विचारांच्या कोलाहलाला आश्वासक प्रत्युत्तर देणारे दीर्घ काव्य... 

'जमीन अजून बरड नाही!' या पुस्तकाचा परिचय 

महावीर जोंधळे यांनी औरंगाबाद येथील मराठवाडा दैनिकात पत्रकारितेला प्रारंभ केला, नंतर दीर्घ काळ लोकमत या दैनिकात व काही काळ प्रभात या दैनिकात संपादक म्हणून काम केले. त्याचबरोबर त्यांची लहान मोठी अशी पन्नासेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात ललित लेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, कथा, कविता, बालसाहित्य इत्यादी प्रकारची पुस्तके आहेत. विविध साहित्यप्रकार हाताळताना त्यांच्यातला कवी काहीसा मागे पडल्यासारखा झाला होता... आता निवृत्तीनंतर तो पुन्हा जागा झाला. त्यांनी लिहिलेले एक दीर्घकाव्य अलीकडेच प्रकाशित झाले आहे. त्याचे नाव –‘जमीन अजून बरड नाही!’ त्याचा परिचय करून देणारा हा लेख...

साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतांत संचार करणारे जे मोजके प्रतिभावंत आहेत त्यांच्यातील एक नाव महावीर जोंधळे हे आहे. त्याखेरीज संपादक म्हणूनही त्यांनी आपली छाप वृत्तपत्रसृष्टीमध्ये उमटवली आहे. विविध साहित्यप्रकार हाताळताना त्यांच्यातला कवी काहीसा मागे पडल्यासारखा झाला होता... आता त्यांनी एक दीर्घकाव्य लिहिले आहे. त्याचे नाव आहे – ‘जमीन अजून बरड नाही!’

हे दीर्घकाव्य एक प्रकारे कवीचे स्वगत म्हणा, महात्मा गांधींना म्हणजेच बापूंना उद्देशून लिहिलेले आहे म्हणा किंवा त्या महात्म्याबरोबर कवीने साधलेला आत्मचिंतनपर संवाद म्हणा पण कधीही आणि केव्हाही गांधीजी आपल्याबरोबर कायम जोडलेलेच कसे असतात हे आपल्याला हे दीर्घकाव्य वाचताना वारंवार जाणवत राहते. भरीला त्यात अपरिहार्यपणे सद्यःस्थितीबाबतचे उल्लेख नकळत वा जाणीवपूर्वक केलेले आहेत त्यामुळे त्याला वेगळीच धार आली आहे आणि हे दीर्घकाव्य निखळ वास्तवाची जाण करून देणारे झाले आहे.  

कधी कवी थेट गांधीजींबरोबर संवाद साधतो तर कधी गंभीरपणे स्वतःशीच चिंतन करत असल्यासारखा दिसतो. कधीकधी तर त्यात आत्मपरीक्षणही असते पण त्यामुळेच या दीर्घकाव्याला एक वेगळे परिमाण लाभले आहे. ते वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. मला वाटते बहुधा कवीला तेच अभिप्रेत असावे. 

हे दीर्घकाव्य वाचताना असे वाटत राहते की, खरोखरच बापूंनी ही प्रदीर्घ कविता वाचली असती तर देशातल्या लोकांच्या आवतीभोवतीचे वास्तव किती बदलले आहे हे त्यांना कळले असते. कदाचित त्याबाबत धडकीही भरली असती. देशात जे काही घडत आहे ते आपल्याला अभिप्रेत नव्हते आणि आपल्या सत्याच्या आग्रहाला अडगळीत टाकून नवेच असत्य तेच सत्य हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचे सतत चाललेले प्रयत्न पाहून ‘हेचि काय फल मम तपाला?’ असेही उद्गार त्यांनी मनोमन काढले असते.

दीर्घकाव्याला प्रारंभ करण्याआधी गांधींविषयी रोमा रोलाँ, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, आईनस्टाईन आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी काय म्हटले आहे हे देण्यात आले आहे आणि त्यामुळेच हे दीर्घकाव्य वाचताना पदोपदी या थोरांच्या मतांची वारंवार आठवण होत राहते. त्यांनी या महात्म्याबाबत जे काही म्हटले आहे ते किती अचूक आहे हे जाणवत राहते आणि त्यामुळे गांधीजींचे माहात्म्य उलगडल्यासारखे वाटते. 

रोमा रोलाँ म्हणतो, ‘गांधी म्हणजे आत्मिक समानतेचा गाभा. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतो, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.’ तर आईनस्टाईन यांना वाटतं की, ‘गांधींसारखी हाडामांसाची महान व्यक्ती या भूतलावर कधी काळी जन्मली होती यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही.’ रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे, ‘आपलं मालिन्य धुवून काढण्याचं काम गांधी नावाच्या तेजःपुंज साधकानं केलं म्हणून त्यांची मूर्ती महाकालाच्या सिंहासनावर कायमची अधिष्ठित झाली.’ विनोबा  सांगतात, ‘हिमालयाची शांती आणि बंगालची क्रांती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. स्वतःला सदैव अपूर्ण मानणाऱ्या बापूंचंच मला विलक्षण आकर्षण वाटलं.’ लोकमान्य टिळक यांनी तर म्हटले होते, ‘सत्यावरील आणि न्यायावरील निष्ठा इतकी तीव्र असावी लागते. त्याशिवाय हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वाला जात नाही हे गांधीजींचं तत्त्व लक्षात घ्यायला हवं.’ 

या दीर्घकाव्याची सुरुवात वाचताच आपण पुढे काय वाचणार आहोत याचा अंदाज वाचकाला येतो. कवी लिहितो...

स्वातंत्र्यासाठी
छिन्नत
गेला स्वतःला
असत्याला ठेवून 
आरीवर
स्वतःला
गेलात कोरीत,  
आरपार काळीज
करपत गेलं तरी
सोडलं नाही
बुद्धाला!
धर्म, अधर्माच्या 
संघर्षात 
अढळ राहण्याचं
बळ देणारे
कोणते हात होते बापू!

आणि मलपृष्ठावरील ओळी या गांधींना आपले करण्याचा प्रयत्न करून त्यांचा जो सोयीस्कर वापर केला जात आहे ते सांगताना त्याबद्दल कवी म्हणतो...

निळ्या डोळ्याचे बगळे
अन्‌ शिंगाड्या हरणांनी
कळू दिलीच नाही
तुमची अर्थपूर्णता 
इत्यादी इत्यादीच्या
गोळीबंद म्होरक्यांना!
तुमचं जे त्यांच्यासाठी
तेवढंच घेतलं
ताटात वाढून
मृगाच्या बेंबीतील
कस्तुरीला फक्त आपलं मानत.

सध्या खरेतर गेली काही वर्षे, देशात जे काही घडते आहे त्यामुळे कवी चांगलाच अस्वस्थ झाला आहे. तो व्यथित, कासावीस होत आहे; त्याची सतत उलघाल होत आहे. अर्थातच ती त्याच्या शब्दांतून प्रकटते...

साबरमतीचे पाणी आता निर्मळ उरले नाही
आता सावल्या मुक्त मोकळ्या पाण्यात पसरल्या नाहीत
करतात बापूंचे स्मरण, पेटवीत निरांजन
घेतात ओेंजळीत, पाण्यातील तुमची प्रतिमा,
बघतात थेंबाथेंबातून, वाटेकरी डोळे लावून
श्वासाला उद्याचा सूर्योदय दाखवत. 
आजही फिरतात बापू पामरांचे किनारे गाठत 
वर्तमानाच्या बिकट वाटेवर!

सध्या बेमालूमपणे आणि अगदी जाणीवपूर्वक करण्यात येत असलेली विषारी आणि विखारी विचारांची पेरणी आणि त्या विचारांना अनुकूल शिकवण तर त्यांच्यावर गांधी विचारआचारांचा मुलामा देऊन करण्यात येत आहे त्याबाबत कवी लिहितो...

कर्णकर्कश आणि तिरकस
असत नाही प्रार्थना
प्रार्थना माणूसपणाची
अर्घ्य देता-देता 
माणूसही जपायचा असतो
कस्तूरीला अर्थसुगंध 
यावा म्हणून... 
आणि पुढे त्याचे होळीबाबतचे विचार येतात...
होळीत
जळतो म्हणे वाईट विचार
मग नथुरामचं का नाही झालं तसं?
वर्षभर डोक्यात घोळणाऱ्या विचाराचं?
विचार जळत नसतात.
जळतो कोवळा नारळ,
चोरून आणलेली लाकडं
मग इतके दिवस जपून ठेवलेले 
विचार होळीत का करपत नाहीत?
होळीत नेमकं काय जळतं?
निरक्षर अंधत्वाला कळत नाही,
कळलं तरी बापू अजूनपर्यंत वळत नाही! 

कवीला अनेक प्रकारचे प्रश्न पडतात. काही वेळा त्यांची उत्तरेही त्याला मिळतात आणि तरीही न संपणारे अनेक प्रश्न मनात वारंवार येत राहतातच. तो ते बापूंपुढे ठेवतो. त्यातून त्याची एकूण समाजात जे काही चालले आहे ते आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता आणि निराशा जाणवत राहते. अशा प्रसंगी केवळ बापूंचाच आधार वाटणे यातच त्यांची महती नाही का? सहजपणे तो लिहून जातो...

बाप हो?
निष्कलंक राहण्यासाठी 
जाळून घ्यावे लागते 
थेट उदरापर्यंत;
मरणाचा उत्सव करीत,
सरणावर जळावे लागते.
जंतरमंतरचा प्रवास टाळून 
राजघाटावर जावे लागते!

थोरोने आणि रस्किनने या थोर संन्यस्त अवलियाला समजून घेतले होते. अकिरावो कुरुसावाच्या मनात त्याची प्रतिमा बिंबली होती. या जगातून गेल्यानंतरही मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, हो-चि-मिन्ह, बराक ओबामा अशा अनेकांचे ते प्रेरणास्थान होते. अशा प्रकारे घडलेल्यांना जो बदल करायचा असतो तो प्रथम आपल्यातच करायचा असतो हे त्यांना कळले होते. म्हणून महात्म्याला उद्देशून कवी म्हणतो... 

...म्हणून बापू तुम्ही गेल्यावर
तुमचे काय गेले?
जे गेले ते आमचे गेले
जिवंतपणीच
आमचे श्वासच मेले!

नव्या काळात, जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या परिस्थितीत अनेकांच्या वाट्याला चांगले दिवस आले. ती होती तरुणाई पण रंजनवादी दृष्टीने त्यांना केवळ फक्त आपलेच पाहायची सवय जडलीय म्हणून ती तरुणाई एकमेकांच्या नावाने बोटे मोडत आणि पाय खोडत रांगते आहे असे कवीला दिसते आहे. त्यांचे स्वातंत्र्योत्तर सोडलेले अनंत फूत्कार त्याला कासावीस करतात आणि मग तो विचारतो...

बिनभाड्याच्या खोलीत राहणं काय असतं
हे कळणार कसं
आयत्या बिळातल्या नागोबांना!

साधा सर्वसामान्य माणूस अजूनही प्रांजळ आहे हे लेखकाला ठाऊक आहे कारण तो बिचारा सामान्य माणूस पोटालाच विश्व मानून जीवनाच्या अनेक काठांवर मूकस्तंभासारखा नक्षी काढत बसलाय आणि अशा त्या साऱ्या सामान्य माणसांना या गर्भित धारणा समजू न देता या अप्पलपोट्यांनी फक्त उज्ज्वल परंपरेचे खोटे गोडवे गात, दंतकथा चिमटीत धरून बापूंचे खरे रूप कळूच दिलेले नाही असे कवी सांगतो तेव्हा त्याची खंत जाणवत राहते. 

कर्मकांडांना फेकून द्या म्हटल्याबरोबर यज्ञोपवित बिथरले आणि त्यांनी तुम्हाला वावटळीतच घेतले कारण माणसात देव बघणे त्यांना जमले नसते म्हणून त्यांनी वेगळ्या वावटळीस जन्म दिला असे तो बापूंना सांगतो तेव्हा तो जणू काही अनेकांच्या मनातला सलच दाखवून देत असतो. तुमची अहिंसा ही शूराची अहिंसा होती, ती एक भक्तिरेखा होती. निरुंद रस्तेच आपले मानणारी तुमची दृष्टी होती (म्हणूनच) ती उष्टी बोरे खाणाऱ्यांहूनही पावलोपावली मोठी होत होती असे तो सांगतो. 

सत्य ही अंतरीची खूण रुजवताना तुम्ही आकाशपाताळ एक केलेत... क्षण अन्‌ क्षण लोकांसाठी जगलात (म्हणूनच) धूर्तांना तो क्षणोक्षणी नडला. रक्तरंजित नौखालीतील त्या दौऱ्यामध्ये बुद्धाच्या वाटेवरून चालण्याचे बळ तुम्हाला लाभले आणि म्हणूनच तुमच्यामुळे नौखालीदेखील अहिंसेचे माहेरघर झाली असे सांगत असतानाच कवी विचारतो... 

बळ असते तरी काय?
जगण्याची शांत सोय?

...आणि नंतर एके ठिकाणी तो म्हणतो की, नौखालीत तुमचे पाऊल पडताच कडाडत्या विजा थांबल्या, ज्वालांची फुले झाली, तळ्यात उतरत लोहगोलही अचंबित झाले. शांत सावल्या चंद्रासाठी आतुरल्या होत्या आज शीतलतेच्या उंबरठ्यावरच. 

दंगली शमवताना, जमावात बेधडक घुसताना तुम्हाला कोणती ऊर्जा कुठून मिळाली असा प्रश्न कवी करतो आणि म्हणतो की, ‘काळ्या कर्मकांडांशिवाय एकही पाऊल टाकता येत नाही तुमच्या वारसदारांना. त्यांचे तांडे सायरन वाजवत निघतात तेही मनातले मांडे खात-खात.’ एवढे सांगून तो पुढे म्हणतो, ‘बापू, तुमचं काहीच घेतलं नाही त्यांनी, घेतलं सगळं संस्थानिकांचं!’

अतुलनीय या शब्दात बापूंना बांधून ठेवता येत नाही ही त्याची अडचण आहे आणि प्रतिभेला तुमच्या काय म्हणावे असा प्रश्न त्याला पडतो. 

बापूजींचे वर्णन कशा प्रकारे करायचे हा सर्वांनाच अवघड वाटणारा प्रश्न कवीलाही अडचणीतच टाकतो त्यामुळे तो लिहितो... 

अतुलनीय  शब्दात तुम्हाला 
ठेवता येत नाही बांधून 
ही तर आमची अडचण आहे
मुळात शब्दांचीच चणचण आहे
प्रतिभेला तुमच्या काय म्हणावे 
कळत नाही
अतुलनीय  शब्दाला आकार नसतो,
नसते भूमिती
रोज नवी निर्मिती; 
एक तत्त्वज्ञ वृत्ती 
उलगडा न होणारी

घरच्या सुहृदांच्या आठवणींतच कवीला ठायी-ठायी गांधीजी दिसतात, आठवतात म्हणून तो म्हणतो की, त्याला आयुष्यात गांधी दिसत. काडीच्या चश्म्यातून ते त्याच्याकडे बघत असत आणि काळ्या मातीने दिलेले काहीतरी सोग्यात टाकून ते येत त्याच्यासाठी. त्याला त्याच्या दैनंदिनीतील नागमोड्या अक्षरांत गांधी भेटत आणि आप्पाच्या मांजरपाटाच्या बंडीतून त्याची हाडे दिसत तेव्हाही ते (गांधीजी) तिथेपण भेटायचे. (अप्पांची) चप्पल हुबेहूब त्यांच्यासारखीच आणि ते दुधाचे मडके भरून आणायचे तेव्हा जणू गांधीजीच घरभर वावरत आहेत आणि झपझप पावले टाकत आहेत असे त्याला भासायचे. गावातील विविध व्यवसायांतील लोकांच्या वागण्याबोलण्यानेही त्याला गांधीजींचीच आठवण होते.

सध्या देशात जे काही अगदी ठरवून आणि जाणीवपूर्वकच चालू आहे पण हे सारे लोकांकरताच चाललेय असा मुलामा त्याला देऊन ते करण्यात येत आहे त्या संदर्भात कवी लिहितो...

पोपटांचं एक बरं असतं
शिकवलं तेवढंच बोलता येतं
स्वतःचं सोडून दुसऱ्याचं भूत,
भविष्य सांगता येतं.
कधी उलटतात, पलटतात
या पत्त्यावरून त्या पत्त्यावर
पाय ठेवून उचलतात कधीकधी
चोचीनं हवं ते टॅरट कार्ड.
पोपटांना मस्त जमते पोपटपंची
सूर पळी अन नैवेद्य थाळी उचलताना
खोटं खोटं अप्पलपोटी होताना
एक वंश, एक शंख वाजवतात पोपट
बापू, तुमचं काहीच पटत नाही
पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटांना
त्यांना एकच शिकवलेलं असतं
मार डंख, कर शंख, सांग असत्याचा अंश
पोपटांचं बरं असतं
 पुन्हा-पुन्हा बोलायचं असतं.

अशा वेळी मनात काही-काही येत असतं आणि अचानक त्याला जाणवतं की, आपण सत्य ओळखले आहे. हे वर्णन करताना कवी लिहितो...

चोवीस कॅरटचं 
आमचं मन
गुणगुणतं
तेव्हा
तो कौल कशाला असतो?
ही मनातली 
भगवी गाणी
भगवी नाणी
आमच्यासाठी नाहीत,
हेच तर खरं खरं 
मनातून ओळखलं होतं
सत्य तिथंच कळलं होतं!

अशा प्रकारे हा विचारप्रवाह अखेरीकडे येतो. त्या वेळी कवीच्या मनातील विषण्णता जाणवते आणि हलकेच ती आपल्यातही उतरते हे कवीचे सामर्थ्य आहे. तो म्हणतो... 

गारद्यांनी मेंदू सजविला 
रक्ताच्या रांगोळीने
ती;
तीस जानेवारीची 
काळी रात्र;
रक्तच पेरले तर 
रक्तच उगवते
स्वतःचे काळीज 
सजवण्यासाठी. 
थेंब थेंब रक्ताचा
आत्मसन्मानात 
भिजवला तरी
अजून समाधान त्यांचे
होत नाही?
रक्ताला मातृभूमीचा
वास असतानाही?

...आणि विचारांच्या या कोलाहलामध्ये, मन अस्थिरच झालेले असते. सर्वत्र काळोखच काळोख पसरला आहे की काय असे वाटायला लागते. कुठे, कसले काय चाललेय काहीच उमगत नाही. आता आपल्याला धीर कुणाचा, आधार कुणाचा असे प्रश्न मनात घोंगावू लागत असतानाच कवी आश्वासकपणे सांगतो...

तुमच्या सांडलेल्या 
रक्तातून उगवेल
पुन्हा नवी पहाट
बापू,
अजून आमची जमीन 
बरड झाली नाही! 

असे हे दीर्घ काव्य. पुन्हा-पुन्हा वाचावेसे वाटते आणि तसे केले की दरवेळी काहीतरी नवीन उमगत असल्यासारखे वाटत राहते. तुम्हीही प्रत्यक्ष वाचूनच बघा.

- आ. श्री. केतकर 
aashriketkar@gmail.com


जमीन अजून बरड नाही!
लेखक - महावीर जोंधळे
प्रकाशक - नूतन मनोहर वाघ, आर्ष प्रकाशन, पुणे 38.
पाने - 108;  किंमत - 150 रु.

Tags: कविता दीर्घकाव्य पुस्तक नवे पुस्तक आ श्री केतकर महावीर जोंधळे Book New Book Introduction A S Ketkar Mahavir Jondhale Load More Tags

Comments:

Atul Teware

Nice touching senc

दीपक पाटील

सच्चेपणाचा सूर आणि तो ही धारदार शब्दांनी मढवलेला.... मनातील सुप्त सात्विक क्रोध व्यक्त करताना शिंगावर घेतलेली व्यवस्थेची लक्तरे...त्यात पुन्हा घायाळ होणारे मन...कारण हिंसा हा त्याचा मार्ग नव्हताच !

Add Comment