अमेरिकन स्पर्धेत नवे विजेते : रिबाकिना-झ्वेरेव

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 2026 - एक आढावा

या वर्षी टेनिस ग्रँडस्लॅम मालिकेतील स्पर्धांत, विशेषतः खुल्या फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल लागले होते. अमेरिकन खुली स्पर्धाही याला अपवाद नव्हती. या स्पर्धेत अनेकांची निराशा झाली. अल्काराझला येथे तिसरे विजेतेपद मिळवायचे होते, पण त्याला हुलकावणी मिळाली. सबालेंकालाही या स्पर्धेत लागोपाठ तिसरे विजेतेपद मिळवायचे होते, पण रिबाकिनाने तिला ते यश मिळू दिले नाही. जोकोविचही या मालिकेतील स्पर्धांत 25 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याला तर पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. शेल्टन आणि  कोको गॉफलाही यश मिळाले नाही.

या वर्षीच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांमध्ये झ्वेरेव तर महिलांमध्ये रिबाकिना अजिंक्य ठरले. या जेतेपदाबरोबर दोघेही आता जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. अंतिम सामन्यात जर्मनीच्या झ्वेरेवने अमेरिकेच्या बेन शेल्टनवर 6-3; 7-6 (7-2); 5-7; 6-2 अशी मात केली, तर कझाकस्तानच्या रिबाकिनाने बेलारुसच्या अरिना सबालेंकाला 6-4; 5-7; 6-2 असे पराभूत करून विजेतेपद मिळवले.

सबालेंका क्रमवारीत 99 आठवडे पहिल्या क्रमांकावर होती. तो क्रमांक आता रिबाकिनाने पटकावला आहे. सबालेंकाला या स्पर्धेत लागोपाठ तिसऱ्यांदा जेतेपद मिळवायचे होते. पण तिच्या पदरी निराशाच पडली. टेनिस ग्रँडस्लॅम मालिकेतील स्पर्धांमध्ये या वर्षी तिला एकही विजेतेपद मिळाले नाही. 2022 नंतर प्रथमच तिला असे अपयश आले. अंतिम सामन्यात रिबाकिनाच्या सर्वांगिण खेळापुढे तिचे काही चालले नाही. पराजयानंतर तिला आपली निराशा लपवता आली नाही. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच गेममध्ये तिने रिबाकिनाला ब्रेकपॉइंट बहाल केला. त्यावेळी उद्वेगाने तिने रॅकेट कोर्टवर आपटले व नवी रॅकेट घेतली. निर्णायक सेटमध्येही रिबाकिनाने एक बिनतोड सर्व्हिस करून सामना जिंकला, तेव्हाही तिने रॅकेट जोरात आपटून मोडून टाकली आणि त्यानंतर रिबाकिनाचे अभिनंदन केले. हरल्यानंतर भावनांवर ताबा ठेवणे अवघड असते, असे ती म्हणाली. यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही रिबाकिनाने तिला तीन सेटमध्ये हरवले होते. फ्रेंच खुल्या स्पर्धेत ती डायना श्नायडरकडून हरली होती, तर विम्बल्डनवर चौथ्या फेरीत ओसाकाने तिला पराभूत केले होते.

दोन तास एकवीस मिनिटे चाललेला हा सामना जिंकून रिबाकिनाने ग्रँडस्लॅम मालिकेतील तिसरे विजेतेपद मिळवले. ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि आता अमेरिकन स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. तरी फ्रेंच स्पर्धेत मात्र तिला अद्याप जेतेपद मिळालेले नाही. ती स्पर्धा जिंकल्यावर तिचे करिअर ग्रँड स्लॅम पुरे होईल. या विजयाबाबत बोलायला आत्ता मला त्याचे वर्णन करायला शब्दच सापडत नाहीयेत, असे तिने सांगितले. कर्बर (2016) आणि सबालेंका (2024) यांच्यानंतर एकाच वर्षी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन विजेतेपद मिळवणारी ती तिसरीच महिला खेळाडू आहे.

अंतिम सामना तीन सेटचाच झाला तरी त्यावर रिबाकिनाचेच वर्चस्व जाणवत होते. तिच्या फटक्यांचा प्रभाव चांगला होता. त्यामुळेच पहिल्या सेटमध्ये तिच्या केवळ 27 टक्के सर्व्हिस बरोबर होत्या, तरी तिने ती उणीव फटक्यांच्या मदतीने भरून काढली. सेटच्या सुरुवातीलाच तिने 3-2 अशी आघाडी घेतली आणि नंतर तो सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिची पहिली सर्व्हिस सुधारली, पण त्याचा फायदा तिला उठवता आला नाही. दोन वेळा सबालेंकाची सर्व्हिस भेदण्याची संधी तिने गमावली. तरीही सबालेंकाने दोन सेट पॉइंट वाचवून सामना 5-5 अशा बरोबरीत आणला. त्यानंतर रिबाकिनाची सर्व्हिस भेदून तिने दुसरा सेट 7-5 असा जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीलाच सबालेंकाची सर्व्हिस भेदण्यात रिबाकिनाने यश मिळवले. नंतर जोरदार आणि अचूक फटक्यांच्या मदतीने तिने 5-2 अशी आघाडी मिळवली. सबालेंकाने नंतरचा गेम जिंकून ती 5-3 अशी केली. मात्र नवव्या गेममध्ये रिबाकिनाने आपला सर्व्हिस गेम जिंकला आणि अखेर एक बिनतोड सर्व्हिस करून सामना जिंकला. तिने एकूण 12 बिनतोड सर्व्हिस केल्या. आधी चौथ्या फेरीत तिने ओसाकाला पराभूत केले होते आणि एकही सेट न गमावता उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. उपान्त्य फेरीत तिने कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणले होते. अव्वल क्रमांकाच्या खेळाडूला हरवणारी सेरेना विल्यम्स (2012) नंतरची ती पहिलीच खेळाडू ठरली. अंतिम सामन्यात रॅलीजवर तिचेच नियंत्रण होते. दुसरा सेट जिंकल्यानंतर सबालेंकाला ती लय राखता आली नाही. रिबाकिना दडपण न घेता खेळत होती. त्यामुळेच निर्णायक सेटमध्ये तिने जोरदार सुरुवात करून आघाडी मिळवली आणि ती कायम राखत विजेतेपद मिळवले. सबालेंकाच्या खेळाची लय बिघडवून टाकण्यात तिने यश मिळवले होते आणि त्यामुळे तिच्यावर सतत दडपण ठेवले होते. एकाच वर्षी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच दोन्ही खेळाडू असण्याची ही दुसरीच वेळ होती.

अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी)

पुरुषांच्या अंतिम सामन्यात पहिले सीडिंग मिळालेल्या झ्वेरेवने आठव्या सीडेड शेल्टनवर तीन तास तेहेतीस मिनिटे चाललेल्या चार सेटच्या सामन्यात मात केली. या वर्षीच्या खुल्या फ्रेंच स्पर्धेत ग्रँडस्लॅम मालिकेतील पहिलेच विजेतेपद मिळवल्यानंतर झ्वेरेवचा आत्मविश्वास वाढला आहे. आपणही जिंकू शकतो, हे आता त्याला कळले आहे. जर्मनीच्या बोरिस बेकरने अमेरिकन खुली स्पर्धा 1989 मध्ये जिंकली होती. त्यानंतर या स्पर्धेत असे यश मिळवणारा झ्वेरेव हा पहिलाच जर्मन खेळाडू आहे. 2020 साली याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झ्वेरेव थिएमकडून पराभूत झाला होता.

अंतिम सामन्याचा शेवट आश्चर्यकारक होता. झ्वेरेवची सर्व्हिस परतवताना शेल्टनचा फटका कोर्टबाहेर गेला आणि सामना संपला. पण झ्वेरेव गुण मोजत नव्हता. त्यामुळे सामना संपल्याचे त्याला उमगलेच नाही. तो पुढची सर्व्हिस करण्याच्या तयारीत होता. प्रेक्षकांनाही काय चालले आहे ते समजत नव्हते. शेवटी झ्वेरेवला त्याच्या प्रशिक्षकाने आणि जर्मन पाठिराख्यांनी तू अमेरिकन स्पर्धेचा विजेता झाला आहेस, असे सांगितले. तेव्हा त्याला वास्तवाची जाणीव झाली.

खुल्या फ्रेंच स्पर्धेतील विजयानंतर झ्वेरेवच्या खेळात चांगलाच बदल झाला आहे. तो अधिक आत्मविश्वासाने खेळत आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत त्याने उपान्त्य फेरी गाठली होती, पण तेथेच त्याची आगेकूच थांबली होती. फ्रेंच स्पर्धेत ग्रँडस्लॅम मालिकेतील आपले पहिलेच विजेतेपद संपादन केल्यानंतर त्याने विम्बल्डनची अंतिम फेरीही गाठली, पण तो सिनरकडून पराभूत झाला होता.

या स्पर्धेत अंतिम फेरीत त्याने अल्काराझला पराभूत करणाऱ्या शेल्टनच्या जोरदार फटक्यांचा यशस्वी मुकाबला केला. ते फटके परतवताना त्याचा अचूकपणा वाखाणण्याजोगा होता. रॅलीज कितीही लांबल्या तरी त्याने त्यांच्यावर ताबा ठेवला. शेल्टनने तिसरा सेट जिंकून सामना लांबवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा दबाव झ्वेरेववर आला नाही. प्रभावी सर्व्हिस आणि आक्रमक खेळाच्या जोरावर शेल्टनने तिसरा सेट जिंकला होता. पण तो जोर त्याला कायम राखता आला नाही. चौथ्या सेटमध्ये त्याचा सर्व्हिस गेम सुरुवातीला नीट झाला नाही आणि झ्वेरेवने त्याची सर्व्हिस भेदून आघाडी मिळवली व ती कायम राखली.

या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांतील सामन्यांत शेल्टनला पात्रता स्पर्धेतून आलेल्या खेळाडूंबरोबर 5 सेटपर्यंत झुंजावे लागले होते. पण नंतर त्याचा खेळ उंचावला आणि त्याने उपान्त्य फेरी गाठली. तेथे त्याने टिअफोवर मात केली. अंतिम सामन्यापर्यंत झ्वेरेवला पहिल्या 20 क्रमांकांच्या खेळाडूंपैकी कोणीच प्रतिस्पर्धी नव्हता, तर शेल्टनला अल्काराझ, टिअफोसारख्या खेळाडूंशी झुंजावे लागले होते. या सामन्यापूर्वी झ्वेरेव आणि शेल्टन यांच्या 5 लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व झ्वेरेवनेच जिंकल्या होत्या. त्याचा आत्मविश्वास वाढण्याचे हेही एक कारण होते.

शेल्टनने प्रथमच या स्पर्धा मालिकेत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा असूनदेखील तो दबावाखाली होता. त्याची सुरुवात अडखळती झाली असावी. त्याचाच फायदा झ्वेरेवने उठवला. पहिल्याच गेममध्ये शेल्टनने गेम पॉइंट असताना सर्व्हिसची दुहेरी चूक केली. तो गेम जिंकल्यामुळे झ्वेरेवचा उत्साह वाढला. शेल्टनप्रमाणेच झ्वेरेवची सर्व्हिस वेगवान आहे. तिच्या जोडीला शेल्टनचे बॅकहँडचे परतीचे फटके दुबळे होते. त्याचा लाभ झ्वेरेवने उठवला आणि पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये शेल्टनने अशी संधी दिली नाही. सेट टायब्रेकरवर गेला. तेथे झ्वेरेवने 7-2 अशी सरशी मिळवून तो सेट जिंकला आणि सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये शेल्टनला सूर गवसला. त्याने झ्वेरेवची सर्व्हिस भेदण्यात प्रथमच यश मिळवले आणि तो सेट 7-5 असा जिंकला. सामना पाच सेटवर जाणार असे वाटू लागले. पण चौथ्या सेटमध्ये शेल्टनला आपल्या जोरदार फोरहँड फटक्यांचा वापर करण्यात यश येत नव्हते. तेच त्याला महागात पडले आणि त्याने तो सेट 6-2 असा गमावला.

कार्लॉस अल्काराझ (स्पेन)

या स्पर्धेत अनेकांची निराशा झाली. अल्काराझला येथे तिसरे विजेतेपद मिळवायचे होते, पण त्याला हुलकावणी मिळाली. सबालेंकालाही या स्पर्धेत लागोपाठ तिसरे विजेतेपद मिळवायचे होते, पण रिबाकिनाने तिला ते यश मिळू दिले नाही. जोकोविचही या मालिकेतील स्पर्धांत 25 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याला तर पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. शेल्टन आणि  कोको गॉफलाही यश मिळाले नाही.

या वर्षी टेनिस ग्रँडस्लॅम मालिकेतील स्पर्धांत, विशेषतः खुल्या फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल लागले होते. अमेरिकन खुली स्पर्धाही याला अपवाद नव्हती. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अर्जेंटिनाच्या मारिआनो नोव्होने चौथे सीडिंग मिळालेल्या आणि या मालिकेत 25 वे विजेतेपद मिळवण्यासाठी उतरलेल्या नोवाक जोकोविचला पराभूत केले. 39 वर्षांचा जोकोविच सहज हार मानत नाही. नोव्होनेने पहिला सेट जिंकला, पण त्यानंतर जोकोविचने दोन सेट जिंकून सामन्यात रंगत निर्माण केली. अखेर नोव्होनेने पुढचे दोन सेट जिंकून जोकोविचच्या अपेक्षांवर पाणी फिरवले.

याच फेरीत वयाच्या 40व्या वर्षी खेळणारा आणि सामना जिंकणारा गेल मॉन्फिल्स हा कॉनर्सनंतरचा पहिलाच खेळाडू ठरला. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला हार पत्करावी लागली आणि त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. वावरिंकानेही पहिल्या फेरीत हरल्यावर निवृत्ती जाहीर केली होती. चौथ्या फेरीत अकराव्या सीडिंगच्या टिअफोने सातव्या सीडिंगच्या मेदवेदेवला तीन सेटमध्ये हरवले.

चौथ्या फेरीतच आठवे सीडिंग मिळालेल्या बेन शेल्टनने दुसऱ्या सीडेड कार्लोस अल्काराझला अतिशय रंगलेल्या सामन्यात 5-7; 6-3; 6-1; 1-6 आणि 7-6 (10-8) असे हरवले. दोघांनीही उच्च दर्जाचा खेळ दाखवला. मनगटाच्या दुखापतीनंतर अल्काराझ 5 महिन्यांनी प्रथमच खेळत होता. तरी कोर्टवर उतरल्यानंतर त्याने नेहमीच्याच सफाईने चौथी फेरी गाठली होती. अतिशय वेगवान सर्व्हिस करणाऱ्या शेल्टनला तो सहज सामोरा जात होता. या सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. खेळाचा दर्जा अंतिम सामन्याचाच होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेल्टनच्या देशातलीच स्पर्धा असल्याने प्रेक्षकांचा त्याला चांगला पाठिंबा होता, तरी अल्काराझच्या कौशल्यालाही ते दाद देत होते.

महिला एकेरीत पहिल्या दोन फेऱ्यांत काही पडझड झाली नाही. ती नंतरच्या फेऱ्यांत दिसली. तिसऱ्या फेरीत झेंगने मॅडिसन केजला 1-6; 7-6 (7-3); 7-5 असे हरवले. पोटोपोवाने 10व्या सीडेड अनिसिमोवावर मात केली, तर नवारोने सातव्या सीडेड मुचोवावर विजय मिळवला. चौथ्या फेरीत झेंगने स्विआटेकला 7-5; 6-3 असे हरवून खळबळ माजवली. नवारोने कालिन्स्कायावर विजय मिळवला. उपान्त्यपूर्व फेरीत झेंगची आगेकूच रिबाकिनाने रोखली. याच फेरीत कोको गॉफने अँड्रीवाला, सबालेंकाने नोवोस्कोला आणि पेगुलाने नवारोचे आव्हान संपुष्टात आणले.

उपान्त्य फेरीत मात्र कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या दोघींनाही पराभवाला सामोरे जावे लागले. रिबाकिनाने गॉफवर 3-6; 6-4; 6-4 असा तर सबालेंकाने पेगुलावर 7-5; 6-2 असा विजय मिळवला. गॉफने पहिल्या सेटमध्ये चांगला खेळ केला, पण नंतर तिची सामन्यावरची पकड सुटली. रिबाकिनाच्या जोरदार फटक्यांपुढे तिची मात्रा चालली नाही. त्यानंतर प्रथम सीडेड अरिना सबालेंका आणि दुसरे सीडिंग मिळालेली एलेना रिबाकिना अंतिम फेरीत पोहोचल्या.
कुमार गटात भारताचा अर्णव विजय पापरकर सुरुवातीच्या सामन्यातच अँड्र्यू जॉनकडून 4-6; 1-6 असा पराभूत झाला होता.

अंतिम विजेते : 
पुरुष एकेरी : अलेक्झांडर झ्वेरेव 
महिला एकेरी : एलेना रिबाकिना 
पुरुष दुहेरी : स्कुप्सी आणि हॅरिसन 
महिला दुहेरी : सिनिआकोवा आणि टाऊनसेंड 
मिश्र दुहेरी : मुचोवा आणि मेन्सिक
मुलगे एकेरी : मार्सेल लेटॅक 
मुली एकेरी : सुन क्षिन्रान

- आ. श्री. केतकर.
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: टेनिस अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा अमेरिकन ओपन रिबाकिना सबालेंका झ्वेरेव अल्काराझ शेल्टन जोकोविच Load More Tags

Add Comment