मराठीतील पहिले फुटबॉलविषयक ज्ञानरंजनात्मक पुस्तक

आशिष पेंडसे लिखित 'विश्व फुटबॉलचे' या पुस्तकाचा परिचय

इटालियन फुटबॉल काहीसा संथ, तर स्पॅनिश आणि पोर्तुगाल फुटबॉलची शैली युरोप-दक्षिण अमेरिका यांचा मिलाफ साधणारी. दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल अत्यंत कलात्मक; पण एकाच पेले, मॅराडोना, मेस्सी अशा खेळाडूभोवती केंद्रित झालेली. जोगा बेनिटो म्हणजे सुंदर खेळा, ही ब्राझीलची शैली; टोटल फुटबॉल ही युरोपीय आणि टिकी टाका ही यंदाच्या विजेत्यांची स्पॅनिश शैली. सौदी अरेबियाने फुटबॉल संस्कृती देशात रुजवण्यासाठी प्रीमियर लीग सुरू केली आहे. तीत रोनाल्डो, नेमार यांच्याबरोबर जागतिक दर्जाचे अन्य काही खेळाडू या लीगमधील क्लब्सकडून खेळतात. त्याशिवाय मुलामुलींचे प्रशिक्षणही चालू आहे.

महाराष्ट्रात फुटबॉल हा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. अगदी गावागावांतून तो खेळला जातो. पण आजवर फुटबॉलवर मराठीत चांगले पुस्तक आले नव्हते. ती उणीव आता आशिष पेंडसे यांनी भरून काढली आहे. त्यांचे 'विश्व फुटबॉलचे' हे पुस्तक यंदाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू असतानाच प्रकाशित झाले. विश्वचषकाच्या निमित्ताने त्यांनी फुटबॉलप्रेमींना ही भेट दिली आहे.

आशिष पेंडसे हे दीर्घकाळ फुटबॉलशी जोडलेले आहेत. शाळेत असल्यापासून सब-ज्युनियर आणि ज्युनियर गटात महाराष्ट्राच्या संघाचे उपकर्णधारपद त्यांनी भूषविले. पण नंतर दुखापतीमुळे त्यांना खेळ सोडावा लागला. त्यानंतरची दोन दशके ते 'लोकसत्ता' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चे पत्रकार होते. तेव्हा ते क्रीडा क्षेत्राविषयी बरेच लेखन करत होते; अजूनही लिहीत आहेत. फुटबॉलच्या वेडापायी 2016 साली त्यांनी स्वतः 'व्हिवा फुटबॉल मॅगझिन' नावाचे इंग्रजी नियतकालिक सुरू केले. आजही ते भारतातील एकमेव फुटबॉल मॅगझिन आहे. देशभर जिथे जिथे फुटबॉल खेळला जातो, तिथे 'व्हिवा फुटबॉल मॅगझिन' पोहोचले आहे. त्यांनी मराठीत फुटबॉलवर पुस्तक लिहावे, हे त्यामुळे नवल नाही. महाराष्ट्राच्या गावागावात हा खेळ पोहोचवायचा आहे, या उद्देशाने केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामध्ये त्यांना डॉ. सत्यजीत कदम आणि इतर अनेकांनी साथ दिली आहे.

या छोटेखानी पुस्तकाची निर्मिती अत्यंत दर्जेदार आहे. त्यासाठी ग्लेझ पेपर वापरला आहे. त्यामुळे भरपूर रंगीत फोटोंना तसेच सजावटीसाठी वापरलेल्या चित्रांना न्याय मिळाला आहे. मात्र फोटोंखाली कॅप्शन नाही. त्यामुळे फार फुटबॉल सामने न पाहणाऱ्यांना पंचाईत झाल्यासारखे वाटेल. पण विश्वचषकाच्या निमित्ताने त्यांनी वर्तमानपत्रांतील फोटो पाहिले असतील, त्यामुळे त्यांना फार वाईट वाटणार नाही. पुस्तक फुटबॉलचेच असल्यामुळे फुटबॉलच्या परिभाषेतील शब्दच जरूर तेथे वापरले आहेत. अगदी अनुक्रमणिकेलाही त्यांनी 'लाइन-अप' हा शब्द वापरला आहे. प्रकरणांच्या यादीतील पान नंबर जर्सीवर छापलेले आहेत. त्यामुळे चांगली वातावरणनिर्मिती होते.

'फुटबॉल विश्वचषक 2026 : आढावा' या प्रकरणाने पुस्तकाची सुरुवात होते. त्यानंतर फुटबॉल : तोंडओळख आणि नियम; आधुनिक वेग आणि तंत्रज्ञान; शैली : फुटबॉलच्या ब्राझील ते सौदी; फुटबॉलमधील तंत्रज्ञान आणि एआय; फुटबॉल विश्वातील प्रमुख स्पर्धा; फुटबॉलचे विविध प्रकार; फुटबॉलमधील लोकप्रिय पुरस्कार; विश्वचषक फुटबॉल - विश्वावर मोहिनी; फिफा जागतिक मानांकन; मानांकित देश; फुटबॉलचे तारे; अर्थकारणाचे, करिअरचे गोल; आघाडीच्या व्यावसायिक साखळी स्पर्धा; भारत आणि फुटबॉल : इतिहास आणि वास्तव; पेले, मॅरेडोना... दिग्गजांच्या भेटी; फुटबॉलचा महा गोल; महादेवा उपक्रम; मेसीचा आशीर्वाद; सुनील छेत्रीचा उदयोन्मुख खेळाडूंना सल्ला; गोल्स फॉर गर्ल्स; फुटबॉल पर्यटन; जागतिक फुटबॉल समिट अशी प्रकरणे आहेत. यानंतर लेखकाने फुटबॉल स्टेडियम टूरच्या काही प्रसिद्ध सफरींचा आणि इतिहासात अजरामर झालेल्या ठिकाणांचा आढावा घेतला आहे. नंतरच्या पानांत लेखकाचे नामवंतांबरोबरचे फोटो दिले आहेत.

नुकत्याच संपलेल्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा आढावा लेखकाने वेगळ्या प्रकारे घेतला आहे. 48 देशांच्या संघांचा या स्पर्धेत समावेश होता. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे जागतिक फुटबॉल महासंघाच्या मानांकनात बरेच खाली असलेले संघही सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेचा दर्जा खालावण्याची शक्यता काही जणांना वाटत होती. प्रत्यक्षात मात्र ती भीती फोल ठरली. स्पर्धा अखेरपर्यंत चुरशीची आणि दर्जेदार झाली.

स्पर्धेची प्रसिद्धी 'द लास्ट डान्स' अशी करण्यात आली होती. कारण क्रिस्तिआनो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार या जगभर चाहते असलेल्या खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक होता. पण स्पर्धा सुरू झाल्यावर केवळ त्यांच्यावरच प्रकाशझोत राहिला नाही. एम्बाप्पे-डेंबेले, केन बेलिंघम, हालांड, यमाल, मो सालाह आणि त्यांनी लगावलेले गोल चर्चेत आले. मेस्सी, रोनाल्डो, एम्बापे यांनी केलेल्या विक्रमांनी स्पर्धा वेगळ्याच उंचीवर नेली.

कितीही मार्केटिंग केले तरी संघाच्या मैदानातील प्रत्यक्ष कामगिरीची जोड आवश्यक असते. ही कामगिरीच प्रेक्षकांचे मन जिंकते. पात्रता फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या उरुग्वे, कोरिया, बोस्निया यांनी बाद फेरीत निराशा केली, तर जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिको या बड्या संघांचा अनपेक्षित पाडाव झाला. यजमान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तिन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. त्यातही अमेरिका आणि कॅनडाच्या खेळाडूंचे कौतुक वाटले. फुटबॉलची संस्कृती नसतानाही त्यांनी मारलेली मजल आणि केलेला कौशल्यपूर्ण खेळ दाद घेऊन गेला. तेथे फुटबॉलची लोकप्रियता चांगलीच वाढली.

या स्पर्धेत अधिक संघांना स्थान मिळाले होते. केप वर्दे, काँगो यांनी प्रेक्षकांना भुलवले. त्यातही उठून दिसला तो केप वर्देचा गोलकीपर व्होझिना. त्याने स्पेन, उरुग्वे, अर्जेंटिना या बलाढ्य संघांना एकही गोल करू दिला नाही; त्याचा बचाव इतका अभेद्य होता. सोशल मीडियातील त्याचे फॉलोअर्स 40 हजारांवरून एकदम 60 लाख झाले. आफ्रिकेतील नऊ संघ स्पर्धेत होते आणि त्यातील आठ संघांनी बाद फेरी गाठली. हा एक विक्रमच. त्यातही मोरोक्को आणि इजिप्त लक्षवेधी ठरले.

बाद फेरीत यंदा 40 टक्क्यांपेक्षा जास्त गोल 75 व्या मिनिटानंतर झाले आणि 60 पेक्षा जास्त गोल 90 मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळात करण्यात आले. पाच बदली खेळाडू घेण्याची सोय झाल्याने अर्धा संघ नव्याने मैदानात उतरतो. ब्राझील-नॉर्वे, स्पेन-पोर्तुगाल, अर्जेंटिना-केप वर्दे असे सामने स्मरणीय झाले. या स्पर्धेत प्रथमच हिडिओ असिस्टंट रेफ्री म्हणजे व्हीएआरचा उपयोग करण्यात आला. निर्णयप्रक्रिया वेगाने होऊन त्यात अचूकपणा यावा, हा हेतू होता. पण त्याचा लाभ घेऊन निर्णय देताना पंचांच्या भूमिकेत सातत्य राहिले नाही.

स्पर्धेत भारताचा समावेश झाला नव्हता. तरी भारतातील प्रेक्षकांना ला लिगा, बुंडेस लिगा आणि सौदी प्रीमियर लीग आवडतात. त्यांना खेळाडूंची चांगली माहिती असते. यंदाचे सामने पाहण्यासाठी मध्यरात्रीनंतर जागावे लागत होते. पण हे 104 सामने पाहून भारताने काय साध्य केले, हा प्रश्न आहे. युवा पिढीला फुटबॉल अधिक प्रिय आहे, शिवाय प्रशिक्षणाचे ग्रासरूट प्रकल्प आहेत. त्यांच्या जोडीला मैदानाबाहेर क्रीडासंस्कृती रुजली तर भारत स्पोर्टस नेशन बनेल.

विविध संघांच्या मैदानावरील रचना वेगवेगळ्या असतात, हे लेखकाने उदाहरणे देऊन सांगितले आहे. फुटबॉलसाठी अमेरिकन विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करून निदर्शनेही केली. त्यांना सामने किमान टी.व्ही.वर पाहायचे होते. या खेळाची लोकप्रियता अशी की फिफाचे म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघाचे सदस्य देश संयुक्त राष्ट्रांपेक्षा-यूनोच्या सदस्यांपेक्षा जास्त आहेत.

फुटबॉलच्या मैदानाचा आकार, गोलपोस्टचा आकार, आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कालावधी देऊन लेखक सांगतो की, सामन्याची वेळ मोजताना प्रत्यक्ष खेळ, दुखापत वा अन्य कारणांनी खेळ थांबला तर वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी त्याची भरपाई केली जाते. या भरपाईच्या वेळेला 'इंज्युरी टाइम' असे म्हणतात. सामन्यात बरोबरी झाली तर अतिरिक्त खेळाची तरतूद असते. त्यात 15 मिनिटांची दोन सत्रे असतात. त्यामुळे सामना 90 अधिक 30 म्हणजे 120 मिनिटांचा होतो. त्यानंतरही बरोबरी झाली तर पेनल्टी किकचा अवलंब केला जातो.

फुटबॉलचा सामना 90 मिनिटांचाच का, याविषयीचा किस्सा मजेदार आहे. तो असाः फुटबॉलचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. (पण तो चीनमध्ये झाला असा दावा चिनी संस्कृतीचे अध्यापक करतात.) त्या काळी इंग्लिश राजे, उमराव असे साहेबलोक चिरूट ओढत असत. सर्वसाधारणपणे चिरूट साधारण 45 मिनिटे चालत असे. त्यानंतर थोडी न्याहारी करून फ्रेश होऊन दुसरा चिरूट शिलगावेपर्यंत 15 मिनिटांचा कालावधी लागत असे. (ही दोन सत्रांतील विश्रांतीची वेळ.) मग दुसरा चिरूट म्हणून दुसरे सत्रही 45 मिनिटांचे. अशा प्रकारे सामन्याच्या आणि मध्यंतराच्या वेळेचा नियम आला.

खेळाडू बदली करण्याच्या नियमाबाबतही माहिती दिली आहे आणि बदली खेळाडूंच्या संख्येत वाढ कशी होत गेली, हेही सांगितले आहे. या बदली केलेल्या खेळाडूने विजयी गोल केला तर त्या खेळाडूला 'सुपर सब' असे म्हणतात.

यानंतर फुटबॉलचे नियम आणि त्यात बदल कसे झाले, याची माहिती देण्यात आली आहे. ऑफ साइड नियम शिथील करण्यात आले. बदली खेळाडूला 1958 मध्ये परवानगी देण्यात आली; ती केवळ दुखापतग्रस्त खेळाडूसाठीच मर्यादित होती. पण आता खेळाडू केव्हाही बदलले जातात आणि एक-दोनपासून ती संख्या आता पाचपर्यंत गेली आहे. विश्वचषक स्पर्धेत बदली खेळाडू 1970 मध्ये खेळू लागले.

धसमुसळेपणे खेळणाऱ्या खेळाडूंना लाल, पिवळे कार्ड दाखवण्यात येते. पिवळे कार्ड म्हणजे नियमबाह्य खेळ केल्याबद्दलची ताकीद आणि त्यानंतरही पुन्हा तसाच नियमबाह्य खेळ केला तर लाल कार्ड म्हणजे उर्वरित वेळेसाठी हकालपट्टी. अशा खेळाडूच्या जागी बदली खेळाडू घेता येत नाही. 1970 पासूनच पेनल्टी शूटआउटचा अवलंब सुरू करण्यात आला.

गोलकीपरला चेंडू हाताळायला देणाऱ्या नियमांमध्येही कसे बदल झाले, ते आपल्याला कळते. तसेच ऑफसाइड, बॅकपास नियमांतही बदल केले गेले. गोललाइन आणि पोल येथे आता संवेदक बसविण्यात आले. त्यामुळे पंचांच्या हातातील घड्याळात गोल झाला आहे की नाही, हे कळते. व्हीएआरची, म्हणजे व्हीडिओ असिस्टेड रेफ्रीची, सुरुवात 2018 मध्ये झाली. पंचांचा गणवेशही पूर्वी काळ्या रंगाचा असायचा; तो 1990 च्या दशकापासून रंगीत झाला. त्यामुळे घरात बसून सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाडू आणि अधिकारी यांच्यात फरक करणे सोपे झाले.

खेळाडूंची शरीरयष्टी, खेळण्याची पद्धत, रणनीती, प्रतिस्पर्ध्याचे डावपेच अशा घटकांमुळे खेळण्याची शैली बदलते. युरोपातील खेळाडू आडदांड. त्यामुळे जोरकस धाव घेत मुसंड्या मारून, हवेतून तिरकस पास देऊन, चेंडू हेडने-डोक्याने गोल करण्याची शैली विकसित झाली. तेथील खेळ शिस्तबद्ध असून तासनतास सराव करून खेळाडू ती शैली आत्मसात करतात. व्यक्तिगत कौशल्यापेक्षा सांघिक खेळाला महत्त्व असते. ही शैली वेगवान धाव, अचूक पासेस आणि चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष या प्रकारची असते.

इटालियन फुटबॉल काहीसा संथ, तर स्पॅनिश आणि पोर्तुगाल फुटबॉलची शैली युरोप-दक्षिण अमेरिका यांचा मिलाफ साधणारी. दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल अत्यंत कलात्मक; पण एकाच पेले, मॅराडोना, मेस्सी अशा खेळाडूभोवती केंद्रित झालेली. जोगा बेनिटो म्हणजे सुंदर खेळा, ही ब्राझीलची शैली; टोटल फुटबॉल ही युरोपीय आणि टिकी टाका ही यंदाच्या विजेत्यांची स्पॅनिश शैली.

सौदी अरेबियाने फुटबॉल संस्कृती देशात रुजवण्यासाठी प्रीमियर लीग सुरू केली आहे. तीत रोनाल्डो, नेमार यांच्याबरोबर जागतिक दर्जाचे अन्य काही खेळाडू या लीगमधील क्लब्सकडून खेळतात. त्याशिवाय मुलामुलींचे प्रशिक्षणही चालू आहे. विश्वचषक आयोजनाच्या तयारीसाठी सौदी अरेबिया स्टेडियम बनवत आहे आणि त्याबरोबरच प्रेक्षकांच्या सुविधांचीही काळजी घेणार आहे.

खेळांमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. फुटबॉलही त्याला अपवाद नाही. व्हीडिओ असिस्टेड रेफरी आणि गोललाइन टेक्नॉलॉजी उपयोगात आणली जात आहे. याशिवाय सेमी ऑटोमेटेड ऑफसाइड टेक्नॉलॉजी आणि चेंडूमध्ये विशेष तंत्रज्ञान वापरले जात आहे. इतरही अनेक प्रकारची उपकरणे वापरली जात आहेत. ई-गेमिंगही आहे. त्याची फिफा ई विश्वचषक स्पर्धाही होते.


हेही ऐका : ऑडिओ : ऑर्जिनचे फुटबॉल प्रेम | चित्रपट - फोरपा / द कप ('साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख) - निलेश मोडक


विश्वचषक स्पर्धेत मैदानावर डिजिटल जाळ्याच्या माध्यमातून 30 हजारांवर उपकरणे तैनात होती. अनेक किचकट प्रश्नांची उत्तरे त्यामुळे मिळत गेली. मात्र यामुळे विश्वचषकाच्या मूळ गाभ्याला म्हणजे खेळाचा आनंद, खेळाडू आणि प्रेक्षकांतील अतूट नाते भविष्यात आभासी व तांत्रिक होऊ नये, अशी लेखकाची इच्छा आहे.

फुटबॉलचे फुटसाल, बीच सॉकर, इनडोअर सॉकर, फ्रीस्टाइल फुटबॉल, फुटव्हॉली, टेबल फुटबॉल, फूटव्हॉली आणि टेकबॉल, दृष्टिहीनांचा फुटबॉल, पॉवरचेअर फुटबॉल, स्ट्रीट सॉकर, बेघर फुटबॉल यांबाबतही लेखकाने माहिती दिली आहे. पाठोपाठ विविध पुरस्कारांबाबतही तो सांगतो. उदा. विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, गोल्ड बूट, गोल्डन ग्लोव्ह याबरोबर 21 वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडू असे पुरस्कार देण्यात येतात. फिफाही वर्षअखेर बरेच पुरस्कार देतो. याबरोबर इतर पुरस्कारांची माहिती आहे.

विश्वचषक स्पर्धेचा इतिहास लेखक देतो. त्याबरोबरच जागतिक मानांकन आणि मानांकित देश यांबाबत सांगतो. नंतर फुटबॉलमधील ताऱ्यांबाबत माहिती देतो. या खेळाच्या अर्थकारणाबाबतही सांगताना आकडेवारी दिली आहे. फुटबॉलमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत, त्याची यादी आहे. महत्त्वाच्या व्यावसायिक स्पर्धांची थोडक्यात माहिती आहे. त्यांच्याबरोबरच या स्पर्धांचे जगभर प्रक्षेपण केल्याचा मोठा फायदा होत आहे.

भारतातील फुटबॉलचा इतिहास आणि वास्तवाचे वर्णन आहे. 1948, 52, 57 आणि 60 च्या ऑलिंपिकमध्ये भारत सहभागी होता, हे आपल्याला कळते. 1950 मध्ये विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळाला तरी भारत खेळला नाही, कारण खेळाडू अनवाणी खेळायचे आणि स्पर्धेत बूट घालून खेळावे लागे. मर्डेका स्पर्धेतील भारताच्या यशाबाबत माहिती होते.

देशातील प्रमुख संघटना आणि स्पर्धांची माहिती यात आहे. भारतीय फुटबॉल संघाची स्थापना 1937 साली झाली. त्याच्यातर्फे ड्युरँड कप, रोव्हर्स कप (2001 पर्यंत), एनएफएल, एआयएफएफ, इंडियन सुपर लीग आणि एआयएफएफ सुपर कप, संतोष ट्राफी, सुब्रोतो कप (1960 पासून दरवर्षी), तसेच नेहरू करंडक आंतरराष्ट्रीय स्पर्धा (1982-2012), रोव्हर्स कप (2002 पर्यंत) या स्पर्धांची माहिती पुस्तकात आहे.

महिलांच्या इंडियन वूमेन्स लीग, राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा यांची माहिती मिळते. पद्मश्रीने सन्मानित झालेल्या फुटबॉलपटूंची, अर्जुन पुरस्कार विजेत्यांची यादी, तसेच द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या प्रशिक्षकांची नोंदही केली आहे. पेलेची तसेच मॅराडोना यांची भारतभेट आणि लेखक त्यांना भेटल्याची नोंदही घेण्यात आली आहे. विश्वचषकामध्ये अद्याप भारत का नाही, हे खुलासेवार सांगितले आहे.

महाराष्ट्र आणि फुटबॉल यांच्या अतूट नात्याची माहिती लेखक देतो. त्याबरोबरच महाराष्ट्राने संतोष चषक चार वेळा जिंकला तर उपविजेतेपद १२ वेळा मिळवले. राज्यातील नामवंत प्रशिक्षकांबाबतही लिहिले आहे.

खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी खेळाडूंच्या जगभरच्या विविध संघटना प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्राने आता महा-देवा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेसी याने या उपक्रमाला प्रारंभ केल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळाली आहे. खेळाडूंना सुनील छेत्री सल्ला देतो की चांगले खा, चांगला सराव करा, चांगले खेळा; बाकी सारे तुमचे आई-वडील आणि प्रशिक्षकांवर सोपवा. ते नक्कीच तुमच्या हिताचे निर्णय घेतील. दबाव पेलण्यासाठी सज्ज राहा. तरुण वयात मनावर ताण घेऊ नका.

महिला फुटबॉलची भरारी 'गोल फॉर गर्ल्स' या प्रकरणात सांगितली आहे. ऐतिहासिक परंपरेत 1890च्या दशकातच महिलांचे अनौपचारिक सामने होत होते. धर्मादाय कार्यासाठी निधी गोळा करण्यासाठी हे सामने होत. प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला असे. पण 1921 मध्ये इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने त्यांच्याशी संलग्न असलेल्या मैदानांवर महिलांच्या सामन्यांना बंदी घातली. ही बंदी 50 वर्षे चालली. नंतर फिफाने हस्तक्षेप करून महिला फुटबॉलला जागतिक मान्यता मिळवून दिली.

केवळ मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपासून आता महिला फुटबॉल व्यावसायिक महाशक्ती बनला आहे. 1991 मध्ये पहिला महिला विश्वचषक फिफाने चीनमध्ये आयोजित केला. अमेरिकेत 1999 मध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला रोझ बाऊल स्टेडियमवर 90 हजार प्रेक्षक उपस्थित होते. आता महिलांच्या स्पर्धांना व्यावसायिक रूप आले आहे. भारतातही 1970 मध्ये सुरू झालेल्या महिला फुटबॉलमध्ये वेगाने प्रगती झाली आहे. विविध टप्प्यांमध्ये विकास कसा झाला, हे लेखकाने सांगितले आहे.

फुटबॉल पर्यटनाची माहितीही पुस्तकात आहे. या पर्यटकांसाठी महत्त्वाची टिपही दिली आहे. विविध ठिकाणच्या प्रमुख तेरा फुटबॉल मैदानांची नावे देऊन त्यांचे वर्णनही केले आहे. वर्ल्ड फुटबॉल समिटची माहिती दिली आहे.

थोड्या पानांमध्ये जास्तीत जास्त माहिती दिल्याने फुटबॉल विश्वाची सफर घडवणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक अवश्य वाचण्याजोगे आहे. त्याबद्दल लेखकाला धन्यवादच दिले पाहिजे. तरीही आता सविस्तर माहिती मिळायला हवी, अशी वाचकांची मागणी असेल. तुम्हाला फुटबॉलचे वेड असले वा नसले तरीही हे पुस्तक क्रीडाप्रेमींनी वाचायलाच हवे!

- आ. श्री. केतकर.
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)


विश्व फुटबॉलचे
लेखक : आशिष पेंडसे
प्रकाशक : आशिष पेंडसे; 12, गोवर्धन सोसायटी,
पद्मावती, पुणे 411009.
पाने: 125, किंमत : 250 रुपये.


 

Tags: fifa fooball soccer fifaworld cup messi mbappe ronaldo ब्राझील नॉर्वे स्पेन पोर्तुगाल अर्जेंटिना केप वर्दे america मेसी रोनाल्डो Load More Tags

Add Comment