शैलीदार, संवेदनशील, वैचारिक ललित लेखक

वाचकप्रिय ललितलेखक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन

ख्यातनाम लेखक रवींद्र पिंगे यांच्या ललित लेखनाचा प्रवास न्याहाळल्यानंतर, चौफेर वाचनामु‌ळे आणि रसडोळस वृत्तीने जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या लेखनामुळे समृद्ध झालेले त्यांचे क्षितिज आपल्या डोळ्यांसमोर येते. मुंबईसारख्या महानगरात राहूनही, अभिजाततेचे निरंतर लेणे असलेल्या कोकणभूमीत त्यांचा जीव रमला. त्यांच्या लेखनात केवळ स्मरणरमणीय भावविश्व नसून सृष्टीच्या रूप-रस-गंधाचा मनःपूत आस्वाद त्यांनी घेतलेला आहे असे जाणवते.

रूढार्थाने रवींद्र पिंगे ललित निबंधकार नव्हेत. त्यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न, अनुभवसमृद्ध, बहुश्रुत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्वाने केलेले समग्र जीवनाला आकळणारे ललित लेखन केवळ 'ललितनिबंध' या प्रकारान बंदिस्त करणे हे प्रशस्त नव्हे. पण या शब्दप्रभू साहित्यिकाच्या लेखनाचा आत्मा लालित्याचा आहे.

वैचारिकतेबरोबरच सृजनात्मकता आणि संवेदनशीलता हे या लेखनाचे विशेष आहेत. हे लेखन आल्हाद देणारे आहे. मनमोकळेपणाने जगातील विविध अनुभव घेत घेत विराट क्षितिजाला कवेत घेण्याचे सामर्थ्य या लेखनान आहे. या लेखनाची अंत:प्रेरणा आत्माविष्काराची आहे. पिंगे यांना साहित्य, संगीत, चित्रकला, रंगभूमी, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्ती भेटल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जे जे सर्वोत्तम आहे ते टिपण्याचा पिंगेंना ध्यास होता. त्याला त्यांनी अभ्यासाची जोड दिली. पक्ष, पंथ, प्रणाली यांचा अभिनिवेश टाळून, पूर्वग्रहाविरहित दृष्टिकोनातून, 'माणूस' या नात्याने, त्यांनी भेटलेल्या माणसांचे अंतरंग जाणून घेतले. कितीतरी मुलाखती निरनिराळ्या ढंगांत त्यांनी वाचकांसमोर ठेवल्या.

आकाशवाणीसारख्या एकेकाळच्या सशक्त माध्यमात ते कार्यरत होते. प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी होता. सहवासाची आणि सौहार्दाची ओढ मनाला होती. त्यामुळे सहृदयतेने त्यांनी थोरामोठ्यांच्या मुलाखती घेतल्या. उत्तम चरित्रलेख लिहिले. पायांना भिंगरी लावून बाहुसंवांच्या आणि प्रतिभावंतांच्या जन्मगावांना, संस्कारभूमीला, कर्मभूमीला भेटी दिल्या. त्याविषयी लेखन केले. मात्र ते केवळ साग्रसंगीत स्थलवर्णन न राहता ती सांस्कृतिक संचिताची परिक्रमा होते. अंगप्रत्यंगांसह, रंगविभ्रमांसह आणि तेथील जनसामान्यांच्या जीवनशैलीच्या बारकाव्यांसह तो परिसर पिंग दृग्गोचर करतात. पूर्वजांची भूमी असलेल्या कोकण प्रदेशाचे आणि सृष्टीचे उपवन असलेल्या आपल्या ‘उपळे’ गावाचे ते समरसून चित्रण करतात. आणि तेवढ्याच व तन्मयतेने मर्मज्ञतेने महान साहित्यकृती अवघ्या जगताला देणाऱ्या सॉमरसेट मॉम, पर्ल बक, अर्नेस्ट हेमिंग्वे आणि विन्स्टन चर्चिल या पाश्चात्य साहित्यिकांबद्दल विहितात. साहित्य आणि त्याचा रसास्वाद हा त्यांच्यासाठी साकल्याचा प्रदेश असतो. स्थळकाळाच्या मर्यादांना, संकुचिततेला तेथे थारा नसतो. 

मराठी साहित्याचे प्रांगण हे रवींद्र पिंगे यांचे जिव्हाळ्याचे जग आहे. त्या दृष्टीने त्यांचे ‘पु.ल. प्रखर प्रज्ञाविलास’, ‘ज्ञानमातेला दंडवत’, ‘मर्ढेकरांचा रामदासी गाव’, ‘पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं’, ‘जाईजुईची ताजी ताजी फुलं - आरती प्रभूंच्या ओंजळीतली’ आणि ‘नानासाहेब गोरे सुकाणूवर होते होते’ या लेखांचे सूक्ष्मतेने अवलोकन करावे. 

आपल्या मराठी साहित्यप्रांताच्या चतुःसीमा ओलांडून ते पलीकडे जातात. पंजाबभूमीकडे वळतात. अमृता प्रीतम यांच्या व्यक्तित्वाचा आणि वाङ्‌मयीन ध्यासाचा वेध घेणारा 'अमृता प्रीतम : निरंतर साहित्यसेवेचा कित्ता’ हा अप्रतिम लेख लिहितात.

साहित्यविश्वाला अधिक समृद्ध करणारे संगीताचे क्षेत्र पिंगे यांना तेवढेच प्रिय असल्यामुळे कुमारगंधर्वांवरील 'कुमारगंधर्वांचं शांत, तृप्ज जग’ आणि बालगंधर्वांवरील 'बालगंधर्वांचा चंद्रास्त' हे देख त्यांनी लिहिले आहेत. प्रज्ञावंतांच्या विश्वाविषयी त्यांना तेवढेच आवर्षण वाटते. या दृष्टीने ‘धर्मानंद कोसंबी’ आणि  डी.जी. तेंडुलकरांवरील 'डी. जी, : एक अवलिया’ हे लेख महत्त्वाचे आहेत.

कारवार, सदाशिवगड हीदेखील पिंगे यांच्या पूर्वजांची भूमी. हा भावप्रदेश त्यांनी सौंदर्यदृष्टीने न्याहाळला आहे. कारवारच्या निसर्गसौंद‌याचा आणि सांस्कृतिक संचिताचा वेध घेणारा त्यांचा ‘कारवार : सृष्टीचा अलंकार’ हा लेख अप्रतिम आहे.

'उपळे-सुंदर माझा गाव’, ‘ललित लेखकाला बिलगलेलं कोकण’, ‘माझे बाबा आणि मी’, 'आकाशवाणीवरचे दिवस’, ‘आयुष्यातील अविस्मरणीय’ आणि ‘घडले तेच पसंत’ या लेखांत आत्मचरित्राचे अंश आहेत. पिंगे यांच्या जडणघडणीचा काळ, सर्जनशीलतेला पोषक असलेलं वातावरण, त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू समजून घेण्याच्या दृष्टीने हे लेख उपयुक्त आहेत. पिंगेंचे मनोविश्व किती संस्कारशील आणि अभिरुचिसंपन्न आहे याचा या लेखांतून प्रत्यय येतो. लेखक म्हणून मान्यता मिळण्यापूर्वी पुस्तकांनी त्यांना कसा लळा लावला होता याचे हृदयंगम वर्णन 'घडले तेच पसंत' या लेखात आहे. त्याचा आस्वाद मुळातून घ्यायला हवा. 

चांगला लेखक व्हायचा असेल तर आगोदर तो चांगला वाचक होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत वाङ्‌मयीन क्षेत्रातील श्रद्धास्थाने निर्माण होतात, हे पिंगे यांच्या या आत्मकथनातून अधोरेखित होते. नव्याने उदयास येणाऱ्या लेखकांसाठी हे पाथेय ठरेल. 'संवाद स्वतःशी' या लेखातून त्यांचे आवडते लेखक आणि लेखन यांचा परिचय होतो. प्रा. श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, प्रा. अनंत काणेकर, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, दुर्गा भागवत आणि दि.बा. मोकाशी हे पिंगे यांचे आवडते लेखक. ‘तुकारामांची गाथा’, ‘संपूर्ण विनोबा’, ‘संपूर्ण मर्ढेकर’, ‘संपूर्ण व्यंकटेश माडगूळकर’, ‘संपूर्ण तेंडुलकर’, ‘निवडक प्रभाकर पाध्ये’, ‘निवडक शांता शेळके’,’ निवडक काणेकर’, ‘निवडक सावरकर’, 'श्यामची आई’, ना. ग. गोरे यांचे ‘कारागृहाच्या भिंती’, दि. बा. मोकाशी यांचे ‘सात लक्ष पावलं’ इत्यादी पुस्तकांच्या वाचनान ते रमतात. त्यामुळे त्यांच्या मनाचे उत्तम पोषण झालेले आहे.

आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही घटकांच्या अंगाने पिंगे यांच्या ललित लेखनाचा परामर्श घेणे आवश्यक आहे. पिंगे यांच्या व्यक्तिचित्रणशैलीत गुणग्राहकता आहे. त्यात नुसती विशेषणांची आतशबाजी नाही, तर त्या त्या व्यक्तित्वाचा मर्मदृष्टीने घेतलेला वेध असतो. त्यांनी घडविलेले व्यक्तित्वाच्या गाभ्याचे दर्शन हा वाचकांच्या दृष्टीने एक आनंदानुभव असतो उदा. पु.ल. देशपांडे यांच्या चतुरस्र यशाबद्दल पिंगे उद्‌गारतात, "जिथं पाणी तिथं पक्षी किंवा जिथं फुलं तिथं फुलपाखरं, तसं जिथे पु. लं. तिथे रसिक हे दृश्य गेली पन्नास वर्ष कायम होतं. पुलंच्या वाक्गंगेला ओहोटी ठाऊक नव्हती. वयाच्या पंधराव्या वर्षापासून पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत पुलंनी मराठी जगतावर आपला जरीपटका फडकत ठेवला, नृत्य वजा करता सादरीकरणाचा कुठलाही कलाविष्कार त्यांनी अस्पर्श ठेवला नाही. संगीत, नाट्य, वक्तृत्व आणि लेखन ह्या चतुःसीमांपर्यंत पसरलेलं जग पुलंनी सलग साठ वर्षं ढवळून काढलं. त्यांची पेटीवादनाची ध्वनिफीत कानी पडल्यावर पाऊल जागच्या जागी खिळलं नाही, असे घडलेलंच नाही. पु.लं. म्हणजे परमावधीचं कलात्मक यश. हे वैभव त्यांच्या पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत उचंबळत टिकलं." 

आरती प्रभूंवरच्या लेखाची सुरुवात पिंगे अशी करतात : “पंख लाभलेल्या त्या माणसाला देवानं दुनियेत झोकून दिलं, तेव्हा त्याला दोन लांबसडक हात दिले. पैकी, एका हातात तळ उसवलेली झोळी दिली आणि दुसऱ्या हातात दिली जुईची ताजी ताजी फुलं”. आरती प्रभूंच्या अनेक विरोधाभासांनी भरलेल्या जीवनाचे धागेदोरे पिंगे यांनी या लेखात उलगडून दाखविले आहेत. 

‘पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांद‌णं' या लेखात या श्रेष्ठ कवीशी आपले मैत्र कसे जुळले हे त्यांनी सांगितले आहे. "कवींकडे एक दुर्मीळ तल्लीनता होती. त्यांच्या काव्यवाचनात ती ओतप्रोत प्रकट होते. म्हणून आकाशवाणीवरील त्यांची ध्वनिमुद्रणं मी माझ्या हातांनी, केवळ अंतरीच्या उमाळ्याने केली. व्यावहारिक बाबींबद्दल माझ्या मनात अनेकदां गांधळ होई, तो गुंता सुटावा, मृणून मी कवींशी अनेकदां हितगुज केलं. त्यांनी वेळोवेळी उतारा सांगितला. संतवचनाचा आधार दिला. मला दिलासा लाभला. दिशा दिसल्या. नंतर मी माझी पुस्तकं त्यांना दिली. प्रेमा वाढत गेला. त्यांचं अगत्य प्रत्ययास आलं. सारखे म्हणत, "अरे, गोव्याला खेप टाक नं, तुमचे देवधर्म त्या भूमीत आहेत, ते विसरून कसं चालेल? 

व्रतस्थ वृत्तीने ज्ञानसाधना करणाऱ्या आणि विपुल, गुणसंपन्न लेखन करणाऱ्या दुर्गाबाई भागवत हे विस्तीर्ण क्षितिज होते. लेखणीच्या आवाक्यात येणे कठीण. पण पिंगे यांनी ते यथार्थपणे केले आहे. तरीही ते विनयशील वृत्तीने म्हणतात "कायम भारदस्त आणि मखमली शैलीतलं लेखन सातत्यानं करून शारदेच्या दरबारात मानाची वस्त्रे मिळवलेल्या दुर्गाबाईच्या वाङ्‌मयाविषयी टीकाटिपणी मी काय करणार?"

‘मर्ढेकरांचा रामदासी गांव' हा पिंगे यांचा उत्कृष्ट लेख आहे. द्वितीय महायुद्धोत्तर काळात मराठी नवकवितेचे नवे पर्व निर्माण करणाऱ्या मर्ढेकरांविषयीचा आणि त्यांच्या कवितेविषयीचा आदर आणि ममत्वाची भावना या लेखात व्यक्त झाली आहे. या लेखात मर्ढेकरांच्या कवितेतील बलस्थाने पिंगे यांनी अधोरेखित केलेली आहेत. मर्ढेकरांच्या चरित्रातील अनेक तपशील, मर्ढे येथील रामदासांची शिष्यशाखा, तेथील परिसराचे मर्ढेकरांवर झालेले संस्कार, मर्ढेकर मंडळीचे राममंदिर आणि सिद्धामृत मठ या नावाने ओळखली जाणारी वास्तू इत्यादींचे तपशीलवार वर्णन पिंगे यांनी केलेले आहे.

नानासाहेब गोरे यांच्यासारख्या अभिरुचिसंपन्न आणि सर्जनशील लेखकाचा सहवास हा पिंगे यांना आपल्या आयुष्यातील आनंदयोग वाटतो. त्यांचे शैलीसंपन्न झोकदार लेखन पिंगे यांच्या वाचनात आले. त्यांची ‘कारागृहाच्या भिंती’ ही दैनंदिनी वाचून त्यांनी निखळ वाङ्‌मयानंदाची चव चाखली. “नानासाहेबांचा वाङ्‌मयीन पिंड राजबिंडा, पण विलासी नाही. पक्षकार्यासाठी तीळतीळ वेळ देणारा, पण अंगचे कलागुण फुलवीत ठेवण्याची दक्षता घेणारा आणि नवोदितांबद्दल पऱ्ह्याच्या पाण्यासारखी वाहती आत्मीयता अंगी असलेला हा प्रौढ कार्यकर्ता लेखकोत्तमही आहे, अशी माझी पहिलेछूट भावना झाली. सर्व बाजूंनी प्रमाणबद्ध असलेले नानासाहेब गोरे मला माझ्या उगवतीच्या वेळी भेटले, नि माझ्या आसण्याचा रोख बदलला. त्यांच्या सूचनेवरून मी रात्रीच्या निवांत वेळी झटून व्यासंग करणं, नानासाहेबांच्या ललित लेखनाचा फळा सदैव नजरेसमोर ठेव यामुळे माझ्या एकूण जगण्याला वेगळी दिशा मिळाली. आपण aqui, समाजसेवक न बनता, शैलीसंपन्न ललित लेखक' अशी आपली स्वतंत्र चेहऱ्याची छबी निर्माण करायची हे वळण मला नानासाहेब मोऱ्यांमुळे लागलं. नाना अप्रत्य‌क्षपण सुकाणूवर होने म्हणून माझा दिशापालट झाला. एखी आजचे हे दिवस मला दिसतेच ना!” असे कृतज्ञतेचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

या लेखातून जसे नाना साहेब गोरे भेटतात, तशीच स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरच्या मंतरलेल्या दिवसांतील नव्या स्वप्नांची उभारी घेऊन जगणाऱ्या तरुणाईची स्पंदनेदेखील दिसतात. रवींद्र पिंगे स्वतःच या असंख्य तरुणांपैकी एक होते. त्यामुळे अपरिहार्यपणे त्यांच्या जडणघडणीचे आणि आत्मभानाचे दिवस आपल्यासमोर खुले होतात. पिंगे अडीच पानांमध्ये किती उत्तम, कसदार आणि श्रेयस्कर सिहू शकतात त्याचा हा लेख म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. वाङ्‌मयीन परंपरेच्या खांद्यावर बसून नव्या पिढीला पुढचे क्षितिज दिसते, हे खरं. त्यासाठी मनात  कृतज्ञता हवी.

‘चर्चिलची संध्याकाळ’ मध्ये रॉयल नेव्हीच्या युद्धनौकेवर कार्यरत असलेल्या विन्स्टन चर्चिलचे लेखकामध्ये कसे रूपान्तर झाले याचा आलेख पिंगे यांनी रेखाटला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. सॉमरसेट मॉम ह्या विश्वविख्यात साहित्यिकाविषयीही पिंगे यांनी लिहिले आहे. त्याच्या वाङ्‌म‌यीन व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना त्यांनी वस्तुनिष्ठ दृष्टी सोडलेली नाही. मॉम हा जन्मजात प्रतिभावंत नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वात प्रतिभा आणि परिश्रम यांचा मनोज्ञ मिलाफ होता. मॉमला आपल्या यशाची बाधा झाली नाही, कारण त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे नेमके भान होते. आपल्या मर्यादांची पुरेपूर जाणीव होती असे पिंगे यांनी म्हटले आहे. 'अर्नेस्ट हॅमिंग्वे' या लेखात पिंगे यांनी त्याच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वापेक्षा त्याच्या जीवनचरित्रातील समरप्रसंगांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्याचे अनुभवविश्व समजून घेण्यास मदत झाली आहे. एक्याऐंशी वर्षांचे आयुष्य लाभलेल्या पर्ल बक या ख्यातनाम लेखिकेच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा सांगोपांग परामर्श घेतला आहे. अमेरिकेत जन्म घेतलेल्या या लेखिकेने उणीपुरी चाळीसवर्ष चीनच्या डोंगराळ प्रदेशात घालवली. एकतिसाव्या वर्षी तिने लेखनव्रत स्वीकारले आणि आजीवन ती लेखनमग्न राहिली. तिच्या वाङ्‌मयीन गुणवत्तेमुळे तिला नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. पण कमालीची उपेक्षाही तिच्या वाट्याला आली. 


हेही ऐका : अनंत भालेराव (सुरेश द्वादशीवार लिखित 'तारांगण' या व्यक्तिचित्रसंग्रहातील एक ऑडिओ प्रकरण)


डी. जी. एक अवलिया आणि धर्मानंद कोसंबी' या दोहोंमध्ये खडतर ज्ञानसाधनेचे समान सूत्र आहे. ही माणसं जगावेगळी आहेत. ध्यासपंथी आहेत. माणूस आपल्या ध्येयापायी सारे आयुष्य कसे वेचतो आणि जाताना समाजपुरुषाला समृद्ध कान्त जातो त्याची हो आदर्श उदाहरणे. डी. जी. तेंडुलकरांविषयी पिंगे मर्मज्ञतेने लिहितात. "म्हणजे जन्मभर चैतन्यानं सळसळणाऱ्या डी. जी.चं अखेर काय उरलं? मूठभर थंडगार राख? नाही नाही त्यांची पुस्तकं? त्यांच्या टेपा? त्यांची प्राणप्रिय चारपाई? नाही नाही. डी. जी. च्या मागं उरलं आहे त्यानं अखंडपणे जोपासलेलं त्रिभुवनमोलाचं उमदं साधेपण, शहाणपण, रसिक चोखंदळपण आणि वृत्तीचं अमोल अभिजातपण आणि ह्या सर्वांच्या मिश्रणातून उमललेली आठवणीची ही टवटवीत कमळं".

आचार्य धमानंदांच्या विद्वत्तेचा आणि ज्ञानसाधनेचा यथार्थ गौरव पिंगे यांनी केला. 'धर्मानंद कोसंबी’, या लेखात घालत आहे. त्यांच्या खडतर तपश्चर्येबद्दल सांगितले आहे. ‘शांत निरांजनासारखा एका कोपऱ्यात कायमचे तेवणाऱ्या’ प्रांजळ 'निवेदन' ह्या आत्मचरित्राबद्दल लिहिले आहे. गांधीजींच्या हाकेला ओ देऊन शिरोड्याच्या आणि पार्ल्याच्या मिठाच्या सत्याग्रहात घेतलेल्या सहभागाबद्दल सांगितले आहे. पण दशांगुळे राहिलेल्या त्यांच्या असामान्य विद्वत्तेबद्दल ते म्हणतात, “जुन्या पोथ्यांमधल्या अपभ्रंशित अक्षरांचा अर्थ आणि अन्वय लावणारे ते साधे मठनिवासी बौद्ध भिक्षु होते! परंतु खिशात कुठलेही सर्टिफिकेट नसलेल्या या फटिंग माणसापाशी एक सूक्ष्म नजर होती. आणि जबरदस्त ज्ञानलालसा आहे हे ओळखून हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना चार वेळा संशोधनवृत्ती बहाल केली. ते चारदा अमरिकेत आणि एकदा रशियातल्या लेनिनग्राड विद्यापीठात पाली ग्रंथाच्या संशोधनासाठी साधुवृत्ती करून आले. एका निरिच्छ, विद्याव्रती पारिव्राजकाची ही असामान्य ज्ञाननिष्ठा!”

‘कुमार गंधर्वांचं शांत, तृप्त जग' या लेखात पिंगे यांनी कुमार गंधर्वांची त्यांच्या देवास या जन्मगावी जाऊन घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आहे. मुलाखतीतील रुक्ष भाव येथे गळून पडतो आणि दोघांचा रसीला हृदयसंवाद सुरू होतो. विश्रब्ध वातावरणातील शब्दसुराचे चांदणे इथे ठिबकायला लागते. पिंगे यांचासारखा बहुश्रुत रासिकाग्रणी आणि कुमार गंधर्वांसारखा संगीत क्षेत्रातील तपस्वी दिग्गज अशी ही पर्वणी आहे. पिंगे कुमारांबद्दल म्हणतात, "कुमारांचा मैफलीतला स्वर विजेसारखा सळसळणारा असतो. घरगुती बोलण्यातला स्वर मऊ, शीतल आणि आश्वासक आहे. अंतर कापून क्षणात समीप भिडवणारा आहे."किती सार्थ, समर्पक शब्द आहेत हे!

साहित्याचे क्षेत्र हे पिंगे यांचे आवडते क्षेत्र आहे. त्यांची प्रतिभासंपन्न लेखणी सर्व क्षेत्रांत मुक्तपणे संचार करते. पुस्तके आणि शब्दनिर्मात्या प्रतिभासंपन्न लेखकांचे भावजीवन हे त्यांचा जिव्हाळ्याचे विषय आहेत. या दोहोंच्या अंतरंगात अवगाहन करताना ते किती तदात्म होतात ते पाहण्यासारखे आहे.

समग्रतेने रवींद्र पिंगे यांच्या ललित लेखनाचा गाभा अनुभव-त्यानंतर रसिकांची चित्तवृत्ती प्रसन्न होते. रसज्ञतेने त्यांनी जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केला आहे. आकाशवाणीच्या संपन्न आणि समृद्ध क्षेत्रात अनेक वर्षे ते राहिले. ती त्यांची उपजीविका होती पण अक्षराचा नक्षत्रलोक ही त्यांची जीविका होती. त्यांची ही लेखनयात्रा सर्वार्थाने रसिकांना आल्हाद देत राहिली. पुढेही राहील.

- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

Tags: रवींद्र पिंगे मराठी साहित्य ललित साहित्य ललितनिबंध व्यक्तिचित्रे Load More Tags

Add Comment