1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.
‘राजहंस प्रकाशना’ची स्थापना बाबासाहेब पुरंदरे यांनी 1952मध्ये केली. पुढे श्री.ग. माजगावकर त्यांना येऊन मिळाले आणि दोघांच्या प्रयत्नांतून ही प्रकाशनसंस्था वाढत गेली. प्रकाशनाच्या प्रारंभीच्या काळातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र ‘राजहंस प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध झाले. माजगावकर हे सजग सामाजिक जाणीव आणि वैचारिक मोकळेपणा असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पुस्तकांच्या विषयांच्या वैविध्यपूर्ण निवडीतून दिसते. प्रेरणादायी चरित्रांचे आणि आत्मचरित्रांचे समृद्ध दालन, राजकीय वा ऐतिहासिक विषयांवरील वा समाजकारणावरील प्रभावी पुस्तके ही ‘राजहंस’ची ठळक वैशिष्ट्ये ठरली.
पुढे कामाच्या विभागणीत 1983पासून ही धुरा दिलीप माजगावकर यांच्याकडे आली. दिलीप माजगावकरांनी आजच्या सुजाण वाचकांची आवडनिवड जाणण्याचा प्रयत्न जागरूकतेने केला. त्यातूनच ‘राजहंस’च्या आधीच्या दालनांना विज्ञान, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अन्य विभागांची जोड मिळाली. ललित साहित्यातील नव्या नावांना अन् नव्या प्रवाहांना ‘राजहंस’ने प्रथितयश साहित्यिकांच्या सहकार्यातून पुढे आणले. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमीच स्वागतशील राहिले आहे. त्यांच्या ग्रंथसूचीमध्ये सर्व साहित्यप्रकार आहेत... पण त्यातही चरित्र, आत्मचरित्र या साहित्यप्रकारांबरोबरच ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक साहित्य ही राजहंसची खासियत आहे.
विषयांनुसार संपादक असावेत हा विचार राजहंसने रुजवला. आज राजहंसमध्ये डॉ.सदानंद बोरसे, आनंद हर्डीकर, विनया खडपेकर आणि करुणा गोखले असे चार मुख्य संपादक आहेत. वाचकांच्या बदलत्या सवयी आणि बदलते प्रवाह लक्षात घेऊन राजहंसने आपल्या प्रकाशनाच्या पुस्तकांसाठी नुकतेच अॅपही लाँच केले आहे.
‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने राजहंस प्रकाशनाचे संचालक डॉ. सदानंद बोरसे यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - राजहंस प्रकाशनाच्या परंपरेतले समाधान देणारे असे कोणते विशेष महत्त्वाचे टप्पे किंवा प्रकल्प तुम्ही सांगू शकाल?
- राजहंस प्रकाशनाची स्थापना 1952मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केली. पहिल्या पाचसहा वर्षांतच बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक आलं आणि त्यानं इतिहास घडवला... त्यामुळे ‘राजहंस’ला लौकिक स्थैर्य आणि काही प्रमाणात आर्थिक स्थैर्यसुद्धा मिळालं.
1955च्या आसपास ‘माणूस’कार श्री.ग. माजगावकर हे बाबासाहेबांसोबत राजहंसमध्ये काम करायला लागले. त्यानंतर 1965-66च्या आसपास माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर राजहंसमध्ये काम करायला लागले.
‘साप्ताहिक माणूस’मध्ये ज्या मालिका येत होत्या... त्यांची पुस्तकं काढायची असं मर्यादित काम राजहंसकडून सुरुवातीला होत होतं... मात्र त्यातूनही नाझी भस्मासुराचा उदयास्त, फिडेल, चे आणि क्रांती अशी काही मातब्बर पुस्तकं प्रकाशित झाली.
1965-66च्या आसपास बाबासाहेब त्यांच्या शिवचरित्रांच्या व्याख्यानांमध्ये व्यग्र राहू लागले... त्यामुळे ते राजहंसमधून बाहेर पडले. 1984च्या आसपास श्री.ग. माजगावकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजहंसमधून बाहेर पडले... त्यामुळे त्यांच्यानंतर दिलीप माजगावकरांनी राजहंसची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
1978पासून मी ‘माणूस’मध्ये लेखन करत होतो... त्यामुळे राजहंसशीही मी बऱ्यापैकी संबंधित होतो. 1986-87पासून माझा राजहंसशी संपर्क वाढला. दिलीप माजगावकरांच्या कारकिर्दीमध्ये, 1989मध्ये विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली... जिने इतिहास घडवला. ‘पानिपत झालं’ हा जो मराठीतला वाक्प्रचार आहे त्याचा अक्षरशः उलटा अर्थ म्हणावा असं यश तिनं मिळवलं.
त्याचपाठोपाठ अशोक जैन यांनी अनुवाद केलेलं इंदिरा गांधी यांचं चरित्र, जयंत नारळीकर आणि डॉ. श्रीराम गीत यांनी घडवलेलं ‘सृष्टीविज्ञानगाथा’ हे द्विखंडात्मक पुस्तक प्रकाशित झालं. अशा स्वरूपाचा कोश मराठीत तोपर्यंत तरी नव्हता. त्यानंतर पु.ल. देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवाचं निमित्त साधून स.ह. देशपांडे आणि मंगला गोडबोले यांनी संपादित केलेलं पुलंच्या साहित्याचा, व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारं ‘अमृतसिद्धी’ हे पुस्तक राजहंसने काढलं.
गेल्या काही वर्षांत राजहंसचे जे प्रकल्प नावाजले गेले, उल्लेखनीय ठरले... त्यांत मंगेश पाडगावकर यांच्या ‘कथारूप महाभारत’ या अनुवादाचं नाव घ्यावं लागेल. आजच्या तरुणाईचे आयडॉल असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या जडणघडणीवर आधारित ‘मन में है विश्वास’ हे पुस्तक लिहिलं. चार वर्षांमध्ये त्या पुस्तकाच्या 25 आवृत्त्या निघाल्या. त्याचा खप लाखांमध्ये झालेला आहे.
राजहंसच्या पुस्तकांच्या मांदियाळीमध्ये आवर्जून उल्लेख करावं असं आणखी एक पुस्तक म्हणजे वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’. तेही पुस्तक विलक्षण लोकप्रिय ठरलं. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी ते पुस्तक आपल्याला प्रेरणास्वरूप ठरल्याचं सांगितलं आहे. हे राजहंसचे आत्ता माझ्या नजरेसमोर येणारे काही मोठे टप्पे.
राजहंसची आत्ता जवळपास 800 पुस्तकं उपलब्ध आहेत. एकूण प्रकाशित पुस्तकांची संख्या चार ते पाच हजार इतकी आहे.
‘रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स’ हे माझं पहिलं अनुवादित पुस्तक राजहंसनं काढलं. नंतरही माझी काही पुस्तकं राजहंसकडून प्रकाशित झाली... त्यामुळे व्यक्तिगत पातळीवरही माझ्या मनात राजहंसबद्दल जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं स्थान आहे आणि आता माझा राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकनिर्मितीमध्ये आणि संपादनामध्ये सहभाग असतो.
प्रश्न - नवी पुस्तक काढताना काय निकष असतो?
- आत्तापर्यंतची राजहंसची वाटचाल पाहिली तरी असं दिसेल की, ललित साहित्यामध्ये आमची पुस्तकं मोजकी आहेत... पण ती उल्लेखनीय ठरलेली आहेत. राजहंसचा मुख्य भर चरित्रात्मक आणि आत्मचरित्रात्मक पुस्तकांवर राहिलेला आहे. आमचं ते दालन खूप समृद्ध आहे.
समाजामध्ये जागृती करणं, ज्या गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आवर्जून आणायला पाहिजेत त्या आणणं, प्रसंगी त्या लोकानुनयी नसल्या तरी त्यांच्यावर भर देणं, त्यांचा पाठपुरावा करणं असा उद्देश माणूस साप्ताहिक सुरू करण्यामागे श्री. ग. माजगावकरांचा होता.
राजहंसच्या संहितेच्या निवडीमध्ये आजही तीच परंपरा कायम आहे... त्यामुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जीव ओतून काम करणाऱ्या, समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींची चरित्रं, आत्मचरित्रं राजहंसकडून आवर्जून निवडली जातात.
राजहंसच्या संपादक मंडळात चार मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. त्याशिवाय काही पुस्तकं संजय भास्कर जोशी, डॉ. श्रीराम गीत अशा राजहंसबाहेरच्या मान्यवरांकडून संपादित केली गेली आहेत.
प्रत्येक संपादकाचं संपादनासाठीचं आवडीचं कार्यक्षेत्र काही अंशी ठरलेलं आहे. त्यानुसार सामाजिक-राजकीय विषयांवरच्या संहिता आनंद हर्डीकर यांच्याकडे जातात. ललित साहित्याचं काम विनया खडपेकर बघतात. अनुवाद किंवा सामाजिक विषयांतलं काम करुणा गोखले बघतात. विज्ञान, कला असे विषय माझ्याकडे येतात. अशी ढोबळ विभागणी आहे.
कुठलीही संहिता निवडताना राजहंसच्या आत्तापर्यंतच्या परंपरेला ती साजेशी आहे की नाही हा विचार केला जातो. राजहंसच्या घडणीत एका बाजूला जसा ‘माणूस’च्या वैचारिक परंपरेचा भाग आहे तसाच दुसरा भाग वैचारिक मोकळेपणाचाही आहे.
विशिष्ट विचारांशी कायमस्वरूपी बांधिलकी किंवा विशिष्ट विचारांचा प्रचार असं राजहंसचं धोरण नाही. वैचारिक मोकळेपणा आणि सर्व विचारांना आपल्या व्यासपीठावर वाव देणं हे राजहंसचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे... त्यामुळे कित्येकदा परस्परविरोधी विचारांची पुस्तकंही राजहंसकडून प्रकाशित झालेली आहेत. सर्व प्रकारचे विचार मांडले जाणं आणि त्या वैचारिक घुसळणीतून समाजहितैषी धोरण पुढे येणं ही गोष्ट आम्हाला महत्त्वाची वाटते.
याचं एक उदाहरण देतो. शेषराव मोरे यांचं ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ या नावाचं पुस्तक राजहंसनं प्रकाशित केलं. मोरेंच्या त्या मांडणीला विरोध करणाऱ्या कितीतरी प्रतिक्रिया उमटल्या. त्यांत अनेक नामवंतांच्या प्रतिक्रियाही होत्या. त्या विरोधी प्रतिक्रियांचा संग्रह करून श्री.मा. भावे यांनी एक पुस्तक संपादित केलं. तेही राजहंसनंच प्रकाशित केलं.
आम्ही ही परस्परविरोधी पुस्तकं प्रकाशित केली कारण या मोकळेपणाच्या वैचारिक मंथनातूनच विचारांचं नवनीत हाती लागतं. ते कायमस्वरूपी, समाजाला पुढे नेणारं, समाजात बदल घडवणारं ठरेल असा आमचा विश्वास आहे. त्यानुसार राजहंसच्या संहितांची, पुस्तकांची निवड केली जाते.
प्रश्न - लेखक-वाचक आणि प्रकाशन व्यवसाय या सगळ्या परिघाचा विचार करता... त्यात काय बदल व्हावेत असं वाटतं?
- मराठी भाषेचा वापर करणाऱ्यांची संख्या आज साडेदहा ते अकरा कोटी आहे... पण मराठीतल्या पुस्तकव्यवहाराचा विचार करता हजार-दीड हजारांची आवृत्ती खपवताना मराठी प्रकाशकांना बऱ्यापैकी धाप लागलेली असते. काही पुस्तकं विलक्षण यशस्वी ठरतात, त्यांच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघतात, त्यांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो... पण अशी पुस्तकं मोजकीच असतात. ...मात्र याचा अर्थ असा नाही की, इतर पुस्तकं त्या दर्जाची नसतात. वाचकांच्या प्रतिसादाच्या बाबतीत ती काही वेळा दुर्दैवी ठरतात.
मला वाटतं की, यापुढच्या काळात अधिक मार्गांनी वाचकांच्या समोर जाणं हे प्रकाशकांना साधावं लागणार आहे... कारण बहुसंख्य लोक वाचत नाहीत हे पुस्तकांना प्रतिसाद कमी असण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. बहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही प्रकाशक कमी पडतो असं माझं वैयक्तिक मत आहे.
चंद्रपूरसारख्या दूरच्या भागामध्ये जेव्हा साहित्य संमेलन भरतं तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद विलक्षण असतो... पण तिथल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही बरेचदा कमी पडतो. आजच्या काळातल्या तांत्रिक प्रगतीमुळे, इंटरनेटमुळे आणि समाजमाध्यमांमुळे अशा ठिकाणी पोहोचण्याचा खूप चांगला मार्ग सुदैवानं मिळालेला आहे.
यापुढच्या काळात तांत्रिक प्रगतीच्या जोरावर कदाचित पुस्तकांचं स्वरूपही बदलत जाईल. इ बुक्स, ऑडिओ बुक्स भावी काळात अधिक लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. पुढच्या तंत्रस्नेही पिढीला ती अधिक सोयीची आहेत.
प्रश्न – इ बुक्स किंवा ऑडिओ बुक्स यांच्या दृष्टीनं राजहंसकडे काय योजना आहे?
- राजहंसचं अॅप हे मराठी प्रकाशन व्यवसायातलं पहिलं अॅप आहे. त्याच्या मदतीनं वाचक जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून राजहंसशी संपर्क साधू शकतात. पुस्तकांची मागणी नोंदवू शकतात. इबुक्सच्या दृष्टीनं आम्ही वाचनालयासारखी योजनाही आखलेली आहे. त्यात सदस्य नोंदणी करून वाचकाला वाचनालयाप्रमाणे सदस्य होऊन इबुक वाचता येतं. ते खरेदी करण्याची गरज असत नाही. असे काही तांत्रिक बदल राजहंस प्रकाशनातर्फे आम्ही करतो आहोत. ‘स्टोरीटेल’च्या माध्यमातून राजहंसची काही ऑडिओ बुक्ससुद्धा आलेली आहेत, काही नव्यानं येत आहेत.
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सव’ सध्याच्या काळात किती गरजेचा होता?
- लॉकडाऊनच्या आधीही, गेल्या अडीच-तीन वर्षांच्या काळात पुस्तक व्यवसायात मंदीचा काळ होता. त्याचा परिणाम पुस्तक प्रकाशकांना जाणवत होता. लॉकडाऊनचा फटका तर सगळ्यांनाच बसला. पुस्तकनिर्मिती, पुस्तक वितरण या गोष्टी ठप्प झाल्या होत्या... त्यामुळे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे मार्गच खुंटले होते आणि मराठीत इबुक्सची संख्या फार नाही... त्यामुळे या समस्येला सगळ्याच प्रकाशकांना तोंड द्यावं लागलं.
लॉकडाऊनची बंधनं शिथिल झाली तेव्हा या सगळ्यावर उत्तरं शोधण्याच्या दृष्टीनं सगळे प्रकाशक आपसांत चर्चा करतच होते. त्यातूनच ‘वाचन जागर महोत्सवा’ची कल्पना आली. दोनेक वर्षांपूर्वी प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते यांनी एकत्र येऊन अशा प्रकारची कल्पना पुण्यात राबवली होती. त्याला वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभलेला होता. तो अनुभव जमेला धरून मराठीतल्या दहा प्रकाशकांनी एकत्र येऊन या स्वरूपाचा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि तो पुण्यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातल्या शक्य तितक्या पुस्तक विक्रेत्यांना यात सहभागी करून घेण्यात आलं. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
प्रश्न - या महोत्सवासाठी पुस्तकांची निवड तुम्ही कशी केली?
- आम्ही काही पुस्तकं अशी निवडली ज्यांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, ती वाचकप्रिय आहेत... त्याचबरोबर आमच्या यादीत काही पुस्तकं अशीही आहेत ज्यांना वाचकांचा म्हणावा असा प्रतिसाद काही कारणानं मिळालेला नाही... पण ती वाचकांपर्यंत जाणं गरजेचं आहे.
विषयांच्या दृष्टीनं विचार करताना वय आणि वाचकांची आवड या दोन्हींची पूर्तता होईल अशी पुस्तकं त्यात असावीत असा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. या निकषांवर 25 पुस्तकांची निवड आम्ही केलेली आहे.
(मुलाखत- मृद्गंधा दीक्षित, शब्दांकन – सुहास पाटील)
वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी
हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :
अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे ! - अरुण जाखडे
डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड
प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर
अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात! - अशोक कोठावळे
मराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता ! - दत्तात्रय पाष्टे
चिरस्थायी स्वरूपाचं काम आपल्याकडं व्हायला पाहिजे! - मिलिंद परांजपे
आपलं प्रत्येक पुस्तक पुरोगामी चळवळीला पूरक असावं, हेच माझं तत्त्व ! - अरविंद पाटकर
व्यवसायात 'प्रोफेशनलिझम' आणण्याचे काम प्रकाशकांनी करायला हवे ! - सुनील मेहता
Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव राजहंस प्रकाशन सदानंद बोरसे मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्गंधा दीक्षित सुहास पाटील Interview Vachan Jagar Mahotsav Rajhans Prakashan Sadanand Borse Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Suhas Patil Load More Tags
Add Comment