मालिकेतील रंगत वाढली...

तिसरी कसोटी 24 तारखेला : दोन्ही संघांकरता निर्णायक

फोटो सौजन्य : https://twitter.com/imVkohli

चेन्नई येथील दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारताने 317 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. धावांच्या विजयाचा विचार केला तर हा भारताचा इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय. त्याचबरोबर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याची आशाही भारताने जिवंत ठेवली आहे. अर्थात इंग्लंडने पहिली कसोटी जिंकलेली असल्यामुळे त्यांची आशाही कायम आहे... पण त्यांच्यापुढील काम तसे अवघड आहे... कारण त्यांना उरलेले दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील. उलट भारताने एक सामना जिंकला आणि एक अनिर्णित राखला तरीही भारताला अंतिम फेरी गाठता येणार आहे.

अहमदाबादलाही चेन्नईप्रमाणेच दोन कसोटी सामने होणार आहेत... पण त्यांतील एक कसोटी दिवस-रात्री, गुलाबी चेंडूने खेळली जाणारी असेल आणि त्या वेळी इंग्लंडला विजयाची संधी अधिक असेल. इंग्लडने हे ध्यानात ठेवूनच त्यांचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला दुसऱ्या कसोटीत न खेळवता विश्रांती दिली आहे. इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकली तर उभय संघांना विश्वचषकाची अंतिम फेरी गाठता येणार नाही. थोडक्यात असे म्हणता येईल की, भारताला त्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची तर मालिका जिंकावीच लागेल... 3-1 किंवा 2-1 अशा फरकाने... त्यामुळेच तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरीही मालिकेतील चुरस अखेरच्या सामन्यापर्यंत कायम राहणार आहे... कारण मालिका जिंकणे हीदेखील महत्त्वाचीच बाब असते.

...पण या झाल्या भविष्यातल्या शक्यता... तर दुसऱ्या कसोटीबाबत...

ही कसोटी सुरू होण्यापूर्वीच या कसोटीसाठी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अुनकूल करण्याच्या उद्देशाने त्या पद्धतीने तयार करण्यात आली असेल असा जाणकारांचा अंदाज होता आणि त्याप्रमाणे ती फिरकीला साथ देणारी होतीही... पण तरीही पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाचशेच्या वर धावा करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ एकशे चौतीसच धावा करू शकेल असे कुणाला वाटलेही नसेल... कारण त्यांचा डाव सुरू होण्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकल्यावर अर्थातच फलंदाजी पत्करून 327 धावा केल्या होत्या. त्यात रोहित शर्मा (161), अजिंक्य रहाणे (67) यांचा प्रमुख वाटा होता. या दोघांनाही काही सिद्ध करून दाखवायचे होते हे तर खरेच... कारण आधीच्या काही सामन्यांमध्ये त्यांचा प्रभाव दिसला नव्हता...

मात्र या वेळी रोहितला सुरुवातीलाच सूर सापडला आणि कोहली शून्यावर बाद झालेला असतानाही दडपण झुगारून रहाणेही बहरात आला होता. रोहितने 18 चौकार आणि 2 षटकार तर रहाणेने 9 चौकार मारून इंग्लीश गोलंदाजांना नामोहरम केले होते. त्यांच्यामुळेच भारताचे पहिल्या दिवसावर निर्विवाद वर्चस्व राहिले... पण दुसऱ्यादिवशी ऋषभ पंतनेसुद्धा नाबाद 58 धावा केल्या आणि त्यादेखील दुसरीकडे गडी भराभर बाद होत असताना. मोईन अलीचे चार बळी आणि लीचचे दोन, यांची फिरकी प्रभावी ठरत असताना ऋषभ पंतने धावसंख्येत मोलाची भर घालून भारताला सुस्थिती दिली होती. सुरुवातीला गिलला पायचीत करणाऱ्या जलदगती स्टोनने अखेरचे दोन बळी मिळवले होते.

त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरू झाला आणि पहिल्याच षटकात इशांत शर्माने बर्न्सला पायचीत करून भारताला झकास सुरुवात करून दिली... त्या वेळी इंग्लंडचे खातेही उघडले गेले नव्हते. पाठोपाठ सिब्ली 16 धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि अश्विन घरच्या मैदानावर धुमाकूळ घालणार याचा अंदाज आला. एरवीच त्याच्या गोलंदाजीवर खेळणे भल्याभल्यांना अवघड असते आणि येथे तर त्याच्या घरच्या मैदानावर त्याच्या गोलंदाजीला अत्यंत अनुकूल अशा खेळपट्टीवर तो मारा करत होता. मारा हा शब्द योग्य ठरावा अशीच इंग्लंडच्या फलंदाजांची दैना त्याने केली. त्यानंतर सातच धावांनी इंग्लंडला सर्वात मोठा धक्का दिला तो अक्षर पटेलने. संघातील आपला समावेश किती सार्थ आहे हे त्याने रूटला बाद करून दाखवले. रूटची चेंडू स्वीप करायची सवय त्याने अचूक हेरली होती आणि त्यामुळे त्याने टप्पा थोडा बदलला... त्यामुळे रूटला नीट अंदाज न आल्याने त्याचा स्वीपचा फटका चुकला, चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि अश्विनने झेल टिपला.

खरेच सांगायचे तर नंतर या धक्क्यातून इंग्लंडचा संघ सावरलाच नाही. लॉरेन्सचा झेल अश्विनच्याच गोलंदाजीवर शुभमन गिलने घेतला तर स्टोक्सचा त्रिफळा उडवून अश्विनने भारताच्या मार्गातला मोठा अडसरही दूर केला. त्या वेळी इंग्लंडची धावसंख्या केवळ 52 होती आणि त्यांना फॉलोऑनची नामुश्की पत्करावी लागणार असे वाटत होते... परंतु पोप आणि फोक्स या तरुण खेळाडूंनी काहीसा प्रतिकार करत 35 धावांची भर घातली आणि डावपेचाचा भाग म्हणून जलदगती सिराजला गोलंदाजी देण्यात आली. कोहलीची ही चाल चांगलीच यशस्वी झाली... कारण सिराजने आपले काम चोख बजावले. त्याच्या गोलंदाजीवर पंतच्या हातात झेल देऊन पोप बाद झाला. त्यानंतर मोईनची आणि अन्य तळाच्या फलंदाजांची साथ फारशी मिळाली नाही तरीही फोक्सने प्रयत्न न सोडता धावा वाढवल्या आणि संघाला 134 धावांवर नेले. 42 धावा करून तो नाबाद राहिला... म्हणजेच खेळपट्टी अगदी काही जीवघेणी नव्हती हेच त्याने दाखवून दिले होते.

तब्बल 195 धावांची आघाडी भारताला मिळाली होती. फोक्सच्या खेळीमुळे एक गोष्ट साध्य झाली. इंग्लंडचा फॉलोऑन टळल्यामुळे कोहलीने सुटकेचा निःश्वास टाकला असेल... कारण फॉलोऑन द्यायचा की पुन्हा फलंदाजी करायची हा अवघड प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला असता. अर्थात अलीकडे फॉलोऑन देणं अनेक जण टाळतात... कारण त्यात दुसऱ्या डावात प्रतिस्पर्ध्याने चांगल्या धावा केल्यास चौथा डाव खेळण्याची वेळ येते आणि तेव्हा खेळपट्टी खराब झालेली असते. याच कारणाने रूटनेही पहिल्या कसोटीत भारताला फॉलोऑन दिला नव्हता... कारण रूटच्या डोळ्यांपुढे ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची ऑस्ट्रेलियातील करामत होती.

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात पहिल्या विकेटच्या 42 धावांच्या भागीदारीने झाली आणि त्या वेळी शुभमन गिल बाद झाला. रोहित शर्मा जणू काही पहिल्या डावातील त्याची खेळी पुढे सुरू केल्याप्रमाणे खेळत होता... अगदी सहजपणे, विनासायास. चेतेश्वर पुजारा त्याला योग्य साथ देत होता. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने 1 बाद 54 धावा केल्या होत्या आणि त्याची आघाडी 249 धावांची होती. तिसरा दिवस या कसोटीमधला खऱ्या अर्थाने सर्वात रंगतदार दिवस म्हणायला हवा... कारण त्या दिवशी अनेक चढउतार पाहायला मिळाले.

सुरुवातीला भारताच्या डावाची घसरगुंडी झाली. केवळ 31 धावांची भर घालून पुजारा धावचीत 7, पंत 8 आणि अजिंक्य रहाणे 10 धावा काढून बाद झाले. भारत 5 बाद 85. एका बाजूने कर्णधार विराट कोहली खेळत होता. अक्षर पटेलने त्याला काही काळ साथ देऊन संघाची धावसंख्या शतकापार नेली... पण संघाच्या 106 धावा असताना अक्षर बाद झाला. नंतर चेन्नईचा हिरो रविचंद्रन अश्विन मैदानावर उतरला आणि त्याने कोहलीला चांगली साथ देत धावा वाढवल्या. त्यांच्या भागीदारीत काही काळ तर तो कोहलीपेक्षा वेगाने धावा वाढवत होता. या जोडीने धावसंख्या दोनशेच्या पार नेली आणि दोनशे दोनवर कोहली 62 धावा करून बाद झाला.

भारताचा डाव आता लवकरच संपणार असे वाटत होते... पण अश्विनचा विचार मात्र वेगळा होता. तसा तो चांगला फलंदाज आहे आणि बाकीच्यांना जमले नाही ते त्याने करून दाखवले. फिरकीला तो योग्य प्रकारे सामोरा जात होता आणि योग्य वेळी आक्रमणही करत होता. कोहली बाद झाल्यानंतरही 20 षटके आणि 1 चेंडूपर्यंत भारताचा डाव त्याने चालू ठेवला आणि कुलदीप, इशांत आणि सिराज यांच्या साथीने धावसंख्या दोनशे पंचाऐंशीवर नेतानाच स्वतःचे शतकही पुरे केले. एकाच कसोटीत पाच बळी आणि शतक ही करामत त्याने तिसऱ्यांदा केली आणि भारताला सुस्थितीत आणले. मुख्य म्हणजे इंग्लंडपुढे विजयासाठी 482 धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवण्यात त्याचा मोठा वाटा होता.

aswhinचेन्नईच्या या खेळपट्टीवर एवढ्या धावा करणे ही खूपच अवघड बाब होती आणि उरलेले दोन दिवस आणि दोन तास एवढा काळ टिकाव धरणे ही तर त्याहीपेक्षा अवघड गोष्ट होती... जवळपास अशक्यच... म्हणजे आता केवळ ते कितपत प्रतिकार करतात याचीच उत्सुकता होती... शिवाय अश्विन आणखी काय करतो याकडेही प्रेक्षक नजर लावून होते. दुसऱ्या डावाला तशी बरी सुरुवात झाली असे वाटत असतानाच इंग्लंडच्या 17 धावा असतानाच अक्षर पटेलने सिब्लीला (3) पायचीत केले. लॉरेन्स आणि बर्न्स यांची जोडी जमल्यासारखे वाटत असतानाच अश्विनच्या गोलंदाजीवर कोहलीकडे झेल देऊन बर्न्स (25) बाद झाला.

खेळाची वेळ संपत आली होती. नाईट वॉचमन म्हणून लीचला पाठवले गेले आणि अक्षरने पाहुण्यांना आणखी एक धक्का दिला. रोहितकडे झेल देऊन तो शून्यावरच परतला. दिवसाअखेर लॉरेन्स आणि कर्णधार रूट खेळत होते आणि त्यांच्यापुढे आणखी दोन दिवस खेळण्याचे अशक्यप्राय आव्हान होते. भारताचा विजय दृष्टिपथात होता आणि चौथ्या दिवशी तो केव्हा नोंदला जातो याचीच उत्सुकता होती.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर थोड्या वेळातच लॉरेन्सला (26) अश्विनच्या गोलंदाजीवर पंतने यष्टिचीत केले. पाठोपाठ स्टोक्स (8), पोप (12) आणि फोक्स (2) हेही बाद झाले. इंग्लंडची धावसंख्या तेव्हा 7 बाद 116 होती. त्याच धावसंख्येवर अक्षरने पुन्हा एकदा रूटला चकवले आणि रहाणेकडे झेल देऊन रूट (33) परतला… आणि संघाच्या 126 धावा असताना त्यांचा नववा गडी स्टोनही शून्यावरच बाद झाला. अक्षरच्याच गोलंदाजीवर पायचीत होऊन तो परतला.

...पण अपेक्षेप्रमाणे इंग्लंडचा डाव तडकाफडकी गुंडाळला गेला नाही. मोईन अली चांगला फलंदाजही आहे हे त्याने दाखवून दिले आणि तळाच्या ब्रॉडच्या साथीने त्याने प्रतिकार सुरू ठेवला. सर्वांत घातक ठरलेल्या अक्षरवर त्याने हल्ला चढवला आणि त्याच्या गोलंदाजीवर लागोपाठ तीन षटकार लगावले... शिवाय अश्विन आणि कुलदीप यांच्या गोलंदाजीवरही त्याने एक-एक षटकार मारला. अखेर कुलदीपने त्याला बाद केले. मोठा फटका खेळण्यासाठी तो पुढे सरसावला होता पण कुलदीपने चतुराईने चेंडू त्याच्या पट्ट्यात येणार नाही अशा प्रकारे टाकला होता आणि पंतने शिताफीने तो पकडून मोईन क्रीझमध्ये परतण्याआधीच त्याला यष्टिचीत केले आणि भारताचा मोठा विजय नोंदला गेला.

या डावात अक्षरची गोलंदाजी प्रभावी झाली आणि त्याने पाच गडी बाद केले. 21 षटकांत त्याने 60 धावा दिल्या. पहिल्या डावात 43 धावात पाच गडी बाद करणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. कुलदीपने दोन गडी बाद करून मिळालेल्या संधीचा फायदा उठवला. अपेक्षेप्रमाणे रविचंद्रन अश्विन हा सामन्याचा मानकरी ठरला.

चौदा हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांनी प्रत्यक्ष स्टेडिअममध्ये उपस्थित राहून या सामन्याची रंगत वाढवली... मात्र एक बाब जाणवली... आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षक अलगीकरणानुसार बसलेले नव्हते. स्टेडिअममध्ये क्षमतेच्या निम्म्याहूनही थोडे कमी प्रेक्षक होते खरे... पण ते गटागटांनी, अंतर न सोडता नेहमीप्रमाणेच बसून जल्लोश करताना दिसत होते. त्यांना कुणी काही सांगितल्याचेही दिसले नाही. आपल्या या वर्तनाने एकूणच सर्व ठिकाणी प्रेक्षकांवर बंदी येऊ शकते हा विचारच त्यांच्या मनात आलेला दिसत नाही... त्यामुळे ते प्रेक्षक किती निराश होतील याचा विचारही या क्रिकेटप्रेमींनी करायला हवा होता असे वाटते.

...तर आता 24 तारखेपासून अहमदाबादची तिसरी कसोटी. त्या वेळी खेळपट्टी कशी असेल वगैरेची चर्चा सध्या करता येणार नाही... पण बहुतेक फिरकीला अनुकूल अशीच ती असेल असा अंदाज करता येतो... त्यामुळे भारतीय संघात बदल होण्याची शक्यता म्हणजे बुमराचे पुनरागमन ही असेल... पण त्याला जागा देण्यासाठी कोणाला वगळायचे असा विचार केला तर कुलदीप किंवा सिराज हीच नावे डोळ्यांपुढे येतील. फलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता जवळपास दिसत नाही. या कसोटीत फार काही करू न शकलेल्या गिलच्या ऐवजी मयांक अगरवाल असा विचार केला जाऊ शकतोही... पण तसे होणे अवघडच.

इंग्लंडच्या संघात मात्र बदल होतील... कारण आलटून-पालटून खेळाडूंना विश्रांती देण्याची त्यांची योजना आहे. तिच्यानुसारच अँडरसन परत येईल. इतर बदलांबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही... पण किमान दोन किंवा तीन बदल ते करतील असा अंदाज करता येईल. दोन्ही संघांकरता सामना किती महत्त्वाचा आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे... त्यामुळे काही अनपेक्षित बदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कसेही असले तरी त्या सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे हे खरे... त्यामुळेच आता प्रतीक्षा 24 फेब्रुवारी या तारखेची...!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: क्रिकेट भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना आर. अश्विन रोहित शर्मा आ. श्री. केतकर a. s. ketkar sports cricket India vs England 2nd Test match Load More Tags

Add Comment