हे नमन कुणासाठी?

वाराणसी येथे गंगेच्या किनारी असलेल्या खिडकिया घाटाचे नूतनीकरण करून त्याला नमो घाट असे नाव देण्यात आले आहे..

गेली काही वर्षे गंगा नदी दूषित पाण्यासाठी ओळखली जाते आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे तीरावरील शहरे, गावे यांतील मैलापाणी या प्रवाहात (देशातील अनेक शहरांप्रमाणे) शुद्धीकरण न करताच राजरोस सोडण्यात येत आहे. त्यातही भरीस भर म्हणून गंगातीरी वा त्याच्या आसपास उभारण्यात आलेले कारखाने या प्रवाहात घातक रसायने, धातूंचे कण आणि अन्य टाकाऊ पदार्थ इ. नदीत सोडून प्रदूषणात भर घालत आहेत. पाणी शुद्ध करून मगच नदीत सोडावे हा नियम जवळपास सर्वत्रच धाब्यावर बसवला जातो, त्याला गंगातीरावरील कारखाने तरी अपवाद कसे असणार? आणि हे खरे तर ऐरणीवर आणायला हवेत असे प्रश्न दुर्लक्षित करून केवळ सुशोभीकरणावरच जास्त भर देण्यात येत असल्याचे चित्र निसर्गप्रेमी आणि पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्यांना अस्वस्थ करत आहे.

भारतीय लोकांच्या मनात बनारस / वाराणसी / काशी या स्थळाला मानाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून या शहराचे अस्तित्व असल्याचे पुरावे आहेत आणि धार्मिक कारणांनी त्याचे माहात्म्य वाढले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख मानले जाणारे काशीविश्वेश्वर हे स्थान आहे. त्यामुळेच आपल्याकडे ‘काशीस जावे नित्य वदावे’ असे म्हटले जाते, येथे येण्यानेच जन्माचे सार्थक होते अशी भावना त्यामागे आहे. आता विद्यमान पंतप्रधानांचा मतदारसंघ म्हणूनही या शहराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून तेथे अनेक प्रकारची कामे सुरू आहेत. फार पूर्वीपासून येथील मलमल आणि रेशमी कापड, अत्तरे, हस्तिदंतावरील कारागिरी आणि वास्तुशिल्पे प्रसिद्ध आहेत. आता या नगरीला नवे रूप देण्यासाठी येथील मुख्य काशी विश्वनाथ मंदिराचे सुशोभीकरण, बाजूच्या रस्त्यांचे रुंदीकरण इ. अनेक कामे पूर्ण होत आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची सोय व्हावी हा यामागील हेतू असल्याचे सांगण्यात येते. (असे असले तरी, त्यामुळे अनेकजण विस्थापित झाले आहेत, अनेकांच्या उपजीविकेची पंचाईत झाली आहे, पण त्याबाबत बोलले जात नाही, हेही तितकेच खरे.) या सुशोभीकरणाच्या कामासाठी पैशाची कमतरता नाही, कारण हा पंतप्रधानांचाच मतदारसंघ आहे.

अशा या पुरातन नगरीच्या नव्या जडणघडणीत पवित्र गंगेच्या किनारी एक नवा घाट अस्तित्वात आला आहे. तो पर्यटक आणि श्रद्धाळूंचे आकर्षण ठरेल.. नाही! आताही ठरत आहे. देशात सध्या पेव फुटलेल्या नमो भक्तगणांसाठी तर ते तीर्थक्षेत्रच बनेल, निदान तसे बनावे अशीही इच्छा या लोकांनीच केलेल्या नामकरणामागे असू शकते.

हे मुद्दाम सांगायचे कारण म्हणजे, या घाटाचे मूळ नाव खिडकिया घाट असे असले, तरी तो आता नमो घाट म्हणूनच ओळखला जात आहे. अतिशय अद्ययावत सोयी निर्माण करून तो जलमार्ग आणि वायुमार्गालाही जोडण्यात येणार आहे, त्यामुळे देशी विदेशी पर्यटकांना येथून अन्य शहरांमध्ये जाणेही सहजपणे शक्य होईल. वाराणसी- बनारसमध्ये गंगा नदीवर 84 घाट आहेत. आता 85 घाट आहेत असे म्हणायला हवे. त्यातील काही प्रसिद्ध घाट म्हणजे दशाश्वमेध घाट, मनकर्णिका घाट, महानिर्वाण घाट, अस्सी घाट, राज घाट, बाजीराव घाट, विजयानगरम घाट, सिंदिया घाट, मानसरोवर घाट, मनमंदिर घाट, ललिता घाट, जैन घाट (बचराज घाट), तथागत (बुद्ध) घाट, नारद घाट, हनुमान घाट, प्राचीन हनुमान घाट, हरिश्चंद्र घाट, तुलसी घाट, कर्नाटक राज्य घाट, दरभंगा घाट, प्रयाग घाट, राजेंद्र प्रसाद घाट इ. आहेत. (या घाटांपैकी काहीची उभारणी, तसेच अनेक घाटांची दुरुस्ती करणाऱ्यांमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील नागपूरचे भोसले तसेच शिंदे, शितोळे, अहिल्याबाई होळकर, थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, नाना फडणवीस इ. नावे आहेत.) वाराणसीतील या घाटांपैकी काही घाटांची नावे व्यक्तींवरून देण्यात आली आहेत, वा प्रचलित आहेत आणि राजेंद्रप्रसाद घाट हे नाव आपल्या पहिल्या राष्ट्रपतींबाबतचा आदर व्यक्त करण्यासाठी दिले गेले आहे. त्यामुळेच आता असे असले, तर मग आमच्या विश्वनायकाच्या नावाने घाट ओळखला जाऊ लागला तर त्यात वावगे काय आहे, असा प्रश्नही भक्तगणांकडून विचारला जाऊ शकतो.

हा नवा घाट, घाटच असला तरी तो केवळ इतर घाटांसारखा घाट असणार नाही. कारण तेथे वाराणसीची प्राचीन परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालण्यात येत आहे, आणि त्यासाठी या घाटाला लागूनच एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळेच हा केवळ घाट असणार नाही, तर तो पर्यटकांचे खास आकर्षण असलेले अद्ययावत संकुल बनेल, असे सांगितले जाते. तेथे विविध प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधा असतील. त्याकरता साधारण अर्धा कि.मी. लांब असलेल्या या 21000 चौ. मी. जागेवर 34 कोटी रुपये खर्च करून एक मोठा संकुल प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले आहे. दोन टप्प्यांच्या या प्रकल्पाचा एकूण खर्च 72 कोटी रुपयांचा आहे.

आता प्रश्न असा आहे की, खिडकिया घाटाला नमो घाट असे का म्हटले जात आहे, त्याचे कारण असे दिले जात आहे की, तेथे नमस्ते करण्यासाठी जोडलेल्या हातांची तीन शिल्पे आहेत. शिल्पात हे हात कोपरापासून दिसतात. जणू काही ते जमिनीतून उगवले आहेत असे वाटते. या जोडलेल्या हातांची दोन शिल्पे 25 फूट उंचीची तर तिसरे त्यामानाने थोडे लहान, म्हणजे 15 फूट उंचीचे आहे. मोठ्या शिल्पांतील नमन हे सूर्याला आहे, तर 15 फूट उंचीच्या शिल्पातील प्रणाम हा गंगा नदीला आहे असे सांगण्यात येते. या शिल्पांमुळेच या घाटाला नमो घाट असे म्हटले जात आहे. याचे कारण सांगताना आपल्याकडे नमन वा नमस्कारासाठी नमो हा शब्द प्रचलीत आहे आणि त्याचा नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांशी काहीही संबंध नाही, असे प्रकल्पाचे व्यवस्थापक डॉ. वासुदेवन ठासून सांगतात. अर्थात असे आवर्जून सांगावे लागत आहे, यातच सारे आले! पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या घाटाचे उदघाटन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण प्रत्यक्ष औपचारिक उद्घाटन होण्याच्या आधीच तो लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.


हेही वाचा : अतिशय महत्त्वाच्या (पण दुर्लक्षित) विषयावरील बहुमोल पुस्तक... - आ. श्री. केतकर 


या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात येथे पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या जोडलेल्या हातांच्या तीन शिल्पांच्या मागे दुसऱ्या टप्प्यात 75 फूट उंचीचे असेच धातूचे प्रचंड शिल्प उभारण्यात येणार आहे. या साऱ्या प्रकल्पाच्या उभारणीत ‘मेक इन इंडिया’वर भर देण्यात आला आहे आणि तेथे व्होकल फॉर लोकलही नजरेस येईल. येथे येणाऱ्यांसाठी चांगल्या आधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. या संकुलामध्ये एक मोठे खुले प्रेक्षागृह- ओपन एअर थिएटर, सुसज्ज ग्रंथालय, कॅफेटेरिया तसेच बनारसी पानासाठी खास फूड कोर्टची व्यवस्थाही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वृद्ध आणि दिव्यांगांना सहज फिरता यावे म्हणून विशेष काळजीपूर्वक आखणी करण्यात आली आहे. एक भव्य मंच असून तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येऊ शकते. शिवाय महत्त्वाचे म्हणजे तेथे हेलिकॉप्टरही उतरु शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी नदीकाठी धक्का उभारण्यात आला असून, तेथे भाविक, श्रद्धाळूसाठी ‘काशी विश्वनाथ धाम’ची तिकिटेही मिळतील, आणि श्रद्धाळू वा पर्यटक बोटीने काशी विश्वनाथ धाम येथे दर्शनासाठी जाऊ शकतील.

प्रकल्पाचे अभियंता दुर्गेश यांनी सांगितले की, येथे अशा सामग्रीचा उपयोग करण्यात आला आहे की, गंगेला पूर आला तरी हा घाट सुरक्षित राहील. येथपर्यंत वाहने येऊ शकतील अशी सुविधा निर्माण करण्यात आली आहे आणि घाटावर पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. येथे येणारे पर्यटक, भाविक-श्रद्धाळू अशा सर्वांचे आकर्षण असलेल्या गंगा आरतीतही सहभागी होऊ शकतील. ‘नमामि गंगे’ या 2014 साली सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा एक भाग आहे. अतिशय प्रदूषित झालेल्या या पवित्र नदीच्या शुद्धीकरणाचाही त्यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी 29,972 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रकल्पामध्ये एकूण 341 कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पण आजवर त्यापैकी 141 पूर्ण झाले आहेत. ते बहुधा सुशोभीकरण वा अन्य कामांसाठी असावेत. मुख्य प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याकरता मैला पाणी शुद्धीकरणाचे वेगवेगळे एकूण 157 प्रकल्प नियोजित आहेत आणि आजवर त्यांपैकी केवळ 61 प्रकल्पच पूर्ण झाले आहेत. या काळात प्रदूषणाचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळेच गंगा खऱ्या अर्थाने शुद्ध पवित्र कधी होईल हे सांगणे अवघड झाले आहे.

गेली काही वर्षे गंगा नदी दूषित पाण्यासाठी ओळखली जाते आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे तीरावरील शहरे, गावे यांतील मैलापाणी या प्रवाहात (देशातील अनेक शहरांप्रमाणे) शुद्धीकरण न करताच राजरोस सोडण्यात येत आहे. त्यातही भरीस भर म्हणून गंगातीरी वा त्याच्या आसपास उभारण्यात आलेले कारखाने या प्रवाहात घातक रसायने, धातूंचे कण आणि अन्य टाकाऊ पदार्थ इ. नदीत सोडून प्रदूषणात भर घालत आहेत. पाणी शुद्ध करून मगच नदीत सोडावे हा नियम जवळपास सर्वत्रच धाब्यावर बसवला जातो, त्याला गंगातीरावरील कारखाने तरी अपवाद कसे असणार? आणि हे खरे तर ऐरणीवर आणायला हवेत असे प्रश्न दुर्लक्षित करून केवळ सुशोभीकरणावरच जास्त भर देण्यात येत असल्याचे चित्र निसर्गप्रेमी आणि पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्यांना अस्वस्थ करत आहे. कोरोना काळानंतर प्रदूषणात वाढच झाली असणार हे सांगण्यास कोणा तज्ज्ञाची आवश्यता नाही. त्यातच त्या महामारीमध्ये अन्य काही विधी करणे शक्य नसल्याने अनेक कलेवरे नदीत सोडण्यात आली आणि अनेक तीरावरच मोठ्या संख्येने जाळली गेली. या साऱ्याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही, आणि आली तरी ती कोविड मृत्यूंच्या संख्येप्रमाणे खूपच कमी असणार, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. लॉकडाउनमुळे पायीपायी शेकडो मैलावरील आपल्या गावी जाताना कितीजणांना प्राण गमवावे लागले याबाबत केवळ आमच्याकडे तशी नोंद नाही, असेच सांगण्यात आले. त्यामुळे समजा गंगेत सोडल्या गेलेल्या शवांची आणि काठावरच अग्नी देण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या कितपत विश्वासार्ह असेल हा प्रश्नच आहे.

खिडकिया घाटाचे नाव असे का पडले याबाबत सांगण्यात येते की येथूनच जवळच्या अंत्यसंस्कारासाठीच प्रसिद्ध असलेल्या मनकर्णिका घाटावर जळणाऱ्या चिता मृताचे नातेवाईक बघत. भाविक हिंदूंच्या मनात काशी येथेच देहत्याग व्हावा अशी भावना असते कारण या पुण्यक्षेत्री मरण आले तर सद्गती मिळते असा त्यांचा विश्वास असतो. काशीचे आणि मृत्यूचे असे जवळचे नाते आहे. आणि अशा या क्षेत्रात आता हा नमो घाट अस्तित्वात येत आहे. तेथील नमस्कार करणाऱ्या जोडलेल्या हातांची शिल्पे पाहून वाटते की, हे सूर्य आणि गंगामातेला नमन आहे की पापक्षालनासाठी आहे, कारण काही झाले तरी माणसाचे मन त्याला त्याच्या दुष्कृत्यांची आठवण करून देत असते. बाकी कुणाला नाही तरी त्याला ते नक्कीच माहीत असते. त्यामुळेच हे नमन नक्की कुणाला आहे, असा प्रश्न पडतो. येथील वास्तव सांगणारी पारुल खख्खर यांची एक कविता प्रसिद्ध झाली होती. तिचा हिंदी अनुवाद इलियास शेख यांनी केला. या कवितेच्या सुरुवातीसच म्हटले होते,

एकसाथ सब मुर्दे बोले
'सबकुछ चंगा चंगा'
साहेब, तुम्हारे रामराज में
शव-वाहिनी गंगा

या प्रकल्पाला भेट देणारे ज्यावेळी नमो घाटावरील या भव्य शिल्पांच्या समोर येतील, तेव्हा त्यांना नक्कीच या ओळी आठवतील आणि नकळत त्यांचेही हात गंगेतील त्या असंख्य अनाम शवांसाठी जोडले जातील! गंगेचे खरेखरे शुद्धीकरण करण्याऐवजी केवळ तिला नमन करणारे शिल्प उभारून काय उपयोग असेही त्यांच्या मनात येईल.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: नमो नरेंद्र मोदी पंतप्रधान गंगा गंगा शुद्धीकरण बनारस गंगेचे खोरे भाजप Load More Tags

Add Comment