समाजशिक्षक

29 मे 2020: ग. प्र. प्रधान यांचा 10वा स्मृतिदिन

फोटो सौजन्य: शिल्पा बल्लाळ

29 मे 2010 रोजी ग. प्र. प्रधान यांचे निधन झाले तेव्हा ते 88 वर्षांचे होते. त्यांचे जगणे-वागणे-बोलणे व विचार करणे हे सर्व ‘पारदर्शक’ या संज्ञेला पात्र ठरत होते. याचे कारण त्यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य हे परस्परांमध्ये इतके मिसळलेले होते की, त्यातील कोणत्याही घटकाचा स्वतंत्र वा वेगळा विचार करता येत नाही. म्हणून त्यांच्या जडणघडणीतील सहा प्रमुख टप्पे उलगडून दाखवणारा, ‘ललित’ मासिकाच्या जुलै 2010 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख; प्रधानांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुनर्मुद्रित करणे औचित्यपूर्ण वाटते.
- संपादक

29 मे 2010 रोजी ग. प्र. प्रधान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी हडपसर, पुणे येथील साने गुरुजी रुग्णालयात निधन झाले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व मराठी वर्तमानपत्रांतील बातम्यांत व लेखांत चारित्र्य, नैतिकता, विश्वासार्हता, पारदर्शकता ही व या आशयाची विशेषणे प्रधान सरांचे वर्णन करण्यासाठी वापरली गेली. त्यानंतर चारच दिवसांनी, प्रधान सर ‘माझी मुलगी’ असा ज्याचा उल्लेख करीत असत त्या साधना साप्ताहिकाचा ‘प्रधान स्मृती अंक’ (5 जून 2010) प्रकाशित झाला. त्या अंकातील लेखांची शीर्षकेही मोठी अर्थपूर्ण आहेत. नरेंद्र दाभोलकरांच्या लेखाचे शीर्षक ‘कृतार्थ साधक’, मोहन धारियांच्या लेखाचे शीर्षक ‘महान योगी’, भाई वैद्य यांच्या लेखाचे शीर्षक ‘भावनांचा अथांग सागर’, सुभाष वारेंच्या लेखाचे शीर्षक ‘डोंगराएवढा आदर्श’, अरुण टिकेकरांच्या लेखाचे शीर्षक ‘साधुमुखे समाधान’ तर गोविंद तळवलकरांच्या लेखाचे शीर्षक ‘निरलस, सालस आणि प्रांजळ’. रा.ग.जाधव यांनी ‘सात्त्विक प्रज्ञादर्शन व प्रतिभादर्शन’ या शीर्षकाच्या लेखात प्रधानांचे वर्णन ‘सुसंस्कृत महाराष्ट्राचा सात्त्विक हसरा चेहरा’ असे केले आहे. याचा अर्थ प्रधानांवर लेख लिहिताना या सर्वांनी, लेखाच्या शीर्षकांबाबतही पुरेसा विचार तर केलेला आहेच, पण त्या शीर्षकांतून प्रधान सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    
बरोबर तीन वर्षांपूर्वी ‘मनोविकास’ प्रकाशनाने, महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या 25 नामवंतांविषयी ‘कर्ती माणसं’ हे पुस्तक तयार करायचे ठरवले तेव्हा प्रधान सरांवर लेख लिहिण्याचे काम माझ्याकडे आले होते. त्या वेळी ‘या पुस्तकासाठी आवश्यक ते सहकार्य लेखकाला करावे’ अशी औपचारिक विनंती करणारे प्रकाशकांचे पत्र प्रधान सरांना गेले. त्यानंतरच्या आठवड्यात प्रधान सर साधना कार्यालयात आले तेव्हा म्हणाले, ‘माझ्याविषयी तुला जे काही वाटेल ते नि:संकोचपणे लिही, पण त्या लेखाचं शीर्षक काय ठरवलंस?’ मी म्हणालो, ‘अजून ठरवलं नाही, पण पुस्तकाचं नाव ‘कर्ती माणसं’ आहे, त्यामुळे तुमच्या एकूण कार्याचा गाभा सांगता येईल असं एक किंवा दोन शब्दांचं शीर्षक शोधीन.’ प्रधान सर क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, ‘मग तुझं काम झालं. माझ्यावरच्या लेखाचं शीर्षक ‘समाजशिक्षक’ एवढंच दे. मी कुठेही गेलो तरी शिक्षकच होतो.’
    
प्रधानांचा उल्लेख ‘ज्येष्ठ विचारवंत’ असा केला जात असे. त्या बाबत अनेक वेळा त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे आणि अनेक मुलाखतींत, लेखांत व ‘माझी वाटचाल’ या आत्मकथनात्मक पुस्तकातही लिहिले आहे: ‘जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारे ते ‘तत्त्वज्ञ’, संकल्पनांची मांडणी करणारे ते ‘विचारवंत’ आणि या दोहोंचे विचार समाजापर्यंत पोहोचवणारे ते ‘समाजशिक्षक’, अशा तीन पायऱ्या असतात; यांतल्या तिसऱ्या पायरीवर मी उभा आहे! आजच्या आपल्या सार्वजनिक जीवनात ‘विचारवंत’ हे विशेषण अतिवापरामुळे मूळचा अर्थ हरवून बसले आहे, तर ‘समाजशिक्षक’ हे विशेषण शिक्षकी पेशाला आलेल्या अवकळेमुळे त्याचे सामर्थ्य गमावून बसले आहे. या पार्श्वभूमीवर, ग. प्र. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्या कार्याचा नेमका वेध घेतला पाहिजे.
    
26 ऑगस्ट 1922 हा प्रधान सरांचा जन्मदिवस. तब्बल 88 वर्षे ते अगदी व्यवस्थित व निरोगी आयुष्य जगले. त्यांचे बोलणे व वागणे आणि विचार व कार्य यांत कमालीची सुसंगती होती. शिवाय त्यांनी स्वत:वर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल, ते जगले त्या कालखंडातील राजकीय-सामाजिक घडामोडींबद्दल आणि स्वत:च्या गुण-दोषांबद्दल किंवा सामर्थ्यस्थाने व कच्चे दुवे यांबद्दल अतिशय स्वच्छ व स्पष्ट शब्दांत आणि नि:संकोचाने लिहिले आहे. त्यामुळे त्यांचे जीवन व कार्य समजावून घेता येणे तुलनेने सोपे आहे.
    
प्रधानांच्या आयुष्यातील पहिला टप्पा हा त्यांच्या वयाच्या 18 वर्षांपर्यंतचा मानता येईल. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने इंदापूर, सातारा, पारनेर व पुणे या ठिकाणी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्या वेळच्या मध्यमवर्गीय घरात वाढल्याने वाचनाचे संस्कार होणे स्वाभाविक होते. प्रधानांच्या आईवडिलांना तर वाचनाची विशेष आवड होती. या कालखंडात तीन घटकांनी प्रधानांच्यावर दूरगामी परिणाम केला असे दिसते...
    
पहिला घटक म्हणजे वि.स.खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी, विशेषत: ‘दोन ध्रुव’ व ‘उल्का’ या दोन कादंबऱ्यांनी कुमार वयातील प्रधानांना हलवून सोडले. पांढरपेशा जगण्याच्या बाहेर डोकावण्यास त्यांना भाग पाडले. त्या वेळच्या राजकीय-सामाजिक स्थितीचे भान येण्यास त्या दोन कादंबऱ्या प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. उदात्त ध्येयवाद, देशासाठी-समाजासाठी झोकून देण्याची ऊर्मी, त्यागी प्रवृत्ती, साधी व सात्त्विक जीवनशैली या सर्वांचे बीज तिथे पडले.
    
दुसरा घटक म्हणजे महिपती या संतचरित्रकाराची पुस्तके. प्रधानांची आई धार्मिक प्रवृत्तीची होती, त्यामुळे आईला धार्मिक पुस्तके वाचून दाखवणे हे काम किशोरवयीन प्रधानांकडे होते. अठराव्या शतकात महिपतीने भक्तविजय, संतविजय, पांडवप्रताप अशा काही पोथ्या किंवा संतचरित्रे लिहिली. जवळपास अडीचशे संतांची लहान चरित्रे लिहिणाऱ्या महिपतीची भाषा अत्यंत साधी, सोपी, रसाळ व उद्‌बोधक होती; सामान्यांतील सामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेणारी होती. महिपती हा काही संस्कृत पंडित नव्हता, त्यामुळे संस्कृतच्या प्रभावापासून त्याची भाषा मुक्त होती. असे म्हटले जाते की, राजा रवि वर्म्याने हिंदू देवदेवतांना चेहरा, रंग- रूप दिले, मानवी आकृती बहाल केल्या; तसेच महिपतीने विस्कळीत स्वरूपातील माहिती एकत्र करून संतांची चरित्रे रेखाटली. महिपतीने लिहिलेली चरित्रे आईला वाचून दाखवण्याच्या निमित्ताने प्रधानांवर महिपतीच्या भाषेचा मोठाच प्रभाव पडला. तो प्रभाव इतका आहे की त्यानंतर खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी प्रधानांचे भावविश्व व विचारविश्व ढवळून काढले असले तरी खांडेकरांच्या भाषेचा किंचितही परिणाम प्रधानांच्या भाषेवर झालेला दिसत नाही. एवढेच नव्हे तर प्रधानांनीच लिहून ठेवले आहे की, ‘कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, वैचारिक लेखन हे सर्व वाचायला मला आवडत असलं तरी चरित्रं-आत्मचरित्रं वाचायला मला विशेष आवडतात.’ प्रधानांनी जे लेखन केले त्यातही चरित्र-आत्मचरित्रपर लेखनाचे प्रमाण जास्त आहे.
    
तिसरा घटक म्हणजे माध्यमिक शाळेत असताना वाय.जी. पटवर्धन नावाच्या शिक्षकामुळे प्रधानांना लागलेली इंग्रजी भाषेची गोडी. त्याचा परिणाम म्हणजे फार कमी वयात इंग्रजी कादंबऱ्या वाचायला प्रधानांनी सुरुवात केली. ‘माझी वाटचाल’ या पुस्तकात या संदर्भात एक आठवण सांगताना प्रधान म्हणतात- ‘‘एकदा पटवर्धन सरांनी आमच्या वर्गावर सिनॉनिम्स म्हणजे ‘समानार्थी शब्द’ हा व्याकरणाचा पाठ शिकवला. पण नंतर पुस्तक बाजूला ठेवून म्हणाले. ‘‘हे झालं परीक्षेच्या दृष्टीने. पण मुलांनो या जगात कोणतेही दोन शब्द समानार्थी नसतात. प्रत्येक शब्दाला वेगळी छटा असतेच असते. उदाहरणार्थ, या पुस्तकात joy, delight आणि happiness हे तीन शब्द समानार्थी आहेत असे आपण शिकलो. पण हे खरे नाही. हवेत पतंग उडताना पाहून, फुगे सोडलेले पाहून तुम्हांला जो आनंद होतो त्याला joy म्हणतात. एखादे गाणे ऐकताना किंवा क्रिकेटची मॅच पाहताना होणारा आनंद म्हणजे delight आणि happiness या शब्दाचा अर्थ तुम्हाला या वयात कळणार नाही. तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या वाट्याला unhappiness येईल तेव्हा तुम्हाला happiness या शब्दाचा अर्थ कळेल.’’ भाषेचा हा काटेकोरपणा प्रधानांमध्ये इतका खोलवर रुजला की सात-आठ वर्षांपूर्वी प्रधान सरांचे ‘मला उमजलेले’ हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा प्रकाशन समारंभात प्रधान सर म्हणाले, ‘‘मला समजलेले’ असे नाव मी या पुस्तकाला जाणीवपूर्वक दिलेले नाही, कारण ती प्रक्रिया फार पुढची आहे.’’
    
म्हणजे खांडेकर, महिपती आणि पटवर्धन या तिघांचा विलक्षण प्रभाव कुमार-किशोर अवस्थेतील प्रधानांवर पडला. वयाच्या 23 व्या वर्षी इंग्रजीचे प्राध्यापक होण्यात, वयाच्या 18 व्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यात आणि भावी काळात सुबोध शैलीतील लेखन करण्यात अनुक्रमे पटवर्धन, खांडेकर, महिपती या तिघांचे संस्कार कारणीभूत ठरले.
    
प्रधानांच्या आयुष्यातील दुसरा टप्पा म्हणजे त्यांच्या वयाची 18 ते 23 हा पाच वर्षांचा काळ. अठराव्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजात प्रधान दाखल झाले तेव्हा, म्हणजे 1939-40 च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाची धामधूम सुरू होती आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्राम एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अंतिम लढा उभारण्याच्या तयारीत होती आणि काँग्रेसमधीलच एक गट समाजवादी समाजरचना आणण्याच्या दिशेने विचार करीत होता. नेमके त्या काळात सोशलिस्टांच्या स्टडी सर्कलमध्ये तारुण्यात पदार्पण केलेले प्रधान दाखल झाले. त्यानंतर 1942 ची ‘चले जाव’ चळवळ सुरू झाली तेव्हा काँग्रेस सोशलिस्ट भूमिगत झाले. प्रधानही भूमिगत राहून काम करू लागले आणि पकडल्यानंतर तुरुंगात रवाना झाले. तुरुंगात त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू झाल्यावर, तुरुंगातून सुटका झालेले तरुण राजकीय कैदी कौटुंबिक आघाडीवर स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करू लागले. प्रधानांनीही तेच केले. एम.ए. पूर्ण करून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.
    
प्रधानांच्या आयुष्यातील तिसरा टप्पा 1945 ते 65 हा 20 वर्षांचा आहे. ‘प्राध्यापक म्हणून काम करताना राजकीय काम करता येणार नाही’ ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची अट मान्य करून प्रधानांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजे 1945 मध्ये संपूर्ण लक्ष प्राध्यापकी पेशावर केंद्रित केले. पण त्याआधीच्या पाच वर्षांत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गांधी, नेहरू व अन्य नेत्यांच्या कार्याचा, समाजवादी विचारांचा व साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा, विलक्षण प्रभाव पडलेला असल्याने, राष्ट्र सेवादलात बौद्धिके घेण्याचे म्हणजे सेवादल सैनिकांना शिकवण्याचे काम करण्यास त्यांनी परवानगी मिळवली. वीस वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून मोठा लौकिक मिळवताना प्रधानांना इंग्रजी ललित साहित्याचे प्रचंड वाचन करायला मिळाले. आणि त्याच वेळी सेवादल सैनिकांची बौद्धिके घेण्याच्या निमित्ताने राजकीय-सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वैचारिक वाचनही होत होते. या दोहोंमुळे प्रधानांच्या भावनिक व वैचारिक जडणघडणीत उदारमतवाद, सम्यक्‌ दृष्टी यांचा अंतर्भाव झाला.
    
प्रधानांच्या आयुष्यातील चौथा टप्पा म्हणजे त्यांनी 20 वर्षांच्या प्राध्यापकीनंतर सक्रिय राजकारणात वयाच्या 43 व्या वर्षी प्रवेश केला, तो. खरे तर प्राध्यापकीच्या काळात त्यांनी जे विद्यार्थी घडवले आणि शिक्षणक्षेत्रात नाव कमावले होते त्याच्याच आधारे ते राजकारणात येऊ शकले. प्राध्यापकीचा राजीनामा देऊन बाहेर पडल्यावर पुढच्याच वर्षी ते पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे 20 वर्षांचे कार्य इतके अजोड होते की त्या बळावरच ते पुढची सलग 18 वर्षे आमदार राहिले आणि त्यांतील शेवटची तीन वर्षे तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेही झाले. त्या 18 वर्षांच्या काळात समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करताना समाजवादी चळवळीत एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे हे त्यांचे राजकारणातील गुरू राहिले. उत्तम संसदपटू ही त्या वेळी समाजवाद्यांची खासियत होती. त्या काळात मधु लिमये, बॅ.नाथ पै, मधु दंडवते असे अनेक समाजवादी संसद गाजवत होते, त्यामुळे त्यांचा आदर्श प्रधानांपुढे विधानपरिषदेतील काम करताना होता. 1982 मध्ये म्हणजे वयाच्या साठीनंतर मात्र प्रधानांनी राजकारणातून निवृत्त होऊन साधना साप्ताहिकासाठी काम करायचे ठरवले. राजकारणात नव्यांना संधी द्यावी हा विचार त्यामागे होता, तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविल्यानंतर आता थांबायला हवे हा विवेकही! राजकारणात आपण अधिक धडपड करून फार काही करू शकणार नाही हे त्यांना कळले होते, तसेच लेखन-वाचनासाठी वेळ काढला पाहिजे ही गरजही त्यांना जाणवत होती.
    
प्रधानांच्या आयुष्यातील पाचवा टप्पा 1984 ते 1997 या तेरा वर्षांचा होता. या काळात ते वसंत बापटांच्या बरोबर साधना साप्ताहिकाचे संपादक झाले. या तेरा वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात भटकंती केली. विपुल लेखन केले. साहित्य-संस्कृतीच्या व सामाजिक संस्था-संघटनांच्या बरोबर काम करीत राहिले. मग ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपद असो, वा अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन असो. याच काळात पुरोगामी विचारप्रवाहाच्या संस्था, संघटना, कार्यकर्ते यांना शक्य तेवढे सहकार्य, मदत करण्याची भूमिका ते घेत राहिले. पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमातील ‘अध्यक्षस्थान’ हे या काळात सर्वाधिक वेळा प्रधानांनीच भूषविले असावे. विविध क्षेत्रांतील मित्रपरिवार त्यांच्याशी या काळात अधिक जोडला गेला.
    
‘साधना’चे संपादकपद सोडल्यानंतर 1998 ते 2008 हा दहा वर्षांचा कालखंड प्रधानांच्या आयुष्यातील सहावा आणि शेवटचा टप्पा होता. या काळात त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतून निवृत्ती घेतली, पुरस्कार स्वीकारणे थांबवले, प्रवास थांबवला. आयुष्याची निरवानिरव सुरू केली. अपत्य नसल्याने आणि 2003 मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर एके काळी ते विश्वस्त असलेल्या हडपसरच्या साने गुरुजी रुग्णालयात वास्तव्यासाठी गेले. वृद्धापकाळात अन्य लोकांवर ताण नको, हा विचार त्यामागे होता; त्याचप्रमाणे आयुष्याच्या संध्याकाळी निवांतपणा मिळवून, गतआयुष्यात जे वाचायचे व लिहायचे राहून गेले ते पूर्ण करून जीवनयात्रा आनंदाने संपवण्यास तयार व्हावे ही जाणीवही त्यामागे होती. हडपसरला वास्तव्यासाठी गेल्यावर त्यांनी संतसाहित्य पुन्हा वाचायला घेतले. त्यात तुकाराम, एकनाथ प्रमुख होते. त्या वेळी ते म्हणाले, तुकारामाइतके कठोर मला होता येत नाही; एकनाथ हा प्रापंचिकांचा संत आहे, तो मला जवळचा वाटतो. त्याच काळात त्यांनी डॉ.आंबेडकरही पुन्हा नव्याने वाचायला घेतले. तेथील सहा वर्षांच्या काळात त्यांनी आठा उत्तराची कहाणी, टॉलस्टॉयशी पत्रसंवाद, डॉ.आंबेडकर त्यांच्याच शब्दांत, आचार्य जावडेकर, लेखणीचे ललित, लोकशाही आणि समाजवाद, इत्यादी सात-आठ पुस्तके लिहिली.
    
गेल्या वर्षी वयाची 88 वर्षे पूर्ण होत असतानाच ‘जे शक्य होते ते सर्व करून झाले. आता कसलीही इच्छा उरली नाही’ अशी भावना त्यांच्या मनात अधिक घर करू लागली. कसलाही आजार नाही, पण गात्रे थकलेली, बरोबरीचे सर्व सवंगडी निघून गेलेले, नव्यांशी तितकी नाळ जुळत नाही, जगण्यासाठी काही प्रयोजन राहिले नाही अशा अवस्थेत त्यांना मृत्यूची ओढ लागली होती.
    
म्हणजे समाजशिक्षक प्रधान वर्षभरापूर्वी संपले होते. सतत शिकत राहणे आणि शिकवत राहणे हाच समाजशिक्षकाचा गाभा असतो. शिकण्याची व शिकवण्याची ऊर्मी व उमेद संपली तेव्हा प्रधानांचा जगण्यातला रसही संपला होता. त्यामुळेच शेवटच्या आठ-दहा महिन्यांत तर ‘आपण केवळ भुईला भार राहिलो आहोत’ अशा भावनेने त्यांना पछाडले होते. प्राध्यापक असताना, समाजवादी पक्षाचे सदस्य असताना, विधानपरिषदेचे आमदार असताना, साधनाचे संपादक असताना, सार्वजनिक जीवनात वावरताना आणि लेखन करतानाही प्रधान सर समाजशिक्षकाच्याच भूमिकेत वावरत राहिले. नवीन काही पाहिले, ऐकले, अनुभवले, समजले तर ते इतरांना ऐकवणे, सांगणे, वाचायला देणे आणि नवीन कोणी भेटले तर त्यांच्याकडून समजावून घेणे ही प्रधानांची प्रमुख वृत्ती होती. हे शिकणे-शिकवणे सामान्यातील सामान्य माणसां-बाबतही घडत होते; केवळ राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किंवा बुद्धिजीवी वर्गातील लोकांबाबत नव्हे!
    
प्रधानांनी आपले घर साधनाच्या स्वाधीन केलेले होते. कारण साने गुरुजींनी स्थापन केलेली हीच संस्था आपले आवडते काम (समाजशिक्षणाचेच) दीर्घकाळ करू शकेल असा त्यांना विश्वास होता. हाती येणारे पैसे तर त्या-त्या वेळीच विविध समाजसेवी संस्थांना ते वाटून टाकत असत. मृत्यूनंतर लगेच त्यांचे नेत्रदान केले गेले आणि त्यांचा देह मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला देण्यात आला. एका समाजशिक्षकाचा देह अखेर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आला! प्रधानांची शेवटची इच्छा त्या वेळी वाचून दाखवण्यात आली. ‘‘माझ्याबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी एक झाड लावून पाच वर्षे वाढवावे आणि माझ्याबद्दल आपुलकी असणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावून किमान पाच वर्षे वाढवावीत.’’ ही इच्छा व्यक्त करतानाही प्रधानांमधील समाजशिक्षक जागा होता. त्यांनी अवास्तव अपेक्षा व्यक्त केली नाही. साक्षर-निरक्षर, गरीब श्रीमंत आणि कोणत्याही प्रवृत्तीचा, विचारधारेचा माणूस असेल त्याला करता येईल असा कार्यक्रम दिला. किमान पाच वर्षे झाड जगवले तर ते आपोआप वाढेल ही व्यावहारिक दृष्टी त्यामागे आहे, ही झाडे सावली देतील, समाधान देतील हा विचार त्यामागे आहे. प्रधानांनी तरी आयुष्यभर काय केले? त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांना समाधानच दिले, समाधानी राहायलाच शिकवले, समाधानी कसे राहता येऊ शकते हेच स्वत:च्या आचारविचारांतून दाखवले. प्रधान चरित्र आणि प्रधान विचार त्यातील साधेपणामुळे, सरळपणामुळे आकर्षक वाटतो, पण अनुकरण करण्यास अत्यंत कठीण असतो, याची प्रधानांना पुरेपूर जाणीव होती. म्हणून कदाचित त्यांनी लोकांना स्वीकारता येईल इतका सोपा व समाधान देणारा कार्यक्रम दिला असावा.

- विनोद शिरसाठ
 
editor@kartvyasadhana.in


ग. प्र. प्रधान यांच्या माझी वाटचाल या आत्मकथनात्मक पुस्तकाची नवी आवृत्ती आज साधना प्रकाशनाकडून येणार होती, मात्र मागील अडीच महिने  प्रेस बंद असल्याने ती जून मध्ये येईल. शिवाय,आणखी सव्वा वर्षाने प्रधान सरांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल, त्या वर्षभरात साधनाच्या वतीने प्रधान सरांच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या, त्यांना अभिप्रेत विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाणार आहे.

-संपादक

पहा समीर शिपुरकर दिग्दर्शित माहितीपट -  'प्रधान विचार प्रधान चरित्र' 

Tags: ग प्र प्रधान विनोद शिरसाठ Load More Tags

Comments:

हर्षवर्धन कडेपूरकर

समाजशिक्षक प्रा ग प्र प्रधान सरांवरील तुमचा लेख आवडला. या निमित्ताने प्रधान सरांविषयीच्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या. १९८२ साली राज्य शिक्षण मंडळासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तकाचे काम सुरू होते. सेनापती बापट यांची जन्मशताब्दी नुकतीच पार पडली होती. सेनापतींच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्याचा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना परिचय व्हावा यादृष्टीने इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात एक उतारा समाविष्ट करावा असे ठरले होते. सेनापतीवर मराठीत पुष्कळ लिहिले गेले होते. पण इंग्रजीत कुठे मिळणार हा प्रश्न होता. पुस्तकाचा एक संपादक म्हणून मी यासाठी प्रधान सरांना सदाशिव पेठेतील त्यांच्या घरी भेटलो. सरांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांच्याकडे असलेले साहित्य मला दिले. यात ‘लोकराज्य’ चा सेनापती बापट यांच्यावरील इंग्रजीत प्रकाशित झालेला विशेषांकही होता. पुढील भेटीत मी त्यांना मला विशेष भावलेला लेख कोणता हे सांगितले. यावर इतर आणखी काही लेख कसे जास्त योग्य आहेत हे त्यांनी मला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी माझ्या मतावर ठाम असल्याचे पाहून त्यांनी अखेर होकार दिला, पण खूप संकोचानेच ! कारण तो लेख त्यांनीच लिहिलेला होता. शीर्षक होते ‘ द नॉनव्हायलंट जनरल: सेनापती बापट’. पुढे अनेक वर्षे हा उतारा विद्यार्थ्यांनी अभ्यासला. लोकप्रतिनिधीचा आदर्श आणखी काय असतो?

विजय यादव

प्रधान सरांचा आयुष्यालेख उलघडणारा मोजक्या शब्दातील वाचनीय लेख.

नीती बडवे

उत्तम आढावा समाजशिक्षकाचा. सरांशी पुनर्भेट झाल्याचा आनंद मिळाला. माझी आई म्हणायची, सर लहान मुलासारखे निरागस होते. त्यांच्यापाशी कसलाही अभिनिवेश, कसलीही अहमहमिका नव्हती. खरे हाडाचे शिक्षक. समाजशिक्षक.

NG RAJURKAR

The article has a photographic quality. As I was reading it I felt as if I was watching Shri G. P. Pradhan on the screen.

Anup Priolkar

Thanks for sharing wonderful article on Pradhan Sir. Forever he will be the legend through his creativity.

Add Comment