1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून महाराष्ट्रभर 'वाचन जागर महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक लेखक, कादंबरीकार बाबा भांड यांनी 1975 मध्ये साकेत प्रकाशनाची स्थापना केली. साकेतचे मुख्य कार्यालय औरंगाबाद इथे आहे... तर एक शाखा पुण्यात आहे. या 44 वर्षांत साकेतने 2100 हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. दरवर्षी जवळपास 50 नवी पुस्तके बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महात्मा गांधी, सत्यजित रे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, आर.के. नारायण, जे. कृष्णमूर्ती आणि ओशो अशा काही अत्यंत प्रसिद्ध लेखकांची पुस्तके साकेतने प्रकाशित केली आहेत. अलीकडच्या काळात नोबेलविजेते ओरहान पामुक, जोस सारामागो, जे.एम. कोएटझी, रुडयार्ड किप्लिंग, मोहम्मद युनुस यांची पुस्तकेही साकेतने मराठीत आणली. जगप्रसिद्ध असणारी, बेस्ट सेलर ठरलेली महत्त्वाची पुस्तके मराठीत आणण्याचे काम साकेतने केले आहे. ज्यामध्ये अॅन फ्रँक, जे.डी. सालिंगर, रिचर्ड बाश, एरिक सेगल, किरण देसाई, हारुकी मुराकामी, नेपोलियन हिल, डेल कार्नेगी, केनेथ ब्लाचर्ड, डॉ.जोसेफ मर्फी यांसारख्या जगप्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
साकेत प्रकाशनाच्या पुस्तकांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2009मध्ये महाराष्ट्र शासनाने साकेत प्रकाशनाला सर्वोत्कृष्ट प्रकाशक म्हणून गौरवले आहे. भारतीय प्रकाशकांच्या महासंघाकडूनदेखील गेल्या सात वर्षांपासून सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी साकेतला गौरवले जात आहे. जलद गतीने उत्तम दर्जाची पुस्तके बाजारात आणणे आणि वाचकांना वाचनाचा आनंद मिळवून देणे हे तत्त्व साकेत प्रकाशनाने पाळले आहे.
साकेत भांड हे साकेत प्रकाशनाचे संचालक आहेत. वडील बाबा भांड यांच्याकडून त्यांना हा प्रकाशनाचा वारसा मिळालेला आहे. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर त्यांनी 1999पासून ‘साकेत प्रकाशन’ संस्थेत संचालक म्हणून कार्यास प्रारंभ केला. दिल्ली येथील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुस्तकमेळाव्यात ते स्वतः हजर राहतात. जागतिक पातळीवर जर्मनीतील फ्रँकफर्ट बुक फेअरमध्येदेखील त्यांनी सहभाग नोंदवला होता. जगभरातील उत्कृष्ट साहित्यकृतींचे हक्क मिळवून साकेत प्रकाशनाच्या माध्यमातून ही पुस्तके मराठीमध्ये प्रकाशित करण्याचे आणि सोबतच वितरणव्यवस्थाही सक्षम करण्याचे श्रेय साकेत भांड यांना आहे. ‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - 'साकेत'च्या आत्तापर्यंतच्या प्रवासात वाट्याला आलेल्या चांगल्यावाईट अनुभवांविषयी काय सांगाल?
- गेली 45 वर्षं साकेत प्रकाशनाची वाटचाल चालू आहे. आजवर आम्ही साधारणतः 2000 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. दहा वर्षांपूर्वी पुण्यात साकेतचं ग्रंथभांडार सुरू केलं. चार वर्षांपूर्वी औरंगाबादला मराठी, हिंदी आणि इंग्लीश पुस्तकांचं दालन 'साकेत बुक वाणी' या नावानं सुरू केलं. मला वाटतं की, पुस्तक प्रकाशनाचं काम हे सामाजिक जबाबदारीचं काम आहे. माझे वडील बाबा भांड यांनी हे आम्हाला शिकवलं. समाजाला काहीतरी उपयुक्त साहित्य मिळावं हाच साकेतचा उद्देश राहिलेला आहे. ज्ञानवृद्धी, समाजाला दिशा देणारे आणि अगदी मनोरंजन करणारेसुद्धा विषय आम्ही घेतलेले आहेत.
हे सगळं चांगलं असलं तरी वाचकांमध्ये म्हणावी तितकी जागृती अजूनही नाही असंही मला वाटतं. पुस्तकांना म्हणावं तितकं प्राधान्य दिलं जात नाही. आपण घरात अनेक वस्तू घेतो. त्यांची खरंच गरज आहे का असा विचार न करताही अनेकदा त्या घेतो... पण त्याच उत्साहानं आणि प्राधान्यानं पुस्तकांची खरेदी होत नाही. केरळसारख्या राज्यामध्ये वाचन संस्कृती खूप चांगली रुजलेली आहे. तिथं बुक फेस्टिव्हल्स होतात, सप्ताह साजरे होतात, अनेक उपक्रम राबवले जातात. आपल्याकडे मात्र ललित साहित्याच्या पुस्तकाचं दुकानही प्रत्येक जिल्ह्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये. प्रकाशक, वाचक, वितरक, शासन सगळ्यांनी मिळून ही वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सातत्यानं काही ना काही उपक्रम राबवले पाहिजेत म्हणजे शासनानं ग्रंथालयं उघडलेली आहेत... पण तिथं बऱ्याचदा दर्जाचा निकष न लावता सवलतीचा निकष लावून पुस्तकं भरली जातात. असं होऊ नये याकडे काटेकोरपणे लक्ष देणारी व्यवस्था असणं गरजेचं आहे.
प्रश्न - गेल्या 15-20 वर्षांपासून तुम्ही या व्यवसायात सक्रिय आहात. दरम्यान एकंदरीत पुस्तक प्रकाशनामध्ये काय बदल झालेले आहेत?
- बदल म्हणाल तर सुरुवातीला आम्ही कथा, कादंबऱ्या, शेतीविषयक, काही वैचारिक पुस्तकं करत होतो... पण गेल्या दहाएक वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रदर्शनांचं महत्त्व वाढलं. दुकानांच्या पेक्षा या प्रदर्शनांतून पुस्तकविक्री अनेकदा अधिक होऊ लागली. तेव्हा वाचकांकडून येणारी मागणी बघून आम्ही आमच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल केले. व्यक्तिमत्त्व विकासावरची पुस्तकं, प्रेरणादायी चरित्रं, अनुवादित पुस्तकं, नोबेल पुरस्कार विजेत्यांची पुस्तकं यांवर आम्ही भर दिला... शिवाय ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स'ची पुस्तकंसुद्धा काढायला सुरुवात केली. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळाला.
कोरोनानंतर आता पुन्हा स्थित्यंतराची वेळ आलेली आहे. गेल्या सहा महिन्यांत दुकानांतून पुस्तकांची विक्री पूर्ण थांबली... पण गेल्या चार वर्षांपासून साकेतची पुस्तकं इ बुक स्वरूपामध्ये करून घेतलेली आहेत. किंडलवरही आमची पुस्तकं आहेत. कोरोना काळात आमच्या इ बुक्सची मागणी तीन पटींनी वाढली. मागच्या वर्षीपासून आम्ही ऑनलाईन पुस्तक विक्रीही सुरू केली. बदल स्वीकारत गेल्यामुळे लॉकडाऊनमध्येसुद्धा आम्ही टिकू शकलो असं मला वाटतं. पुढेही नवनवीन प्रयोग करण्याकडे आमचा कल असेल.
...म्हणजे पूर्वी प्रकाशकाचं म्हणणं असायचं की, ‘मी पुस्तकं छापतो आणि ती विक्रेत्यांना देतो. माझं काम झालं. पुढचं काही बघायची गरज मला नाही.’ डिजिटलच्या जमान्यामध्ये प्रकाशकांना आता बदलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. इ बुक म्हणा... ऑनलाईन ऑर्डर स्वीकारून घरपोहोच पुस्तकं देणं म्हणा... अशा गोष्टींमध्ये प्रकाशकाला उतरावंच लागतंय. पुस्तकाचा विषय, आशय, त्याचं मुखपृष्ठ यांवर प्रकाशकांनी मेहनत घेतलीच पाहिजे आणि त्या पुस्तकाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनव्या माध्यमांचा उपयोग केलाच पाहिजे. वाचकाला पुस्तकाविषयी माहिती मिळेल आणि त्याला ते घ्यावंसं वाटेल यासाठी डिजिटल जगताचा आधार आम्ही घेतला पाहिजे. त्यासाठी सोशल मिडियावर पोस्ट करणं, ऑनलाईन पुस्तकविक्री सुरू करणं हे सगळं केलं पाहिजे.
प्रश्न - पूर्वीच्या प्रथितयश लेखकांच्या बरोबरीनं प्रकाशक नवीन लेखकांना संधी देत असतो. नवीन लेखकाचं पहिलं पुस्तक करतानाचा तुमचा काय अनुभव आहे?
- बाबा काम करत असताना एक काळ असा होता की, आमचे निम्म्याहून अधिक लेखक असे होते ज्यांची पहिली पुस्तकं आम्ही केली. ही आमची खासियत म्हणता येईल. नंतर ती मंडळी प्रसिद्ध लेखक झाली... पण त्यांचं पहिलं पुस्तक आम्ही करू शकलो याचा आनंदच आहे.
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सवा’त ‘साकेत’ची कोणती 25 पुस्तकं आहेत? ती कशी निवडली?
- सवलतीमध्ये द्यायची आहेत म्हणून न जाणारी पुस्तकं खपवायची असं आम्ही केलेलं नाही. वाचकांचा चांगला प्रतिसाद असणारी पुस्तकंच निवडली आहेत. त्यांतही पंचवीस पुस्तकं निवडणं अवघड होतं... कारण लोकप्रिय लेखक, लोकप्रिय पुस्तक या निकषात बसणारी अनेक पुस्तकं आहेत... पण त्यांतूनही मग 25 पुस्तकं आम्ही निवडली. जयंत नारळीकर सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांवरचं एक पुस्तक आहे, श्री.ना. पेंडसेंचं पुस्तक आहे, आर.के. नारायण यांचं मालगुडी डेज आहे. माझ्या बाबांचंच ‘श्रेष्ठ भारतीय बालकथा’ हे एक पुस्तक आहे. मॅनेजमेंटवरचं एक पुस्तक आहे, नारायण धारपांच्या भयकथांचा संग्रह आहे... अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं निवडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे... जेणेकरून सर्व प्रकारच्या वाचकांना यामध्ये रस वाटावा.
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सवा’विषयी काय सांगाल?
- कोरोनामध्ये अजूनही वाचक घराबाहेर पडत नाहीये. घाबरतो आहे. पुस्तकांची विक्री ठप्प झालेली आहे. सध्या दुकानं उघडायला परवानगी मिळालेली आहे तेव्हा आता आमच्या वाचकांनी परत दुकानात यावं. वाचकांची पुस्तकांच्या दुकानात जाण्याची, पुस्तकं चाळण्याची, विकत घेण्याची सवय मागच्या काही महिन्यांत कोरोनामुळे मोडलेली आहे. ती सवय त्यांना परत लागावी हाच या महोत्सवाचा उद्देश आहे. पैसे कमावणं हा मुख्य उद्देश नसून वाचकांपर्यंत पोहोचणं, वाचनजागृती करणं हा उद्देश केंद्रस्थानी आहे. प्रतिसादही चांगला मिळतोय. दहा प्रकाशक एकत्र आल्यामुळे या घटनेला बातमीमूल्य आलं आहे. वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या यांनी महोत्सवाची दखल घेतली. हा चांगला पायंडा पडतो आहे. असे उपक्रम सातत्यानं करत राहण्याचा आमचा मानस आहे.
(मुलाखत आणि शब्दांकन - मृद्गंधा दीक्षित)
वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी
हे ही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :
अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे !
Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव साकेत प्रकाशन साकेत भांड मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Saket Prakashan Saket Bhand Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Load More Tags
Add Comment