काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले, त्यांनी देशासाठी केलेल्या योगदानासाठी विनम्र अभिवादन. ते राष्ट्रपती झाले तेव्हा 'रबर स्टॅम्प ही प्रतिमा अस्पष्ट करणार?' या शीर्षकाचे संपादकीय आम्ही साधना साप्ताहिकात लिहिले होते, त्यात त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला होता. ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर वर्षभराने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानाला दिलेल्या भेटीमुळे मोठ्या वादाचा विषय बनले होते. त्यासंदर्भात बरीच उलट सुलट चर्चा माध्यमांतून झालेली होती. तेव्हा 'प्रणवबाबुंचे पोकळ प्रवचन' हा संपादकीय लेखही प्रस्तुत संपादकानेच लिहिला होता. आज पहिला संपादकीय लेख साधना साप्ताहिकाच्या डिजिटल अर्काईव्हवरून पुनर्भेट म्हणून पुढे आणला आहे आणि दुसरा संपादकीय लेख (आणखी एक अपवाद करून) कर्तव्यवर सादर करीत आहोत. एखाद्या महनीय व्यक्तीच्या निधनानंतर औचित्याचे भान ठेवले पाहिजे याची पुरेपूर जाणीव आम्हाला आहे. मात्र महनीय व्यक्तींच्या विचार कार्याची व सार्वजनिक वर्तनाची चर्चा चिकित्साही अशा वेळी सभ्य व सुसंस्कृत पद्धतीने करता येऊ शकते, असे आम्हाला वाटते, म्हणून हा लेख इथे प्रसिद्ध करण्यात औचित्यभंग झाला असे मानण्यात येऊ नये. आणि समजा तसे कोणाला वाटत असेल तर, 'असे औचित्यभंग स्वागतार्ह मानायला हवेत' अशी आमची भूमिका आहे..!
- संपादक
प्रसंग 1: मराठी चित्रपट व मराठी नाटक यामधून सर्वांत जास्त व सर्वांत महत्त्वाच्या खलनायकी भूमिका ज्यांच्या वाट्याला आल्या आणि सर्वाधिक लोकप्रिय खलनायक म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्यांचे नाव निळू फुले. पडद्याबाहेरच्या जीवनात मात्र त्यांची ओळख एक निर्मळ मनाचा माणूस आणि पुरोगामी शक्तींना बळ देणारा वलयांकित अभिनेता अशी राहिली. कारकिर्दीच्या ऐन बहरात असताना त्यांना समविचारी पक्षांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीला उभे राहण्यासाठी अनेक वेळा आग्रह केला, पण प्रत्येक वेळी त्यांनी नकार दिला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचे ठरले होते, पण त्याला त्यांनी विनम्र नकार देऊन, आदिवासी क्षेत्रांत काम करणाऱ्या समाजसेवकाचे नाव त्या पुरस्कारासाठी सुचवले.
अशा या निळू फुले यांची मुलाखत त्यांच्या अखेरच्या दिवसांत घेण्याची संधी प्रस्तुत संपादकाला मिळाली होती. ‘तुमच्यावर विशेष प्रभाव टाकून गेलेला आणि पुरोगामीत्वाचा पहिला संस्कार म्हणावा असा बालपणातील एखादा प्रसंग सांगता येईल का?’ असा एक प्रश्न निळूभाऊंना विचारला होता. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर होते, ‘वयाच्या दहा-अकराव्या वर्षी आम्ही काही मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत खेळायला जाऊ लागलो. एकदा एका मुस्लिम मित्राला घेऊन गेलो, तर तिथे सांगण्यात आले की, मुस्लिम मुलांना शाखेत आणता येणार नाही. त्याचक्षणी संघाच्या शाखेत जाणे मी बंद केले, हा बालवयातला प्रसंग तसा सांगता येईल.’ त्या मुलाखतीत त्यांना असाही प्रश्न विचारला की, ‘तुम्ही ज्यांच्या लेखनाचा/विचारांचा तुमच्यावर सखोल प्रभाव पडला असे सांगता, त्यात आ. ह. साळुंखे यांचेही नाव घेतले आहे. तर ‘नुकतीच शिवधर्माची स्थापना झाली आहे, त्याला वैचारिक अधिष्ठान साळुंखेसरांचे आहे. तर तुमची त्याबाबत भूमिका काय आहे?’ त्यावर निळुभाऊंचे उत्तर होते, ‘त्यांनी मला निमंत्रण दिले असते तर मी नम्रपणे नकार कळवला असता. शिवधर्मात ब्राह्मणांना प्रवेश नाही, म्हणून येऊ शकणार नाही.’
प्रसंग 2: त्यानंतर काही महिन्यांनी परभणी येथे ब्राह्मण महाअधिवेशन झाले आणि त्या कार्यक्रमाला बीजभाषण करण्यासाठी नामवंत पत्रकार-संपादक कुमार केतकर यांना बोलावले गेले. संयोजकांना केतकरांचा पुरेसा अंदाज आलेला नसल्याने ते निमंत्रण दिले गेले असावे आणि केतकरांनीही निमंत्रण स्वीकारताना तिथे येऊन ते काय बोलणार आहेत याचा सुगावा संयोजकांना लागू दिला नसावा. परिणामी केतकरांनी तिथे जाऊन केलेले भाषण थांबवण्याचा व ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. (त्या संदर्भात, 'असे औचित्यभंग स्वागतार्ह आहेत!' या शीर्षकाचा संपादकीय लेख आम्ही लिहिला होता.)
प्रसंग 3: त्यानंतर काही दिवसांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे व्याख्यान वसई येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आयोजित केले होते. त्या व्याख्यानाला डॉ. दाभोलकर उभे राहिले तेव्हा श्रोत्यांमधून गडबड-गोंधळ करण्याचा प्रयत्न झाला. ‘धर्मश्रद्धा दुखावणारे भाषण डॉ. दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याकडून केले जाते, म्हणून हे भाषण होऊ नये,’ असा गोंधळ करू पाहणाऱ्या ख्रिस्ती बांधवांचा सूर होता. त्यावर ‘तुम्हा सर्वांची इच्छा असेल तरच मी बोलणार आहे, अन्यथा निघून जाणार आहे. त्यानंतर तुमची सभा पुढे चालू ठेवा. मात्र एक लक्षात घ्या, मी जी भूमिका मांडणार आहे, त्यातील एकही शब्द वावगा आहे, असे कोणी दाखवून देणार असेल आणि त्याबाबत कोणाचेही काहीही आक्षेप असतील तर त्या सर्वांची उत्तरे द्यायला मी तयार आहे.’ असे म्हणून डॉ. दाभोलकर थांबले आणि व्यासपीठावरील खुर्चीत जाऊन बसले. त्यानंतर श्रोत्यांमधील काहींनी आणि फादर दिब्रिटो यांनी, गोंधळ करू पाहणाऱ्यांना शांत केले. मग तास-सव्वा तास डॉक्टरांचे भाषण झाले, त्यानंतर प्रश्नोत्तरेही झाली.
वरील तीनही प्रसंग अकरा-बारा वर्षांपूर्वीचे (2006-07 मधील) आहेत. तीनही व्यक्ती आचार-विचाराने पुरोगामी, तिघांनीही समोर आलेल्या परिस्थितीचा सामना तीन वेगवेगळ्या पद्धतीने केला. निळुभाऊंनी तिथे जाण्यास नम्रपणे नकार कळवला. डॉ. दाभोलकरांनी स्वत:च्या भूमिकेचा जराही संकोच होणार नाही याची काळजी घेऊन, पण तशी स्पष्ट कल्पना संयोजकांना देऊन तिथे जाऊन भाषण केले. आणि केतकरांनी परिणाम भोगण्याची तयारी ठेवून आपल्या आक्रमक बाण्याचे प्रात्यक्षिक घडवले. अर्थातच तिघेही आपापल्या स्वभावधर्मानुसार बोलले, तिघेही आपापल्या जागेवर बरोबरच होते. पुरोगाम्यांनी प्रतिगाम्यांच्या किंवा आपल्या विरोधकांच्या व्यासपीठावर जावे की जाऊ नये, या प्रश्नाचे त्रिपर्यायी उत्तर त्यातून पुढे येते. या तीनपैकी एकही पर्याय अवलंबता येत नसेल तर त्या व्यक्तीकडे पुरेशी वैचारिक स्पष्टता नाही असा अर्थ होतो. आणि या तीन पर्यायांपैकीच एक निवडून त्याप्रमाणे कृती झालेली असेल तर त्या व्यक्तीला कोणताही दोष देण्यात अर्थ नसतो. हे सर्व आठवण्याचे व सांगण्याचे कारण, गेल्या आठवड्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूर येथील रा.स्व. संघाच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी आणि त्यावरून देशभर निर्माण झालेला वाद. वरील तीन निकषांवर प्रणवबाबूंच्या उपस्थितीची चर्चा-चिकित्सा करायला हवी.
अर्थात त्याआधी एक प्रश्न असा उपस्थित केला जातो की, ‘रा.स्व. संघ ही देशातील सर्वांत मोठी संस्था असताना आणि राष्ट्रभक्तीचे, त्यागाचे व समर्पण भावनेचे शिक्षण वा संस्कार तिथे दिले जात असताना माजी राष्ट्रपतींनी तिथे जाण्यात वावगे ते काय? शिवाय सध्याचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले देशाचे सत्ताधारी व त्यांचा पक्ष यांची ती मातृसंस्था आहे, त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी जनतेचा त्यांना पाठिंबा आहे.’ या युक्तिवादांमध्ये लोकशाही संकल्पनेचा खूपच संकुचित अर्थ घेतलेला आहे. लोकशाहीच्या संवर्धनासाठी व वाढीसाठी ज्या शक्ती वा संस्था या ना त्या प्रकारे अडथळा बनतात, त्यांच्याशी लोकशाहीवादी शक्तींचे वर्तन-व्यवहार कसे असावेत असा मूळ मुद्दा आहे. आणि केवळ भारतातच नाही तर जगभरातही लोकशाहीला मारक ठरणाऱ्या शक्तींवर बहिष्कार टाकण्याचे प्रकार लोकशाहीवादी शक्तींकडून झालेले आहेत, होत आहेत. भारताचा स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता, स्वातंत्र्य दृष्टिपथातही नव्हते तेव्हादेखील हिटलर व मुसोलिनी या लोकशाहीविरोधी व्यक्तींच्या भेटी घेण्यावरून वाद झडलेले आहेत. सुभाषबाबू हिटलरच्या भेटीला गेले तेव्हा आणि रवींद्रनाथ टागोरांनी मुसोलिनीचे आमंत्रण स्वीकारले तेव्हा मोठे वादंग झाले होते. जवाहरलाल नेहरूंनी हिटलर व मुसोलिनी यांना भेटण्यास नकार दिलेला आहे. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषी राजवट होती, तेव्हा लोकशाही राष्ट्रांनी त्या देशावर बहिष्कार टाकलेला होता. म्यानमार देशाबाबतही असेच झाले होते. एवढेच कशाला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याआधी अमेरिका व अन्य काही लोकशाही राष्ट्रांनी व्हिसा नाकारलेला होता.
संघाच्या लोकांमध्ये देशभक्ती आहे हे खरे, पण त्यातच मुस्लिम व ख्रिश्चन द्वेषही दडलेला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात संघाने केवळ सहभाग टाळला असे नसून, त्याला विरोधही केलेला आहे. गांधीजींची हत्या करणारे लोक संघाशी संबंधित आहेत की नाहीत, हा भाग बाजूला ठेवला तरी संघाने निर्माण केलेले धार्मिक विद्वेषाचे वातावरण कारणीभूत आहे, असे सरदार पटेलांनी सांगितलेले आहेच. नव्वदच्या दशकात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून देश ढवळून निघाला आणि देशात धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, त्यात संघाचीच भूमिका मध्यवर्ती होती. गुजरातमध्ये 2002 या वर्षी जे काही घडले, त्याला ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ असे संबोधले गेले. त्यामध्येही संघाची विचारधारा केंद्रस्थानी राहिली आहे. संघाचा सहभाग असलेल्या लहान-मोठ्या अशा शेकडो घटना सांगता येतील, ज्या लोकशाही राष्ट्र म्हणून भारत निर्माणाला अडथळाच ठरल्या आहेत. शिवाय, संघविचाराने प्रेरित अशा अनेक व्यक्ती, संस्था व संघटना दुहीची बीजे पेरण्याचे काम सातत्याने करत आलेल्या आहेत. भारतीय संविधान संघाला तेव्हाही मान्य नव्हते, आताही संविधानावर त्यांचा पुरेसा विश्वास नाही.
संघाची अशी प्रतिमा असल्यामुळेच कदाचित, पंतप्रधान झाल्यानंतरच्या चारही वर्षांत नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधील संघस्थानाला भेट देणे व तेथील कार्यक्रमात सहभागी होणे टाळले आहे (मोदींच्या खात्यावर पुरोगाम्यांनी लिहावी अशी ही कदाचित सर्वांत चांगली नोंद). आपल्या तिथे जाण्याने काय संदेश जाईल, मतदार कसा विचार करतील याचे त्यांना पुरेपूर भान असावे, असे म्हणता येईल कदाचित किंवा अन्य काही कारण असू शकेल...
पण अशा या रा. स्व. संघाच्या कार्यक्रमातील आपल्या उपस्थितीमुळे देशात काय संदेश जाईल याचा पुरेसा विचार प्रणवबाबूंनी मात्र केला नसावा, याचे आश्चर्य वाटते. मुळात प्रणवबाबू हे काही फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध नाहीत, विचारप्रवर्तक भाषण-लेखन करणारे अशी त्यांची ख्याती नाही. मोठ्या जनसमूहाचे नेते (मास लीडर) अशीही त्यांची ओळख नाही. मग त्यांची ओळख आहे तरी कशासाठी? तर परस्परविरोधी हितसंबंध जोपासणाऱ्यांमध्ये समन्वय साधून, व्यावहारिक युक्त्यांचा अवलंब करत पक्षाचा किंवा सरकारचा गाडा चालू ठेवण्यासाठी, जे शिलेदार आधारस्तंभाची भूमिका बजावत असतात, त्यामध्ये प्रणवबाबूंची गणना अव्वल स्थानी केली जाते.
परंतु हे सर्व गुण जिथे अटीतटीची लढाई असते किंवा पारंपरिक विरोधकांशी उभा-आडवा छेद देणारे प्रसंग उद्भवतात तिथे उपयोगाला येत नाहीत. तेथील कामगिरीसाठी धडाडीने, निर्भयपणे व धोका पत्करणारे वीर हवे असतात. त्यामुळे आता संघाकडून आमंत्रण आले तेव्हा प्रणवबाबूंनी आपण अर्धशतक ज्या राजकीय पक्षात वावरलो, त्या पक्षाने संघावर तीन वेळा बंदी घातली होती, याचे भान ठेवायला हवे होते. "तुमच्या विचारधारा, तुमचे दृष्टिकोन आणि ज्या विचारधारेसोबत माझे सर्व आयुष्य घालवले व ज्या दृष्टिकोनासोबत कार्यरत राहिलो ते पाहता, आपल्यात मूलभूत व महत्त्वाचे भेद आहेत. सबब मी तिथे येणे योग्य ठरणार नाही, जनतेत चुकीचा संदेश जाईल," अशा आशयाचे उत्तर प्रणवबाबूंकडून जायला हवे होते. तो प्रश्न तिथेच मिटला असता.
पण समजा तरीही संघाने आग्रह धरला असता आणि "तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायला या, तुमचे विचार स्पष्टपणे ऐकवा, आमचे काय चुकते आहे ते सांगा." अशी विनंती केली असती, तर एक ऐतिहासिक संधी चालू आली आहे असे मानून पूर्णत: सभ्य व सुसंस्कृत पद्धतीने संघाच्या भूमिकेची व कार्याची परखड चिकित्सा करणारे भाषण प्रणवबाबूंना करता आले असते. संघाच्या शिस्तीचे, कार्यकर्त्यांच्या सचोटीचे आणि तथाकथित देशभक्तीचे कौतुक करून ती शिस्त, सचोटी व देशभक्ती यांच्यात मुख्य उणीवा कोणत्या आहेत, त्या कशा सुधारल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माण कसे करता येईल, याबाबतचे विवेचन विश्लेषण करता आले असते. आणि हिंदुराष्ट्र ही कल्पना देशाच्या विकासाला कशी मारक आहे, मुस्लिम व ख्रिश्चन यांचा संघाकडून केला जाणारा द्वेष देशाच्या वाटचालीत किती नुकसानकारक ठरतो आहे, हेही विशद करता आले असते. तसे भाषण झाले असते तर संघाच्या लोकांनी ‘आमची ऐतिहासिक चूक’ असे या भेटीचे वर्णन केले असते आणि देशभरातील पुरोगामी शक्तींनी प्रणवबाबूंना अक्षरश: डोक्यावर घेतले असते.
पण घडले आहे ते उलटेच. ज्या काँग्रेस पक्षाने मासबेस नसणार्या प्रणवबाबूंना राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचवले, तो पक्ष त्याच्या इतिहासातील सर्वाधिक कठीण कालखंडातून जात असताना, प्रणवबाबूंनी ही चूक करून ठेवली. परिणामी नरसिंहराव (यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी संदिग्ध किंवा निष्क्रिय भूमिका घेतली, त्या रागाची परिणती त्यांना परिघाबाहेर फेकण्यात झाली.) यांच्याप्रमाणे प्रणवबाबूंची स्थिती होण्याची शक्यता आहे. आता अहमद पटेल यांनी "प्रणवदा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती" या एका वाक्याच्या ट्विटद्वारे काँग्रेसची मनोभूमिका अप्रत्यक्षपणे मांडली. आणि प्रणवदांच्या मुलीने (शर्मिष्ठा), "संघाच्या त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीची प्रतिमा शिल्लक राहील, भाषण हवेत विरून जाईल" असे विधान करून नेमके भाकित केले.
दुसऱ्या बाजूला, लालकृष्ण अडवाणी यांनी "सरसंघचालक मोहन भागवत व माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या भाषणात कमालीचे साधर्म्य होते" असे प्रशस्तिपत्र दिले आहे, म्हणजे प्रणवबाबूंचे तिथे जाणे कसे चूक होते, याचा नकळत दिलेला तो पुरावा आहे. विशेष गंमत म्हणजे त्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी तिथल्याच काही स्वयंसेवकांच्या प्रतिक्रिया वृत्तवाहिनीवर दाखवल्या/ ऐकवल्या गेल्या. त्यातील सुरतहून आलेल्या एका स्वयंसेवकाची प्रतिक्रिया होती, "भाषण अच्छा हुआ. सेक्युलॅरिझम की हवा ही निकाल दी."
असो.. प्रणवदांनी केलेल्या भाषणात संविधानाची महानता, गांधी-नेहरूंचा विचार आणि सर्व धर्मांचा असलेला हा देश अशी विधाने जरूर होती, प्राचीन इतिहासाचा आढावा घेत वर्तमानाच्या दु:स्थितीबाबत चिंता व्यक्त करणारे ते भाषण होते. पण राष्ट्रपतीपदावर असताना त्यांनी केलेली भाषणे याच प्रकारची होती. ती भाषणे त्या त्या वेळी राष्ट्राला उद्देशून सरकारच्या वतीने केलेली असतात. त्या भाषणांचा जर काही प्रभाव संघावर पडलेला नसेल तर त्याच प्रकारचे आणखी एक भाषण करायला संघस्थानावर जाणे म्हणजे, केवळ पोकळ प्रवचन ठरणार हे उघड होते. त्या प्रवचनाचा संघावर परिणाम होणार नाही, तिथल्या प्रणवबाबूंच्या उपस्थितीचा मात्र गैरफायदा घेता येईल, हाच या भेटीचा अर्थ आहे.
- विनोद शिरसाठ
editor@kartavyasadhana.in
(सदर लेख हा साधना साप्ताहिकाच्या 23 जून 2018 च्या अंकाचे संपादकीय आहे.)
साधना साप्ताहिकाच्या अर्काईव्हमधील हे लेखही वाचा:
रबर स्टँप ही प्रतिमा अस्पष्ट करणार?
असे औचित्यभंग स्वागतार्ह आहेत!
Tags: विनोद शिरसाठ साधना संपादकीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस Pranab Mukharjee Vinod Shirsath RSS Rashtriya Swayamsevak Sangh Editorial Load More Tags
Add Comment