अंमळनेर (जिल्हा जळगाव) या साने गुरुजींच्या कर्मभूमीत, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी मे महिन्यात तरुणाई साठी सहादिवसांचे श्रमसंस्कार छावणी शिबीर भरवले जाते. 2015 या वर्षी पावणेतींनशे युवक युवती सहभागी झालेल्या त्या छावणीचे उद्घाटन 26 मे रोजी झाले. त्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर केलेले हे भाषण आहे. वस्तुतः साने गुरुजी हा तसा सर्वपरिचित विषय, त्यामुळे त्यावर वेगळे काय बोलायचे हा प्रश्न कोणत्याही वक्त्याच्या मनात असतोच, तसेच माझेही झाले होते... त्यातच भर म्हणजे, रात्रभर प्रवास करून तिथे पोहचलेलो, खानदेशातील उन्हाळा, सभागृहात प्रचंड उकाडा आणि दुपारच्या भोजनानंतर सत्रात भाषण करायचे ठरलेले. तशा परिस्थितीत उद्घाटनाची इतर भाषणे चालू असताना मनातल्या मनात या भाषणाची जुळवणी केली. मात्र भाषण संपल्यावर परिचित विषयावर वेगळे म्हणावे असे भाषण करता आल्याचे समाधान वक्त्याला आणि तसेच भाषण ऐकता आल्याचे समाधान श्रोत्यांना होते. नंतर ते भाषण जसेच्या तसे लिहून साधना साप्ताहिकात (13 जून 2015 अंकात) प्रसिद्ध केले होते, आज ते इथे प्रसिद्ध करीत आहोत साने गुरुजींच्या 70 व्या स्मृतिदिनानिमित्त.
- संपादक
माझ्या तरुण मित्रांनो,
साने गुरुजींच्या या कर्मभूमीत किंवा कर्मभूमीच्या आसपास तुम्ही सर्व जण जन्माला आला आहात, वाढला आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांना साने गुरुजींचे विचार, कार्य आणि साहित्य माहीत आहे, असे मी गृहीत धरतो. आणि समजा, तुमच्यापैकी काहींना ते पुरेसे माहीत नसेल, तर तुम्ही ते वाचू शकाल. त्यामुळे ते सांगत बसण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण काही वेळापूर्वीच युवा श्रमसंस्कार छावणीचे उद्घाटन झाले आहे आणि पुढील पाच दिवस तुम्ही या छावणीत/शिबिरात बरेच काही ऐकणार आहात, समजून घेणार आहात; त्याची पूर्वतयारी म्हणून आताचे भाषण मी करणार आहे.
मला आज संयोजकांनी तुमच्यासमोर बोलण्यासाठी विषय दिला आहे- ‘साने गुरुजी: जीवन आणि प्रेरणा’. आणि मला असेही सांगितले आहे की, साधनाच्या संदर्भातही मी थोडे बोलावे. म्हणून आता आपण साने गुरुजींचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्य यावर काहीएक दृष्टिक्षेप टाकून त्यांची कालसुसंगतता तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर मित्रांनो, ‘साने गुरुजी’ हे नाव ऐकल्यावर/ वाचल्यावर तुम्हा सर्वांच्या मनात ‘श्यामची आई’ हे पुस्तक येत असणार; भले तुम्ही ते वाचलेले असो वा नसो. कारण त्या पुस्तकातला एखादा तरी धडा आपण शाळेत अभ्यासलेला असतोच आणि त्या पुस्तकाच्या संदर्भात थोरा-मोठ्यांकडून बहुतेक वेळा चांगले आणि काही वेळा वाईट ऐकलेले असते. हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले 1934 मध्ये, म्हणजे 80 वर्षे झाली. या काळातील महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांवर ‘श्यामची आई’ कमी-अधिक प्रभाव टाकून गेलेली आहे आणि मराठीतील ‘माइलस्टोन’ म्हणावी अशी दहा पुस्तके निवडायची ठरली, तर त्यात ‘श्यामची आई’चा समावेश करावाच लागतो.
या पुस्तकाला आचार्य अत्रे यांनी ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ असे म्हटले आहे, ते शब्दश: खरे आहे. याच पुस्तकावर आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा मराठी चित्रपट केला आणि त्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (1954 मध्ये) मिळाले, हे आपल्याला माहीत असते; पण त्याचे नेमके महत्त्व कळलेले नसते.
लक्षात घ्या... स्वातंत्र्य मिळून पाच-सात वर्षे झाली आहेत, भारत प्रजासत्ताक होऊन दोन-तीन वर्षे झाली आहेत, नव्या व आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी देशभरातील नागरिक आसुसलेले आहेत, स्वातंत्र्यासाठी लढलेली ध्येयवादी माणसं उदात्त आणि भव्य स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करीत आहेत. अशा वेळी, अखिल भारतीय स्तरावरील सर्व भाषांतून मिळून एक चित्रपट राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकासाठी निवडायचा होता. असे सुवर्णपदक देण्यासाठीचा तो प्रारंभबिंदू होता.
पहिलेच वर्ष असल्याने- कोणत्या चित्रपटाला ते सुवर्णपदक मिळणार याचे कुतूहल चित्रपटक्षेत्रातील देशभरातील लोकांना होते. कारण कलाकृती म्हणून तर तो चित्रपट ग्रेट असणे आवश्यक होतेच; पण कोणता विचार व कोणती मूल्ये सांगणारा तो चित्रपट आहे, हे अधिक महत्त्वाचे असणार होते. आणि त्या वेळी ‘श्यामची आई’ निवडला गेला होता. (त्या निवड समितीत मराठी भाषा जाणणारा एकही सदस्य नव्हता, हे आणखी विशेष)
देशाच्या आगामी वाटचालीत, राष्ट्राला आधुनिक करीत असताना ‘श्यामची आई’मधील विचार व मूल्ये देशातील नागरिकांनी स्वीकारावीत, त्यांचे अनुकरण करावे, त्यांचा प्रचार व प्रसार करावा- असा त्या राष्ट्रपतिपदकाचा सांगावा होता. मित्रांनो, ‘श्यामची आई’चा विचार करताना असा राष्ट्रीय कॅनव्हास समोर ठेवला; तर तुम्हाला साने गुरुजींचे जीवन, विचार व साहित्य यांच्या गाभ्याकडे जाता येईल.
आता अगदी अलीकडचे एक उदाहरण सांगतो. पाचसहा महिन्यांपूर्वी आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘पीके’ हा हिंदी चित्रपट आला आणि प्रचंड गाजला. तुम्ही बहुतेक सर्वांनी तो पाहिला असेल. नसेल पाहिला, तर जरूर पाहा. हा सिनेमा मी पाहिला, तेव्हा त्यावर संपादकीय लिहायचे ठरवले; म्हणून मग या सिनेमाच्या निर्मितीमागची कथा, त्यामागील प्रेरणा आणि त्यातून पटकथा लेखक व दिग्दर्शक यांना काय सांगायचे आहे, याचा शोध घेत होतो. त्यासाठी त्यांच्या मुलाखती, त्यांच्यावरील लेख पाहत होतो, वाचत होतो.
‘पीके’चे दिग्दर्शक आहेत राजकुमार हिरानी आणि पटकथा व संवादलेखक आहेत अभिजात जोशी. या अभिजात जोशींनी लिहिलेला हा केवळ दुसरा सिनेमा. यापूर्वी त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमाची पटकथा व संवाद लिहिले आहेत आणि तो सिनेमाही ‘पीके’इतकाच नव्हे तर अधिक गाजला होता. ‘गांधीगिरी’ ही संकल्पना घेऊन आलेल्या त्या सिनेमाने २००६ च्या उत्तरार्धातील पाच-सहा महिने भारताच्या समाजजीवनात हलकल्लोळ माजवला होता.
तर, ‘पीके’वर लिहिण्याच्या निमित्ताने मी अभिजात जोशी यांचे मूळ आणि कूळ शोधत होतो. आता ते अमेरिकेत आहेत, पण त्यांचे वडील प्रा.जयंत जोशी हे गुजरातमधील निवृत्त प्राध्यापक आहेत. ‘विकिपीडिया’वरील अभिजात जोशी यांच्या संदर्भातील माहितीमध्ये अगदी ठळकपणे लिहिलेले आहे की, प्रा.जयंत जोशी यांच्यावर साने गुरुजींच्या लेखनाचा विशेष प्रभाव आहे आणि अभिजात जोशी यांच्यावरही. (Like his father Jayant Joshi, who is a Sane Guruji scholar, Abhijat was deeply influenced by Sane Guruji. His father drew his attention to the profound concept of Dharma as Sane Guruji saw it. All these readings have helped him immensely in writing stories.)
नंतर मी सुधाताई बोडा (साने गुरुजींची पुतणी) यांच्याकडे चौकशी केली, कारण त्या गुजरातमध्ये बडोद्याला राहतात. त्यानंतर प्रा. जयंत जोशी यांच्याशी फोनवरून बोलणेही झाले आणि अभिजातला साधनाच्या एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करायचेही ठरले. मित्रांनो, हे सर्व जरा विस्ताराने व पार्श्वभूमीसह सांगायचे कारण, मी दुसऱ्यांदा ‘पीके’ पाहिला तेव्हा मला प्रकर्षाने हे जाणवले की; या सिनेमात सर्वत्र एक धून लपलेली आहे- ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’. तुम्हाला हे खरे वाटत नसेल तर, जा आणि पुन्हा एकदा तो सिनेमा पाहा. आणि त्या सिनेमाचा शेवट कसा आहे पाहा- ‘पीके कुछ सीख के गया, कुछ सिखाके. झुट बोलना सीख के गया, सिखाके गया प्यार शब्द का सही मतलब.’
मित्रहो, पीकेमधील ती धून आणि तो संदेश ज्या अभिजात जोशी यांच्या लेखणीतून उतरलेला आहे, त्या लेखणीतील शाई साने गुरुजींच्या साहित्यातून अवतरलेली आहे. या चित्रपटाचे महत्त्व लक्षात घ्या. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वांत जास्त व्यवसाय (700 कोटी रुपये) करणारा हा चित्रपट आहे आणि भारतातील व विदेशातील मिळून एक हजारांपेक्षा अधिक चित्रपटगृहांतून तो एकाच वेळी प्रदर्शित झालेला आहे. तुफान गर्दी खेचून सर्वांची वाहवा मिळवणारा हा चित्रपट आहे.
हे असे नातेसंबंध दाखवून मी साने गुरुजींचे माहात्म्य फुगवून सांगण्याचा प्रयत्न करतोय, असे तुमच्यापैकी एखाद्याला वाटेलही कदाचित. पण ‘पीके’मधील कोणती मूल्ये व कोणता विचार भारतभरातील लहान-थोरांनी डोक्यावर घेतला आहे आणि साने गुरुजींच्या साहित्यातील विचारमूल्यांचा गाभा काय आहे; हे तुम्ही एकत्रितपणे पाहणार असाल, तर मी सांगतोय तो नातेसंबंध अवास्तव वाटणार नाही.
अभिजात जोशी यांच्याकडून ‘पीके’मध्ये ‘खरा तो एकचि धर्म’ अनवधानाने आलेला नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील धून ‘बंदे में था दम, वंदे मातरम्’ अशी आहे. म्हणजे तिथे उघड-उघड गांधी आहेत, इथे अदृश्य रूपात गुरुजी आहेत. (गंमत म्हणजे, या दोनही सिनेमांचे पुरेपूर कौतुक करून, प्रत्येकी एक मोठी गफलत दाखवून, कठोर टीका करणारे संपादकीय लेख मी त्या-त्या वेळी लिहिले आहेत. पण ते वेगळ्या संदर्भात आहेत, म्हणून त्याबाबत इथे बोलत नाही.)
माझ्या तरुण मित्रांनो, गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्व मराठी शाळांमधून ज्या प्रार्थना म्हटल्या जातात (असो तुला देवा माझा, बलसागर भारत होवो, खरा तो एकचि धर्म इ.) यातल्या बहुतेक साने गुरुजींच्या कविता आहेत. आणि चळवळी-आंदोलनात जी गाणी म्हटली जातात, त्यातली अनेक (आता उठवू सारे रान, जिंकू किंवा मरू...) साने गुरुजींची आहेत.
साने गुरुजींच्या नावावर लहान-मोठी मिळून शंभरांपेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्यात लहान मुलांसाठी ‘गोड गोष्टी’सारखी अनेक संस्कारक्षम पुस्तके आहेत आणि मोठ्यांसाठी ‘भारतीय संस्कृती’सारखी विचारप्रवर्तक पुस्तके आहेत. पण गुरुजींच्या साहित्यामध्ये एक मोठे दालन आहे- अनुवादित पुस्तकांचे. त्याचे महत्त्व आपण नीट ओळखलेले नाही. कोणी तरी सांगितले म्हणून किंवा प्रकाशकांनी सुचवले म्हणून अनुवादित करायला घेतले, असा प्रकार गुरुजींबाबत शक्यच नव्हता. एखादे पुस्तक, लेख-निबंध, गोष्ट इतकी भावली की, ती अनुवादित किंवा रूपांतरित केल्याशिवाय राहवले नाही, असाच प्रकार त्यांच्याबाबत प्रत्येक वेळी घडत होता. पण ते करताना त्यांनी भारतीय व पाश्चात्त्य आणि प्राचीन व अर्वाचीन काळातील कोणते व किती साहित्य मराठीत आणले, यावर नजर टाकली तरी आपण अचंबित होतो. त्या सर्वांमधील समान सूत्र उदात्त ध्येयवादाचे दर्शन घडवून, आदर्श माणूस घडवणे हेच आहे.
गुरुजींनी तमिळ भाषेतील प्राचीन काव्य ‘कुरल’चा अनुवाद केला, तसाच ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या जवाहरलाल नेहरूंच्या ग्रंथाचा अनुवादही केला. टागोर आणि गांधी यांचे काही लेखन तर त्यांनी मराठीत आणलेच; पण मला जास्त कौतुक वाटते ते विल ड्युरांटच्या ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या ग्रंथाचे भाषांतर गुरुजींनी केले याचे. ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ या नावाने तो अनुवाद प्रसिद्ध आहे.
आज इथे येण्यापूर्वी तत्त्वज्ञान केंद्रात जाऊन आलो; तेव्हा अविनाशने (पाटील) सांगितले की, साने गुरुजी अंमळनेरला आले होते ते तत्त्वज्ञान शिकण्यासाठी, शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी नव्हे. भारतातील पहिले तत्त्वज्ञान केंद्र शंभर वर्षांपूर्वी अंमळनेर येथे प्रतापशेठजींनी उभारले आणि तिथे शिकण्यासाठी (पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून बाहेर पडल्यावर) गुरुजी आले होते. पण वर्षभरानंतर तत्त्वज्ञानात रस राहिला नाही म्हणून ते अंमळनेरमध्येच शिक्षक झाले, हा इतिहास नंतरचा आहे. त्यामुळे आता लक्षात येतेय, ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाच्या अनुवादामागची गुरुजींची प्रेरणा...
गुरुजींनी ‘इस्लामी संस्कृती’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिले आहे. अनेकांच्या मते, इस्लामी संस्कृती अशी नाही; आणि यदुनाथ थत्ते यांच्या मते, साने गुरुजींना भावलेली इस्लामी संस्कृती या पुस्तकात आली आहे. ते काहीही असो; मराठी लोकांना इस्लामी संस्कृती कळली पाहिजे, तिचे दालन खुले करून दिले पाहिजे, ही त्या लेखनामागची प्रबळ प्रेरणा होती, हे तर निश्चित!
असाच प्रकार ‘चिनी संस्कृती’बद्दलही सांगता येईल. चिनी संस्कृतीची ओळख करून देणारे पुस्तक गुरुजींनी अखेरच्या काळात लिहिले होते, ते प्रकाशित करायचे राहून गेले आणि त्या हस्तलिखिताच्या दोन डायऱ्या आता इतक्या अस्पष्ट झाल्या आहेत की, त्या प्रसिद्ध करणे शक्य नाही म्हणून वडघरच्या साने गुरुजी स्मृतिसंग्रहालयात ठेवल्या आहेत.
पण मित्रांनो, इस्लामी संस्कृती व चिनी संस्कृती लिहिताना गुरुजींनी भारताचा सर्वांत मोठा अंतर्गत प्रश्न व सर्वांत मोठा बाहेरचा धोका लक्षात घेऊन ते लेखन केले असावे, एवढे तरी आपण मान्य करणार आहोत की नाही? साने गुरुजींचे साहित्य महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले आहे- किंबहुना, मागील पन्नास-साठ वर्षांतील बालकुमार व युवकांच्या अनेक पिढ्या त्या लेखनाचे संस्कार घेऊनच मोठ्या झाल्या आहेत.
या संदर्भात, नुकतेच ज्ञानपीठ मिळालेले भालचंद्र नेमाडे ‘साने गुरुजी हा मला थोर कादंबरीकार वाटतो’ असे का म्हणतात, ते समजून घेतले पाहिजे. आणि तर्कशुद्ध पद्धतीने राजकीय- सामाजिक-सांस्कृतिक विषयांवर लेखन करणारा नरहर कुरुंदकर हा विचारवंत साने गुरुजींच्या साहित्याचा गौरव का करतो, तेही लक्षात घेतले पाहिजे. भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या देशीवादाच्या मांडणीसाठी ओळखले जातात आणि कुरुंदकर स्वत:ला मार्क्सवादी म्हणवून घेत होते. म्हणजे मार्क्सवाद व देशीवाद अशा दोन टोकांच्या विचारसरणीच्या भाष्यकारांना गुरुजींच्या साहित्याचे अनन्यसाधारणत्व मान्य आहे, एवढाच मुद्दा मला इथे अधोरेखित आहे.
पण ना.सी. फडके व तत्सम काही लेखकांनी साने गुरुजींच्या हयातीतच त्यांच्या साहित्यावर टीका केली होती. आणि गुरुजींनी स्वत:वरील टीकेला कधीही उत्तर दिलेले नाही, असा एक समज आहे. पण तो खरा नाही. पुणे येथे 1942 मध्ये कुमारांचे साहित्य संमेलन भरले होते, तिथे गुरुजींनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका ‘कुमारांपुढील कार्ये’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात गुरुजींनी स्वत:च्या लेखनावर होत असलेल्या टीकेला दिलेले उत्तर लाजवाब आहे.
त्यातला एक परिच्छेद असा आहे- ‘‘मी साधे-सरळ लिहिले. त्यात कला नाही. पाल्हाळ असेल, परंतु मी अपाय करणारे सहसा लिहिले नाही. महाराष्ट्रातील हजारो मुले- बाळे, स्त्रिया त्याने आनंदल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील भूमिगत कार्यकर्ते अज्ञातवासात माझी पुस्तके वाचीत. ते रडके झाले नाहीत. मी नवविचार, उदार भावना दिल्या आहेत. शनिमाहात्म्याचे धर्म मी सांगितले नाहीत. टीका करणारे टीका करोत, माझे लिहिणे पै किमतीचे ठरवोत. परंतु त्या पै किमतीच्या लिखाणाचाही खूप उपयोग होऊन राहिला आहे. भूक लागली असता हिरेही फेकावे लागतात आणि पै किमतीचे डाळे-मुरमुरेही पृथ्वीमोलाचे वाटतात.’’
मित्रांनो, गंमत अशी आहे की, 2004 च्या डिसेंबरमध्ये हा परिच्छेद मी युवा अतिथी संपादक असताना साधनाच्या मुखपृष्ठावर छापला होता, तेव्हा साधनाच्या काही वाचकांनी असा आक्षेप घेतला होता की, हा परिच्छेद गुरुजींचा असणे शक्यच नाही. एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी महिला तर म्हणाल्या की, आम्ही गुरुजींबरोबर इतकी वर्षे राहिलो आहोत; त्यामुळे आम्हाला माहीत आहे- साने गुरुजी स्वत:विषयी असे लिहिणे शक्य नाही. गंमत म्हणजे, कुमारांच्या त्या साहित्य संमेलनाला त्या स्वत: उपस्थित होत्या. सांगायचे काय तर, गुरुजींचे लेखन आपण पुन: पुन्हा तपासून घेतले, तर प्रत्येक वेळी नवीन काही तरी हाती लागण्याची शक्यता आहे.
असाच आणखी एक वेगळा उतारा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा उतारा ‘गोदातटीचे कैलासलेणे’ या कुरुंदकरांच्या स्मृतिग्रंथातून घेतला आहे. आनंद साधले यांनी कुरुंदकरांच्या आठवणी सांगणारा जो लेख लिहिला आहे, त्यातील हा उतारा आहे. उताऱ्याचे शीर्षक आहे ‘रड्या माणूस.’
रड्या माणूस
एकदा मुंबईतील शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिरात कुरुंदकरांचे व्याख्यान होते. विषय होता- ‘साने गुरुजी’. कुरुंदकरांचे व्याख्यान, म्हणून सभागृह श्रोत्यांनी भरून वाहत होते. शिवाजी पार्कचे श्रोते म्हणजे कडक इस्त्री, ताठ कॉलर, परदेशी सुगंध, लिपस्टिकची लाल धनुष्ये, परदेशी साड्या यांचे प्रदर्शनच. साने गुरुजी हा एक ‘रड्या माणूस’, हीच बहुतेकांची धारणा. कुरुंदकरांनी ही नाडी बरोबर ओळखली होती. सुरात सूर मिसळून त्यांनी व्याख्यान आरंभिले- ‘‘...साने गुरुजी हा एक रड्या माणूस. हा कसला लेखक?’ असे तुम्ही मानत असाल. मी तुमच्याशी सहमत आहे, असे समजा. साने गुरुजींनी पुष्कळ कादंबऱ्या लिहिल्या. मी कॉलेजात गेली अनेक वर्षे कादंबरी हा विषय शिकवतो; पण मी कधीही साने गुरुजींचे नाव घेतलेले नाही. त्यांनी कविताही लिहिल्या. विद्यार्थ्यांना मराठी काव्यही मीच शिकवतो; पण मी कधीही साने गुरुजींचे नाव घेतले नाही.’’
अशा सुरांवर बरेच बोलून मग एकदम कलाटणी देत कुरुंदकर म्हणाले, ‘‘पण मित्र हो, वर्गात कथा-कादंबरी शिकविताना मी कधी टिळकांचेही नाव घेतलेले नाही; मग तुम्ही टिळकांना लेखक मानणार आहात की नाही? गीतारहस्याला ग्रंथ मानणार आहात की नाही?’’ रूळ बदलून कुरुंदकरांची गाडी अशा स्थानकावर आली की, साने गुरुजी हे नुसते लेखक नव्हते, ते लेखकांचे लेखक होते; लेखकांचे निर्माते होते. म्हणजे श्रोते ज्या दुसऱ्या लेखकांना नामवंत लेखक मानीत होते, त्या सर्वांच्या लेखनप्रेरणेला कुठे तरी साने गुरुजींच्या लेखनाचा परिसस्पर्श झालेला होता; खतपाणी मिळालेले होते.
नंतर विषय वळला रडण्याकडे. कुरुंदकर म्हणाले, ‘‘साने गुरुजी सतत रडतच असत; पण तुमच्यामध्ये एक तरी व्यक्ती अशी आहे का, जी कधी रडली नाही? फरक एवढाच आहे की; तुम्ही रडता ते स्वत:साठी. कधी परीक्षेत नापास झाला म्हणून रडता, पास झालात तर पहिला वर्ग नाही म्हणून रडता, तो मिळाला तर चांगली नोकरी नाही म्हणून रडता, तीही मिळाली तर बढती नाही म्हणून रडता, ती मिळाली तर दुसऱ्याच्या खर्चाने परदेशात जाता येत नाही म्हणून रडता....असे तुम्ही सारे रडतच असता; पण तुम्ही रडता ते स्वत:साठी, स्वार्थासाठी. साने गुरुजी रडले दुसऱ्यांसाठी. तुम्हा साऱ्यांसाठी ते रडले. त्यांनी त्यांचा एकही अश्रू स्वत:ला काही मिळावे म्हणून ढाळलेला नाही. त्यामुळे तुमचे अश्रू ही रडगाणी असतात. साने गुरुजींच्या अश्रू-अश्रूंतून महाराष्ट्राची शक्तिकेंद्रे उमलली आहेत. ज्यांचा तुम्हाला आधार वाटतो, असे महाराष्ट्राचे अनेक थोर पुढारी साने गुरुजींचे अश्रू पिऊन पेटलेले आहेत.’’
असे हे व्याख्यान दीड-पावणेदोन तास चालले आणि ते संपताच एक मोठे आश्चर्य घडलेले दिसले. सभेतील कित्येकांचे डोळे तर ओलावले होतेच, पण व्यासपीठावर असलेले बालमोहनचे संस्थापक आणि संवर्धक दादासाहेब रेगे यांना आवेग अनावर झाला. स्वत:चे वयोवृद्धत्व विसरून पुत्रापेक्षाही वयाने लहान अशा कुरुंदकरांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी ते व्यासपीठावरच विनम्र झाले. ही घटना अत्यंत नाट्यमय होती. सभेतील बहुतेक साऱ्या ताठ कॉलरींची जडण-घडण दादासाहेबांच्या नामवंत शाळेतच झालेली होती. त्यामुळे त्या कुलपतीचे हे विनम्र अभिवादन स्वत:बरोबर सर्व सभागृहाला घेऊनच विनम्र झाले...
- आनंद साधले (आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषदेने 1983 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘गोदातटीचे कैलासलेणे’ या नरहर कुरुंदकर स्मृतिग्रंथातील लेखातून)
माझ्या तरुण मित्रांनो, या उताऱ्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. पण आणखी एका अफलातून लेखनाचा संदर्भ सांगतो आणि मग साने गुरुजी व साधना या शेवटच्या मुद्याकडे वळतो. तुम्हाला हे माहीत असेल की, 1942 च्या चळवळीत साने गुरुजी भूमिगत झाले होते. भूमिगत अवस्थेत असताना ते वेष बदलून गावोगावी फिरत होते आणि समाजातील सर्व घटकांना स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यासाठी उद्युक्त करीत होते. त्यासाठी त्यांनी काही पत्रकं काढली होती आणि ती गावोगावी अतिशय गुप्त पद्धतीने वाटप केली जात होती. त्या सर्व पत्रकांचे ‘क्रांतीच्या मार्गावर’ या नावाने सायक्लोस्टाइल पुस्तक तयार झाले होते आणि ते सुद्धागावोगावी पोहोचवले जात होते.
त्या पत्रकात/पुस्तकात विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नोकरदार अशा विविध वर्गांना कळकळीचे व जोरदार आवाहन केलेले होते. ‘विद्यार्थ्यांनो, शाळा सोडा आणि लढ्यात उतरा- देश पारतंत्र्यात असताना कसली पुस्तके वाचता? कामगारांनो,रस्त्यावर या, कारखाने बंद पडू द्या; शेतकऱ्यांनो, धान्य विकू नका, सरकाराला कर देऊ नका; नोकरदारांनो, सरकारी नोकऱ्या सोडा आणि देशकार्यात उतरा...’ असे आवाहन गुरुजींनी केवळ आक्रमक नव्हे तर चेतवणाऱ्या भाषेत केलेले आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न होणाऱ्या कम्युनिस्टांचा तरत्यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
‘क्रांतीच्या मार्गावर’ हे पुस्तक म्हणजे नुसता अंगार आहे;त्यातून पेटत्या ज्वाला बाहेर पडतात, असे म्हणणेच योग्य ठरेल. तर, भूमिगत होऊन असे जनमानसाला पेटवणारे साने गुरुजी तेच आहेत, ज्यांनी ‘श्यामची आई’ लिहिली आहे. आणि या दोहोंमध्ये विसंगती अजिबात नाही. असलेली सुसंगती तुम्ही ओळखा, शोधा!
ब्रिटिश सत्तेच्या काळात ‘क्रांतीच्या मार्गावर’ या पुस्तकावर बंदी आली होती आणि नंतर त्याच्या प्रतीही उपलब्ध नव्हत्या. पण २००७ मध्ये त्याची एक दुर्मिळ प्रत हातात आल्यावर ती संपूर्ण पुस्तिका आम्ही साधनाचा विशेषांक म्हणून प्रसिद्ध केलेली आहे. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत, दोन-तीन प्रकाशकांनी समग्र साने गुरुजी पुस्तकरूपात आणले आहेत. त्यामुळे ते पुस्तक उपलब्ध आहे.
आणखी एका कारणासाठी ते पुस्तक मला विशेष महत्त्वाचे वाटते. त्या पुस्तकातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात,जमीनदार- भांडलदार आणि प्रस्थापितांच्या विरोधात आग ओकली आहे हे खरे; पण त्या पुस्तकात गुरुजींनी विद्यार्थी,कामगार, शेतकरी, शोषित घटकांना मोठी आश्वासने दिली आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणी दु:खी असणार नाही, सर्वांना शिक्षण मिळेल, सर्वांच्या हाताला काम मिळेल, शोषणकरणारे कोणी नसतील, समतेच्या दिशेने देश वाटचालकरील- अशी आश्वासने अतिशय स्पष्ट शब्दांत व उत्कटतेने दिलेली आहेत.
त्या संदर्भात ग. प्र. प्रधान आणि सदानंद वर्दे यांना मी विचारले होते की, ‘गुरुजींना तसे खरोखरच वाटत होते का? की,लोकांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्या भावनेला हात घालण्यासाठी तसे आवाहन ते करत होते?’ प्रधान सर व वर्दे सर या दोघांनीही असे सांगितले की, ‘‘स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आम्हा सर्वांनाच तसे वाटत होते. देश स्वतंत्र झाला की, आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील, अशीच आमची त्या वेळची समजूत होती; म्हणून तर आम्ही इतके त्वेषाने व झोकून देऊन, सर्वस्व पणाला लावून लढत होतो... आणि साने गुरुजी तर तसे मनापासून वाटल्याशिवाय लिहिणे शक्यच नाही.’’
तरुण मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न यापूर्वी विचारला गेला असेल किंवा पुढे कोणी निश्चित विचारतील की, साने गुरुजींनी 11 जून 1950 ला स्वत:चे आयुष्य का संपवले? याचे कारण कदाचित त्या पुस्तकात सापडू शकेल. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सुटतील अशी गुरुजींच्या मनाची खात्री होती आणि प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य मिळाले तेच मुळी फाळणी होऊन! त्या वेळी झालेला रक्तपात आणि धार्मिक द्वेष, त्यातच झालेली गांधीजींची हत्या. त्यानंतर पंढरपूर मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवून देण्यासाठी गुरुजींना करावा लागलेला संघर्ष आणि त्या वेळी दिसलेली जातिसंस्थेची घट्ट वीण. हा सर्व प्रकार गुरुजींना निराशेच्या गर्तेत ढकलणारा ठरला असावा.
आपण स्वप्नं वेगळीच दाखवत होतो आणि प्रत्यक्षात वेगळेच घडते आहे... प्रत्येकच घटक कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शोषण करतोय, सर्वच घटक कमी- अधिक मतलबी आहेत, हे विदारक वास्तव गुरुजींना सहन करण्यापलीकडचे वाटले असावे. आणि म्हणून कदाचित, या जगात जगण्यासाठी आपण लायक नाही, असेही त्यांना वाटले असावे.
मित्रांनो, स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व ओतून लढणाऱ्या गुरुजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर एक दैनिक सुरू केले होते, त्याचे नाव होते ‘कर्तव्य’. किती अर्थपूर्ण शीर्षक! म्हणजे स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेशी संघर्ष केला, आता स्वराज्य आणण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे! नवा समाज निर्माण करायचा आहे, जाती-धर्मांच्या भिंती पाडायच्या आहेत, गरीब-श्रीमंत यातील दऱ्या बुजवायच्या आहेत, शोषित-शोषक अशी विभागणी संपुष्टात आणायची आहे; त्यासाठी करावयाचे काम म्हणजे ‘कर्तव्य’.
पण आजच्याइतके नसले तरी व्यावहारिक दृष्टीने त्या वेळीसुद्धा दैनिक चालवणे कठीण होते. त्यामुळे चार-पाच महिन्यांतच ते बंद पडले. त्यानंतर गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘साधना’ या पुस्तकाचा गुरुजींवर विशेष प्रभाव होता. साधना या कल्पनेचा त्या पुस्तकात अभिप्रेत असलेला उदात्त अर्थ आणि त्याची व्याप्ती लक्षात घेऊन गुरुजींनी साप्ताहिकाला ते नाव दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. पहिल्या अंकाच्या संपादकीयात त्यांनी साधनाचे स्वरूप कसे असेल, याविषयी तर लिहिले आहेच; पण त्याचा गाभा फार नेमकेपणाने सांगितलेला आहे.
त्यातले एक वाक्य असे आहे... ‘विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे.’ हे वाक्य फार साधे वाटते, पण तसे ते नाही. सर्व प्रकारची विषमता आणि सर्व प्रकारचा वैरभाव नष्ट करण्याची भाषा गुरुजी बोलताहेत, कमी करण्याची नव्हे!
मित्रहो, तुम्हाला व मला तेवढा ध्येयवाद झेपत नाही आणि शोभतही नाही. म्हणून आजच्या आणि तुमच्या-माझ्यासंदर्भात एवढेच म्हणेन की, युगानुयुगे चालत आलेली विषमता व वैरभाव पुढील हजार-पाचशे वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात राहणार आहे, हे आपण मनोमन समजून घेतले पाहिजे. पण त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे,याची खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. त्यामुळे जे-जे उत्तम,उन्नत व उदात्त आहे, त्यासाठी वेळ व श्रम खर्च केले आणि हा प्रवास न संपणारा आहे, हे लक्षात घेऊन वाटचाल केली, तर निराशा येणार नाही. कर्तव्यभावना म्हणजे तरी वेगळे काय असते?
गुरुजींनी पहिल्याच संपादकीयात ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची सुंदर व्याख्या केली आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, असा इशारा तर ते देतातच. पण ‘स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी’ असे सांगतात; तेव्हा गुरुजींचा मानवी भाव-भावनांचा विचार किती सखोल होता, हे दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला- मला स्वातंत्र्य मिळते किंवा मिळवायचे असते; तेव्हा संधी व जबाबदारी या दोहोंचा विचार एकत्रितपणे करायचा असतो, बरोबर वागवायचा असतो आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचे असते.
साने गुरुजी केवळ पावणेदोन वर्षे साधनाचे संपादक होते, त्यानंतरची 65 वर्षे साधना वेगवेगळ्या संपादकांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालवली आहे. पण साने गुरुजींच्या ध्येयवादाचा गाभा कायम आहे, कायम राहील! साधनाच्या आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मी इथे सांगत बसत नाही.पण हीरकमहोत्सवानंतर साधनाची वाटचाल अमृतमहोत्सवाच्या दिशेने करण्यासाठी जे उपक्रम दीर्घकालीन हेतू ठेवून सुरू केले, त्यांतला एक उपक्रम आहे बालकुमार व युवा हे दोन दिवाळी अंक. गेली पाच वर्षे बालकुमार अंकाच्या साडेतीन ते चार लाख प्रती महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात आम्ही पोचवीत आहोत.
गेल्या वर्षापासून युवा दिवाळी अंक सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी त्याच्या पाऊण लाख प्रती काढाव्या लागल्या. बालकुमार व युवा अंक अशाच पद्धतीने वाढते राहिले, तर आणखी सात वर्षांनी म्हणजे साधनाचे अमृतमहोत्सवी वर्ष येईल तेव्हा; महाराष्ट्रातील किमान 50 लाख तरुण-तरुणी असे असतील ज्यांनी त्यांच्या शाळा- महाविद्यालयात किमान एकदा तरी बालकुमार किंवा युवा अंक वाचलेला असेल. आणि त्या वेळी गुरुजींची साधना मोठ्या प्रमाणात सर्वत्र पोहोचविण्यासाठी अधिक अनुकूलता निर्माण झालेली असेल. तो प्रवास साधनाला करता यावा यासाठी तुमच्या शुभेच्छांची आणि सहभागाची अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.
- विनोद शिरसाठ
Tags: साने गुरूजी विनोद शिरसाठ श्रमसंस्कार छावनी श्यामची आई पीके Speech Sane Guruji Shyamchi Aai Vinod Shirsath Pk Load More Tags
Add Comment