मराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता !

‘वाचन जागर’मधील प्रकाशकाची मुलाखत : 5

1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.

पुण्यात अप्पा बळवंत चौकात पूर्वी राका बुक एजन्सीचं खूप मोठं दुकान होतं. 1973मध्ये पाष्टे सर तिथे नोकरीला लागले. तिथे पुस्तकांविषयी आस्था निर्माण झाली. पुस्तकविक्री करण्यासाठी महाविद्यालयांतून फिरताना त्या पुस्तकांमधला आणि विक्रीमधला रस वाढायला लागला. 1986मध्ये त्यांनी डायमंड बुक सेंटर सुरू केलं आणि 2005मध्ये डायमंड पब्लिकेशन सुरू केलं. डायमंडची आत्तापर्यंत 980 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामधला एक महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे डायमंडनं काढलेले 60 वेगवेगळ्या क्षेत्रांतले शब्दकोश. 

‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्तानं पाष्टे सरांशी केलेली बातचीत.

प्रश्न - प्रकाशन व्यवसायात काय वेगळं, नवं करायला मिळालं? डायमंडचं वैशिष्ट्य काय आहे?
- आम्ही शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशक म्हणून ओळखले जातो. आर्ट्स आणि कॉमर्स या शाखांमधल्या बऱ्याच विषयांवरची पुस्तकं आम्ही मराठीत आणली. ती स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडतात. ती वाचून अनेक विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे फोन येतात आम्हाला आणि ते सांगतात की, तुमची पुस्तकं फारच उत्तम आहेत. ती आम्हाला संदर्भासाठी उपयुक्त ठरतात. 

महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व विद्यापीठांमध्ये ‘एफवाय’ म्हणजे पदवीच्या पहिल्या वर्षापासून ते ‘एमए’पर्यंतच्या अभ्यासक्रमांमध्ये डायमंडची अनेक पुस्तकं संदर्भ म्हणून दिलेली आहेत. 

उच्चशिक्षणावरची पुस्तकं इंग्रजीमध्ये खूप आहेत... पण मराठीमध्ये ती अगदी बोटावर मोजण्याइतकी आहेत... त्यामुळे ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ नावाची सरकारी संस्था आणि डायमंड प्रकाशन यांनी जवळजवळ 13 ऐतिहासिक पुस्तकं मराठीत आणली आहेत. 

भारतीय नद्यांवरचा ‘सरिताकोश’ आम्ही चार भागांमध्ये काढला. शरद पवारांसारख्या अनेक मान्यवरांना तो पाठवला. त्यावर त्यांची कौतुक करणारी पत्रं आम्हाला आलेली आहेत. आपल्या कामाला अशी पावती मिळणं हा आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे. 

राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, विधिशास्त्र, शिक्षणशास्त्र, संरक्षणशास्त्र अशा अनेक विषयांवर आम्ही मराठी कोश उपलब्ध करून दिलेले आहेत. ‘सामाजिक ज्ञान कोश’ हा आम्ही तीन भागांत काढला आहे... तर सर्वात मोठा - ‘वाणिज्य कोश’ हा पाच भागांत आहे आणि तो साडेचार हजार पानांचा आहे.
 
दिल्लीला भरलेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये आम्ही एक स्टॉल घेतला होता. त्या वेळी प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या ग्रंथालयासाठी आमची सगळी पुस्तकं विकत घेतली होती... कारण त्यापूर्वी एकदा फर्ग्युसन कॉलेजच्या शतकपूर्ती कार्यक्रमासाठी त्या पुण्याला आलेल्या असताना त्यांनी आम्हाला राजभवनमध्ये बोलवून घेतलं होतं. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की, त्या ज्या वेळी शिकत होत्या तेव्हा समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा विषयांमध्ये मराठी माध्यमात क्रमिक पुस्तकंही फारशी नव्हती. महाविद्यालयीन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा यांना संदर्भग्रंथ मिळावेत या हेतूनंच डायमंड प्रकाशन पुस्तकं काढत आलं आहे.

प्रश्न - हा हेतू व्यवसाय सुरू करताना म्हणजे सुरुवातीपासूनच होता की नंतर सापडला?
- मी 1973मध्ये माझं करिअर सुरू केलं तेव्हा महाविद्यालयांना इंग्लीश पुस्तकं पुरवायचो. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, मॅकमिलन, रॉक्लेज अशा जागतिक प्रकाशकांचा पुणे शहराचा मी अधिकृत विक्रेता होतो. तो अनुभव गाठीशी होता. 

आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या काही महाविद्यालयांचं म्हणणं होतं की, आमच्याकडे इंग्लीशमधून कुणी पुस्तकं वाचत नाही. आमच्या विषयांवर आम्हाला मराठीत पुस्तकं लागतात आणि ती मिळत नाहीत.  

2005मध्ये मी स्वतःचा प्रकाशनव्यवसाय सुरू करायचं ठरवलं तेव्हा माझ्यासमोर हाच उद्देश होता की, मोठमोठ्या इंग्लीश प्रकाशकांकडून चांगल्या पुस्तकांचे हक्क विकत घेऊन ती मराठीमध्ये आणायची. 

‘सेज’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाची 32 पुस्तकं आम्ही मराठीत आणली. या सगळ्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला... त्यामुळे मुलांना संदर्भग्रंथ मराठीत द्यायचे हा उद्देश व्यवसाय सुरू करतानाच होता.

प्रश्न - ...पण यामुळे तुमचा वाचकवर्ग मर्यादित होतो. कोशवाङ्मय किंवा संदर्भग्रंथ खरेदी करणारा वर्ग अल्पसंख्यच असणार. अशा वेळी व्यवसाय चालू ठेवणं कसं शक्य होतं?
- दहा वर्षांपूर्वी माझा मुलगा निलेश परदेशातून आला आणि त्यानं व्यवसायात रस दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अनेक इंग्लीश पुस्तकांचे अनुवाद मराठीत करून घेतले. त्याचबरोबर आम्ही आमच्याकडे बालवाङ्मय आणि कुमारवाङ्मय विकसित केलं. 

‘भन्नाट माणसं’ नावाची एक मालिका केली. त्यांत सातआठ संशोधकांची शंभरेक पानांची चरित्रं काढली. पूर्वी लोक शेक्सपिअरचा हजार पानांचा मोठा ठोकळा काढायचे. आम्ही शेक्सपिअर लहान लहान भागांत काढला.  

शंभर-दीडशे रुपयांचं पुस्तक पालक सहज विकत घेऊन मुलांना देऊ शकतात. अशा प्रकारे व्यावसायिक यश मिळावं आणि आमचा ब्रँडही तयार व्हावा या दृष्टीनं समतोल राखायचा प्रयत्न आम्ही केला.

प्रश्न - या व्यवसायात कोणते बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? किंवा आणखी कोणत्या गोष्टी कराव्याशा वाटतात?
- अजूनही पदव्युत्तर पातळीवरची काही पुस्तकं आम्हाला मराठीमध्ये काढायची आहेत. पुस्तकखरेदीसाठी शैक्षणिक क्षेत्राला युजीसीकडून जे पैसे मिळायचे ते देणं गेली पाचसहा वर्षं केंद्र सरकारनं बंद केलं. आधीच आमचा व्यवसाय फार काही मोठा नव्हता. आता अशा योजनाच बंद केल्यामुळे महाविद्यालयांना क्रमिक पुस्तकं घेण्यासाठीच पैसे पुरत नाहीत मग संदर्भ पुस्तकं तर दूरच.

सध्या आमच्या व्यवसायापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काही गट वाचन वाढवण्याच्या नावाखाली मोबाईलवर पीडीएफ फायली वाटतात. काही महाविद्यालयांतले ग्रंथपालसुद्धा हे करत आहेत. मी त्यांच्याशी बोललो की, हे बेकायदेशीर आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघानं याबाबत सायबर क्राईममध्ये तक्रारही केलेली आहे. पायरेटेड आवृत्तींची समस्या पूर्वी होतीच... त्यात आता पीडीएफची भर पडली आहे. या सगळ्यासाठी सर्व प्रकाशकांकडून संघटित प्रयत्न व्हायला हवेत.

मोबाईल आणि सोशल मिडिया या सगळ्यांतूनही लोकांचं वाचन टिकून आहे... पण अजूनही लोकांना पुस्तक म्हणजे रद्दीच वाटते. लोक तोंडावर म्हणतात की, एवढी पुस्तकं कोण वाचणार? पण मला तरी पुस्तक ही जीवनावश्यक गोष्ट वाटते.

प्रश्न - काही विशिष्ट तत्त्वांवर संस्था उभी राहते... ती तशीच पुढे चालू राहावी म्हणून पुढची पिढी तयार होणं गरजेचं असतं. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता?
- एखादं चांगलं पुस्तक पिढ्यान्‌पिढ्या चालू राहतंच... पण काही पुस्तकं, लेखक पिढ्यान्‌पिढ्या वाचले जावेत म्हणून पुढच्या पिढीनं या व्यवसायात यायला हवं आणि म्हणूनच ‘आय टी’मध्ये असणाऱ्या माझ्या मुलाला - निलेशला मी सांगितलं की, तू या व्यवसायात ये. 

या व्यवसायात इतकाही काही अंधकार नाही. पैसे मिळण्याला काही मर्यादा जरूर आहेत... पण या व्यवसायात मिळणारं समाधानही मोठं आहे... त्यामुळे निर्मितीचं सगळं काम मी त्याच्याकडे सोपवलं आहे आणि माझा मोर्चा मी पुस्तकविक्रीकडे वळवलेला आहे.

प्रश्न - मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी असं आपण म्हणतो. त्यासाठी तुमच्या या प्रयत्नांचा उपयोग होईल.
- होऊ शकेल...! उदाहरणार्थ, ‘गरिबी’ असा एक विषय दिला आणि त्यावर दहा ओळी लिही असं आपण एखाद्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला सांगितलं तरी त्याला ते लिहिता येत नाही. ती संकल्पना आपल्याला जुजबी माहीत असते आणि तिचा अर्थ आपण दोनतीन वाक्यांतच लिहून संपवतो. 

या संकल्पनेचा इतिहास काय आणि तिचा भविष्यात काय उपयोग आहे या गोष्टी पुस्तकांतून दिल्या तर वाचकांना त्याचा उपयोग होतो. सामाजिक शास्त्रांमध्येही उत्कृष्ट करिअर करता येऊ शकतं हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. 

हल्लीचे पालक मुलांना फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल यांसाठीच प्रोत्साहन देतात. आम्ही निरनिराळ्या महाविद्यालयांत जी प्रदर्शनं भरवतो तिथेही हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो की, तुम्ही पुस्तकाशी मैत्री करा. तुम्हाला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही.

बंगालमध्ये आणि दक्षिण भारतात मेडिकलची आणि इंजिनिअरिंगची पुस्तकंसुद्धा त्यांच्या मातृभाषांमध्ये उपलब्ध असतात. डायमंडनं आणि केंद्र सरकारनं मिळून ‘हिट ट्रान्स्फर’ नावाचं सहाशे पानांचं डबल क्राऊन साईज पुस्तक मराठीत काढलं. ते मी एका फिजिक्सच्या प्राध्यापकांना दाखवलं तर ते म्हणाले की, यामुळे आमच्या मुलांचं इंग्लीश बिघडेल...! आता यावर काय बोलणार?

प्रश्न - ‘वाचन जागर महोत्सव’ सध्याच्या काळात किती महत्त्वाचा होता असं वाटतं?
- कोरोनामुळे लोक तीनचार महिने घरांतच होते. त्यादरम्यान पुस्तकांची दुकानं बंदच होती... त्यामुळे इच्छा आणि वेळ असूनही लोकांना पुस्तकं मिळत नव्हती. त्यादरम्यान ऑनलाईन ऑर्डर चांगल्या येत होत्या. तेव्हा आमच्या मनात अशी कल्पना आली की, आता दिवाळीच्या निमित्तानं लोकांना आणखी सुट्ट्या आहेत. त्या काळात आपण दहा चांगले प्रकाशक एकत्र आलो तर लोकांना पुस्तकांकडे वळवू शकतो.

क्रमिक पुस्तकांच्या बाहेर वाचायची सवय आपण मुलांना लहानपणापासून लावत नाही आणि एकदम दहावीनंतर त्यांच्यावर पुस्तकांचा भडिमार करतो. निदान आपल्याकडे मराठी-मराठी, मराठी- इंग्लीश, इंग्लीश-मराठी अशा डिक्शनऱ्या, भारताचा आणि महाराष्ट्राचा नकाशा एवढ्या गोष्टी प्रत्येक घरात असायला पाहिजेत. 

आपण मोठ्या अभिमानानं सांगतो की, आम्ही एक कोटीचा फ्लॅट घेतला... पण त्यात एक हजार रुपयांचीही पुस्तकं नसतात. टीव्ही, मोबाईल यांचं मात्र लेटेस्ट व्हर्जन आपण तत्काळ खरेदी करतो. पुस्तकं महाग झालीत अशी एक नेहमीची तक्रार असते... पण महाग तर सगळ्याच गोष्टी झाल्यात आणि पुस्तकातल्या ज्ञानाची किंमत फक्त पानांवरूनच करायची का?

प्रश्न – इ बुक्स, ऑडिओ बुक्सचा विचार तुम्ही करत आहात का?
- आम्ही 300 इ बुक्स केलेली आहेत. अमेझॉनवर ती उपलब्ध आहेत. त्यांना 20-25 टक्के प्रतिसाद आहे... पण हव्या त्या गतीनं अजून तोही वाढत नाहीये....

प्रश्न - हा कदाचित स्थित्यंतराचा काळ असू शकेल का? आमच्या आधीच्या पिढीतल्या लोकांना छापील पुस्तक हातात घेतल्याशिवाय वाचण्याची सवय नाही. सध्याची पिढी काही प्रमाणात लॅपटॉपवर किंवा किंडलवर रीडरवर इबुक्स वाचत असते.
-  अजून इबुक्समध्ये बऱ्याच तांत्रिक सुधारणा होणं बाकी आहे. मोबाईलवर पुस्तक वाचणं अजूनही सोयीचं नाही. डोळ्यांना त्रास होतो. किंडल डिव्हाईस तसं महागही आहे. बरेच प्राध्यापक असंही म्हणतात की, आता पुस्तकांची गरज नाही, गुगलवरून माहिती मिळू शकते... पण ती विश्वासार्ह असतेच असं नाही. छापील पुस्तकाला अधिकृत मानलं जातं, संदर्भ देता येतात.

अजूनही परदेशांत बेस्टसेलर लेखकांच्या लाखो छापील प्रती विकल्या जातात... त्यामुळे पुस्तकाची विक्री हा काही फार मोठा चिंताजनक विषय नाही... पण या व्यवसायाला लागणाऱ्या इतर बाबी कमकुवत आहेत. पुस्तकविक्री हा व्यवसाय आहे असा दर्जासुद्धा केंद्र सरकारनं दिलेला नाही. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं पुस्तक प्रकाशकाला हा दर्जा दिला... पण अद्याप बऱ्याच प्रकाशकांनी तो घेतलेला नाही... कारण त्यांना तो माहीतच नाही. 

पुस्तक व्यावसायिकांना बॅंका कर्ज देत नाहीत. त्या म्हणतात की, छापील पुस्तकाला रिसेल व्हॅल्यू नाही... कर्ज हवं असेल तर स्थावर मालमत्तेवर, सर्वसाधारण व्याजदरानं घ्या. इतर व्यवसायांत मात्र त्यांचा जो काही माल असेल त्याच्यावर कर्ज दिलं जातं. 

भारतात प्रकाशकांचा जीव एवढा लहान आहे की, केंद्र किंवा राज्य सरकारला आमच्याकडून पाहिजे तसा रेव्हेन्यू मिळत नाही... त्यामुळे आमची लॉबी तयार होत नाही आणि आमची कुणी दखल घेत नाही.

प्रश्न - इतक्या सगळ्या पुस्तकांतून महोत्सवासाठी 25 पुस्तकं निवडणं अवघड गेलं असणार. त्यांची निवड कशी केली?
 - दिवाळीची सुट्टी आहे म्हणून आम्ही त्यात संपूर्ण ‘शेरलॉक होम्स’ घेतला आहे. या यादीत मुद्दाम शैक्षणिक पुस्तकं न घेता आम्ही सेपियन्स, स्टीव्ह जॉब्ज यांसारखी जनरल पुस्तकंही घेतली आहेत. त्यात बालवाङ्मयही आहे. 

डायमंड पब्लिकेशन्स म्हणजे ‘शैक्षणिक’ असंच 90 टक्के लोकांना वाटतं... पण आम्ही इतरही चांगली पुस्तकं काढली आहेत हे या निमित्तानं अधिक लोकांपुढे जाईल असं वाटतं. गेल्या 15 वर्षांत आम्ही 980 पुस्तकं प्रकशित केली आहेत. एकूण 60 कोश काढले आहेत. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झाली तेव्हा आम्ही महाराष्ट्रावर 50 पुस्तकं काढली होती. आर.आर. पाटील, सुशीलकुमार शिंदे यांना त्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाला बोलवलं होतं. त्या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, जे काम सरकारनं करायला हवं ते डायमंडनं केलं आहे...

(मुलाखत- मृद्‌गंधा दीक्षित, शब्दांकन – सुहास पाटील)


वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी 


हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :

अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे !  - अरुण जाखडे

डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड

प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर

अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात! - अशोक कोठावळे 

Tags: मुलाखत वाचन जागर महोत्सव डायमंड पब्लिकेशन दत्तात्रय पाष्टे मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्‌गंधा दीक्षित सुहास पाटील Interview Vachan Jagar Mahotsav Diamond Publication Dattatray Pashte Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Suhas Patil Load More Tags

Add Comment

संबंधित लेख