व्यवसायात 'प्रोफेशनलिझम' आणण्याचे काम प्रकाशकांनी करायला हवे!

‘वाचन जागर’मधील प्रकाशकाची मुलाखत : 8

1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या दहाही प्रकाशकांशी साधलेला संवाद दहा दिवस ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध होत आहे.

अग्रगण्य प्रकाशक म्हणून 'मेहता पब्लिशिंग हाउस'ने प्रकाशनविश्वात आपला ठसा उमटवला आहे. मराठीतील उत्तम साहित्य प्रकाशित करण्याबरोबरच जगभरातील उत्तम साहित्य मराठी भाषेत आणण्याचे काम मेहता पब्लिशिंग हाऊस गेल्या चाळीस वर्षांपासून करत आहे.  

आनंद यादवांच्या ‘माळ्यावरची मैना’ या कथासंग्रहाने मेहता पब्लिकेशनचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत 4500हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विविध भाषांमधील पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी या भाषांमध्येदेखील पुस्तके करायला सुरुवात केली. रणजीत देसाई, वि.स. खांडेकर, व.पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, आशा बगे, राजन गवस, दया पवार अशा अनेक मातब्बर लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. 

साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडिअन पब्लिशर्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकांना लाभले आहेत.

मेहताच्या वाचकांसाठी ‘मेहता मराठी ग्रंथ जगत’, ‘ट्रान्सलेटेड बुक जगत’ यांसारखे ऑनलाईन क्लब्ज आहेत.  2013मध्ये डीआरएम तंत्रज्ञान वापरून पहिले मराठी इबुक तयार करणारे मेहता हे पहिले प्रकाशक ठरले. 1964पासून पुस्तक व्यवसायात वावरणाऱ्या सुनील मेहता यांनी त्यांचे वडील अनिल मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली 1976मध्ये मेहता प्रकाशनाची स्थापना केली. 

‘वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने मेहता पब्लिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - प्रकाशन व्यवसायातल्या तुमच्या काही चांगल्या अनुभवांविषयी सांगा. कोणत्या गोष्टींविषयी तुम्ही समाधानी आहात?
- या व्यवसायात मी मुद्दामहून आलो असं काही नाही. माझं बी.कॉम. पूर्ण झाल्यानंतर मी कोल्हापूरला शिफ्ट व्हायचं ठरवलं होतं... पण आईवडलांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी थोड्याशा नाराजीनंच पुणं गाठलं... पण एकदा व्यवसायात उतरल्यानंतर इथल्या अनुभवांनी मला समृद्ध केलं. 

प्रकाशन व्यवसायाच्या निमित्तानं अरुण शौरी, किरण बेदी, सुधा मूर्ती, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गुलजार अशा दिग्गजांच्या भेटी झाल्या. अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांशी गप्पा मारता आल्या. त्यांच्या पुस्तकांनी माझा व्यवसाय जितका समृद्ध होत होता... तितकंच एक व्यक्ती म्हणून मी समृद्ध होत होतो. पुस्तकविक्रीत मला हे समाधान कदाचित लाभलं नसतं. 

मेहता पब्लिशिंग हाऊसचं काम सांभाळायला सुरुवात केल्यानंतर अनेक बरेवाईट अनुभव येत गेले. पुस्तकछपाईसाठी लागणाऱ्या कागदखरेदीसंदर्भातला एक अनुभव असाच होता. मी एका कागद-वितरकाला कागद पुरवण्यासंदर्भात विचारलं तेव्हा त्यांनी ‘तुमची बिलं उशिरा मिळतात’ असं सांगत कागद देण्याचं नाकारलं. त्या अनुभवानं मला पैशाचं महत्त्व कळलं. हा अनुभव गाठीशी घेऊन मी व्यवसाय करत राहिलो. 

पैशामुळे माझ्या व्यवसायाला कधीही नुकसान पोहोचणार नाही याची दक्षता माझ्या पुढच्या कारकिर्दीत मी घेतली. असेच लेखकांसंदर्भातही अनेक अनुभव आले... पण व्यवसाय म्हटल्यावर हे अनुभव येणारच. त्यांतून शिकत पुढे जात राहिलो.  

प्रश्न - ‘या व्यवसायात येणं ही माझी निवड नव्हती.’ असं तुम्ही म्हणालात... पण मग या व्यवसायात यायचं हे तुम्ही कसं ठरवलंत? 
- कोल्हापूरला ‘अजब पुस्तकालय’ नावाचं दुकान माझे वडील श्री.अनिल मेहता आणि काका उल्हास मेहता चालवायचे. कॉलेज संपल्यानंतर ते दुकान बघायचं असं मी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे दुकानात जायलाही लागलो होतो. आमचं एकत्र कुटुंब होतं आणि आम्ही सगळी मिळून सहा भावंडं होतो. एकाच दुकानात आम्ही सहा जण होतो. त्याचदरम्यान माझ्या वडलांनी पुण्यात मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना केली होती... पण इतर भावंडांपैकी कुणीच पुण्याला जायला तयार नव्हतं... त्यामुळे मला पुण्यात येण्यावाचून इलाज नव्हता. पुण्याला जायची ही संधी स्वीकारण्यासाठी आईनं मला प्रोत्साहन दिलं आणि मी पुणं गाठलं. 

सुरुवातीला मला वाचनाची सवय किंवा आवड होती असंही नाही. ती हळूहळू निर्माण होत गेली. प्रकाशन व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं वडलांनी मला फ्री हॅन्ड दिला होता. 1986-87 मध्ये आमचा व्यवसाय खूपच लहान प्रमाणात होता. काही मोठे प्रकाशक डॉमिनेटिंग स्टेजला होते. तसंच आपणही मराठी प्रकाशन व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण करायला हवं असं ध्येय ठेवून मी माझा व्यवसाय वाढवत गेलो... मात्र आजसुद्धा मी कुठल्याही प्रकाशकाला माझा स्पर्धक मानत नाही. आपण स्वतःशीच स्पर्धा केली तर आपल्याला आपली पुस्तकं, आपला कन्टेन्ट अधिक चांगला करता येतो. 

प्रश्न - या व्यवसायातल्या खटकणाऱ्या गोष्टी कोणत्या?
- अशा खूप गोष्टी आहेत. सगळ्या प्रकाशकांनी एकत्र यायला पाहिजे. पुस्तकविक्रेत्यांना हाताशी धरलं पाहिजे. लेखकांशी चांगले, व्यावहारिक संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. प्रकाशन व्यवसायातल्या या प्राथमिक गोष्टी आहेत. 

आपल्याकडे एकता नाही. एकत्र आलो तर आपल्याला खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. भारतीय भाषांमधील पुस्तकविक्रीत बंगाली आणि मल्याळम भाषा आघाडीवर आहेत. मराठीत चांगला वाचकवर्ग असतानाही आपण त्यांच्या तुलनेत मागे आहोत... पण सर्व प्रकाशकांनी एकत्रित काम केलं तर आपण नक्कीच मराठीतली पुस्तकविक्रीही नव्या उंचीवर नेऊ शकतो. महाराष्ट्रात बंगालइतकाच दर्जेदार कन्टेन्ट उपलब्ध आहे.

...शिवाय प्रकाशन व्यवसायाशी संबंधित इतर व्यावसायिकांनाही समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज आपल्याकडे चांगले मुद्रितशोधक, संपादक यांची वानवा आहे. त्यासाठी प्रकाशकांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे. मुद्रितशोधन, संपादन या संदर्भातल्या कार्यशाळा व्हायला हव्या. अशी माणसं प्रकाशकांनी आणि मराठी भाषेतल्या इतर संघटनांनी तयार केली पाहिजेत. 

प्रकाशन व्यवसायातली नवी पिढी तयार करण्यासाठी लेखक-प्रकाशकांनी मोठं पाऊल उचललं पाहिजे. साहित्य परिषदांनी आणि विद्यापीठांनी हे काम करणं खूप गरजेचं आहे. चांगले लेखक, मुद्रितशोधक, संपादक यांना हाताशी धरून प्रकाशन व्यवसायात 'प्रोफेशनलिझम' आणण्याचं काम एक प्रकाशक म्हणून आपण नक्कीच करू शकतो. त्यानं हा व्यवसाय अधिक समृद्ध होत जाईल. 

या व्यवसायात पैसे मिळत नाहीत... त्यामुळं एमए, बीए झालेली मुलं या व्यवसायाकडे वळत नाहीत. या व्यवसायात पैसा आहे हे त्यांना पटवून द्यावं लागेल. त्यासाठी हा व्यवसाय ‘प्रोफेशनली’ करणं आपल्याला अजूनही शक्य आहे. 

प्रश्न - आपल्याकडे चांगला कन्टेन्ट असतो. त्यांतून चांगली पुस्तकंही येतात... पण ती वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत असं वाटतं?
- बरोबर आहे... आणि त्यासाठीही प्रकाशकच जबाबदार आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुस्तकविक्रेत्यांनी आणि प्रकाशकांनी एकत्र यायला हवं. जिथे पुस्तकविक्रेते पोहचू शकत नाहीत तिथे एक प्रकाशक म्हणून आपली आउटलेट्स असू शकतात का... असाही विचार आपण करायला पाहिजे. 

उदाहरणार्थ, चाकणसारख्या ठिकाणीही एखादा पुस्तकविक्रेता असायला पाहिजे. पुण्यात लक्ष्मीरोडवर पीटर इंग्लंडचं दुकान आहे आणि तिथून एक किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर अप्पा बळवंत चौकाच्या अलीकडे त्याचंच दुसरं शोरूमही आहे. हे आपण का करू शकत नाही? आणि हे एकाच प्रकाशकानं करायला हवं असं नाही. चार प्रकाशक आपापल्या सोयीनुसार एकत्र येऊन हे करू शकतात... त्यामुळे वाचकांनाही स्वतः पुस्तक पाहून, चाळून ती खरेदी करणं सोपं जाईल... शिवाय जसं दुबईत ‘शारजा पब्लिशिंग सिटी’ नावानं पब्लिशिंग हब निर्माण केला गेला आहे... तसा पुण्यात एखादा बुक हब आपण का निर्माण करू शकत नाही? जिथे सर्व प्रकाशक, पुस्तकविक्रेते आणि वाचक एकत्रित येतील.  

ॲमेझॉनच्या एक टक्कासुद्धा वाचक आपल्या प्रकाशनांच्या वेबसाईटवर येत नाही. याचं कारण आपण पूर्वी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. ॲमेझॉन अशा रितीने या व्यवसायात उतरेल असा विचारच आपण केला नव्हता. येणाऱ्या काळात काय काय बदल घडू शकतात याचा विचार करत राहणं इतर व्यवसायांप्रमाणेच इथेही खूप गरजेचं आहे. 

2010 मध्ये मी फ्रॅंकफर्टला जात होतो. तेव्हा मला तिथे इ बुक्स दिसली आणि 2012 मध्ये आम्ही आमची इ बुक्स तयार करायला घेतली. त्या वर्षभरात जवळपास 600 ते 700 पुस्तकं तयार करून आम्ही आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली. त्या वेळी ॲमेझॉन नुकतंच सुरू झालं होतं आणि रिजनल लँग्वेजेसमध्ये ते आलेलं नव्हतं.  

2013-14 मध्ये जेव्हा किंडल भारतात आलं तेव्हाच आम्ही जवळजवळ 1600 पुस्तकं तिथे उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा आम्हाला लॉकडाऊनच्या काळात झाला... कारण या काळात इबुक्सचा सेल 200 ते 300 पटींनी वाढला... त्यामुळेच मी टिकून राहू शकलो. याचप्रमाणे ऑडिओ बुक्सचा विचारही आता आपण करायला हवा.

प्रश्न - प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना तुमचा काय निकष असतो?
- ते पुस्तक वाचनीय असलं पाहिजे असा माझा एकच निकष असतो. 80-90 सालापर्यंत मराठीत कथा-कादंबऱ्यांचा ट्रेंड होता. तसं आता राहिलेलं नाही. आता पुस्तकांच्या प्रचंड कॅटेगरीज्‌ आलेल्या आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे वाचकही वाढलेले आहेत. आपल्या पुस्तकांतून वाचकाला काही मिळालं तर त्याचं समाधान लेखकालाही असतं आणि प्रकाशकालाही... त्यामुळे वाचकांना आवडलेल्या अशा विषयांमधली आणखी काही पुस्तकं आपण काढू शकतो का असा विचार करून, वाचनीयतेचा निकष ठेवून ती प्रकाशित केली पाहिजेत.

प्रश्न - अनुवादित पुस्तकांबाबत काय निकष असतो?
-  तिथेही निकष वाचनीयतेचाच असतो. त्याचा कमर्शिअल अँगल मी कधीही मनात ठेवत नाही. जगभर विविध प्रकारांतलं विविधांगी साहित्य उपलब्ध आहे. ते साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचायला हवं ही अनुवादित साहित्य प्रकाशित करण्यामागची आमची मुख्य प्रेरणा आहे. अनुवादाच्या माध्यमातून जेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन, रॉबीन कुक, फ्रेडरिक फोरसीथ, रेई किमुरा असे अनेक लेखक आज आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवू शकलो आहे. 

त्यातून होणारी सांस्कृतिक देवाणघेवाणही तितकीच महत्त्वाची आहे... शिवाय पूर्वीप्रमाणे छपाईची प्रक्रिया हा आता फार मोठा भाग राहिलेला नाही. इन्व्हेन्टरी आणि गुंतवणूक कमीत कमी ठेवून तुम्ही जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आपलं पुस्तक कसं पोहोचवू शकता हा भाग आता महत्त्वाचा आहे. 

पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये लेखक सहभागी झाला तर त्या पुस्तकाला गती मिळते. मार्केटिंगचे अनेक उपाय आपल्याकडे आहेत आणि त्यासाठी पैसा खर्च करावाच लागतो. 

प्रश्न - पूर्वी लेखकांना ग्लॅमर होतं. लोक आपल्या आवडीच्या लेखकांच्या पुस्तकांची वाट बघायचे. आता ते तेवढ्या प्रमाणात राहिलेलं नाही. याचं काय कारण असावं?
- पूर्वी साहित्यप्रकारांची आणि लेखकांची संख्या मर्यादित होती. कल्पनारम्य साहित्यावर अधिक भर होता... त्यामुळे लेखकांना वेगळं ग्लॅमर होतं... पण सध्याच्या काळात साहित्यप्रकारांमध्ये सेल्फहेल्प आणि चरित्रं यांसारख्या पुस्तकांना चांगले दिवस आले आहेत. सध्या वेगवेगळ्या कॅटेगरीज्‌ची पुस्तकं येत असल्यामुळे विशिष्ट साहित्यप्रकार किंवा विशिष्ट लेखक असं कौतुक राहिलेलं नाही... शिवाय सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे... त्यामुळे संपर्क सहज झाल्यानंही त्यावर परिणाम झाला आहे. 

प्रश्न - व्यवसाय चालू ठेवण्याच्या दृष्टीनं तुमच्या पुढच्या पिढीचं प्रशिक्षण कसं चालू आहे?
- माझी पुढची पिढी माझ्यासोबत काम करते आहे. अखिल आणि साहिल ही माझी दोन मुलं माझ्यासोबत काम करतात. मी आजवर जे काही मिळवलं आहे ते माझ्या काटेकोर व्यावहारिक संबंधांमुळे. पुस्तक काढणं आणि त्याचा व्यवहार सांभाळणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. लेखकांचे, इतर सप्लायर्सचे पैसे ठरल्यानुसार आणि वेळेवर देणं ही बाब या व्यवसायात असली पाहिजे आणि त्यानंतर तुमची लेखकांशी भावनिक गुंतवणूकही असू शकते. माझ्या दृष्टीनं ‘व्यवहार पाळणं’ ही खूप महत्त्वाची बाब आहे. नवी पिढी तंत्रस्नेही आहेच. ते तिला शिकवायची गरज नाही... त्यामुळे त्यापलीकडचा व्यवहार मी त्यांना शिकवतो.

प्रश्न - ‘वाचन जागर’सारख्या महोत्सवाची गरज कितपत वाटते? असे आणखी कोणते प्रयोग करता येऊ शकतात?
-  अशाच प्रकारे मराठीतल्या 20-25 प्रकाशकांनी एकत्र येऊन आपली प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आपल्याला वृत्तपत्रांतल्या जाहिराती एकत्र येऊन देता येतील का... हाऊस मॅग्झिन्स एकत्र येऊन चालवता येतील का असा विचार आपण करायला हवा. आज आम्ही दहा प्रकाशक एकत्र आलो असू आणि त्यांतले आठ टॉपमोस्ट असतील तर निदान दोन प्रकाशक असे निवडायला हवेत ज्यांची पुस्तकं खरोखर चांगली आहेत... पण त्यांना आउटलेट नाही. दरवर्षी अशा दोनतीन प्रकाशकांना रोलआऊट करता येईल... जेणेकरून त्यांनाही हा विश्वास वाटेल की, आपण मोठ्या प्रकाशकांसोबत जाऊ शकतो आणि त्यांच्याबरोबर आपलीही विक्री होऊ शकते.

प्रश्न - ‘वाचन जागर’मधली 25 पुस्तकं तुम्ही कशी निवडलीत?
-  लोकांपर्यंत खूप पोहोचलेली पुस्तकं मी यात मुद्दाम निवडलेली नाहीत. उलट गेल्या दीड वर्षांत आणलेली काही खूप चांगली पुस्तकं या यादीत आहेत. त्यांच्या प्रमोशनमध्ये कदाचित आम्ही कमी पडलेलो असू... कारण इतर काही पुस्तकांमध्ये आपण इतके व्यग्र असतो की, अशी पुस्तकं सतत मागे पडत राहतात. त्यांना आपण बी ग्रेड म्हणत राहतो... पण मुळात प्रकाशनासाठी निवडताना ती उत्तम आणि वाचनीय आहेत म्हणूनच निवडलेली असतात. 

अशी प्रमोशनच्या दृष्टीनं दुर्लक्षित राहिलेली पण समृद्ध आशय असणारी महत्त्वाची पुस्तकं मी ‘वाचन जागर’साठी मुद्दाम निवडलेली आहेत. मग अरुंधती रॉय यांचं ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’सारखं किंवा नादिया मुरादचं ‘द लास्ट गर्ल’सारखं पुस्तक असेल. ही पुस्तकं अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवणं मला महत्त्वाचं वाटतं म्हणून अशा पुस्तकांचा 25 पुस्तकांत समावेश केला आहे. ती वेगवेगळ्या कॅटेगरीज्‌मधली पुस्तकं आहेत... जेणेकरून वाचकांना विविधताही मिळेल.

(मुलाखत- मृद्‌गंधा दीक्षित, शब्दांकन – सुहास पाटील)


वाचन जागर महोत्सव - 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत - पुस्तकांची यादी 


हेही वाचा - ‘वाचन जागर’मधील प्रकाशकांच्या मुलाखती :

अभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे !  - अरुण जाखडे

डिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल! - साकेत भांड

प्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे! - प्रदीप चंपानेरकर

अलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात! - अशोक कोठावळे 

मराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता ! - दत्तात्रय पाष्टे

चिरस्थायी स्वरूपाचं काम आपल्याकडं व्हायला पाहिजे! - मिलिंद परांजपे

आपलं प्रत्येक पुस्तक पुरोगामी चळवळीला पूरक असावं, हेच माझं तत्त्व ! - अरविंद पाटकर

Tags: मुलाखत मराठी मुलाखत वाचन जागर महोत्सव मेहता पब्लिशिंग हाऊस सुनील मेहता मराठी प्रकाशन विश्व प्रकाशन संस्था ग्रंथ साहित्य मृद्‌गंधा दीक्षित Interview Vachan Jagar Mahotsav Mehta Publishing House Sunil Mehta Marathi Publication World Marathi Literature Publication Books Mrudgandha Dixit Load More Tags

Add Comment

संबंधित लेख