1932 ते 82 असे जेमतेम 50 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नरहर कुरुंदकर यांची आज 88 वी जयंती आहे. आजपासून पाच वर्षांपूर्वी (15 जुलै 2015 रोजी) नांदेड येथील कुरुंदकर प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या स्मृतीनिमित्त केलेले हे भाषण आहे. या भाषणाची ध्वनिफीत गेल्या महिन्यात प्रतिष्ठानने त्यांच्या वेबसाईटवर टाकली आणि सोशल मीडिया वरूनही फिरवली. त्या माध्यमाचे असे काही बलस्थान आहेच. मात्र हे संपूर्ण भाषण शब्दांकन करून प्रथमच इथे प्रसिद्ध होत आहे. शब्दांकन करताना अंशतः संपादन केले आहे.
- संपादक
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, आदरणीय सदाशिवराव पाटील, शामलताई पत्की आणि मित्रहो...
नांदेडला यापूर्वी दोन वेळा येण्याचा योग आला होता आणि दोन्ही वेळा मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल सुरवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या संचाचं काम चालू आहे. आणि त्याचं मी संपादन करतो आहे. त्यातला पहिला खंड 'व्यक्तिवेध' या नावाने ऑक्टोबर 2013 मध्ये इथे गिरीश कुबेर यांच्या हस्ते प्रकाशित करायचं ठरलं होतं. पण आपणा सर्वांना माहीत आहे की, त्याच्या एकच महिना अगोदर डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली होती. इथे कार्यक्रम ठरला होता, त्याच दिवशी सातारा नगरपालिकेने डॉ. दाभोलकर स्मृती: पाहिले व्याख्यान ठरवले होते, मला तिकडे जावं लागणं साहजिक होतं. त्यानंतर गेल्या वर्षी पीपल्स कॉलेजमध्ये कार्यक्रम ठरला होता, पण त्याच्या आदल्या दिवशी इथे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांचं निधन झालं. मग तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आणि माझं वेळेचं गणित पुन्हा एकदा कोलमडलं. त्यामुळे दोन्ही वेळा मी येऊ शकलो नाही. या दोन्ही वेळा येऊ न शकण्याचा माझ्या मनात थोडासा अपराधी भाव होता. त्यामुळे विश्वास कुरुंदकरांनी मला जेव्हा विचारलं की, 'यावेळी 15 जुलैला बाबांचा 83 वा जन्मदिवस आहे, तर येणार का?', तेव्हा माझ्या मनामध्ये प्रचंड मोठा संकोच असूनही, मी नाही म्हणू शकत नव्हतो.
माझ्या मनात संकोच का आहे, याची कारणं तुमच्यापैकी बहुतेक लोक समजू शकतील. एकतर नांदेडमध्ये यायचं आणि कुरुंदकरांच्याविषयी बोलायचं हे फार अवघड आहे. कुरुंदकर जाऊन आता 33 वर्षं एवढा कालखंड लोटला आहे. त्यांच्या हयातीमध्ये किमान 20-25 वर्षं तरी लोक त्यांना ऐकत होते. म्हणजे जवळपास 50 वर्षं नांदेडकरांच्या दृष्टीने जो माणूस आपला आयकॉन होता (अजूनही आहे) त्याच्या संदर्भात, आणि त्याच लोकांच्या समोर जाऊन बोलायचं ही खरोखरच कुणालाही अवघड वाटण्यासारखी गोष्ट आहे. माझ्यासमोर आज एल. एस. देशपांडे (ज्यांनी इंग्रजी आणि मराठीतून कुरुंदकरांवर पुस्तक लिहिलेलं आहे) बसलेले आहेत. आणि तुम्ही सर्वांनी अनेक मोठ्या लोकांची भाषणं ऐकली आहेत, कुरुंदकरांचं लेखन वाचलेलं आहे. त्यामुळे मी तुमच्यासमोर नवीन काय सांगणार असा माझ्या मनातला प्रश्न होता.
पण विश्वास कुरुंदकरांचे व माझेही मित्र अभय दातार आणि अन्य काही लोकांनी 'नरहर कुरुंदकर यांचं विचारविश्व' असा म्हटलं तर फार सोपा विषय समोर केला. त्यामुळे मी पटकन होकार दिला. मात्र भाषणाच्या दृष्टीने या विषयाचा विचार करायला लागलो, तेव्हा माझ्या मनात एक विचार प्रकर्षाने आला. तो असा की, कुरुंदकर हा खरं तर समजून देण्याचा किंवा समजावून सांगण्याचा विषय नाही; कुरुंदकर हा वाचायला देण्याचा विषय आहे! म्हणजे कुरुंदकरांचा ग्रेटनेस जर समजावून सांगायचा असेल तर त्यांचा कोणताही एखादा छोटासा लेख किंवा एखाद्या लेखातले काही परिच्छेद समोरच्याला वाचायला द्यायचे. ज्याला थोडंसं सोशिओ-पोलिटिकल अंडरस्टँडिंग आहे अशा कोणाही माणसाकडे, त्यांच्या लेखनातील काही उतारे दिले तर पुढचं काम आपल्याला करावं लागत नाही, असा माझा गेल्या दहा-बारा वर्षांतला अनुभव आहे.
एक गोष्ट मला हीपण जाणवली की, कोणत्याही काळातील तरुण वर्गाला काही लेखकांचं विशेष आकर्षण असतं. उदाहरणार्थ, कुमार वयातील मुलांना सानेगुरुजी पटकन भावतात, किशोर वयातील मुलांना वि. स. खांडेकर विशेष भावतात. अगदी तसेच, राजकीय - सामाजिक विषयांबाबत कुतूहल निर्माण व्हायला लागलेल्या तरुणांच्या मनात कुरुंदकरांविषयी आकर्षण निर्माण होतं. गेल्या दहा-बारा वर्षांतला माझा अनुभव तसा आहे. आणि मागच्या पिढीतल्या काही लोकांशी मी बोललो, तर त्यापैकी बहुतेकांचं मत हेच होतं की, कुरुंदकर तरुण मनावर गारुड करतात. म्हणजे ते प्रत्येक नव्या पिढीपर्यंत पोहचतात.
कुरुंदकरांच्या विचारविश्वातले जे काही टप्पे किंवा माईलस्टोन्स मला दिसतात त्यांच्याबद्दल मी जरासं सांगेन. पण त्याच्या आधी मला माझ्या काही मर्यादा सांगितल्या पाहिजेत. पहिली मर्यादा अशी की, कुरुंदकर गेले तेव्हा माझं वय जेमतेम पाच-सहा वर्षांचं होतं. त्यामुळे त्यावेळचा माहौल, ते भारावून जाणं यापैकी काहीही मला माहीत असणं शक्य नाही. दुसरं म्हणजे, कुरुंदकरांच्या दोन मुख्य ओळखी सांगितल्या जातात. लेखक आणि वक्ता या दोन ओळखी आहेतच; पण त्यांच्या अभ्यासाचे आणि लिहिण्याचे जे विषय आहेत, त्यानुसार दोन ओळखी सांगितल्या जातात. पाहिली ओळख साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक आणि दुसरी ओळख राजकारण व समाजकारण यांचे अभ्यासक. अर्थातच या दोन्हींमध्ये अनेक विभाग- उपविभाग येऊन जातात. माझी अडचण अशी की, कुरुंदकरांनी ज्या साहित्यकृतींबद्दल लिहिलेलं आहे, त्यांतल्या फारच कमी साहित्यकृती मी वाचलेल्या असल्यामुळे त्याबद्दल मला काही बोलता येणार नाही. शिवाय, साहित्यातल्या किंवा वाङ्मयातल्या लोकांनी त्याबद्दल बोलणं अधिक योग्य ठरेल.
मला थोडासा अधिकार आहे, तो त्यांच्या राजकीय व सामाजिक विषयांवरील लेखनाबाबत बोलण्याचा. तोच माझ्या विशेष अभ्यासाचा व आकलनाचा प्रांत राहिला आहे. शिवाय, साधना साप्ताहिकात मी मागील दहा-बारा वर्षं लेखन व संपादन या स्वरूपाचं काम केल्यामुळे; कुरुंदकर ज्या महनीय लोकांच्या बरोबर राहिले, वाढले त्यांच्यापैकी अनेकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. या सगळ्या प्रक्रियेतून माझ्या मनावर कुरुंदकरांच्या संदर्भात खोलवर ठसलेली पहिली गोष्ट ही आहे की, ते सॉक्रेटिस परंपरेतले होते. 'व्यक्तिवेध' या पुस्तकाला जी छोटेखानी प्रस्तावना मी लिहिली, तिच्यामध्ये हा मुद्दा अधोरेखित केला आहे. वापरून वापरून गुळगुळीत झालेले शब्द थोर माणसांना लावले तर त्यात फार काही नवीन वाटत नाही. म्हणून 'सॉक्रेटिस परंपरा' या शब्दाचा अर्थ त्याच्या सगळ्या आयामांसकट समजून घेतला, तरच कुरुंदकरांचं अनन्यसाधारणत्व आपल्या लक्षात येईल.
लक्षात घ्या, सॉक्रेटिसची परंपरा अडीच ते तीन हजार वर्षांपासून सुरु आहे, असं सांगितलं जातं आणि "युरोपातलं सगळं तत्त्वज्ञान 'रिपब्लिक' या ग्रंथाच्या फुटनोट्स आहेत", इथपर्यंत काही विचारवंत भाष्य करतात. 'रिपब्लिक'मध्ये सॉक्रेटिस आणि प्लेटो व इतर शिष्य यांच्यातले जे काही संवाद आहेत, त्यातून मानवी मनोव्यापारांच्या संदर्भात किंवा मानवी जीवनव्यवहारांच्या संदर्भात इतकं काही मूलभूत मांडलेलं आहे की, आजही जगभरातल्या कोणत्याही तत्त्वज्ञानामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये सॉक्रेटिसला वगळून पुढे जाता येत नाही. किंबहुना बऱ्याचदा स्टार्टिंग पॉइंट हा सॉक्रेटिस असतो. तर या सॉक्रेटिसचं स्वतःबद्दल काय मत आहे किंवा लोकांपर्यंत तो कसा पोहोचला आहे? तो असं म्हणतो की, 'मी रेडिमेड विचार दिलेला नाही, लोकांना विचार व पुनर्विचार करायला प्रवृत्त केलं आहे.' म्हणजे विचार कसा करावा हे शिकवण्याचा प्रयत्न त्याने केला. आपणा सर्वांना सॉक्रेटिसचं एक प्रसिद्ध विधान माहीत आहे: 'मी या जगातला सगळ्यात ज्ञानी मनुष्य आहे, याचं कारण आपलं अज्ञान किती सखोल व गहन आहे, याची मला चांगली जाणीव आहे'.
कुरुंदकरांच्या बाबतही असेच आहे. त्यांनी कोणता नवा विचार दिला, हा प्रश्न सहसा कोणी विचारत नाही. आणि स्वतः कुरुंदकरांनीही असं म्हणून ठेवलेलं आहे की, "विचार करणं, पुनर्विचार करायला लावणं आणि विचार कसा करावा हे शिकवणं, याच प्रकारचं काम संपूर्ण आयुष्यामध्ये मी केलेलं आहे." त्यांनी तेविसाव्या वर्षी पहिला लेख लिहिला आणि पन्नाशी पूर्ण होण्याच्या आत ते गेले. दरम्यान 25 वर्षांच्या लेखन काळात त्यांच्या नावावर चांगली म्हणावी अशी 25 पुस्तकं आहेत. आणि त्या 25 पुस्तकांमधले विषय पाहिले तर कुणीही थक्क होतं. त्यांचा हा आवाका समजून घेणं हे मोठं आव्हान आहे. एका पीएचडीच्या प्रबंधात तो विषय बसणार नाही. दोन-तीन-चार असे वेगवेगळे घटक करावे लागतील. अनेक प्रबंध लिहावे लागतील...
कुरुंदकरांचं कोणत्याही काळातलं, कोणतंही लिखाण वाचायला घेतलं तर एका पाठोपाठ एक धक्के बसतात. ते थोडे आश्चर्याचे असतात. त्यातला मुख्य भाग असा असतो की, 'अरे, हे आपल्या इतक्या जवळ होतं आणि तरीही आपल्या लक्षात कसं नाही आलं? किंवा आपण हे इतकं स्वीकारलेलं होतं की हेच अॅबसोल्युट ट्रुथ आहे असे समजत होतो; पण हे असं नाहीये.' म्हणजे आपल्या हाताशी असलेली सिम्पल ट्रूथ्स आपल्याला सापडत कशी नाहीत, हा धक्का कुरुंदकरांचं कोणतंही लेखन वाचताना बसतोच. आणखी एक नोंदवावा असा भाग म्हणजे, त्यांच्या लिखाणातली कोणतीही पानं घेतली आणि त्यांच्यावर रँडमली खुणा करत गेलो तरी ती कोटेशन्स म्हणून वापरता येतात. इतकी कोटेशन्स- तुलना करायची झाली तर- वेगळ्या अर्थाने खांडेकरांच्या लिखाणामध्ये येतात. पण खांडेकरांची कोटेशन्स ही अलंकारिक, फ्लॉवरी लँग्वेजमधली, थोडीशी रोमँटिक किंवा भाबडी अशा स्वरूपातली आहेत. कुरुंदकरांच्या लिखाणातली कोटेशन्स मात्र 'येस, आय गॉट इट - मला काही तरी नव्याने सापडलं' असा अनुभव देणारी आहेत. म्हणजे काहीतरी गहन सत्य सापडलं का, हा भाग बाजूला ठेवला तरी, मला काहीतरी दिशा सापडली असं कुरुंदकरांच्या सर्व लेखनातून जाणवतंच!
गंमत म्हणजे कुरुंदकरांचं स्वतःचं त्याबद्दलचं आकलन इतकं परिपूर्ण होतं की, सॉक्रेटिसच्या पद्धतीने विचार करणं किंवा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणं याच्या काही मर्यादासुद्धा आहेत, हे त्यांना पुरेपुर माहीत होतं. त्यामुळे त्यांनी असं म्हणून ठेवलं आहे की, "इतर कोणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणं मी केव्हाही पसंत करेन." आणि त्याच्या आधी ते म्हणतात की, "सॉक्रेटिस तर्कशुद्ध विचार करत होता, तर्कशुद्ध विचार करायला सांगत होता; पण व्यक्तिगत जीवनात तो प्रत्येक वेळी तर्कशुद्ध पद्धतीने वागत होताच असं नाही. अन्यथा अथेन्सच्या देवतेला तो नवस बोलला नसता." सॉक्रेटिसच्या आयुष्यातल्या अशा विसंगती दाखवून कुरुंदकर पुढे म्हणतात, "तरीही मी सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणं पसंत करेन."
वयाच्या फक्त 36 व्या वर्षी कुरुंदकरांची स्वतःबद्दलची जाणीवदेखील किती पक्की होती याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, मे. पुं. रेगे यांनी 'रूपवेध'ची अतिशय कठोर चिकित्सा केली; सत्यकथेमध्ये परीक्षण लिहिलं, ते बरंचसं गाजलं; तेव्हा त्याचा प्रतिवाद कुरुंदकरांनी (माझ्या माहितीप्रमाणे) नाही केलेला. पण त्याबद्दल एका खासगी पत्रात लिहिलंय. ते पत्र त्यांनी आपले प्रकाशक देशमुख पती-पत्नींना पाठवलं होतं, नंतर ते 'निवडक पत्रे' या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. त्यातला एक परिच्छेद 'व्यक्तिवेध' या पुस्तकाच्या ब्लर्बवर घेतलेला आहे. तो परिच्छेद इंटरेस्टिंग आहे. त्यात ते म्हणतात, "मी ज्या परीक्षणाला भीत होतो, ते हे नाही. तर्कशुद्ध युक्तिवाद करून माझं म्हणणं खोडून काढणं किंवा खंडण करणं, असं झालं असतं तर मला त्याचा आनंद वाटला असता. मला त्याची भीतीही होती आणि मला त्याचं आकर्षणही होतं." तिथेच ते म्हणतात, "माझं खरं मरण कशात आहे? तार्किक पद्धतीने माझं म्हणणं जर कोणी खोडून काढलं तर मी माझी मतं सोडून त्याचं मत स्वीकारायला केव्हाही तयार होईन. तेच माझं खरं मरण आहे आणि त्या मरणाचं मला आकर्षण आहे."
म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याच्या मर्यादा कुरुंदकरांना पुरेपूर माहीत होत्या. पण जसं आपण लोकशाहीबद्दल म्हणतो की, 'सर्व मर्यादा लक्षात घेऊनही कमीत कमी दोष असणारी शासनप्रणाली कोणती, तर लोकशाही!' अगदी तसंच विवेचनाची, विश्लेषणाची, चिकित्सेची (सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनही) सर्वोत्तम पद्धत म्हणजे तार्किक पद्धतीने विचार करणं. तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची सवय कुरुंदकरांना कशी लागली असावी, हाही एक मोठा गहन प्रश्न आहे. कारण त्यांचं सगळं विवेचन, विश्लेषण बघायला गेलं तर असं वाटतं की, केवळ तार्किक पद्धतीने नाही तर त्याच्याही पलीकडे ते जात होते. 'प्रतिभा' हा शब्द साहित्यामध्ये वापरला जातो, तशी काहीतरी देणगी (मी 'दैवी' म्हणणार नाही) त्यांना लाभलेली असावी. सुरेश द्वादशीवार यांनी त्यांचं वर्णन 'प्रज्ञावंत' या एका शब्दामध्ये केलेलं आहे, ते मला योग्य वाटतं. कुरुंदकरांनी स्वतः 'माळरानावरील कवडसे' या लेखामध्ये असंही म्हटलं आहे की, "मी गणितामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारा विद्यार्थी नव्हतो; पण 92 ते 95 टक्के मला मिळत होते." म्हणजे त्यांनीसुद्धा स्वतःमधील तर्कशुद्ध विवेचन, विश्लेषणाचं नातं गणित या विषयाशी जोडलेलं आहे, असं म्हणता येईल का? त्याच्याबद्दल फार तपशील मला मिळालेले नाहीत, पण तसे संदर्भ मिळाले तर ते जोडून बघायला पाहिजेत.
कुरुंदकरांचं विचारविश्व कसं घडलं याच्याबद्दल संभ्रमात टाकणारं, चकित करणारं लेखन मला अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच वाचायला मिळालं. ते होतं मधु कुरुंदकर यांचं 'संगत नरहरची' हे पुस्तक. ते वाचलं मी आणि काही मित्रांनी. त्यावेळेला आम्ही विशी-पंचविशीतले विद्यार्थी होतो. एका मित्राने दुसऱ्या मित्राबद्दल वय वर्ष 10 ते 22 या दहा-बारा वर्षांच्या काळाबद्दल खूप बारकाईने, खूप तपशिलाने, कौतुकाने व आपुलकीने लिहिलं आहे. (मराठीमध्ये याप्रकारचं अन्य पुस्तक उपलब्ध नाही). कुमार आणि तारुण्य या दोन्हींच्या सीमारेषेवर असताना नरहरी हा तरुण कसा होता, हे त्यातून कळतं. त्यातले अफलातून किस्से, प्रसंग आणि त्यातल्या गमतीजमती बाजूला ठेवल्या तरी; नरहर कुरुंदकरांचा त्यावेळचा बिनधास्तपणा, बौद्धिक आव्हान पेलण्याची ताकद आणि हिम्मत याबाबतही सखोल संशोधन होणं गरजेचं आहे. अर्थातच, त्याच्याही संदर्भात आपल्याकडे रिसोर्सेसची बरीच वानवा आहे. पण तो त्यांचा सुरुवातीचा मुख्य कालखंड समजून घेता आला तर त्यांचं विचारविश्व कसं घडत गेलं आणि त्याला किती आयाम आहेत, हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकेल.
कुरुंदकरांचे विचारविश्व या मुद्द्याकडे आपण आलो की, उत्तरं मिळत नाहीत तर अनेक प्रश्न निर्माण होतात. दोन-तीन उदाहरण देतो.
मी बारावीच्या नंतर जी पुस्तकं अगदी सुरुवातीला वाचली त्यामध्ये एक होतं 'श्रीमान योगी'. (त्याच्या आधी 'बुवाबाजी आणि समाज' हा एक धडा आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होता, तो सोडला तर फार काही त्यांच्याबद्दल मला माहीत नव्हतं.) काही वर्षांनंतर जेव्हा माझे काही मित्र विचारायचे की, आम्हाला 'श्रीमान योगी' वाचाविशी वाटते, काय करावं, कशी वाचावी, की आत्ता नको? तेव्हा मी त्यांना सांगायचो, "तुम्ही 'श्रीमान योगी' वाचू नका. ती आठशे-हजार पानं वाचायची गरज नाही. मात्र त्या कादंबरीला 40 पानी प्रस्तावना आहे, ती तुम्ही वाचा." ते मित्र मला विचारायचे, "कोणाची प्रस्तावना आहे?" तर मी म्हणायचो, "मला आठवत नाही, मी बरीच पूर्वी वाचली आहे ती प्रस्तावना." मग एके दिवशी मनात विचार आला, आपण चार-पाच वर्षं इतरांना सांगतो आहोत की, ती तुम्ही प्रस्तावना वाचा, पुस्तक वाचायची गरज नाही. तर बघू कोणाची आहे? मग बघायला गेलो तर लक्षात आलं, अरे ही तर कुरुंदकरांची प्रस्तावना! आत्ताही मला अनेक लोक, अगदी तरुण मुलं भेटतात तेव्हा ते म्हणतात, 'श्रीमान योगी' या पुस्तकापेक्षा आम्हाला ती प्रस्तावना अधिक भावली.
मी सर्वप्रथम वाचलेलं कुरुंदकरांचं पुस्तक होतं, 'अभयारण्य'. त्याची अनुक्रमणिका पाहूनच मी थरारून गेलो होतो. (सव्वाशे पानांचे ते पुस्तक 'स्वातंत्र्य' या संकल्पनेशी जोडलेले आहे.) म्हणजे मुख्य अनुक्रम आणि त्यातले सब-टॉपिक्स, अशी ती तीन-चार पानांची अनुक्रमणिका आहे. ती वाचूनच माझ्या लक्षात आलं की, या पुस्तकाला 'अभयारण्य' हे नाव किती व कसं बरोबर आहे! स्वातंत्र्य या संकल्पनेला किती आयाम असतात, हे आपण वाचतो तेव्हा थक्क होतो. त्या पुस्तकाच्या प्रारंभीच कुरुंदकर असं सांगून जातात की, बरेचसे शब्द आपण अचूक वा सुपरफिशियल पद्धतीने वापरतो, पण त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळलेला असतोच असं नाही, त्यांपैकी 'स्वातंत्र्य' हा एक शब्द आहे. 'स्वातंत्र्य म्हणजे काय' हा लेख लिहायला बसल्यानंतर त्यांना 'स्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ नेमकेपणाने जाणून घेण्याची गरज वाटली आणि मग त्यांनी ते मांडलं. ते पुस्तक वाचल्यावर मी कमालीचा चकित झालो होतो. कारण त्यातून असेही पुढे येत होते की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हिंसा, अहिंसा, न्याय हे शब्द आपण बिनचूक पद्धतीने वापरतो खरे; पण त्यांचा अर्थ आपल्याला नेमकेपणाने सांगता येईलच असं नाही, ते शब्द डिफाईन करता येतीलच असं नाही.
2004-05 मध्ये कुरुंदकरांच्या लेखनातून सापडलेलं एक छोटसं सूत्र घेऊन एक लेख मी लिहिला होता. त्याचं शीर्षक, '98 टक्यांशी कसं लढायच?'. तो लेख आता 10 वर्षांनंतर मी साधनात रिप्रिंट केला आणि त्याला जी काही दाद मिळाली तेव्हा मी लोकांना सांगत होतो, "त्यातलं विवेचन- विश्लेषण माझं असलं तरी, बीज मात्र कुरुंदकरांचं आहे आणि ते जर सापडलं नसतं तर माझं पुढचं विवेचन- विश्लेषण आकार घेऊच शकलं नसतं." त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. कुरुंदकरांनी 'मी आस्तिक का नाही' या शीर्षकाच्या लेखामध्ये असं म्हटलं आहे की, "शेकडा 98 माणसं अशी असतात, जी त्यांना परमेश्वराविषयी नेमकं काय वाटतं हेसुद्धा प्रामाणिकपणे सांगू शकत नाहीत." आणि मग पुढे त्यांचं विवेचन आणि विश्लेषण येतं. मी त्यावेळी असा साधा विचार केला की, हे 98 टक्के का म्हणत आहेत? 99 टक्के किंवा 95 टक्के का नाही? कारण ढोबळमानाने बोलताना आपण दोन मिनिटं, पाच मिनिटं, दहा मिनिटं असं म्हणतो. 'चार मिनिटांत ये किंवा सात मिनिटांत येतो' असं आपण म्हणत नाही. तर मग त्यांनी 98 टक्के का म्हटलं, असा एक साधा प्रश्न माझ्या मनात आला. पण त्याचं उत्तर त्या लेखात मिळालं नाही. तो प्रश्न बरेच दिवस मनात राहिला. मी नंतर वाचत गेलो आणि एकदा त्यांच्या अन्य लेखनातूनच असा संदर्भ लागला की, 'समाजामध्ये खरी आस्तिक माणसं एक टक्काच असतात.' म्हणजे आपण असं गृहीत धरून चालतो की, नास्तिक माणसं एक टक्का असतात. (विवेचनाच्या सोयीसाठी एक टक्का म्हणू, खरं तर ती एक टक्कासुद्धा नसतात. ती 0.00 something अशी काहीतरी असतील.) पण आस्तिक माणसंसुद्धा एक टक्काच असतात, हे आपल्या लक्षातच येत नाही. मी जे मघाशी म्हणालो की आपल्या हाताशी असलेली सिम्पल ट्रुथस, साधी सत्यं ते दाखवतात ते हे! तर कुरुंदकर म्हणतात की, 'ईश्वर' या संकल्पनेबद्दल खरोखर काहीतरी विचार केलेला आहे; आतून, मनापासून काहीतरी भक्तिभाव आहे अशी माणसं 99 टक्के नाहीत तर फक्त एकच टक्का आहेत. याचाच अर्थ, उरलेल्या 98 टक्क्यांनी आस्तिक आणि नास्तिक या दोन्हींच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते.
मला या एका सुत्रामुळे एक स्वतंत्र विचारविश्वच खुलं झाल्यासारखं वाटलं. नंतर हे सूत्र मी एक्सटेंड करत गेलो आणि मग म्हणू लागलो, "या जगामध्ये चांगली माणसं एक टक्का असतात, तशी वाईट माणसंही एक टक्काच असतात; उरलेल्या 98 टक्क्यांनी चांगल्या-वाईटाच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते. त्यागी माणसं समाजामध्ये एक टक्का असतात, पण खऱ्या अर्थाने भोगी माणसंही समाजामध्ये एक टक्काच असतात; उरलेल्या सर्वांनी त्याग आणि भोग या दोहोंच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते. खरेखुरे पुरोगामी एक टक्का असतात, पण खरेखुरे प्रतिगामीही एक टक्काच असतात; उरलेल्या सर्वांनी पुरोगामी व प्रतिगामी यांच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते." आणि मग असा सारांश काढला की, सत् आणि असत् या जर दोन प्रवृत्ती असतील तर जगामध्ये सत्प्रवृत्त एक टक्का असतात, आणि असत्प्रवृत्तही एक टक्काच असतात.
2005 साली साधनेत माझी अगदी सुरुवात होती तेव्हा 'थर्ड अँगल' या युवा सदरात तो लेख लिहिला होता. त्यात मी असंही म्हटलं होतं की, "हे एक टक्का सत्प्रवृत्त आणि एक टक्का असत्प्रवृत्त या दोहोंमध्ये थेट लढाई झाली तर सत्प्रवृत्तांचा पराभव निश्चित असतो. प्रमाण भाषेत सांगायचं तर, सत्प्रवृत्तांमध्येही दोन मुख्य गट असतात, एक सुधारक आणि दुसरा क्रांतिकारी. आणि थोड्या अनौपचारिक भाषेत सांगायचं तर, असत्प्रवृत्तांमध्येही ढोबळमानाने दोन गट असतात. एक 'तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे' आणि दुसरा 'टाळूवरचं लोणी खायला तयार असणारे'. तर मुद्दा असा की, सत् आणि असत् या दोहोंची लढाई झाली तर सत्प्रवृत्तांचा दणदणीत पराभव निश्चित असतो. पण दोहोंचाही खरा जय-विजय ठरतो तो 98 टक्क्यांना कोण किती प्रभावित करतात यावर! म्हणजे सत्प्रवृत्त लोक जर 98 टक्क्यांना जास्तीत जास्त अलर्ट करू शकले, त्यांचं प्रबोधन करू शकले तर असत्प्रवृत्तांवर विजय मिळवणं त्यांना सोपं जातं. आणि असत्प्रवृत्तांचं असं असतं की, ते 98 टक्कयांना निष्क्रिय जरी ठेवू शकले तरी सत्प्रवृत्तांवर विजय मिळवता येणं त्यांना सोपं जातं.
हा लेख साधनेमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी दिला, तेव्हा आमचे डीटीपी ऑपरेटर सत्यजित म्हणाले, "तुझं सगळं लेखन सुबोध असतं. पण हा लेख काही मला काही कळला नाही. म्हणून अंकाचे प्रूफ तपासणाऱ्या कुमुदताईंना (त्या पूर्वी साधनेच्या सहसंपादकही होत्या. नंतरही त्या आम्हाला मदत करायच्या.) मी विचारलं. मला धास्ती वाटली म्हणून. तर त्या म्हणाल्या, "खरंय, मलाही काही कळलं नाही." चार दिवसांनी डॉक्टर दाभोलकरांनी मला सांगितलं की, "साताऱ्यात माझा एक बालपणापासूनचा मित्र आहे, फार मोठा बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहे. तो केवळ माझ्यामुळे (आपला मित्र संपादक आहे म्हणून) साधनाचा अंक घेतो, त्यातील फारसं काही वाचत नाही. तो मला काल म्हणाला की, 98 टक्के हा लेख इतका अप्रतिम आहे की, साधनाच्या वर्गणीचे माझे आतापर्यंतचे सगळे पैसे वसूल झाले असं मी समजतो." त्यानंतर दोन दिवसांनी अवधूत परळकर यांचे पोस्टकार्ड आले, त्यावर मध्यभागी एकच वाक्य लिहिले होते: "98 टक्क्यांशी कसं लढायचं? ...अप्रतिम!" गंमत म्हणजे त्याच्या दोन आठवडे आधीच्या लेखावर, त्यांनी मला प्रतिक्रिया दिली होती, "साधनेची दोन पाने तू वाया घालवलीस."
अलीकडेच गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्यानंतर अनेक तरुण मुलं-मुली गटागटाने पुढील काही दिवस भेटायला येत होती. तेव्हा मला जाणवत होतं की, यांना एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलं आहे. त्यांच्या मनात अशी प्रबळ भावना होती की, "आपण संख्येने व बळाने फार कमी आहोत; आता आपलं काही खरं नाही; केंद्रात आणि राज्यात प्रतिगामी राजवट आलेली आहे; पुरोगाम्यांना पुढची दहा वर्षं वाव नाही. आपला लढा इतक्या मोठ्या गटाशी आहे, वगैरे." तेव्हा जे छोटेमोठे दहा-बारा ग्रुप मला भेटले, त्यातील मुलं-मुली फार तयारीची नव्हती. पण फार कच्चीदेखील नव्हती. त्यांना मी जेव्हा एक टक्का विरुद्ध एक टक्का आणि सीमारेषेवर 98 टक्के हे सूत्र सांगायचो, तेव्हा त्यांना आपली सुटका झाल्यासारखं वाटायचं, रिलीफ मिळाल्यासारखं वाटायचं! म्हणून तोच लेख मी साधनेत रिप्रिंट केला आणि कंसामध्ये टाकलं की, हा लेख 10 वर्षांपूर्वी साधनेत प्रकाशित झाला होता. तेव्हा अनेक अनेक वाचक चकित झाले होते. त्यातील एकच इंटरेस्टिंग प्रतिक्रिया इथे सांगतो. चिपळूणच्या एका प्राचार्यांचा फोन आला की, "मी विज्ञान शाखेचा माणूस आहे, त्यामुळे माझे अन्य वाचन कमी आहे. पण आमचे ग्रंथपाल आज साधनाचा अंक घेऊन आले आणि म्हणाले, सर, बाकी काही नका वाचू, पण हा लेख तुम्ही वाचायलाच हवा!" आणि आता या क्षणी (मी फेस रीडिंग मध्ये कच्चा आहे, पण तरीही मला दिसतेय) 98 टक्के सिद्धांताविषयी मी हे जे काही सांगतोय, ते ऐकताना तुमचे चेहरे अधिक फुलले आहेत.
तर हा मुद्दा मी इतक्या विस्ताराने का सांगितला आहे? इथे मला हे नोंदवायचे आहे की, आज हा 98 टक्क्यांचा सिद्धांत माझ्या नावावर असला तरी, त्याचं पेटंट मात्र कुरुंदकर गुरुजींकडे आहे! असो. सॉक्रेटिसपासून घेतलेला मुद्दा मी थोडासा एक्सपांड करत गेलो आणि त्याच्या परिघावरचे काही मुद्दे आतापर्यंत मांडले. आता भाषणाच्या उत्तरार्धाकडे वळतो.
'कुरुंदकरांचं विचारविश्व' हा शब्द आपण वापरतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की, ते स्वतःला मार्क्सवादी आणि समाजवादी म्हणवून घ्यायचे. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर 'लोकशाही समाजवादी' असं म्हणवून घ्यायचे. पण त्यालाही त्यांनी हळूवार अशी पुस्ती जोडलेली होती की, "माझा समाजवाद हा राष्ट्रीय समाजवादापेक्षा निराळा आहे." त्याचं विवेचन, विश्लेषण मला फारसे कळलेलं नाही. किंवा मी ते फार पूर्वी वाचलं, आता परत बघितलं तर काहीतरी निश्चितच सापडेल. तर मार्क्सवाद आणि समाजवाद हे दोन्ही शब्द ते स्वतःबद्दल वापरत होते. पण मला असं दिसतं की, कोणत्याही मार्क्सवाद्याला कुरुंदकर आपले वाटलेले नाहीत. आणि समाजवाद्यांना कुरुंदकर आपलेच वाटतात, पण संपूर्ण कुरुंदकर समाजवाद्यांना कधी झेपत नाहीत, पचत नाहीत. याचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की, समाजवाद काय किंवा मार्क्सवाद काय अंतिमतः एक चौकट ते स्वतःला घालून घेतात आणि कुरुंदकरांना अशी चौकट मान्य नव्हती. त्याचं कारण पुन्हा एकदा हेच की, ते सॉक्रेटिस परंपरेतून आलेले होते.
कुरुंदकरांच्या बाबतीत आणखी एक आश्चर्य मला असं वाटलं की, अकादमिक स्तरावर म्हणजे साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांतील जे कुणी विद्यापीठीय स्तरावरचे अभ्यासक असतात, त्यांच्याकडूनही कुरुंदकरांना फार जास्त रेफर केलं गेलं किंवा वेगळ्या प्रकारची मान्यता दिली गेली असं मला कमी वेळा दिसलं. आणि कुरुंदकरांनी राजकीय व सामाजिक विषयांवर विपुल लेखन केलं, पण राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांकडूनसुद्धा कुरुंदकरांना रेफर केलं गेलं आहे असं फार कमी वेळा दिसतं. यासंदर्भात मी काही लोकांशी बोललो की, हे असं का होतं? तर मला असं उत्तर जास्त वेळा मिळालं की, अकादमिक क्षेत्रातील लोकांना कुरुंदकरांविषयी एक प्रकारची असूया वाटते. मला असं वाटतं की, हे फार सोपं उत्तर झालं. दुसरं उत्तर असं मिळतं की, अकादमिक क्षेत्रातील लोक एका चौकटीमध्ये असतात, आणि त्या चौकटीच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत, त्यांना तशी इच्छाही नसते. कदाचित ती त्या पदाची-जागेची मागणीही नसते.
तर मुद्दा असा की, कुरुंदकर सतत चौकटी तोडणारे आहेत. ते कोणत्याही एका विद्याशाखेचा अभ्यास व मांडणी त्याच चौकटीत करत नाहीत. ते कोणत्याही विद्याशाखेच्या भिंती तोडून पलीकडे जाऊन अन्य विद्याशाखांना भिडतात. उदा. 'धार आणि काठ' हे त्यांचं साहित्य समीक्षेचं पुस्तक वाचलं तर साहित्याचा कप्पेबंद पद्धतीने विचार करणारे लोक त्याने प्रभावित होत नाहीत. रूढार्थाने समीक्षेची टर्मिनॉलॉजी त्यामध्ये दिसत नाही. एवढंच नाही तर, 'धार आणि काठ'मध्ये प्रत्येक वेळी ते चौकटीच्या बाहेर जाऊन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विषयांना भिडतात. पण त्याची दखल साहित्य वर्तुळात घेतली जात नाही. कुरुंदकरांच्या अनेक चाहत्यांना त्याचं दुःख आहे. मला मात्र तसं कधीच वाटलं नाही. उलट, मला ते कुरुंदकरांचं सर्वात मोठं बलस्थान वाटतं. 'व्यक्तिवेध'मध्ये गिरीश कुबेरांनी जो लेख लिहिला आहे त्यातही त्यांनी असं म्हटलं आहे की, "कुरुंदकर वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना थोडंसं चकित करून जात होते. काहींना ते थोडेसे गोंधळात टाकणारे वाटत होते आणि मला हे त्यांचं फार मोठं यश आहे असं वाटतं." म्हणजे हे केवळ माझं मत नाही, तर मराठीतला आजचा जो एक मोठा संपादक आहे आणि ज्याच्यावर कुरुंदकरांचा मोठा प्रभाव आहे त्याचंही मत असंच आहे.
'व्यक्तिवेध'मध्ये एकूण चार विभाग केले आहेत. त्यातल्या चौथ्या विभागात चार वेगवेगळ्या पिढ्यांतल्या चार संपादकांचे लेख आहेत. त्यांना कुरुंदकरांनी कसं प्रभावित केलं, त्याची उदाहरणं म्हणून ते चार लेख घेतले आहेत. पहिला अनंत भालेराव- जे कुरुंदकरांना गुरुस्थानी होते. किंबहुना कुरुंदकरांचं पहिलंवहिलं लेखन अनंतरावांच्याच हाताखाली किंवा त्यांच्या बरोबरीने, संगतीने छापायला सुरुवात झाली. नंतरच्या पिढीचे यदुनाथ थत्ते. वयाच्या बाबतीत अनंतराव आणि यदुनाथ यांच्यात फार फरक नसला तरी, यदुनाथ आणि कुरुंदकर यांचं नातं समकालीन म्हणावं असं होतं. त्यानंतरची तिसरी पिढी म्हणजे आज सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले सुरेश द्वादशीवार. मी मघाशी उल्लेख केला, ‘प्रज्ञावंत’ हे शीर्षक त्यांनी कुरुंदकरांसाठी वापरलं ते मला विशेष आवडलं होतं. त्यांचा लेखही फारच वेगवेगळे आयाम दाखवणारा आहे. आणि मग चौथे गिरीश कुबेर. त्यांनी 'आजच्या काळात कुरुंदकरांसारखी माणसं असायला हवीत', अशा आशयाचं विवेचन लेखाच्या शेवटी-शेवटी केलं आहे आणि त्या लेखाच्या शीर्षकामध्येसुद्धा ते आलेलं आहे.
मी जेव्हा आजच्या काळाच्या संदर्भात विचार करतो -कुरुंदकरांचा म्हणजे अर्थातच त्यांच्या विचारविश्वाचा- तेव्हा असा प्रश्न मनात येतो की, आजपर्यंत ते राहिले असते तर त्यांनी कोणते विषय हाताळले असते? (वस्तुतः 'जर-तर'च्या प्रश्नांवर सहमती होणं फार अवघड असतं. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे मी जे आता बोलतो आहे, त्याच्याशी अनेक लोक सहमत होतीलच असं नाही.) लक्षात घ्या, कुरुंदकरांचं सगळं लेखन हे त्यांच्या वयाच्या 25 ते 50 या कालखंडात झालं. ते स्वातंत्र्यानंतरचं पहिलं पाव शतक होतं. त्यामुळे आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली लोकशाही, नवी राजवट, धर्म व समाजरचनेतील विषमता, विविध प्रकारचे शोषण, तत्त्व/ विचारप्रणाल्या यांच्या भोवतीचं ते सगळं लेखन असणं स्वाभाविक होतं. म्हणजे एका बाजूला पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं आणि दुसऱ्या बाजूला महाभारत आणि मनुस्मृती यांच्याकडेही जाणं. पण आणखी 25 वर्षं ते हयात असते- आज तर केवळ 83 वर्षं एवढंच त्यांचं वय असतं- तर त्यांनी कशाकशाचा अभ्यास केला असता? कशावर त्यांनी लिहिलं असतं? मी जे त्यांचं लेखन वाचलं आहे आणि थोडाबहुत अभ्यास केला आहे, त्यावरून मला असं वाटतं की, दोन क्षेत्रांना त्यांनी आजच्या काळामध्ये जास्त महत्त्व दिलं असतं.
एक म्हणजे अर्थकारण. कुरुंदकरांच्या लेखनाची एक मर्यादा किंवा न्यून नव्हे, पण त्याच्यात काय कमी आहे किंवा राहून जातं आहे असं शोधलं तर दिसतं असं की, त्यात अर्थकारणाचा विचार तुलनेने कमी आहे. ते स्वतःला 'मार्क्सवादी' म्हणवून घेत होते आणि त्यांची वैचारिक बैठक तयार होत असताना अर्थकारण त्यांनी अभ्यासलेलं असणारच. पण तरीही त्यांच्या एकूण राजकीय आणि सामाजिक लेखनामध्ये अर्थकारणाचा विचार कमी दिसतो, असं काही लोकांप्रमाणेच मलाही वाटतं. अर्थात, ही अपेक्षा आपण कुरुंदकरांकडूनच करतो; इतरांच्याकडून नाही. म्हणजे इतक्या अफाट उंचीचा माणूस, त्याच्याकडून हे डायमेन्शन जरा कमी आलं आहे... मी मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की, 1950 ते 80 या अडीच-तीन दशकांच्या काळात तसंही प्युअर इकॉनॉमिक्सचे लोक सोडले तर अन्य लोक अर्थकारणविषयक वाचन तेवढ्या प्रमाणात करत नसावेत. कदाचित हा फार किचकट विषय आहे, असंही त्यांना वाटत असावं .
आणखी एक कारण हेसुद्धा आहे की, त्या काळात अर्थकारणाच्या संदर्भातली पुस्तकं आजच्याइतकी उपलब्ध नव्हती. प्युअर इकॉनॉमिक्स वाचणं आजही थोडं अवघड आहे, पण पोलिटिकल इकॉनॉमीवरची फारच चांगली पुस्तकं गेल्या वीसेक वर्षांत येत आहेत. मी जेव्हा जेव्हा इकॉनॉमिक्स या विषयातल्या लोकांशी बोललो आहे की, पोलिटिकल इकॉनॉमीवरची पुस्तकं 1950 ते 80 या काळात होती का? तर बहुतेकांचं म्हणणं आहे की, ती उपलब्ध नव्हती; त्यांचं प्रमाण फारच कमी होतं. पण कुरूंदकरांसारखा माणूस ज्याला बौद्धिक आव्हानं पेलवण्यामध्ये मजा वाटत होती, गंमत येत होती; अशा माणसाने आजच्या काळात अर्थकारण या विषयावर वाचन केलं असतं, ते समजून घेतलं असतं, आणि त्यावर लेखनही केलं असतं. आणि अर्थकारण म्हणत असताना मला 'पोलिटिकल इकॉनॉमी' अपेक्षित आहे. कारण या देशासमोरचा आजचा कळीचा प्रश्न तोच आहे.
तर अर्थकारणाच्या बाबतीतली साक्षरता ही फारच मोठी समस्या आहे. आणि साक्षरता हा शब्द वापरतो तेव्हा मला सर्वसामान्यांमधली नाही तर ओपिनियन मेकर क्लासमधील साक्षरता अभिप्रेत आहे. त्यांच्यामधली अर्थकारणाच्या संदर्भातली साक्षरता अतिशय दयनीय आहे, अशी माझी खंत आहे. ओपिनियन मेकर क्लासमध्ये साहित्यिक, पत्रकार, संपादक, प्राध्यापक, चळवळी - आंदोलनांतले मोठे नेते, राजकीय नेते, आणि उद्योगधंद्यातले व व्यापार क्षेत्रांतले लोक येतात. आता मी त्याच्या जास्त खोलात जात नाही. पण इथे मला कुरुंदकरांच्या संदर्भात हे आग्रहाने मांडावंसं वाटतं की, जर कुणालाही कुरुंदकरांच्या विश्लेषक आणि चिकित्सक बुद्धीचा वारसा सांगावा (त्यांना फॉलो करावं) असं वाटत असेल, तर त्यांनी अर्थकारणाच्या क्षेत्रांमधील आव्हानं स्वीकारावीत. भले कुरुंदकरांनी अर्थकारणावर काहीही लिहिलेलं नसलं तरीही!
कुरुंदकर आज असते तर त्यांनी आणखी कोणत्या विषयांना हात घातला असता, असाही विचार मी करतो. तेव्हा असं वाटतं की, जिथे डेड एन्ड दिसतो आहे किंवा जिथे कुलपं लागलेली आहेत, तिथे त्यांनी धडका मारल्या असत्या. आणि जी दालनं उघडायची हिंमत कोणी दाखवत नाही, अशी दालनं त्यांनी खुली केली असती. उदाहरणार्थ, गेल्या दोन महिन्यांपासून रावसाहेब कसबे यांनी अक्षरक्षः बैठक टाकून, घरदार बंद करून एक काम चालू ठेवलं आहे. भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य आणि त्यांचे देशीवादाचे विचार यांचं उत्खनन ते करत आहेत. आतापर्यंत त्यांची तीन-चार प्रकरणं लिहून झालेली आहेत. त्यातील एक 'परिवर्तनाचा वाटसरू'मध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित झालं आहे, दुसरं साधनेमध्ये. मोठी प्रकरणं आहेत ती, 25 - 25 पानांची. मी त्यातली तीन प्रकरणं वाचली आहेत. त्यांनी जे काही मांडलं आहे, त्याच्यावर टीकाटिप्पणी होईल, ती जरूर व्हावी. पण हे फार आवश्यक होतं. भालचंद्र नेमाडे जी काही देशीवादाची मांडणी करू पाहत आहेत, संस्कृतीबद्दल बोलू पाहत आहेत, इंग्रजी भाषेविषयी बोलू पाहत आहेत, जातीसंस्थेबाबत बोलू पाहत आहेत ते सगळं खोडून काढण्याचं किंवा त्याला आव्हान देण्याचं काम, त्याच ताकदीच्या माणसांकडून व्हायला हवं. हे काम करण्याची क्षमता असणारी माणसं आजच्या महाराष्ट्रात फार नाहीत. त्यामुळे रावसाहेब कसबे असं काही करणार आहेत हे कळलं, तेव्हा मी त्यांना म्हणालोही होतो की, "सर, तुमच्या या विवेचनाशी मी सहमत होईल किंवा नाही हा नंतरचा भाग झाला. पण हे होणं बौद्धिक वातावरणासाठी फार आवश्यक आहे."
तर मला असं वाटतं की, अशी आव्हानं कुरुंदकरांकडून उचलली गेली असती, पेलवली गेली असती. उदा. आधुनिक बुवाबाजीचे आव्हान. आधुनिक अध्यात्म या नावाखाली गेली दोन दशके जे काही चालू आहे, त्याला आव्हान देण्याची गरज आहे. दृश्य रूपामध्ये ते कसल्याही स्वरूपातील चमत्काराचा दावा करत नाहीत, कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कर्मकांड तिथे वरवर पाहता दिसत नाहीत. पण अधिक खोलात गेलं तर सेल्फ रियलायझेशनच्या नावाखाली तिथं जे काही चालू आहे, ते लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. सेल्फ रियलायझेशन किंवा व्यक्तिमत्त्व विकास यांच्या नावाखाली मध्यमवर्ग व तरुणवर्ग समाजविन्मुख होतो आहे. या सगळ्या प्रकारांची सुरुवात ओशो रजनीशांच्यापासून झालेली आहे.
कुरुंदकर होते तेव्हा आधुनिक अध्यात्म या नावाखाली काम करणारी फार थोडी माणसं होती, त्यातलं ओशो हे एक प्रॉमिनंट नाव होतं. ओशोंवर कुरुंदकरांनी जो लेख लिहिलेला आहे, तो चिरफाड करणं या प्रकारचा आहे. आम्ही निवडक कुरुंदकर: ग्रंथवेधचा पुढचा जो भाग काढणार आहोत, त्याच्यामध्ये चार विभाग असणार आहेत. पहिला विभाग असेल आस्वाद - ज्या ग्रंथांचा कुरुंदकरांनी आस्वाद घेतला त्याविषयी तो असेल. दुसरा विभाग असेल परामर्श घेणारा. तिसरा विभाग असेल चिकित्सा करणारा. आणि चौथा विभाग असेल समाचार घेणारा. समाचार या विभागात ज्या दोन पुस्तकांवर लेख आहेत, त्यांपैकी एक आहे ओशोंचं 'संभोगातून समाधीकडे' आणि दुसरं गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी'. तर त्या लेखात, ओशोंचा समाचार ज्या पद्धतीने कुरुंदकरांनी घेतला आहे तशाप्रकारे, आजचं आधुनिक अध्यात्म आणि त्या नावाखाली चालू असलेली बुवाबाजी यांना बाहेर काढणं फार आवश्यक आहे.
हे फार आवश्यक आहे. कारण 1990 नंतर या देशात एकाबाजूला मध्यमवर्ग फुगत चालला, दुसऱ्या बाजूला चळवळी आणि आंदोलनांचा ऱ्हास झाला. छोट्या-छोट्या स्वरूपात त्या राहिल्या, पण निष्प्रभ किंवा निष्क्रिय अवस्थेत. आणि याचं कारण, चळवळी - आंदोलनांकडे जाऊ शकणारी, त्यांच्याबरोबर काम करू शकणारी सुशिक्षित मध्यमवर्गातली (तुलनेने सुखवस्तू अशी) माणसं आधुनिक बुवाबाजीकडे वळलेली आहेत. म्हणजे चळवळी - आंदोलनांचा ऱ्हास आणि आधुनिक अध्यात्माचा उत्कर्ष या दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी सुरु झाल्या आहेत. याचं विवेचन, विश्लेषण अजून कुणी केलेलं नाही. मला वाटतं, कुरुंदकरांचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या कुणीतरी हे आव्हान पेलवायला हवे...
कुरुंदकरांचे विचारविश्व समजून घेताना, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. कुरुंदकरांनी 'माझा ग्रंथसंग्रह नाही' या शीर्षकाच्या लेखामध्ये असंही सांगून ठेवलेलं आहे की, "माझा असा कोणताही अभ्यासाचा विषय नाही. माझ्यावर अभ्यासाचा विषय येऊन पडतो आणि त्याच्या मागे मी लागतो." त्यामुळे कुरुंदकर कोण होते आणि त्यांचं स्पेशलायझेशन काय होतं याच्या चर्चेत पडण्यापेक्षा; जो जो विषय समाजासमोर उकलून दाखवणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या घटकांना एक्सपोज करणं आवश्यक आहे ते ते केलं पाहिजे. म्हणजे जे जे समाजहिताचं आहे, पण इतर कुणी करत नाही, अशा सर्व विषयांमध्ये मतलबी घटकांना किंवा विघातक शक्तींना अंगावर घेऊन त्यांची चिकित्सा करणं हे कुरुंदकरांच्या गाभ्याचं तत्त्व होतं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं व्यवच्छेदक लक्षण होतं. ते तत्त्व आणि ते लक्षण आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, जर कुरुंदकरांच्या विचारविश्वाची चर्चा आपण करणार असू तर!
कुरुंदकरांच्या बाबतीत मी मघाशी बोलताना असंही म्हटलं की, समाजवाद्यांनाही सगळेच कुरुंदकर झेपणारे नव्हते. त्याचा संदर्भ असा आहे की, कुरुंदकरांनी मुस्लिमांची आणि दलितांची ज्या प्रकारे चिकित्सा केली तशी चिकित्सा करायला लोक घाबरतात, तेव्हाही आणि आजही! इथे हेही लक्षात घ्यायला हवं की, समाजवाद्यांना सगळ्या समुहांबद्दल जी आपुलकी आहे; तळागाळातल्या समूहाला झुकतं माप दिलं पाहिजे असं जे मनापासून वाटतं, तेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कुरुंदकरांना वाटत होतं. त्यामुळे मुस्लिम, दलित आणि अन्य कोणत्याही शोषित घटकांना -मी जो अभ्यास केला आहे त्यानुसार- कुरुंदकरांचं झुकतं माप होतंच होतं. एवढंच नाही तर, जात, धर्म, वंश, लिंग, प्रदेश, भाषा इत्यादींच्या आधारावर असलेल्या विषमतेला आणि त्याद्वारे होत असलेल्या शोषणाला त्यांचा कडवा विरोध होता. पण त्यासंदर्भात त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा होता की, आपल्याला चर्चा आणि चिकित्सा करायची आहे की नाही?
आणि तशी चिकित्सा ते करत होते, करू पाहत होते. म्हणून त्यांच्यावर त्या काळात टीका झाली. मला वाटतं, ती टीका स्वाभाविक होती आणि अशी टीका सहन करणं हे कोणत्याही काळातले अभ्यासक, विचारवंत यांना अपरिहार्य ठरतं. म्हणून त्या टीकाकारांना फार दोष देत बसण्यापेक्षा, 'मला प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध पोहायचं आहे ना, मग मी हे केलं पाहिजे', अशी धारणा असायला हवी. कुरुंदकरांच्या काही लेखनातूनही थोडेसे निराशेचे म्हणावेत असे उद्गार दिसले की, "ही सगळी माझी माणसं, मी जेव्हा काही अप्रिय सत्य मांडायला गेलो तेव्हा मला दुरावली किंवा थोडी लांब व्हायला लागली, किंवा माझ्या हेतूबद्दलच शंका घ्यायला लागली." पण मित्रहो, मला त्याचं फार आश्चर्य वाटत नाही. कारण कोणत्याही काळामध्ये जे कुणी प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची भूमिका घेतात, त्यांच्या वाट्याला अशा प्रकारची निराशा, काही अंशी वैफल्य येणारच! त्याचा सामना करणं याला दुसरा काही पर्याय मला तरी दिसत नाही...!
(शब्दांकन: सुहास पाटील)
- विनोद शिरसाठ
editor@kartavyasadhana.in
Tags: व्यक्तिवेध विनोद शिरसाठ नरहर कुरुंदकर Speech Vinod Shirsath Load More Tags
Add Comment