इंग्लंड संघाविरुद्धच्या यंदाच्या क्रिकेट कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी शनिवार 13 फेब्रुवारीला चेन्नई येथे सुरू होईल. नेहमीच्या मालिकेपेक्षा ही मालिका जास्त महत्त्वाची आहे... कारण कसोटी सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी या चार कसोटींच्या मालिकेत चांगल्या प्रकारे म्हणजे 2-0 वा 3-0 वा 2-1 वा 3-1 असा विजय मिळवणे भारताला आवश्यक आहे.
पहिली कसोटी इंग्लंडने जिंकल्यामुळे भारताचे काम अवघड झाले आहे. इंग्लंडलाही अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा तर तीन विजय नोंदवावे लागणार आहेत... त्यामुळे त्यांची वाट जास्त खडतर वाटत होती... पण पहिली कसोटी जिंकून आपण भारताच्या तोडीस तोड आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे व या विजयामुळे त्यांचीही उमेद वाढली असेल... त्यामुळे ही दुसरी कसोटी जिंकण्याचा उभय संघांचा प्रयत्न असेल.
असे असले तरीही भारतीय चाहत्यांना आशा आहे की, जेमतेम महिन्याआधीच ऑस्ट्रेलियामध्ये ज्याप्रमाणे भारतीय संघाने उसळी मारून पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही चार सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली होती तशीच कामगिरी तो पुन्हा करेल... पण यांपैकी कोणत्याच संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि मालिका 1-1 वा 2-2 अशी बरोबरीत सुटली तर मात्र या दोन संघांच्या लढाईत ऑस्ट्रेलियाचाच फायदा होईल आणि तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.
...म्हणजेच नुसती आशा बाळगण्याएवढे हे सहजसोपे नाही. भारताप्रमाणे... इंग्लंडनेही या मालिकेपूर्वी काही दिवसांपूर्वी संपलेली श्रीलंकेतील दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यामुळे त्यांच्या संघातील बऱ्याच नवोदितांना उपखंडातील वातावरणाशी जुळवून घेणे शक्य झाले आणि येथील खेळपट्ट्यांचा तसेच फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याचा अनुभवही मिळाला. त्याचा परिणाम पहिल्या कसोटीत दिसला आहे.
पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी खासकरून रूट, सिबली आणि बटलर यांनी चांगली धावसंख्या नोंदवताना, अश्विन, नदीम आणि सुंदर यांच्या फिरकीला तोंड देताना स्वीपचा योग्य प्रकारे वापर केला होता. अश्विन प्रभावी ठरत होता तरी त्याला दुसरीकडून योग्य साथ देण्यात कसोटीत पदार्पण करणारा नदीम वा वॉशिंग्टन सुंदर खूपच कमी पडत होते. इशांत शर्मा आणि बुमरा यांनी जलदगती माऱ्याची बाजू समर्थपणे सांभाळली तरी भारताला या उणिवेमुळेच अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
पहिल्या कसोटीत चेपॉकची खेळपट्टी सुरुवातीचे दोन दिवस तशी ठीक होती... पण नंतर ती खराब होत गेली. (तरीही तिच्यावर खेळणे अतिशय अवघड व्हावे एवढी खराब नव्हती. रूट, गिल, कोहली यांनी ते दाखवून दिले.)
फिरकी गोलंदाजीला अशी साथ देणाऱ्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवायचा तर अश्विनसारखा अनुभवी गोलंदाजच हवा. त्याच्या मानाने खूपच कमी अनुभव असलेले लीच आणि बेस यांनी हुशारी दाखवली आणि भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. या इंग्लंडच्या संघात बरेच खेळाडू वयाने पंचविशीच्या आतले आहेत (ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या संघातही बरेच नवोदित, तरुण खेळाडू होते) आणि तिशी पार केलेले फक्त अँडरसन आणि ब्रॉड हे दोघेच आहेत. असे असले तरी त्यांचा प्रभाव कमी झालेला नाही. अँडरसनने दुसऱ्या डावात पुजारा, राहणे आणि पंत यांचे बळी मिळवताना हे सिद्ध केले.
जोफ्रा आर्चर कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो... कारण त्याचा गोलंदाजीचा वेग. मात्र कोपराला दुखापत झाल्यामुळे तो या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी क्रिस वोक्स अथवा ऑली स्टोन खेळू शकतात.
याखेरीज पाहुण्यांचे क्षेत्ररक्षणही भारतापेक्षा खूपच सरस ठरले आणि कॅचेस विन मॅचेस हे त्यांनी आपल्या कामगिरीने दाखवून दिले. रूटने आणि अँडरसनने घेतलेले अफलातूनच म्हणावे लागतील असे झेल आठवा.
जलदगती अँडरसन आणि ब्रॉड यांना एकत्र न खेळवता त्यांना विश्रांती देण्याचे आपले धोरण असल्याचे इंग्लंडने सांगितले आहे... त्यामुळे दुसऱ्या कसोटीमध्ये यांपैकी कोण खेळणार याबाबत उत्सुकता असेल. कदाचित अनुकूल खेळपट्टी असेल तर त्यांच्या या धोरणात बदलही होईल आणि या वेळी नाही तरी मालिकेत पुढे चुरस वाढली तर ही शक्यता जास्तच आहे. लीच आणि बेस यांची पहिल्या कसोटीतील कामगिरी पाहता त्यांच्यापैकी कुणालाही वगळले जाण्याची शक्यता कमी आहे. अर्थातच मोईन अलीचाही संघात समावेश होण्याची शक्यता दिसते पण त्यामुळे बेसला बाहेर काढावे लागेल.
भारतीय संघामध्येही काही तरुण खेळाडू आहेत तरीही...! घरच्या मैदानावर खेळताना रविचंद्रन अश्विन नेहमीच प्रभावी ठरला आहे आणि तसा तो याही वेळी ठरला. तरीही त्याच्या गोलंदाजीला कशा प्रकारे उत्तर देता येईल हे आता बऱ्याच फलंदाजांना ठाऊक झाले आहे... त्यामुळे त्यालाही आता गोलंदाजीत आणखी वैविध्य आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसरीकडून चांगली साथ मिळाली तर त्याचा प्रभाव निश्चितच वाढू शकेल.
भारतीय संघामध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाज अक्षर पटेल खेळेल हे जवळपास नक्की आहे. शिवाय वॉशिंग्टन सुंदरप्रमाणे फलंदाजी हीदेखील त्याची जमेची बाजू आहे. अन्य बदलाची शक्यता नाही. त्यामुळे कुलदीप यादवला तूर्त तरी दिसत संघाबाहेरच राहावे लागेल. नदीमची जागा त्यांच्यापैकी एकाला मिळेल असे दिसते. जलदगती माऱ्यासाठी आपल्याकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. महंमद सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले होते.. खेळपट्टी जर जलद असेल तर त्यालाही कदाचित संधी मिळू शकेल. तसेच निवळ वेगाचा विचार केला तर उमेश यादवचाही विचार केला जाऊ शकेल.
...पण बदल करायचा म्हटले तर त्यासाठी इशांत शर्माला वगळावे लागेल आणि हा निर्णय तसा सोपा नाही... कारण 300 बळींचा टप्पा पार करणाऱ्या इशांताचा अनुभव. खेळपट्टीच्या स्वरूपानुसार तो आपला वेग व टप्पा बदलू शकतो. पहिल्या कसोटीतील त्याची कामगिरीही ठीक म्हणावी अशीच होती.
जसप्रीत बुमरा हा सध्याचा आपला प्रमुख गोलंदाज आहे. तिन्ही प्रकारच्या सामन्यांत त्याची गोलंदाजी खेळणे आजही फलंदाजांना अवघडच जाते. त्यांच्यावर मानसिक दबाव राखण्यासाठी तो संघात असणे आवश्यकच आहे आणि बळी मिळवण्याची त्याची क्षमताही चांगली आहे. मायदेशी तो प्रथमच कसोटी सामने खेळत आहे... पण येथील खेळपट्ट्यांचा त्याला चांगला अनुभव आहे... त्यामुळे संघामध्ये तो असणारच. अर्थातच यामुळे नव्या चेंडूचा मारा करणारी ही जोडी बदलली जाण्याची शक्यता कमीच आहे.
फलंदाजीचा विचार केला तर भारतीय फलंदाजीचे पारडे जड दिसते ते रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या दीर्घ अनुभवाच्या खेळाडूंमुळे आणि त्यातील प्रत्येकाची कामगिरी पाहिली तर तीदेखील साधारण गोलंदाज दबून जातील अशीच आहे. विराट आज क्रिकेटमधल्या तीन अव्वल फलंदाजांत गणला जातो आणि शिवाय पुजारा त्याच्या सातत्यामुळे महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे.
पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता कोणालाही हेवा वाटावा अशीच आहे. कसोटी सामन्यांसाठी आवश्यक अशीच ही बाब आहे. त्यांच्या कारकिर्दीतील धावसंख्या दुर्लक्ष करण्याजोगी नाही. आता त्यांच्या जोडीला शुभमन गिल आणि ऋषभ पंत हे तरुण आक्रमक फलंदाज आहेत. वॉशिंग्टन सुंदरनेही फलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे (त्यामुळे त्याची जागाही कायम राहील अशी शक्यता आहे) आणि अर्थातच रविचंद्रन अश्विन. कसोटी सामन्यांमध्ये चार शतके आणि अकरा अर्धशतके नावावर असलेला अश्विन. त्याला फलंदाज म्हणून कमी लेखता येणार नाही. असे असूनही... का कोण जाणे... त्याचा अष्टपैलू म्हणून क्वचितच उल्लेख करण्यात येतो!
...पण याची दुसरी बाजू अशी आहे की, काही वेळा हेच फलंदाज कधीकधी अनाकलनीय प्रकारे एकामागून एक बाद होतात. काही वेळा चांगली सुरुवात केली तरी नंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरतात. शुभमन गिल बऱ्याचदा विशीत वा तिशीत बाद झाला आहे. पुजारालाही मोठी धावसंख्या करण्याची पूर्वीची जिद्द दाखवावी लागेल. रहाणेची गोष्टही फारशी वेगळी नाही. त्याने तर मेलबर्नच्या शतकानंतर मोठी धावसंख्या केलेलीच नाही... त्यामुळे भारताचे आव्हान कायम राखायचे तर या प्रत्येकालाच (किमान तिघांना तरी!) चांगली खेळी करावीच लागेल.
पहिल्या कसोटीमध्ये गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली असती तर थोडे वेगळे चित्र दिसले असते. सामना अटीतटीचा झाला असता... पण तसे न झाल्याने भारत मालिकेमध्ये पहिलाच सामना गमावल्याने पिछाडीला गेला आहे. (ऑस्ट्रेलियामध्येही आपल्या क्षेत्ररक्षकांची कामगिरी फारतर सुमार म्हणावे इतपतच होती. तेथेही सुटलेले झेल महाग पडले हे विसरून चालणार नाही. सुदैवाने आपण मालिका जिंकली असली तरी ती बाब दुर्लक्षून चालणार नाही.) क्षेत्ररक्षकांच्या अशा चुकारपणामुळे फलंदाजांवरील जबाबदारी वाढली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे क्षेत्ररक्षकांनीही आपला दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे.
गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्येही इंग्लंड संघात फारसा अनुभव नसलेले खेळाडू आहेत. पहिल्या कसोटीत कर्णधार जो रूट, डोमिनीक सिब्ली यांना बर्नस, पोप, बटलर (इंग्लंडच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या धोरणानुसार तो मायदेशी परत गेला आहे आणि त्याची जागा दुसऱ्या कसोटीत बेन फोक्स घेईल.) आणि बेस यांची चांगली साथ मिळाली. तरी रूट खेळपट्टीवर टिकून राहिल्यामुळेच हे शक्य झाले हे मान्य करावेच लागेल. दुसऱ्या डावातही तोच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता... मात्र ठरावीक अंतराने गडी बाद होत गेल्याने अपेक्षित वेगाने धावा करण्यात पाहुण्यांना यश मिळाले नाही व त्यामुळेच रूटने डाव घोषित न करता अखेरपर्यंत चालू ठेवला आणि आपण सामना हरणार नाही याची जवळजवळ निश्चिती तेथेच त्याने केली. (अर्थातच हे करताना त्याच्या डोळ्यांपुढे ऑस्ट्रेलियामध्ये भारताने चौथ्या कसोटीत खेचून आणलेला विजय असणार!)
दुसरी कसोटी चेन्नईच्या याच चेपॉक मैदानावर होणार आहे... त्यामुळे खेळपट्टी कोणती निवडली जाते याकडे सर्वांचे लक्ष राहील. पहिल्या कसोटीची खेळपट्टी ही नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणाऱ्या संघाला फायदेशीर होणार असा अंदाज करण्यात आला होता... कारण ती सुरुवातीला अगदी ठणठणीत होती आणि नंतर ती फिरकीला साथ देणार असे म्हटले जात होते. तो अंदाज अगदी अचूक ठरला... त्यामुळेच दुसऱ्या सामन्यासाठी त्यापेक्षा भिन्न स्वरूपाची खेळपट्टी असेल असे बोलले जात आहे. खरेतर आता पूर्वीप्रमाणे केवळ फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करतानाही विचार करावा लागेल... कारण आता अन्य संघांमध्येही चांगले फिरकी गोलंदाज असतात. जलद खेळपट्टी आपल्या गोलंदाजांना नक्कीच आवडेल... पण कदाचित ती आपल्या फलंदाजांना घातक ठरू शकते. तसे पाहता दोन्ही संघ तुल्यबलच आहेत व त्यामुळेच खेळपट्टी कशीही असली तरी सामने अटीतटीचेच होणार असे आपण म्हणू शकतो. अर्थात नाणेफेकीवर आणि ती जिंकणारा कर्णधार कोणता निर्णय घेतो यावरही बरेच काही अवलंबून असेल.
कसोटी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करायची संधी कायम राखण्यासाठी भारताने इंग्लंड विरुद्धची दुसरी कसोटी जिंकायला, किमान अनिर्णित राखायला हवी. पहिल्या क्रमांकावरील भारत पहिल्या कसोटीतील पराभवानंतर चौथ्या स्थानावर घसरला आहे आणि त्यामुळेच त्याच्यावर दबाव वाढला आहे. काहीही करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचाच या जिद्दीने खेळाडूंनी या कसोटी सामन्यात खेळायला हवे. इंग्लंडचे खेळाडूही अशा जिद्दीने खेळणार व हीच बाब सामन्याची रंगत वाढवायला कारणीभूत ठरेल. या सामन्यासाठीची खेळपट्टी कशी असेल, नाणेफेक कोणता संघ जिंकेल याबरोबरच भारतीय खेळाडू या दबावाखाली कसे खेळतात यावर दुसऱ्या कसोटीचे आणि मालिकेचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामन्याच्या वेळी स्टेडिअममध्ये प्रेक्षक उपस्थित असतील... त्यामुळे गेले काही महिने रिकाम्या स्टेडिअममध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना वेगळाच उत्साह येईल हे नक्की. घरच्या मैदानावर प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडिअममध्ये खेळण्याचा त्यांना अनुभव आहे आणि प्रेक्षकांची उपस्थिती आणि त्यांनी दिलेले उत्तेजन यांनी या खेळाडूंची कामगिरी सुधारते. चेन्नईचे प्रेक्षक जाणकार आहेत... खरेतर क्रिकेटप्रेमी आहेत... त्यामुळे ते चांगल्या खेळाला दाद देतात. हा आपला तो परका असा भेदभाव ते दाद देताना करत नाहीत. (हे मुद्दाम सांगायचे कारण अनेक ठिकाणी उत्तेजन देणे हे एकतर्फीच असते.) अर्थात यामुळे भारतीय खेळाडूंवर प्रेक्षकांच्या उपस्थितीचा फारसा दबाव नसेल... उलट ते आपला खेळ उंचावून दाद मिळवण्याचाच प्रयत्न करतील आणि अर्थातच त्यामुळे मालिकेची रंगत वाढेल हे निश्चित.
तेव्हा तयार राहा...
शनिवारी सकाळी साडेनऊला...
सामना पाहण्यासाठी....
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)
Tags: आ श्री केतकर क्रिकेट भारत इंग्लंड टेस्ट मालिका टेस्ट A S Ketkar Cricket India England Test Series Load More Tags
Add Comment