1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक-प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.
रोहन प्रकाशनाची स्थापना 1983 मध्ये झाली. स्थापनेपासूनच रोहन प्रकाशन साहित्य, सामाजिक, राजकीय, इतिहास, आरोग्य, नाटक, कला आणि कौशल्ये असे विविध विषय हाताळत आहे. किशोरसाहित्यातही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. तसेच इंग्रजीतील उत्तम साहित्यदेखील मराठीत आणण्याचे काम रोहन करत आहे. रोहनने आजवर साडेपाचशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. लालबहादूर शास्त्री यांचे चरित्र, कस्तुरबा गांधी यांचे चरित्र, श्री. यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र अशा काही महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश त्यांत आहे. त्यांच्या ‘यांनी घडवले सहस्रक’, असा घडला भारत (1947-2012) यांसारख्या अतिशय मौलिक संशोधनपर ग्रंथांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे... तर देशपातळीवर दखल घेण्यात आली.
पुस्तकनिर्मितीमध्ये संपादक मंडळाचे महत्त्व ध्यानात घेऊन रोहनने चांगल्या संपादकांची मोट बांधली. त्याचा परिणाम उत्तम दर्जाच्या पुस्तकनिर्मितीत दिसून येत आहे. मराठीतील प्रतिष्ठित प्रकाशकांमध्ये रोहनने स्थान मिळवले आहे. त्यांचे मुख्य ऑफिस पुण्यात तर सेल्स ऑफिस मुंबईमध्ये आहे. रोहनला अनेक राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘रोहन प्रिंट्स’ हा इंग्लीश विभागही सुरू केला आहे. 2008मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनोमोहन सिंग यांच्या हस्ते रोहन प्रिंट्सच्या इंग्लीश पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. प्रदीप चंपानेरकर हे रोहन प्रकाशनाचे संचालक आहेत. ‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - प्रकाशन व्यवसायातलं समाधान काय आहे?
- मी गेली 37 वर्षं या व्यवसायात आहे. प्रकाशनामध्ये कसंय की... व्यवसायासोबत लोकांना प्रगल्भ करण्याचं समाधानही मिळतं. माहितीपूर्ण पुस्तकांमधून तुम्ही योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवता, सामाजिक विषयावरच्या पुस्तकांनी लोकांमधला अवेअरनेस वाढण्यासाठी मदत करता, वैचारिक पुस्तकांनी वाचकांच्या विचारांना चालना देण्याचं काम करता. ललित, फिक्शन पुस्तकांनीदेखील वाचकाचा अवकाश वाढतच असतो. हा व्यवसाय मटेरिअलिस्टीक नाहीये असं मला वाटतं. माझी सर्जनशीलता मला माझ्या व्यवसायात वापरता येते. लेखकाकडून लिखाण घेणं आणि प्रिंटिंग करणाऱ्याकडून ते छापून घेणं एवढीच प्रकाशकाची भूमिका मर्यादित आहे असं मला वाटत नाही.
प्रकाशन ही मोठी जबाबदारी आहे... कारण छापील गोष्ट आपल्याकडे विश्वासार्ह मानली जाते. आपल्याकडे एखादी संहिता आली तर तिचा सांगोपांग विचार करून आपण लेखकाला काही सूचना करू शकतो. त्या संहितेची खोली वाढावी, तिचा आवाका वाढावा या उद्देशाने काही सुचवू शकतो. रोहनमध्ये आम्ही ग्रुप डिस्कशनला खूप महत्त्व देतो. एखादी संहिता घ्यायची की नाही, तिच्यामध्ये काय बदल आवश्यक आहेत, कुठल्या विषयावर कुणाकडून आपणहून अप्रोच होऊन लिहून घ्यायचं आहे हे सगळं ग्रुप डिस्कशनमध्ये ठरतं. संपादकांची टीम असल्यामुळे ब्रेन स्टॉर्मिंग करता येतं.
एखादा विषय आपण ठरवून संहिता लिहून घेण्यातही गंमत आहे. त्या-त्या विषयातला तज्ज्ञ शोधायचा, त्यांना विषय-हेतू-वाचकवर्ग हे सारं समजून द्यायचं आणि त्याच्याकडून लिहून घ्यायचं. तज्ज्ञ व्यक्ती उत्तम लेखक असतेच असं प्रत्येक वेळी होत नाही. अशा वेळी तिच्यामधला लेखक तयार करणं हेसुद्धा प्रकाशकाचं काम आहे. आत्ता कोरोनाकाळात आम्ही अशीच अनलॉक सिरीज काढली. त्यामध्ये एक मानसशास्त्रज्ञ आहेत, एक शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. तीन डॉक्टर्स आहेत. कोरोना अनलॉकच्या निमित्तानं या सर्व बाजू सांगणारी आणि लोकांना योग्य माहिती देणारी, मदत करणारी आणि धीर देणारी सिरीज आत्ता गरजेची होती असं मला वाटतं. ‘लव्ह इन टाईम ऑफ कोरोना’मध्येसुद्धा आम्ही लेखकांना संकल्पना सांगितली आणि त्यांच्याकडून कथा लिहून घेतल्या.
पुन्हा या व्यवसायात तुमचा संपर्कसुद्धा सर्जनशील लोकांशी येतो. लेखक असेल, तज्ज्ञ मंडळी असतील किंवा उदाहरणार्थ एखादा उद्योजक असेल. त्याला त्याचे अनुभव पुस्तकरूपात आणायचे असतील. अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली सर्जनशील माणसं तुम्हाला इथे भेटतात.
पुन्हा या व्यवसायाकडे, या कामाकडे समाज आदरानं पाहतो हीसुद्धा समाधानाची बाब आहे. लेखक आणि मुद्रक यांच्यातल्या मिडलमनचं काम मी करता कामा नये. प्रकाशकाची जबाबदारी याहून खूप मोठी आहे असं मला वाटतं.
प्रकाशक पुस्तकं घडवतो तशी पुस्तकंपण त्याला घडवत असतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मीसुद्धा इव्हॉल्व्ह होत जातो.
प्रश्न - पण तरी तुम्ही असमाधानी आहात?
- मला वाटतं... प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे म्हणजे त्याच्याकडून अधिकाधिक दर्जेदार काम होत जाईल. काहीतरी वेगळं आणि उत्तमोत्तम करत राहण्याचा ध्यास त्याला असायला हवा.
प्रश्न - आपण क्लासिक्समधून कन्टेम्पररीकडे यायला अजून तयार नाही असं वाटतं तुम्हाला? नवीन लेखकांना त्यामुळे मर्यादा येतात?
- आपल्याकडे नाऽ एक प्रथा पडलेली आहे की, मुलगा ठरावीक वर्षांचा झाला की त्याला ययाती वाचायला द्यायचं; स्वामी, मृत्युंजय द्यायचं...म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार होतात... तर तुझं म्हणणं एका अर्थानं बरोबर आहे की, यामुळे आपल्या वाचनाला मर्यादा येतात, नवीन लेखनावर मर्यादा येतात. दोन पावलं पुढं जाऊन वेगळं साहित्य आपल्या मुलांपर्यंत पोहोचावं असे पालकांचे प्रयत्न दिसत नाहीत. त्यांना वाटतं की, आपल्या मुलानं पु. ल. देशपांडे आणि चार बाकीचे लेखक वाचले म्हणजे माझा मुलगा परिपूर्ण झाला. मुळात आपला मुलगा प्रगल्भ व्हावा, त्यानं विचार करायला शिकावं, मुलांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण व्हाव्यात असंच पालकांना वाटत नाही. त्यानं डिग्री मिळवावी आणि लवकरात लवकर भरपूर पैसे कमवायला लागावं असंच वाटतं. साहित्य ही फार कमी लोकांची गरज उरलेली आहे.
प्रश्न - तुम्ही नवीन लेखकांसाठी कोणते निकष लावता?
- सर्जनशील लेखनाला प्राधान्य द्यायचं असं आम्ही सध्या ठरवलेलं आहे. नवीन लेखकाचं लेखन घेतानासुद्धा त्याच्या साहित्याचाच कस लागतो. कसदार लेखन, त्याचा विषय, त्याची शैली, आशयाची खोली असं बघूनच संहिता निवडली जाते. कधीकधी प्रथितयश लेखकाचंही साहित्य आपण घेऊ शकत नाही.
आता आम्ही ‘विंचवाचं तेल’ नावाचं पारध्यांवरचं पुस्तक काढलं, त्यावर आम्ही वर्षभर काम केलं. विषय चांगला होता, कन्टेन्ट होता... पण लेखनावर काम करण्याची गरज होती. मग लेखकानं आणि प्रकाशन टीमनं त्यावर काम केलं. ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ यावरसुद्धा असंच काम केलं. आमच्याकडे आलं तेव्हा ते डॉक्युमेन्ट होतं. त्याला वाचनीय करण्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न केले. लेखकांना विश्वासात घेऊन असं काम करता येतं... कारण प्रकाशकाच्या मताची दखल ते घेतात आणि मग एकत्र काम करणं सोयीचं होतं. ‘माझा धनगरवाडा’ म्हणून 800 पानांचं पुस्तक माझ्याकडे आलं. एक मेंढपाळ प्रोफेसर झाल्याची संघर्षकथा आहे ती. आता हा लेखक नवाच होता. तो त्याचे अनुभव लिहीत गेला... पण त्यावर आम्ही दोन संपादक नेमले. लेखकानं आणि त्या दोघांनी मिळून पुस्तकावर काम केलं, 800 ची 375 पानं केली आणि ते पुस्तक अधिक वाचनीय झालं.
प्रश्न - प्रकाशक म्हणून ‘रोहन’च्या हँडओव्हर प्रक्रियेकडे तुम्ही कसे पाहता?
- सुरुवातीला कसं होतं... विषय मीच निवडणार, लेखकांशी मीच बोलणार, संपादन मीच करणार, मुखपृष्ठ मीच करून घेणार... पण आमचं काम वाढत गेलं तशी आम्ही आमची एक टीम बांधत गेलो. टीमवर्क फार गरजेचं वाटतं मला. माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे... पण त्यामुळं आता मला सगळ्यातलं सगळं कळतंय असं वाटू शकतं... तरीही माझ्याकडे जी पस्तिशीतली तरुण मंडळी आहेत त्यांचा विचार मी घेतो, आमच्यामध्ये खूप चर्चा होतात. मी केलेल्या कामातही मी 'टीम रोहन'ला दाखवतो. त्यांचं मत घेतो. त्यांचा व्ह्यू पॉइंट समजून घेतो. आणि आवश्यक वाटल्यास, पटल्यास बदलही करतो.
हँडओव्हर शब्दापेक्षा मला टीमवर्क, पार्टिसिपेशन, विकेंद्रीकरण हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आपली टीम तयार व्हायला पाहिजे. एकट्यानं सगळे निर्णय घेत पुढे जाण्यापेक्षा टीमनं काम केलं... तर अधिक इनपुट्स मिळतात असा माझा तरी अनुभव आहे. मी करतोय तेच भारीय असं काही नसतं. प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो आणि तरुणसुद्धा चांगले इनपुट्स देऊ शकतात... जर आपण सगळ्यांना सहभागी करून घेतलं तर. रोहनमधलं मोकळेपण, चर्चा, टीमवर्क हेच मला आमचं वैशिष्ट्य वाटतं.
आता माझा मुलगा इंजिनिअरिंगमधला आहे. त्याच्यापण वेगळ्याच काहीतरी कल्पना असतात... पण आपण त्या ऐकून घेऊन त्यावर विचार केला तर लक्षात येतं की, त्यातल्या काही आपल्याला उपयोगी येऊ शकतात आणि फक्त मीच असं नाही तर या प्रक्रियेमधून पूर्ण टीमच इव्हॉल्व्ह होत जाते.
प्रश्न - पुस्तकांचे फॉर्मपण बदलतायत. इ बुक यायला लागलेली आहेत.
- इ बुकविषयी बरं काऽ मी बऱ्याच वेगवेगळ्या लोकांशी बोललो... पण त्याचा जेवढा बोलबाला आहे तेवढं काही ते अजून लोकप्रिय झालेलं दिसत नाही. त्याच्या मर्यादा आहेत बऱ्याच. आता पुस्तक छापताना हजारचा आकडा आम्हाला कमी वाटतो... अगदी संदर्भग्रंथामध्ये सुद्धा... पण इ बुकमध्ये मात्र 200 प्रती गेल्या तरी फार मोठा आकडा समजला जातो. अजूनही लोकांनी इ बुक तितकीशी स्वीकारलेली आहेत असं नाही. अजूनही वाचकांना हातांत पुस्तक घेऊन वाचणं अधिक आवडतं... तरी तरुण वाचक इ बुककडे हळूहळू वळेल कदाचित... पण हा ट्रान्झिशन पिरिअड आहे... म्हणजे माझा नातू 12 वर्षांचा आहे. तो मोठा होईल तेव्हा कदाचित किंडलवर वगैरे वाचायला लागेल किंवा तो मोठा झाल्यावर कशाला प्राधान्य देईल हे आत्ताच सांगता येणार नाही.
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सवा’साठी रोहनची 25 पुस्तकं कशी निवडली?
- सामाजिक, वैचारिक, माहितीपूर्ण, चरित्रं, फिक्शन अशी वेगवेगळ्या धाटणीची पुस्तकं महोत्सवात घेतलेली आहेत. लोकप्रिय पुस्तकांबरोबरच दर्जेदार पण तुलनेनं लोकांपर्यंत कमी पोहोचलेलीसुद्धा काही पुस्तकं घेतली आहेत आणि वाचकसुद्धा अशा साहित्याच्या शोधात असतात बरं का...
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सवा’साठी तुम्ही पुढाकार घेतलात. त्यामागचा तुमचा विचार काय आहे? आणि प्रतिसाद कसा मिळतोय?
- कोरोनामध्ये लोकांना आरोग्याच्या चिंता तर आहेतच... बाकी इतरही चिंता बऱ्याच आहेत. सर्व्हायव्हलचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत वाचक पुस्तकांकडे आवर्जून येणं अवघड आहे... पण आपण वाचकांना पुस्तकांकडे आकृष्ट तर केलं पाहिजे. अनेक वाचकांना पुस्तकं हवी होती, हवी आहेत. काहींना मिळाली नाहीत, काही जण कोरोनामुळे पुस्तकं घ्यायला घाबरत आहेत. अशा परिस्थितीत एकट्यानं काम करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून काम केलं तर पुस्तकांच्या दुनियेत पुन्हा घडामोडी घडायला लागतील असं मला वाटतं. काहीतरी हालचाल आमच्याकडून वाचकांना दिसायला हवी आहे आत्ता. बंद पडलेल्या गाडीला चारचौघांनी मिळून धक्का मारावा लागतो... तसंच काहीसं आहे हे. या महोत्सवाचा फायदा लगेच होणार नाही... पण एक चालना मिळेल. कसंयऽ पुण्यामध्ये वगैरे थोडीतरी हालचाल आहे... पण बाहेरगावचे किंवा छोट्या शहरांतले विक्रेते इतके घाबरलेले आहेत की, ते एकही पुस्तक घ्यायला तयार नाहीयेत. त्यांना विश्वास द्यायची गरज आहे. महिनाभरात त्यांच्याकडे समजा पंचवीसच ग्राहक येत असतील... पण महोत्सवाच्या निमित्तानं शंभर जण आले तर तिथे वळण सुरू होईल. विक्रेत्याला त्या शंभर जणांना जोडून घेता येईल. साखळी वाढवता येईल.
आज आम्हाला महोत्सवातून जितका फायदा मिळणार आहे त्याहून अधिक आम्ही त्याच्या जाहिरातीवर खर्च करतोय. पण आम्ही दहा जणांनी मिळून फंड जमा करून जाहिरात केलेली आहे. मी एकटा जाहिरात करणार असेन तर मी एक छोटी जाहिरात देणार आणि गप्प बसणार... पण सगळे एकत्र असल्यामुळे मोठ्या जाहिराती करता आल्या आणि त्याशिवाय तुमची पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचणार कशी? किमान पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचायला पाहिजे.
दहा प्रकाशक एकत्र आले यातून एक वेगळा मेसेज लोकांपर्यंत जाईल. माध्यमंसुद्धा याची दखल घेतील. त्यांनाही वाटेल की, पुस्तक व्यवसायासाठी काहीतरी करायला पाहिजे. माध्यमांना पुस्तकं, साहित्य यांविषयी आस्था आहे. त्यांना हे निमित्त आपण देऊ शकतो आणि शेवटी महोत्सवामागचा हेतू चांगला आहे ना... लोकांना पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करणं. सातत्यानं असे प्रयोग आम्ही करत राहायला पाहिजे तर त्याचे सकारात्मक परिणाम पुढे दिसून येतील.
आत्ताही विक्रेत्यांकडून चांगला प्रतिसाद आहे. आम्ही खूप कमी वेळात ही योजना आखली. कितीतरी विक्रेत्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही... पण आता विक्रेते फोन करून माझ्याकडे तक्रार करतायत की, आम्हाला का सामील करून घेतलं नाही या महोत्सवात? काही मोठे प्रकाशकसुद्धा मला म्हणाले की, आमचं काही चुकलं का? तुम्ही आम्हाला का घेतलं नाही यात? मला महोत्सवाच्या दृष्टीने हा फार सकारात्मक प्रतिसाद वाटतोय. या वेळी आमच्याकडे वेळ खूप कमी होता. मी विनोद शिरसाठ यांना फोन केला तेव्हा त्यांनीही काही अडचणी सांगितल्या... पण महोत्सवाची पूर्ण माहिती आणि हेतू ऐकल्यावर तो एका मिनटात म्हणाले साधना आहे या योजनेमध्ये. असे झटपट निर्णय घेणारे प्रकाशक हवे होते. पुढल्या वेळेला अजून प्रकाशक आणि विक्रेते घेऊन मोठे महोत्सव करता येतील. एक चांगली सुरुवात झालेली आहे. आत्ताही आमच्यात पूर्ण एकवाक्यता होती असं मी म्हणणार नाही... पण सगळ्या प्रकाशकांनी माझ्यावर आणि माझ्या मुलावर विश्वास दाखवला आणि अप्रुव्हल दिलं पटापट. या महोत्सवाच्या निमित्तानं आम्हा प्रकाशकांत एकोपा निर्माण होतोय ही महत्त्वाची गोष्ट आहे.
(मुलाखत आणि शब्दांकन - मृद्गंधा दीक्षित)
वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी
हे ही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :
अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे ! - अरुण जाखडे
डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड
Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव रोहन प्रकाशन प्रदीप चंपानेरकर मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Rohan Prakashan Pradip Champanerkar Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Load More Tags
Add Comment