राष्ट्रकुल स्पर्धांपाठोपाठ बुद्धिबळ ऑलिंपियाडही संपले. भारतात झालेल्या या ऑलिंपियाडमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी अपेक्षित यश मिळवले नाही, तरी अगदी निराशही केले नाही. प्रथम सीडेड भारतीय महिला ‘अ’ संघाने तर भारतीय पुरुष ‘ब’ संघानेही ब्रॉंझपदक मिळवले. पण बुद्धिबळामध्ये भारताला चांगले भवितव्य असल्याची पावती मात्र मिळाली. कारण प्रभावी कामगिरीसाठी असलेला गॅप्रियन डॅशविली करंडक दोन ब्रॉंझविजेत्या भारताने जिंकला. त्याबरोबरच उत्कृष्ट कामगिरीसाठी डी. मुकेश आणि निहाल सरिनला सुवर्णपदक, अर्जुन इरिगेसीला रौप्यपदक तर आर. प्रज्ञानंद, आर. वैशाली, तानिया सचदेव आणि दिव्या देशमुख यांना ब्रॉंझपदक देण्यात आले.
उझबेकिस्तानने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत सुवर्णपदक मिळवताना अखेरच्या फेरीत हॉलंडला 2-1 असे हरवले. या विजयामुळे त्यांनी आर्मेनियावर आघाडी मिळवून प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आर्मेनियाने स्पेनवर 2.5 - 1.5 असा विजय नोंदवून दुसरा क्रमांक - रौप्यपदक जिंकले. भारत ‘ब’ने बॉंझपदक मिळवले. स्पर्धेत उझबेकिस्तान अपराजित राहिला.
महिलांच्या स्पर्धेत युद्धग्रस्त युक्रेनने सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अखेरच्या सामन्यात पोलंडला हरवले आणि टायब्रेकरमधील गुणांच्या आधारे जॉर्जियाला मागे टाकले. जॉर्जियाला रौप्य तर अमेरिका संघाकडून 2-1 असे पराभूत झालेल्या भारतीय ‘अ’ संघाने ब्रॉंझपदक मिळवले. सहाव्या फेरीत भारत ‘अ’ संघाने जॉर्जियाचा पराभव केला होता. त्यामुळेच अखेर त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या कोनेरू हंपीने विजय मिळवला, तरी वैशाली, तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी पराभूत झाल्याने अमेरिका 3-1 असा जिंकला.
"संघाची निवड योग्य प्रकारे केली असती - म्हणजे अनुभवी खेळाडू एका संघात आणि नवे अन्य संघात अशी - तर भारताला अधिक सरस कामगिरी करता आली असती" असे प्रशिक्षक ग्रँडमास्टर रघुनंदन गोखले म्हणाले. मात्र 'आपल्या संघांची कामगिरी चांगली झाली' असे मत अभिजित कुंटे यांनी व्यक्त केले.
ब्रॉंझपदकविजेच्या भारतीय ‘ब’ संघाचा गुकेश म्हणाला, आमची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली. अर्थात ती यापेक्षाही सरस होऊ शकली असती, असेही वाटत असल्याचे त्याने सांगितले. विजेत्या युक्रेनशी भारताने बरोबरी केली होती.
भारतीय महिला ‘अ’ संघाने ऑलिंपियाडमध्ये प्रथमच पदक मिळवले. हा त्यांचा विजय ऐतिहासिकच ठरला, यात नवल नाही. प्रशिक्षक कुंटे म्हणाले, "गेले तीन-चार महिने या संघाने कसून मेहनत केली आणि त्यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. भारतीय महिला बुद्धिबळासाठी ही प्रगतीची सुरुवात ठरायला हवी."
तानिया सचदेव, कोनेरू हंपी, आर. वैशाली व डी. हरिका
महिलांच्या ऑलिंपियाडला 1957 मध्ये सुरुवात झाली. पण 1976 पर्यंत त्यांचे ऑलिंपियाड वेगळे खेळवले जात असे. 1976 पासून मात्र पुरुष व महिला ऑलिंपियाड एकत्रच आयोजित केले जाऊ लागले. यंदाच्या या 44व्या ऑलिंपियाड आयोजनाचा मान भारताला मिळाला होता.
सोमवारी, 8 ऑगस्टला भारताला (अंतिम विजेत्या ठरलेल्या उझबेकिस्तानवर विजय मिळवण्याची संधी होती. परंतु सतत बलाढ्य स्थितीत असलेल्या गुकेशने प्रतिस्पर्धी नॉडिरबेक अब्दुसत्तारोवने बरोबरीचा प्रस्ताव दिलेला असताना तो नाकारला. पण हा नकारच भारतासाठी घातक ठरला. कारण आधी चांगल्या स्थितीत असलेल्या गुकेशने तो सामना नंतर गमावला. या पराभवाने तो निराश झाला. पण जिद्दीने अखेरच्या फेरीत लढला. जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदचा सामनाही बरोबरीत सुटला पण रौनक साधवानी आणि निहाल सरिन यांच्या विजयाने भारताला ब्रॉंझपदक मिळाले.
गुकेश म्हणाला की, आम्हाला पदक मिळाले खरे, पण माझ्याकडून चूक झाली नसती, तर ते सुवर्णपदक असते. मला माझाच खूप राग आला होता आणि मी चांगलाच दुखावला गेलो होतो. पण आमचे मार्गदर्शक विश्वनाथन आनंद यांनी मला समजावले. हा सारा जीवनाचा भाग आहे. पण तू त्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. स्वत:चे दु:खद अनुभवही त्यांनी सांगितले आणि त्यानंतर मग मला खूपच धीर आला. चांगले वाटले.
महिलांचे ब्रॉंझपदक मात्र अधिकाधिक महिलांना बुद्धिबळाकडे आकर्षित करेल, असा विश्वास कोनेरू हंपीने व्यक्त केला. ‘तसे झाले तर ते आम्ही मिळवलेल्या ब्रॉंझपदकाचे यश असेल’, असेही ती म्हणाली.
प्रज्ञानंद म्हणाला, "आम्हाला सुवर्णपदक मिळाले नसले, तरी आशेचे किरण दिसत आहेत. अद्याप विशीही न गाठलेल्या निहाल आणि रौनक यांच्यामुळेच भारताला यापुढे बुद्धिबळामध्ये अधिक चांगले दिवस येतील, असे वाटते. यंदा आम्ही मिळवू शकलो नाही, तरी पुढच्या स्पर्धेत आम्ही सुवर्णपदक मिळविण्याचा विश्वास आम्हाला वाटतो आहे व त्या दृष्टीनेच आम्ही प्रयत्न करत राहू."
युद्धग्रस्त असूनही सुवर्णपदक मिळविणार्या युक्रेनच्या महिलांचा पराक्रम प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढून विजयी होण्याची जिद्द खेळाडूंमध्ये नक्कीच निर्माण करेल.
- आ.श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: क्रीडा चेन्नई बुद्धिबळ ऑलिंपियाड युक्रेन Load More Tags
Add Comment