विश्वविजेत्यांवर भारताची निर्विवाद मात!

कसोटी विश्वचषकातील पराभवाचे दु:ख या मालिका विजयामुळे नक्कीच हलके होईल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारतीय संघाने 372 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. दोन सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकून भारताने कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले. यापूर्वी झालेल्या टी-20 मालिकेतही भारताने न्यूझीलंडला सपशेल नमवले होते आणि मालिका  3-0 ने जिंकली होती. त्यानंतर त्यांचा प्रमुख जलद गती गोलंदाज ट्रेंट बोल्ट मायदेशी परत गेला होता आणि तो संघ आणखीच कमकुवत बनला होता. त्यामुळे न्यूझीलंडवर भारत नक्कीच सहज मात करेल असे बोलले जात होते.

या मालिकेत काही लक्षणीय गोष्टी घडल्या. प्रथमच कसोटीत खेळणारा श्रेयस अय्यर याने पहिल्या तर मयांक अगरवालने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले, तर न्यूझीलंडच्या लॅथॅमने पहिल्या कसोटीत शतकाची नोंद केली. दुसऱ्या कसोटीत एजाझ पटेलने एका डावात दहा गडी बाद करून जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाची बरोबरी केली. महत्त्वाची बाब म्हणजे परदेशांत खेळताना त्याने ही कामगिरी केली. लेकर आणि कुंबळे दोघेही विक्रम केला तेव्हा मायदेशी खेळत होते.

रविचंद्रन विश्वनने यंदाच्या वर्षात 50 बळी पूर्ण केले. त्याने पहिल्या कसोटीत सहा, तर दुसऱ्या कसोटीमध्ये आठ बळी मिळवले आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याला संघात स्थान न दिल्याबाबत झालेली टीका (तो जवळपास तीन वर्षांनंतर कसोटीत खेळत होता) सार्थच होती हेदेखील त्याने दाखवून दिले. अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी मिळवले, तर जयंत यादवने चार गडी बाद केले.

भारत-न्यूझीलंड मालिकेपासून भारतीय संघ व्यवस्थापनाची जबाबदारी राहुल द्रविडकडे देण्यात आली आहे. टी-20 मालिका जिंकल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीत न खेळता विश्रांती घेणार होता, त्यामुळे त्या कसोटीत नेतृत्व उपकर्णधार अजिंक्य राहणेकडे सोपवण्यात आले होते. रहाणेने कर्णधार असताना एकही पराभव पत्करलेला नाही, यावरून त्याच्यातील नेतृत्वगुण दिसतात.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झाला. त्यानंतर विराट कोहली काही वैयक्तिक कारणाने भारतात परतला. त्यानंतर रहाणेच्या नेतृत्वाखाली भारत ती मालिका जिंकला होता. तेव्हापासून कसोटी कर्णधारपदही त्याच्याकडेच देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. परंतु अलीकडील काही कसोटींमध्ये त्याला फलंदाजीत अपयश येत होते. त्यामुळे ही मागणी काहीशी बंद झाली होती. कानपूर कसोटीसाठी त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली आणि त्याने पुन्हा एकदा आपल्यातील नेतृत्वाचे गुण दाखवले. तरीही विजय थोडक्यात निसटला होता. (स्वतः त्याची कामगिरीही खराबच होती.)

त्या कसोटीत रचिन रवींद्र आणि एजाझ पटेल या न्यूझीलंडच्या शेवटच्या जोडीने सामन्यातील अखेरची नऊ षटके जिद्दीने खेळून काढली आणि खराब प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. त्यामुळे भारताच्या तोंडचा घास हिरावला गेला असे म्हटले गेले. कुणी सांगावे, रवींद्र आणि एजाझ या जोडीने आणखी दहा मिनिटेदेखील खेळून काढली असती! पण ही झाली जर...तरची गोष्ट.

दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यावर अगरवाल आणि गिल यांनी 80 धावांची सलामी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पण गिल बाद झाल्यावर पुजारा आणि कर्णधार कोहली शून्यावरच बाद झाल्याने पुढे काय- असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पहिल्या कसोटीचा मानकरी अय्यरही केवळ 18 धावा काढून परतला. भारताच्या तेव्हा 4 बाद 160 धावा झाल्या होत्या. परंतु प्रथम वृद्धिमान साहा 27 आणि अक्षर पटेल 52, यांनी मयांकला व्यवस्थित साथ दिली. आणि भारताचा डाव सावरला. भारताच्या 291 धावा असताना मयंक अगरवाल 150 धावा काढून परतला, पण आता संघ त्या मानाने सुस्थितीत होता. नंतर अक्षरने जयंत पटेलच्या साथीने धावसंख्या 316 पर्यंत नेली आणि तो 52 धावा करून बाद झाला. भारताचा डाव 325 वर आटोपला. न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याने भारताचे सर्वच्या सर्व म्हणजे दहा गडी बाद केले. त्याची गोलंदाजी 47.5 षटके, 12 निर्धाव 19 धावा आणि दहा बळी अशी होती.

पहिल्या कसोटीतील कामगिरीवरून न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत चांगली लढत देईल असे वाटत होते. परंतु तसे काही घडले नाही. या वेळी भारताचे नेतृत्व रहाणेऐवजी कोहली करत होता. कर्णधार विल्यमसनच्या ऐवजी लॅथॅम त्यांचे नेतृत्व करत होता. अशा प्रकारे दोन कसोटींत चार कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळ झाला. महंमद सिराजने तिसऱ्या षटकात यंग आणि लॅथॅम यांना बाद केले तर पाचव्या षटकात रॉस टेलर याचा मोलाचा बळी मिळवून पाहुण्यांना मोठाच धक्का दिला आणि त्यानंतर ते डाव सावरू शकले नाहीत. एकामागून एक त्यांचे फलंदाज परतत होते आणि अखेर त्यांचा डाव केवळ 62 धावांवर आटोपला. अश्विनने तीन, अक्षरने दोन- तर जयंत यादवने एक बळी मिळवला.

भारतानेही फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (फॉलोऑननंतर द्रविडने शतक आणि लक्ष्मणने द्विशतक नोंदवून ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला होता. या घटनेमुळे शक्यतो फॉलोऑन देण्याचे टाळतात). सामन्याचे जवळपास सव्वादोन दिवस बाकी असल्यानेच भारताने हा निर्णय घेतला होता. कारण त्यांना न्यूझीलंडपुढे मोठे आव्हान ठेवायचे होतेच, पण आपण कोणत्याही परिस्थितीत हरणार नाही याकडेही लक्ष द्यायचे होते आणि झालेही तसेच.

फिरकीला झकास साथ देणाऱ्या वानखेडेच्या खेळपट्टीवर योग्य तंत्राने खेळून भारताने दुसरा डाव सात बाद 276 वर घोषित केला आणि पाहुण्यांपुढे 540 धावांचे आव्हान ठेवले. अगरवालने पहिल्या डावातील शतकापाठोपाठ दुसऱ्या डावातही अर्धशतकी मजल गाठली. समाधानाची बाब म्हणजे अलीकडे फार काही करू न शकलेल्या आणि या डावात आघाडीला आलेल्या पुजारा आणि कोहली यांनी थोडी चमक दाखवली. ही गोष्ट आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी समाधानाचीच आहे. तिसऱ्या क्रमांकवर आलेल्या गिलने 47 धावा केल्या. आणि नंतरच्या फलंदाजांपैकी अक्षर पटेल 47 धावा काढून नाबाद राहिला. डाव तेव्हा घोषित करण्यात आला नसता तर त्याने पहिल्या डावाप्रमाणे अर्धशतक नोंदवलेही असते.

न्यूझीलंडकडे भरपूर वेळ होता, पण वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर दोन दिवसांनंतर अशी धावसंख्या करणे खूपच अवघड होते. त्यातच सिराज आणि अश्विन व अक्षरची कामगिरी पाहता हे नक्की सोपे नव्हते. कारण एजाझने दुसऱ्या डावातही चार तर रचिन रवींद्रने तीन बळी मिळवले होते आणि अपेक्षेप्रमाणेच हा डावही अश्विनने गाजवला. अश्विनने पुन्हा एकदा चार गडी बाद केले आणि त्याला जयंत यादवची साथ मिळाली. शेवटचे चार गडी बाद करून त्याने चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव झटपट संपवायला मोठी मदत केली. मिशेल 60 आणि निकलस 44 यांनी काहीसा प्रतिकार केला तरी त्यांना इतरांची साथ मिळाली नाही. न्यूझीलंडचा दुसरा डाव केवळ 167 धावांवर आटोपला आणि भारताने मालिका जिंकली. न्यूझीलंडने मालिका सोडाच; पण भारतात 1988 नंतर एकही सामना जिंकलेला नाही. योगायोग असा की तो विजय त्यांनी वानखेडे स्टेडियमवरच मिळवला होता. रविचंद्रन अश्विन मालिकावीर तर मयंक अगरवाल सामनावीर ठरला.

कानपूर येथील पहिल्या कसोटीमध्ये नाणेफक जिंकल्यावर रहाणेने अपेक्षेअनुसार फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयंक अगरवाल आणि शुभमन गिल या नव्या आघाडीच्या जोडीने डावाला सुरुवात केली, पण केवळ 13 धावा करून मयंक परतला. त्याला जेमीसनने बाद केले. गिल आणि पुजारा यांनी धावसंख्या 82 नेल्यानंतर गिल त्याच्या 52 धावा असताना जेमीसनने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुजारा 26 आणि रहाणे 35 बाद झाले. त्यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती ती काही पूर्ण झाली नाही. पण कसोटीत पदार्पण करणारा अय्यर सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळत होता. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 4 बाद 145 अशी होती. पण त्यानंतर जडेजा आणि अय्यर यांनी न्यूझीलंडला यश मिळू न देता शतकी भागीदारी रचली आणि भारताच्या 266 धावा असताना जडेजा 50 धावांवर बाद झाला. पण त्याने आपले काम चोख पार पाडले होते. पाठोपाठ साहाही त्याच धावसंख्येवर परतला, तरी नंतर अनुभवी अश्विनने अय्यरला चांगली साथ दिली.

भारताच्या 305 धावा असताना अय्यर बाद झाला. अक्षर पटेल तीन धावा काढून परतला. अश्विनला एजाझने त्रिफळाचीत केले, तर ईशांत शर्माला पायचीत केले. भारताचा डाव 345 वर संपला. भारताच्या धावसंख्येला चेख उत्तर देत लॅथॅम (95) आणि यंग (89) या आघाडीच्या जोडीने न्यूझीलंडला 151 धावांची सलामी दिली. पण विल्यमसन, टेलर आणि निकलस यांनी निराशा केली. त्यांच्या 227 धावा असताना लॅथॅमही परतला आणि नंतर ब्लंडेल, रचिन आणि जेमीसन यांच्या थोड्या प्रतिकारामुळे पाहुण्यांना 295 ची मजल गाठता आली. अक्षरने पाच तर अश्विानने तीन गडी बाद केले.

दुसऱ्या डावातही लॅथॅमने अर्धशतक (52) नोंदवले . पण सुरुवातीलाच यंग संघाच्या केवळ तीन धावा असताना बाद झाला होता. नाइट वॉचमन म्हणून आलेल्या सोमरव्हिलने दिवस अखेर आणि नंतरच्या दिवशी सुरुवातीला काही काळ लॅथॅमला साथ दिली आणि 36 धावा काढून तो बाद झाला. न्यूझीलंड 2 बाद 79. कर्णधार विल्यमसनने नंतर लॅथॅमच्या साथीने धावसंख्या शतकापार नेली, पण पुन्हा एकदा मोठी धावसंख्या नोंदवण्यात त्याला अपयशच आले. संघाच्या 118 धावा असताना लॅथॅम बाद झाला. पाठोपाठ टेलर दोन- तर निकलस केवळ एक धाव करून परतले. पाठोपाठ विल्यमसनही केवळ 24 धावा करून तो परतला.

आता धावसंख्या होती न्यूझीलंड 6 बाद 128. नंतरचे ब्लंडेल (5), जेमीसन (4) आणि सौदी (1) झटपट बाद झाले आणि न्यूझीलंडची हालत 9 बाद 155 अशी झाली. पण रचिन रवींद्रने (18) आणि एजाझ पटेलने चिवट प्रतिकार केल्याने पाहुण्यांना काहीसा दिलासा मिळाला. प्रत्येक षटकाबरोबर पराभवाचे सावट दूर होत होते आणि अखेर अपुऱ्या प्रकाशाने सामना थांबवण्यात आला. सामना अनिर्णित ठेवण्यात न्यूझीलंडला यश आले आणि त्याचे मानकरी हे दोघेच होते.

एकंदरीत भारताच्या दृष्टीने ही मालिका समाधानकारक ठरली. भारताकडे अनेक दर्जेदार खेळाडू कसोटीत संधी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत हे स्पष्ट झाले. म्हणूनच द्रविडने म्हटले की, एवढ्या खेळाडूंमधून केवळ अकरा खेळाडूंचा संघ निवडणे ही एक डोकेदुखी आहे, पण ही डोकेदुखी नक्कीच हवीहवीशी आहे.

कसोटी विश्वचषकाच्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. ते दुःख या मालिका विजयामुळे नक्कीच हलके होईल. शिवाय 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठीही खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी याची मदत निश्चतच होईल. तेथील खेळपट्ट्या वेगळ्या असतील, पण मार्गदर्शनासाठी द्रविड गुरुजी आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय चमूची अद्याप निवड झालेली नाही, तरीही त्यात काही नवे चेहरे दिसतील अशी खातरी बाळगायला हरकत नाही. कारण तेच पुढे भारताचा आधार ठरणार आहेत.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: क्रीडा आ. श्री. केतकर क्रिकेट भारत न्यूझीलंड कसोटी मालिका टेस्ट A. S. Ketkar Cricket India New Zealand Test Series Sports Load More Tags

Add Comment