मधुकर रावांना मृत्यूचे भय नव्हते. तरीही सदैव मृत्युच्या सावटाखाली असलेल्या आणि आपल्या मृत्यूने अनेकांचे भविष्य अंध:कारमय होणार होणार आहे याची जाणीव असलेल्या माणसाची मन:स्थिती कशी असेल याचा आपण विचारदेखील करू शकणार नाही. ‘सलवा जुडूम’च्या त्यांच्या लहान-मोठ्या सर्व सहकार्यांना नक्षलवाद्यांनी वेचून वेचून मारले. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले आणि त्यातून ते बचावले. पण त्यांच्या जिवंत राहण्याचे विश्लेषण कधीतरी करावे लागेल. ते जिवंत राहिले ते पोलीस संरक्षण असल्यामुळे नाही तर एका विशिष्ट बिंदूनंतर नक्षलवादी चळवळीने त्यांना मारण्याचा विचार सोडला म्हणून. ही क्रूर चळवळ एका व्यक्तीला जिवंत ठेवत नव्हती तर त्यांच्या विचारसरणीशी दिलेल्या लढ्याच्या पराभवाला जिवंत ठेवत होती.
के.मधुकर राव हे हाडाचे शिक्षक होते व छत्तीसगडमध्ये त्यांना सर्व आदराने ‘बडे सर’ असे संबोधत असत. त्यांचा मृत्यू होऊन आता अडीच महिने होतील. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या (तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 2009 मधील प्रतिपादन) नक्षलवादाला खंबीरपणे तोंड देणाऱ्या या एकांड्या शिलेदाराचा मृत्यू छत्तीसगडमधील स्थानिक माध्यमे सोडून इतरांनी ‘कव्हर’ केला नाही. त्यांच्या कार्याप्रमाणेच त्यांचा मृत्यूदेखील नेमस्त होता. त्यांचे कार्य अनुल्लेखित राहिले व मृत्यू दुर्लक्षित!
टाईप 2 मधुमेह असलेले त्यांचे शरीर इतरही अनेक व्याधींनी ग्रासलेले होते. पण अंगभूत इच्छाशक्ती व हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची त्यांची तळमळ त्यांना अजून किमान 10 वर्षे तरी जिवंत ठेवेल अशी आशा होती. पण त्यांच्या निधनाची वार्ता कळली, त्यांच्या उपचारादरम्यान झालेले अक्षम्य दुर्लक्ष समजले आणि मन विषण्ण झाले. या सगळ्यामध्ये, दोन आपोआप आलेले अश्रू ढाळण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो याची खंत लागून राहिली.
या माणसाचे जीवन आणि त्याचा मृत्यू असे होते की, कोणकोणत्या गोष्टीची खंत करायची हे ठरवणं कठीण! सांत्वन करणार तरी कोणाचे? शेवटी, त्यांचे खरे नातलग असलेल्या पंचशील बालिका आश्रमातील मुलींना उद्देशून एक पत्र लिहिले व पोस्टाने पाठवून दिले.
मी त्यांचा उल्लेख जेव्हा ‘बस्तरचा गांधी’ असा करतो तेव्हा ते उपमेय व उपमान व्यक्तीचे नसून विचारप्रणाली व कार्यपद्धतीचे असते. त्यांचा अहिंसेवर गाढ विश्वास होता. निरुपायाने नव्हे, तर निडर शूराप्रमाणे प्राप्त परिस्थितीचे सूक्ष्म विश्लेषण करून आणि अहिंसेची उपयुक्तता जाणून त्यांनी डोळसपणे स्वीकारलेले ते तत्त्व होते.
गांधी हे महात्मा होते व त्यांची तुलना होऊ शकत नाही. पण गांधीजींपुढे असलेली आव्हाने आणि के.मधुकर राव यांच्यासमोर असलेली आव्हाने यांचा काळाच्या परिप्रेक्षात विचार केला तर के.मधुकर राव यांच्यासमोर असलेली आव्हाने अधिक जटील होती असे म्हणावे लागेल. ब्रिटीश राजवट जुलमी होती पण त्या राजवटीला संसदीय लोकशाहीची पार्श्वभूमी होती त्यामुळे चर्चेचे एक दार - किलकिले का होईना - कायम खुले असायचे आणि ‘आपल्याला भारतातून एक दिवस परत जायचे आहे’ हे ब्रिटीश जाणून होते. के.मधुकर राव यांचा मुकाबला हिंसा हे तत्त्व असलेल्या, ‘दास कॅपिटल’ला प्रमाण मानणाऱ्या, ‘कन्फ्युशियस’ आधाराला घेणाऱ्या, समानतेच्या नावाखाली हुकुमशाही आणू पाहणाऱ्या ‘गळेकापू’ विकृतीशी होता. पुन्हा गांधीजींकडे विनोबांसारखी ज्ञानी, साने गुरुजींसारखी समर्पित, नेहरुंसारखी जनतेवर प्रभाव पाडणारी व पटेलांसारखी कणखर व कार्यक्षम माणसे होती. मधुकर रावांच्या बाबतीत तसे नव्हते. हा माणूस एकांडा होता पण तरीही अखेरपर्यंत लढत राहिला.
‘सलवा जुडूम’ ही एकप्रकारे के.मधुकर राव यांनी अंगिकार केलेली नक्षलवादविरोधी ‘असहकार चळवळ’ होती. कारण त्या चळवळीचा मूळ गाभा 'गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांशी असहकार करायचा' हाच होता आणि हे तत्त्व त्या विचारसरणीच्या मुळावर घाव घालणारे होते.
के.मधुकर राव यांची आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य ‘कुटरू’ या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड तालुक्यातील गावी व्यतीत केले. कुटरूपासून पाच मैलांवर अम्बेली हे गाव आहे. याच गावात नक्षलवाद्यांवर (सुरक्षादलाशी संबंध नसलेल्या व्यक्तींकडून) प्रथम गोळी झाडली गेली. हा प्रसंग ‘सलवा जुडूम’चा ‘चौरीचौरा’ ठरला. गांधीजी असहकार चळवळ थांबवू शकले, के. मधुकर राव पुढील गोष्टी थांबवू शकले नाहीत, त्या थांबवणे त्यांच्या आवाक्याबाहेर होते. पण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष नव्हता तर काहींनी जाणतेपणी व काहींनी अजाणतेपणी केलेल्या चुकांचा तो परिपाक होता. पण त्यातून जे अपयश आले, त्याने के.मधुकर राव यांची साथ कधीही सोडली नाही!
‘बिजापूर डायरी’च्या लेखिका डॉ.ऐश्वर्या रेवडकर हिच्या माध्यमातून या माणसाशी माझी प्रथम ओळख झाली. बिजापूर जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळांबरोबर मी काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंध असल्याने या (नक्षलवादाविषयी तीव्र चीड असणाऱ्या) शिक्षकाशी संबंध येणे अपरिहार्य होते. बिजापूरच्या अडीच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचा सहवास वाढला आणि त्याचे रुपांतर आदर व विश्वासात झाले. मध्यम उंची, थोडासा स्थूलतेकडे झुकलेला देह, लक्ष देऊन ऐकल्याशिवाय कळणार नाही इतका मृदू आवाज, पांढऱ्या दाढीत हरवून गेलेला चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रथमदर्शनी भुरळ पाडणारे नव्हते, आणि नक्षलवादविरोधी अहिंसक आंदोलनाचा प्रणेता हा माणूस असेल यावर विश्वासही बसत नसे. पण त्यांचे डोळे मात्र प्रथमभेटीतच काळजात चर्र करून जाणारे व अनामिक ओढ निर्माण करणारे होते.
विख्यात पत्रकार श्री. देवेंद्र गावंडे यांच्या साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखातील द्विरुक्ती टाळण्यासाठी के.मधुकर राव यांची माहिती देणे येथे मी टाळत आहे. पण हा संवेदनशील माणूस व्यवस्थेचे अपयश स्वतःच्या डोळ्यात घेऊन जगत होता आणि आतून पोखरला जात होता.
या आतल्या आत पोखरण्यावरचा उतारा म्हणून असेल किंवा आता करण्यासारखे रचनात्मक कार्य हेच उरले या विचारातून असेल; त्यांनी ‘पंचशील आश्रम’ या अनाथाश्रमाची स्थापना केली. या अंतर्गत मुलींचे व मुलांचे वेगवेगळे अनाथालय होते आणि मुलांचे शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासाची काळजी घेतली जावी हा त्याच्या स्थापनेचा उद्देश होता.
मी माझ्या उपक्रमासाठी दूरस्थ आश्रमशाळा निवडल्या होत्या व त्यातील सर्वच शाळा तीव्र नक्षलप्रभावित भागात होत्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अयाझ तांबोळी यांची ‘चार वाजल्यानंतर प्रवास करायचा नाही’ अशी सक्त ताकीद होती. पण तीन वाजता सुटणाऱ्या शाळेतून निघून चार वाजायच्या आत नक्षलप्रभावित भागातून बाहेर पडणे अशक्य होते. त्यामुळे तांबोळी यांनीच माझ्या राहण्याची सोय कुटरूमधील वनविभागाच्या गेस्ट हाउसमध्ये करून दिली होती. महिन्याचे किमान 10 दिवस तरी माझा मुक्काम कुटरूमध्ये असे. कारण कुटरूच्या 20 किमी परिघात फरसेगढ (या गावाच्या पुढे जायचे असेल तर नक्षलवाद्यांची परवानगी घ्यावी लागते), सोमनपल्ली, कुटरू, करकेली आणि बेदरे (येथे मतदानाच्या दिवशी सरकारी अधिकारी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने जातात) अशा पाच आश्रमशाळा होत्या. माझी राहण्याची सोय तर झाली पण जेवणाचा प्रश्न होता. तो के.मधुकर राव यांनी न सांगता सोडवला व माझी जेवणाची व्यवस्था पंचशील आश्रमात केली. पंचशील आश्रमाच्या शाळा माझ्या कार्यक्षेत्रात येत नव्हत्या पण आश्रमशाळा व या शाळा यांचा अभ्यासक्रम समान असल्याने मी माझे शैक्षणिक उपक्रम येथेदेखील राबवू लागलो.
कृतीशील शिक्षणावर आधारित असलेले ते उपक्रम मुलांना गुंतवून तर ठेवतच, शिवाय विषयाचे सखोल ज्ञान देण्यावर भर देणारे असत. सर्वांना सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या के.मधुकर राव यांनी मलाही संपूर्ण सहकार्य केले. माझ्या लग्नाचे ‘रिसेप्शन’ पंचशील आश्रमात करण्याची कल्पनादेखील त्यांनी चांगलीच उचलून धरली व एक जिव्हाळ्याचा कार्यक्रम घडवून आणला. आमच्यातील औपचारिक संबंधाची जागा ओलाव्याने घेतली.
त्यांचे सहकार्य केवळ वैयक्तिक स्तरावर मर्यादित नव्हते तर माझ्या कामातसुद्धा ते मला मदत करत असत. एकदा असे झाले की, सोमनपल्ली या मुलांच्या व बेदरे या मुलींच्या अधीक्षक/अधीक्षिकेबद्दल परस्परविरोधी तक्रारी तत्कालीन जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलावर येऊन पडल्या. हे थेट थेट आय.ए.एस झालेले तरुण अधिकारी होते आणि फाईलचा निपटारा करण्यात तत्पर होते. मी या दोन्ही आश्रमशाळांत कायम जात असल्याने या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे कार्य त्यांनी माझ्यावर सोपवले. ही चौकशी गुप्तपणे करणे भाग होते आणि ती वस्तुनिष्ठ व्हायची असेल तर मुलांशी अनौपचारिकपणे बोलणे भाग होते. मुले माझ्याशी जरी मोकळेपणाने बोलत असली तरीही ते बोलणे अधीक्षक/अधीक्षिकेच्या कानावर जाणे सहज शक्य होते. मुलांना सुट्ट्या लागणार होत्या त्यामुळे मुलांशी त्यांच्या घरीच बोलायचे मी ठरवले. ही गोष्ट मी मधुकर राव यांच्या कानावर घालताच त्यांनी त्यांचे ‘नेटवर्क’ कामाला लावले व मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलांच्या आई-वडील-इतर नातेवाईक यांच्याकडून काढून दिली. सोमनपल्लीचा अधीक्षक अप्रामाणिक व बेदरेची अधीक्षिका प्रामाणिक आहे या माझ्या प्राथमिक अंदाजाला पुष्टी देणारीच ती उत्तरे होती. त्या उत्तरांना ‘एक्सेल शीट’ मध्ये टाकून मी ती फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोपवली. मुले सुट्टीवरून परत येईपर्यंत सोमनपल्लीचा अधीक्षक आपल्या मूळ प्रतिनियुक्तीवर गेला होता.
मधुकर रावांशी चर्चा करताना जाणवायचे की, या माणसाला नक्षलवाद ही समस्या व त्यावरील उपाय यांचे सखोल आकलन आहे. आय.ए.एस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री अकादमी, मसुरी येथे त्यांना नक्षलवादावर मार्गदर्शन करण्यास पाचारण केले जाण्याइतपत त्यांचा आवाका मोठा होता. पण त्यांच्या ‘सेवा’कार्याच्या आड त्यांचा ‘रिसर्च’ झाकोळला जात होता. सरकारने देखील त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञानाचा उपयोग धोरण ठरवताना करून घेतला नाही.
डॉ. ऐश्वर्या, मधुकर राव, मकरंद दीक्षित व आश्रमातील मुले
अत्यंत विनयशील असलेला हा माणूस प्रचंड मनस्वी होता आणि प्रत्येक व्यक्तीशी तो त्याचे पद, ‘रुतबा’ विचारात न घेता व्यक्ती म्हणून वागणारा होता. या संदर्भात एक प्रसंग येथे सांगितला पाहिजे. माझ्या बिजापूरच्या कालखंडातील पहिल्याच स्वातंत्र्यदिनाला त्यांनी मला आमंत्रण दिले आणि ध्वजारोहण करण्याचा मान देखील दिला. (डॉ.ऐश्वर्या देखील तेथे उपस्थित होती.) झाले असे की, आदल्या दिवशी छत्तीसगडच्या तत्कालीन राज्यपालांचे निधन झाले, त्यामुळे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे तत्कालीन आमदार, जिल्हाधिकारी (डॉ.अयाझ तांबोळी यांची बदली झाली होती), एस.पी. असा सर्व लवाजमा आगंतुकपणे पंचशील आश्रमात येऊन थडकला. त्यामुळे मुलांचा नियोजित कार्यक्रम बाधित झाला व मुले नाराज झाली. या कार्यक्रमानंतर शासकीय गेस्ट हाउसवर जेवणाचा कार्यक्रम होता. मी आणि डॉ.ऐश्वर्याने निक्षून सांगितले की, आम्ही मुलांसोबतच जेवण करणार. तेव्हा मधुकर रावांनीसुद्धा शासकीय जेवणाला न जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांना समजावूनदेखील ते ऐकत नव्हते. एव्हाना दोन वेळा निरोप येऊन गेले होते. त्यांचे म्हणणे होते की, आम्ही त्यांच्या आमंत्रणावरून आलो आहोत व बाकीचा लवाजमा न बोलावता आला आहे (आमदार असतील आपल्या घरचे!) त्यामुळे मी अतिथींचा अपमान करणार नाही. लोकप्रतिनिधी व उच्चस्तरीय शासकीय अधिकारी यांचा अहं कधी दुखावला जाईल आणि त्याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे “आम्ही आज दिवसभर येथेच आहोत” असे सांगितल्यावर ते अनिच्छेनेच कार्यक्रमाला गेले आणि उरलेला पूर्ण दिवस त्यासाठी खंत व्यक्त करत बसले.
‘खंत करणे’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता आणि तो का याचा उलगडा त्यांच्या सहवासात राहिल्यावर व आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहिल्यावर होत होता. ही खंत केवळ ‘सलवा जुडूम’च्या अपयशाची व त्यामुळे झालेल्या वाताहतीची नव्हती, तर मागचे विसरून नव्या ध्येयाकडे नव्या मार्गावरून चालणाऱ्या माणसाला न मिळणाऱ्या साथीमुळेही होती. मधुकर रावांच्या बरोबर चालणारे (किमान तसे दाखवणारे) लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळपासही जाणारे नव्हते. त्यांच्या ठायी मधुकर रावांसारखा ध्येयवाद व प्रामाणिकपणादेखील नव्हता. त्यांचे अंतस्थ हेतूदेखील वाईट होते. पंचशील आश्रमाला मिळणाऱ्या सरकारी अनुदानावर डोळा ठेवून लोक त्यांच्या बाजूला जमा झाले. त्यामुळे अल्पावधीतच ही संस्था भ्रष्टाचार, अनागोंदी, अनियमितता यांच्या विळख्यात सापडली. माझ्या एका परिचिताने आश्रमासाठी देणगी दिली, तेव्हा पावतीवर क्रमांक नव्हता हे पाहून मला थोडा अंदाज आला होता. पण हळूहळू सर्व बाबी लक्षात येऊ लागल्या. अनुदानातील रक्कम इतरत्र वळवून स्वतःच्या तुंबड्या भरणे, मुलांना मिळालेल्या वस्तूसुद्धा घरी नेणे, मुलांच्या बाह्य जगाबाबत असलेल्या कुतूहलाचा गैरफायदा घेऊन त्यांना घरच्यांच्या / नातेवाईकांच्या कार्यक्रमाला नेऊन सर्व कामे करवून घेणे, वेळचे वेळी हिशोब व लेखा परीक्षण सादर न करणे यामुळे या संस्थेची चौकशी सुरु झाली व संस्था बंद पडायला आली. व्यवस्थापन समितीच्या लोकांनी एव्हाना आपले खिसे भरले होते, त्यांचा कार्यभाग उरकला होता. त्यामुळे संस्था बंद पडली काय, चालू राहिली काय त्यांना काही देणेघेणे नव्हते. संस्था बंद पडली तर ह्या मुलांची पुन्हा वाताहत होणार होती. त्यामुळे या सर्व परिस्थितीकडे हताशपणे पाहण्याशिवाय मधुकर रावांकडे पर्याय नव्हता. कारण हे लोक एका रुपयातील सत्तर पैसे खात होते, पण निदान तीस पैसे तरी मुलांच्या कामी येत होते! नक्षलग्रस्त भागात माणसे मिळणे दुरापास्त असल्यामुळे या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याशिवाय मधुकर रावांनाही पर्याय नव्हता. त्यांची ही अडचण शासनाच्या लक्षात आली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पोक्तपणा दाखवून समिती बरखास्त केली. दोषी व्यक्तींची चौकशी चालू ठेवली. अनुदानात कपात केली. पण संस्था बंद होऊ दिली नाही.
मधुकर रावांना वेदना देणारी आणखी एक घटना येथे नमूद केली पाहिजे. कुतरू येथे डी.आर.जी या छत्तीसगड राज्यसरकारच्या अधीन असणाऱ्या सुरक्षादलाचा तळ आहे. तेथील एका 40 वर्षीय ‘जवानाने’ पंचशील आश्रमातल्या एका किशोरवयीन मुलीला भुलवले. घरचा काहीच ठावठिकाणा नसलेल्या या मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखवले. उज्ज्वल भविष्याच्या ओढीने त्याच्या सापळ्यात अडकून ती त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडली. आश्रमातील एका शिक्षिकेला हे प्रकरण समजल्यावर तिने ‘पॉस्को’ अंतर्गत तक्रार दाखल केली. ते करताना पोलिसांनी तिला सहकार्य केले नाहीच पण आश्रमाच्या इतर सदस्यांनीदेखील तडजोड करण्याचा सल्ला दिला. मधुकर राव तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर हालचाली होऊन गुन्हा दाखल झाला. पण पोलिसांनी तपासात त्रुटी ठेवल्या व ‘आरोपीच्या’ घरच्यांच्या सहाय्याने पिडीत मुलीची दिशाभूल केली. त्यामुळे या मुलीने खटल्यात जबाब बदलला व तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या शिक्षिकेवरच आरोप केले. या घटनेमुळे पंचशील आश्रमातील ‘शील’च नष्ट झाले, या आश्रमातील मुलींविषयी एक वेगळाच गैरसमज निर्माण झाला व संस्थेची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली. स्वत: लावलेल्या रोपट्याला कीड लागून मरताना पाहिल्यावर जे दु:ख होईल तेच दु:ख मधुकर राव यांच्या वाट्याला आले. आणि या घटनेनंतर ते पूर्णपणे कोलमडले. त्या शिक्षिकेने आश्रमाच्या बोटचेपेपणाचा निषेध म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा उरला-सुरला आधारदेखील गेला. सदर शिक्षिकेने ही केस मात्र नेटाने चालवली, त्याची परिणती म्हणून या ‘जवानाला’ 10 वर्षांची शिक्षा व पिडीत मुलीला नुकसानभरपाई मिळाली. पण हा न्याय होईपर्यंत मधुकर रावांनी जग सोडले होते.
त्यांचे शरीर अनेक व्याधींनी ग्रस्त होतेच. कुटरू बिजापूरपासून 40 किमीवर आहे. बिजापूरहून नेमेड 15 किमी व तेथून डावीकडे वळल्यावर 25 किमीवर कुतरू आहे. हा 25 किमीचा रस्ता तीव्र नक्षलप्रभावित आहे. मधुकर राव हे नक्षलवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’ होते त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण होते. मधुकर राव कुटरूच्या बाहेर पडत तेव्हा सुरक्षादलांना संपूर्ण 40 किमीवर ‘रोड ओपनिंग’ करून सुरक्षा तैनात करावी लागत असे. ‘माझ्यासाठी सुरक्षादलांवर ताण नको आणि इतरांच्या जीवाला धोका नको’ म्हणून मधुकर राव कुटरूहून बिजापूरला येऊन सर्व तपासण्या व उपचार करण्यास टाळाटाळ करत असत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अयाझ तांबोळी यांनी अथक प्रयत्न करून बिजापूरचे जिल्हा रुग्णालय अद्ययावत केले होते आणि ते मधुकर राव यांना ‘समाजाला / मुलांना तुमची गरज आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरी तब्येतीकडे लक्ष द्या’ असे कळकळीचे आवाहन करत असत. पण इतरांना त्रास नको म्हणून मधुकर राव ते टाळत असत. त्यांची दृष्टी मधुमेहामुळे पूर्णपणे अधू झाली होती. त्यांच्या खालावत जाणाऱ्या तब्येतीकडे पाहवत नव्हते. त्यामुळे मी एक दिवस त्यांना धमकीसदृश बजावूनच सांगितले की, तुम्ही उपचार घेईपर्यंत मी आश्रमात येणार नाही. ही पोकळ धमकी आहे हे त्यांना माहीत होते. पण तरीही एका शासकीय कार्यक्रमाचे निमित्त करून त्यांनी बिजापूरला भेट दिली व दाखवण्यापुरती डोळ्यांची तपासणी करून घेतली.
पोटात दुखणे हे त्यांच्या मृत्यूचे निमित्त ठरले. अनेक व्याधींनी ग्रासलेल्या त्यांच्या शरीराची माहिती असूनदेखील आश्रमाच्या माणसांनी प्रथम घरगुती उपचार केले. कुटरूच्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनीदेखील त्यांची पोटदुखी गांभीर्याने घेतली नाही. त्यांची तब्येत खालावत चाललेली पाहून त्यांना रुग्णवाहिकेने बिजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने अनेक रुग्ण पाहण्याच्या अनुभवाने ‘बडे सर को हार्ट अटॅक आया है’ असे त्यांच्याबरोबर असणाऱ्यांना सांगितले होते. (हा तपशील एका शिक्षिकेकडून प्रस्तुत लेखकाला समजला) पण एका चालकाला कोण गांभीर्याने घेणार? डॉ.अयाझ तांबोळी यांच्यानंतर पाच वर्षांत पाच जिल्हाधिकारी बदलले होते. त्यामुळे बिजापूरची आरोग्ययंत्रणा ही (दुर्दैवाने) पूर्वपदावर आली होती. त्यामुळे एकेकाळी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा लौकिक मिळवलेले हे बिजापूर जिल्हा रुग्णालय त्यांच्या हार्ट अटॅकचे निदान करू शकले नाही. नक्षलवाद्यांच्या अनेक हल्ल्यातून वाचलेले आणि सर्व समाजाप्रती कायम आस्था बाळगणारे मधुकर राव अखेर त्याच समाजाच्या अनास्थेचे बळी ठरले.
मधुकर रावांना सुरक्षा होती. पण त्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलदेखील एकदा सांगितले पाहिजे. निवृत्तीच्या मार्गावर असेलेले व अभियानास उपयुक्त नसलेले ‘जवान’ त्यांच्या तैनातीत असत. त्यांच्याकडची शस्त्रेदेखील जुनाट असत. मी एकदा रात्री दहा वाजता मधुकर राव यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. तेव्हा ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक झोपले होते. मी विनासायास त्यांच्या घरात प्रवेश करून अर्धा तास चर्चा करून बाहेर पडलो, तेव्हा आवाजाने हे सुरक्षारक्षक जागे झाले आणि त्यांनी दरडावणीच्या स्वरात विचारले, “तुम्ही आत कसे गेलात?” मी त्यांना उत्तर दिले, “खरेतर हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. पण जाऊ दे. हा प्रश्न उद्या एस.पी. गर्ग साहेबांना विचारतो किंवा आय.जी. सुंदरराज यांना विचारतो.” ते सुरक्षा कर्मचारी या अधिकाऱ्यांची नावे ऐकून गांगरून गेले. शेवटी मधुकर रावांनीच, “जाऊ द्या हो. चालायचंच” असे म्हणून हा विषय (याआधी देखील अनेक वेळा जसा संपवला असेल तसा) संपवला.
स्वातंत्र्यदिनाच्या प्रभातफेरीनंतर कुटरू पोलीस ठाण्याला दिलेली सदिच्छा भेट
मधुकर रावांना मृत्यूचे भय नव्हते. तरीही सदैव मृत्युच्या सावटाखाली असलेल्या आणि आपल्या मृत्यूने अनेकांचे भविष्य अंध:कारमय होणार होणार आहे याची जाणीव असलेल्या माणसाची मन:स्थिती कशी असेल याचा आपण विचारदेखील करू शकणार नाही. ‘सलवा जुडूम’च्या त्यांच्या लहान-मोठ्या सर्व सहकार्यांना नक्षलवाद्यांनी वेचून वेचून मारले. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले आणि त्यातून ते बचावले. पण त्यांच्या जिवंत राहण्याचे विश्लेषण कधीतरी करावे लागेल. ते जिवंत राहिले ते पोलीस संरक्षण असल्यामुळे नाही तर एका विशिष्ट बिंदूनंतर नक्षलवादी चळवळीने त्यांना मारण्याचा विचार सोडला म्हणून. ही क्रूर चळवळ एका व्यक्तीला जिवंत ठेवत नव्हती तर त्यांच्या विचारसरणीशी दिलेल्या लढ्याच्या पराभवाला जिवंत ठेवत होती.
मधुकर रावांचा नक्षलवादी चळवळीतील माणसांना विरोध नव्हता. तर विचारसरणीच्या आड लपलेली व क्रौर्याची परिसीमा गाठणारी खंडणीखोरी, हिंसा, आदिवासींची होणारी दिशाभूल, तरुणाईची वाताहत व संविधानातील मूल्यांना निर्माण झालेला धोका यांना होता. हा विरोध डोळस होता. त्यांना या वाट चुकलेल्या लोकांबद्दल कणव होती. त्यांचे प्रतिपादन होते की, ‘या विचारसरणीचे ‘लाल राज्याचे’ स्वप्न हे स्वप्न नसून हिंसक स्वप्नाळूपणा आहे. ते छोट्या-मोठ्या चकमकी जिंकतील, सुरक्षाकर्मी, सामान्य माणसे यांना मारत राहतील पण युद्ध कधीही जिंकू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी हिंसा सोडून विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे.’ त्यांच्या प्रत्येक भाषणात हा परिच्छेद ठरलेला असे.
आदिवासींमध्ये दूध पिण्याची संस्कृती नाही आणि बऱ्याच वेळा तेच आरोग्यविषयक समस्यांचे कारण ठरते. मुलांना ताजे दूध मिळावे म्हणून त्यांनी दोन गाई पाळल्या व ते स्वत: या गाईंचे संगोपन करत असत. प्रस्तुत लेखकाने त्यांना कित्येक वेळा अंगणातल्या चुलीवर मुलांसाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवताना पाहिलेले आहे.
लोक त्यांना आदर देत. तोंडावर प्रत्येक गोष्टीला हो हो करत पण मागे आपल्याला पाहिजे तेच करत. आदिवासी संस्कृतीबद्दल मधुकर रावांना आदर तर होताच, पण लहानसहान गोष्टींच्या उत्सवात आठ-आठ दिवस घालवणे, नशापाणी करणे, शिक्षणाचे महत्त्व न ओळखणे यामुळे ते व्यथित होत. मात्र समजावून सांगण्यापलीकडे ते काहीही करू शकत नसत.
त्यांच्या आश्रमात शिकणाऱ्या काही मुलांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. पण हा छोटा अपवाद वगळता इतर मुलांना जबाबदारीची जाणीव होतीच असे नाही. ही मुले त्यांच्याप्रती निश्चितच कृतज्ञ होती. पण आपल्या ‘बडे सरांना’ आपल्याकडून कृतज्ञतेची नव्हे तर जिद्द/चिकाटीची अपेक्षा आहे हे त्यांना समजले नाही.
गैर आदिवासी असूनदेखील आदिवासींसाठी आयुष्य अर्पण केलेला हा माणूस शेवटपर्यंत एकाकी राहिला. त्यांचा भूतकाळ सलत राहणारा, वर्तमान अस्वस्थ करणारा व भविष्यकाळ निराश करणारा ठरला. ज्या लोकांना विरोध करायचा त्यांना कोणत्याही जीवाचे मोल नाही, ज्या लोकांना सोबत घेऊन काम करायचे ती विश्वासार्ह नाहीत आणि ज्या लोकांच्या उद्धाराची काळजी वाहायची त्यातील बहुतांश संख्येने उदासीन आहेत हा पेच उभ्या हयातीत त्यांच्या समोर राहिला. एकंदरीतच ‘लोक’ या यंत्रणेने केलेला हा पराभव ते पचवत राहिले व आपल्या स्मितहास्यामागे त्या पराभवाचा दाह लपवत राहिले.
आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहिलेल्या, ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञ असणारा हा ‘बस्तरचा गांधी’ प्रतिकूल परिस्थितीशी लढताना व्यवस्थेसमोर हतबल ठरला.
नोव्हेंबर 2021मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात सुरक्षादलांनी केंद्रीय समिती सदस्य व एम.एम.सी. (मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड) झोनचा कमांडर मिलिंद तेलतुंबडे यांस कंठस्नान घातल्यावर सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या शांततेमुळे सर्व सरकारांनी नक्षलवादी चळवळ संपल्याचे दिंडीम वाजवले. नुकत्याच ‘दंतेवाडा’मध्ये झालेल्या हल्ल्याने हे सर्व फोल ठरवले. यानंतर सर्व संबंधितांनी ठरलेली वक्तव्ये केली. पोलीस व माध्यमांनी आपापले विश्लेषण केले. या दरम्यान नजरेआड झालेली एक बाब अशी की, या हल्ल्याचे प्रारूप, नियोजन व उपलब्धी पाहता नक्षलवादी चळवळीला मिलिंद तेलतुंबडेची ‘रिप्लेसमेंट’ मिळाली आहे.
मिलिंद तेलतुंबडे, आझाद, किशनजी यांची ‘रिप्लेसमेंट’ एक-दीड वर्षांत मिळते. पण महेंद्र कर्मा, बहादूर शहा अलाम यांची ‘रिप्लेसमेंट’ आपल्याला अजूनपर्यंत मिळालेली नाही आणि त्यात के.मधुकर राव हे आणखी एक नाव जोडले गेले आहे. ही ‘कधीही भरून न येणारी पोकळी’ हे आपल्या सर्वांचे दुर्दैव व अपयश आहे.
के.मधुकर राव व नक्षली हिंसेत शहीद झालेल्या सर्वांनाच विनम्र श्रद्धांजली.
- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Tags: नक्षलवाद बिजापूर के. मधुकर राव आदिवासी बस्तर महात्मा गांधी स्मृतीलेख मकरंद दीक्षित Load More Tags
Add Comment