असा विक्रम पुन्हा होणे अशक्यच वाटते!

रविवारी (5 जून) रोलाँ गॅरोवर राफेलने इतिहास रचत आपले 22 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.

forbes.com

राफा नदालनं पुन्हा एकदा, 14 व्यांदा, खुली फ्रेंच टेनिस स्पर्धा जिंकून आपला या स्पर्धेतील, तसेच ग्रँड स्लॅम मालिकेतील विजेतीपदे मिळवण्याचा विक्रम आणखी उंचावला आहे. ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांतील हे त्याचे 22 वे विजेतेपद! काय म्हणायचं याला? 36 व्या वर्षी येथे विजेतेपद मिळवून तो सर्वात जास्त वयाचा विजेता ठरला, तर तिशी गाठल्यानंतर सर्वाधिक म्हणजे आठ ग्रँड स्लॅम मालिकेतील विजेतीपदे जिंकून त्याने स्वतःचाच विक्रम आणखी उंचावला आहे. अर्थात त्याला गाठणं प्रतिस्पर्ध्यांना आता अधिकाधिक अवघड बनणार आहे. कारण ज्या गोष्टी अवघड आणि अशक्य वाटायच्या त्या त्या नदालनं करून दाखवल्या आहेत. त्याची कामगिरी अचाट आणि अफाटच म्हणायला हवी. तो जिद्दीचा महामेरू होताच. आता विक्रमांचा महामेरूही बनला आहे!

स्पेनच्या राफेल नदालनं त्याच्या कर्तृत्वाचा आलेख असा उंचावला आहे की, त्याला गौरवायला विशेषणंही कमी पडतील. वाढत्या वयाबरोबर त्याच्या खेळातील धार वाढत चालली आहे की काय, असा संशय प्रतिस्पर्ध्यांना नक्कीच येत असेल, रोलाँ गॅरोवर 2005 मध्ये विजेतेपद मिळवताना त्यानं, अठराव्या वाढदिवशीच अंतिम सामन्यात चार सेटस्मध्ये अर्जेंटिनाच्या मारिआनो प्युएर्ताला 6-7 (5-7), 6-3, 6-1, 7-5 असं पराभूत केलं होतं. आणि आता 36 वा वाढदिवस कट्टर प्रतिस्पर्धी नोवाक योकोविचला उपान्त्यपूर्व फेरीत हरवून साजरा केल्यावर दोनच दिवसांनी त्यानं अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा सरळ तीन सेटस्मध्ये केवळ दोन तास अठरा मिनिटांत 6-3, 6-3, 6-0 असा धुव्वा उडवला. आणि वर सांगितलेले अनेक विक्रम नोंदले.

पण राफाची महती केवळ अशा विक्रमांसाठीच आहे का? त्याचं कौतुक केवळ त्याच्या विजयांसाठीच आहे का? तसं तर ते आहेच. पण राफाकडं त्याहीपेक्षा बरंच काही आहे. माजी खेळाडू मॅटस विलँडर म्हणतो की, राफाचं वैशिष्ट्य त्याचा खेळ, त्याची चिकाटी, त्याची जिद्द, लढवय्या वृत्ती, अखेरपर्यंत हार न मानता लढत राहण्याचा ध्यास आणि जबरदस्त दमछाक एवढंच नाही, तर मला सर्वात जास्त महत्त्व वाटतं ते वारंवार दुखापतींतून लवकरात लवकर बाहेर येऊन पुन्हा पहिल्याच दर्जानं लढण्याचं. बरं अशी एखादी वेळ नाही, तर अनेकदा त्यानं ही करामत करून दाखवली आहे. ते खरंच आहे म्हणा. कारण यंदाही ऑस्ट्रेलियन स्पर्धेनंतर त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागली, ती पाय त्रास देत असल्यामुळं. नंतर तो खेळला माद्रिदला कार्लोस अल्काराझकडून पराभूत झाला, त्यानंतरही त्याला पाय सतावू लागल्यानं नंतर विश्रांती घ्यावी लागली आणि तो फ्रेंच खुल्या स्पर्धेत उतरणार का नाही, अशी शंका बोलून दाखवली जाऊ लागली. पण रोलाँ गॅरो हे राफासाठी अगदी खास आहे. तोच तसं म्हणतो. ते खरंच आहे म्हणा. तेथे 13 अंतिम सामने जिंकणाऱ्याला तसं काही वाटलं नाही तरच नवल!

त्यामुळंच काय होईल ते होवो, 'जो होगा देखा जाएगा' असं म्हणत तो स्पर्धेत सहभागी झाला आणि पाहता पाहता त्यानं विजेतेपदालाच गवसणी घातली की! पहिल्या फेरीत त्याला बाय मिळाला होता. त्यामुळे त्याला एकदम दुसऱ्या फेरीत खेळावं लागणार होतं. ते चांगलंच झालं. त्याला आणखी थोडी विश्रांती मिळाली. आणि दुसऱ्या फेरीसाठी तो पूर्ण तयारीनं उतरला आणि तिथं त्यानं सरळ सेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनला 6-2, 6-2, 6-2 असं पार निष्प्रभ केलं, तिसऱ्या फेरीत फ्रान्सच्या कोरंटिन मॉटेटचाही सरळ सेटमध्ये 6-3, 6-1, 6-4 असा विनासायास पराभव केला. नेदरलँडच्या बॅटिक व्हॅन द झांडशुल्पलाही तसंच सहजी 6-3, 6-2, 6-4 असं हरवून तिसरी फेरी पार केली, चौथ्या फेरीत मात्र नवव्या सीडेड कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियासिमनं त्याला जबरदस्त झुंज दिली. दीर्घकाळ हार मानायला तो तयार नव्हता. तरीही अखेर नदालनं 4 तास 29 मिनिटांच्या झुंजीनंतर 3-6, 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा विजय मिळवून आपण चांगले फिट असल्याचं सिद्ध केलं.

उपान्त्यपूर्व फेरीतही त्याला प्रथम सीडेड योकोविचनं चांगलीच टक्कर दिली. अर्थात त्यात आश्चर्यकारक असं काहीच नव्हतं. या दोघा अव्वल खेळाडूंमधील लढत पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते आणि त्याप्रमाणंच हा सामनाही अगदी चुरशीचा झाला. पण अखेर हे रोलाँ गॅरोचं फिलिप चॅट्रिअर कोर्ट होतं आणि तिथं नदालला हरवणं हे महाकठीण, हे योकोविचलाही अनुभवानंच माहीत होतं. तरीही अव्वल क्रमांकावरील या खेळाडूनं सहजी हार न मानता नदालची परीक्षा पाहिली आणि नदालही परीक्षेत पास झाला. 4 तास 13 मिनिटांच्या या कडव्या झुंजीत नदाल 6-2, 4-6, 6-2, 7-6 असा विजयी झाला. सामन्यानंतर योकोविचनं दाद देताना म्हटलं की, नदाल अप्रतिम खेळला आणि तो जिंकला हे योग्यच झालं. हे कट्टर प्रतिस्पर्धी जिवलग मित्रही आहेत हे यामुळं दिसलं.

आता त्याची गाठ तिसऱ्या सीडेड, जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी उपान्त्य फेरीत होती. झ्वेरेव्हनं ही फेरी गाठताना, माद्रिद स्पर्धेत योकोविच तसेच नदालला हरवणाऱ्या कार्लोस अल्काराझचा पराभव केला होता. त्यामुळं त्याचा आत्मविश्वास खूपच वाढला होता. अर्थात तो मोठ्या अपेक्षेनं कोर्टवर उतरला होता, हे साहजिकच होतं. पण एरवीचा नदाल आणि या स्पर्धेतील नदाल यांच्यात खूपच फरक असतो, हे त्याला सामना सुरू झाल्यावर लगेचच उमगलं असणार. तरीही मोठ्या चिकाटीनं तो खेळत होता. नदालची कमकुवत बाजू हेरत होता. प्रभावी वेगवान सर्व्हिस हे त्याचं प्रभावी हत्यार. पण नदालही त्याला योग्य प्रकारे सामोरा जात होता. त्याची सर्व्हिस परतवत होता आणि नंतर खेळावर ताबा मिळवत होता. रॅलीजचा काळ वाढत होता. मिनिटांमागून मिनिटं गेली तरी पहिला सेट चाललाच होता. हार मानायला कुणीच तयार नव्हतं. शेवटी 6-6 अशी बरोबरी होऊन सेट टायब्रेकरवर गेला. झ्वेरेव्हच्या प्रभावी सर्व्हिसमुळं तो सरस ठरणार असं काहींना वाटत होतं. पण नदालनं या प्रभावी अस्त्रावर चपखल प्रतिफटक्याचं उत्तर शोधलं होतं. झ्वेरेव्ह त्यामुळे चकितच झाला असणार. कारण त्याच्या अस्त्राचा प्रभावच पडत नव्हता. हा टायब्रेकर नदालनं 10-8 असा जिंकला. नदालनं पहिला सेट 98 मिनिटांच्या लढतीनंतर 7-6 (10-8) असा जिंकला होता.

दुसऱ्या सेटमध्येही पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. हार मानायला कुणीच तयार नव्हतं. झ्वेरेव्ह प्रयत्न करत होता आणि नदाल ते हाणून पाडत होता. फटके कोर्टच्या दोन्ही बाजूंना सीमारेषेलगत पेरत होता आणि झ्वेरेव्हला ते परतवण्यासाठी खूपच पळावं लागत होतं. अर्थात नदाललाही तसंच करावं लागेल अशी फटक्यांची पेरणी तोही करत होता. पण या कोर्टवरील धावपळीचा नदालचा दीर्घ अनुभव त्याला तारून नेत होता. उलट झ्वेरेव्ह दमल्यासारखा भासू लागला होता. तरीही त्याने चिकाटीने हा सेटमध्ये 6-5 अशी आघाडी घेतली होती. पण आता सर्व्हिस नदालची होती आणि ती भेदणं हे अवघड काम होतं. नदालनं 40-30 नंतर एका अचूक परतीच्या फटक्याने गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. पण त्याच वेळी झ्वेरेव्ह कोर्टवरच कोसळला. त्याचा पाय चांगलाच मुरगळला होता. त्याला उठून बसणंही अवघड झाले होते. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच त्याला किती वेदना होत आहेत, याची साक्ष होते. चाकाच्या खुर्चीवरूनच त्याला उपचारांसाठी न्यावं लागलं. पण त्याची खेळावरील भक्ती अशी, की नंतर कुबड्यांच्या मदतीनं तो कोर्टवर आला आणि पंचांच्या आभाराचा उपचार त्यानं पूर्ण केला. नदालचंही अभिनंदन केलं. प्रेक्षकांनीही त्याला भारावून जाऊन निरोप दिला.


हेही वाचा : जिद्दीचा महामेरू : राफा नदाल - आ. श्री. केतकर


त्याआधी नॉर्वेचा कॅस्पर रूड हा क्रोएशियाच्या मार्टिन सिलिचचा पराभव करून अंतिम फेरीत दाखल झाला होता. त्याआधीच्या फेऱ्यांत त्यानं रुसुव्हओरीचा 6-3, 6-4, 6-2 असा, सोनेगोचा 6-2, 6-7 (3-7), 1-6, 6-4, 6-3 असा, हुरकाझचा 6-2, 6-3, 3-6, 6-3 तर रूनचा 6-2, 6-3, 3-6, 6-3 असा पराभव करून उपान्त्य फेरी गाठली होती. ही मजल गाठणारा तो नॉर्वेचा पहिलाच टेनिसपटू. त्याचा खेळ चांगलाच प्रभावी होता. त्याला येथील कोर्टचा अचूक अंदाज आला असावा असे त्याच्या खेळावरून वाटत होते. अनुभवी प्रतिस्पर्ध्याला तो आपल्या फटक्यांनी चोख उत्तर देत होता. शिवाय तो आपला फटका कोठे मारणार याचा सिलिचचा अंदाज अनेकदा चुकत होता. तरीही त्यानं पहिला सेट 43 मिनिटांत 3-6 असा जिंकला. अनुभवाच्या जोरावर तो रूडवर मात करणार का असा प्रश्न आता पडत होता. पण पहिला सेट हरल्यावरही रूडचा आत्मविश्वास कायम होता. नवोदित रूनवर चार सेटमध्ये 6-1, 4-6, 7-6 (7-2) आणि 6-3 अशी मात करून तो उपान्त्य फेरीत पोहोचला होता. देशवासियांच्या अपेक्षा त्यानं वाढवल्या होत्या. कदाचित त्याचं स्मरण झाल्यावर त्यानं आपल्या फटक्यांच्या पेरणीचा अचूक वापर करून नंतरचा 45 मिनिटे चाललेला सेट 6-4 असा जिंकला. सिलिचनं प्रयत्न सोडले नाहीत आणि प्रत्येक पॉइंटसाठी रूडला चिकाटीनं झुंजावं लागलं. पण तो त्याचा दिवस नव्हता हेच खरं. त्याच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं उलट रूड गुणांमागून गुण मिळवत होता. 50 मिनिटांच्या लढतीनंतर रूडनं हा सेट 6-2 असा जिंकला. त्यानंतर मात्र त्यानं अधिकच जोमानं खेळ केला. यशाची चाहूल त्याला लागली असावी. चौथा सेट त्यानं 6-2 असाच पण केवळ 30 मिनिटांत जिंकला. हा सामना 168 मिनिटं चालला होता. आणि नंतरचा अर्ध्यावरच निर्णय झालेला सामना 193 मिनिटं!

अंतिम सामन्याची प्रतीक्षा सर्वजण करत होते. अतिशय अटीतटीचा सामना होईल अशी अपेक्षा बाळगून प्रेक्षक आले होते. अर्थात त्यांचा नदाललाच पाठिंबा होता, तरीही नदालपेक्षा 13 वर्षांनी लहान असलेला रूड काय करतो हे त्यांना बघायचं होतं. पण तसं काही झालं नाही. नदालमध्ये विक्रमवीरच जणू संचारला होता. रूटचा प्रत्येक फटका परतवण्याचा त्याचा निर्धार होता. त्यात त्याला यशही येत होतं. अर्थात रूडनंही आपले फटके कोर्टच्या दोन्ही बाजूंना पेरण्याचं तंत्र वापरलं, पण नदालला सुरुवातीला नाही, तरी नंतर त्याबाबत अचूक अंदाज करता येऊ लागला आणि त्या फटक्यांचा प्रभाव कमीकमी झाला. पहिल्या दोन सेटस् मध्ये रूडला केवळ तीन-तीन गेम जिंकता आले. पण तिसऱ्या सेटमध्येही नदालचा प्रभाव कमी न होता उलट वाढतच आहे हे पाहून तो पुरता खचल्यासारखा वाटला. त्यानं मनोमन पराभव मान्य केला होता. तिसऱ्या सेटमध्ये तो एकही गेम जिंकू शकला नाही. पहिले दोन सेटस् अनुक्रमे 51 आणि 57 मिनिटं चालले होते. पण तिसरा सेट केवळ तीस मिनिटांतच आटोपला. या विजयानं नदालनं पुन्हा एकदा इतिहासाचं नवं पान लिहिलं होतं.

रूडनं त्याला मनोमन दाद दिली इतकंच नाही, तर हा सामना मला खेळायला मिळाला यातच माझा बहुमान झाला आहे असं मला वाटतं असं त्यानं सांगितलं. मी 13 वर्षांचा असताना नदालला फेररवर मात करून विजेतेपद मिळवताना पाहिलं होतं आणि तेव्हापासूनच त्यानं माझ्यावर प्रभाव पाडला होता. तो माझा आदर्शच आहे. भावी काळात मी माझ्या नातवंडांना मी नदालबरोबर खेळलो होतो असं अभिमानानं सांगेन! असंही तो म्हणाला. नदाल म्हणाला, “माझ्या पायामुळं मला काळजी वाटत होती. तरीही मी माझ्या डॉक्टरांना बरोबर घेऊनच आलो होतो. सुदैवानं सारं काही ठीक झालं. आता पायानं अशीच साथ दिली तर मी यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतही नक्कीच उतरणार आहे.”

महिलांच्या एकेरीच्या सामन्यात अव्वल क्रमांकाच्या पोलंडच्या इगा स्विआटेकनं अमेरिकेच्या 18 वर्षांच्या कोको गॉफला जराही डोकं वर काढू न देता 6-1, 6-3 असं पराभूत करून ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. तिचं वर्चस्व वादातीतच होतं. तिच्या फटक्यांना कोकोकडे उत्तर नव्हतं. पहिला सेट 35 तर दुसरा केवळ 33 मिनिटांत आटोपला होता. पुरुषांच्या दुहेरीचं विजेतेपद मिळवताना डोडिंग आणि क्रायचेक यांनी अरेवालो आणि रॉजर या जोडीवर 7-6 (7-4), 6-7 (5-7), 6-2 अशी मात केली. महिलांच्या दुहेरीत कोको गॉफ पेगुलाच्या साथीनं खेळली. पण येथेही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. कॅरोलिन गार्सिआ आणि क्रिस्तीना देनोविक या जोडीनं पेगुला-गॉफ जोडीवर 2-6, 6-3, 6-2 असा तीन सेटस् मध्ये विजय आणि अजिंक्यपद मिळवलं, तर मिश्र सामन्यात सिबाहारा आणि कुल्हॉफ या जोडीने ग्लिजेन आणि इकेरी या जोडीचा 7-6 (7-5), 6-2 असा सरळसेटमध्ये पराभव करून जेतेपद कमावलं.

आता प्रश्न असा आहे की, पुढे काय ? नदालचे विक्रम मागे टाकणं ही कुणासाठीही अत्यंत अवघड गोष्ट आहे. तो ही जेतेपदाची माळ आणखी किती मोठी करणार आहे हा प्रश्न आहे. कारण तो अजूनही चांगला खेळ करत आहे.  ग्रँड स्लॅम मध्ये योकोविच 20 विजेतीपदे मिळवून दोनने त्याच्यामागे आहे. तो नदालला गाठण्याचा प्रयत्न करणारच. पण खुल्या फ्रेंच स्पर्धेमध्ये मात्र कुणीही त्याच्या जवळपास नसल्यानं त्याच्या विक्रमाजवळ फिरकण्याचीही शक्यता दिसत नाही. निदान नजिकच्या भविष्यात तर नाहीच नाही. कदाचित अशाच पराक्रमाला ‘न भूतो न भविष्यती’ असं म्हणत असतील!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: Grand Slams 14 French Open Titles Rafael Nadal ग्रँड स्लॅम विजेतेपद कॅस्पर रुड टेनिस Load More Tags

Add Comment