनी नंतर गुहा नियोगी यांच्या घराला भेट दिली. त्या संदर्भात ते म्हणतात, “कामगारांच्या झोपडीसारखे दारिद्रयाने भरलेले त्यांचे घर पाहून मी चक्रावून गेलो. एकाच खोलीच्या त्या घरात दोन्ही बाजूला व्हरांडे होते. भिंती मातीने सारवलेल्या आणि जळक्या खापरांचे छप्पर होते. मी खोलीत जाऊन पाहिले तर, साडेसातशे रुपये मासिक मानधनावर उपजीविका करणारे  शंकर गुहा नियोगी,  आपली पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत एका खुडमुड्या पाटावर आनंदाने चहा पीत बसले होते.      

शंकर गुहा नियोगी यांची सुरुवात मार्क्सवादी म्हणून झाली. मात्र पुढे ते गांधींच्या खूप जवळ आले. आपल्या तात्त्विक आणि व्यावहारिक चिंतनाबाबत त्यांनी ब्यापारी यांना सांगितले, “जयप्रकाश नारायण यांनी एक विधायक चळवळ सुरु करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते अयशस्वी ठरले. नक्षलवाद्यांच्या विध्वंसक चळवळीलाही काही यश मिळवता आले नाही. त्यामुळे मी या निष्कर्षाप्रत येऊन ठेपलो आहे की, (चळवळ यशस्वी करण्यासाठी) विधायकता आणि विध्वंसन यांच्यामध्ये संतुलन राखायला हवे. यामुळेच, 'उध्वस्त करण्यासाठी निर्मिती करा, निर्मितीसाठी उध्वस्त करा' हे आमच्या चळवळीचे घोषवाक्य आहे. या विचाराशी एकनिष्ठ राहत आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून या परिसरात दवाखाने, छोट्या शाळा, वर्कशॉप्स, सहकारी आणि सांस्कृतिक संस्था आदींची उभारणी करत आहोत. दुसरीकडे लोकशाहीने दिलेल्या बैठका, मेळावे, मोर्चे, निवेदने आणि शिष्टमंडळे आदी मार्गांचा जास्तीत जास्त उपयोग करत  समाजहित साधण्याचा प्रयत्न करतो.”

पुढे त्यांनी सांगितले, “सीपीआय आणि सीपीआय (एम) या पक्षांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनांच्या संकुचित आणि अर्थकेंद्री दृष्टीकोनामुळे ‘कामगारांच्या - कारखान्याच्या चार भिंतींच्या पलिकडील - जीवनात विधायक बदल होऊ शकले नाहीत. आम्ही ते बदल करण्यात यशस्वी ठरलो. स्त्री-पुरुषांना आपले जीवन आरोग्यदायी, समृद्ध आणि सुंदर बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आम्ही पुरवू शकलो.”  

छत्तीसगड मुक्ती मोर्चाचे वेगळेपण पटवून देताना गुहा नियोगी पुढे म्हणाले, “कामगारांसाठी वेतनवाढीची मागणी आम्ही केली. त्यांना वेतनवाढ मिळाली. पण आलेला पैसा दारूमध्ये खर्च होऊ लागला, त्यामुळे आम्हाला दारूबंदीची चळवळ उभी करावी लागली. या पद्धतीची चळवळ कामगार संघटनेच्या कार्यक्रमाचा भाग नसते. त्यामुळे त्या चळवळीच्या प्रेरणेसाठी आम्हाला गांधींकडेच वळावे लागले. मार्क्सवाद, गांधीवाद, लोहियावाद, आंबेडकरवाद इत्यादी सर्व विचारधारांमधील लोककल्याणकारी सिद्धांत आम्ही एकत्रित केले आणि आमचा गरजांच्या पूर्ततेसाठी त्यांमध्ये साजेसे बदलही केले."

अनेक वर्षांपूर्वी लेखिका रजनी बक्षी यांनी शंकर गुहा नियोगी यांच्याबद्दल उत्कृष्ट लेख लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले आहे की, 'आणीबाणीच्या काळात सरकारी दडपशाहीमुळे शंकर गुहा नियोगी यांना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. सरकारने त्यांच्याविरुद्ध अनेक खोट्या केसेस दाखल केल्या. या सरकारी छळाच्या पार्श्वभूमीवरच सप्टेंबर 1991 मध्ये काही उद्योजकांनी गुंडांना सुपारी देऊन त्यांचा निर्घृण खून केला. या घटनेकडे पोलीस आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली. गुहा नियोगी तेव्हा केवळ 48 वर्षांचे होते.'         

गांधींप्रमाणेच गुहा नियोगीदेखील निस्सीम पर्यावरणवादी होते याची आठवण रजनी बक्षी यांनी त्या लेखातून करून दिली आहे. खाणी आणि कारखाने  यांच्यामुळे होणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणाच्या समस्येकडे त्यांचे पहिल्यांदा लक्ष गेले. सामाजिक न्याय आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समतोल राखण्याबाबत  नियोगींनी हिंदीतून लिहिलेल्या लेखाचा इंग्रजी अनुवाद देखील रजनी बक्षी यांनी केला. वातावरण आणि पाणी दुषित करणाऱ्या लोकांना कडक शासन करावे आणि जंगल व्यवस्थापनाचे लोकशाहीकरण करण्यात यावे अशी सूचना नियोगी यांनी त्या लेखाद्वारे केली होती. ‘पर्यावरणाच्या ऱ्हासाचे विश्लेषण केले गेले पाहिजे. पर्यावरणाशी संबंधित घटकांविषयी राष्ट्रीय स्तरावर प्रभावी जनजागृतीची प्रचंड गरज आहे. जगभरातील आणि देशातील पर्यावरणाशी संबंधित चळवळींविषयी  संघटनांचे संवेदनशील कार्यकर्ते लोकजागर करतील. ही मंडळी चळवळीत बंधुत्व निर्माण करत विविध उपक्रम आणि चळवळी यांचे नेतृत्व करण्यासाठी  कार्यकर्त्यांना आणि सामन्य माणसांना उभे करतील.’ असा आशावादही नियोगींनी या लेखाद्वारे व्यक्त केला आहे.

विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही योजनाही ते या लेखातून सुचवतात. जंगलांवर भाष्य करताना ते म्हणतात, “ज्या दिवसापासून लोक जंगलाविषयी संवेदनशील होतील, आणि त्यांना आपले मानू लागतील, अगदी त्याच दिवसापासून - लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत - सर्वजण डोळ्तेयांत तेल घालून जंगलांचे रक्षण करण्यासाठी कंबर कसतील. परिणामी जंगलचोरांना प्रतिबंध बसेल, तर निष्क्रिय आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या कृतींवर वचक बसेल. जंगल हे सामुहिक स्वास्थ्याच्या रक्षणाचे माध्यम बनले तर तेथे वास्तव्य करणारा प्रत्येक रहिवासी वृक्षतोडीसाठी उचलल्या जाणाऱ्या कुऱ्हाडीविरोधात बंड करेल. अशा प्रकारे सामुहिक हितांचे रुपांतर राष्ट्रीय हिताच्या रक्षणात होऊ शकेल. यामुळे केवळ पर्यावरणाचेच रक्षण होणार नाही तर मानवतेच्या भविष्याबाबतही खात्री देता येऊ शकेल.”       

नियोगींनी आपल्या लेखाचा शेवट ज्या वाक्यांनी केला आहे, ती वाक्ये तेव्हापेक्षा आज जास्त प्रस्तुत वाटणारी आहेत. ते लिहितात, “सत्य हेच आहे की, आपल्यालाच आपल्या पृथ्वीचे रक्षण करावे लागणार आहे. ही झाडे-झुडपे, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छ हवा, पशु-पक्षी आणि आपण या सर्वांचे मिळून हे विश्व तयार होते. संवेदनशील कल्पना आणि परिवर्तनशील कृतीकार्यक्रम यांच्या माध्यमातून आपल्याला निसर्ग आणि विज्ञान यांच्यामध्ये समतोल साधावा लागणार आहे. आणि जनतेच्या जाणिवांचा विकास करूनच हे साध्य करता येणार आहे."

आपल्या आठवणींमध्ये मनोरंजन ब्यापारी लिहितात, “नियोगी यांना कोणत्याही एका विचारधारेच्या चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. ती अतिशय अवघड नव्हे, अशक्य कोटीतील गोष्ट आहे. ते सर्व ‘वादां’च्या पलिकडे पोहोचले होते. ते थोर मानवतावादी होते. इतिहासात एकच अशी व्यक्ती मला दिसते, जिच्यासोबत गुहा नियोगी यांची तुलना होऊ शकेल. ती व्यक्ती म्हणजे आपला महाल सोडून गरिबांचे दु:ख नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले  गौतम बुद्ध!”               

नियोगी यांच्या हत्येचे कारण आणि त्यामुळे झालेले दुष्परिणाम विशद करताना रवी टेलर हा युवा आदिवासी नेता ब्यापारी यांना सांगतो, “जोपर्यंत नियोगी जिवंत होते, तोपर्यंत आदिवासींच्या मनात संविधानिक व्यवस्थेविषयी आस्था होती, म्हणजे  ती टिकवून ठेवण्यात नियोगी यांना यश आले होते. यामुळेच  त्यांना ‘छत्तीसगढचे गांधी’ असे म्हटले जायचे. आणि याच कारणामुळे त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांनी कुणालाही हानी पोहोचवली नाही, तरीही त्यांचा खून करण्यात आला. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षाही झाली नाही. कामगारांच्या न्याय्य मागण्या पोलीस आणि उद्योजकांनी बंदुकीच्या बळावर दडपून टाकल्या. नियोगीजींच्या निधनाने सर्वत्र अंध:कार माजला. मनुष्याला आधाराची गरज असते. नियोगीजींच्या निधनाने आदिवासींचा मोठा आधार हरवला आणि त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली.”              

त्यानंतर, नक्षलवाद्यांनी ही पोकळी भरून काढली नसती तर नवलच! नक्षलवाद्यांचे अर्धवट डोके आणि त्यांच्या खुनशी पद्धतीला परतवून लावण्यासाठी पोलीस व निमलष्करी दलांनी उघडलेली हिंसक आघाडी, यामुळे आदिवासी परिघाबाहेर फेकले गेले.                

प्रामाणिकपणा आणि धैर्यशिलतेचा विचार करता, ए. के. रॉय आणि शंकर गुहा नियोगी हे एकाच जातकुळीचे होते. (जरी गुहा नियोगी हे अस्सल विचारवंत होते). ‘इलेक्टोरल बॉण्ड्स’मुळे रॉय यांच्यासारखे शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी  लढणारे स्वतंत्र विचारांचे अपक्ष उमेदवार आता संसदेत निवडून येणार नाहीत याची पूर्ण तजवीज करण्यात आली आहे. अहिंसक आंदोलन करणारे आणि विरोधी विचार मांडणारे यांच्याविषयीचे सरकारी धोरणही आता कमालीचे दडपशाहीचे झाले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दुसरे शंकर गुहा नियोगी तयार होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा या अंध:कारमय काळात, ए. के. रॉय आणि शंकर गुहा नियोगी यांच्यासारख्यांची आणि त्यांना ओळखणाऱ्यांची स्मृती तेवत ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे परम कर्तव्य असायला हवे.

रामचंद्र गुहा

(अनुवाद – समीर शेख)

Tags: ए. के. रॉय Ramchandra Guha रामचंद्र गुहा अनुवाद लेख Load More Tags

Comments:

विश्वास सोनवले

शं.नी.गुहांविषयी खुप दिवसांनी वाचायला मिळालं. ह्या योगी माणसान साधेपणांंच आयुष्य सर्वसामान्यांसाठी भरभरून जगवलं.

लतिका जाधव

अतिशय सुबोध व भविष्यातील धोके स्पष्ट करणारा लेख, धन्यवाद.

Add Comment