अमूर्त संकल्पनांना जिवंत आशय देणारा साहित्यिक

ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विनोद कुमार शुक्ल यांना आदरांजली 

"साहित्यनिर्मिती हा एखादा प्रकल्प नसून जीवनाच्या दर्शनाने येणारी प्रतिक्रिया आहे", असे शुक्ल यांचे प्रतिपादन होते. “मी माझे सर्वश्रेष्ठ अजून निर्माण केलेले नाही” असे नम्रपणे म्हणणारे शुक्ल हे आदर्श ठरावेत ते त्यांच्या साहित्याप्रती असलेल्या बांधिलकीसाठी. 'साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा काय आहे याचा शोध घेणे महत्वाचे नाही' असे प्रतिपादन करणाऱ्या शुक्ल यांच्या साहित्यनिर्मितीला प्रेरणा शोधायचीच असेल तर ती त्यांच्या जीवनपटाकडे साक्षेपीपणे पाहून शोधता येईल. समकालीन वास्तवाचे चित्रण करणे, जीवनातील व्यामिश्रतेचा ठाव घेणे व मानवी अस्तित्वाशी निगडीत मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे हे साहित्याचे प्रयोजन असेल तर शुक्ल यांचे साहित्य श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही कसोट्यांवर अभिजात ठरते.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे 23 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आणि भारतीय सारस्वतातील एका सर्जनशील पर्वाचा अस्त झाला. 1 जानेवारी 1937 ते 23 डिसेंबर 2025 असे 88 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शुक्ल यांची साहित्यिक कारकीर्द 50 वर्षाची राहिली आणि या काळात त्यांनी कथा, कविता, कादंबरी, निबंध अशा साहित्याच्या सर्वच प्रांतांत लीलया मुशाफिरी केली आणि सकस व दर्जेदार साहित्य निर्माण केले. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही स्तरांवर त्यांचे योगदान भव्य होते असेच म्हणावे लागेल.

अत्यंत तीक्ष्ण व सूक्ष्म निरीक्षण शक्ती, संवेदनशीलता आणि संयत अभिव्यक्तीने सिद्ध झालेले त्यांचे लिखाण त्यातील तळमळीमुळे एका वेगळ्याच उंचीवर गेले; किंबहुना त्या लिखाणाने एक नवीन शिखर निर्माण केले. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतील पात्रे कधीही Larger than life नव्हती. कामगार, मजूर, शिक्षक, कारकून, गृहिणी हा ‘क्लास’ त्यांच्या साहित्यातील मुख्य पात्र असे. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य हा शुक्ल यांच्या लिखाणाचा मुख्य गाभा राहिला. कल्पना आणि वास्तव यांतील फारकत,विरोधाभास व बऱ्याच वेळी निर्माण होणारे द्वंद्व त्यांनी आत्यंतिक कळकळीने मांडले आणि असे करतानाच सर्वसामान्य जगणे असामान्य करणाऱ्या मूल्यनिष्ठेचा जागर हिरीरीने केला. 

सर्वसामान्य माणसाचे जगणे आले म्हणजे त्यात वंचना, होरपळ, दुखः, कारुण्य अपरिहार्यपणे आलेच. ही अपरिहार्यता मनस्वीपणे मांडतानाच शुक्ल यांनी करुणा तर जिवंत ठेवलीच पण उज्ज्वल उद्याच्या आशावादाचा कधीही अंत होऊ दिला नाही. त्यांच्या साहित्याला अभिजातता प्राप्त झाली त्याचे हे एक महत्वाचे कारण असावे. 

गद्य असो वा पद्य, शुक्ल यांचे साहित्य कायमच प्रवाही राहिले. अत्यंत सोप्या शब्दांचा वापर, वाक्यांची उपयोजना करून मूलभूत स्वरूपाचे तत्वचिंतन (तत्वचिंतन केल्याचा आव न आणतादेखील) करता येते आणि ते वाचकांना अंतर्मुख करतानाच स्फूर्तीदेखील देऊ शकते हे शुक्ल यांनी आपल्या आशयघन निर्मितीतून दाखवून दिले. त्यांच्या साहित्याच्या वाचकावर पडणाऱ्या प्रभावाच्या अंगाने अवलोकन केल्यास त्यांनी साहित्याला नवा आयाम प्राप्त करून दिला असे म्हणावे लागेल. हा प्रभाव हिंदी साहित्य किंवा हिंदी भाषकांपुरता मर्यादित न राहता तो राष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून वैश्विक झाला. लगभग जय हिंद (कविता संग्रह), नौकर कि कमीज, कूच होना बचा रहेगा, दीवार में एक खिडकी रहती थी, खिलेगा तो देखेंगे, एक छुपी जगह ही व अशी त्यांच्या पुस्तकांची शीर्षके पहिली तरी शुक्ल यांनी निर्माण केलेल्या प्रवाहाचे वेगळेपण लक्षात येते. 

लगभग जय हिंद हा त्यांचा कविता संग्रह १९७१ साली प्रसिद्ध झाला. इंदिरा गांधीच्या दुर्गा प्रतिमेने व बांगलादेश युद्धाच्या छायेत निर्माण झालेल्या राष्ट्रवादाचा तो काळ होता. अशा वेळी लगभग जय हिंद मधून राष्ट्रवाद व मानवता वाद यांत अंतर्विरोध नसतो असे प्रतिपादन करणारे शुक्ल वेगळ्या वाटा दाखवणारे जागले ठरतात. 'नौकर की कमीज' ही 1979 मध्ये आलेली त्यांची कादंबरीदेखील लक्षवेधी ठरली. यात ‘नौकर’ हा शब्द चाकरमानी या वर्गाशी निगडीत आहे. सामाजिक उतरंडीवर भाष्य करणारी ही कादंबरी आहे. या कादंबरी वर 1999 रोजी चित्रपटदेखील निर्माण झाला ज्याची पटकथा शुक्ल यांनी दिग्दर्शक मनी कौल यांच्या सोबत लिहिली होती. 

1999 मध्येच त्यांना 'दीवार में एक खिडकी रहती थी' या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. निर्जीव (दरवाजे, खिडकी, रस्ता, दगड, भिंती) व सजीव (झाडे, पक्षी, शेत) वस्तूंचा रूपक म्हणून वापर करून अमूर्त संकल्पनांना जिवंत आशय देणारी शुक्ल यांची अभिव्यक्ती थक्क करणारी असते. शांत संथ लयीत जाणाऱ्या त्यांच्या कथांमध्ये निसर्गचित्रण प्रकर्षाने येते. सरळ साधे, गरजा कमी असणारे ग्रामीण जीवन या कथांच्या केंद्रस्थानी असते. औद्योगिक क्रांती, भांडवलशाही व जागतिकीकरणाच्या रेट्याखाली निर्माण झालेल्या गोंधळग्रस्त व भौतिक सुखांच्या हव्यासी जीवनपद्धती पेक्षा निसर्गाच्या जवळ जाणारे, भाव भावनांना महत्व असणारे जीवन अधिक अर्थपूर्ण व प्रतिष्ठेचे असल्याचे सूचन या कथांमधून सातत्याने येते. शुक्ल यांनी गरिबीचे उदात्तीकरण केले असा आरोप त्यांच्या कथांवर झाला पण तो त्यांच्या कथांची वीण व अंत:प्रवाह नीट न समजून घेतल्यामुळे. त्यांनी गरीबीचे उदात्तीकरण केले नाही तर मूल्यनिष्ठ जगण्यातील सौंदर्यस्थळे तेवढी दाखवून दिली.

भारतातील साहित्यिक कलावंत यांच्या बाबतीत राजसत्तेकडून होणारी उपेक्षा शुक्ल यांच्या बाबतीतदेखील अपवाद ठरली नाही, त्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान होण्यासाठी 2025 चे वर्ष उजाडावे लागले. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे छत्तीसगड राज्यातील पहिले साहित्यिक अशी त्यांची इतिहासात नोंद होईल. त्याआधी अस्सलपणा व अभिजातता या निकषांवर दिला जाणारा PEN-Nabokov हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्याच्या क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2023 मध्ये प्राप्त झाला. या प्रतिष्ठित पुरस्कार ने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय साहित्यिक होते.

शुक्ल यांचा जन्म राजनांदगाव मध्ये झाला. हे स्वातंत्र्यपूर्वकाळातील मध्य प्रांतातले, नंतर मध्य प्रदेशातले व आता छत्तीसगढमधले जिल्ह्याचे गाव आहे. विनोद कुमार शुक्ल यांच्या बहरलेल्या साहित्यिक कारकिर्दीचे मूळ त्यांच्या प्रसिद्धिपराङ्मुख  स्वभावातदेखील शोधता येईल. ते साहित्य संमेलने, events व ल्युटांस दिल्लीतील धंदेवाईक प्रकाशकांच्या कोलाहलापासून दूर राहिले. ते एकांत प्रिय व बरेचसे अलिप्त असले तरी माणूसघाणे नव्हते. त्यांनी वाचकांचे सांगातीपण नाकारले नाही आणि त्यांच्याशी दुरावादेखील पत्करला नाही. त्यांचे साहित्य वाचकाला कायम आवाहन करणारे राहिले आणि वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले. आपल्या आयुष्याचे शेवटचे दशक तर त्यांनी बालसाहित्य निर्माण करण्यासाठी व्यतीत केले.

"साहित्यनिर्मिती हा एखादा प्रकल्प नसून जीवनाच्या दर्शनाने येणारी प्रतिक्रिया आहे", असे शुक्ल यांचे प्रतिपादन होते. “मी माझे सर्वश्रेष्ठ अजून निर्माण केलेले नाही” असे नम्रपणे म्हणणारे शुक्ल हे आदर्श ठरावेत ते त्यांच्या साहित्याप्रती असलेल्या बांधिलकीसाठी. 'साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा काय आहे याचा शोध घेणे महत्वाचे नाही' असे प्रतिपादन करणाऱ्या शुक्ल यांच्या साहित्यनिर्मितीला प्रेरणा शोधायचीच असेल तर ती त्यांच्या जीवनपटाकडे साक्षेपीपणे पाहून शोधता येईल. समकालीन वास्तवाचे चित्रण करणे, जीवनातील व्यामिश्रतेचा ठाव घेणे व मानवी अस्तित्वाशी निगडीत मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे हे साहित्याचे प्रयोजन असेल तर शुक्ल यांचे साहित्य श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही कसोट्यांवर अभिजात ठरते.

शुक्ल यांचे लेखन शांत, संयमी व निर्मळ होते. त्यात एक प्रकारचा ठहराव होता. हा ठहराव वाचकालासुद्धा कोणतीही घाई गडबड न करता शांतपणे विचार करण्यास लावणारा व त्यांच्या साहित्यातील मूल्यांशी एकरूप होण्यास उद्युक्त करणारा ठरला. त्यांनी आयुष्य जसे शांतपणे व्यतीत केले त्याच शांतपणे त्यांनी मृत्यूला जवळ केले. त्यांच्या सरकारी इतमामातील अंत्य संस्काराच्या वेळी छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पार्थिवास दिलेला खांदा व देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुणांनी लावलेली उपस्थिती ही त्यांच्या कालातीत असण्याचे रूपक म्हणून समोर येते. 


हेही वाचा - निराशेहूनही अधिक अस्वस्थ करणारी काल्पनिक आशा... - ऋचा मुळे 
(विनोद कुमार शुक्ल यांच्या 'खिलेगा तो देखेंगे' या कादंबरीचा अनुवाद - ‘फुलेल तेव्हा बघू’ या पुस्तकाचा परिचय)


साहित्यिक / कलावंत यांनी समाजात घडणाऱ्या घटनांबाबत व्यक्त व्हावे का ? राजकीय भूमिका घ्याव्यात का? हा सार्वकालिक कळीचा प्रश्न आहे व यांत कायम दोन तट पडलेले दिसतात. साहित्यिकाने भूमिका घेणे म्हणजे काय हे विनोद कुमार शुक्ल यांच्याकडून शिकता येईल. AI चा झंझावात जेव्हा येईल तेव्हा माणसाच्या माणूसपणाचे लोभसवाणे दर्शन घडवणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांचे नसणे प्रकर्षाने जाणवेल. “जो मेरे घर कभी नही आएंगे मै उनसे मिलने उनके पास चला जाउंगा “ असे लिहून ठेवणाऱ्या, जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर साहित्य व वाचक यांच्यात जिव्हाळा निर्माण करणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांचे योगदान कायम स्मरणात राहील. 

अत्यंत सोपी पण आयुष्य कवेत घेणारी वाक्ये हे विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्याचे बलस्थान. त्यांच्या नौकर कि कमीज या कादंबरीत एक सहजपणे येणारे वाक्य आहे. “घर बाहर जाने के लिये उतना नही होता, जितना लौटने के लिये...” विनोद कुमार शुक्ल कधीही परत न येण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत.. आयुष्य समृद्ध करणारे अमूल्य असे संचित मागे ठेवून! 

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com 
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Tags: dnyanpith pen award पेन पुरस्कार ज्ञानपीठ विनोद कुमार शुक्ल कविता स्मरणलेख Load More Tags

Add Comment