''तुम्ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येणार आहात का?" असा प्रश्न नव्वदच्या दशकातील विचारी व उत्तम अभिनेत्यांना हमखास विचारला जात असे, नाना पाटेकर हा त्यातला एक. त्याने 1991 मध्ये 'प्रहार' हा सिनेमा दिग्दर्शित केला, त्याची पटकथाही त्यानेच लिहिली होती. त्यातील प्रमुख भूमिकेची तयारी करण्यासाठी तो सीमेवरील जवानांसोबत राहतोय, प्रशिक्षण घेतोय अशा बातम्या त्यावेळी मोठ्या कौतुकाचा विषय झाल्या होत्या. आणि त्या सिनेमात डिंपल कपाडिया व माधुरी दीक्षित या आघाडीच्या अभिनेत्री मेकअपशिवाय दिसणार आहेत, याचेही कुतूहल निर्माण केले गेले होते. सुधाकर बोकाडे यांची निर्मिती असलेला तो सिनेमा व्यावसायिक दृष्टीनेही प्रचंड यशस्वी झाला आणि राष्ट्रीय स्तरावर नानाची वेगळीच क्रेझ निर्माण झाली. तरीही, त्यानंतर नानाने कोणताच सिनेमा दिग्दर्शित केला नाही. अशा या नानाचे 8 ऑक्टोबरला निधन झाले, त्या निमित्ताने त्या सिनेमावर नव्याने दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख.
8 ऑक्टोबरला नाना गेला. एक वादळ अचानक शांत झाले. नाना एक मनस्वी कलावंत होता. त्याने विविध भूमिका केल्या, त्याला अभिनयासाठी पुरस्कारदेखील मिळाले, त्यामुळे तो खास करून अभिनेता म्हणून लक्षात राहतो पण त्यामुळे त्याच्यातील दिग्दर्शक अजाणतेपणी विसरण्याचा धोका संभवतो. नानाने त्याच्या कारकिर्दीत एकमेव चित्रपट दिग्दर्शित केला. तो चित्रपट म्हणजे 90 च्या दशकातील ‘प्रहार’ हा सर्वार्थाने मैलाचा दगड ठरलेला चित्रपट.
जेष्ठ चित्रपट समीक्षक सुहास किर्लोस्कर यांच्या घरी हा चित्रपट पुन्हा पाहण्याच्या योग आला. या चित्रपटावर भाष्य करणे म्हणजे केवळ नानाच स्मरण नाही तर समाजाविषयी असलेल्या बांधिलकीच्या, त्याने कलेच्या माध्यमातून जीवनविषयक मूल्यांना सच्चेपणाने भिडण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे विवेचन आहे. चित्रपटाच्या यशस्वितेचे जे काही निकष आहेत. त्यातील महत्वाचा निकष म्हणजे प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणे व काळाच्या पटावर सुसंगत ठरणे हे होय. ‘प्रहार’ चित्रपटात दाखवलेली परिस्थिती व आजची परिस्थिती यांत साम्य आहे का, असलं तर काय, याचा विचार प्रत्येकाने डोळसपणे केला पाहिजे.
प्रहारचे मध्यवर्ती कथासूत्र काही काळ बाजूला ठेवून याचा विचार केला पाहिजे की या चित्रपटाने कोणत्या परिस्थितीवर भाष्य केले? व्यवस्थांचे कोलमडणे, नियमांची पायमल्ली, मध्यमवर्गीयांचे बोटचेपेपण, शोषण, तरुण वर्गात पसरलेली निराशा, जुन्या पिढीची नव्या पिढीविषयीची उद्विग्नता, सत्-असत् च्या संघर्षात सत् प्रवृत्तीच्या लोकांना योग्य साथ न मिळाल्याने येणारे हताशपण, असत् प्रवृत्तीला धार्जिणी झालेली व्यवस्था, समाजाच्या भल्यासाठी संघर्ष करण्याऱ्या लोकांवर शांतताभंगाचा ठपका ठेवून केली जाणारी कारवाई, मूल्यांचा सार्वत्रिक ऱ्हास... आशा अनेक. असत् प्रवृत्तीच्या लोकांचे सक्रिय असणे जितके घातक असते त्यापेक्षा सत् प्रवृत्तीच्या लोकांचे निष्क्रिय असणे अधिक घातक असते का? आजूबाजूला पाहिले तर ही परिस्थिती दिसते का? याचे उत्तर होकारार्थी असेल तर प्रहारचे कालसुसंगत असणे अधोरेखित होते व त्यावर नव्या परिप्रेक्ष्यातून भाष्य करणे समयोचित ठरते.
प्रहारच्या पूर्वार्धात पीटर हे मुख्य पात्र आहे. पीटर (गौतम जोगळेकर) घरचा पिढीजात बेकरीचा व्यवसाय न करता सैन्यात अधिकारी झालेला आहे आणि आता कमांडो प्रशिक्षणासाठी जाणार आहे. त्याने जाऊ नये म्हणून त्याची प्रेयसी (माधुरी दीक्षित) त्रागा करते आहे. पीटरचे वडील (हबीब तन्वीर) थोडा विरोध करतात पण नंतर मुलाच्या इच्छेला मान देतात. शेजारी किरण (डिम्पल कपाडिया) पण त्याला पाठिंबा देते. पीटर प्रशिक्षणासाठी रुजू होतो व मेजर चौहान (नाना पाटेकर) च्या तावडीत सापडतो. कमांडो ट्रेनिंग च्य काठिण्याचा पुरेसा अंदाज नसल्याने फाजील आत्मविश्वास असलेला पीटर डगमगतो व ट्रेनिंग सोडण्याचा निर्णय घेतो पण मेजर चौहानच्या त्याच्या पौरुषाला आव्हान करण्याच्या कडवट बोलण्याने त्याचा निर्धार पक्का होतो. मेजर चौहानची शिस्त, लष्करी प्रशिक्षण, लष्करी प्रशिक्षण कालावधीत तो व त्याचे कॅडेट्स यांच्यामध्ये निर्माण होणारे भावबंध या गोष्टी चित्रपटाच्या पूर्वार्धात ताकदीने मांडलेल्या आहेत. पूर्वार्धात निर्माण झालेले लष्करी वातावरण उत्तरार्धात नागरी जीवनावर व त्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करते.
पीटरच्या लग्नासाठी मेजर चौहान मुंबई मध्ये येतो. लहानपणी ताटातूट झालेल्या आईचा शोध घेणे हादेखील त्याचा हेतू असतो. मुंबईमध्ये (नागरी जीवनात) आल्यावर त्याला एकामागून एक धक्के बसतात. त्याच्यातील लष्करी अधिकारी व माणूस या भूमिकांत कोलाहल निर्माण होतो. लष्करी शिस्त व नागरी शैथिल्य यात द्वंद्व सुरु होते. ‘याचसाठी केला होता का अट्टहास?’ असा प्रश्नदेखील त्याचा पाठपुरावा करू लागतो. सीमेवरती शत्रू कोण हे माहीत असते पण इथे तर संपूर्ण व्यवस्थाच शत्रुवत वागते आहे आणि ज्यांच्यासाठी या व्यवस्थेला आव्हान द्यायचे, ज्यांच्यासाठी संघर्ष करायचा तेच आपल्या विरोधात जाताना पाहून तो हताश होतो. या हताश अवस्थेतून बाहेर पडून दमनकारी व्यवस्थेचा सामना करण्यासाठी, त्याचा निर्धार जागृत करण्यासाठी, त्याची वैयक्तिक मूल्यनिष्ठा, आजूबाजूची परिस्थिती व परिघातील माणसे काय भूमिका निभावतात, मेजर चौहानला आयुष्याच्या व्यापक अर्थाविषयी काय आकलन होते, हे प्रत्यक्ष चित्रपट सजगपणे पाहून ठरवणे योग्य होईल.
प्रहार हा चित्रपट ‘सबकुछ नाना’ असा नसला तरी ‘बहुतकुछ नाना’ असा नक्की होता. कारण दिग्दर्शनाबरोबरच कथा, पटकथा व अभिनयाची धुरादेखील त्याने सांभाळली. नानाने आपल्या कारकिर्दीत विविधांगी व अनेक छटा असलेल्या भूमिका केल्या. क्रौर्य (परिंदा, अंगार, पुरुष, माफीचा साक्षीदार), विक्षिप्तपणा (अग्निसाक्षी), व्यवस्थेविरुद्धचे अस्वस्थपण (क्रांतिवीर), हळवेपणा (खामोशी, थोडासा रूमानी हो जाये) सहृदयी माणूस (गुलाम ए मुस्तफा) नर्मविनोद (वेलकम) इ. कधी पल्लेदार संवादातून, कधी देहबोलीतून, कधी डोळ्यांतील भावांतून तर कधी अर्थपूर्ण मौनातून त्याने या भूमिका जिवंत केल्या. प्रहार चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व छटा त्याच्या मेजर चौहानच्या एकाच व्यक्तिरेखेत पहावयास मिळतात, त्यामुळे प्रहार ही एक पर्वणी ठरते.
युवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना करडी शिस्त राखणारा मेजर चौहान त्यांचे मनोबल टिकून राहावे म्हणून त्यांच्या पौरुषाला आव्हान देतो, सैनिकाची dignity टिकून राहावी म्हणून विचित्र शिक्षा देताना काही काळ विक्षिप्त भासतो, त्यांना टोपण नावे देताना मिश्कील भासतो, आपण प्रशिक्षित केलेल्या सैनिकाचा अपमानजनक मृत्यू पाहून हेलावून जातो, आपल्या आईच्या आठवणीत हळवा होतो. विधवा नर्स व तिच्या अनाथ मुलाप्रती जाणीवा जागृत होणारा, दिवंगत मुलाच्या बापाच्या वेदना ओळखणारा सहृदयी माणूस होतो तर खलप्रवृत्तीच्या व्यक्तीला Ambassador गाडीने चिरडून मारताना विलक्षण क्रूर होतो. प्रत्येक छटा दाखवताना त्याने अभिनयाच्या विविध अंगांचा विलक्षण ताकदीने वापर केला आहे.
नानाचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच आणि एकच चित्रपट असला तरी प्रत्यक्ष चित्रपट पाहताना तसे वाटत नाही. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या नानाची तंत्रावर जबरदस्त पकड आहे. त्याची शैली वास्तववादी आहे. सशक्त कथा, तितकीच बांधीव पटकथा, प्रसंगांच्या साखळीतून आणि लयीतून निर्माण झालेली दृश्यभाषा या गोष्टी प्रेक्षकाला पूर्ण अडीच तास खिळवून ठेवतात. नानाने या चित्रपटात अनेक धाडसी, काहीसे नाविन्यपूर्ण तर कधी अतर्क्य असे प्रयोग केले. त्याने स्वतः लष्करी प्रशिक्षण तर घेतलेच पण त्याच बरोबर पीटर व त्याचे इतर सहकारी यांनी देखील असे प्रशिक्षण घेतले नसते तर चित्रपटाचा पूर्वार्ध वास्तववादी वाटलाच नसता.
1990 चा काळ म्हणजे माधुरी व डिम्पल च्या ‘नटी’ म्हणून ऐन बहराचा काळ. अशा काळात या दोघींना या चित्रपटात ‘बिना मेकअप’ सादर केले गेले.चित्रपटाचा opening shot शर्लीच्या व्यक्तिरेखेपासून म्हणजेच माधुरीपासून सुरु होतो हे विशेष. माधुरीने एकदा हलका मेकअप केला होता ते नानाच्या लक्षात येताच त्याने तिला तो काढायला लावला. काही सिनेमासिकांनी मेकअप केल्यामुळे नानाने माधुरीच्या कानशिलात वाजवली होती असादेखील तपशील प्रसिद्ध केलेला होता! माधुरी तिच्या चेहऱ्यावरील बदलणाऱ्या भावांतून आणि डिम्पल शांत स्वरातून तर कधी फक्त मौनातून व्यक्त झाली. त्या दोघींची लोकप्रियता encash करण्याऐवजी चित्रपटाच्या आशयाशी सुसंगत असा वास्तववादी, subtle अभिनय करून घेण्यावर नानाने मेहनत घेतली.
गौतम जोगळेकरसारख्या नवख्या व हबीब तन्वीरसारख्या बंगाली रंगभूमीवरील प्रख्यात (त्यांना बंगालचे श्रीराम लागू म्हणतात) अभिनेत्याकडून अभिनय करून घेताना नानाचे कसब पणास लागले असेल. गौतम जोगळेकरने या चित्रपटात काम करण्याआधी नानाला “मी जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करेन तेव्हा तू त्यात काम करशील” असे गमतीत म्हटले होते. नानाने ते लक्षात ठेवून त्याच्या ‘पक पक पकाक’ या मराठी चित्रपटात ‘भुत्या’ची भूमिका केली. तेव्हा नाना यशाच्या शिखरावर होता आणि त्याने मराठी चित्रपट करणे जवळपास सोडले होते, पण तिथपासून त्याचा मराठीतला प्रवास नव्याने सुरू झाला, असेही म्हणता येईल.
प्रहारच्या नावावरून व पोस्टरवरून तो एक मारधाडपट असेल असे first impression पडते. पण तो तेवढाच नाही तर मूल्याधिष्ठित समाज घडवण्यासाठीचा अटळ संघर्ष दाखवणारा आणि त्यासाठी धनदांडग्यांना धार्जिण्या असलेल्या व्यवस्थेवर सामान्य लोकांनी प्रहार करण्याची गरज दाखवणारा चित्रपट आहे. अशा या चित्रपटात ‘याद पिया की आये’ ही शोभा गुर्टूंच्या स्वरातील ठुमरी व मन्ना डे यांच्या आवाजातील ‘हमारीही मुठ्ठी में आकाश सारा...’ सारखे भजनसदृश गीत सहज सामावून जाते. दोन्ही गाण्यांची धून चित्रपटभर प्रसंगानुरूप वाजत राहते. कोणत्याही चित्रपटात हाणामारीच्या दृश्यांना कर्णकर्कश पार्श्वसंगीत लावले जाते. प्रहारमध्ये हाणामारीचे शेवटचे दृश्य साधारण आठ मिनिटांचे आहे. अंगावर काटे आणणारे हे दृश्य क्रौर्याची परिसीमा गाठते. अशा या दृश्याला पार्श्वसंगीत म्हणून किशोरी आमोणकरांचा करुण आलाप वापरला आहे. प्रेक्षक एकाच वेळी क्रौर्य पाहतो आणि कारुण्य ऐकतो; त्याच्या संवेदनांना हादरा बसणारा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो. आदेश श्रीवास्तवने या चित्रपटात बासरी, सतार, ट्रंपेट, जाझसारख्या वाद्यांचा वापर करून प्रत्येक प्रसंगाला उठावदार करणारे प्रत्ययकारी पार्श्वसंगीत दिले आहे.
खर्जाच्या आवाजातील पल्लेदार संवाद हे नानाच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. पण या चित्रपटात कोर्टातील एक monolog वगळता प्रत्येक संवाद दोन-तीन वाक्यांचाच आहे पण अंतर्मुख करायला लावणारा आहे. उदा एका प्रसंगात मेजर चौहान विचारतो, “पुलिसने कुछ किया नही ?” त्यावर किरण उत्तर देते “किया ना! पंचनामा किया. पीटर की मौत का, और देश की आझादी का!”
चित्रपट हे दृश्य माध्यम आहे. कथेला पुढे नेण्यासाठी दृश्यांची कल्पक मांडणी व पूरक योजना केल्यास ते प्रभावी ठरते. तीन-चार पानांचे संवादही जे सांगू शकणार नाहीत ते एक फ्रेम परिणामकारकपणे व्यक्त करू शकते. या चित्रपटात अशा दृश्य साखळ्यांची रेलचेल आहे. वानगीदाखल एक प्रसंग सांगता येईल. मेजर जेव्हा वस्तीतल्या गुंडांना चोप देत असतो तेव्हा वस्तीतील लोक त्याला पाठिंबा द्यायचे सोडून उलट त्याच्यावर दगडफेक करतात. या अचानक आलेल्या प्रसंगाने मेजर प्रथम आश्चर्यचकित, मग हताश होतो. इथे कथेत संभ्रम निर्माण झाला आहे. पुढच्या प्रसंगाच्या मांडणीत तो दूर होतो. तो प्रसंग असा - मेजर चौहान आपल्या आईच्या शोधात निघालेला असताना एका कपड्याच्या शोरूम समोर थांबतो. त्यात काचेच्या मागे तीन पुतळे असतात. त्या पुतळ्यांकडे एकटक बघत असताना मेजर स्टान्स घेऊन म्हणतो “Come on, kill me!” संपूर्ण दृश्यात एकच संवाद. काचेच्या मागच्या निर्जीव पुतळ्यांच्या रूपाने पांढरपेशा समाजाचे संवेदनाहीन, बंदिस्त जगणे निर्विकारपणे उभे राहिलेले दिसते. मेजर चौहानसारख्या वृत्ती आणि मध्यमवर्गीय जाणीवा यांमधील तफावत अधोरेखित होते. “Come on, kill me” या एकाच वाक्यातून समजते की, मेजर चौहान आता फक्त गुंड प्रवृत्तीशी लढणार नाही तर मध्यमवर्गीय निबरपणाशीदेखील लढणार आहे. हा लढा दोन व्यक्ती किंवा समूहांचा नसून वृत्तींचा आहे.
चित्रपटाची दृश्यभाषा संवादांपेक्षा वरचढ ठरली आहे. मेजर चौहानचे किरणच्या घरात मदर मेरीचा पुतळा ठेवणे, किरणचे जखमी अवस्थेतील मेजरला आपल्या नवऱ्याचा स्वेटर देणे अशा काही दृश्यांतून व्यक्तिरेखांमधील परस्पर संबंध ठळक होतात.
देबू देवधर यांची cinematography अप्रतिम आहे. कोणतेही vfx नसताना, केवळ कॅमेराच्या placement मधून व विशिष्ट कोनातून चित्रण करून, लष्करी प्रशिक्षण, हाणामारीच नव्हे तर भावनिक प्रसंगही ती परिणामकारक करते. उदा. मेजर चौहानची त्याच्या आईशी ताटातूट होण्याआधी तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले गेलेले असते. लहानपणीच्या flashback मध्ये दलाल तिला जिन्यावरून खाली ओढत नेत असतानाच्या दृश्यात कॅमेरा bottom angle ला ठेवून चित्रीकरण केलेले आहे. बैठकीत गाणे गाणाऱ्या एका गायिकेचे वेश्या व्यवसायात होणारे स्खलन अशा रीतीने चित्रित केलेले आहे.
या चित्रपटात हिंसा आहे पण तो हिंसेचे समर्थन करत नाही. व्यवस्था बदलण्याने माणूस बदलेल की माणूस बदलल्याने व्यवस्थेत परिवर्तन होईल? या मूलगामी प्रश्नाला हा चित्रपट भिडतो व आपला कौल स्पष्टपणे माणसात परिवर्तन करण्याच्या बाजूने देतो. काळ बदलला तरी काही मूल्ये शाश्वत व चिरंतन राहतील. या मूल्यांचा अंगीकार करणे हेच प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे असेदेखील सूचित करतो. या दृष्टीने चित्रपटाचा शेवट बोलका आहे. या दृश्यात लष्करी गणवेशातील मेजर चौहान दिसतो व त्याच्या समोर प्रशिक्षणासाठी उभी असलेली संपूर्ण नग्न अवस्थेतील लहान मुले दिसतात. सध्याच्या काळात हा प्रसंग सेन्सॉरने संमत केला नसता, आणि त्यामुळे परिणामकारकता हरवून बसला असता. वरवर पाहता या दृश्यातून सक्तीच्या लष्करी शिक्षणाची भलावण होते आहे असे दिसते पण ते तसे नाही. मेजर चौहानला त्याच्या आयुष्याच्या पटाने लष्करी पेशात आणून सोडले. तो आता हा पेशा बदलू इच्छित नाही. त्याची मूल्यव्यवस्था लष्करी शिस्तीतून घडलेली असली तरी तो काही रामबाण उपाय नाही.
लहान मुलांची संपूर्ण नग्न अवस्था हे रूपक आहे. ते सुचवते की, माणसावर धार्मिक, जातीय संस्कार होण्याआधी त्याची पाटी कोरी असतानाच मूल्यसंस्कार केले पाहिजेत. सहकार्याची भावना, संवेदनशीलता, सौहार्द जागृत ठेवणारे व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे. चारित्र्यवान माणूस घडला तरच समाज समृद्ध होईल, नैतिक मूल्यांच्या रुजवणीतून चारित्र्य संवर्धन करूनच निकोप समाजाची निर्मिती करता येईल. असा आशावाद उजागर करणारा आणि Be the change you want to see in the world असे “हमारे पीछे कोई आए ना आए, हमें ही तो पहले पहुँचना वहाँ है“ यासारख्या नव्या शब्दांत सांगणारा ‘प्रहार’ कालसुसंगत ठरतो तो यामुळेच!
प्रहार हा अडीच तासांचा संपूर्ण चित्रपट यूट्यूबवर येथे पाहता येईल.
- मकरंद दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Tags: prahaar 1991 nana patekar madhuri dixit नाना पाटेकर प्रहार माधुरी दीक्षित मध्यमवर्गीय निबरपणा लष्कर सैन्य लष्करी प्रशिक्षण Load More Tags
Add Comment