तुकोबांशी मुक्त काव्य संवाद

राजेंद्र दास यांच्या 'तुकोबा' या काव्यसंग्रहाचा परिचय

हा काव्यसंग्रह वाचून झाल्यानंतर आठवतात ते प्रस्तावनेतील डॉ. आ. ह. साळुंखे यांचे शब्द : ‘माणसाला जोपर्यंत आपली अस्मिता कळलेली नसते, ध्येय सापडलेले नसते, त्याला आपले प्रेरणास्थान ओळखता आलेले नसते, तोपर्यंत तो काळोखातच वावरत असतो, वाट शोधण्यासाठी चाचपडत असतो. परंतु जेव्हा त्याला तुकोबांसारखा प्रेरक झरा प्राप्त होतो, तेव्हा त्याचे प्रकाशासाठी तहानलेले, भुकेलेले मन त्या काळोखाच्या अंतिम सीमेपर्यंत पोचते आणि त्याचा पुढचा प्रवास प्रकाशातून सुरू होतो. प्रा. दास यांना तुकोबांशी संवाद करता करता हा प्रकाश सापडलेला आहे आणि जणू काही आता त्यांचा पुढचा प्रवास आनंदाचा, आत्मभानाचा आणि उज्ज्वल प्रकाशाचा असणार आहे, हे नक्की! 

असं म्हटलं जातं की ज्यानं ज्ञानेश्वर, तुकाराम वाचले नाहीत, तो खरा मराठी माणूसच नाही. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं जे म्हटलं जातं ते बहुधा या दोघांच्या गौरवासाठीच असतं. त्यातही ज्ञानोबा हे जरा अंतर राखल्यासारखी भावना देणारे, तर तुकोबांशी जवळीक कधी होते ते ही कळत नाही अशी स्थिती. तुकोबा म्हणजे तुकाराम महाराज, जगद्गुरू इ. इ. ते बरोबरच. पण ‘तुकोबा’ किंवा नुसतं ‘तुका’ म्हटलं की जसं वाटतं, तसं काही त्यामुळं वाटत नाही. कारण ज्ञानोबांचं भाषावैभव जरा अवघड वाटणारं, तर तुकोबा थेट तुमच्या-आमच्या भाषेतच बोलतात, आपल्याहूनही रोखठोक! आणि त्यामुळंच तर ते तुमच्या-आमच्यातलेच वाटतात. त्यांच्याबद्दल कितीही आदर वाटला, तरी त्यामुळं त्यांच्या आपल्यात दुरावा कधीच निर्माण होत नसतो. साऱ्या विश्वासाठी मागणं मागणारे ज्ञानोबा तर विठू माऊलीप्रमाणं साक्षात माऊलीच! त्यामुळं त्यांची महती वेगळी सांगायलाच नको. कारण खुद्द तुकोबांनीच म्हणून ठेवलंय... ‘ज्ञानियांचा राजा, गुरू महाराव’ आणि जनाबाईनं तुकोबांची महती ‘तुका झालासे कळस’ या शब्दांत सांगितली आहे.

या तुकोबांनी वर्षानुवर्षं सर्वांना झपाटलं आहे, त्यातही कवी आणि काही प्रमाणात लेखकांनाही. त्यांच्याबद्दल लिहिताना कंटाळाच येत नाही. प्रा. राजेंद्र दास हे अशा झपाटलेल्यांपैकी एक. ‘तुकोबा’ या काव्यसंग्रहात ते तुकोबांना ‘बापा’च म्हणतात. त्या नात्यानं, हक्कानं, जवळिकीनंच त्यांच्याशी अगदी मोकळेपणानं संवाद साधतात. मुक्त काव्य संवाद. यात त्यांची तुकोबांबाबतची जवळीक, मतं, तक्रारी, प्रश्न इ. सारं काही येतं. अगदी आपुलकीच्या नात्यानं आणि तेही अगदी सहजपणं खरोखर कुणी मोठ्या आवाजात ते वाचले तर तसंच वाटेल, इतकं ते मनापासूनचं, कळकळीचं, भावपूर्ण आणि विचार करायला लावणारं आहे. या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी म्हटल्याप्रमाणं त्यात एक लडिवाळपणाही आहे. हा संवाद पित्याशी सहजपणे झालेला आहे. यात तुकोबांची सांगड ते सध्याच्या काळाशी घालतात आणि त्यामुळं निर्माण झालेल्या गुंत्याचं वर्णनही करतात, ते हलवून टाकणारं आहे.

प्रस्तावनेत आ. ह. साळुंखे म्हणतात, “तुकोबांच्या प्रेमात आकंठ बुडालेला, चिंब भिजलेला आणि जणू काही तुकोबांचा ‘समानधर्मा’च बनलेला, तुकारामांसारखाच अवलिया कवी म्हणजे प्रा. राजेंद्र दास! तुकोबांची काव्यप्रतिभा, त्यांची नवनिर्मितिक्षम प्रज्ञा, त्यांचं त्यागमय चरित्र, मार्गदर्शक आचरण व विश्वात्मक विचारसरणी समजून घेण्याचा आणि प्रतिभेच्या जोरावर अभिव्यक्त करण्याचा ध्यास घेतलेले प्रा. दास हे वर्षानुवर्षे तुकोबा या विषयाच्या चिंतनात मग्न होऊन गेले आहेत.” एवढंच सांगतो की, ही प्रस्तावना प्रत्येकानं प्रथमच वाचायला हवी. त्यामुळं या काव्यसंग्रहाचा अधिक चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल.

पहिल्याच कवितेत दास वाचकाची पकड घेतात आणि अखेरपर्यंत त्याला त्या पकडीतून सुटावंसं वाटत नाही, हेच या काव्यसंग्रहाचं यश म्हणायला हवं. सुरुवातीलाच ते म्हणतात:
‘तुकोबा
दुःखाचे असेच असते बाबा
ते पेरले तरी उगवते
नाही पेरले तरी ही उगवते’

आणि पुढं त्यांच्या जीवनाशी सांगड घालताना लिहितात: 

‘चाड्यावर मूठ धरून तुम्ही आयुष्यभर पेरीत राहिलात
शब्दांचे बियाणे
अभंगांच्या बागायतीसाठी 
त्याचवेळी
चुलीतला जाळ चुलीतच सारून
उपाशी रहिलेल्या तव्यासाठी
आवली तडफडत होती
चुलीतलेच जळके लाकूड होऊन; 
तुमचे एक बरे होते 
शब्दाच्या धनाची पूजा करण्यात तुम्ही मग्न
इकडे दुष्काळाने वेशीसह गाव भग्न
दुःखाचे भरघोस पीक भोवतीने तुमच्या
तरीही तुम्ही
शब्दांच्या पुजेतच मग्न
काळजाखालच्या झऱ्यासारखे
निवळशंख.’

या पहिल्याच कवितेतून आपल्याला पुढच्या प्रवासाचा अंदाज आणि आवाका ध्यानात येतो. तुकोबांएवढंच किंबहुना थोडं जास्तच कवीला आवलीबद्दल वाटतं. तुकोबांची महती सर्वमान्यच, पण तरीही त्यांच्याबाबत परखडपणे कवी म्हणतो: 
‘शेवटी तुकोबा 
तुम्हीही पुरुषच आम्हा चार चौघांसारखे निघालात 
बाईल कर्कशा 
बरी ही दुर्दशा जनामध्ये म्हणत म्हणत 
मोठे होत राहिलात ... चारचौघांत 
पण त्याचवेळी भिंतीवर पडलेली तिची सावली तुमच्याहून 
कितीतरी मोठी होती हे विसरू नका तुम्ही कधीही...’

आणि नंतरच्या एका रचनेत कवीनं म्हटलं आहे : 
‘तुकोबा 
दिले सारे काही 
मागितले ना कुणा 
म्हणे पंढरी राणा 
सवे माझ्या, तरी का रिकामे टोपले, 
दुरड्या 
आवलीच्या शिव्या भरलेल्या -
देता घेता थोर 
असे पांडुरंग 
तरी का निःसंग झाला तुम्ही’

कवीची एक तक्रार आहे. तो म्हणतो :
‘तुकोबा, 
अजूनही कुणी काढले नाही तुमचे मनासारखे चित्र’

नंतर अस्तित्वात असलेल्या चित्रांबद्दल तो म्हणतो : 
‘या चित्रांत नसताच तुम्ही कधी’ 

त्याला अपेक्षित चित्र कसे आहे?

‘‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हणत म्हणत अस्वस्थतसे
करंज्याच्या कडू तेलाच्या दिव्यासमोर बसून अभंग लिहिताना चुरचुरणाऱ्या डोळ्यांना आज्ञा करताना ‘डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचे मुख’ 
इंद्रियांना लगाम घालून, प्रपंचाचा डोंगर ओलांडणारे 
तुकोबा चितारायला हवेत, 
सूर्याला साक्षी ठेवून उधारीच्या वह्या बुडविणारे
न्यायपूर्ण... 
वि ...द्रो ...ही!’

कवी वास्तवाचं भान कधीच विसरत नाही. त्यामुळं या कवितांत सध्याच्या परिस्थितीचे संदर्भ येत राहतात आणि त्यांची सांगड अशी घालण्यात आली आहे, की ते वेगळे वाटतच नाहीत. तुकोबांना न्यायला आलेल्या विमानाबाबत तो तिरकसपणे लिहितो: 
‘तुमच्या विमानाच्या इंधनाचा... 
ते कुठे भरले आणि कसे भरले? 
याच्या पावत्यांचाही शोध सुरू आहे.’

आणि नंतर अचानक वाचकाला धक्का देताना म्हणतो: 
‘तुमच्या एकतारीच्या अभंगाच्या आवाजामागे 
कसले कसले कर्कश आवाज ऐकू येताहेत 
दगडावर शस्त्रांना धार लावल्यासारखे 
अगदीच पार्श्वसंगीतासारखे 
त्यामुळे डिस्टर्ब होतो आहे अभंगात... 
कुठे स्पष्ट कुठे अस्पष्ट 
तेवढे ते आवाज कशाचे ते सांगाल काय? प्लीज...’

तुकारामांच्या आरतीला वारीमध्ये विरोध झाला आणि नंतर परवानगीही मिळाली, यामुळे कवी अस्वस्थ होतो. कारण दोन्ही वेळी तुकोबांना त्याची फिकीरच नाहीय. पण ते एक करतात, दोन्ही वेळा दिंडी अर्ध्यावर सोडूनच परततात. कवी कळवळतो. म्हणतो: 
‘आम्ही सुरात... ‘एक तुका देखियेला...’  
तुम्ही 
पाठमोरे 
मुके... मुकेच 
हे काय कुठे निघालात? 
देहूकडे?
एकटेच? 
दिंडी अर्ध्यावरच सोडून?’

पण तुकोबा तसेच रामकृष्णहरी म्हणत भराभर वाटा तुडवत निघतात. तेव्हा तो स्पष्टपणे सांगतो: 
‘‘माझे मज कळो येती अवगुण काय करु मन अनावर’
एवढे म्हटले की काम झाले तुमचे 
चुकलात, तुकोबा चुकलात तुम्ही 
एकदा जनाईचा निरोप घ्यायला हवा होता 
तिला तसेच तिष्ठत ठेवून 
तुम्ही कोणत्या देवाला भेटणार आहात?’

सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतील संशोधनाबाबत कवी खूपच अस्वस्थ आहे. तो म्हणतो: 
‘तुकोबा, 
सध्या सुरू आहे जिकडे तिकडे 
तुमच्यावरच्या संशोधनाचा बोलबाला, 
विद्यापीठांच्या कारखान्यात पाडल्या जात आहेत विटा तुमच्या अभंगांच्या 
फिरकू नका इकडे तिकडे चुकूनसुद्धा 
पस्तावाल...’ 

पुढे लिहितो: 
‘कुणी शोधतो आहे तुमच्या एकतारीचा ब्रँड, 
कुणाला चारशे वर्षे जराही पुसट न होणाऱ्या शाईचा घ्यायचाय शोध
तर कुणी हुडकतो आहे तुमच्या अभंगांतून सळसळणाऱ्या
इंद्रायणीतील माशांचा वंशवृक्ष 
कुणी गोधडीला कवटाळून बसलेला, 
कुणी टाळाच्या शोधात 
पण शांतपणे तुकोबा त्याला म्हणतात: अरे, हाडा-कातड्याच्या पलिकडे असतो रे माणूस, 
दगडा मातीत काय हुडकणार माझे तुम्ही?’ 

कवी लिहितो: 
‘मी स्तब्ध. 
अन् 
तुकोबा अचंबित.’

साक्षात देवाला ‘निलाजरा तुज । नाही यातीकुळ । चोरटा शिंदळ । ठावा मज’ असं म्हणण्याची तुकोबांची हिंमत असली तरी कवी त्यांना इशारा देतो : 
‘पण तसेही नका समजू तुम्ही तुकोबा 
संपल्या असतील वंशावळी मंबाजी अन सालो मालोंच्या म्हणून 
त्या अजूनही चिकटून आहेत त्याच्या पदाला 
प्रत्येक पिढीतल्या तुकोबांना जलदिव्य करायला लावायला’ 
आणि शेवटी म्हणतो :
‘तुम्ही संपविलेत तुमचे ‘मी’पण 
आणि वाढवत राहिलात त्यांचे ‘तू’पण 
म्हणूनच अपरात्री बसावे लागले तुम्हाला 
काळोखात इंद्रायणीकाठी 
वह्यांची वाट पहात 
तरी ही अजून कुणाच्याच वह्या 
वर आल्या नाहीत 
कोणत्याच पिढीतल्या तुकारामाच्या 
तुमच्याशिवाय 
हे हो कसे? 
जरा उलगडून सांगाल काय?’ 

आणि नंतरच्या एका रचनेत म्हणतो: 
‘तुकोबा, 
दुःखाचिया हाता देऊनी भाकर
मायेची पाखर घातलीस
म्हणूनीच सारी दुःखे ही लाचार
होऊनिया सुख
लोळताती.’

तुमचा खरा गुरु दुष्काळच असे तो तुकोबांना सांगतो आणि त्यानेच तुम्हाला संसारातून उठवले याची आठवण देतो. त्यांना म्हणतो: 
‘दिवाळे निघाले म्हणून तुम्ही खुष झाला 
तेव्हाच हार मान्य केली काळाने अन गुडघे टेकले तुमच्यासमोर 
भले तुम्ही म्हणत राहिला स्वतःशी 
‘बरी ही दुर्दशा जनामध्ये 
बरे झाले जगी पावलो अपमान’’ 

आणि अखेरीस सांगतो: 
‘मोडला नाहीत तुम्ही 
म्हणूनच... म्हणूनच तुकोबा 
तुमच्या पायी डोई ठेवली आहे आम्ही 
आमचा हीनपणा झाकण्यासाठी’

पर्यावरणाच्या सुरू असलेल्या हानीने कवी गदगदला आहे. तो स्पष्टपणे लिहितो: 
‘केक कापावा तसे कापून टाकले आहोत डोंगर त्यांनी 
झाडांच्या बेसुमार कत्तली करूनही तृप्त झाले नाहीत ते अजून’
 
आणि नंतर तुकोबांना म्हणतो: 
‘तुम्ही माकड म्हणालात त्यांना तरी बहुमान वाटतोय त्यांना
तुम्ही गाढव म्हणालात त्यांना तरी हसताहेत ते हर्षवायू होऊन 
आता त्यांना फक्त ‘माणूस’ म्हणा म्हणजे... ठीक होईल 
तुमच्या माणसांचा ‘काणूस’ झालेला पाहून
कशासाठी पश्चात्ताप करताय तुम्ही तुकोबा 
‘तुका म्हणे खळा नावडे हित’ हे तुम्हीच लिहावे ना त्यांच्यासाठी?’

आणि शेवटच्या रचनेत कवी म्हणतो: 
‘तुकोबा, 
आता आतबाहेर जाळून टाकणारे कावेबाज ऊन
अन् तुमच्या काळापासून तापत तापत 
उन्हे पीत आलेले इंद्रायणीच्या घाटावरचे दगड 
तोडून तोडून शिल्लक राहिलेली उघडीबोडकी झाडे 
ते पहात पहातच आम्ही शिकवत रहातो तुमचे निसर्गप्रेम 
वृक्षवल्लींशी तुमची सोयरीक वगैरे वगैरे
हळूहळू गायब होऊ लागले आहेत तुमचे सोयरे 
वर्षानुवर्षे तुडविताहेत वाटा वारकरी तुमच्या पालखीबरोबरच
या सोयत्यांशिवायच घाटावाटांना ओलांडून...’

आणि पुढं प्रा. दास म्हणतात:
‘पर्यावरणाची चर्चा करीत वसुंधरेला वाचविण्यासाठी 
गळे आवळलेले पक्षी आता रिंगटोनवरून गात रहातात 
कुठेही... कधीही... बटन ऑफ करताच गप्प होतात 
गळा कापल्यासारखे... निथळत रहाते त्यांचे रक्त माझ्या मनाच्या भिंतीवर 
आणि झाडे डिस्कव्हरी चॅनलवर घनदाट गर्दी करतात 
माझ्या पायाखाली इंद्रायणीच्या पात्रातली सणसणीत वाळू
जीव भाजत चाललेली...
मी तुकोबा तुमच्या... 
सावलीच्या शोधात’

हा काव्यसंग्रह वाचून झाल्यानंतर आठवतात ते प्रस्तावनेतील डॉ. आ. ह. साळुंखे यांचे शब्द : ‘माणसाला जोपर्यंत आपली अस्मिता कळलेली नसते, ध्येय सापडलेले नसते, त्याला आपले प्रेरणास्थान ओळखता आलेले नसते, तोपर्यंत तो काळोखातच वावरत असतो, वाट शोधण्यासाठी चाचपडत असतो. परंतु जेव्हा त्याला तुकोबांसारखा प्रेरक झरा प्राप्त होतो, तेव्हा त्याचे प्रकाशासाठी तहानलेले, भुकेलेले मन त्या काळोखाच्या अंतिम सीमेपर्यंत पोचते आणि त्याचा पुढचा प्रवास प्रकाशातून सुरू होतो. प्रा. दास यांना तुकोबांशी संवाद करता करता हा प्रकाश सापडलेला आहे आणि जणू काही आता त्यांचा पुढचा प्रवास आनंदाचा, आत्मभानाचा आणि उज्ज्वल प्रकाशाचा असणार आहे, हे नक्की! 

‘कालपर्यंत काळोख्या वाटेवरूनच चाललो होतो मी... 
आज उभा आहे संपलेल्या काळोखाच्या सरहद्दीवर’

कुणीही याच्याशी सहमतच होईल!

तुकोबा
लेखक : प्रा. राजेंद्र दास
प्रकाशक : बाळासाहेब धोंगडे 
अक्षरवाङ्मय प्रकाशन, 
बेनकर नगर, धायरी, 
पुणे 411041
पाने : 96, किंमत : 150 रुपये.

- आ. श्री केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: संत तुकाराम वाङ्मय साहित्य नवे पुस्तक कविता काव्यसंग्रह अभंग मराठी कवी Load More Tags

Comments:

अभय करंदीकर लातूर

श्री दास सर यांचे "तुकोबा"या पुस्तकावर केतकर सर यांनी सखोल दीर्घ पण अगदी अचूक असा अभिप्राय लिहिला आहे! संत तुकाराम म्हणजे "आभाळा "एव्हढे मोठे संत पण आपला अभ्यास आणि चिंतन या मुळे दास सर यांनी त्यांना बरोबर शब्दबद्ध केले आहे!आदरणीय साळुंखे सर यांची सुरेख प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे!दास सर " मोठे साहित्यिक"आहेत हे सांगणे करिता "तुकोबा"हे एकच पुस्तक पुरेसे आहे कारण सर्व प्रकारे हे पुस्तक साकारले आहे !दास सर यांचे मनापासून अभिनंदन

Bhagwat Shinde

प्रा. राजेंद्र दास यांच्या कविता संग्रहाचे केतकर सरांनी खूप छान विश्लेषण केलेले आहे. हे विश्लेषण व दास सरांच्या यातील काही कविता वाचल्या नंतर कवितासंग्रह वाचण्याची खूप उत्सुकता, उत्कंठा निर्माण झाली आहे.

सुहास रघुनाथ पंडित सांगली

प्रा.राजेंद्र दास यांचे 'तुकोबा 'हे पुस्तक मी अजून वाचलेले नाही.आज आ.श्री.केतकर यांनी त्यावर लिहिलेले परिक्षण वाचले आणि स्वतःला एक प्रश्न विचारला," हे पुस्तक,या कविता मी अजून का वाचल्या नाहीत.?" संपूर्ण परिक्षण वाचून झाल्याशिवाय थांबलो नाही.कविता वाचतानाही असेच होणार आहे.पर्याय एकच....या कविता वाचणे.

Add Comment

संबंधित लेख