भारताच्या इतिहासातील एक काळे पान म्हणजे ब्रिटिश राजवटीत 13 एप्रिल 1919 रोजी झालेले नृशंस जालियनवाला बाग हत्याकांड. क्रूरकर्मा जनरल डायर याने वैशाखीच्या दिवशी तिथे जमलेल्या दोन हजारांहून अधिक लोकांवर कायदेभंग केल्याचा आरोप केला आणि म्हणून त्यांच्यावर सैनिकांकरवी बेछूट गोळीबार केला. 'गोळ्या झाडा' असा आदेशच त्याने या (निरापराध) लोकांना मारण्यासाठी दिला. या बागेतून बाहेर पडण्यासाठी केवळ एक अरुंद बोळ होता त्यामुळे गोळीबार सुरू झाल्यावर लोकांना निसटणे अशक्यच झाले होते. त्या गोळीबारात तेव्हाच्या सरकारी अंदाजाप्रमाणे किमान 379 लोक मरण पावले. सैनिकांनी 1650 राउंड गोळ्या झाडल्या. अनधिकृत अंदाजानुसार त्यात 1137 लोक मरण पावले.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने डायरच्या कृतीला मान्यता दिली पण याबाबतची जाहीर चौकशी करण्यासाठी काँग्रेसने मोतिलाल नेहरूंची नेमणूक केली. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जवाहरलाल नेहरूंना अमृतसरला धाडले. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी लिहिले की, ‘डायरच्या त्या कृतीला निष्ठुरपणे देण्यात आलेली मान्यता हा मला मोठाच धक्का होता. तो सारा प्रकारच अनैतिक व अश्लाघ्य होता. पब्लीक स्कूलची भाषा वापरायची तर तो वाईटाचा कळस होता.’
या हत्याकांडाच्या वेळी शांतिकुमार मुखर्जी तिथे उपस्थित होते. त्याच वर्षी होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनासाठी ती जागा निश्चित करावी असा ठराव त्यांनी मांडला. महात्मा गांधींनी निधी उभारण्यासाठी आवाहन केले. 5,60,471 रुपयांचा निधी जमा झाला. 1 ऑगस्ट 1919 रोजी ती जागा तिचे मालक हिंमतसिंग यांच्याकडून घेण्यात आली. तेव्हापासून मुखर्जी कुटुंबाकडे त्या जागेची देखभाल करण्याचे काम आहे. शांतिकुमार यांचे पुत्र सुकुमार मुखर्जी यांनी 1988मध्ये आपली बँकेतील नोकरी सोडली आणि तेव्हापासून ते हे काम बघत होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्र सरकारने 1 मे 1951 रोजी जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट स्थापन केला. तिथे ज्योतिरूप शिल्प साकार करण्याचे काम अमेरिकन शिल्पकार बेंजामिन पोक (Polk) यांच्याकडे दिले. स्मारकाचे उद्घाटन 13 एप्रिल 1961 रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले होते. कालपरत्वे हे स्मारक जुने झाले होते. त्याची दुरवस्था पाहून 2008मध्ये गदर चळवळीत सक्रिय सहभाग असलेले 101 वर्षांचे बाबा भगतसिंग बिल्गा यांनी निषेध व्यक्त केला होता. पुढे देश भगत यादगार समितीच्या वतीने संयुक्त लोकशाही आघाडीच्या सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली होती, तेव्हा बिल्गा हे चाकाच्या खुर्चीवर बसून या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. समितीने नूतनीकरणाचाही निषेध केला आहे.
जालियनवाला बाग स्मारकाच्या दैन्यावस्थेमुळे 2019मध्ये नूतनीकरणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आणि ट्रस्टच्या घटनेतही बदल करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच नूतनीकरण झालेले हे स्मारक पंतप्रधानांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले. साडेतीन वर्षे स्मारक बंद ठेवून नूतनीकरणाचे काम चालू होते. ज्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी लोकांनी उड्या घेतल्या त्या विहिरीभोवती आता पारदर्शक संरक्षक लावण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या ज्या अरुंद बोळातून जाऊन जीव वाचवण्यासाठी लोक धडपडत होते त्याचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याच्या दोन्ही भिंतींवर म्युरल्स - भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत. नूतनीकरण नावाखाली झालेल्या या विद्रुपीकरणावर प्रचंड टीका होत आहे. प्रकाश-ध्वनिचित्राचा खेळही (साउंड ॲन्ड लाइट शोही) तिथे दाखवण्यास सुरुवात झाली आहे. याखेरीज चार संग्रहालयांद्वारेही सविस्तर माहिती मिळवता येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सारे काही 'नयनरम्य' कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
काही अभ्यासकांनी आणि जाणकारांनी या नूतनीकरणावर टीका केली. जेएनयूचे प्रा. चमनलाल यांच्या मते ‘इतिहासाचे विरूपीकरण-विपर्यास करण्याचा हा प्रयत्न आहे. जालियनवालाबाग इथे जाणाऱ्यांना दुःखाने व्याकूळ होऊन वेदना व्हायला हव्यात पण सुशोभीकरणाच्या नावाखाली हा परिसर मौजमजेसाठी असलेल्या पर्यटनस्थळासारखाच बनवण्यात आला आहे. ते काही सुंदर उद्यान नव्हते. शांत, निरापराध लोकांवर डायरने गोळीबार केला होता पण त्या ऐतिहासिक ठिकाणाची डागडुजी करून ते जतन करण्याऐवजी सरकारने नूतनीकरण आणि सुशोभीकरण केले, तेही नव्या गोष्टींची भर घालून.’
ज्येष्ठ इतिहासकार इरफान हबीब म्हणाले की, ‘चांगल्या सुविधा, स्वच्छतागृहे वा उपाहारगृहे यांना माझा विरोध नाही पण इथे जे काही बदल घडलेत ते इतिहासाचा आणि राष्ट्राच्या संस्कृतीच्या वारशाचा बळी देऊन. त्या अरुंद बोळात भित्तिचित्रे का हवीत? हा खरोखरच भपकेदार बटबटीतपणा आहे. इतिहास नव्याने लिहिला जात आहे हे स्मारकाचे कॉर्पोरेटीकरण आहे. हे बदल अनावश्यक सौंदर्यप्रसाधनासारखे आहेत.’
इंग्लंडमधील प्राध्यापक आणि ‘अमृतसर 1919 - ॲन एम्पायर ऑफ फिअर अँड मॅसॅकर’ या पुस्तकाचे लेखक किम वॅग्नर म्हणतात, ‘या नूतनीकरणाने त्या दुर्घटनेचे अखेरचे ठसेही मिटवण्यात आले आहेत.’ त्यांनी नूतनीकरण करण्याआधीचे आणि नंतरचे फोटोही आपल्या टि्वटरवर पोस्ट केले. ते म्हणतात, ‘जुन्या अमृतसर शहराचे आता डिज्नेफिकेशन (‘Disney’fication) करण्यात येत आहे.’
दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अमृतसरमध्येच त्या ऐतिहासिक स्थळापासून पाच किलोमीटर अंतरावरील रणजित ॲव्हेन्यू परिसरातील अमृत आनंद पार्क येथील जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दी स्मारकाचे उद्घाटन केले. 4490 चौ. मी. जागेवर साडेतीन कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे. मरण पावलेल्यांच्या 29 वंशजांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या स्मारकात हुतात्मा झालेली मुले, किशोरवयीन, युवक, मध्यमवयीन आणि वृद्ध यांचे प्रतीक म्हणून आकाशाकडे झेपावणारे वेगवेगळ्या उंचीचे पाच पांढरे दगडी स्तंभ आहेत. उपलब्ध झालेली 492 हुतात्म्यांची नावे स्मारकाच्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. हे स्मारक म्हणजे त्या वेळच्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. पांढरा रंग त्यांच्या बलिदानाच्या शुद्धतेचे, आकाशाकडे झेपावणारे स्तंभ हे सद्गतीचे प्रतीक आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
या घटनेतील हुतात्मे आणि पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमधील हुतात्मे यांच्याबाबतच्या जास्तीच्या संशोधनाचे काम गुरू नानकदेव विद्यापीठाकडे सोपवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले तर दुसरीकडे जालियनवाला बागेपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर नवे स्मारक उभारणे अयोग्य असल्याचे मत जालियानवाला बाग राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे सदस्य श्वेत मलिक यांनी नोंदवले.
या टीकेबरोबरच या स्मारकांबाबत काही राजकीय शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यातील एक ही की, सध्याच्या केंद्र सरकारच्या इतिहास बदलण्याच्या ध्यासासाठीच स्मारकाचे मूळ स्वरूप बदलून टाकून त्याला उदात्ततेऐवजी पर्यटनस्थळ असल्यासारखे मनोरंजनाचे सवंग रूप देण्यात आले त्यामुळे जालियानवाला बागकडे जाणाऱ्या त्या अतिशय अरुंद मार्गाचे ‘सुशोभीकरण’ केले गेले. भित्तिचित्रांवरील आकृत्या आणि मूळ दुर्घटना यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही असे जाणकारांचे मत आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसने स्थापन केलेल्या ट्रस्टची घटना बदलण्यात आली आणि ट्रस्टींच्या यादीतून काँग्रेसच्या अध्यक्षांना वगळण्यात आले त्यावरूनही सरकारचा हेतू स्पष्ट होत असल्याचे दिसून येते असेही म्हटले जात आहे.
येत्या काही महिन्यांतच होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे सर्व करण्यात आल्याचे मतही काही जण व्यक्त करतात. इंधनाच्या आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या भावांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे असे काहींचे मत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्या अशा क्लृप्त्यांना चांगले यशही मिळाले आहे. तसेही भाजपसाठी अन्य कोणत्याही प्रश्नापेक्षा निवडणुका सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना असल्याने आपली बाजू बळकट करण्यासाठी आणि अर्थात राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी त्यांनीही वेगळ्या जागेवर नवे स्मारक उभे केले आहे असेही म्हटले जात आहे. यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार... दोघांनाही हुतात्म्यांच्या स्मारकाचे नव्हे तर आपल्या प्रतिमेचेच महत्त्व आहे!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: आ. श्री. केतकर जालियानवाला बाग नूतनीकरण स्मारके राष्ट्रीय स्मारक इतिहास पंजाब नरेंद्र मोदी कॅप्टन अमरिंदर सिंग A S Ketkar Jallianwala Bagh National Monument Renovation Punjab Controversy Captain Amrinder SIngh Load More Tags
Add Comment