86 वर्षांचे समृद्ध, समाधानी जीवन जगून टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा निर्वतले. टाटा उद्योगसमूह हा ‘हमता, हुक्सता आणि हवारश्ता’ (चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कार्य) ह्या पारशी धर्माच्या नैतिक अधिष्ठानावर उभा आहे. वाळवीसारख्या सर्वच खाणाऱ्या लोभाने (termite greed) बरबटलेल्या आजच्या स्वार्थी, स्वयंकेंद्री व भ्रष्ट वातावरणात रतन टाटांनी नैतिक व्यवस्थापनाचा विजयस्तंभ उभारला. टाटा उद्योगसमूहाला मानवतावादी भांडवलशाहीचा चेहरा बनवले. महात्मा गांधींची ट्रस्टीशिप संकल्पना राबवणारा टाटा खेरीज दुसरा उद्योगसमूह भारताच्या औद्योगिक क्षिताजावर दिसत नाही.
टाटा कंपन्यांच्या एकूण नफ्यापैकी 66 टक्के नफा टाटा ट्रस्टमार्फत सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. ही रक्कम वार्षिक 12,000 कोटी रुपये एवढी प्रचंड आहे. हा निधी शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सेवा, शिष्यवृत्त्या, कला व संस्कृतीचे वर्धन ह्यासाठी वापरला जातो. अमेरिकेत ही परंपरा आहे. वॉरन बुफेने आपल्या संपत्तीचा 99 टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी दिला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी 36 बिलियन डॉलर्सची देणगी गेट्स फाऊंडेशनला दिली आहे. फेसबुकचा प्रवर्तक मार्क त्सुकरबर्ग याने 45 बिलियन डॉलर्सच्या किंमतीचे फेसबुकचे शेअर्स, म्हणजे त्याच्या संपत्तीचा 99 टक्के वाटा समाजकार्यासाठी राखीव ठेवला आहे. टाटा उद्योगसमूहाने आजपर्यंत अब्जावधी रुपयांची देणगी सामाजिक कार्यासाठी दिली आहे.
कोणताही आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप नसलेला, कोणत्याही वादात न अडकलेला, असा निष्कलंक व पूर्ण पारदर्शी व्यवहार असलेला टाटा उद्योगसमूह रतन टाटांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला आहे. 1991 साली 32,000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या टाटा उद्योगाची धुरा रतन टाटांनी हाती घेतली. 2012 साली ते निवृत्त झाले तेव्हा ही उलाढाल 8 लाख कोटींची झाली तर आज टाटा उद्योगाची उलाढाल 13 लाख कोटी रुपयांची आहे. रतन टाटांनी टाटा उद्योगाचा विस्तार सेंद्रीय आणि असेंद्रीय अशा दोन्ही पद्धतीनी केला. असेंद्रीय विकासांतर्गत त्यांनी कोरस स्टील, टेटले टी, जॅग्वार व लॅन्ड रोवर्स मोटर्स आणि आता एअर इंडिया ह्या उद्योगांवर ताबा मिळवला. टायटन वॉचेस व ज्वेलरी, जिंजर हॉटेल्स, टाटा टी, स्टारबक्स कॉफी, विजेवर चालणाऱ्या मोटारी असे नवे उद्योग टाटांनी उभारले.
टाटा नॅनोचे अपयश जग्वार, लॅन्ड रोवर्स, विजेवर चालणाऱ्या नेक्सॉन, कर्व्ह, टियागो, पंच ह्या गाड्यांच्या देदीप्यमान यशाने पुसून काढले. कापड उद्योग, दूरसंचार ह्या क्षेत्रात रतन टाटांच्या नेतृत्वाखालील टाटा उद्योगास यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ह्या उद्योगातून निवृत्ती घेतली. ACC सारख्या सिमेंट कंपनीवर ताबा न मिळवता सिमेंट उद्योगाकडे पाठ फिरवणे ही टाटा उद्योगाची घोडचूक होती. पेट्रोल व डिझेलचे उत्खनन व रिफायनिंग ह्या क्षेत्रात रिलायन्सपूर्वी टाटाला जाता आले असते.
सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आज TCS ही टाटा कंपनी अग्रगण्य आहे. योग्य संधी साधून टाटा सेमिकंडक्टर्स बनवण्याच्या उद्योगात शिरत आहेत. टाटा पॉवर ही टाटा कंपनी प्रदूषणमुक्त ग्रीन विजेची निर्मिती करण्यात गुंतली आहे. ‘ताज’ ह्या ब्रँडखाली असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या उद्योगात टाटाला अभूतपूर्व यश मिळाले. रतन टाटांनी ‘Tajness’ ची व्याख्या बनवली - संपूर्ण कम्फर्ट, उत्तम दर्जा, आपुलकीची सेवा, व सर्वंकष उत्तम अनुभव हा या Tajness चा भाग आहे. ग्राहकाला प्रत्येक ताज हॉटेलमध्ये हा Tajness दिसला पाहिजे, अनुभवाला आला पाहिजे हा आग्रह धरला. हीच कल्पना पुढे विस्तारून ‘Tataness’ ची संकल्पना पुढे आली. ‘टाटानेस’ किंवा ‘टाटात्व’ म्हणजे दर्जाची हमी, सचोटी, सौंदर्यदृष्टी, पैश्यांचा मोबदला हे समीकरणच झाले. रतन टाटांनी भविष्यवेधी (Futuristic) उद्योगांचा ध्यास धरला. त्यामुळे टाटा उद्योग सॉफ्टवेअर, सेमिकंडक्टर्स, वीजनिर्मिती, विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवाई वाहतूक ह्या सूर्योदयी (Sunrise) क्षेत्रात कार्यरत आहे.
कोणताही उद्योगसमूह हा त्याच्या व्यवस्थापकीय संचालकाची सावली (Extended shadow) असतो. टाटा उद्योगसमूह म्हणजे रतन टाटांच्या व्यक्तीमत्वाचा दृश्यावतार. आपला वारस म्हणून सायरस मिस्त्रीची केलेली निवड चुकल्यावर रतन टाटांनी नटराजन चंद्रशेखर ह्या अत्यंत कार्यक्षम व बुद्धिमान तंत्रज्ञ - व्यवस्थापकाच्या हातात टाटा उद्योगसमूहाची सूत्रे दिली. रतन टाटांनी टाटा उद्योगसमूहाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा रूसी मोदी (टाटा स्टील), दरबारी सेठ (टाटा केमिकल्स), अजित केरकर (ताज हॉटेल्स) व नानी पालखीवाला (एसीसी सिमेंट) ह्यासारखे ढुढ्ढाचार्य मोक्याच्या जागा बळकावून बसले होते. रतन टाटांनी ह्या सगळ्यांना निवृत्तीची वाट दाखवली व नव्या, तरूण रक्ताला वाव दिला. टाटा उद्योगाच्या प्रत्येक निर्णयात 'नियत' असली पाहिजे असा रतन टाटांचा अट्टाहास होता. नियत म्हणजे नेमकेपणा, नियमबद्धता, नैतिकता, शाश्वतता. आज अन्य उद्योगसमूहांत ही 'नियत' अपवादानेच दिसते.
रतन टाटा हा भारतीय औद्योगिक क्षेत्राची सदसद्विवेकबुद्धी सतत जगती ठेवणारा दीपस्तंभ होता. आपल्या जीवनकालात आपल्याला अशा उंचीचा औद्योगिक नेता पाहता यावा हे आपल्या सर्वांचे सुभाग्य आहे.
- दत्ता दामोदर नायक, गोवा
kdnaik@cdhomes.com
(मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.)
Tags: ratan tata tata industries datta nayak mrutyulekh obituary tata group tata motors taj Load More Tags
Add Comment