'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)

'गांधींविषयी' या ग्रंथाचे तीन खंड 25 जानेवारी 2022 पासून उपलब्ध झाले आहेत.

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या 'गांधींविषयी' या ग्रंथाचे तीन खंड 25 जानेवारी 2022 पासून उपलब्ध झाले आहेत. या तीन खंडांमध्ये मिळून 76 लेख आहेत, ते साधना, नवभारत, समाजप्रबोधन पत्रिका, गांधीमार्ग इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या पुस्तकांतून घेतलेले आहेत. 1915 ते 2015 या शंभर वर्षांत लिहिले गेलेले हे लेख 43 लेखकांचे आहेत (अर्थातच काहींचे लेख एकापेक्षा अधिक आहेत).गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे. त्यातला पहिल्या खंडाचे (गांधी : जीवन आणि कार्य) संपादन किशोर बेडकीहाळ यांनी केले आहे. प्रस्तुत खंडाला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश प्रसिद्ध करतो आहोत.

म. गांधी हे विसाव्या शतकातले एक महान व्यक्तिमत्त्व. अहिंसात्मक व सत्याग्रही प्रतिकाराचा मार्ग जगाला दाखवणारे व त्यावर अंमल करणारे एक युगपुरुष. निर्वैर, निर्भय व समतेवर आधारित जगाचे स्वप्न पहाणारे विचारवंत. निसर्ग व मानवी जीवन यांच्या एकात्मतेच्या आधारावर मानवी जीवनाची उभारणी करू इच्छिणारे व समस्त पुढच्या पिढ्यांसाठी पृथ्वीवरची संपदा सुरक्षित राहील यासाठी अथक व प्रगल्भ विचार करणारं व्यक्तिमत्त्व. धर्मां-धर्मांतील वैर संपून सर्व धर्मांतील चांगुलपणाचा एकत्रित प्रत्यय देणाऱ्या धर्माची गरज सांगणारे धर्मपुरुष अशी म. गांधींची अनेक रूपे या जगाने पाहिली. अशा या व्यक्तिमत्त्वाचा द्वेषही केला गेला, खूनही केला गेला पण तरीही गांधी शिल्लकच आहेत. एक लाखाहून अधिक पुस्तके गांधींवर लिहिली गेली, आजही लिहिली जाताहेत. तत्त्वचिंतक, वैज्ञानिक, अभ्यासक, कार्यकर्ते पुन्हा पुन्हा गांधींच्या विचारांशी झटापट करताहेत व त्यात आपला मार्ग शोधताहेत.

गांधीजी द. आफ्रिकेतील आपले कार्य उरकून भारतात आल्यापासून ते त्यांची हत्या होईपर्यंत व आजतागायत गांधींवर विविध भाषांत लेखन होते आहे. मराठीतही त्यांच्यावर बरेच लेखन झाले आहे पण ते अर्थातच सुटे-सुटे, प्रासंगिक आहे. ग्रंथरूपाने मराठीत गांधींवर फारच कमी लिहिले गेले आहे.

तरुण मराठी वाचकांच्या हाती गांधींबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल काहीएक सामुग्री असायला हवी, या भूमिकेतून मराठीत गांधींवर लिहिलेल्या अनेक लेखांमधून काही निवडक लेख तीन खंडांच्या रूपाने वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पातील हा पहिला खंड आहे. या खंडात टिळक, रविंद्रनाथ टागोर, पं. नेहरू, आचार्य भागवत या मान्यवरांच्या लेखनाबरोबरच अनेक साहित्यिक, अभ्यासक यांच्या लेखनाचाही समावेश केला आहे. दुसऱ्या खंडात गांधी व अन्य विचारवंत यांचा तौलनिक विचार करणारे लेखन आहे. तर तिसऱ्या खंडात गांधी व जीवनाची इतर क्षेत्रे याबाबतच्या लेखनाचा समावेश आहे. या तीनही खंडातील लेखनाने म. गांधींविषयी जिज्ञासा असणाऱ्या, अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना आधारभूत साहित्य मिळेल अशी आशा आहे.

गांधींचे मराठीतले पहिले चरित्र कै. सौ. अवंतिकाबाई गोखले या कार्यकर्ती विदुषीने लिहिले व तेही गांधींचा चंपारण्य सत्याग्रह चालू असताना. अवंतिकाबार्इंनी गांधींचे चरित्र लिहिले व त्याची प्रस्तावना लिहिण्यासाठी टिळकांना विनंती केली. टिळकांना गांधींच्या कार्याची एव्हाना माहिती झाली होती. म्हणूनच टिळक गांधींबद्दल काय लिहितात याची उत्सुकता स्वाभाविक आहे. गांधीचरित्राला लिहिलेल्या या प्रस्तावनेमध्ये, गांधींच्या आगमनावेळची भारताची स्थिती ही पूर्वसुरींच्या (विशेषत: बुद्धिमान, विद्वान अशा लोकांच्या) अकर्तृत्वाने झाली; आणि परमेश्वरावर भरवंसा ठेवून, निस्वार्थ बुद्धीने व निष्काम बुद्धीने कार्यरत राहणारे लोकच स्वत:च्या शीलाने ही परिस्थिती बदलवू शकतात असे टिळकांचे प्रतिपादन आहे.

या खंडातील दुसरा लेख रविंद्रनाथ टागोर (ठाकूर) यांचा आहे. टागोर हे गांधींचे समकालीन. 1914-1941 हा गांधी-टागोरांच्या संपर्काचा व संबंधांचा काळ. उभयतांमधील पत्रव्यवहार प्रसिद्धच आहे. अनेक बाबतीत टागोरांचे गांधींशी मतभेद होते पण गांधी उभे करत असलेल्या कार्याविषयी मात्र टागोर नि:शंक होते. आपल्या लेखात, ‘प्रादेशिकतेच्या जाळ्यात’ (टागोरांचे शब्द) गुरफटलेल्या तत्कालीन भारताला या स्थितीतून बाहेर काढून त्याचे राष्ट्रात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रानडे, सुरेंद्रनाथ बानर्जी, गोखले यांचा टागोरांनी गौरव केला आहे व या मंडळींची ही साधना प्रबळ सामर्थ्याने व वेगाने सिद्धीच्या मार्गावर पुढे नेणारा महात्मा म्हणून गांधींचा गौरव केला आहे. गांधीपूर्व काळातील काँग्रेसचे अर्ज-विनंत्यांचे राजकारण, प्रासंगिक दबावाचे राजकारण व गांधींचे कर्तृत्व यातील फरकावर टागोरांनी चांगला प्रकाश टाकला आहे.

या खंडातील तिसरा लेख आचार्य स. ज. भागवतांचा आहे. ‘गांधीजींची जीवनावर अपार श्रद्धा होती व ते जीवनाचे नम्र उपासकही होते. सत्याचा अखंड शोध हीच त्यांची साधना होती. संपूर्ण अंत:करणाची शुद्धी हाच त्यांचा मोक्ष होता’ हे आचार्यांचे प्रतिपादन मौलिक आहे. याच आधारावर ‘संपूर्ण जीवनदर्शनात कधी पूर्णतेची शक्यता नसते, फक्त अखंड शोध असतो’ असे सांगून आचार्य गांधीविचार गांधीवाद का बनू शकत नाही याची कारणमीमांसा देतात.


हेही वाचा : गांधीजींचे संपूर्ण जीवन सलगपणे मांडणारे एकमेव चरित्र - नरेंद्र चपळगावकर


खंडातील चौथा लेख महाराष्ट्रातील प्रकांडपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आहे. लेख अगदी छोटा आहे, गांधीहत्येनंतर नागपुरी केलेल्या भाषणाचा सारांश आहे. पण एवढ्या छोट्या लेखात तर्कतीर्थांनी गांधींचे केवढे नि वेगळे दर्शन घडवले आहे याचा प्रत्यय येतो.  हे भाषण शास्त्रीजींनी केले तेव्हा ते गांधीजींच्या बौद्धिक प्रभावाखाली नव्हते पण नैतिक प्रभावाखाली मात्र नक्कीच होते. (तर्कतीर्थ 1937 पासून शेवटपर्यंत मानवेंद्रनाथ रॉय यांच्या बौद्धिक प्रभावाखाली होते पण तरीही बौद्धिकदृष्ट्या स्वतंत्र होते, गांधींचा बौद्धिक प्रभाव संपला होता हे नक्कीच) हा प्रभाव जडवादी विचारांचाही होता. त्यामुळे शास्त्रीजींच्या गांधीमीमांसेला वेगळे महत्त्व आहे.

सत्य आणि अहिंसा ही गांधीजींच्या विचारांची पायाभूत तत्त्वे. गांधीजींचे सर्व जगणे यांच्या आधारे पहाता येते. गांधींच्या सत्यशोधनाचा पाया काय होता? ते कशाच्या आधारे सत्य शोधीत या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण वसंत पळशीकरांनी त्यांच्या लेखात केले आहे. गांधी तत्वज्ञ नसल्याने बुद्धीच्या आधारे सत्यशोधनाचा गांधींचा पिंड नव्हता. स्वत:चा अनभुव, स्वत:ला पडणारे प्रश्न, समस्या व आव्हाने यांच्या संदर्भात गांधी व्यावहारिक सत्य शोधीत असे पळशीकरांचे म्हणणे. या संदर्भात त्यांनी काही उदाहरणेही दिली आहेत. गांधीजींच्या एकादशव्रतांची मीमांसाही पळशीकरांनी केली आहे. गांधींनी भोगप्रधान, वासना-विकारकेंद्री भांडवली अर्थरचनेचा विरोध केला व त्यांना पर्याय दिला तो एकादशव्रतांचा. एका अर्थाने हा पर्यायी समाजनिर्मितीचा पायाच आहे. भयमुक्त, भूकमुक्त, आसक्तीमुक्त, समाजातच सत्य-अहिंसा नांदू शकते. म्हणूनच सत्य, अहिंसा हे साध्यही आहे व साधनही आहे. एकादशव्रते याचा आविष्कार आहेत. पळशीकरांच्या या मांडणीमुळे गांधीविचार समजून घेण्याची एक नवी रीतच आपल्यासमोर ठेवली गेली आहे.

मे. पुं. रेगे हे महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक, त्याचप्रमाणे सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचे मीमांसक. त्यांनी 1970 साली वाचलेला एक निबंध ‘गांधीजी आणि बदलती मूल्ये’ या खंडात समाविष्ट केला आहे. रेगे यांनी आपल्या लेखातून एक गोष्ट अधोरेखित केली आहे, ती म्हणजे ‘औद्योगिक जीवनपद्धती व गांधीप्रणित मूल्ये यांचा मेळ घालण्याचे आव्हान’. या शतकात जी नवी आव्हाने निर्माण झाली त्यात पर्यावरण, तंत्रज्ञान, समुचित विकास व स्वातंत्र्याचे विस्तारणारे क्षेत्र यांचा समावेश आहे. या चर्चेत आजही ‘गांधी’ उभेच आहेत व नव्या दर्शनाच्या प्रतीक्षेतही आहेत.

प्रा. नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्राला व्यासंगी विचारवंत म्हणून माहीत आहेत. साहित्य, कला, इतिहास, राजकारण, धर्मशास्त्र, समाजकारण, संगीत अशा विविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. अमूक एका विषयावर कुरुंदकर काय म्हणतात, याची उत्सुकता मराठी वाचकाला कायमच राहिली आहे. 1967 च्या आसपास ‘जागर’ नावाचा त्यांचा राजकीय लेखसंग्रह आला. म. गांधींविषयी त्यांचा प्रदीर्घ लेख यात आहे. सर्वसामान्य माणसे करतात त्याहून वेगळी मांडणी कुरुंदकर गांधींबद्दल करतात व ती वैशिष्ट्यपूर्णही आहे.  

केवळ गरजांचे समाधान हे माणसांचे समाधान असू शकत नाही. म्हणून प्राकृतिक प्रेरणांवर प्रसंगी मात करता आली पाहिजे. प्रकृतीला योग्य तो वाव द्यायलाच लागेल पण ‘प्रकृतीच्या दयेवर’ संस्कृती उभी असता कामा नये. संस्कृतीचे वर्चस्व कायम राहिले तरच परिपूर्ण माणूस निर्माण होणे शक्य आहे आणि या सत्याचा प्रतिनिधी म्हणून कुरुंदकर गांधींकडे पहातात.

कुरुंदकरांचा ‘म. गांधी आणि समाज सुधारणा’ हा (1976 सालचा) आणखी एक लेख खंडामध्ये समाविष्ट केला आहे. या लेखात कुरुंदकर गांधींच्या धर्मविषयक, समाजसुधारणाविषयक भूमिकेवर विस्ताराने लिहितात. कोणत्याही समाजसुधारणा यशस्वी व्हायच्या असतील तर अनुकूल राजकीय वातावरणाची आवश्यकता असते. गांधींच्या राजकारणातून व राजकीय-आर्थिक-सामाजिक कार्यक्रमातून असे वातावरण निर्माण झाले व त्यामुळेच समाजसुधारणांचा अवकाश निर्वेध झाला असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. इथे गांधींआधीच्या समाजसुधारकांपेक्षा गांधींचे वेगळेपण लक्षात येते. आधीचे सुधारक एकेका सुधारणेच्या प्रश्नात गुरफटले होते; तसे गांधीचे नव्हते, हेही कुरुंदकर दाखवून देतात.

प्रा. सु. श्री. पांढरीपांडे हे गांधी विचारांचे मूलगामी भाष्यकार, समीक्षक आहेत. ‘गांधी-परंपरा आणि परिवर्तन’ हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा लेख या खंडात समाविष्ट केला आहे. भारतीय परंपरा, वास्तव यात अस्सल आधुनिक मूल्ये भारतीय अवतारात असायला हवीत या दृष्टीतून प्रा. पांढरीपांडे मांडणी करत आहेत. वसाहतकाळात आधुनिकतेतून मिळालेली आधुनिक मूल्ये - (व्यक्तिस्वातंत्र्य, सेक्युलॅरिझम, लोकशाही, समता, विज्ञाननिष्ठा, स्वातंत्र्य इ.) स्वीकारताना इथल्या परंपरा व संस्कृतीचा मन:पिंड आपण लक्षात घेतला नाही, त्याने या मूल्यांचे एकजीव असे समायोजन होऊ शकले नाही हा प्रा. पांढरीपांडे यांचा आक्षेप आहे. आधुनिक मूल्यांना नकार न देता त्यांची रुजवणूक ‘समन्वय, संवादित्व आणि सुसंगतीकरण’ या पद्धतीने झाली असती तर धर्मांध प्रवृत्तींना पायबंद बसला असता अशी प्रा. पांढरीपांडे यांची मांडणी आहे. गांधी विचारांच्या अंगाने परंपरा ते परिवर्तन हा प्रवास कसा करायला हवा याचा हा लेख उत्तम नमुना म्हणायला हवा.

गांधीजींच्या चिंतनात मानवी जीवनाला व्यापणाऱ्या राज्यसंस्थेविषयक चिंतन फार महत्त्वाचे आहे. गांधीजींना अपेक्षित असणाऱ्या पर्यायी समाजाच्या कल्पनेच्या दृष्टीने हे चिंतन महत्त्वाचे आहे. या चिंतनाचे विश्लेषण व गांधींची राज्यविषयक विचारांची सखोल मीमांसा वसंत पळशीकरांनी एका लेखात केली आहे. त्यांचा ‘स्वदेशीनिष्ठ समुदाय : गांधींचा राज्यविषयक विचार’ हा लेख या खंडात समाविष्ट केला आहे. सामान्यत: गांधींना अराज्यवादी विचारवंतांच्या मालिकेत बसवले जाते. पळशीकरांना हे मान्य नाही. राष्ट्रवादी राष्ट्रराज्य, केंद्रीभूत राज्यसंस्था व या चौकटीतील लोकशाही गांधींना मान्य नव्हती. सरकार-लोक यातील या व्यवस्थेतील संबंधही त्यांना मान्य नव्हता. गांधींच्या या भूमिकेचे नेमके विश्लेषण पळशीकरांनी केले आहे व ते करताना स्वातंत्र्योत्तर भारतातील घडामोडींचाही दाखला दिला आहे.

प्रा. पांढरीपांडे यांचा ‘गांधींचा अहिंसाविचार’ हा लेखही या संग्रहात घेतला आहे. गांधींच्या ‘अहिंसे’बद्दल अनेक समज-गैरसमज अस्तित्वात आहेत. काही बुद्‌ध्या पसरवलेले आहेत तर काही तात्त्विक आहेत. पसरवलेल्या गैरसमजांच्या निराकरणासाठी हा लेख नाही. अहिंसेमागचा तात्त्विक विचार काय आहे व त्या संबंधातल्या काही भूमिकांचा आढावा प्रा. पांढरीपांडे यांनी घेतला आहे. पांढरीपांडे यांच्या या लेखात महाभारतातील दाखले आहेत तसेच जावडेकरांच्या भूमिकांचेही संदर्भ आहेत. काँग्रेस नि अहिंसा यांचेही विश्लेषण आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी, तसेच बोअर युद्धाच्यावेळी गांधींनी घेतलेली सैन्यभरतीची भूमिका, क्रांतिकारकांची हिंसा, अहिंसेचा व्यापक आशय यांचे पांढरीपांडे यांनी केलेले विश्लेषण खरोखरीच मौलिक आहे. हिंसा-अहिंसेचे तात्त्विक विवेचन करणारा हा लेख खरोखरच पुन्हा-पुन्हा वाचावा असाच आहे.

आजच्या राज्यघटनेत ‘गांधीविचार’ किती प्रमाणात आहे? या प्रश्नाचा विचार न्या. नरेंद्र चपळगांवकर यांच्या ‘राज्यघटनेतील गांधीविचार’ या लेखात दिसेल. वस्तुत: हा लेख न्या. चपळगांवकर यांच्या ‘म. गांधी आणि भारतीय राज्यघटना’ या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे. राज्यघटनेतील गांधी विचारांचा वेध घेण्यासाठी हे प्रकरण मुद्दाम या खंडात समाविष्ट केले आहे. राज्यघटनेतील गांधी विचारांचा वेध घेताना गांधी-नेहरू यांच्या विचारविश्वातील फरकाचा मागोवा न्या. चपळगांवकरांनी घेतला आहे.

गांधीजींच्या एकूणच विचारात विकेंद्रित नियोजन, मर्यादित गरजा, श्रमनिष्ठा, व्रतपालन याला महत्त्व होते. या उलट पं. नेहरुंच्या मनाची घडण आधुनिक अंगाने झाली होती. बळकट केंद्रीय सत्ता, केंद्रीभूत नियोजन, खेड्यांचे शहरीकरण करणारे विकासाचे प्रारूप ही त्यांच्या भूमिकेची वैशिष्ट्ये होती. याशिवाय घटना समितीच्या बहुसंख्य सदस्यांचे मानस गांधी विचारांचे नव्हते या वास्तवाचे भान न्या. चपळगांवकरांच्या विवेचनात दिसते.

‘हिंदस्वराज्य’ हे गांधींचे 1908-09 सालचे पुस्तक भारतीय राज्यकारणाच्या चर्चाविश्वातले हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. जागतिकीकरण, त्याने निर्माण केलेली परिस्थिती लक्षात घेता आजच्या आधुनिक भांडवली व टोकाच्या विषम समाजाचा तंत्रज्ञानाने कब्जा मिळवलेल्या समाजाचा पर्याय शोधताना ‘गांधी’ विचार अटळ ठरतो. (अर्थातच जसाच्या तसा नव्हे) या दृष्टीतून ‘हिंदस्वराज्य’वरचे दोन लेख या खंडात समाविष्ट केले आहेत. यातील पहिला लेख प्रसिद्ध अभ्यासक व राज्यशास्त्राचे नामवंत अध्यापक डॉ. अशोक चौसाळकरांचा आहे. प्रतिपाद्य विषय त्याच्या सर्व तपशील व पार्श्वभूमीसह मांडणे व चिकित्सा करणे हा डॉ. चौसाळकरांचा लौकिक आहे व त्याचा प्रत्यय या लेखात पुरेपूर येतो. भारत गुलामगिरीत का व कसा गेला याची गांधींची मीमांसाही वेगळी आहे. आम्ही इंग्रजांच्या शस्त्रबळाचे नाही तर त्यांच्या विचारसरणीचे बळी आहोत हा गांधीचा निष्कर्ष चौसाळकरांनी व्यवस्थित समजावून दिला आहे.

या खंडातील ‘हिंद स्वराज्य’ वरील दुसरा लेख गांधी विचाराच्या व्यासंगी तरुण अभ्यासक व राज्यशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. चैत्रा रेडकर यांचा आहे. डॉ. रेडकर यांच्या लेखाचा मध्यवर्ती रोख (focus) ‘हिंद स्वराज्य’ हे समाजसापेक्ष विकासाचे प्रतिमान म्हणून उभे करण्याचा आहे.

‘गांधी विचारातील समता संकल्पना : एक पुनर्विचार’ हा डॉ. यशवंत सुमंत या व्यासंगी अभ्यासकांचा लेख या खंडात मुद्दाम समाविष्ठ केला आहे. डॉ. यशवंत सुमंत हे अलिकडच्या काळातील गांधी विचारांचे समर्थ भाष्यकार मानले जातात. विशेषत: गांधी-आंबेडकरांची परस्परपूरकता सिद्ध करणाऱ्या (आधीच्या अभ्यासकांपेक्षा) चर्चा विश्वात अत्यंत मोलाची भर त्यांनी घातली आहे. या लेखात गांधीविचार समतेच्या चर्चाविश्वातून का बाहेर ठेवला गेला याची स्पष्ट कारणमीमांसा डॉ. सुमंतांनी केली आहे, ती महत्त्वाची आहे. गांधींच्या काळात व नंतरही त्यांच्या विचारांचे आकलन करण्यात महाराष्ट्रीय अभिजन कसे कमी पडले याची जाणीव या कारणमीमांसेतून होते. गांधींची धार्मिक परिभाषा न रुचणे/आवडणे व न आकळणे, जात-वर्ग अंताची लढाई व स्वातंत्र्य चळवळ यात गांधींनी स्वातंत्र्य चळवळ महत्त्वाची मानणे व उर्वरित अवकाशात जात-वर्गांताची चळवळ करणे त्यामुळे वर्गसमन्वयाची भूमिका अधोरेखित होणे, गांधीविचारांच्या परिप्रेक्ष्यांची योग्य जाण नसणे, प्रचलित मार्क्सवादी आंबेडकरवादी विचारविश्वांच्या समतेविषयक धारणांना आव्हान देणे यातून गांधीविचारांचे सीमांतीकरण होत गेले ही सुमंतांची मीमांसा अगदी योग्यच आहे.

गांधीजींचे आर्थिक विषयावरील चिंतन हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. यंत्रप्रधान औद्योगिक व्यवस्थाच उत्पादन, पुरवठा व जीवनमानातील वाढ या बाबी पुरवू शकेल अशी 19 व 20 व्या शतकातील धुरिणांची धारणा होती. गांधीजी तर यंत्रविरोधकच म्हणूनच माहीत होते ते अज्ञानामुळे. गांधीजींचे अर्थशास्त्र हे मागासांचे अर्थशास्त्र आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वर्धिष्णु जगात व समाजवादाचा ‘युगधर्म’ असणाऱ्या काळात श्रमनिष्ठ जीवन जगणे अनावश्यक आहे ही धारणाही प्रभावी होती. मराठी विचारविश्वात गांधीजींच्या अर्थशास्त्रावरील लिखाण बोटावर मोजण्याइतकेच आहे. विद्यापीठे, अर्थशास्त्र परिषदा, चर्चासत्रे, कार्यक्रम अशा ठिकाणीही क्वचित्‌च गांधींच्या अर्थकारणावर विस्ताराने चर्चा झाली. अशाच एका मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या चर्चासत्रात ‘रोजगार, आर्थिक विकास आणि गांधी विचार’ या विषयावर वसंत पळशीकरांनी वाचलेला निबंध या खंडात समाविष्ट केला आहे. गांधीजींच्या विचारातून रोजगार, दारिद्र्य, आर्थिक विकास या प्रश्नांची उकल करण्याचा एक सकस प्रयत्न या निबंधात दिसतो.

गांधींची धर्मसंकल्पना व समाजसुधारणा याचा अन्वयार्थ लावणारा प्रा. नरहर कुरुंदकरांचा एक लेख याच खंडात आहे. त्यावर लिहिताना प्रस्तुत लेखकाने कुरुंदकरांशी असणाऱ्या मतभेदाचा धावता उल्लेख केला होता. याचा अधिक विस्तार करणारा व गांधींची धर्मकल्पना व सुधारणा यांचा गाभा शोधणारा एक लेख यात प्रस्तुत लेखकाने लिहिला आहे व त्याला आजच्या ‘धर्म’ स्वरूपाचा/तथाकथित धार्मिकतेचा संदर्भ आहे. धर्माला परिवर्तनशील बनवणे, त्याचे विवेकीकरण करणे व वैश्विक मूल्यांशी तो सुसंगत करणे इतकी गांधींच्या धर्मकल्पनेची व्याप्ती आहे, याचे भान या लेखातून यायला हरकत नाही.


हेही वाचा : 'चले जाव'चा ठराव मंजुरीला टाकण्यापूर्वी गांधीजींनी केलेले प्रास्ताविक


अरुण खोपकर हे प्रख्यात कला समीक्षक म्हणून आपणा सर्वांना माहीत आहेत. त्यांचा एक अतिशय वेगळा लेख या खंडात समाविष्ट केला आहे. गांधींना आतापर्यंत अनेक रूपात पाहिले गेले आहे पण कवि-कलावंत गांधी म्हणून क्वचित्‌च पाहिले गेले. गांधींची चित्रपट/कला/साहित्य या विषयीच्या मतांची कधीच गंभीरपणे दखल घेतली गेली नाही. अरुण खोपकरांचा लेख गांधींना कवी-कलावंताच्या भूमिकेत पहातो. खोपकर हे एक प्रथितयश सिनेदिग्दर्शक आहेत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘एका सिनेदिग्दर्शकाने दुसऱ्या महान कलाकाराची कला समजून घेण्याचा हा प्रयत्न’ म्हणून या लेखाकडे पहायला हवे.

गांधीमार्गाच्या सामर्थ्य आणि मर्यादांचा विचार अनेक तत्त्वचिंतकांनी केला आहे. त्यात स्वतंत्र दृष्टीचे मार्क्सवादी विचारवंत दि. के. बेडेकर यांचे नाव/लेखन महत्त्वाचे आहे. मार्क्सवादी दृष्टी ठेवून गांधींकडे कसे पहायचे हा एक कुतूहलाचा विषय आहे. स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळातही बराच काळ मार्क्सवाद्यांनी गांधींकडे भांडवलदारांचे हस्तक म्हणूनच पाहिले. बेडेकरांसारखा अव्वल तत्त्वचिंतक जरी मार्क्सवादी असला तरी त्यांनी ठोकळेबाज मार्क्सवाद्यांप्रमाणे राजकीय-सामाजिक भूमिका घेतल्या नाहीत. मार्क्सवादाचे मर्म केंद्रस्थानी ठेवून त्यांनी स्वतंत्र प्रतिभेने घटनांचा, परिस्थितीचा अन्वयार्थ लावला. आयुष्याच्या अखेरीस ‘Towards Understanding Gandhi’ नावाच्या दोन खंडांचे लेखनही त्यांनी केले. त्यांचे हे पुस्तक किंवा त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झालेले ‘ललित चिंतन’, ‘धर्मश्रद्धा-एक पुनर्विचार’ या सारखी पुस्तके पाहिली तर त्यांच्या स्वतंत्र दृष्टीची, अव्वलतेची व प्रतिभेची साक्ष पटते. बेडेकर गांधींविषयी काय लिहितात हा म्हणूनच अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय राहिला. या खंडात त्यांचा अगदी छोटा पण विचारप्रवृत्त करणारा ‘गांधीमार्ग : सामर्थ्य आणि मर्यादा’ हा लेख मुद्दाम समाविष्ट केला आहे.

गांधी विचाराने प्रेरित होऊन ध्येयवादाच्या आधारे आपले जीवन व्यतीत करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी लेखकात वि. स. खांडेकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या कादंबऱ्या, विशेषत: ‘क्रौंचवध’कडे बोट दाखवता येते. गांधीवादापेक्षाही गांधी मोठे आहेत असे एक वाक्य त्यांच्या एका कादंबरीत नायकाच्या तोंडी वाचल्याचे स्मरते. खांडेकरांच्या अनेक भाषणांतून (प्रस्तुत लेखकाने ऐकलेल्या) ढासळत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीविषयीचे भाष्य करताना ‘गांधीविचार’ आधारभूत असे. 1969 साली गांधी जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या ‘एक महामानवाचे एक भव्य स्वप्न’ या लेखाचा समावेश या खंडात समाविष्ट केला आहे.

या खंडात ‘म. गांधी आणि महाराष्ट्र’ हा प्रा. गं. बा. सरदार यांचा लेख मुद्दाम समाविष्ट केला आहे. गांधीजी आणि महाराष्ट्र यांची नाळ स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जुळली हे खरेच. पण अ. भा. राजकारणाची सूत्रे टिळकांकडून गांधींकडे गेली म्हणजेच महाराष्ट्राकडून गांधींकडे गेली ही या संबंधांची सुरुवात होती. गांधी आफ्रिकेतून परत येऊन साबरमतीत त्यांनी आश्रम काढला व 15 वर्षे त्यांचे वास्तव्य तेथे राहिले. पुढची 18 वर्षे त्यांचा अनुबंध महाराष्ट्राशी राहिला. गांधी-महाराष्ट्र यांच्या अनुबंधाचा काळ हा महाराष्ट्रातील विलक्षण चैतन्याचा, जागृतीचा काळ आहे. प्रा. सरदारांनी म्हटल्याप्रमाणे, सक्षम समर्थक व कडवे विरोधक गांधींना महाराष्ट्रातच मिळाले. भारतीय राजकारणातील महत्त्वाच्या तीनही प्रवाहांचे भक्कम अस्तित्व महाराष्ट्रात होते. (गांधींचा गुरूही महाराष्ट्रातलाच होता) महाराष्ट्रातील बुद्धिजीवींच्या एका गटाने (यात केळकर प्रभुतींचा गट जसा आहे तसा मार्क्सवाद्यांचाही आहे) गांधी विचार/राजकारण कधीच आपले मानले नाही. टिळकपंथीय जहाल (पण प्रत्यक्षातले मवाळ) नाईलाजाने काँग्रेसबरोबर गेले तरी तेथे मनाने समरस झाले नाहीत याची नेमकी नोंद प्रा. सरदारांनी घेतली आहे. गांधींच्या विचारात महाराष्ट्रातील जहालांचा प्रतिकारवाद व नेमस्तांचा उदारमतवाद यांचा समन्वय साधलेला आहे हे प्रा. सरदारांनी दाखवून दिले आहे पण त्याचबरोबर आधीच्या राजकारणाच्या सर्व मर्यादांवर गांधीनी मात करून एक नवे राजकारण उभे केले, याचेही सूचन केले आहे.  

या खंडाची सुरुवात लो. टिळकांच्या लेखाने झाली व शेवट पं. नेहरुंच्या लेखाने होतो आहे. टिळकांच्या काळात गांधींचे नेतृत्व उदयाला येत होते, नेतृत्वाच्या संक्रमणाचा काळ होता. ‘साधनानाम अनेकता’ यावर टिळक कायम असले तरी गांधींच्या मार्गाच्या यशाची शक्यताही त्यांना वाटत होती, म्हणूनच तर गांधीचा सत्याग्रहाचा मार्ग शास्त्रपूत झाला आहे असे त्यांनी म्हटले होते. व याद्वारा गांधींच्या नेतृत्वाला एक प्रकारे त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. नेहरुंचा काळ हा गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळीतल्या सक्रियतेचा होता. गांधीमार्गाचा परिणाम, किमया, गांधींचे नेतृत्व, आंदोलनाची त्यांची पद्धत, जनमासाचे त्यांचे अचूक आकलन, जनतेवरील त्यांचा प्रभाव या साऱ्याचा अनुभव व अनुभूतीचा हा काळ होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत नेहरू-गांधी हा अनुबंध तयार झाला, गडद झाला पण उभयतांपैकी कोणाच्याच व्यक्तिमत्त्वाचा त्यातून लोप झाला नाही. स्वत:ची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे ठेवूनही हा अनुबंध फारच घट्ट होता. म्हणूनच नेहरुंनी केलेले गांधींचे आकलन महत्त्वाचे आहे.

असा हा ‘गांधींजींविषयी’ चा खंड. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, गांधीविचारांचे काही पैलू यावर प्रकाश टाकणारा. यात लिहिणारे मयत व हयात लेखक नामवंत अभ्यासक आहेत. या खंडाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ पाच पिढ्यांमधल्या अभ्यासकांच्या लेखांचा यात समावेश आहे. टिळक-टागोरांची एक पिढी, नेहरु-आचार्य भागवत यांची एक पिढी, कुरुंदकर-पळशीकर यांची एक पिढी, चौसाळकर-सुमंत यांची एक पिढी व आताची चैत्रा रेडकरांची पिढी अशा पाच पिढ्यांच्या प्रतिनिधिक लेखकांचा हा संग्रह. या सर्वच अभ्यासकांनी गांधींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे केवळ आकलनच मांडलेले नाही, तर यातल्या प्रत्येक लेखातून गांधी विचारांच्या त्यांच्या-त्यांच्या कालखंडातील प्रस्तुततेचेही अधोरेखन आहे. पहिल्या मराठी गांधीचरित्राला टिळकांनी प्रस्तावना लिहिल्याला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही गांधींचे व्यक्तित्व, गांधीविचार अभ्यासकांना खुणावत आहे, चिकित्सेचा मोह घालत आहे; इतके सामर्थ्य गांधीविचारात असल्याचीच ही खूण आहे. गांधींजींविषयीचे हे लेखन आजच्या विद्यार्थी, युवक, अध्यापक, अभ्यासक, संशोधक यांना आजही उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो.

- किशोर बेडकिहाळ
kishorbedkihal@gmail.com 


सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प...
गांधींविषयी
खंड 1 : गांधी : जीवन आणि कार्य 
खंड 2 : गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व
खंड 3 : गांधी खुर्द आणि बुद्रुक 
दर्जेदार निर्मिती व हार्डबाउंड अशा तिन्ही खंडांची एकूण किंमत 1300 रुपये.
सवलतीत 900 रुपये. पोस्टाने घरपोच हवे असल्यास 1050 रुपये.

संपर्क : 
साधना प्रकाशन 431, 
शनिवार पेठ, पुणे 411030 
sadhana.prakashan@gmail.com  
Ph. 02024459635, 
Mob. 7058286753

'गांधीविषयी'चे तिन्ही खंड AMAZON वर उपलब्ध आहेत.

Tags: गांधींविषयी साधना प्रकाशन सेवाग्राम कलेक्टिव्ह Load More Tags

Comments:

मनोज कदम, हिंगोली

अमेझॉनवर तीन खंडांचा हा संच एक हजार रुपयांना मिळतो आहे. 'साधना प्रकाशन' यांचेच नाव तेथे सेलर म्हणून दाखवले जाते आहे. त्या ठिकाणी अमेझॉनला दलाली द्यावी लागत असेल, तरीही एक हजार रुपयांत संच उपलब्ध करून दिला असताना थेट आपल्या प्रकाशनाकडून संच घेणाऱ्यांना १०५० रुपये किंमत ठेवणे सुज्ञपणाचे वाटत नाही. अमेझॉनची दलाली वजा केली असता आपणास संचाची एकत्रित रक्कम आणखी कमी करून टपालखर्चासह अधिक वाजवी किंमत ठेवणे शक्य होईल, अथवा अमेझॉनवर दिसते तितकी एक हजार रुपये ठेवली तरीही ते साधना प्रकाशनाच्या तसेच वाचकांच्या सोयीचे ठरेल. अन्यथा, अमेझॉनला दलाली देऊन एक हजार रुपये आणि थेट प्रकाशनाकडून घेतल्यास मात्र १०५० रुपये, ही विसंगती वाटते आहे. असो. संच प्रकाशित केल्यास्तव शतशः धन्यवाद.

दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, पत्रकार. भुसावळ.

लेख अभ्यास पूर्ण आहे. गांधी विषयी हे तीन ही ग्रंथ संग्रहणीय आहेत. किंमत व मिळण्याबाबत कळवावे.

Add Comment

संबंधित लेख