प्रधान सरांची प्रधान आठवण

शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे.

ज्येष्ठ समाज शिक्षक आणि समाजवादी विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांचा जन्मशताब्दी सांगता समारंभ शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात प्रधान सरांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेतला जाणार आहे. या समारंभाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक पुणे, साहित्य शिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. साधनाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांनी 'ऋतुरंग'च्या 2020 च्या दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख प्रधानसरांच्या जन्मशताब्दी समाप्तीच्या निमित्ताने पुन्हा भेटीला आणतो आहोत.

मला प्रभावित करून गेलेल्या पुस्तकांची नावे कोणी विचारली आणि त्या यादीत आठ-दहा पुस्तके सांगायची असतील तर त्यात ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले 'साता उत्तराची कहाणी' हे पुस्तक असतेच. माझा राजकीय सामाजिक दृष्टिकोन आकाराला येण्याच्या टप्प्यावर, म्हणजे वयाच्या पंचविशीच्या आत- बाहेर असताना ते पुस्तक मी वाचले होते. त्या पुस्तकाला कादंबरीचा फॉर्म आहे, पण ती कादंबरी नाही.

1940 मध्ये वयाच्या ऐन विशीत असलेले सात तरुण मित्र सात वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांसोबत जातात. साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी, रॉयवादी, आंबेडकरवादी, क्रांतिकारी (पत्री सरकार) हेच ते सात प्रवाह. 1980 च्या दरम्यान ते सात तरुण वयाच्या साठीत येतात. मधल्या 40 वर्षांत त्या तरुणांनी आपापल्या विचारधारेसोबत जो काही प्रवास केला, तो म्हणजे साता उत्तराची कहाणी.

या पुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे, त्या 40 वर्षांत देशातील महत्त्वाच्या घटना प्रसंगी, त्या सात प्रवाहांच्या मूळ भूमिका कशा व का होत्या आणि त्यांचे वर्तन तसे का राहिले, हे त्यांच्या-त्यांच्या दृष्टिकोनातून कळते. 1980 मध्ये ते पुस्तक आले. तेव्हा तरी त्या सातपैकी कोणत्याही प्रवाहाने, 'आमची भूमिका अशी नव्हती' किंवा 'आमच्या भूमिकेचा विपर्यास केला गेला' असे म्हटले नव्हते. किंबहुना सर्वच प्रवाहांना न्याय देणारे हे पुस्तक आहे, अशी एकंदर प्रतिक्रिया होती. लेखक ग. प्र. प्रधान यांचे ते सर्वांत मोठे यश होते. आणि आजही 1940 ते 80 ही राष्ट्रीय स्तरावरील राजकीय धामधुमीची 40 वर्षे समजून घ्यायची असतील तर इतके उत्तम पुस्तक मराठीत तरी अन्य कोणते नाही. प्रधान सर असे लिहू शकले, याचे एक कारण ते त्या काळाचे साक्षीदार तर होतेच, पण त्यातील एका प्रवाहाचे (समाजवादी) प्रतिनिधी होते. दुसरे कारण, आयुष्यभर ते ध्येयनिष्ठ समाजवादीच राहिले, पण अन्य सहाही प्रवाहांना त्यांच्या गुणदोषांसकट समजून घेण्याएवढे पारदर्शक मन त्यांना लाभले होते. किंबहुना ज्याला स्वतःची बलस्थाने व मर्यादा पुरेपूर माहीत आहेत आणि ते तो जाहीरपणे सांगत आला आहे, असा समाजशिक्षक म्हणजे प्रधान सर. 

अशा या प्रधान सरांनी त्यांच्या वयाची 85 वर्षे पूर्ण केली त्या दरम्यानची ही आठवण आहे. वर्ष 2007. तेव्हा मी साधना साप्ताहिकात युवा संपादक म्हणून पूर्ण वेळ काम करू लागलो होतो. त्या आधीची तीन-चार वर्षे मी स्तंभलेखक व युवा अतिथी संपादक या नात्याने साधना वर्तुळात वावरत होतो. त्यामुळे प्रधान सरांशी अनेक वेळा भेटीगाठी झाल्या होत्या. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते, आणि त्यांच्या आधी प्रधान सर (वसंत बापट यांच्यासह) साधनाचे संपादक होते. त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील एक-दोन दिवस तरी त्या दोघांच्या सहवासात येत होतो. वय वर्षे 30, 60 आणि 90च्या आसपास असणाऱ्या तीन पिढ्यांचा तो संवाद असायचा. त्या दोघांच्या कर्तृत्वाविषयी माझ्या मनात कमालीचा आदर आणि त्यांच्या मनात माझ्याविषयी कमालीचे कौतुक, असा तो बहराचा कालखंड होता. साहजिकच, साता उत्तराची कहाणी या पुस्तकामुळे मी कसा प्रभावित झालो होतो आणि त्या पुस्तकाची छाया, मी साधनात लिहिलेल्या 'लाटा लहरी' (2004) या युवकांसाठीच्या सदरावर माझ्याही नकळत कशी पडली होती, हे मी प्रधान सरांना त्याच दरम्यान सांगितलेले होते.


हेही वाचा : साने गुरुजींचे विचार माझ्या पिढीला मार्गदर्शक ठरले - ग. प्र. प्रधान


तर 2007 च्या प्रारंभी एका सोमवारी प्रधान सर साधना कार्यालयात आले तेच मुळी नेहमीपेक्षा अधिक उत्साहात. त्यामुळे आमच्या लक्षात आले, आज काहीतरी भन्नाट कल्पना ऐकायला मिळणार. अपेक्षेप्रमाणे त्यांनी कार्यालयातील सर्वांना गप्पा मारण्यासाठी बोलावून घेतले. बोलके डोळे, खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार आणि बालकाचा निरागसपणा यांचे दर्शन अशा वेळी पाहायला मिळत असे. वातावरणात चैतन्य आल्याचे जाणवत असे. त्यांनी बातमी फोडली, "साता उत्तराची कहाणी या पुस्तकाला 25 वर्षे पूर्ण झाली. आता मी 'आठा उत्तराची कहाणी' हे पुस्तक लिहायला घेणार, त्यात 1980 नंतरच्या 25 वर्षांतील राजकीय सामाजिक प्रवाह आठ व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून मांडणार. आधीच्या पुस्तकातील काही राजकीय प्रवाह अद्याप आहेत, काही काळाच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामुळे नक्षलवादी, स्रीवादी चळवळ, शेतकरी संघटना, मुस्लिम समाजातील सुधारणा हे चार नवे प्रवाह घेणार..." तर त्या आगामी पुस्तकाबाबत प्रधान सर तपशिलात आणखी बरेच काही सांगत होते. डॉ. दाभोलकर, रा ग. जाधव आणि आणखी चार-पाच जणांसह मी कान गोळा करून ऐकत होतो.

त्यानंतर प्रत्येक आठ-दहा दिवसांनी प्रधान सर कार्यालयात यायचे तेव्हा, 'आठा उत्तराची कहाणी' कुठपर्यंत आलेय असे स्वतःहून तरी सांगायचे किंवा आमच्यापैकी कोणीतरी त्यांना विचारायचे. त्यामुळे छोटी का होईना मैफिल रंगायची. दरम्यान त्या आगामी पुस्तकाविषयी ते (हडपसर येथे तेव्हा त्यांचे वास्तव्य होते.) त्यांना भेटायला जाणाऱ्या अनेकांना भरभरून सांगायचे. साता उत्तराची कहाणी मौज प्रकाशनाने काढले होते, त्यामुळे आठा उत्तराची कहाणीसुद्धा मौजकडूनच यावे अशी त्यांची इच्छा होती. श्री. पु. भागवत यांनीही त्याला आनंदाने होकार दिला होता. 'हा आपला शेवटचा एकत्रित प्रकल्प' असे त्या दोन मित्रांनी ठरवले होते. त्यांचा पत्रव्यवहारही तसा चालू होता.

चार-पाच महिने गेले आणि एका सोमवारी दुपारी प्रधान सर मोठ्या उत्साहाने कार्यालयात आले. काठी बाजूला ठेवून, शबनममधील एक हस्तलिखित बाड बाहेर काढून त्यांनी ते माझ्यापुढे ठेवले आणि म्हणाले, "सुटलो आज.. आठा उत्तराची कहाणी लिहून पूर्ण झाले. हे त्याचे हस्तलिखित. याचा पहिला वाचक तू व्हावेस, कारण तुझ्या पिढीचा सभोवताल कसा होता हे यात लिहिले आहे. तुला पसंत पडले की पुस्तक यशस्वी झाले असे समजायचे.. चला फर्स्ट क्लास चहा मागवा, काहीतरी खायला आणा." आणि मग कार्यालयात इकडे-तिकडे फिरून सर्वांना ते सांगत होते, 'आठा उत्तराची कहाणी पूर्ण झाले...!'

पुढील सोमवारी ते आले तेव्हा त्यांनी हसत हसत विचारले, "काय कुठपर्यंत आले वाचन?" मी म्हणालो, "या आठवड्यात वाचतो सर." पुढच्या आठवड्यात आले, तेव्हा तोच कुतुहलजनक प्रश्न. मी म्हणालो, "सुरू केलंय वाचायला.." तिसऱ्या आठवड्यात ते आले तेव्हा, त्यांनी विचारायच्या आत मीच स्वतः हुन म्हणालो, "सर अर्ध्याहून अधिक वाचून झालेय, पुढच्या वेळी तुम्ही याल तेव्हा संपलेले असेल." कसे वाटतेय , या त्यांच्या प्रश्नावर मी म्हणालो, "इंटरेस्टिंग..!" पण खरी गंमत अशी होती की, ते हस्तलिखित त्यांनी मला दिले त्यानंतर दोन दिवसांतच वाचून झाले होते. साधारणतः दीडशे पानांचे होईल असे ते पुस्तक. साता उत्तराची कहाणीच्या एक तृतीयांश म्हणावे इतकेच. पण त्या पुस्तकाने माझ्या मनाची पकडच घेतली नव्हती. आणि म्हणून प्रधान सरांना आपले खरे खरे मत सांगावे का, याबाबत माझ्या मनात मोठाच संकोच निर्माण झाला होता.. आणि म्हणून मी त्यांना इतके दिवस सांगायचे टाळत होतो.

त्यानंतरच्या भेटीत ते आले तेव्हा वातावरणात तसेच चैतन्य भरलेले होते. याची-त्याची विचारपूस करत ते माझ्याकडे आले तेच मुळी, 'याने पुस्तक पूर्ण वाचले आहे आणि आता सविस्तर प्रतिक्रिया मिळणार' या अपेक्षेसह.. त्यामुळे, 'आता काय सांगावे' अशी जुळवाजुळव मी मनातल्या मनात करीत होतो, पुस्तकातील काही सौंदर्यस्थळे सांगावीत असा विचार आकार घेत होता. आणि सुरुवात करताना माझ्याकडून पहिलेच वाक्य गेले, "सर, पुस्तक चांगले आहे, पण साता उत्तराची कहाणीत जी गंमत आहे ती यात नाही..."

ते वाक्य ऐकले आणि प्रधान सरांचा चेहरा एका क्षणात उतरला... मी पुढे त्या पुस्तकातील सौंदर्यस्थळे सांगायला सुरुवात करणार, तर त्यांचा उत्साहच मावळलाय असे जाणवले. मात्र काही क्षण गेले आणि प्रधान सर थोडे पुढे सरकून अतिशय मृदू आवाजात म्हणाले, "साता उत्तराची कहाणी लिहिले तेव्हा मी वयाच्या साठीत होतो, आता मी नव्वदीच्या जवळ आलोय. ते पुस्तक लिहिण्यासाठी मी पाच वर्षे दिली, हे पुस्तक मी पाच महिन्यांत लिहिले आहे. ते पुस्तक लिहिण्यासाठी मी धकाधकीच्या दिनक्रमातून वेळ काढत होतो, आता हे पुस्तक मी लिहिलेय ते माझा वेळ जात नाही म्हणून... त्यामुळे त्या पुस्तकाची गंमत यात कशी येणार?" 

मी स्तब्धच झालो. माझ्या तोंडून बाहेर पडलेले ते पहिलेच वाक्य त्यांनी निकाल म्हणून घेतले होते, यामुळे मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आणि त्यांनी स्वतःचे मूल्यमापन इतक्या कमी क्षणात ज्या सूत्रबद्ध पद्धतीने केले, त्यामुळे मी आणखी चकित झालो होतो. त्यानंतर आमचे थोडे बोलणे झाले खरे. पण त्या पुस्तकावर बोलण्यात त्यांचा रस संपला होता.

नंतर वर्षभराने ते पुस्तक प्रकाशित झाले. आणि त्यानंतर दोनेक वर्षे प्रधान सर हयात होते. पण त्या पुस्तकाबाबत ते कोणाशीच फार उत्साहाने बोलले नाहीत. त्यामुळे माझ्या मनात असा प्रश्न कायम राहिला की, त्या एका वाक्याची प्रतिक्रिया देण्यात आपण चूक केली की काय?

2010 मध्ये प्रधान सरांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मी साधनात संपादकीय लेख लिहिला. त्यात हे ठळकपणे अधोरेखित केले की, "साता उत्तराची कहाणी हे पुस्तक प्रधान सरांची प्रधान शिल्लक राहील."

त्यानंतरच्या दहा वर्षांत साधना कार्यालयात अनेक तरुणांच्या भेटीगाठी होत राहिल्या. पंचविशीच्या आत-बाहेर वय असलेल्या अनेक तरुणांकडून, 'आम्ही वाचलेच पाहिजेत अशा पुस्तकांची यादी द्या किंवा तुम्हाला प्रभावित करून गेलेल्या काही पुस्तकांची नावे सांगा.' अशा प्रकारची मागणी अधूनमधून होत राहिली. असे रेडिमेड कोणालाही काही सांगायला मी फारसा उत्सुक नसतो... पण राजकीय/सामाजिक बाबतीत बऱ्यापैकी पूर्वतयारी व गांभीर्य असलेले तरुण भेटतात तेव्हा त्यांना मी ज्या काही पुस्तकांची नावे सांगतो, त्यात साता उत्तराची कहाणी हे एक असतेच! त्यातील काही तरुण ते पुस्तक वाचून झाल्यावर भेटायला येतात किंवा फोनवरून बोलतात तेव्हा, ते भारावून गेलेले दिसतात, प्रभावित झालेले असतात. "किती बरे झाले, तुम्ही हे पुस्तक सुचवले, आमचे लक्ष या पुस्तकाकडे कधीच गेले नसते..." अशी त्यातील बहुतांश तरुणांची प्रतिक्रिया असते. त्या प्रत्येक वेळी माझ्या मनात असा विचार चमकून जातो की यांना सांगावे, 'याच्या पुढचा भाग आठा उत्तराची कहाणी या नावाने आला आहे... सहज शक्य असेल तेव्हा वाचा.' पण तो विचार मी मनातल्या मनात दाबून टाकतो. कारण मला खात्री असते, ही मुले नंतर आपल्याला प्रतिक्रिया देतील, 'सर , साता उत्तराची कहाणीची गंमत यात नाही..' आणि त्यांची ती प्रतिक्रिया मला प्रधान सरांची ती प्रधान आठवण देईल, जी मला अस्वस्थ करील...!

- विनोद शिरसाठ
संपादक, साधना
vinod.shirsath@gmail.com 


हेही वाचा : ग. प्र. प्रधान यांचे 'साता उत्तराची कहाणी' - विनोद शिरसाठ


Tags: प्रधान मास्तर विनोद शिरसाठ संपादक साधना 75 प्रधान सर साता उत्तराची कहाणी Load More Tags

Comments:

राजन इंदुलकर

लेख आवडला. नव्वदीत पोहोचलेल्या प्रधान सरांची वय परत्वे अगतिकता जाणवली. आठा उत्तराची कहाणी हे त्यांचं स्वप्न असावं.

Add Comment

संबंधित लेख