1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.
बालसाहित्य, चित्रकला आणि क्राफ्ट्स या विषयांमध्ये गेल्या 70 वर्षांपासून ज्योत्स्ना प्रकाशनने आपले स्थान निर्माण केले आहे. कलेशी संबंधित पुस्तकांमध्ये कलावंतांचा दृष्टीकोन आणि कलाकारांच्या कार्यपद्धती समाविष्ट करणारे रेखाटन, रेखाचित्र आणि चित्रकला यांसारख्या विषयांवरील पुस्तके जोत्स्नाने काढली आहेत. यांतील काही पुस्तकांची क्रमिक अभ्यासक्रमासाठीदेखील शिफारस करण्यात आली.
बालसाहित्यातही चित्रपुस्तके, कथा, चरित्र, इतिहास, विज्ञान आणि पर्यावरण अशा विविध विषयांवरील पुस्तके ज्योत्स्नाने प्रकाशित केली आहेत. पूर्वप्राथमिक स्तरातील मुलांसाठी नावीन्यपूर्ण ‘पिक्चर रिडिंग’ पुस्तके आणि त्यांचा इमोशनल कोशंट वाढवणारी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.
किशोर साहित्यात अनुवादित आणि नव्याने लिहून घेतलेली अशी दोन्ही प्रकारची पुस्तके प्रकाशित केली आहेत. आशय आणि निर्मिती यांसाठी ज्योत्स्ना प्रकाशनाला अनेकविध पुरस्कार मिळाले आहेत. प्रकाशन क्षेत्रातला अत्यंत मानाचा समजला जाणारा वि. पु. भागवत पुरस्कार त्यांना 1998 मध्ये मिळाला.
‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने जोत्स्ना प्रकाशनाच्या मिलिंद परांजपे यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - ज्योत्स्ना प्रकाशनाच्या वाटचालीतील समाधानाच्या गोष्टी कुठल्या वाटतात तुम्हाला?
- माझ्या वडिलांनी म्हणजे ल. गो. परांजपे यांनी हे प्रकाशन सुरू केलं आणि अगदी सुरुवतीपासून आम्ही प्रयोग करत गेलो, जे आपल्याकडे बालवाङ्मयामध्ये सहसा कुठे केलेलं दिसत नाही. पन्नास सालीच आम्ही मोठ्या टायपात पुस्तकं छापायला सुरुवात केली. म्हणजे त्या वेळी हेडिंगसाठी जो टाईप वापरला जायचा तो वडिलांनी मुलांच्या पुस्तकांसाठी वापरायला सुरुवात केली. त्या वेळी तो टाईप पुस्तक छापण्याइतका उपलब्ध नव्हता... कारण हेडिंगसाठी किती लागणार? तो ल.गों.नी पुस्तकासाठी पुरेसा ठरेल इतका मुद्दामून करवून घेतला. तो प्रयोग खूप यशस्वी झाला.
आम्ही गेल्या 15-20 वर्षांमध्ये वेगवेगळ्या आकारांतसुद्धा पुस्तकं छापून घेतली. रंगीत पुस्तकं छापण्याची सुरुवातसुद्धा आम्हीच केली. पुस्तकाचा आकार, त्याचं मुखपृष्ठ, मजकुराचा फॉन्ट साईझ यांच्या बरोबरीनं आम्ही पुस्तकातल्या आशयामध्येसुद्धा प्रयोग केले. परीकथा, लोककथा एवढंच आपल्या बालवाङ्मयाचं विश्व होतं. आम्ही त्यात नवीन आताच्या काळाच्या गोष्टी आणल्या आणि सगळ्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळाला.
1992पासून लहान मुलांची चित्रकलेची पुस्तकं करायला सुरुवात केली. 2000पासून मोठ्यांचीपण चित्रकलेची पुस्तकं करायला सुरुवात केली. त्याला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला... कारण आम्ही ती मराठीबरोबरच इंग्लीशमध्येही प्रकाशित केली. ही पुस्तकं मग बंगाली, कानडी, मल्याळी या भाषांतही आली...
आमच्या ‘वाचू आनंदे’ या साहित्य आणि दृश्यकला या दोन्हींची सांगड घालणाऱ्या चार पुस्तकांनी चांगलीच वाहवा मिळवली.
‘विमानं उडवा’ नावाचं एक पुस्तक आहे. त्यात विमानाचे पार्ट पंच करून त्यात दिलेले असतात. अशा पुस्तकातून तुम्ही नकळत विज्ञान शिकत असता. विमानाचं मॉडेल कागदावरचं असलं तरी ते उडवयाचं कसं हे सांगताना लेखकाला एरोडायनॅमिक्सचीच माहिती सांगावी लागते. ‘एरोडायनॅमिक्सची माहिती’ असं ठळक टायपात छापून ती सांगितली जात नाही तर विमान करता-करता नकळत सांगितली जाते. असे अनेक प्रयोग आम्ही केले.
त्यामुळे एकंदरीत जोत्स्ना प्रकाशनाचा प्रवास समाधानाचा आणि आलेख चढता राहिलाय असं म्हणू शकतो.
प्रश्न - प्रकाशन व्यवसाय आणि त्याचा एकंदरीत परीघ यांमध्ये तुम्हाला खटकणाऱ्या गोष्टी काय आहेत? या व्यवसायात कोणते बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं?
- सगळे प्रकाशक टेक्नोलॉजीच्या बाजूनं कमजोर आहेत. इ बुकला किंडलकडून व्यावसायिक दृष्ट्या 2007मध्ये सुरुवात झाली. आमच्याकडे बहुतांश प्रकाशनाची इ बुक्स यायला या वर्षी सुरुवात झालीय. तेसुद्धा लॉकडाऊनमुळे काही प्रकाशक या माध्यमाकडे वळले. इ बुक आपल्याकडे यायला 15 वर्षांचा काळ जावा लागला.
आपल्या बहुतांश मराठी प्रकाशकांच्या अद्ययावत वेबसाईट्स नाहीयेत. जगभर अशा वेबसाईट्सच्या माध्यमातून किंवा एकंदरीत इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुस्तकांच्या विक्रीसाठी प्रचार-प्रसार केला जातो. आपण अजूनही वर्तमानपत्रांतून जाहिरात देणं आणि परीक्षणं येणं इतक्या गोष्टींवरच अवलंबून आहोत. नवीन तंत्रज्ञान, माध्यमं आपण पुरेशी वापरत नाही. अनेक प्रकाशकांच्या अगदी आतापर्यंत वेबसाईट्स नव्हत्या. अजूनही काही जणांच्या नाहीयेत. तांत्रिक प्रगतीकडे आपण बरंच दुर्लक्ष केलेलं आहे.
जगभरामध्ये मोठ्या प्रकाशन संस्था स्वतःचं एक टार्गेट ठरवत असतात. इतकी पुस्तकं प्रकाशित करायची, इतक्या लोकांपर्यंत पोहोचायचं, इतकी विक्री वाढवायची. आपल्याकडे असं काहीच नाहीये. ‘फ्रँकफर्ट बुक फेअर’ यंदा ऑनलाईन झालं, त्याचे सगळे परिसंवाददेखील ऑनलाइन झाले. त्यांतल्या एका परिसंवादामध्ये ‘कोबो’ नावाची एक प्रकाशन संस्था सहभागी होती. त्यांनी असं सांगितलं की, कोरोनाच्या काळातले पहिले दोन महिने गोंधळाचे होते... पण नंतरच्या चार महिन्यांत आम्ही इ बुकच्या संदर्भातलं आमचं पुढच्या दोन वर्षांचं टार्गेट पूर्ण केलं. याचं कारण ते आधीपासून इ बुक व्यवसायात होते.
लोक घरी बसलेले... बाहेर पडता येत नव्हतं. साहजिकच तेव्हा लोकांनी छापील पुस्तकाला पर्याय म्हणून इ बुकचा विचार केला. आपल्याकडे मात्र बहुतांश प्रकाशनांची इबुक्सच नव्हती. आम्ही काय प्रगती केली तर त्या चार महिन्यांत आम्ही इबुक करायला सुरुवात केली... पण तरी आपल्या वाचकांना त्याची पूर्ण माहिती नाहीये. ती विकत कशी घ्यायची, वाचायची कशी, कुठल्या-कुठल्या डिव्हाईसवर वाचता येतील हे अजूनही सगळ्या वाचकांपर्यंत पोहोचलेलं नाही.
प्रश्न - याचं कारण काय असावं असं वाटतं तुम्हाला?
- ...कारण आमची दृष्टी संकुचित आहे. आम्ही नवीन मार्ग चोखळायला तयार होत नाही. पारंपरिक मार्गाला चिकटून राहतो. इंटरनेटवर फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मिडियाचा उपयोग करून पुस्तकांचा प्रचार-प्रसार जगभर चांगल्या प्रकारे केला जातो. आपल्याकडे आपण कॉपी करतो... म्हणजे लॉकडाऊनमध्ये एकानं फेसबुक लाइव्ह केलं म्हटल्यावर दुसऱ्यानं केलं. कॉपी करण्यापेक्षा आपण स्वतःचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत... पण तसं होत नाही. याचं कारण आपण नव्या तंत्रज्ञानाची क्षमता समजून घेतलेली नाही, म्हणून आपल्या प्रकाशनाला अनुरूप असे प्रयोग केले जात नाहीत. आमच्या वेबसाईटवर आम्ही चित्रकारांचे व्हिडिओ टाकले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण हा प्रयोग दुसऱ्याच्या कामी येणार नाही.
प्रश्न - या व्यवसायात तुम्ही कसे आलात?
- आम्ही लहान असल्यापासून या प्रकाशनाच्या वातावरणात वाढलो... त्यामुळे साहजिकच त्याचे संस्कार झाले. मी स्वाभाविकपणे या व्यवसायात आलो. माझा भाऊदेखील आला.
प्रश्न - तुम्ही कोणते नवे प्रयोग करताय?
- आम्ही इ बुक्स केली आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या एन्हान्स इ बुक्सचा प्रयोग सुरू आहे. एन्हान्स इ बुक म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ सपोर्ट असणारे इ बुक. लवकरच या प्रकारचे पुस्तक प्रकाशित होईल.
प्रश्न - ऑडिओ बुक्सविषयी तुम्हाला काय वाटतं?
- ऑडिओ बुक्स व्यवसाय म्हणून चालतील की नाही याविषयी मी जरा साशंक आहे. नेटवर मिळतं, ते फुकट असतं; असा आपल्याकडच्या बऱ्याच लोकांचा समज झालेला आढळतो. जोत्स्नाच्या खूप पुस्तकांचं वाचन कित्येक जणांनी कित्येक ठिकाणी केलं. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनसुद्धा अनेक जणांनी वाचन केलं आणि फेसबुकवर टाकलं. त्या पुस्तकाच्या वाचनासाठी हक्क वगैरे घायला पाहिजेत याची जाणीवसुद्धा वाचणाऱ्या लोकांना नव्हती. फार कमी लोकांनी आमच्याकडून परवानगी घेतली. बाकीच्यांना असं काही असतं हेच माहिती नसावं. बरं पुन्हा हे वाचन घरी मोबाईलवर रेकॉर्ड केलेलं, म्हणजे पुन्हा तोच मुद्दा की, टेक्निकली योग्य नाही.
गटेनबर्ग (gutenberg) या वेबसाइट्वर असंख्य कॉपीराईट फ्री पुस्तकं इबुक स्वरुपात मोफत उपलब्ध आहेत आणि अत्यंत प्रोफेशनल पद्धतीनं तयार करून घेतलेली आहेत. त्यामध्ये भारतामधून टागोरांची काही पुस्तकं दिसतात. बाकी भारतातल्या इतर कुणाचीही पुस्तकं नाहीत. आता आपल्याकडे टागोरांची सोडून कोणती चांगली पुस्तकं नाहीत का... जी कॉपीराईट फ्री असतील? तर आहेत... पण आपण त्यासाठी तसे प्रयत्न करत नाही. आता साने गुरुजींची पुस्तकं घ्या. त्यांची कॉपीराईट फ्री पुस्तकं पुन्हा पुन्हा छापण्याचा उद्योग आपल्याकडे अनेक प्रकाशनांनी केला... पण कोणत्याही संस्थेनं ती पुस्तकं फ्री इबुक करण्याचा विचार नाही केला. लिबरीव्हॉक्स (libriVox) या वेबसाइट्वर कॉपीराईट फ्री पुस्तकं ऑडियोबुक स्वरुपात मोफत उपलब्ध आहेत.
प्रश्न - नवीन लेखक, लहान मुलांसाठी नवीन पुस्तकं निवडताना तुमचे काय निकष असतात?
- गोष्टीत वेगळेपणा पाहिजे. आपल्याकडे बरीचशी बालवाङ्मयामधली पुस्तकं ही ‘रीटोल्ड’ (‘retold’) या गटातली आहेत म्हणजे पारंपरिक किंवा पुराणातल्या चालत आलेल्या गोष्टी पुन्हा सांगायच्या... सणांची माहिती वगैरे किंवा परदेशातले जे नामवंत परीकथाकार होते ग्रीम बंधू, हॅन्स अँडरसन वगैरे. त्यांच्याच कथा यांनी मराठीत आणल्या. रामायण, महाभारत, शिवाजी महाराज अशा गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या. त्याला ‘रीटोल्ड’ असा शब्द इंग्लीशमध्ये आहे. याला मराठी प्रतिशब्द तयार झालेला नाही आणि तसा शब्द तयार झाला तर बरेचसे लेखक लेखकच राहणार नाहीत.
आमच्याकडेही त्या प्रकारची काही पुस्तकं आहेत... नाहीत असं नाही... पण अलीकडे आम्ही ‘रीटोल्ड’ साहित्य अजिबात स्वीकारत नाही. काहीतरी वेगळं असेल तरच आम्ही घेतो... त्यामुळे नवीन, वेगळं हा पहिला निकष.
दुसरी गोष्ट म्हणजे आपलं बालवाङ्मय संस्कार शब्दात अडकलेलं आहे. त्या संस्कार शब्दाची व्याप्ती आम्ही वाढवून घेतलेली आहे. चित्रकला, पर्यावरण, विज्ञान, निसर्ग यांचेसुद्धा संस्कार झाले पाहिजेत. मुळात लेखक नसलेल्या काही लेखकांनी आमच्याकडे पुस्तकं लिहिली आहेत. उदाहरणार्थ, नीलीमकुमार खैरे. त्यांनी गोष्टींपेक्षा पर्यावरणाची माहिती दिलेली आहे... अर्थात ती रंजक पद्धतीनं दिलेली आहे. असे प्रयोग आम्ही करतो.
तिसरा निकष चित्रांसबंधी. पुस्तकांमध्ये चित्रांना चांगला वाव पाहिजे... कारण बालवाङ्मयामध्ये चित्रं खूप महत्त्वाची असतात. लहान मुलाला लेखकाचं नाव वगैरे काही माहिती नसतं. पुस्तकाचा लेखक कोण यानं मुलांना फरक पडत नाही. मुखपृष्ठ, आतली चित्रं बघून ती पुस्तक उचलतात. माझ्या लहानपणीची काही आवडीची पुस्तकं मला आजही आठवतात, त्यातली चित्रं आठवतात... पण लेखक आठवत नाहीत. लहान मुलाला भूतकाळ नसतो. एखाद्या मोठ्या लेखकाचं नाव घेतलं की त्यांची गाजलेली पुस्तकं आपल्याला माहीत असतात. अशा एखद्या लेखकाचं नवीन पुस्तक आलं की लगेच आपण त्याचा शोध घेतो, ते मिळवतो, ते वाचतो... मुलांच्या बाबतीत असं घडत नाही.
प्रश्न - लहान मुलांपर्यंत तुमची पुस्तकं पोहोचावीत म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता?
- गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुणे इथल्या काही शाळांमध्ये आम्ही दरवर्षी प्रदर्शनं करतो. मुलांसमोर चांगली पुस्तकं घेऊन जायला पाहिजे. तीच तीच पारंपरिक पुस्तकं, पौराणिक गोष्टी घेऊन गेलो तर त्यांतून वाचक घडवणं तितकंसं साध्य होणार नाही. सध्याचा पॉप्युलर शब्द ‘अपग्रेड’ करणं हा आहे. वाचकही अपग्रेड करायचा असतो. आता मोठ्या माणसांसाठीच्या पुस्तकांना मागणी कमी आहे अशी जी ओरड चालू असते... त्याचं कारण मुलांच्या पुस्तकांवर योग्य दिशेनं आणि मोठ्या प्रमाणात काम केलं गेलेलं नाही. ते केलं असतं तर मोठ्यांसाठीच्या पुस्तकांचा वाचक आपोआपच तयार झाला असता.
इंटरनेटवर ‘इंग्रजीतली लहान मुलांसाठीची चांगली 100 पुस्तकं’ असं टाकलं तर वेगवेगळ्या नामवंत संस्थांनी केलेल्या याद्या मिळतात. टाइम्सनेसुद्धा अशा याद्या केलेल्या आहेत. 1925 ते आजपर्यंत या काळातली उत्कृष्ट 100 पुस्तकं त्यात मुखपृष्ठासहित बघायला मिळतात. वेगवेगळ्या देशांत अनेक संस्थांनी हे काम केलेलं आहे. असं काम आपल्याकडे मराठीमध्ये झालेलं नाही. 1995-96मध्ये आपल्याकडे लोकसत्ताने अशी एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर गेल्या 25 वर्षांत पुन्हा तसं काहीही घडलं नाही... म्हणजे मागच्या 25 वर्षांत लहान मुलांसाठी निघालेली पुस्तकं त्यात नाहीत. मुळात अशा याद्या आपण केल्याच नाहीत आणि एक केली ती अपडेटही केली नाही.
बालवाङ्मयापेक्षा कुमारवाङ्मय तर मराठीत खूपच कमी आहे. ते वाचून झालं की मुलाच्या हातांत काय ठेवायचं हा प्रश्न असतो. बालसाहित्य ते मोठ्यांचं साहित्य यांच्यामधली गॅप भरणारं साहित्य... म्हणजेच कुमार साहित्य. यात खूप काम व्हायला पाहिजे.
मोठी पुस्तकं मुलं वाचत नाहीत, गुंतागुंतीचं कथानक - भरपूर पात्रं असंही मुलं वाचत नाहीत... असे काही गैरसमज होते. पण ‘हॅरी पॉटर’नं हे सगळे समज मोडीत काढलेच की... म्हणजे मुलांमध्ये क्षमता आहे. आपण कमी पडतोय. आपले नायक कोण आहेत? आधी गोट्या होता, मग फास्टर फेणे, नंतर बोक्या सातबंडे. संपलं. आता आपल्याकडं कोण नायक आहे?
प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सवा’विषयी काय सांगाल?
- वाचकांना पुन्हा पुस्तकांकडं वळवण्यासाठी हा प्रयोग चांगला आहे... पण डिस्काउंट वाढवून प्रयोग करणं ही कल्पना मला फारशी रुचत नाही. ती साडीच्या विक्रीसाठी चांगली असते. लक्ष्मीरोडवर साडीखरेदीला आलेल्या गिऱ्हाइकांना आकर्षित करण्यासाठी हे चांगलं असतं. तिथे दुकानदाराला फायदा मिळवायचा असतो... पण आपल्याला वाचन संस्कृती रुजवायची असेल तर याचा फारसा फायदा नाही.
...म्हणजे बघाऽ आता एखादा वाचक पुस्तकांच्या दुकानात गेला. त्याला वेगळं कुठलं पुस्तक घ्यायचं म्हणून तो आला... पण त्याला तिथे कळलं की जोत्स्ना, रोहन, साधना यांच्या पुस्तकांवर सूट आहे. मग तो जे पुस्तक घ्यायला आलेला आहे ते सोडून तो आमच्यातलं पुस्तक घेणार किंवा जे पुस्तक तो उद्या घेणार असेल ते तो आज घेणार. नवीन माणसाला पुस्तकाकडे वळवण्यासाठी काय करतोय आपण यातून?
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी पुस्तकातला थोडक्यात आशय, पुस्तकाची माहिती लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, त्यांना वाचनाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम न करता फक्त जो मुळात वाचक आहे त्याला आपल्या पुस्तकांकडे ओढण्याचं काम आपण करतोय. यातून वाचन संस्कृती नाही, आम्हा प्रकाशकांचे व्यवसाय वाढतील.
प्रश्न - पुस्तक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग काय करावं असं वाटतं तुम्हाला?
- ते तर खूप महत्त्वाचं आहे. वर्तमानपत्रांतून परीक्षणं येतात... पण त्याला मर्यादा आहेत. पुस्तकं जास्त असतात, जागा कमी असते आणि मुळात हल्ली परीक्षण केलंच जात नाही. गुडी गुडी काहीतरी ओळख करून दिली जाते. वर्तमानपत्रातल्या परीक्षणांचा वाचकाला विश्वास वाटत नाही. तो त्याकडे जाहिरात म्हणूनच बघतो.
कुठलं पुस्तक चांगलं आहे, त्या पुस्तकात काय आहे, त्याची प्रामाणिक परीक्षणं हे सगळं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्राध्यापक, वाचक यांना सोबत घेऊन असे प्रयोग करायला पाहिजेत. जिथे पुस्तकांची सर्वांगीण माहिती मिळेल, लेखकांची माहिती मिळेल अशी विश्वासार्ह वेबसाईट पाहिजे. आता जर तुम्ही पु.ल. देशपांडे गुगलवर सर्च केलंत तर आपल्याला पुलंची माहिती विकीपिडियावरून मिळते. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठी साहित्यसंस्थांची अशी एखादी वेबसाईट का नाही? प्रकाशकांच्या वेबसाईटवरही लेखकांची माहिती नसते! जोत्स्नानं ज्या लेखकांची पुस्तकं काढलेली आहेत त्यांचा गुगल सर्च केला तर विकीपिडियाच्या आधी जोत्स्नाचं नाव येतं.
आपण साहित्याचे वार्षिक ‘उरूस’ करतो... पण त्याचा परिणाम तत्कालिकच असतो. कायमचा परिणाम राहील असं काहीतरी काम करायला पाहिजे. हे जगभर होतं. आपल्याकडेसुद्धा व्हायला पाहिजे. आपल्याकडे साहित्य परिषदेनं दिलेले पुरस्कार 90 साली कुणाला मिळाले, 2000मध्ये कुणाला मिळाले... मिळते का यादी अशी?
ब्लू बेरी नावाचा बालसाहित्यातला नावाजलेला पुरस्कार आहे. 1920 साली तो सुरू झाला. 1920पासूनच्या सर्व पुरस्कारांची यादी त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळते. आपल्याकडच्या शासनाच्या काय किंवा इतर नामांकित संस्थांच्या काय, पुरस्कारांची अशी यादी मिळत नाही. असं चिरस्थायी स्वरूपाचं काम आपल्याकडं व्हायला पाहिजे.
प्रश्न - महोत्सवासाठी निवडलेल्या जोत्स्नाच्या 25 पुस्तकांविषयी काय सांगाल?
- चित्रकला, गोष्टी, प्राणी, निसर्ग असे सगळे विषय निवडले आहेत. काही पुरस्कारप्राप्त पुस्तकंही त्यात आहेत.
मोठ्यांच्या दर्जेदार कादंबऱ्या संक्षिप्त रूपात सांगणारी पुस्तकंसुद्धा जगभर येतात. आम्ही मागच्या दोन वर्षांपासून तो प्रयोग करायला सुरुवात केली. त्याही या पंचवीसमध्ये आहेत. मुलांसाठी संक्षिप्त कांदबऱ्या (कादंबरिका) हा प्रकार आपल्याकडं औषधालासुद्धा नाही... म्हणजे टागोरांचं ‘काबुलीवाला’ मोठं आहे. ते संक्षिप्त स्वरूपात मोठ्यांसाठीसुद्धा मिळतं आणि लहानांसाठी गोष्टीरूपातसुद्धा मिळतं. आपल्या प्रसिद्ध पुस्तकांच्या बाबतीत हे झालेलं नाही. आम्ही असा प्रयोग केला आहे आणि त्यांतली काही पुस्तकं या पंचवीसमध्ये घेतलेली आहेत.
(मुलाखत आणि शब्दांकन – मृदगंधा दीक्षित)
वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी
हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :
अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे ! - अरुण जाखडे
डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड
प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर
अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात! - अशोक कोठावळे
मराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता ! - दत्तात्रय पाष्टे
Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव ज्योत्स्ना प्रकाशन मिलिंद परांजपे मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Jyotsna Prakashan Milind Paranjape Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Load More Tags
Add Comment