इंग्रजी पत्रकारितेच्या क्षेत्रात मागील चार दशके कार्यरत असलेल्या शेखर गुप्ता यांनी दहा वर्षे इंडिया टुडे या साप्ताहिकात तर अडीच दशके इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात पत्रकार - संपादक म्हणून व्यतीत केली आहेत. सध्या ते द प्रिंट या डिजिटल पोर्टलचे संपादक आहेत. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राचे मुख्य संपादक व मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाचा त्यांचा कालखंड मोठ्याच कर्तबगारीचा मानला जातो. त्याच काळात एन डी टीव्ही वर त्यांचा वॉक द टॉक हा साप्ताहिक कार्यक्रम प्रसारित होत असे. त्यात विविध क्षेत्रांतील देशविदेशातील नामवंतांच्या मुलाखती अतिशय अनौपचारिक व रोचक शैलीत घेतल्या जात. बारा वर्षांत मिळून त्यांनी सहाशे मुलाखती घेतल्या, त्यातील निवडक 25 मुलाखतींचे पुस्तक वॉक द टॉक या नावानेच रूपा पब्लिकेशन्स कडून आले आहे, त्या पुस्तकाचे वेगळेपण व महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख आहे.
कमीत कमी वेळ, कमीत कमी ऊर्जा व कमीत कमी श्रम खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकणारा अभिव्यक्तीचा प्रकार म्हणजे मुलाखत. कारण मुलाखत देणारा म्हणतो "मला फार काही करायचे नाही, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत", आणि मुलाखत घेणारा म्हणतो, "मलाही फार काही करायचे नाही, फक्त प्रश्न विचारायचे आहेत." पण गंमत ही असते की, चांगली उत्तरे देण्यासाठी माणसाकडे हुशारी असणे आवश्यक असते आणि चांगले प्रश्न विचारण्यासाठी शहाणपण!
मुलाखती खूप दिल्या घेतल्या जातात, पण त्यातील खूप कमी मुलाखती चांगल्या होतात याचे एक कारण हे आहे. दुसरे कारण हे आहे की, मुलाखत देणे व घेणे या प्रकारात दोन्ही बाजूच्या व्यक्तींना अभिव्यक्तीचे तंत्र बऱ्यापैकी अवगत असावे लागते, काही प्रमाणात कलात्मकतेची डुबही आवश्यक असते. आणि तिसरे कारण हे आहे की, दोन्ही बाजूंनी किमान पातळीवरील पूर्वतयारी गरजेची असते. वरील तिन्ही घटक चांगले जुळून आले तर, दोन्ही बाजूंनी भावना व विचार यांचे आदानप्रदान सुलभ व जलद होते, त्यातून अगदीच नवी माहिती आणि अगदीच अनपेक्षित भाष्य वा निष्कर्ष पुढे येण्याची शक्यता वाढते. आणि मग सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो.
अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून विचार केला तर मुलाखती प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. एक - समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांसाठी घेतलेली ती प्रकट मुलाखत, त्यातूनच पुढे दोन उपप्रकार आले, आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांच्यासाठी घेतलेल्या मुलाखती. दुसरा प्रकार - मुद्रित माध्यमांसाठी घेतलेली मुलाखत, यात नियतकालिके व पुस्तके असे दोन ढोबळ उपप्रकार करता येतील. पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, बहुतांश मुलाखती समुहासाठी असतात, कधी तो समूह खूप लहान असतो कधी खूपच मोठा, आणि कधी तो समूह खूप एकजिनसी असतो तर कधी कमालीचा संमिश्र. प्रकट मुलाखतीत काटछाट व दुरुस्त्या करायला, म्हणजे संपादन करायला खूप कमी वाव असतो, मुद्रित माध्यमात मात्र तसे करायला बराच जास्त वाव असतो.
मुद्रित माध्यमातील मुलाखतीचे रूपांतर कोणत्याही प्रकारच्या प्रकट मुलाखतीत करण्याचे तंत्र अद्याप आलेले नाही (कदाचित पुढे कधी तरी ते विकसित होऊ शकेल). पण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कोणत्याही प्रकारच्या प्रकट मुलाखतीचे रूपांतर मुद्रित माध्यमात अधिकाधिक झपाट्याने व अचूकपणे करता येण्यासाठी दिवसेंदिवस अनुकूलता वाढत आहे. मात्र खूप थोड्या प्रकट मुलाखती अशा असतात, ज्यांना मुद्रित माध्यमात आणल्यावर त्यांचा आशय उणावत नाही, प्रवाह कमी होत नाही. आणि अगदीच थोड्या प्रकट मुलाखती अशा असतात, ज्या मुद्रित माध्यमात आल्यावर त्यांच्यातील आशय दुणावतो, प्रवाहीपणा अधिक भिडतो. अशा दुर्मिळ प्रकारातील मुलाखतीचे एक पुस्तक म्हणजे वॉक द टॉक ( Walk the Talk).
या पुस्तकातील सर्व मुलाखती शेखर गुप्ता यांनी घेतल्या आहेत. मागील चार दशके इंग्रजी पत्रकारितेत असलेल्या शेखर गुप्ता यांनी दहा वर्षे इंडिया टुडे या साप्ताहिकात तर वीस वर्षांहून अधिक काळ इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात पत्रकार संपादक म्हणून व्यतीत केली आहेत, चांगल्या अर्थाने गाजवली आहेत. एक्सप्रेसचे संपादक असताना, 2003 ते 2016 या बारा वर्षांच्या काळात त्यांनी एन डी टीव्ही वरील वॉक द टॉक या कार्यक्रमात दर आठवड्याला एक याप्रमाणे जवळपास सहाशे मुलाखती घेतल्या. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग व्यापार , शिक्षण, आरोग्य, सिनेमा, संगीत अशा अनेकविध क्षेत्रातील थोरामोठ्यांच्या मुलाखती आहेत. त्यातील बहुतांश लोक राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे म्हणता येतील असे होते.
यातील काहींच्या मुलाखती एका भागात, तर काहींच्या मुलाखती दोन भागात झाल्या आहेत. प्रत्येक भाग पंचवीस मिनिटांचा. हे सर्व भाग यूट्यूब वर पाहण्यासाठी / ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. वस्तुतः त्यातील अर्ध्याहून अधिक मुलाखती शब्दांकन करून पुस्तक रूपाने पूर्वीच यायला हव्या होत्या. मात्र त्यातील फक्त 25 मुलाखतींचे पुस्तक दोन वर्षांपूर्वी रुपा पब्लिकेशनकडून आले आहे.
या पुस्तकातील सर्व 25 मुलाखती राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या आहेत. या मुलाखती पुस्तकात क्रमाने लावताना काळाचे, विषयाचे, व्यक्तींचे वा अन्य कोणतेही निश्चित व ठोस असे सूत्र शेखर गुप्ता यांच्या किंवा प्रकाशकांच्या मनात होते, असे दिसत नाही. तसा उल्लेखही त्यांनी प्रास्ताविक व मनोगत यामध्ये केलेला नाही. मात्र त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येईल. काँग्रेस मधील राजकारणी : नरसिंह राव, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, सोनिया गांधी, पी चिदंबरम. भाजपचे राजकारणी : नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, अरुण शौरी. तिसऱ्या किंवा समाजवादी/ कम्युनिस्ट प्रवाहातील म्हणता येतील असे : व्ही पी सिंग, मुलायम सिंग, नितीश कुमार, अरुण सिंग, ज्योती बसू, हरकिशन सिंग सुरजित. खऱ्या अर्थाने प्रादेशिक पक्षांचा चौथा प्रवाह मानला तर त्यात : प्रकाश सिंग बादल, मायावती, एम करुणानिधी. आणि विदेशी राजकीय नेते : पुष्कमल दहाल उर्फ प्रचंड ( नेपाळ ), नवाज शरीफ ( पाकिस्तान ), डेव्हिड कॅमेरून ( ब्रिटन ), हेन्री किसिंजर ( अमेरिका ). वरील 23 लोक राजकारणी आहेत, त्यात थेट बसवता येणार नाहीत असे दोन लोक या पुस्तकात घेतले आहेत : सरसंघचालक के सुदर्शन आणि निवृत्त सरन्यायाधीश पी एन भगवती. पण हे दोघेही राजकारणाच्या परिघावर वावरलेले आहेत, त्यामुळे त्यांचा समावेश खटकत नाही.
प्रस्तुत लेखकाने मनातल्या मनात वरीलप्रमाणे विभाग करून याच क्रमाने त्या सर्व मुलाखती वाचल्या आहेत, एकेक राजकीय प्रवाह विचार कसा करतो हे लक्षात यावे म्हणून! पण प्रत्येक वाचक आपापल्या अभिरूचीनुसार या 25 मुलाखतींचे विभाग करून वाचू शकेल, आणि समजा तसे काहीही न करता एखादा वाचक कोणत्याही क्रमाने या मुलाखती वाचत गेला तरी त्याच्या वाचनानंदात विशेष फरक पडणार नाही. मात्र सर्वच मुलाखती वाचायला हव्यात, अन्यथा वाचलेल्या मुलाखतींचा जो काही परिणाम व्हायला हवा, त्यात काही प्रमाणात तरी उणेपणा येईल. कारण राजकारण चालते कसे याचा एक परिप्रेक्ष (perspective) बघायचा असेल तर ते आवश्यक आहे.
यासंदर्भात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, एकूणच राजकारणाविषयी उत्तम दर्जाचे कुतूहल असेल आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे राजकारण कसे चालत आले याची किमान तोंडओळख असेल, तर या पुस्तकाची खरी चव चाखता येईल. आणि त्यातही मागील 30 वर्षांच्या राजकीय घटना घडामोडीचे संदर्भ बारकाईने माहित असतील किंवा या कालखंडाचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून जगता आले असेल, तर हे पुस्तक कमालीचे लज्जतदार आहे! थोडक्यात, जेवढे जास्त संदर्भ माहीत, तेवढी खुमारी अधिक. याचे मुख्य कारण, या मुलाखतीमधील प्रश्न व उत्तरे जरी भूत- वर्तमान- भविष्य या पद्धतीने झालेली असली तरी, या मुलाखती देताना व घेताना समोर त्या त्या वेळचा टीव्ही वरील प्रेक्षक गृहीत धरलेला होता. त्यामुळे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे अगदी थोडक्यात आलेली आहेत, बहुतांश वेळा दोन चार वाक्यांत, क्वचित काही वेळा एकेका परिच्छेदात. मात्र प्रश्नाची संख्या व शब्द संख्या ( अडीच ते तीन हजार ) यांचा विचार केला तर प्रत्येक मुलाखत बऱ्यापैकी मोठी आहे. एक चांगली गोष्ट पुस्तकात केली आहे ती म्हणजे, प्रत्येकी मुलाखतीच्या प्रारंभी एक छोटेसे प्रास्ताविक म्हणावे असे टिपण जोडले आहे. त्यात, त्या राजकारण्याचे खास वैशिष्टय आणि त्या मुलाखतीचा संदर्भ दिलेला आहे, शिवाय त्या मुलाखतीचे वैशिष्टय काय आणि त्यातून वेगळे असे काय पुढे आले हेही नोंदवलेले आहे. यामुळे वाचकांची चांगली सोय होते.
या मुलाखती घेणारा माणूस, त्यावेळच्या भारतातील प्रभावशाली दैनिकाचा अभ्यासू संपादक होता, त्याचा पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव दांडगा व समृद्ध म्हणावा असा होता. वार्तांकनाच्या निमित्ताने अनेक अत्यंत महत्त्वाच्या वा स्फोटक घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होण्याची संधी त्याला मिळालेली होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरण्याची बरीच जास्त संधी त्याला मिळालेली होती. आणि मुख्य म्हणजे त्याने व्यावसायिक नितीमूल्ये सांभाळून, या मोठ्या राजकारण्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केलेले होते, काहींशी तर मैत्रीचे म्हणावेत असे ( उदा. हरकिशन सिंग सुरजित आणि नवाज शरीफ. हे दोघेही पंजाब प्रांतातील आणि शेखर गुप्ताही, त्यामुळे समान भाषा व संस्कृती त्यांच्या मैत्रीसाठी उपयुक्त ठरली असावी. ) त्यामुळे, शेखर गुप्ता यांना या राजकारण्यांशी मुलाखतीत सुर जुळवता येणे आणि त्यांच्या मुखातून काही हळवे, काही परखड, काही कठोर व क्वचित स्फोटक असे बाहेर काढता आले. यातील प्रत्येक राजकारण्याच्या तोंडून काही भाग या मुलाखतीतूनच पहिल्यांदा बाहेर आला आणि त्याची मोठी बातमी झाली. म्हणूनच या पुस्तकाचे Decoding Politicians हे उपशीर्षक अगदी समर्पक आहे. राजकीय नेत्यांच्या तोंडून काही गुपिते उकलण्याचे, काम झाले आहे, त्यांची संकेतिक भाषा उकलण्यासाठी दार थोडे किलकिले झाले आहे. पण एकुणच विचार केला तर, या सर्वांहून महत्वाचे म्हणजे हे राजकीय नेते उलगडून दाखवण्याचे कामही या मुलाखतींमधून उत्तमच झाले आहे.
मुलाखतीचे तंत्र व मुलाखतीची कला यांवरील गुप्ता यांची जबरदस्त पकड यातील सर्वच मुलाखतींमध्ये दिसते, पण त्यात सावधपणा न गमावता कमालीची सहजता आहे. या राजकीय नेत्यांच्या ते आहारी जाताहेत, जास्तीचे नम्र होताहेत असे कुठेही दिसत नाही, त्याच वेळी मुलाखतकाराचा अहंकार किंवा अतिशहाणपणा डोकावतोय असेही कुठे आढळत नाही. मात्र आपण पत्रकार संपादक आहोत, आपला पत्रकारितेचा धर्म पाळला पाहिजे हे त्यांचे भानही कुठे सुटत नाही. त्याचवेळी हे सर्व राजकारणी आपापल्या क्षेत्रातले नुसतेच दिग्गज आहेत असे नाही; तर हे लोक प्रतिभाशाली आहेत, बुद्धिमान आहेत, सर्जनशील आहेत, त्यांचे कर्तृत्व निर्विवाद आहे याची जाणीवही या मुलाखती घेताना सुटलेली दिसत नाही. ( बुद्धिमान व प्रतिभाशाली हे विशेषण या पुस्तकातील फक्त के. सुदर्शन यांना लावता येणार नाही, त्या मुलाखतीच्या छोट्या प्रास्ताविक टिपणातूनही असेच सूचित होते आहे.) असो. तर असे अनेक घटक जुळून आल्याने, या मुलाखती वाचताना आपण अचंबित होत राहतो.
यातील प्रत्येक राजकारण्याने मोकळेपणाने संवाद साधलेला आहे, पण त्यात नेमकेपणा आहे, स्पष्टता आहे. स्वतःच्या वा पक्षाच्या भूमिका व धोरणे, घेतलेल्या निर्णयांची योग्य अयोग्यता, राज्य वा राष्ट्रासमोरील समस्या, याबाबत आपल्याला त्यांच्याबाबत कितीही उलट सुलट दिसत आले असले तरी, या त्यांच्या तोंडून मात्र त्यातील तार्किकता किंवा व्यवहार्यता किंवा त्या काळाची गरज अशाच पद्धतीने ते पुढे येते. यातील प्रत्येकाने एकदा तरी असे म्हटले आहे की, "त्या विषयावर आता किंवा पुढेही कधीच बोलणे योग्य ठरणार नाही." उदाहरणार्थ, भारताने अणुचाचण्या करू नयेत असा दबाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आणला होता असे बोलले गेले, त्यात कितपत तथ्य आहे, या प्रश्नावर नरसिंह राव यांचे उत्तर होते, "काही प्रश्न माझ्या बरोबरच दफन होतील, त्यापैकी हा एक आहे."
यातील प्रत्येक राजकारण्यांने स्वतः ची वा पक्षाची एक तरी चूक कबुल केली आहे. उदाहरणार्थ 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादणे ही चूक होती एवढेच सांगून सोनिया गांधी थांबत नाहीत, तसे इंदिरा गांधींनाही वाटतं होते अशी माहिती पुरवतात. काही नेत्यांना त्यांच्या कार्य काळातील आपत्तीची जबाबदारी शिरावर घेण्यास गुप्ता यांनी अनेक उपप्रश्न विचारून भाग पाडले आहे. उदाहरणार्थ, "गुजरातमधील 2002 च्या दंगलीच्या काळात मी मुख्यमंत्री होतो, त्यामुळे जे काही झाले त्याची जबाबदारी मी टाळू शकत नाही ", या उत्तरापर्यंत नरेंद्र मोदींना आणले आहे. काही उत्तरांच्या वेळी स्वतः शेखर गुप्ताही चकित झाले आहेत. उदाहरणार्थ, द्रमुकने स्वतंत्र द्रविडस्थानची मागणी का सोडून दिली यावर एम करुणानिधी यांचे उत्तर, राजकारण व भारताची अखंडता याबद्दल कोणालाही अधिक आश्वस्त करणारे आहे.
काही राजकारण्यांना या मुलाखतीच्या निमित्ताने, अधिकृतपणे एक सर्वपरिचित मुद्दा नोंदवून ठेवावा अशी इच्छा झाली. उदाहरणार्थ, पंतप्रधान होण्याची संधी माकपने नाकारली ही चूक होती, हे ज्योती बसू यांना सांगायचे होते आणि तसा प्रश्न विचारला जावा असे ते आधीच्या उत्तरातून सूचित करीत होते. गंमत म्हणजे, "हो मला माहित आहे तो प्रश्न विचारला जावा अशी तुमची इच्छा आहे, पण मी त्याकडे नंतर येणार आहे" असे गुप्ता म्हणतात आणि पुढे स्वतःला विचारायचा आहे त्याच प्रश्नाकडे 90 वर्षांच्या ज्योतीबाबुचे लक्ष वेधतात. काही नेत्यांना, तुमच्या विचारसरणीच्या अनुयायांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न विचारून त्यांच्या तोंडून व्यवहार्य व राष्ट्रहिताचे उत्तर काढण्यातही गुप्ता यशस्वी झाले आहेत. उदाहरणार्थ , भारतातील माओवाद्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न नेपाळचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या प्रचंड यांना विचारला आहे, तर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्याशी भाजपचे नातेसंबंध किती गहन आहेत, हा प्रश्न अडवाणी यांना विचारला आहे.
या पुस्तकात समाविष्ट करायची गरज नव्हती, असे एकाही मुलाखतीबाबत वाटत नाही. मात्र राजकारणी म्हणून अगदीच कच्चा व संकुचित म्हणावा असा नेता, यातून पुढे येतो तो अरुण शौरी. आणि बोफोर्सला अतिरंजित स्वरूपात पुढे आणून देशाच्या राजकारणाला धोकादायक वळण दिले, असे व्ही. पी सिंग यांची मुलाखत वाचून वाटू शकते. गावरान शहाणपण असलेला नेता म्हणून मुलायम पुढे येतात. प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, अरुण जेटली हे नेते बुद्धिमान आहेत, पण मास लीडर नाहीत, हे चांगलेच ठसते. फार बुद्धिमान नाही आणि मास लीडरही नाही, तरीही राजकारणात मोठी मजल मारता येते, हे राजनाथ सिंग यांच्या मुलाखतीतून अधोरेखित होते.
अरुण सिंग खूप संवेदनशील आहेत, पण त्याची शिक्षा नियतीने त्यांना दिली असे वाटू शकते. प्रकाश सिंग बादल यांनी जे भोगले त्यासाठी त्यांच्याविषयी कौतुक व सहानुभूती दाटून येते. मायावतींनी अनेक कोलांटउड्या मारल्या, त्या समर्थनीय नाही पण क्षम्य आहेत अशी भावना मनात येऊ शकते. नितीश कुमार कायम कोंडीत अडकलेले राहणार, तेच त्यांचे भागध्येय आहे यावर शिक्कामोर्तब होते, तर हरकिशन सुरजित यांची प्रतिमा आणि वास्तव यात फरक आहे असे सूचित होते. डेव्हिड कॅमेरून यांच्या मुलाखतीतून, 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले' असे ब्रिटनबाबत म्हटले जाते ते उगाच नाही, याची प्रचिती येते. डिप्लोमॅट म्हणून हेन्री कीसिंजर यांच्याविषयी दरारा वाटतो, पण आपुलकी वाटावा असा हा माणूस नाही, याची खात्री पटते.
भारताने नवे आर्थिक धोरण 1991 मध्ये स्वीकारले, त्याचे दोन प्रमुख शिलेदार म्हणजे नरसिंह राव आणि मनमोहन सिंग. या दोघांच्याही मुलाखती त्या संदर्भात मूलभूत असे काही सांगू पाहतात. त्या मुलाखती 2004 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना घेतलेल्या आहेत. "आम्ही आर्थिक धोरणाचा मार्ग बदलला नाही, यू टर्न घेतला नाही", असे सांगून राव म्हणतात, "आपला देश ज्या मार्गावरून चालला होता, त्या मार्गावर वळण आले, म्हणून आम्ही वळलो इतकेच." त्याच संदर्भात, एका प्रश्नाला उत्तर देताना मनमोहन सिंग म्हणतात, "लायसन्स व परमिट राज समाप्त करावे असा पेपर मी 1972 मध्ये लिहिला होता आणि इंदिरा गांधी यांना तो सुपूर्दही केला होता". म्हणजे भारताने आर्थिक सुधारणा मार्गावरून वीस वर्षे आधी टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू केला असता, तर 1991 ला अचानक मोठे व त्रासदायक वळण भारताच्या मार्गावर आले नसते, असा अर्थ त्यातून निघतो. आणखी विशेष हे आहे की, मनमोहन सिंग या मुलाखतीत स्वतः ला रूढ अर्थाने नाही, पण विशिष्ट प्रकारचा समाजवादी म्हणवून घेतात.
एकंदरीत विचार करता प्रत्येक मुलाखत काही ना काही वेगळे देऊन जाते, आपल्या विचार प्रक्रियेला चालनाही देते. त्यामुळे यातील मुलाखतींबाबत फार डावे उजवे करता येणार नसले तरी नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, नरसिंह राव, सोनिया गांधी, व्ही पी सिंग, अडवाणी, करुणानिधी, किसिंजर, प्रचंड, कॅमेरून यांच्या मुलाखती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आशय लक्षात टॉप टेन म्हणाव्यात अशा आहेत.
मात्र सर्वोत्तम मुलाखत म्हणून कदाचित नवाज शरीफ यांचाच उल्लेख करावा लागेल. मुशर्रफ यांनी त्यांचे सरकार हटवून त्यांना दहा वर्षांसाठी हद्दपार केले त्या काळात लंडनमध्ये झालेली ही मुलाखत आहे. एका भारतीय पत्रकारांशी इतके मोकळेपणाने व इतक्या आतल्या गोटातील माहिती सांगणारी त्यांची ती एकमेव मुलाखत असावी. "झिया उल हक या हुकुमशहाच्या काळात तुम्ही त्यांचे विश्वासू म्हणून मानले जात होता, तर त्याविषयी सांगा", या प्रश्नाला त्यांनी दोन वेळा बगल दिली आहे, तरीही ही मुलाखत उत्कृष्ठ झाली आहे. बऱ्यापैकी प्रांजळपणे ते व्यक्त झाले आहेत, हद्दपारीची शिक्षा भोगत असल्यानेही कदाचित. कारगिल युद्ध झाले ते लष्कर प्रमुख मुशर्रफ यांच्यामुळेच असे ते निःसंदिग्ध पणे सांगतात, त्यावेळी भारत पाकिस्तान अणु युद्धाच्या उंबरठ्यावर होते, ते टाळण्याचे श्रेय क्लिंटन, वाजपेयी व शरीफ यांचे आहे, असेही सांगतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, भारत देश संविधानाला चिकटून राहिला, पाकिस्तानला ते अजिबात जमले नाही हे सांगताना त्यांच्यातील राष्ट्र नेत्याची व्यथा वेदना लपून राहत नाही. राज्य घटनेला चिकटून राहण्याचे महत्त्व विशद करताना, त्यांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारे नेते भारतात होते हेही ध्वनित केले आहे. यातून आपोआपच निष्कर्ष पुढे येतो तो हाच की, धर्मनिरपेक्ष राष्ट्र हाच पाया मानल्यामुळे भारत देश टिकून राहिला आहे आणि पाकिस्तान मात्र राजकीय अस्थिरतेच्या भोवऱ्यातून कधीच बाहेर पडू शकलेला नाही. कारण पाकिस्तान ने जन्मापासूनच स्वतः ला मुस्लिम राष्ट्र घोषित केले आहे. आणि धर्मावर आधारित राष्ट्रामध्ये लोकशाही कधीच नांदू शकत नाही. किंबहुना धर्म , वंश, वर्ग यांना मध्यवर्ती ठेवून ज्या देशाची राज्य घटना तयार केली जाते तिथे लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात येऊच शकत नाही. तिथे लोकशाहीवादी राजकीय नेते उभेच राहू शकत नाहीत.
असो... तर राजकारण आणि राजकीय नेते यांच्याविषयी आपले आकलन अधिक सम्यक व सकारात्मक व्हावे असे वाटत असेल तर हा मुलाखतसंग्रह वाचायला हवा.
- विनोद शिरसाठ, पुणे
vinod.shirsath@gmail.com
Walk the Talk : Decoding Politicians
Shekhar Gupta
Rupa Publicatioms, New Delhi
Pages 350, Rs 595
Tags: विनोद शिरसाठ वॉक द टॉक शेखर गुप्ता मुलाखत ज्योती बसू नरेंद्र मोदी नवाज शरीफ नरसिंहराव सोनिया गांधी मनमोहन सिंह vinod shirsath walk the talk shekhar gupta narendra modi nawaz sharif book review Load More Tags
Add Comment