अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे!

‘वाचन जागर’मधील प्रकाशकाची मुलाखत : 1

1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून महाराष्ट्रभर 'वाचन जागर महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद पुढील दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होणार आहे. 

विज्ञान शाखेचे विद्यार्थी असलेले अरुण जाखडे हे साहित्याच्या प्रेमातून प्रकाशन व्यवसायात आले. वाचनाच्या आवडीतून व ग्रंथांवरील प्रेमातून त्यांनी 'पद्मगंधा प्रकाशन' सुरु केले. ते प्रकाशक तर आहेतच, पण पद्मगंधा हा दिवाळी अंकही ते मागील 25 वर्षांपासून काढतात, त्या अंकाचे ते संपादक आहेत. त्याचबरोबर उत्तम लेखकही आहेत. त्यांची इर्जिक, पाचरूट, हुसेनभाई बाताड्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. विविध पुस्तकांसाठी त्यांना शासनाचे आणि इतरही पुरस्कार मिळालेले आहेत. अलीकडेच त्यांना प्रकाशन क्षेत्रातील कामासाठी राज्य सरकारचा अतिशय प्रतिष्ठेचा असा 'श्री. पु. भागवत पुरस्कार' देण्यात आला आहे.  

मराठी वाचकांसाठी उत्तम साहित्य निर्माण करण्याच्या उद्देशाने 1988मध्ये पद्मगंधा प्रकाशनाची स्थापना झाली. त्यांनी आतापर्यंत फिक्शन, नॉन-फिक्शन या दोन्ही प्रकारांतील मिळून सातशे पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात कादंबरी, कथा, कविता, समीक्षा यांबरोबर आत्मकथने, चरित्रे, समाजशास्त्र, विज्ञान, आरोग्य, निसर्ग, अर्थ अशा विविध विषयांवरची पुस्तके ही पद्मगंधा प्रकाशनाची खासियत आहे. व्यंकटेश माडगूळकर, अरुण साधू अशा थोर साहित्यिकांची पुस्तके पद्मगंधाने प्रकाशित केलेली आहेत. तसेच  अगाथा ख्रिस्ती यांचे हर्क्युल पायलट सिरीज, पाउलो कोएलो यांचे द अल्केमिस्ट, द जहीर, जेन ऑस्टिन यांचे प्राइड अँड प्रेज्युडाइज, टोनी मॉरिसन यांचे बिलव्ह्ड अशी जगभरातील नामवंत पुस्तके पद्मगंधाने मराठीत आणली. आजवर पद्मगंधाने सातशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांपैकी नव्वद पुस्तकांना शासकीय आणि विविध मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या कार्यावर आधारित 'रधों' ही आठ पुस्तकांची मालिका, श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या सात कादंबऱ्या, डॉ. गणेश देवी यांच्यासोबत भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण असे काही महत्त्वाचे उपक्रम पद्मगंधाच्या नावावर आहेत. याशिवाय रा.चिं. ढेरे यांची वैचारिक आणि संशोधनपर 20 पुस्तके पद्मगंधाने प्रकाशित केलेली आहेत.

‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - तीन दशकांच्या पद्मगंधाच्या वाटचालीमध्ये तुम्हाला विशेष समाधानाच्या व असमाधानाच्या गोष्टी कुठल्या वाटतात?
- प्रकाशनामध्ये मला चांगलेच अनुभव आलेले आहेत... त्यामुळे संस्था इतकी वर्षे स्थिर आहे. आमचा आलेख सातत्याने चढत गेलेला आहे. पद्मगंधाला सगळे मानसन्मान मिळाले. शासन, इतर साहित्य संस्था यांच्याकडून मिळालेल्या पुरस्कारांमुळं आमच्या कामाची अधिकृतरीत्या नोंद झाली... त्यामुळे मी आनंदी आहे. काही कमीजास्त गोष्टी असतात, चढउतार असतात... त्या प्रत्येक व्यवसायात असतात.

आपण उत्तम पुस्तकं काढावीत असाच प्रयत्न असतो... पण काही पुस्तकं चकवा देतात म्हणजे दर्जेदार पुस्तक असूनही त्याला वाचकप्रियता लाभत नाही. विशेषतः अभिजात साहित्य किंवा आमच्याकडं असतात अशी संशोधनपर पुस्तकं यांच्या बाबतीत असा अनुभव बऱ्याचदा येतो. अशी पुस्तकं आदरणीय असली तरी विक्रीय असतातच असं नाही... पण मला त्याची खंत नाही. कारण ती पुस्तकं काढतानाच मला हे माहीत असतं की, या पुस्तकांचा एक ठरावीक वाचकवर्ग आहे, तो बुद्धिजीवी आहे आणि कुठल्याही समाजामध्ये त्यांची संख्या मर्यादित असणार.

प्रश्न - प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना पद्मगंधाचे काय निकष आहेत? 
- तसं ठोस सांगता येणार नाही... कारण लेखक बदलतो, विषय-संदर्भ बदलतो, संशोधनाचे विषय वेगवेगळे असतात, लेखनशैली निरनिराळी असते... त्यामुळे ठरावीक निकषांच्या साच्यात त्याला बांधता येत नाही. आता संशोधनपर पुस्तक असेल तर त्या लेखकानं किती अभ्यास केलाय, किती प्रवास केलाय, किती संदर्भग्रंथ हाताळले आहेत, त्यानं या पुस्तकासाठी किती वेळ दिलेला आहे या सगळ्या गोष्टींवरून एक अंदाज येतो आपल्याला.

प्रश्न - 1988 ते 2020 या 32 वर्षांमध्ये प्रकाशन व्यवसायामध्ये काय स्थित्यंतरं दिसतात तुम्हाला?
- आम्ही सुरुवातीच्या काळात लेटर प्रेसवर पुस्तकं छापली. त्यानंतर ऑफसेट प्रिंटिंग आलं. आता इ बुकच्या गोष्टी सुरू आहेत. ही तांत्रिक पातळीवरची स्थित्यंतरं म्हणता येतील.

उत्तम साहित्यनिर्मितीच्या अंगानं असं आहे की, जनमानसावर ठसा असणारी लेखकांची पिढी पुन्हा झाली नाही. सन 2000पर्यंत हे सगळे आधीचे लोक निवर्तले. लेखकांच्या पुढच्या पिढ्या तेवढ्या ताकदीनं आल्या नाहीत... त्यामुळं सर्वच प्रकाशन संस्थांमध्ये बघा... पूर्वीच्या लेखकांची पुस्तकं बऱ्याच प्रमाणात अजूनही काढली जातात... कारण प्रभावी लेखक कमीकमी होत गेले. मग प्रकाशकांनी अनुवादित पुस्तकं जवळ केली. आपल्या शेतात कमी पिकायला लागलं की आपण दुसरीकडून विकत आणतो, तसा हा प्रकार झाला. आमच्याकडेसुद्धा काही अनुवादित पुस्तकं आहेत.

प्रश्न - मग आपण अनुवादासाठी साहित्य निवडताना काय निकष लावता?  
- ज्या लेखकांचा जगभर प्रभाव आहे अशा लेखकांचं वैचारिक लेखन मराठीत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनुवादित पुस्तकांत आम्ही व्यावसायिकता कमी आणि अभिजातता अधिक पाहतो. अनुवादित साहित्य खूप महत्वाचं आहेच... परंतु ते फक्त 'बेस्ट सेलर' पुस्तकांपर्यंत मर्यादित नको. व्यावसायिकतेच्या दृष्टीनं ते चांगलं असलं तरी मूळ मराठी साहित्यासाठी ते धोकायदायक आहे... कारण त्या बेस्ट सेलर पुस्तकांचं मार्केट मोठं असतं. त्यामानानं मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात झालेली असते, त्याचं नाव लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं... त्यामुळं लोक पटकन तेच पुस्तक उचलण्याची शक्यता असते... म्हणजे त्या पुस्तकांचा दर्जा वाईट असतो असं मी म्हणत नाही...  पण ‘बेस्ट सेलर’ या निकषापेक्षा इतर भाषांमधलं अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे आपला कल असायला पाहिजे असं मला वाटतं.

प्रश्न - मराठी पुस्तकं जाहिरात आणि वितरण यांमध्ये कमी पडतात असं वाटतं का तुम्हाला?
- इंग्रजी प्रकाशकांच्या दृष्टीतून प्रादेशिक प्रकाशकांकडे पाहू नये असं मला वाटतं... कारण इंग्रजी संस्था बऱ्याच अंशी केवळ व्यावसायिक पद्धतीनं चालतात. आपली माती, संस्कृती, आपले विचार अशा बाबी तिथे फार रुळलेल्या असतीलच असं नाही. तिथे स्थानिक प्रतिभेला फारसा वाव नसतो. तुमच्या एकूण मिळकतीच्या काही टक्के रक्कम तुम्ही जाहिराती वगैरेवर खर्च करत असता. इंग्रजी प्रकाशकांची मूळ मिळकतच प्रादेशिक संस्थांपेक्षा कितीतरी अधिक आहे. प्रादेशिक प्रकाशकांची ही मर्यादा आहे. आम्हाला संस्था टिकवायची असते... त्यामुळं खर्च आटोक्यात ठेवावा लागतो. सगळं गणित बसवावं लागतं. खरं सांगायचं तर मराठी पुस्तकांच्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये करणं परवडत नाही. आता यामध्ये वर्तमानपत्रांनीसुद्धा त्यांच्या धोरणांमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे ते नाटकसिनेमाच्या जाहिराती कमी किमतीमध्ये छापतात... पण पुस्तकांच्या जाहिरातींचे हजारो रुपये घेतात. हे बदलायला हवं. आम्ही दहा जण एकत्र आल्यामुळे आणि जाहिरातीचा खर्च वाटून घेतल्यामुळे या ‘वाचन जागर महोत्सवा’ची जाहिरात करता येतीये.

प्रश्न - संस्थेचं काम पुढं अनेक वर्षं असंच चालू राहावं यासाठी पुढची पिढी तयार होणं महत्त्वाचं असतं. पद्मगंधाच्या पुढच्या पिढीविषयी काय सांगाल? हँडओव्हरच्या प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघताय?
- माझी दोन्ही मुलं साहित्याची आवड असणारी आहेत. ‘उत्तम अनुवाद’च्या अंकाचं सगळं काम माझा मुलगा अभिषेकच बघतो. सध्या तो त्याचा जॉब सांभाळत मला मदत करतो... पण त्याला ‘सेन्स ऑफ लिटरेचर’ आहे. आमच्या सगळ्या लेखकांशी, वितरकांशी त्याचे मैत्रीचे संबंध आहेत. पूर्ण वेळ इथं येऊन बसत नसला तरी त्याचा सहभाग असतो. पुढची पिढी तयार होते आहे. मला त्याविषयी पूर्ण विश्वास वाटतो. इथं ‘विनोद’ प्रकाशन नावाची संस्था आहे. त्यांची मुलं इतर क्षेत्रांत गेली तरीही संस्था चालू आहे... कारण त्यांच्या वडलांनी अशी पुस्तकं काढली जी दीर्घकालीन टिकणारी आहेत. मीसुद्धा आता काढलेल्या पुस्तकांच्या एकदम लाटा वगैरे आलेल्या नसतील... पण ती दीर्घजीवी असावीत असं मला वाटतं. पुढच्या पिढीचा जम बसून संस्था पुढे घेऊन जाण्यासाठी मुलांना त्याचा खूप उपयोग होतो, त्यांना वेळ मिळतो. पुस्तकं तयार होतच असतात. ग्रंथ तयार होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. पुढं चांगलं काही होणारच नाही असं मी म्हणत नाही... पण संख्या आटलेली दिसते. मी काढलेली सगळी सहा-सातशे पुस्तकं दीर्घकाळ टिकतील असंही मी म्हणत नाही... पण त्यांतली 50-60 तरी तशी टिकतील असं वाटतं.

प्रश्न - पद्मगंधाच्या इतक्या पुस्तकांमधून ‘वाचन जागर महोत्सवा’साठी 25 पुस्तकं तुम्ही कशी निवडलीत?
- काही अनुवादित, काही वैचारिक, काही संशोधानात्मक, काही लोकप्रिय असा मेळ घातलेला आहे. विकली जाणारी लोकप्रिय पुस्तकं आम्ही घेतलेली आहेत... कारण हे प्रदर्शन भरवणाऱ्या दुकानदारालासुद्धा यातून काही मिळायला पाहिजे.

प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सव’ आत्ता किती गरजेचा होता असं वाटतं तुम्हाला? 
- तो आवश्यकच होता. गंमत बघा हं. यंदा दिवाळी अंकासाठी लेखकांना लेखन मागवण्यासाठी फोन केले तरी ते लेखक विचारात होते, ‘काढताय का अंक?’ असं वातावरण झालेलं आहे कोरोनामुळं. एक नैराश्य, निरुत्साह आला होता. त्यात जाग आणण्याचं काम ‘वाचन जागर महोत्सव’ करेल असं वाटतं. यातून आमची विक्री कमी झाली तरी हरकत नाही... पण ग्रंथव्यवहारामध्ये चैतन्य निर्माण झालं तरी आम्ही खूप काही कमावलं असंच म्हणता येईल. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी असे प्रयत्न, उपक्रम गरजेचे असतात. दहा प्रकाशनांची पुस्तकं यात समाविष्ट आहेत असं म्हणणंसुद्धा संकुचित होईल... कारण वाचक जेव्हा या महोत्सवाच्या निमित्तानं त्या दुकानात जाईल तेव्हा काय तो ठरवून याच दहा प्रकाशनाची पुस्तकं पाहील असं नाही. महोत्सवाच्या निमित्तानं तो दुकानात जाईल, पुस्तकं चाळेल, विकत घेईल... मग ते कुठल्याही प्रकाशनाचं असलं तरी हरकत नाही. अशा वाचकाला पुस्तकांपर्यंत घेऊन येणं हा अशा महोत्सवांचा उद्देश असतो. 

(मुलाखत आणि शब्दांकन - मृद्‌गंधा दीक्षित)

वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी 

Tags: मुलखात वाचन जागर महोत्सव पद्मगंधा प्रकाशन अरुण जाखडे मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य रा. चिं. ढेरे मृद्‌गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Padmagandha Prakashan Arun Jakhade Marathi Publication World Marathi Literature Publication Books R. C. Dhere Mrudgandha Dixit Load More Tags

Comments:

रंजिता वीरकर

मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ह्या नूतन उपक्रमाला अगणित शुभेच्छा! काळाची पावले ओळखून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या सर्व मराठी प्रकाशकांचे मनापासून अभिनंदन!

सुनील कुमार लवटे

श्री अरुण जाखडे हे चोखंदळ वाचक, लेखक, संपादक,प्रकाशक आहेत.या व्यवसायाला जी जिद्द, चिकाटी,पारख लागते,ती त्यांच्यात आहे.ते मराठी प्रकाशनाचे भविष्य होत.हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

नामदेव माळी

जाखडे सर आपल्यासारखी वेगळी माणसंच असा वेगळा विचार करतात. वेगळी पुस्तकं काढतात. वाचन चळवळ समृृृृृद्ध करत पुढे नेतात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

अभिनव उपक्रम. शुभेच्छा.अभिनंदन.

Add Comment

संबंधित लेख