अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात!

‘वाचन जागर’मधील प्रकाशकाची मुलाखत : 4

1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.

पुस्तकविक्रीने व्यवसायाची सुरुवात केलेल्या केशवराव कोठावळे यांनी 1952मध्ये ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ची स्थापना केली. ‘विवाहानंतर’ हे श्रीमती मालतीबाई दांडेकर यांचे पुस्तक म्हणजे ‘मॅजेस्टिक’चे पहिले प्रकाशन. गो.नी. दांडेकर, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, सुभाष भेंडे, ह. मो. मराठे, वसंत सरवटे, श्री.ज. जोशी, दि.वि. गोखले, रत्नाकर मतकरी, श्री.ना. पेंडसे, गोविंद तळवलकर, शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, आशा बगे, विजया राजाध्यक्ष, उत्तम बंडू तुपे, भारत सासणे, मुकुंद टाकसाळे यांसारखे अनेक मान्यवर साहित्यिक हळूहळू ‘मॅजेस्टिक’शी जोडले गेले.

केशवराव कोठावळे यांनी 1964मध्ये ‘ललित’ मासिकाची सुरुवात केली. ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांचे ‘दीपावली’ वार्षिक प्रसिद्ध करण्यास केशवराव कोठावळे यांनी 1978पासून सुरुवात केली. दीपावलीला ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ’, ‘स्व. सीतादेवी सोमाणी प्रतिष्ठान, बार्शी’, ‘रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ’ इत्यादी पारितोषिके मिळाली. ललित साहित्याबरोबरच आरोग्य, मानसशास्त्र, पाककला, धार्मिक, इतिहास, व्यवस्थापन, क्रीडा, युद्ध, खास स्त्रियांसाठी, इंग्रजी संभाषण अशी विविध विषयांवरची पुस्तके मॅजेस्टिक प्रसिद्ध करते.

‘सत्तांतर’ - व्यंकटेश माडगूळकर, ‘स्मरणगाथा’ - गो.नी. दांडेकर, ‘ताम्रपट’ - रंगनाथ पठारे या मॅजेस्टिकच्या पुस्तकांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाले... याशिवाय महाराष्ट्र राज्य पुरस्कार, दमाणी पुरस्कार, केशव भिकाजी ढवळे, बा. ग. ढवळे, 'म.सा.प.', ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ यांसारखे आणखी अनेक पुरस्कार मॅजेस्टिक प्रकाशनाच्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत. मराठी प्रकाशन क्षेत्रात मानाचे मानले जाणारे ‘वि.पु. भागवत पारितोषिक’ मॅजेस्टिकला मिळाले. आतापर्यंत साहित्य तसेच विविध विषयांवरील सुमारे दोन हजारांहून अधिक पुस्तके मॅजेस्टिकने प्रकाशित केली आहेत.

मॅजेस्टिकचे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या निधनानंतर अशोक कोठावळे मॅजेस्टिकचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. 2004मध्ये औरंगाबाद इथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेना’त अशोक कोठावळे यांना ‘उत्कृष्ट प्रकाशना’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  ‘द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’, न्यू दिल्ली या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘प्रथितयश पुस्तकविक्रेता पारितोषिका’साठी (For the Distingushed Book Seller Award) अशोक कोठावळे यांची निवड झाली. सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी 'महाराष्ट्र राज्य सरकार'तर्फे देण्यात येणारा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ 2012मध्ये मॅजेस्टिकला देण्यात आला. ‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने कोठावळे यांच्याशी साधलेला संवाद...
 
प्रश्न - प्रकाशन व्यवसायातल्या तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या?
- माझे वडील केशवराव कोठावळे यांनी ही प्रकाशन संस्था सुरू केली. 1983मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर मी ललितचं आणि मॅजेस्टिकचं काम पाहू लागलो. लेखकांशी चर्चा करणे, त्यांची पुस्तकं काढणं या सगळ्याची आवड मला आधीपासूनच होती. गो.नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, श्री.ज. जोशी, मधु मंगेश कर्णिक अशा मोठमोठ्या लेखकांना मी लहानपणापासून पाहत होतो... त्यामुळे प्रकाशक म्हणून काम करणं हीच मुळात आवडीची गोष्ट होती. इतर व्यवसायांच्या तुलनेत माझं काम मला सर्जनशीलतेला चालना देणारं, निर्मितीचा आनंद देणारं असं नेहमीच वाटत आलं आहे. आर्थिक यशापयश हा भाग वेगळा... पण कुठल्याही पुस्तकाची निर्मिती होताना आनंद असतोच.

मी काम सुरू केलं तेव्हा अशा मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रेसमध्ये चालू होती... पण नवोदिताचं एखादं पुस्तक एखादा प्रकाशक प्रकाशित करतो आणि ते यशस्वी होतं तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो. अगदी सुरुवातीच्या काळात अनंत सामंत यांची ‘एम टी आयवा मारू’ ही कादंबरी माझ्याकडे आली. त्याआधी ती दोन प्रकाशकांनी नाकारलेली होती. मी ती कादंबरी वाचली आणि स्वीकारली. प्रकाशित झाल्यानंतर ती कादंबरी खूप गाजली. त्या लेखकाचंही ते पहिलंच पुस्तक होतं. तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता.  

प्रश्न - पुस्तक प्रकाशित करताना विषयांची चाळणी कशी लावता?
- आम्ही ललित, वैचारिक, उपयुक्ततावादी अशा सगळ्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करतो. एका विद्वान प्रकाशकानं एके ठिकाणी उपेक्षित सुरात असं म्हटलं होतं की, काही प्रकाशक नुसती रेसिपीवरची, कामशास्त्रावरची पुस्तकं प्रकाशित करतात. मला वाटतं की, तीसुद्धा समाजाची गरज आहे. संपादकांनी एवढाच विचार करायला हवा की, अशा विषयांवर तुम्ही चांगलं पुस्तक देता का? ‘निरामय कामजीवन’ नावाचं डॉ.विठ्ठल प्रभूंचं पुस्तक आम्ही काढलं आहे. या विषयावर त्याआधी काढली गेलेली पुस्तकं भावना उद्दीपित करणारी होती. हे पुस्तक मात्र शास्त्रीय माहिती देणारं आहे.

प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची संख्या अलीकडे खूप वाढते आहे.1964मध्ये माझ्या वडलांनी विकास पुस्तकांची माला काढली होती. सभेत कसे बोलावे, मित्र कसे मिळवावेत, संभाषणकला कशी आत्मसात करावी, व्यवहारचतुर कसे व्हावे अशा विषयांवरची ती छोटीछोटी पुस्तकं होती. प्रकाशकाकडे ही दृष्टी असणं गरजेचं आहे. प्रकाशक जे पुस्तक प्रकाशित करतो ते तो स्वतःसाठी करत नाही. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा वाचक असतो. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं मराठीत येणं आवश्यक आहे. आता ती येत आहेत. अर्थात ‘मी फक्त वैचारिक किंवा फक्त ललित पुस्तकंच काढेन’ हेच एखाद्या प्रकाशकाचं ध्येय असू शकतं. तेही चांगलंच आहे... पण म्हणून उपयुक्ततावादी पुस्तकांना कमी लेखण्याची गरज नाही आणि त्यापलीकडे त्या प्रकाशकानं किती वैचारिक, ललित साहित्य प्रकाशित केलेलं आहे; किती लेखकांना पुढे आणलेलं आहे; किती लेखक त्या प्रकाशकासोबत गेले आहेत हेसुद्धा आपण पाहिलं पाहिजे. ‘बेस्ट सेलर’ पुस्तकं प्रकाशकाला व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी आर्थिक पाठबळ देतात.
 
प्रश्न - एखादं पुस्तक आपण प्रकाशित करावं की नाही हे तुम्ही कसं ठरवता?
- अनंत सामंतांचं उदाहरण मी दिलंच. वाचकाला खेचून घेण्याची ताकद त्यांच्या लेखनात होती. दुसरं उदाहरण आमच्या एका नव्या पुस्तकाचं आहे. ‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ नावाचं हे पुस्तक आहे. जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला या लेखकाचा विरोध आहे. त्यानं त्या प्रकल्पावर ‘हाय पॉवर’ नावाची फिल्म केली. तिला फ्रान्समध्ये ‘यलो ऑस्कर’ नावाचा मोठा पुरस्कार मिळाला. फिल्म करताना त्याला भारतात खूप त्रास झाला. त्या फिल्मचे फ्रान्समध्ये शो झाले. त्या निमित्ताने अनेक व्यक्तींशी त्याचा परिचय झाला. या सगळ्या अनुभवांवर त्यानं लिहिलं आहे.

या पुस्तकात मला विषयाचं वेगळेपण दिसलं, मांडणी वेगळी होती. त्यानं स्वतः केलेलं कामही महत्त्वाचं होतं. आर्थिक चणचण असूनही ही फिल्म करताना त्यानं जो संघर्ष केला... तो त्याचा प्रवास सगळ्यांना काहीतरी शिकवणारा, प्रेरणा देणारा आहे. या सगळ्या निकषांवरच आम्ही पुस्तक निवडलं. आता हे पुस्तक किती खपेल याचा विचारही ते काढताना मी केलेला नाही... पण याच्यावर काही चांगले अभिप्राय आले तर ते चांगलं खपेल आणि ते यावेत यासाठी मी प्रयत्नही करेन.
 
आमच्या दिवाळी अंकातसुद्धा मी नवीन कथेसाठी नेहमी जागा ठेवलेली असते आणि अचानक एखाद्या नवोदित लेखकाची चांगली कथा मिळूनही जाते. काही वेळा आमच्या अंकामुळे त्या लेखकांना चांगला वाचकवर्ग मिळतो. आमच्या वितरणव्यवस्थेमुळे तो लेखक वाचकांपर्यंत पोहोचू शकतो. अशा गोष्टींचं समाधान वाटतं.
 
प्रश्न - पूर्वी विशिष्ट लेखकांचे विशिष्ट वाचक असायचे. त्या त्या लेखकाचं नवीन पुस्तक येण्याची ते वाट बघायचे.  आता असे विशिष्ट लेखकांचे ‘चाहते’ वाचक एवढे राहिलेले नाहीत. याचं कारण काय वाटतं तुम्हाला?
- पूर्वीच्या काळात असे वाचक होते... कारण तेव्हा लेखक सातत्यानं लिहीत असायचे. दळवी, पेंडसे, खानोलकर, मधु मंगेश कर्णिक अशा अनेक लेखकांचा विशिष्ट वाचकवर्ग असायचा. सध्याच्या काळात खूप लेखन करणारे लेखक नाहीत. सध्या मला असं वाटतं की, दोनतीन पुस्तकांतच लेखक संपून जातो. सध्याच्या काळात सातत्यानं लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये भारत सासणे, राजन खान यांची नावं सांगता येतील. ते सातत्यानं कथा-लघुकथा लिहीत आहेत.

पुस्तक हे नेहमी लेखकांच्या नावानंच ओळखलं जातं. उदाहरणार्थ, जयवंत दळवींचं पुस्तक हे ‘जयवंत दळवीं’चं म्हणून मागितलं जातं; ते मॅजेस्टिकचं आहे म्हणून मागितलं जात नाही. समजा, जयवंत दळवींची एखादी डावी कादंबरी निघाली असली तर लोक असं म्हणणार नाहीत की, मॅजेस्टिकनं हे काय काढलं? ते म्हणतील, ‘दळवींनी असं का लिहिलं?’ त्यामुळे आपला दर्जा टिकवणं हे लेखकासाठी आवश्यक असतं. कित्येक लेखकांच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की, त्यांना नवीन काही सुचत नाही... पण तरी ते लिहीत राहिलेत. वेळीच थांबलेले लेखक मी फार कमी पाहिले आहेत... विंदा करंदीकरांसारखे....
 
प्रश्न - तुमच्या वडलांकडून हा व्यवसाय तुमच्याकडे हस्तांतरित झाला... त्यालाही आता बरीच वर्षं झाली. आता तर पुस्तकं, वाचक सगळंच बदललं आहे. या व्यवसायात डिजिटल तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. हे स्थित्यंतर मॅजेस्टिकमध्ये होत आहे का?
 - आम्हाला इ बुक्स करायची आहेत... पण अजूनही इ बुक्स, किंडल यांना फारसा प्रतिसाद नाही. सध्याच्या काळात लेखनाच्या बाबतीत जे बदल होत आहेत त्यांच्याविषयी मला असं वाटतं की, पूर्वी कादंबऱ्या ज्या प्रमाणात लिहिल्या जायच्या त्या प्रमाणात आता त्या लिहिल्या जात नाहीत. पूर्वी योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर यांच्यासारख्या स्त्री-कादंबरीकारही बऱ्याच होत्या. आज रवींद्र शोभणे किंवा रंगनाथ पठारे अशी काही नावं सोडली तर आपल्याकडे कादंबरीकारांचं प्रमाण कमीच आहे. एक खरं की, आत्ताचे कादंबरीकार अभ्यास करून लिहीत आहेत. त्या अर्थी श्री.ना. पेंडशांनी अभ्यास करून कुठली कादंबरी लिहिली असेल असं मला वाटत नाही. पेंडसे किंवा दळवी ज्या परिसरात वावरत होते त्या परिसरातल्याच त्यांच्या व्यक्तिरेखा आहेत. त्या त्यांनी पाहिलेल्याच होत्या. मग त्यात लेखक म्हणून जी कल्पनाशक्ती वापरावी लागते... ती त्यांनी वापरली. त्यांचं लेखन मुख्यतः त्यांच्या जगण्याशी संबंधितच होतं. अलीकडेच मी ‘चौघी जणी’ नावाचा दळवींचा एक उत्तम लेख वाचला... तेव्हा माझ्या लक्षात आलं की, या व्यक्तिरेखा त्यांच्या कादंबऱ्यांत या ना त्या कारणानं आलेल्या आहेत. दळवींनी त्यात लिहिलं आहे की, वर्षातून एकदोनदाच त्या स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा प्रसंग येत असे. आणि त्या वेळी चपला शोधण्यासाठी त्यांची जी शोधाशोध होत असे ती पाहण्यासारखी असायची. त्या चपला वापरल्याच गेल्या नसल्याने त्यांच्या पायात सहजासहजी शिरतही नसत. किती साध्याशाच प्रसंगातून दळवींनी त्या काळच्या स्त्रीजीवनाचं चित्र उभं केलं आहे.   
 
प्रश्न - पण अलीकडे आपलं आजचं जगणं मर्यादित लोकांपुरतं उरलं आहे... त्यामुळे निरीक्षण करायला आजूबाजूला इतकी माणसंच नसतात...
- खरं आहे. पेंडसे, खानोलकर, कर्णिक हे सगळे लेखक कोकणातून आले होते. त्यांनी पाहिलेलं कोकण त्यांच्या कादंबऱ्यांत आलं. आजकाल राजकारणाबद्दल जास्त लिहिलं जातं. राजकीय स्थित्यंतरावरच्या, रवींद्र शोभणे यांच्या तीन कादंबऱ्या आम्ही प्रकाशित केल्या आहेत. अशा विषयांवर लिहिताना केवळ कल्पनेनं लिहिता येणार नाही. चुकीच्या संदर्भामुळे गोंधळ होऊ शकतो. अशा लेखनासाठी अभ्यास करावाच लागतो. ह.मो. मराठ्यांनी उद्योगजगतातील कामगार-मालक संघर्षावर लिहिलं आहे... पण त्यासाठी त्यांना औद्योगिक जगाचा काही अभ्यास करणं, वर्तमानपत्रांतल्या बातम्यांचे संदर्भ बघणं हे करावंच लागलं असणर आहे... पण त्यामुळे निदान काही नवीन विषय साहित्यात आले.... 
 
प्रश्न - मॅजेस्टिक आत्तापर्यंत ज्या तत्त्वांनी काम करत आली तशीच ती पुढे करत राहावी म्हणून पुढची पिढी तयार करण्यासाठी तुम्ही काय करता?
- मी या व्यवसायात आलो ते मला लेखकांशी त्यांच्या वाचनाविषयी चर्चा करण्याची आवड होती म्हणून. माझा मुलगाही आता या व्यवसायात आहे. आम्ही ज्या नजरेनं या व्यवसायाकडे पाहत होतो... त्याच्याहून वेगळ्या नजरेनं ही मुलं पाहतात... त्यामुळे या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या काही सुधारणाही होऊ शकतील. मी मात्र तंत्रज्ञानात खूप मागे आहे. माझा मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की, शिवाजीमंदिरला दुकानात जाऊन बस. तो म्हणाला, ‘मी तिथे जाऊन काय करू?’ मी त्याला म्हटलं, ‘तू काही करू नकोस. नुसतं जाऊन बस.’ पण दोनेक महिन्यांत त्याला इतकी आवड निर्माण झाली की, तोच मला कायकाय सांगू लागला. कोणत्या पुस्तकांना वाचक आहे, कोणत्या लेखकांना वाचक आहे हे त्याला समजायला लागलं. बाबांची परंपरा धरून ठेवण्याचा आणि तीच वाढवण्याचा मी प्रयत्न केला... पण त्याचा विचार आता काहीतरी वेगळं असू शकेल. तो आता पूर्ण वेळ या व्यवसायात आहे. ‘आपल्याला या व्यवसायातूनच काहीतरी करायचं आहे...’ या जाणिवेतून चांगल्या कल्पना सुचू शकतात आणि तसा तो कल्पक आहे.
 
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सवा’साठी तुम्ही निवडलेल्या मॅजेस्टिकच्या 25 पुस्तकांविषयी काय सांगाल?
 - ती मुख्यतः माझ्या मुलानं निवडली आहेत. मी त्याला एकच गोष्ट सांगितली की, जी पुस्तकं वाचकांपर्यंत जायला पाहिजेत असं वाटतं तीच पुस्तकं निवड; मग ते बेस्ट सेलर नसलं तरी चालेल... त्यामुळे आम्ही सगळी नवी आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं निवडली आहेत.
 
प्रश्न - ‘वाचन जागर’सारखे महोत्सव - विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर - किती आवश्यक आहेत असं वाटतं?
 - वाचकांना दुकानापर्यंत आणण्यासाठी काहीतरी निमित्त झालं पाहिजे. 25 टक्के ही बऱ्यापैकी सवलत आहे. या निमित्तानं वर्तमानपत्रांत बातम्याही येतात. आपल्या व्यवसायात जाहिराती फारशा परवडत नाहीत... पण बातम्यांमुळे वातावरणनिर्मिती होते. मला नेहमी असं वाटतं की, काही करून माणूस एकदा दुकानापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणजे तो सगळीच पुस्तकं पाहू शकतो. आमचा बुक क्लब होता. तिथे वर्गणी भरायला लोक यायचे, रक्कम काही विशेष नसायची... पण येताना तो मनुष्य आपल्या एखाद्या मित्राला आणायचा. तो मित्र कधी पुस्तकांच्या दुकानातसुद्धा गेलेला नसायचा... पण तिथे आल्यावर तोही बुक क्लबमध्ये रस दाखवायचा. असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खूप फायदे असतात....

या वर्षी कोरोनामुळे आम्ही दिवाळी अंक मागच्या वर्षीच्या 50 टक्केच छापायला सांगितले होते... पण दिवाळी जसजशी जवळ येत चालली तसतशी मागणी वाढत गेली. आणि मागच्या वर्षींच्या 80 टक्के अंकांची विक्री झाली. हा अप्रत्यक्ष फायदा असतो.

(मुलाखत - मृद्‌गंधा दीक्षित, शब्दांकन - सुहास पाटील) 


वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी 


हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :

अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे !  - अरुण जाखडे

डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड

प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर

Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव मॅजेस्टिक प्रकाशन अशोक कोठावळे मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्‌गंधा दीक्षित सुहास पाटील Interview Vachan Jagar Mahotsav Majestic Prakashan Ashok Kothawale Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Suhas Patil Load More Tags

Add Comment

संबंधित लेख