मिशन हरियाणा पूर्ण! आता मिशन महाराष्ट्र सुरू! 

हरियाणात जिंकले 'हारी बाजी', महाराष्ट्रात आता काय घडेल?

२००४ च्या लोकसभा निवडणुकीची गोष्ट.
'इंडिया शायनिंग'ची हवा!
इथून-तिथून सगळेच म्हणत होते:
एनडीए सरकार पुन्हा येणार.
अटलजी पुन्हा पंतप्रधान होणार.
पण झालं उलटंच!
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अटलजी म्हणाले होते :
‘हम क्यूँ हारे, हमेंही नही पता.
ये क्यूँ जीते इन्हेंही नही पता!’

===

तसंच काहीसं यावेळीही घडलं.
जसजसे हरियाणा विधानसभेचे निकाल येत होते;
तसतसे देशभरातील सगळेच पत्रकार चक्रावून जात होते.
त्याला कारणही तसेच होते.
पंचवीस तीस वर्षे पत्रकारितेत काढलेले,
सामान्य लोकांची नाडी ओळखणारे,
सतत लोकांमध्ये मिसळणारे,
संपूर्ण हरियाणा पिंजून काढणारे हाडाचे पत्रकार
चकवा बसल्यागत झाले. 
काय होत आहे, कुणालाच काही कळत नव्हते.
निवडणूक विश्लेषक, एवढेच नाही तर
गोदी-सरकारी पत्रकार सुद्धा 'दंग' झाले होते.
चकित झाले होते.
सर्वांनाच धक्का बसत होता.

===

कारण ते पत्रकार गावागावात फिरले होते.
किसान आंदोलनाचा परिणाम
त्यांनी पाहिलेला होता.
सरकारचे आडमुठे धोरण त्यांना दिसलेले होते.
रस्त्यावर खिळे ठोकून
शेतकऱ्यांच्या अडवलेल्या गाड्या
त्यांनी पाहिलेल्या होत्या.
शेतकऱ्यांवर झालेले अन्याय
त्यांनी पाहिलेले होते.
आंदोलनात झालेला शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू
त्यांनी बघितला होता.
या गोष्टी कमी आहेत की काय म्हणून या आंदोलनाबद्दल
ऐन निवडणुकीच्या वेळी काहीतरी बेताल बोलून
शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या
भाजप खासदार कंगना राणावतचे बोलही
त्यांनी ऐकलेले होते.  
या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम
त्यांना तेथील शेतकऱ्यांच्या लाल डोळ्यांत दिसत होता.
भाजप विरोधातला प्रचंड राग आणि संताप दिसत होता.

===

महिला पहिलवानांचं दुःख, वेदना आणि त्रास
आणि त्यातून निर्माण झालेली
डबल इंजिन सरकारविरोधातील सामान्य लोकांची चीड
त्यांनी पाहिली होती. 
विनेश फोगाटच्या रूपाने एक पीडित महिला
या सरकारविरोधात समोर येते,
कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवते
त्यामुळे लोकांचा जोशही वाढत होता.

===

मोदी सरकारने ‘अग्निवीर’ सारखी योजना आणून
सैन्यात भरती होऊन आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या
युवकांमध्ये प्रचंड नाराजी आणि नैराश्य आणले होते.
ते या पत्रकारांनी पाहिलं होतं.

===

निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी म्हणून
‘ओपीएस’ लागू करण्यासाठी
जीव तोडून आंदोलन करणारे सरकारी कर्मचारी
त्या पत्रकारांनी पाहिले होते.

===

नोकरीसाठी वणवण भटकणारे तरुण त्यांनी पहिले होते.
त्यात राहुल गांधीतर्फे प्रदर्शित झालेली
डबल इंजिन सरकारच्या विकासाचा बुरखा टराटरा फाडणारी
आणि दहा बारा मिनिटातच
नव्या पिढीचं काळवंडलेलं भविष्य दाखवणारी
‘डंकी’ ही फिल्म पाहून आसवं गाळणारे दुःखी लोक
त्यांनी पाहिले होते.

===

एकंदर किसान, जवान, पहिलवान
आणि या सर्वांचे कदरदान असलेले सरकारी कर्मचारी सुद्धा
सरकारविरोधात उभे होते.
त्याचाच एकत्रित परिणाम
भाजपच्या प्रचारमोहिमेत दिसत होता.

===

मोदीजींची २०१४ वा २०१९ सारखी लहर
यावेळी दिसत नव्हती.
त्यावेळीसारखे लाखो लोक मोदीजींच्या सभेला येत नव्हते.
मोठ्या मुश्किलीने पाच-दहा हजार लोकांच्या सभा होत होत्या.
त्यातही फारसा दम नव्हता. उत्साह नव्हता.
भाजपचा ताकदवान असा प्रादेशिक नेताही दिसत नव्हता.
कोणे एके काळी मोदीजींना फटफटीवर फिरवणारा मुख्यमंत्री
मनोहरलाल खट्टरच्या रूपाने हरियाणाने साडेनऊ वर्षे पाहिला.
पण लोकांची नाराजी बघून त्यांनाही बदलण्यात आले.
मोठमोठ्या प्रचारसभेत आणि पोस्टर्सवरून त्यांना गायब करण्यात आले.
त्यांच्याच मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केलेले
नायबसिंग सैनी मुख्यमंत्री झाले.
पण लोकांचा संताप कमी होत नव्हता.
लोकांकडून होणारी गावबंदी.
भाजप नेते कार्यकर्ते यांच्यावर घातला जाणारा सामूहिक बहिष्कार.
पत्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते.
दहा वर्षांची ‘दुहेरी सरकारविरोधी लहर’ स्पष्ट दिसत होती.

===

यासारख्या अनेक गोष्टी पत्रकार पाहत होते.
‘यावेळी भाजपची वाट लागणार’ असे सांगत होते.
सरकार बनवणे तर सोडा पण भाजपचे
९० पैकी २० आमदार सुद्धा येणार नाहीत
असे ठणकावून सांगत होते.
कॉंग्रेसला ६० पेक्षा जास्त जागा देत होते.
काँग्रेसचे नेते सुद्धा ‘आता सरकार आपलेच’ या थाटात होते.
भाजपवाले नाराज होते. खट्टर साहेबांना दोष देत होते.
‘भाजपा का काल मनोहरलाल!’ असं म्हणत होते.
विजयाचे ‘क्रेडिट’ राहुल गांधींना मिळू नये म्हणून
‘हुड्डा...हुड्डा’ करत होते.
एकंदर सगळ्यांचीच मानसिक तयारी झालेली!

===

असं असूनही मतमोजणीच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री सैनी,
विधानसभा सभापती आणि भाजप अध्यक्षांसोबत पत्रकारांना भेटले.
‘सारी व्यवस्था हमारे साथ है, हम सरकार बनायेंगे.
छत्तीसगड जैसे होगा. ये लोक इव्हीएम पर इल्जाम लगायेंगे...”
वगैरे वगैरे ते बोलले.
पत्रकार त्यांच्यावर हसत होते.
त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत होते.
पण जेव्हा मतमोजणी सुरु झाली,
इव्हीएमने सगळ्यांनाच ४४० व्होल्टचा झटका दिला.
भाजप ४८. कॉंग्रेस ३७.
मोठमोठे पत्रकार, राजकीय विश्लेषक एका झटक्यात!
आपल्या चुकीच्या आकलनाबद्दल माफी मागू लागले.
असं ‘होलसेल’ माफीसत्र पहिल्यांदाच दिसलं.

तिकडे काँग्रेसने जाहीरपणे सांगितले,
की आम्हाला हा निकाल मान्य नाही.
अनेक इव्हीएम यंत्रे संशयास्पद वाटत आहेत.
त्यांची बॅटरी ९९% चार्ज आहे.
म्हणजे छेडछाड झालेली आहे.

भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं.
एखादा राष्ट्रीय पक्ष देशातील सर्वात जुना पक्ष
जाहीरपणे ‘प्रेस कॉन्फरन्स’ घेऊन
‘आम्हाला हा निकाल मान्य नाही’
‘ये तंत्र की जीत और लोकतंत्र की हार है!’
असं सांगतोय
आणि तिकडे सर्वच जाने-माने पत्रकार
आपला अंदाज चुकल्याबद्दल माफी मागत आहेत.
आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्री जाहीरपणे कबूल करताहेत की
‘सारी व्यवस्था हमारे साथ है!’
सर्वच अद्भुत!

===

असो. आपण लोकशाही मानणारे लोक.
तंत्र, यंत्र, लोकतंत्र सर्वच बरोबर आहे, असं मानूया
आणि नेमकं काय झालं ते बघूया.

===

लोकसभेच्या अपेक्षाभंग करणाऱ्या निकालानंतर
भाजप कार्यकर्ता जरा नाराजच झालेला होता.
‘मोदी-शहा’ची ताकद कमी झालेली दिसत होती.
पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर!
दोन्ही ठिकाणी.
‘मेरा मजाक उडाया जा रहा है...’ असं मोदीजीच बोलत होते.
आरएसएस कडून सुद्धा मणिपूरसारखे
अनेक अप्रिय विषय समोर येत होते.
अशा परिस्थितीत त्यांना गरज होती
एका अतिशय ‘पावरफुल बुस्टर डोस’ ची!
समोर जम्मूकाश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र
आणि झारखंड च्या निवडणुका.
चारही राज्यं अवघड.
थोडीफार धुगधुगी हरियाणातच.  
मग त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलं हरियाणावर.

‘यावेळी आपलं काही खरं नाही’
हे भाजप नेत्यांना दिसत होतं.
त्यांनी आपली रणनीती पूर्णपणे बदलली.
हरियाणात जागा जरी ९० असल्या तरी
भाजप १२० जागावर लढत आहे,
असे अनेक वरिष्ठ पत्रकार बोलू लागले.
सर्वात आधी ‘फोकस’ ठेवला कॉंग्रेसच्या बंडखोरांवर.
त्यांना ताकद, हिंमत आणि रसद पुरवली.
कसंही करून त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराची मत खायची.

मग समोर आले तेथील प्रादेशिक पक्ष.
इंडियन नॅशनल लोक दल. जननायक पार्टी.
निवडणुकीच्या आखाड्यात त्यांचं अस्तित्व
एखाद्या आजारी माणसाच्या हसण्यासारखे होऊ नये म्हणून
त्यांना ‘बूस्टर डोस’ देण्यात आला.
इंडियन नॅशनल लोक दलबरोबर
मायावतीची बहुजन समाज पार्टी आली.
दुष्यंतसिंग चौटालाच्या ‘जननायक पार्टी’सोबत आले
चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशमधील उदयोन्मुख दलित नेतृत्व. 
जननायक पार्टी आणि आझाद समाज पार्टी
[चंद्रशेखर आझाद-कांशीराम] यांची युती.
आता या दोन्ही आघाड्या कुणाची मते खाणार?
सांगायची गरज नाही.
याशिवाय अरविंद केजरीवालची आम आदमी पार्टी
आणि जयंत चौधरीचे राष्ट्रीय लोक दल होतेच मते खायला!
दोन्ही एनसीपीने टिल्लू-पिल्लू का होईना
पण मते खाल्लीच असणार! 
सगळ्यांनी मिळून कॉंग्रेसला पाच सहा टक्के मतांचा फटका
जरी दिला तरी जेव्हा ‘कट टू कट’ मुकाबला करायची वेळ येते
तेव्हा फार फरक पडतो.

याशिवाय गोपाल कांडा वगैरे सारख्या ‘लोकल’ नेत्याच्या
हरियाणा लोकहित पार्टीबरोबर जुळवून भाजपने
आपली थोडीफार ताकद वाढवायचा प्रयत्न केला.

सरकारविरोधी लहर असल्यामुळे
भाजपने बहुसंख्य आमदारांचे तिकीट कापले.

असंख्य लोकांना मंत्रमुग्ध करणारा रामरहीम सारखा गुन्हेगारही
खास प्रचार करण्यासाठी ‘पॅरोल’वर बाहेर आला.

लोक नाराज आहेत म्हणून मनोहरलाल खट्टर मोठमोठ्या सभांमध्ये
किंवा पक्षाच्या जाहिरातीत दिसत नसले तरी
त्यांनी हिम्मत हरली नाही.
छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन चाळीस पन्नास कार्यकर्त्यांसमोर
जाऊन ते प्रचार करतच राहिले.

हरियाणामध्ये सर्वात जास्त वजनदार समाज आहे जाट लोकांचा.
२५% पेक्षाही जास्त लोकसंख्या.
जवान, किसान, पहिलवान सर्वच क्षेत्रात त्यांचेच प्राबल्य.
भाजपने सर्वात आधी आपल्या रणनीतीप्रमाणे
‘रिवर्स पोलरायझेशन’ करायला सुरुवात केली.
छत्तीस बिरादरी च्या संकल्पनेचा हुशारीने वापर केला.
देवीलाल वगैरेच्या काळातील
जाट अत्याचाराच्या कहाण्या सांगून
जाट विरुद्ध ३५ जातींना एकत्र केले.
मग काय - ३५ विरुद्ध १ असा लढा निर्माण केला.
म्हणजे २५% विरूद्ध ७५%!
पंजाबी मनोहरलाल खट्टर ‘जाट’ समुदायाचे नाहीत.
ओबीसी सायबसिंग सैनी ‘जाट’ समुदायाचे नाहीत.
या सर्व गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने फायदा घेण्यात आला.

एकीकडे हे होत असताना कॉंग्रेसमध्ये मात्र प्रचंड आत्मविश्वास होता.
आपलंच सरकार येणार हे नक्की होतं.
भूपेंदरसिंह हुड्डासारखा अनुभवी नेता होता.
पण भूपेंदरजींनी कॉंग्रेसमधील इतर सत्ताकेंद्र असलेल्या
सैलजा आणि रणजीत सुरजेवाला यांना विश्वासात घेतले नाही.
सैलजाच्या नाराजीमुळे हक्काची दलित मते दूर गेली.
सुरजेवाला, सैलजा आणि हुड्डा
एकमेकांना खाली खेचण्यात धन्यता मानू लागले.
रोज सकाळी दोन हेलिकॉप्टर निघायचे.
त्यात असायचे भूपेंदरसिंह हुड्डा आणि दिपेंदर हुड्डा!
या जाट समुदायाच्या बापलेकांमुळे
‘कॉंग्रेस ही जाट समुदायाची पार्टी आहे’
हे दाखवणारे भाजपचे ‘नॅरेटीव्ह’ आणखी पक्के झाले.
विशेष म्हणजे भूपेंदर हुड्डा यांचा अतिआत्मविश्वास
पराभवाचे प्रमुख कारण झाला.
सत्यपाल मलिकसारखे नेते प्रचार करण्यासाठी येणार होते,
पण हुड्डांना त्यांची गरज वाटली नाही.
अरविंद केजरीवालबरोबर युती करावी,
हा राहुल गांधींचा सल्ला त्यांना मान्य नव्हता.
त्यांच्याच जाट उमेदवारांच्या विरोधात ठिकठिकाणी
अनेक जाट उमेदवार उभे करण्यात आले.
आणि कॉंग्रेसचे उमेदवार पडले.
या सर्व ‘ऑपरेशन लोटस’मध्ये
सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली
अगदी शांतपणे, प्रामाणिकपणे आणि न थकता काम करणाऱ्या
आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी.
प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक बस्तीमध्ये,
प्रत्येक चावडीवर, प्रत्येक घरात, ते जात होते.
शांतपणे मोदी सरकारच्या योजनांची माहिती देत होते.
राज्य सरकारच्या योजनांची माहिती देत होते.
पारंपारिक पद्धतीने त्यांचे काम चालू होते.
कुठेही गडबड गोंधळ नाही.
कसलाच गाजावाजा नाही.  
ज्या मतदारसंघात भाजप कमजोर वाटते
तेथे विशेष प्रयोग केले जात होते.
जाट समुदायाव्यतिरिक्त इतर पस्तीस बिरादरीवर
विशेष लक्ष दिले जात होते.
भाषा, जात, प्रांत असे सगळेच मतभेद विसरून
समस्त हिंदू समाजाने एकत्र येण्याचे महत्त्व सांगण्यात येत होते.
हे सगळं घडत होतं.
निकालाचा चेहरामोहरा बदलणारी चळवळ होती.
ही इतकी मोठी घटना घडत होती.
पण मीडियाच्या लक्षात येत नव्हतं.
भाजपचे यश त्यांच्या अतिशय सूक्ष्म नियोजनात आहे,
त्यांच्या रणनीतीमध्ये आहे.
विरोधकांना दुबळे, अशक्त करण्याच्या त्यांच्या युक्तीमध्ये आहे
‘साम, दाम, दंड, भेद’ यांचा अफलातून वापर करण्यात आहे
कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीमध्ये आहे
तसेच ते आरएसएसच्या संन्यासी वृत्ती धारण केलेल्या
अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये पण आहे.  
म्हणूनच म्हणतात:
“वो सिकंदर ही कहलाता है,
हारी बाजी को जितना जिसे आता है!”

===

या निकालाचे आता महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीवर
बऱ्यापैकी परिणाम होणार आहेत.
भाजपवर दादागिरी करून दबाव निर्माण करू पाहणारा
शिवसेनेचा शिंदे गटच आता दबावाखाली असेल.
‘शत प्रतिशत’चे भाजपचे स्वप्न आता परत उभारी घेईल.
तिकडे लोकसभेच्या यशाने हुरळून गेलेले कॉंग्रेसचे
राज्यातील नेते आता हिशोबात राहतील.
उद्धव ठाकरे यांचे महत्त्व परत कबूल करतील.
जाहीरपणे कबूल करतील.
इंडिया आघाडीतील इतर नेते
आता काँग्रेसची मजा घेऊ लागले आहेत.
शिवसेनेचे संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी,
आपचे संजय सिंग, राघव चड्डा सगळेच
आता जखमी झालेल्या कॉंग्रेसला टोमणे मारू लागले.
काँग्रेसने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी
असा सल्ला देणारी कविताच राघव चड्डा यांनी
X वर पोस्ट केली:
“हमारी आरजू कि फिक्र करते तो कुछ और बात होती,
हमारी हसरत का खयाल रखते तो एक अलग शाम होती.

आज वो भी पछता रहा होगा मेरा साथ छोडकर,
अगर साथ साथ चलते तो कुछ और बात होती”

आता हे लोक एकमेकांना कवितेमधून,
सामनाच्या अग्रलेखातून सल्ले देत आहेत.
पण खरी लढाई पुढेच आहे.
महाराष्ट्रातच आहे.
बऱ्याच गोष्टींचे साम्य आहे.
तिथे जाट होते, इथे मराठा आहेत.
तिथे मायावती, चंद्रशेखर आझाद,
जननायक पार्टी, इंडियन नॅशनल लोक दल होते
इथे प्रकाश आंबेडकर, वंचित, एमआयएम, मनसे, थर्ड फ्रंट...
खूप काही आहे.
बंडखोर तिथंही आहेत
बंडखोर इथंही आहेत.
साम, दाम, दंड, भेद तिथंही चालतो - इथंही चालतो.
तेच मोदी-शहा आहेत.
तेच शांतपणे हळूहळू घराघरात घुसून काम करणारे
आरएसएस चे कार्यकर्ते आहेत.
विशेष म्हणजे ‘हारी बाजी को जितना उन्हे आता है!”

निवडणूक जवळ आहे.
प्रचारासाठी एक महिना पण मिळणार नाही.
रात्र वैऱ्याची आहे.
इंडिया आघाडीने एकेक पाऊल
विचारपूर्वक उचलायला पाहिजे.  
नाही तर आशा भोसलेचे गाणे गावे लागेल:

“जीती बाजी हार गये हम,
जीती बाजी हार गये हम
किस्मत ही कुछ ऐसी थी,
कर ना सके हम प्यार का सौदा
किस्मत ही कुछ ऐसी थी,
किस्मत ही कुछ ऐसी थी...”

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com 
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)

Tags:Load More Tags

Comments: Show All Comments

Nitin Kottapalle

हरियाणा मध्ये झालेला भाजपचा विजय हा आश्चर्यकारक आहे, पण आता ते वास्तव आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे जनतेमध्ये एवढा क्षोभ असूनही पुन्हा मोठ्या संख्येने लोक जर त्याच पक्षाला मतदान करत असतील तर लोकांच्या अपेक्षा ओळखण्यामध्ये विरोधी पक्ष आणि माध्यमांत काम करणारे तज्ज्ञ कमी पडत असावेत. केंद्र शासनाच्या अशा कोणत्या प्रभावी योजना आहेत की ज्या शांतपणे सांगून या कार्यकर्त्यांनी हा क्षोभ शांत केला असावा? समजत नाही. दुसरा भाग म्हणजे एका जातीच्या विरोधात पस्तीस जाती या समीकरणातून तयार होणारे जातीय ध्रुवीकरण म्हणजे 'हिंदू एकते'चा नारा देणाऱ्या संघ भाजपचे लक्षणीय तात्विक अपयश म्हणावे लागेल. त्याचबरोबर जातीय ध्रुवीकरणाच्या आजपर्यंत चालत आलेल्या राजकारणाचा हा पुढील टप्पा म्हणून पाहू गेल्यास, आपण वाईटकडून अधिक वाईटाकडे आणि भयंकराकडून अधिक भयंकराकडे वाटचाल करत आहोत याबद्दल कुठल्याही सुजाण नागरिकाला तरी शंका असू नये.

Swapnil Patil

काहिही असो पण विरोधी पक्ष एकाच्याच भरवश्यावर कित पर्यन्त चालणार.... काय असेल महाराष्ट्रात इंडिया आघाड़ीचि रणनीति....

Abhijeet

Well said Sir, but India is waiting for more ... Let's wait and watch.. Where we go in Maharashtra...

Niraj Mashru

खुप छान.. आता बघुयात महाराष्ट्रात इंडिया आघाड़ी काम काम करते ... कि परत ..

Suraj Khavate

खूप छान विश्लेषण साहेब! काँग्रेस साठी हरियाणाची हार डोळ्यात अंजन घालणारी आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हवेत गेलेल्या विरोधकांना हा निकाल जमिनीवर आणणारा आहे हे नक्की... आशा आहे की महविकास आघाडी यातून काही धडा घेईल आणि या चुका टाळायचा प्रयत्न करेल

Prashant Dindokar

अत्यंत सुंदर लेख आणि सत्यकथन आहे सर

Add Comment