ययाति हे महाभारतातील पात्र मराठीत सर्वसामान्य वाचकांना माहीत झाले ते 1959 मध्ये आलेल्या वि. स. खांडेकर लिखित ययाति या कादंबरीमध्ये. 1974 मध्ये या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले. मागील सत्तर वर्षांत मराठीतील सर्वाधिक वाचली गेलेली कादंबरी कोणती, या प्रश्नाचे उत्तर कदाचित ययाति हेच द्यावे लागेल. त्यात सर्व स्तरांतील वाचकांचा समावेश आहे. ही कादंबरी चौदा भारतीय भाषांमध्ये (साहित्य अकादमीकडून), तर दहा पेक्षा अधिक परकीय भाषांमध्ये प्रकाशित झाली आहे. खांडेकरांना प्रसिद्ध मराठी लेखक म्हणून अखिल भारतीय स्तरावर ओळखले जाते ते प्रामुख्याने याच कादंबरीमुळे. या कादंबरीवर टीका करणारेही अनेक प्रतिष्ठित साहित्यिक सुरूवातीपासून आहेत. मात्र तरीही मराठीतील प्रत्येक नवी पिढी वाचक म्हणून घडायला लागते, तेव्हा तिच्या पहिल्या टप्प्यावर ययाति असतेच. त्यामुळे, जागतिक वाचक दिनाच्या निमित्ताने या कादंबरीच्या आशायाकडे व विषयाकडे टाकलेला हा एक दृष्टिक्षेप...
"ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते। संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते।।
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।"
(इंन्द्रियविषयांचे चिंतन करीत असताना, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते.
- भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 62, 63. सौजन्य- भक्तिवेदांत बुक ट्रस्ट)
भगवद्गीतेतील या श्लोकांवर चिंतन करत असताना सहज 'ययाति' हे नाव आठवते. महाभारतातील एक पात्र, कौरव-पांडव व अगदी भरत राजाचा पूर्वज असलेला ययाति हा इतिहासात तितकाच प्राचीन आहे, जितकी पुरातन आहे विचार प्रक्रियेची सुरूवात व भोगवादाकडून त्यागभावनेकडे तिचे झालेले संक्रमण!
थोर मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर आपल्या 'ययाति' या कादबंरीत, या ययातिला काळाच्या जंजाळातून मुक्त करतात. त्यांचा ययाति हा सत, त्रेता, द्वापर आणि कली अशा सर्व युगांतील मानवजातीचा प्रतिनिधी होऊन जातो. याचे कारण म्हणजे या सर्व युगांमध्ये एका समान गोष्टीने माणूस कायमचाच बांधला गेला व ती म्हणजे त्याची अमर्यादित व वर्धिष्णू हाव! कधी तो सत्तेसाठी आसुसलेला असतो, तर कधी तो स्त्री-सुखासाठी लंपट बनतो आणि कधी सर्व प्रकारची सुखे आपल्यापुढे हात जोडून उभी असावीत अशी त्याची लालसा असते. इंद्रियसुख हे विषय भावनेचे मुळ आहे आणि जर ही विषयभावना चाळवली गेली नाही तर त्याची परिणती क्रोधात होते. पुढे क्रोधात भडकलेला मनुष्य स्वतःचे पतन करवून घेतो.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ययातिचे वाचन हा नव वास्तव्याची जाणीव करून देणारा अनुभव ठरतो; कारण प्रत्येक वेळी आपण एकच आत्मा असलेल्या भिन्न भिन्न व्यक्तिरेखांना भेटल्याचा अनुभव घेत राहतो. स्वामी विवेकानंद म्हणत, 'बाल्यकाळात भगवद्गीता वाचण्यापेक्षा शारीरिक कसरतीचे खेळ खेळणे चांगले'. विवेकानंदांचे हेच वाक्य थोडेसे बदलण्याचे धाडस करीत मी म्हणेन की, ‘यौवनाच्या उंबरठ्यावर प्रत्येकाने भगवद्गीतेपेक्षा ययाति वाचणे अधिक उपयुक्त ठरेल.’
धार्मिक ग्रंथ मग ती भगवद्गीता, बायबल वा कुठलेही धार्मिक लिखाण असो; त्यात जरी जीवनाची व्यापक तत्त्वे मांडलेली असली तरीही सामान्य माणूस आणि त्यांच्यात एका खोल दरीचे अंतर असते. लोकोत्तर पुरूषांचे वर्तन हे सर्वसामान्य विश्वाच्या परिघाबाहेरचे असते. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्याला संत साहित्यात स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब पाहून त्याचे अवलोकन करणे दुष्कर बनते. परंतु त्याचवेळी अनीतीतून नीतीकडे मार्गक्रमण करण्यासाठी त्याला मोहनदास गांधी, ऑगस्टिन अशा सर्वसामान्य मुलांच्या आत्मकथा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतात; कारण त्यामध्ये स्व-आयुष्याची छबी सुस्पष्टपणे दिसू शकते. ही पुस्तके जाणीव करून देतात, की अनैतिकतेत गुरफटलेला मनुष्य देखील महात्मा वा संतपदापर्यंत पोहोचू शकतो. ययाति कांदबरीदेखील नेमकी त्याच धर्तीवर प्रेरणादायी ठरते.
ययाति हा जगज्जेता, स्वर्गविजयी महाराज नहुष यांचा त्यांच्याप्रमाणेच शौर्यवान असलेला पुत्र. सत्तेचा उन्माद चढल्यामुळे नहुषाला अगस्ती ऋषींकडून शाप मिळतो, की तो व त्याची संतती कधीच सुखात राहणार नाहीत. नहुषाचे दोन पुत्र एकाच ग्रहाचे दोन भिन्न ध्रुव बनून जातात व आपापल्या जीवनविषयक तत्त्वप्रणालीचे कट्टर अनुयायी बनतात. धाकटा ययाति भोगवासनेत आकंठ बुडू पाहतो, तर थोरला यती जीवनाचे मुलभूत सौंदर्यच नाकारून शून्यवादी बनतो. दोघांनाही एका विशिष्ट वेळी जाणीव होते की ते जीवनपथावर पूर्णपणे बहकले गेलेले आहेत व निसर्गाच्या विरूद्ध वाटचाल करीत आहेत. कट्टर शून्यवाद हा भोगवादाइतकाच घातक ठरतो. प्रवाहाविरूद्ध केलेली वाटचाल म्हणजे भडकून आलेल्या वणव्यास विझवण्यासाठी सरळ सरळ त्यात उडी घेण्यासारखाच मूर्खपणा!
दुसरीकडे शर्मिष्ठा ही निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक बनते, तर देवयानी स्वतःच्या अहंभावास कुरवाळत बसते. 'प्रेम सर्व सहन करते, ते आपल्या प्रिय व्यक्तीवर सर्वस्वी विश्वास ठेवते, सर्व चांगुलपणाची आशा ठेवते, सर्व बाबतीत धीर धरते.', हे शाश्वत सत्य शर्मिष्ठा सिद्ध करून दाखवते. पुरू हा तिचा पुत्र. आपल्या आईकडून घेतलेला प्रेमाचा वारसा तो चारपटींनी बहरवतो व त्या प्रेमाच्या तापहीन ज्वालेत देवयानीचा अहंकार पार भस्मसात करतो. त्यामुळे देवयानी सर्वसंगपरित्याग करून वनात जायला तयार होते. आणि हेच प्रेम ययातिलाही भोगवादाकडून वानप्रस्थाश्रमाकडे घेऊन जाते. जंगलात जाण्यापूर्वी ययाति आपल्या पुत्राला उपदेश करतो,
'न जातु कामः कामानुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवत्मैर्व भुय एवाभिवर्धते ॥
( ज्याप्रमाणे होमात टाकलेली आहुती अग्नीला अधिक प्रज्वलित करते त्याप्रमाणे वासना जितकी चाळवावी तितकी भडकत जाते.)
अशी ही ययातिची कामकथा असल्याने तो त्या कथेचा नायक ठरतोच, मात्र खूपच अभावाने येणारा कच हा त्या काव्याचा महानायक (super hero) बनतो. देवगुरु बृहस्पतीचा संयमी पुत्र कच हा विश्वशांतीसाठी अधीर आहे. दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या असते. त्याचा उपयोग ते देव-दानव संघर्ष वाढविण्यासाठी करीत असतात. मोठ्या युक्तीने कच ती विद्या त्यांच्याकडून आत्मसात करतो. त्यानंतर शुक्राचार्य संजीवनीहून महान विद्या संपादन करण्यासाठी तप आरंभवतात. तसा कचही प्रतिविद्या मिळवण्यासाठी तप करण्यासाठी बसतो.
आज पूर्ण मानवजात कचासारख्या महानायकासाठी व वसुंधरेला विनाशापासून वाचवू शकणाऱ्या त्याच्या जीवनदायक शक्तीसाठी आक्रोश करत आहे. हरित तंत्रप्रणालीतील शोध ही ती आधुनिक शक्ती आहे. तिच्या विकासामुळे राष्ट्रां-राष्ट्रांमधील शत्रूत्व, रोगराई आणि सर्व प्रकारच्या पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण होऊ शकते. कचाच्या अस्तित्वाने ही कामकथा एक भक्तीगाथा बनून जाते. कच कामाच्या मुक्तसंचाराला धर्माचा लगाम घालतो, कारण ज्या समाजात कर्माला धर्माचे अधिष्ठान नसते त्या समाजाचा विनाश अटळ असतो.
उपसंहारात खांडेकर नीतीच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मानवी मनाच्या विकासावर व आत्म्याच्या विशालतेवर भाष्य करतात. पौराणिक ययातिचे विषयसुख स्त्री-सुखापुरते मर्यादित होते. परंतु आजचा ययाति शरीरसुखाच्या अन्य वाटा शोधत त्याही पुढे पोहोचलेला आहे.शेवटी सामान्य मनुष्याच्या नीती अनीतीला सामाजिक प्रवाहच आकार देत असतो. समाजाला नीतीच्या प्रभेने तेजोमय करणे ही खांडेकरांच्या मते समाज पुढाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु आजच्या जगात नवी दिशा अन् नवी आशा दाखवणारे पुढारी आहेत का?.....
वि. स. खांडेकर बुरसटलेल्या धर्ममतांना तिलांजली देऊन मूर्तीपुजेच्या दास्यातून मुक्त होण्याची आकांशा धरतात. परंतु मग पुढे काय? आधुनिक मनुष्याला स्तंभातून बाहेर पडणारा नरसिंह काल्पनिक वाटू लागला परंतु त्यापुढे जाऊन त्याला स्वतःच्या अंतःकरणातील परमेश्वराचा थांग लागला का? मग ते शेवटी एक आशा व्यक्त करत म्हणतात, " मनुष्य स्वभावतःच भोगी आहे विरागी नाही. प्रश्न आहे तो त्याला स्वतःच्या भोगाच्या मर्यादा कशा कळत राहतील हा! पूर्वी धर्माचे, नीतीचे आणि ईश्वरी श्रध्देचे नियंत्रण त्याच्या मनावर होते. आता मानवतेचे, सामाजिकतेचे, सहजीवनाचे नियंत्रण तिथे आले पाहिजे." ज्यावेळी चोखंदळ वाचकवर्ग ययातिच्या विलासी कथेपलिकडील ययातिचा वेध घेईल त्यादिवशी या ग्रंथराजाला खरे ज्ञानपीठ मिळाल्याचे समाधान लाभेल.
- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असुन गांधी विचारांचे अभ्यासक आहेत)
('Yayati- a new perspective' या मुळ इंग्रजी लेखाचा अनुवाद)
वाचा 'जागतिक पुस्तक दिवस' निमित्त विशेष लेख:
अनुवाद आणि उत्तम अनुवाद - संजय भास्कर जोशी
अनुवादकाचे वाचन... - चंद्रकांत भोंजाळ
केल्याने भाषांतर... - डॉ. शंतनू अभ्यंकर
मुक्त संवाद: अभिरुचिसंपन्न प्रकाशकाशी - सोमनाथ कोमरपंत
Tags: कादंबरी वि. स. खांडेकर मॅक्सवेल लोपीस अनुवाद साहित्य V. S. Khandekar Yayati Novel Maxwel Lopes Load More Tags
Add Comment