'शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे' हे ब्रीदवाक्य घेऊन मागील दोन-अडीच दशके कार्यरत असलेल्या अरुण फडके यांचे काल (14 मे 2020) निधन झाले. भाषा आणि लेखन यांची गोडी निर्माण होण्यासाठी त्यांना घरातूनच अनुकूल वातावरण मिळाले होते. मुद्रण व्यवसायाशी थेट संबंध असल्याने त्यांना भाषा वापरातील बारकावे व अडचणी (भाषेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य लोकांच्या तुलनेत) जास्त चांगल्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे वयाच्या चाळिशीमध्ये त्यांना आपले ध्येय सापडले, त्यासाठी चौफेर संचार करण्याचा आत्मविश्वास आला. त्यातून मराठी भाषेचे व्याकरण या विषयावर त्यांनी कमालीचे प्रभुत्व मिळवले. इतके की गेल्या दशकभरात गांभीर्याने लेखन, संपादन, अनुवाद, मुद्रितशोधन करणाऱ्या लोकांमध्ये काही शब्दांबाबत मतभिन्नता निर्माण झाली तर, 'आम्ही अरुण फडके यांना प्रमाण मानतो' असे अगदी सहजपणे सांगणाऱ्यांचा वर्ग आकाराला आलेला होता.
अरुण फडके यांना हे कसे साध्य झाले? व्याकरण हा भाषेच्या संदर्भात अतिशय मूलभूत आणि तरीही कायम दुर्लक्षित व हेळसांड केला जाणारा विषय आहे. पण 1995 मध्ये त्यांचे 'शुद्धलेखन मार्गप्रदीप' हे पुस्तक आले, आणि त्यांचा व्याकरणाच्या क्षेत्रातील दबदबा निर्माण व्हायला सुरुवात झाली. ते पुस्तक आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेली आणखी काही पुस्तके केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्यांपासून अन्य भाषांमधून उत्तम मराठी अनुवाद करणाऱ्यापर्यंत असंख्य लहान-थोरांनी वापरली.
भाषेच्या वापराबाबत निर्माण झालेल्या वादविवादात, वेळप्रसंगी वर्तमानपत्रांत लेख लिहून, तर्कशुद्ध युक्तिवाद करून ते खंडन-मंडन करीत असत. त्याशिवाय शुद्धलेखन आणि मुद्रितशोधन व संपादन यांच्या कार्यशाळा घेत असत. अशा कार्यशाळा राज्यभरात सर्वत्र झाल्या, त्यांची संख्या अडीचशेपर्यंत आली होती. शब्दकोश कसा पाहावा, कोशवाङ्मय कसे वाचावे यासाठीही स्वतंत्र कार्यशाळा ते घेऊ इच्छित होते, मात्र त्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्था फारशा नाहीत ही त्यांची खंत होती. शाळा व महाविद्यालये, विद्यापीठीय स्तरांवरील सर्व विभाग, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, पुस्तक प्रकाशन करणाऱ्या संस्था, प्रशासनात वापरली जाणारी मराठी भाषा, आणि नव्याने येत असलेले तंत्रज्ञान इत्यादी सर्व ठिकाणी प्रमाण मराठी भाषा वापरण्याची चळवळ उभारू इच्छिणारा व त्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असणारा हा व्याकरणी होता.
'अरुण फडके यांची पुस्तके वापरा, त्यांच्या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घ्या' अशा प्रकारच्या सूचना-शिफारशी मागील दहा पंधरा वर्षांत मी अनेक लोकांना केलेल्या होत्या. मात्र फडके यांच्या भेटीचा योग माझ्यासाठी आला नव्हता. तशी संधी जानेवारी 2020 मध्ये आली, ती घेतली आणि आता तीच त्यांची अखेरची कार्यशाळा ठरली आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये साधनाने डिजिटल क्षेत्रात मोठे पाऊल टाकले. साप्ताहिकाच्या पूर्वीच्या अंकांचे डिजिटल अर्काइव्ह, कर्तव्य साधना हे नवे डिजिटल पोर्टल आणि साधना प्रकाशनाची पुस्तके इ-बुक स्वरूपात आणणे, या तिन्ही आघाड्यांवर कामाला प्रारंभ केला. त्यासाठी पाच-सहा तरुणांची पूर्ण वेळ टीम आणि वर्क फ्रॉम होम करू शकणारे आणखी पाच-सहा लोक साथीला घेतले. चांगली क्षमता असणारी व त्या क्षमता वाढवण्याची इच्छा असणारी माणसे त्यासाठी निवडली, पण तरी त्या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मिळत राहणे आवश्यक होते. त्यातला सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणून मी शुद्धलेखन कार्य शाळेकडे पाहत होतो. अर्थातच त्यासाठी अरुण फडके हेच नाव मनात होते, आणि त्याच दरम्यान त्यांची शिष्या म्हणवून घेणाऱ्या उल्का पासलकर यांची भेट झाली. 'फडके सरांची कार्यशाळा अजिबात कंटाळवाणी होत नाही, पण ते खूप काटेकोरपणाची व शिस्तबद्धतेची मागणी करतात आणि त्यांची फी बरीच जास्त असते', अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. ते ऐकून निश्चय पक्का झाला, कारण हे सर्वच दुर्मीळ गुण आहेत (हो, गुणवत्तावान लोकांनी जास्त फी आकारणे हा सुद्धा) आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांच्याशी संवाद साधला.
अरुण फडके यांना साधनाविषयी व माझ्याविषयी थोडीबहुतच माहिती होती, त्यामुळे त्यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर उल्का पासलकर यांनी मला सांगितले होते त्याच अपेक्षा सांगितल्या. त्या सर्वांना मी होकार दिला. कल्पना अशी होती की, साधनाचे माझ्यासह आठ सहकारी आणि निमंत्रित तीन-चार लोक अशा बारा-तेरा जणांसाठी कार्यशाळा, ती पुण्यातील साधना कार्यालयाच्या सभागृहात आणि सलग आठ दिवस (रोज तीन तास). 'इतके कमी लोक असतील तर माझी फी तुम्हाला जास्त वाटेल आणि नाशीकहून पुण्यात येऊन दहा दिवस राहायचे असेल तर माझ्याकडे वेळ बराच उरेल. म्हणून सकाळच्या सत्रात आणखी एक कार्यशाळा आयोजित झाली तर तुमचा खर्च कमी होईल', असे त्यांनीच सुचवले. ('नाशीक' हा शब्द 'नाशिक' असा सर्रास चुकीचा लिहिला जातो, याबाबतही त्यांनी कार्यशाळेत तो दीर्घ का आहे याचे स्पष्टीकरण दिले होते.) दरम्यान तशी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी काही लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला होता. प्रश्न येणार होता तो केवळ तारखा जुळवण्याचा. त्यासाठी मी तत्काळ संमती दिली... पण कार्यशाळा जास्त पुढे ढकलली जाऊ नये, एवढेच त्यांना सांगितले.
मात्र पुढच्याच महिन्यात त्यांच्या कर्करोगाने पुन्हा उचल खाल्ली म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे दिवाळी सुट्टीत किंवा त्यानंतर अशा तारखा जुळवायचे ठरले. नंतर सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाशी त्यांचे बोलणे झाले आणि मग जानेवारी मध्यानंतरच्या तारखा ठरल्या. 14 ते 17 व 22 ते 24 जानेवारी 2020 हे सात दिवस. त्या काळात ते सकाळी विद्यापीठात व दुपारी साधनात कार्यशाळा घेणार होते. त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी माझ्याकडून बरीच माहिती घेतली. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांचा वयोगट, त्यांच्या भाषिक क्षमता, ते सध्या करत आहेत ते काम, सर्वजण पूर्ण वेळ उपस्थित राहतील याची खात्री, कार्यशाळा घेण्यासाठीचा हॉल आणि आवश्यक साधने इत्यादी. एवढेच नाही तर त्यांची सर्व नियमावली त्यांनी मेलद्वारे पाठवली होती आणि तसे संमतीपत्र अधिकृतपणे साधनाच्यावतीने पाठवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. कार्यशाळेत ते काय घेणार आहेत, याचे नियोजन ते 'साधना टीमच्या गरजा काय आहेत' हे पाहून ठरवणार होते. त्यासाठी साधनातील शुद्धलेखनाच्या दृष्टीने मला सर्वोत्तम वाटणारे लेख त्यांनी मागवून घेतले होते (त्यावर रंगरंगोटी करून ते आणणार हे मला माहीत होते.)
अखेर एकूण 24 तासांच्या कार्यशाळेचे नियोजन झाले, त्यात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे लेखनाविषयक नियम आणि वाक्यरचना यांना मध्यवर्ती ठेवून त्यांनी भरगच्च अभ्यासक्रम आखला. शब्दांच्या जाती आणि विरामचिन्हे हे दोन घटक त्यात प्राथमिक स्वरूपात का होईना यावेत अशी माझी इच्छा होती, पण त्यासाठी आणखी चार किंवा पाच सत्र लागतील असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यासाठी नंतर स्वतंत्र कार्यशाळा घेऊ असे ठरवले...
आमच्या कार्यशाळेचा प्रारंभ 14 जानेवारीला दुपारी होणार होता, म्हणून 13 तारखेला दुपारी ते पुण्यात पोहचले आणि कार्यशाळेची जागा व आवश्यक साहित्य यांची पाहणी करायला आले. तेव्हा आमची पहिली भेट झाली. थोड्याशा गप्पा झाल्या. आणि मग सर्व व्यवस्था पाहून ते समाधानाने परत गेले.
दरम्यान साधनाचे आठ सहकारी व अन्य चार-पाच तरुण यांना सक्त ताकीद अशी दिली होती की, सर्व सात दिवस, वेळेवर येऊन, मोबाईल बंद ठेवून, पूर्ण वेळ बसणे शक्य असेल तरच या. फडके सरांनी पाठवलेली नियमावली प्रत्येकाला दिली होती. खडू-फळा व प्रोजेक्टर अशा दोन्हींचा वापर ते करणार होते. मध्यंतरांत पाच मिनिटे चहा-बिस्किटे जागेवर येईल अशी व्यवस्था आम्ही केली होती.
एक-दोन वेळा छोटे अपवाद सोडता सर्वजण सर्ववेळ उपस्थित राहिले. कार्यशाळा मूलभूत काही नवे सांगणारी होती, वर्षानुवर्षे चुकीचे किती शब्द वापरले जातात हे दाखवणारी होती. अर्थातच ते सर्व कारणमीमांसेसह! नियम का आहेत, ते तसे का आहेत आणि अपवाद कोणते आहेत आणि ते का, हे सर्व ते नेमकेपणाने सांगत होते. त्याचा संदर्भ आशयाशी कसा आहे, हे ते दाखवत तेव्हा त्यात शंकेला वाव राहत नसे.
संपूर्ण कार्यशाळेत ते कुठेही अडखळले नाहीत. पण पहिल्याच दिवशी प्रास्ताविक करताना त्यांनी सांगितले होते, 'व्यक्तिगत गोष्टी सांगायला मला आवडत नाही, पण एक सांगून ठेवतो. आपण भाषेच्या वापराबाबतची कार्यशाळा घेतोय, यात उच्चार खूप महत्त्वाचे आहेत... माझे उच्चार अतिशय स्पष्ट असतात, मात्र अलीकडच्या काळात कर्करोगावरील शस्त्रक्रिया झालेली असल्याने क्वचित काही शब्दांचे उच्चार किंचित वेगळे होतील, तेवढे तुम्ही समजून घ्या.' त्यावेळी उपस्थित सर्वजण क्षणभरासाठी स्तब्ध झाले. मात्र पुढील सातही दिवसांत आम्हाला कोणालाच तसे उच्चार जाणवले नाहीत. मधल्या एका सत्रात कोशवाङ्मयाच्या वापराबाबत नाशीकमधील एका शाळेत त्यांनी एकदिवसीय कार्यशाळा घेतली आणि त्या मुलांना नंतर कोश वाचनाची कशी गोडी लागली हे सांगताना त्यांना भरून आले होते. मात्र क्षणभरातच त्यांनी स्वतःला सावरले.
भाषेच्या बाबतीत सर्व स्तरांवरील अनास्था हा त्यांच्यासाठी वेदनेचा विषय आहे, हे आम्हाला त्यांच्या बोलण्यातून रोज जाणवत असे. त्यांना रोज वृत्तपत्र वाचताना, दूरचित्रवाणीवरील बातम्या ऐकताना आणि रस्त्यावरून चालताना सभोवतालचे फलक व दुकानाच्या पाट्या बघताना, किती त्रास होत असेल याची आम्हाला चांगलीच कल्पना येत होती. स्वभाषा व स्वदेश यांचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून सातत्याने व्यक्त होत होता. कार्यशाळा गहन-गंभीर होती, पण मनोरंजक होती, अज्ञान दूर करणारी होती, अज्ञानाची जाणीव करून देणारीही होती.
वस्तुतः त्यांनी सुरुवातीलाच मला हे स्पष्ट विचारले होते की, 'या कार्यशाळेकडून तुमची अपेक्षा काय आहे?' तेव्हा मी म्हणालो होतो, 'कोणतीही कार्यशाळा ते ते विषय पक्के करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे तुमची कार्यशाळा झाली की, मी आणि माझे सहकारी शुद्धलेखनात परिपूर्ण होऊ अशी भाबडी आशा बाळगणे शक्यच नाही. आमच्या शुद्धलेखनात तुमच्या कार्यशाळेमुळे दोन-पाच टक्क्यांपेक्षा जास्त फरक पडेल असे मला वाटत नाही. पण कार्यशाळेच्या अखेरीस शुद्ध लेखन ही अतिशय गांभीर्याने करायची गोष्ट आहे, भाषेचा वापर शक्य तितका काटेकोर व्हायला हवा, त्यामागे शास्त्र आहे हे आमच्या सर्व लोकांच्या मनावर ठसेल. आणि यासाठी सतत सजग राहिले पाहिजे, आपले लेखन सुधारणे हे काम सतत चालू राहिले पाहिजे ही जाणीवही आमच्या सर्वांच्या मनात चेतवली जाईल. आणि समजा एवढेही नाही झाले, मात्र भाषेच्या वापराबाबत काटेकोर असणाऱ्या माणसांबद्दल आमच्या लोकांना आदर जरी वाटू लागला किंवा किमान राग जरी नाही आला, तरी ही कार्यशाळा यशस्वी झाली असे मी मानेन..!'
वरील निकषांवर विचार केला तर आमची कार्यशाळा चांगलीच यशस्वी झाली. विद्यापीठाने त्याच काळात दुसरी कार्यशाळा ठेवल्यामुळे त्यांनी त्यांची फी कमी केली, एवढेच नाही तर या संपूर्ण कार्यशाळेचे व्हिडिओ शूटिंग करू इच्छिणाऱ्या, भाषेच्या संदर्भात काम करत असलेल्या एका कंपनीला त्यातला काही वाटा उचलायला लावला. तरीही आम्ही त्यांना दिलेली फी मराठी भाषेबद्दल आस्था असलेल्या काही लोकांना प्रथमदर्शनी तरी जास्त वाटली, अर्थातच स्पष्टीकरण दिल्यावर खूप कमी वाटली. पण ते साहजिक आहे, आपल्याकडे अर्थसाक्षरताही कमीच आहे.
सात दिवसांची कार्यशाळा संपल्यावर त्यांची एक-दीड तासाची दीर्घ मुलाखत व्हिडिओ स्वरूपात कर्तव्यवर आणि नंतर त्याचे शब्दांकन साधना साप्ताहिकात प्रसिद्ध करायचे असे आम्ही ठरवले होते. तेव्हा 'भाषेची हेळसांड करणाऱ्या शासन संस्था, शिक्षण संस्था व साहित्य संस्था इत्यादी घटकांबद्दल मी अप्रिय बोलेन ते तुम्हाला चालेल का', असे त्यांनी विचारले होते आणि त्याला आम्ही बिनशर्त होकार दिला होता. त्या मुलाखतीतून त्यांचे व्यक्तिमत्व बऱ्यापैकी उलगडले असते, त्यांचे विचार व कार्य चांगले अधोरेखित झाले असते (कोणत्याही माणसाचा गाभा व आवाका शोधायचा असेल तर अनेक लहान-लहान भेटीगाठींपेक्षा एकच दीर्घ मुलाखत पुरेशी ठरते असा माझा अनुभव आहे.) ती मुलाखत मार्च मध्ये ते पुण्यात येतील तेव्हा करायची असेही ठरले होते.
त्या कार्यशाळेतून पाहिलेल्या अरुण फडके यांच्याबाबत दोन वेगळी व महत्त्वाची निरीक्षणे सापडली होती. एक- प्रामुख्याने भाषाशास्त्राचे अभ्यासक असलेले लोक आणि प्रामुख्याने व्याकरणाचे अभ्यासक असलेले अरुण फडके यांच्यात मतभेदांची दरी आहे. दुसरे- आपले आडनाव फडके असल्यामुळे अनेक ठिकाणी डावलले जाते असा त्यांचा समज बराच बळकट झालेला आहे. माझी अशी इच्छा होती की, ती दरी कमी करण्यासाठी आणि त्यांचा तो समज तितकासा बरोबर नाही हे त्यांना पटवण्यासाठी, आपण प्रयत्न करावेत. त्यात किती यश मिळाले असते हे कळावयास मार्ग नाही.
कार्यशाळा संपल्यावर एक विचार मनात असाही घोळत होता की, अरुण फडके यांची भेट आधीच झाली असती तर आपण त्यांचा चांगला उपयोग करून घेऊ शकलो असतो. कारण प्रमाण मराठी भाषेसाठी प्रमाण मानला जावा असा हा माणूस होता... आता ते सर्वच राहिले. त्यांच्या स्मृतीला साधनाच्या वतीने विनम्र अभिवादन..!
- विनोद शिरसाठ
editor@kartavyasadhana.in
Tags: शुद्धलेखन व्यक्तिवेध साधना कार्यशाळा विनोद शिरसाठ Arun Phadke Sadhana Workshop Vinod Shirsath Load More Tags
Add Comment