समग्रतेचं भान येण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक !

‘वाचन जागर’मधील प्रकाशकाची मुलाखत : 10

1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध झाला. (त्या मालिकेतील  ही  शेवटची  मुलाखत.)  

साधना प्रकाशन मागील 70 वर्षांपासून पुस्तके प्रकाशित करत आले आहे. थोडीच (दरवर्षी दहा ते बारा), पण महत्त्वाची पुस्तके साधना प्रकाशनाकडून येतात. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आशय-विषयाची पुस्तके प्रामुख्याने असतात. आतापर्यंत जवळपास 700 पुस्तके साधनाने प्रकाशित केली आहेत. साधना साप्ताहिकातील मजकुराचीच पुस्तके साधना प्रकाशनाकडून प्रामुख्याने येत राहिली... त्यामुळे सर्वच काळात साधना साप्ताहिकाचे संपादकच साधना प्रकाशनाचे संपादक / संचालक राहिले आहेत. साप्ताहिक आणि प्रकाशन हे दोन्ही ‘साधना ट्रस्ट’मार्फत चालवले जाते. त्यामुळे प्रकाशनाच्या वितरणाला आणि व्यवस्थापनाला काही मर्यादा सुरुवातीपासून राहिल्या आहेत... मात्र तरीही पुरोगामी आचार विचार आणि चळवळी, आंदोलने यांना पूरक व पोषक ठरतील अशी साधनाची पुस्तके चांगलीच दखलपात्र ठरलेली आहेत. 

साधनाचे संस्थापक साने गुरुजी आणि साधना परिवारातील नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग.प्र. प्रधान, एस.एम. जोशी, मधू दंडवते, राजा मंगळवेढेकर यांची आणि अन्य दिग्गजांची पुस्तके साधनाने प्रकाशित केली. याशिवाय नरहर कुरुंदकर, बाबा आमटे, हमीद दलवाई अशा काही समाजधुरिणांची सुरुवातीची पुस्तकेही साधनाकडूनच आली. कथा, कादंबरी, कविता, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक लेखन, बालसाहित्य, शिक्षणविषयक पुस्तके असे विविध प्रकार साधना प्रकाशनाकडून आले... परंतु पुरोगामी विचारांची राजकीय - सामाजिक पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशन अशीच साधनाची ओळख अधिक गडद राहिली. 

साधना प्रकाशनाच्या वाटचालीत लहानमोठे चढउतार येत राहिले... पण हीरक महोत्सवी वर्षानंतरच्या म्हणजे 2008नंतरच्या 12 वर्षांत साधना प्रकाशनाचा आलेख चढताच राहिला आहे. या काळात जवळपास सव्वाशे पुस्तके प्रकाशित झाली. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, तुलनेने कमी किंमत आणि तरीही जास्त सवलत ही साधनाची चतुःसूत्री या काळात राहिली आहे. गोविंद तळवलकर, सुरेश द्वादशीवार, सुहास पळशीकर, ज्ञानेश्वर मुळे, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, मिलिंद बोकील अशा अनेक नामवंतांची पुस्तके या दशकात साधनाने प्रकाशित केली. मागील दोनतीन वर्षांत लुई फिशर, अरुणा रॉय, रामचंद्र गुहा यांसारख्या काही दिग्गजांची इंग्लीश पुस्तके मराठीत आणून साधना प्रकाशनाने अनुवादित पुस्तकांचे आपले दालन उघडले आहे. याच काळात मुस्लीम समाज सुधारणा, आदिवासी समाजजीवन, नक्षलवाद, महात्मा गांधी इत्यादी विषयांवरील विशेष महत्त्वाची पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. 

या बारा वर्षांच्या काळात साधना साप्ताहिकाचे युवा संपादक, कार्यकारी संपादक आणि संपादक असा प्रवास करणारे विनोद शिरसाठ हे साधना प्रकाशनाचेही संपादक राहिले आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न - साधना साप्ताहिकाची स्थापना आणि वाटचाल आम्हाला चांगली माहीत आहे... पण साधना प्रकाशनाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली ?   
- साधना साप्ताहिक साने गुरुजींनी 15 ऑगस्ट 1948ला सुरू केले आणि त्यानंतर काहीच महिन्यांनी साधना प्रकाशन सुरू झाले. सुरुवातीचे काही महिने अनौपचारिक पद्धतीने काही पुस्तिका काढल्या. पण साधना प्रकाशनाचे पहिले पुस्तक ऑक्टोबर 1950मध्ये आले. ते होते ‘सुंदर पत्रे’. 

साने गुरुजींनी जून 1949 ते जून 1950 म्हणजे मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत साधारण प्रत्येक आठवड्याला एक पत्र असं वर्षभर साधनेतून लिहिलेल्या सदराचं ते पुस्तक. ही पत्रं त्यांनी त्यांची 14-15 वर्षांची प्रिय पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिली... पण महाराष्ट्रातल्या कुमारवयीन मुलांसाठी लिहिलेली ही पत्रं आहेत. सभोवतालाविषयी, निसर्गाविषयी, प्राणिसृष्टीविषयी, जीवनाविषयी अशी ती सुंदर पत्रं आहेत. मुलांची भावनिक आणि वैचारिक वाढ चांगली व्हावी, त्यांना सामाजिक भान यावं, त्यांच्यात उदात्त ध्येयवाद रुजावा, त्यांच्या दृष्टीकोनाची भक्कम पायाभरणी व्हावी अशा आशयाची ही सगळी पत्रं आहेत. ते पुस्तक खूपच गाजलं आणि पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या आल्या. 

या वर्षी ‘सुंदर पत्रे’ची नवी आवृत्ती आणताना, आता 85 वर्षांच्या असलेल्या सुधाताई (साने-बोडा) यांना विनंती केली होती की, 'मागील 70 वर्षांत या सुंदर पत्रांनी तुम्हाला काय दिलं हे सांगणारं पत्र तुम्ही तुमच्या प्रिय अण्णांना (साने गुरुजींना) लिहा...' आणि मग त्यांनी लिहिलेलं अप्रतिम असं दीर्घ पत्र या नव्या आवृतीत समाविष्ट केलं आहे. 

प्रश्न - तुम्ही गेली बारा वर्षं साधना प्रकाशनाचं काम पाहताय आणि या काळात प्रकाशनाचा आलेख चढता राहिलेला आहे... तर त्याचा स्टार्टिंग पॉइंट किंवा आरंभबिंदू म्हणता येईल असे काही सांगता येईल का?   
- 2007मध्ये मी साधनात पूर्ण वेळ काम करायला लागलो. त्याच्या आधी तीन वर्षं स्तंभलेखक आणि युवा अतिथी संपादक या नात्यानं बऱ्यापैकी जोडला गेलेला होतो... पण 2007-2008 हे साधनाचं हीरक महोत्सवी वर्ष होतं. डॉ.नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होऊन 10 वर्षे झालेली होती आणि पुढची 15 वर्षं समोर ठेवून ते साधनाची उभारणी करत होते. तोपर्यंत त्यांनी साप्ताहिकावरच लक्ष केंद्रित केले होते. कारण प्रकाशनाची वितरण यंत्रणा मजबूत नव्हती... मात्र त्यांना हे चांगलं माहीत होतं की, साधना प्रकाशनाला काही बाबतींत खूप जास्त अनुकूलता आहे, तिचा लाभ घेता यायला हवा.  

त्याच दरम्यान निवडक साधना ग्रंथसंच हा आठ खंडांचा प्रकल्प करायची कल्पना त्यांनी मांडली. ग.प्र. प्रधान आणि रा.ग. जाधव यांना त्या प्रकल्पासाठी संपादक म्हणून काम करण्याची विनंती डॉ. दाभोलकरांनी केली. इतर चार-सहा लोक त्यांच्या मदतीला दिले, त्यात मी एक होतो. त्या आठ खंडांच्या संचाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. पाचशे संच जातील की नाही अशी चिंता होती, पण तेव्हा तीन हजार संच काढावे लागले. तिथून साधना प्रकाशन पुन्हा चर्चेत आलं. साधना प्रकाशनाच्या दृष्टीनं तो टर्निंग पॉइंट होता...

...आणि माझ्या दृष्टीनं तो स्टार्टिंग पॉइंट म्हणता येईल. कारण त्या काळात आणि त्या प्रक्रियेत मला साधना प्रकाशनाची बलस्थानं व मर्यादा, दोन्ही चांगलंच कळलं. प्रकाशन वाढवण्यासाठी डॉ.दाभोलकर जे ब्रेन स्टॉर्मिंग करत असायचे - वेगवेगळ्या लोकांशी (लेखक, प्रकाशक, संपादक, विक्रेते, मुद्रक यांच्याशी...) त्यात प्रत्येक वेळी मला बरोबर घेऊन जात होते. आता मागं वळून पाहताना वाटतं की, त्या प्रक्रियेत मला एकूणच मराठी प्रकाशन व्यवहार चांगला कळायला लागला. हे खरं की, पुस्तकवाचन आणि ग्रंथव्यवहार यांची आवड मला पूर्वीपासून होती. पुस्तकांच्या लेखन आणि निर्मिती या प्रक्रियांमध्ये विशेष रस होता. मात्र ते दालन मला सताड उघडून दिलं ते डॉ.दाभोलकरांनीच. एवढंच नाही तर मला तिथं मुक्त खेळायला म्हणा किंवा प्रयोग करायला म्हणा, पुरेपूर संधी दिली. परिणामी, त्यानंतरच्या 12 वर्षांत साधनाची सव्वाशे पुस्तकं आली. त्यामधली जवळपास 100 पुस्तकं ही साप्ताहिकातल्या लेखमालांची किंवा विशेषांकांचीच आहेत. 

प्रश्न - साधना प्रकाशनाची पुस्तकं काढताना तुम्ही गेल्या 12 वर्षांच्या कामावर समाधानी आहात?
- या प्रश्नाला तिहेरी उत्तर देता येईल. साधना साप्ताहिकातील लेखमाला किंवा विशेषांक पुस्तकरूपात आणणं हे सुरुवातीपासून साधना प्रकाशनाचं मुख्य वैशिष्ट्‌य राहिलं. (हे साधना प्रकाशनाचं मोठं बलस्थान राहिलं आणि तीच मोठी मर्यादाही राहिली.) साप्ताहिकाचा संपादक म्हणून काम करताना मिळवलेला किंवा चालून आलेला उत्तमोत्तम आणि वैविध्यपूर्ण मजकूर अधिक चांगल्या प्रकारे पुस्तकांद्वारे जतन करता आला, पोहचवता आला याचं मोठंच समाधान मला आहे. ते समाधान युनिक म्हणावं असं आहे. कारण अन्य साप्ताहिकं आणि मासिकं यांच्या संपादकांना तशी संधी मिळत नाही. किंबहुना खूप चांगला मजकूर अंकातच पडून राहिलाय अशी रुखरुख त्यांना कायम लागून राहत असावी.

मात्र असमाधान हे आहे की, साप्ताहिकाबाहेरचा मजकूर थेट पुस्तकरूपानं आणणं यासाठी वेळ देता येत नाही. म्हणजे स्वतःहून चांगल्या पुस्तकांचा शोध घेणं किंवा ती लिहून घेणं हे काम तर फार करता येत नाहीच, पण चालून आलेल्या काही चांगल्या संहितांवर काम करून त्यांना पुस्तकरूप देणंही शक्य होत नाही.

हे असमाधान दूर करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे अन्य पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नियुक्त करणं... पण हे काम करायचं तर त्या व्यक्तीला पुस्तकांचं संपादन,  निर्मिती, व्यवस्थापन, वितरण, विपणन, जाहिरात, अर्थकारण हे सगळं जुळवता आलं पाहिजे... या आघाडीवर आम्ही पुरेसे प्रयत्न करू शकलो नाही, केले तेव्हा त्याला यश आलेलं नाही. साधनाची वितरणप्रणाली सुधारली तर कदाचित या आघाडीवर यश मिळेल आणि म्हणून त्यासाठी सध्या आम्ही जास्त प्रयत्नशील आहोत.

प्रश्न - लेखमाला किंवा विशेषांक यांना पुस्तकरूप द्यायचं हे कसं ठरतं? 
- साप्ताहिकातून दरवर्षी दहाबारा लेखमाला आणि सातआठ विशेषांक प्रसिद्ध होतात... मात्र दरवर्षी त्यांतून पाचसहाच पुस्तकं प्रकाशित केली जातात. लेखमाला किंवा विशेषांक प्रसिद्ध होत असतानाच, याचं पुस्तक होऊ शकेल की नाही हा निर्णय आकार घेतो. याचं पुस्तक साप्ताहिकाच्या वाचकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देईल का, ते पुस्तक संग्रही ठेवावंसं वाटेल का, आणि विकत घेऊन भेट द्यावंसं वाटेल का, या तिन्ही निकषांवर उतरत असेल तरच त्या लेखमालेचं किंवा विशेषांकाचं पुस्तक प्रकाशित करायला आम्ही उत्सुक असतो... मात्र क्वचित काही वेळा या तिन्हींमध्ये न बसणारी पण दस्तऐवजीकरण म्हणून गरजेची आहेत अशी पुस्तकं साधनानं केलेली आहेत.

प्रश्न - नव्या आणि तरुण लेखकांना संधी या आघाडीवर काय स्थिती आहे साधना प्रकाशनाची? 
- तरुण लेखकांना संधी देण्याच्या किंवा त्यांच्याकडून लिहून घेण्याच्या बाबतीत मला आणि साधना प्रकाशनाला फारसं यश आलेलं नाही. पण खरं सांगायचं तर त्यासाठी आम्ही पुरेसे प्रयत्नच केले नाहीत. याचंही कारण पुन्हा तेच... नव्या आणि तरुण लेखकांना जो वेळ द्यावा लागतो, चिकाटीनं पाठपुरावा करावा लागतो, पुनर्लेखन करून घ्यावं लागतं, यासाठी आवश्यक उसंत साप्ताहिकाच्या संपादकाकडे नसते... मात्र जेव्हा केव्हा कुणामध्ये तरी स्पार्क दिसला तेव्हा त्यांना पुश करण्याचं काम आम्ही निश्चितच केलेलं आहे. साप्ताहिकात असं काम भरपूर झालेलं आहे. पुस्तकरूपानं त्यातलं कमी आलेलं आहे. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक. 

आदर्श पाटील हा तरुण आणि त्याचे दोन मित्र (विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेवाळे) आदिवासी भागात सायकल प्रवास करायला गेलेले असताना (2016) नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडले. राष्ट्रीय स्तरावर बातम्या झळकल्या आणि सरकारी यंत्रणेची धावाधाव झाली. चार दिवसांनी त्यांची सुटका झाली. त्या अनुभवावर आदर्शनं डायरी लिहिलेली होती. सुभाष वारे यांच्यामार्फत ती डायरी माझ्याकडे आली. मला त्यामध्ये पोटेन्शिअल दिसलं, विशेषांकाचं, पुस्तकाचं आणि एका सिनेमाचंही. मग मी उरलेल्या दोन तरुणांनाही डायरी लिहायला सांगितली... तेव्हा ‘आता नवीन वेगळं काही त्यात येणार नाही. आदर्शनं लिहिलं तेच रिपीट होईल...’ अशीच त्या तिघांची प्रतिक्रिया होती... पण मला खातरी होती की, प्रत्येकाकडून काहीतरी इंटरेस्टिंग बाहेर येईल आणि मग ती भन्नाट व परिपूर्ण स्टोरी होईल. तिथं मात्र मी अतिरिक्त वेळ दिला... 104 पानांचा विशेषांक काढला. 8500 प्रती, संपूर्ण रंगीत, भरपूर छायाचित्रे, कमालीचा वाचनीय, सर्व प्रकारच्या वाचकांचे अपील, नवीन व फ्रेश आशय विषय... असा तो अंक. नंतर त्याला पुस्तकरूप दिलं. एक अवॉर्डविनिंग सिनेमा होऊ शकेल असं आशयनाट्य ‘तीन मुलांचे चार दिवस’मध्ये आहे. एखाद्या पुस्तकाचं खऱ्या अर्थानं संपादन केल्याचं समाधान मला या पुस्तकानं दिलं....

प्रश्न - साप्ताहिकातील लेखमाला किंवा विशेषांक यांना पुस्तकरूपात आणताना तुम्हाला सर्जनशील असं काही केल्याचा आनंद मिळत असेल... पण स्वतंत्र पुस्तक लिहून घेण्याच्या प्रक्रियेत जो सर्जनशीलतेचा आनंद असतो तो तुम्हाला कमी अनुभवायला मिळाला असेल... बरोबर?
- होऽ खरंय... लेखमाला किंवा विशेषांक प्रसिद्ध होत असताना बरीच मोठी प्रक्रिया घडते... पण स्वतंत्र पुस्तक लिहून घेणं आणि ते यशस्वी होणं ही प्रक्रिया निश्चितच अधिक सर्जनशील आहे. माझ्या वाट्याला तो अनुभव आणि तो आनंद कमी वेळा आला. मात्र तशी सर्जनशीलता नाही, पण कल्पकता दाखवल्याचे अनुभव आणि आनंदाचे प्रसंग बरेच आहेत. 

एक उदाहरण देतो... गोविंदराव तळवलकर यांनी मृत्यूपूर्वी दहा वर्षं साधना साप्ताहिकात सातत्यानं लेखन केलं, साधनाच्या वाचकांशी त्यांची नाळ चांगली जुळली होती. त्यांच्या मृत्यूनंतर काहीच दिवसांनी (मार्च 2017मध्ये) अमेरिकेत असलेल्या त्यांच्या दोन मुलींना मी पत्र पाठवलं होतं. ‘गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तिगत जीवन, त्यांचे लेखन व वाचन, त्यांना असलेली प्राणी, पक्षी व झाडे, फुले यांची आवड या संदर्भात तुम्ही विस्ताराने लिहा. तुम्ही हे पुढील वर्षाच्या आत नाही लिहू शकलात तर कदाचित कधीच लिहून होणार नाही आणि तो सर्व ऐवज काळाच्या उदरात गडप होईल.’ हे त्यांना कळवताना मी माझंच उदाहरण देऊन लिहिलं होतं, ‘2013मध्ये डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर मी त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी वेळ काढू शकलो नाही. आता माझ्याकडून ते लिहून होण्याची शक्यता खूप कमी झाली आहे. आणि ते नाही लिहून झालं तर खूप महत्त्वाचा दस्तऐवज कायमच काळाच्या उदरात राहील. माझ्याकडून झालेली चूक तुमच्याकडूनही होऊ नये.’ त्या पत्राला त्या दोघींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुढच्या सहा महिन्यांत ते पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या बाबतीत कल्पकतेचा आनंद आहे, जरी मोठी प्रक्रिया काही घडली नसली तरी!

प्रश्न - या सव्वाशे पुस्तकांमध्ये विशेष नोंद घेतलीच पाहिजे अशी पुस्तकं किंवा असे प्रकल्प कोणते सांगता येतील? 
- खरंतर बरीच सांगता येतील. किंबहुना यांतल्या 80 टक्के पुस्तकांच्या मागे इंटरेस्टिंग म्हणावं असं काही ना काही आहे. ते सर्व सांगायचं हे स्थळ नाही... पण दोनतीन उदाहरणं देतो. असे काही प्रथितयश लेखक असतात, जे मुळातच उत्तम लिहित असतात. पण त्यांच्या बुद्धीचं आणि कामाचं खरं चीज व्हायचं असेल तर त्यांना चांगला प्लॅटफॉर्म किंवा व्यासपीठ उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, गेल्या दशकात सुरेश द्वादशीवार यांच्या सहा लेखमाला साधना साप्ताहिकातून आल्या आणि नंतर त्यांची सहा पुस्तकं आली. सगळ्या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळाला, प्रत्येकाच्या तीनचार आवृत्या आल्या.

दुसरं एक उदाहरण सांगतो. अनेकांना फार कल्पक किंवा ओरिजिनल वाटणार नाही, पण सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा ठरलेला प्रकल्प म्हणजे हमीद दलवाईंची सहासात पुस्तकं. नव्या आवृत्त्या, नव्यानं संकलन-संपादन, अनुवाद अशा स्वरूपातली ती पुस्तकं आहेत... पण गेल्या पाच वर्षांत हमीद दलवाईंची सर्व पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली, आवृत्त्या निघाल्या. इतकंच नव्हे तर ती पुस्तकं हिंदी, इंग्लीश आणि कन्नड या भाषांमध्ये अनुवादित करून नामवंत प्रकाशनांकडून यावीत यासाठी यशस्वी प्रयत्न केले. 

प्रश्न - साधना प्रकाशनाकडे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही कसं पाहता? काही नियोजन, कल्पना आहेत मनाशी? 
- त्रिस्तरीय विचार आणि योजना मनाशी आहेत. इंग्लीशमधलीसुद्धा काही महत्त्वाची पुस्तकं मराठीत आणण्याचं काम गेल्या दोनतीन वर्षांपासून साधना करते आहे. लुई फिशर यांचं ‘The Life of Mahatma Gandhi’  हे पुस्तक मराठीत करण्याविषयी सातआठ प्रकाशकांशी बोललो होतो... पण या ना त्या कारणानं ते होऊ शकलं नाही. मग ते 'गांधी 150' मध्ये साधनानंच काढलं. पहिल्या महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली. अरुणा रॉय यांच्या ‘The RTI Story : Power to the People’ या पुस्तकाच्या बाबतीतही असंच झालं... तीनचार प्रकाशकांना सुचवलं होतं, अखेरीस हेही साधनानं काढलं. ही दोन पुस्तकं साधनेची चौकट विस्तारण्यासाठी नवं दालन खुलं करणारी ठरली. 750 आणि 450 पानांची ही दोन मोठ्या लेखकांची मोठी पुस्तकं, इंग्लीशमधल्या नामवंत प्रकाशकांकडून त्यांचे हक्क मिळवणं, त्यांचे अनुवाद करून घेणं, त्याचं अर्थकारण जुळवणं, मोठे प्रकाशन समारंभ करणं हे सर्व जमवता आलं... त्यामुळं यापुढे दरवर्षी चारपाच अनुवादित पुस्तकं येतील, असा आत्मविश्वास आलाय.

दुसरं म्हणजे, साधनेचा वारसा अधोरेखित व्हावा यासाठी आधीच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या उत्तम निर्मिती आणि व्हॅल्यू अ‍ॅडिशन यांसह  आणणं... उदाहरणार्थ, साने गुरुजी, ग.प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते या व अन्य काही दिग्गजांची साधनेचा वारसा सांगणारी पुस्तकं आम्ही पुन्हा आणत आहोत. 

...आणि तिसरं म्हणजे दरवर्षी साधना साप्ताहिकाच्या लेखमालांमधून आणि विशेषांकांतून होणारी किमान पाचसहा पुस्तकं येत राहतील....
त्यापलीकडे जाऊन, चालत आलेली काही नवी पुस्तकं करता येतील, पण त्यांचं प्रमाण कमीत कमी राहील. (याचं कारण वर सांगितलंच आहे.)

याबरोबरच सर्व पुस्तकं इ बुक्स स्वरूपात आणणं आणि साधारणतः त्यातील अर्धी पुस्तकं ऑडिओ रूपात आणणं हे काम हाती घेतलं आहे. पुढच्या दोन वर्षांत ते पूर्णत्वाला गेलेलं असेल. जानेवारी 2021मध्ये साधना प्रकाशनाची वेबसाईटही येत आहे.

प्रश्न - ‘वाचन जागर अभियाना’कडे तुम्ही कसं पाहता?
- या अभियानात सहभागी झालेल्या सर्व प्रकाशकांना हा प्रश्न विचारला गेला आहे... त्या सर्वांकडून आलेल्या मुद्द्यांशी मी पूर्णतः सहमत आहे. त्याला जोडून मांडायचा मुद्दा एकच राहतो... तो म्हणजे अन्य अनेक माध्यमांतून या ना त्या प्रकारचं वाचन खूप जास्त होत असताना, पुस्तकं किंवा ग्रंथ यांच्या वाचनाचा आग्रह कशासाठी? त्याचं मला दिसणारं उत्तर हेच आहे की, बहुतांश माणसं तुकड्या-तुकड्यांत विचार करतात. त्यांना समग्रतेचं भान येण्यासाठी ग्रंथवाचन उपयुक्त ठरू शकेल... कारण पुस्तकांमधून त्या त्या विषयाची अधिक व्यापक, विस्तृत आणि सखोल मांडणी केलेली असते, एकूण गुंतागुंत आणि अनेक घटकांमधले परस्परसंबंध अधोरेखित झालेले असतात.  

प्रश्न - आता शेवटचा म्हणजे या दहा भागांच्या मुलाखत मालिकेतला शेवटचा प्रश्न विचारते. ‘वाचन जागर उपक्रमा’तल्या सर्व प्रकाशकांच्या मुलाखती 'कर्तव्य'वर प्रसिद्ध कराव्यात अशी कल्पना तुमच्या मनात आली तेव्हा तुमचं मानस काय होतं आणि आता त्या सर्व मुलाखती प्रसिद्ध झाल्यानंतर ते मानस कसं आहे? 
- ‘वाचन जागर’मध्ये सामील झालेले सर्व प्रकाशक सर्वार्थानं दिग्गज आहेत, किमान 30 वर्षं आणि कमाल 70 वर्षं इतका त्यांचा कालावधी आहे. या सर्वांच्याच कामाविषयी माझ्या मनात आदर होताच... त्यामुळे, मुलाखतींमधून त्यांच्या धारणा एकत्रितपणे पुढे येतील, ग्रंथव्यवहाराविषयी सजग असलेल्या घटकांसमोर समग्रतेची एक झलक दाखवता येईल आणि या सर्वांना जोडणारं एखादं सूत्र पुढे येईल असा माझा मानस होता. सर्व प्रकाशकांच्या मुलाखती वाचल्यावर त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेल्या आदरात बरीच वाढ झाली. या नऊ प्रकाशकांचं काम साधना प्रकाशनाच्या तुलनेत खूप जास्त तर आहेच, पण सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदानही जास्त आहे अशीही माझी भावना झाली. साधनासारख्या संस्थेच्या संपादकांचा / संचालकांचा अहंकार गळून पडावा असं त्यांचं काम आहे. एवढंच नाही तर त्यांनी केलेलं काम पाहता, बरीच अनुकूलता असूनही साधना प्रकाशनाने खूपच कमी काम केलं आहे असंही तीव्रतेने वाटलं!

(मुलाखत आणि शब्दांकन- मृद्‌गंधा दीक्षित)


वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी 


हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :

अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे !  - अरुण जाखडे

डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड

प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर

अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात! - अशोक कोठावळे 

मराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता ! - दत्तात्रय पाष्टे

चिरस्थायी स्वरूपाचं काम आपल्याकडं व्हायला पाहिजे! - मिलिंद परांजपे

आपलं प्रत्येक पुस्तक पुरोगामी चळवळीला पूरक असावं, हेच माझं तत्त्व ! - अरविंद पाटकर

व्यवसायात 'प्रोफेशनलिझम' आणण्याचे काम प्रकाशकांनी करायला हवे ! - सुनील मेहता

बहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही प्रकाशक कमी पडतो ! - डॉ. सदानंद बोरसे

Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव साधना प्रकाशन विनोद शिरसाठ मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्‌गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Sadhana Prakashan Vinod Shirsath Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Load More Tags

Comments: Show All Comments

नागेश अंकुश, औरंगाबाद

सर नेहमीप्राणेच हाही लेख खूप छान लिहिला आहे...नवी,वेगळी मांडणी...चिंतनीय लेख...

सुधा साने - बोडा , बडोदा (गुजरात)

विनोदभाई, तुमची खूपच छान मुलाखत घेतली आहे मृद्- गंधा दिक्षित यानी. साधना साप्ताहिकातील तुमची वाटचाल व संपादक म्हणून तुम्ही राबविलेले विविध उपक्रम अत्यंत स्तुत्य.तुम्हाला सुचलेल्या नवनवीन कल्पना या क्षेत्रात यशस्वीपणे राबवून, विविध नव्या उपक्रमांचा शोध घेत असता, हे फारच कौतुकास्पद आहे. सुंदर पत्रातील माझ्या पत्राचा उल्लेख कशासाठी ? माझंपत्र म्हणून नाही म्हणत, पण ही सुचलेली कल्पना अफलातून. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Sangeeta bapat

विनोद,मुलाखत उशीरा वाचली.पण साधनेच्या आजवरच्या कामाबद्दल यथायोग्य कल्पना आली आणि अशा संस्थेचा काही वर्ष मीही एक भाग होते म्हणून अभिमान वाटला

Umesh kunde

विनोद शिरसाठ यांची मुलाखत वाचली . खुप सुंदर माहिती मिळाली. साधनेचा असाच उत्कर्ष होत रहावा. नवनवीन कल्पनांना मूर्त रूप येत रहावे. वाचन चळवळ समृध्द करण्यात साधना प्रकाशन निश्चितच यशस्वी होत आहे याचा आनंद वाटतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

या मालिकेतील शेवटची मुलाखत वाचली. आपण केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यानिमित्ताने नामवंत आणि प्रयोगशील प्रकाशकांचे विचार आणि दृष्टिकोन समोर आले. प्रत्येकांनी आपलं स्व:ताचं असं वेगळेपण जपून मराठी भाषा , साहित्य, संस्कृती आणि समाज समृद्ध आणि संपन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.ते करीत असताना आलेले यश ,अपयश ,अडचणी आणि मर्यादा यावरही प्रकाश टाकला आहे. यातून पुढे जाण्याची , कालानुरूप बदल करण्याची मानसिकता आणि अडचणींवर मात करीत प्रकाशन व्यवसाय हा व्यवसाय न मानता निष्ठा ,सचोटी म्हणून करणारे प्रकाशक समोर आले. अजून काही चांगले प्रकाशक आहेत ते यात सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु हा साधनाच्या पुढाकाराने झालेला वाचन जागर खचितच वाचनसंस्कृतीसाठी आणि प्रकाशन क्षेत्रासाठी वेगळी वाट चोखाळणारा आहे. सर्वांना शुभेच्छा.

राहुल अशोक पाटील, नाशिक

प्रकाशकांच्या मुलाखती हा खूप सुंदर व समृद्ध करणारा उपक्रम या निमित्ताने अनुभवता आला. साधना परिवार पारंपरिकता जपताना नवं काहीतरी करू पाहतो आहे, याचा एक नियमित वाचक म्हणून अभिमान आहे. या दिशादर्शक उपक्रमासाठी मनापासून खूप - खूप शुभेच्छा! आटोपशीर मुलाखतीतून विनोदजी आपण तळमळीने करत असलेले प्रयत्न जाणवले. केलेल्या व करत असलेल्या कामाबद्दल कौतुक. काही सहकार्य लागले तर हक्काने सांगावे, ही विनंती.

लतिका

आपली वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. जी पुढील येत्या काळात युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. चांगले प्रश्न विचारले याबद्दल मृदगंधा दीक्षित यांना धन्यवाद!

संजय मेश्राम, पुणे

अतिशय सुंदर मुलाखत. आपण 'साधना'चा संक्षिप्त इतिहासच डोळ्यांसमोर उभा केला. केवळ सकारात्मक बाबींचा विचार करीत आपण पुढे जात आहात, हे स्पष्टच दिसते. आपल्या जिद्दीला, महत्त्वाकांक्षेला सॅल्युट. भविष्यात आणखी नवनवीन कल्पना घेऊन नवनवीन विषयांवरील पुस्तके वाचकांच्या भेटीला येतील, हा विश्वास आहे. 'साधना' च्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!

Add Comment

संबंधित लेख