राजकारणाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ (उत्तरार्ध)

गेले काही दिवस सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर टाकलेला दृष्टीक्षेप.

(या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार यांना काय वाटलं असेल?       

शेवटी ‘आज होईल...उद्या होईल...’ असं म्हणत म्हणत  
तो दिवस अखेर उगवला.  
मुख्यमंत्री आपलाच आहे, सरकार आपलंच आहे  
हे माहीत असल्याने  
शंभर टक्के खात्रीने  
‘मी मंत्री तर होणारच!’ असं सांगणारे  
शिंदेंच्या शिवसेनेचे भले भले नेते तोंडावर पडले. 
मग ते कोकणातील भरत सेठ असोत की 
मराठवाड्यातील शिरसाठ साहेब असोत. 
ठाणे मुंबईचे सरनाईक असो. 
एवढंच नाही तर  
आपल्या विनोदी बोलण्याने लोकांना हसवणारे बापू असोत. 
किंवा सतत दादागिरी करून सरकारी अधिकाऱ्यांना  
येता जाता टोले लगावणारे हिंगोलीचे आमदार असोत. 
ते ऐतिहासिक बंड झाल्यानंतर  
सुरुवातीपासून शिंदेंच्या सोबत सावलीसारखे राहिलेले  
विदर्भातील अपक्ष आमदार कडूसाहेब असोत.  
सगळ्यांनाच मंत्री व्हायचं होतं.  
कुठंतरी ‘चेकमेट’ झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.  
‘आमच्यामुळेच तुमचं सरकार’,  
‘केंद्रात मोदी राज्यात शिंदे’   
‘शिंदे फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय’  
अशा अनेक गोष्टी बोलून झाल्या.  
करून झाल्या. 
आपल्याशिवाय भाजपला पर्यायच नाही,  
असं सतत वाटत असल्यामुळे आणि  
‘आपण एवढं मोठं धाडसी काम केलं.’   
‘सरकार सोडून आलो’,  
‘उद्धव ठाकरेंचं सरकार खाली पाडलं’,  
‘33 देशांनी आपल्या बंडाची दखल घेतली’  
असे जुमले खरे वाटत असल्याने  
त्यांना स्वतःबद्दल जास्तच विश्वास निर्माण झाला होता. 
खरं तर सगळ्यांनाच मंत्रीपद पाहिजे होतं.  
आता जी परिस्थिती निर्माण झाली  
त्यातून शिंदे गटाच्या लोकांना कळून चुकलं की,  
जे काही मिळालं तेवढं टिकवता आलं तरी खूप झालं. 
परत सभापती भाजपचे.  
ठाकरे शिवसेनेकडून सतत दबाव. 
या गडबडीत जर 16 आमदारांची आमदारकी गेली  
तर मोठाच करेक्ट कार्यक्रम. 
पहिल्या दिवसापासून तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री  
अजित पवारांमुळे आपण पक्ष सोडला म्हणून केलेली टीका.  
आता सगळंच परत येतंय. 
शिवाय ठाकरेंबद्दल बेताल बोलण्यानंसुद्धा परतीचे दोर कापून टाकलेत. 
थोडक्यात काय तर तोंड दाबून बुक्क्याचा मार!

***

अजित दादा आणि मंडळींचं काय चुकलं? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता 25 वर्षांचा झाला.  
काँग्रेस पक्षातून फुटून निर्माण झालेला पक्ष.  
नेते, कार्यकर्ते, विचारधारा काँग्रेसचीच.  
महाराष्ट्रात सर्वत्र सहकार क्षेत्रात नेतृत्व करणारे प्रमुख कार्यकर्ते.  
विशेषतः शिक्षण सम्राट, साखर सम्राट, सहकार महर्षी अशी ओळख.  
प्रत्येकजण आपापल्या छोट्या छोट्या साम्राज्याचे सम्राट.    
या सर्व कार्यकर्त्यांना सतत बळ देण्यासाठी सत्तेची उब आवश्यक.  
ते पवार साहेबांनी सातत्याने पाळले.  
काँग्रेसच्या सरकारमध्ये तर ते सहभागी होतेच पण  
अटल बिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदी -  
सर्वच नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध. 
साहेबांचं काम कधीच अडणार नाही.  
कुठेच अडणार नाही.               
आपण सत्तेच्या सोबत राहूनच  
आपापल्या मतदारसंघांची कामं करून घ्यावीत, 
आपली कामं करून घ्यावीत, ही साहेबांचीच शिकवण.  
त्यांचे फुटीर आमदार जाहीरपणे सांगतात.  
अशावेळी भाजपसारखा बलाढ्य पक्ष,  
नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्व,  
अमित शहांसारखे ‘खतरनाक’ चाणक्य  
आणि देवेंद्र फडणवीसांसारखे मित्र मिळत असेल तर  
त्यांनी सत्तेत का सहभागी होऊ नये? 
आज स्वतःला उपमुख्यमंत्रीपद (कदाचित उद्या मुख्यमंत्रीपद)  
आणि सहकाऱ्यांना मंत्रीपदं   
प्रफुल सेठसारख्या वरिष्ठ सहकाऱ्याला कदाचित केंद्रात मंत्रीपद  
मिळणार असेल तर का सोडावं? 
विशेषतः मोदी-शहा काळातलं राजकारण पाहता  
येथे दयामाया नसते. 
तुम्ही मित्र असाल किंवा शत्रू.  
तिसरा पर्याय नाही. 
मित्र असाल तर सर्व काही मिळेल.  
शत्रू असाल तर संपाल. नष्ट केले जाल.  

अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर दोनच पर्याय दिसतात. 
एक तर सोबत या. राज्य करा. काम करा. राजेशाही जगा. 
नाही तर त्रास. सतत तणाव. चौकशा. धाडी.  
सहकारी/मित्र/सांगाती सर्वच तुरुंगात.    
वर्षभरापासून आमदारांची कामं होत नाहीत, अशी तक्रार. 
आपल्या आणि आपल्या साथीदारांना होणारी इडीची इडापिडा.         
अशा परिस्थितीत दादांनी काय करायला हवे होते? 
बरं विचारधारा, वगैरे म्हटलं तर 
दादांनी आधीच सांगितलं होतं, 
‘ज्या दिवशी आम्ही शिवसेनेबरोबर सरकार बनवलं  
त्या दिवशीच ‘सेक्युलर’ वगैरेला  
काही अर्थ राहिला नाही.’ 

***
शरद पवार यांनी हा प्रस्ताव का स्वीकारला नसेल?   
पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आलो,  
अशी जाहीर कबुली मोदी साहेबांनी दिली होती.  
भाजपने असा प्रस्ताव शरद पवार साहेबांना दिलेला होता. 
त्यांच्या कन्या केंद्रात मंत्री आणि राज्यात एनसीपी-भाजप सरकार.   
त्यांचा अनुभव, वय आणि त्यांच्याबद्दल मोदीजींच्या मनातला आदर पाहता  
शरद पवार साहेबांना खऱ्या अर्थाने मानसन्मान, प्रतिष्ठा आणि  
देशात अतिशय महत्त्वाचं स्थान मिळालं असतं. 
पण त्यांनी ते स्वीकारलं नाही.  
आपण हा प्रस्ताव स्वीकारला तर  
तो आपल्या सर्वच लोकांच्या दुखण्यावरील  
एक जालीम ‘रामबाण’ औषध असेल, हे त्यांना माहीत होतं.  
आपण जर हे स्वीकारलं नाही तर  
आपले सर्व अडचणीत सापडलेले ‘सांगाती’ सोडून जातील,  
याची त्यांना कल्पना होती. 
तरीही त्यांनी भाजपबरोबर जाणं का मान्य केलं नाही? 
या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. 
रामविलास पासवान यांच्यासारखंच पवार साहेबांनासुद्धा  
‘मौसम वैज्ञानिक’ म्हणून ओळखलं जातं. 
कदाचित त्यांनी ‘आनेवाले मौसम का हाल’ ओळखला असेल. 
नाकारता येत नाही!

***

भाजपने बहुमत असतानासुद्धा एनसीपीला सत्तेत का सहभागी केलं? 

इडी, इडापिडा, सत्तेची मिठाई, उब या गोष्टींचा विचार करून  
एनसीपीवाले भाजपला पाठिंबा देणं शक्य आहे.  
पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, 
भाजपने एनसीपीला सत्तेत का सहभागी करून घेतलं? 
त्यांच्याकडे बहुमत होतं.  
शिंदेंच्या शिवसेनेचे 16 आमदार अपात्र झाले असते  
तरीही भाजपच्या सरकारला धोका नव्हता. 
ही गोष्ट विरोधी पक्ष नेते असतानासुद्धा  
अजित पवारांनी सतत सांगितली होती. 
मग प्रश्न असा पडतो की, भाजपने  
उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपदं देऊन  
चार दिवसांपूर्वी आपल्याच सर्वोच्च नेत्याने  
ज्यांच्या भ्रष्टाचारावर जाहीर टीका करून  
लाखो लोकांना साक्षी ठेवून  
कारवाई करायची ‘गारंटी’ दिली होती  
त्यांना आपल्या सरकारचा भाग का बनवला असेल? 
याचाच अर्थ हा आहे की,  
आज जरी 165 आमदार सोबत असले तरी  
पुढच्या निवडणुकीत किती आमदार निवडून येतील याचा  
भाजपच्या नेत्यांना पूर्ण अंदाज आलेला असेल. 
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेश नंतर  
लोकसभेच्या सर्वात जास्त जागा देणारा महाराष्ट्र  
त्यांना हातातून जाऊ द्यायचा नाही. 
याचाच दुसरा अर्थ  
आज तरी महाराष्ट्र हातातून गेलेला दिसतो.  
म्हणजेच भाजपला एकीकडे  
महाविकास आघाडी खल्लास करायची आहे. 
त्यांना दोन शिवसेना, दोन एनसीपी पाहिजे. 
प. बंगालप्रमाणे महाराष्ट्रात  
प्रादेशिक अस्मिता अडचण ठरू नये.   
आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर निर्माण होणाऱ्या  
विरोधी पक्षाच्या ऐक्याला सुरुंग लावायचा आहे.  
त्यात महत्त्वाची भूमिका शरद पवार बजावत आहे,  
ही वस्तुस्थिती आहे.

***

पक्षांतर बंदी कायदा अपयशी ठरतोय का? 

आता आमदार फोडायचे नाहीत,  
आमदारांचा गट फोडायचा नाही,  
पक्ष फोडायचा नाही  
तर संपूर्ण पक्षच घेऊन चिंगाट पळायचे,  
असा नवा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ तयार झालेला आहे.  
सभापती, निवडणूक आयोग, प्रशासन, सरकार  
या सर्वच संस्थांनी एकत्र येऊन हे करायचं ठरवलं  
तर काहीच अवघड नाही. 
सुप्रीम कोर्ट आणि त्यांचं खंडपीठ यांनी निर्णय दिला  
पण त्यातही थोडी ढील दिलेली आहे.  
पण हे जर असंच चाललं तर लवकरच  
दिल्ली, पंजाबमधील आप सरकार आणि पक्ष,  
प. बंगालमधील टीएमसी सरकार आणि पक्ष, 
तेलंगाणाचे बीआरएस सरकार आणि पक्ष, 
सगळीकडे याच गोष्टींचा कित्ता गिरवला जाईल. 
काही उद्योगपती, केंद्रीय यंत्रणा, सरकार मिळून  
कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतील. 
हे कुठंही होऊ शकतं. 
हे कधीही होऊ शकतं. 
तुम्ही कुणालाही मत द्या,  
तुम्ही कोणत्याही पक्षाला मत द्या,  
आम्हाला पाहिजे तोच पक्ष आम्ही म्हणतो तसेच राज्य करेल,  
अशी वृत्ती निर्माण होऊ शकते.

***

पुढे काय होईल?

खरं सांगायचं झालं तर,  
हे सगळं प्रकरण शरद पवारांनीच घडवून आणलं,  
‘हा त्यांचाच गेम आहे’ असं म्हणणारे खूप लोक,  
राजकीय विश्लेषक दिसतात. 
त्यांचं म्हणणं 100 टक्के खोटं आहे,  
असंही कुणी म्हणू शकत नाही. 
‘कारण पवार साहेब काहीही करू शकतात’ 
या त्यांच्या दैवी शक्तीबद्दल कुणीही वादविवाद करत नाही. 
पण एक मात्र खरं, 
‘अडचणीत सापडलेल्या आपल्या सहकाऱ्यांना  
‘सेफ पॅसेज’ उपलब्ध करून देण्याचं काम मात्र ते सहजपणे करू शकतात. 
झालेला प्रकार हा ‘सेफ पॅसेज’ आहे का हे ज्याचे त्याने ठरवावं.’   

पण आपण गृहीत धरलं की,  
पवार साहेब आता महा विकास आघाडी सोबतच राहतील  
तर परिस्थिती फार वेगळी राहील. 
एनसीपीचे मतदार आणि काँग्रेसचे मतदार एकाच प्रकारचे आहेत.  
भाजप विरोधी आहेत. 
त्यामुळे काँग्रेससाठी महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येतील यात शंकाच नाही. 
उद्धव ठाकरे यांनी जर जोर लावला तर बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आणि  
उद्धवजींच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याकडे आकर्षित झालेला  
मुस्लिम, दलित, भाजपविरोधी मतदार आणि मध्यमवर्गीय मतदार  
ठाकरे शिवसेनेकडे येईल, यात शंकाच नाही.  
त्यात परत काँग्रेस - शिवसेना (उ.बा.ठा.) - शरद पवार  
ही एक अतिशय सशक्त युती होऊ शकते.  

‘शिंदेंच्या शिवसेनेकडून एका नाजूक क्षणी असंही सांगण्यात आलं होतं की,  
‘आम्हाला निवडून आणायची जबाबदारी भाजपची आहे.’ 
अर्थात अशी वक्तव्यं करून  
आपण भाजपसाठी ओझं बनत आहोत हेच सिद्ध होतं. 
परत भाजपसाठी जागावाटप ही एक विचित्र डोकेदुखी होऊ शकते. 
शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची एनसीपी आणि भाजप. 
बंडखोरीचं प्रमाणही वाढू शकतं.

असं असलं तरी  
महा विकास आघाडी खिळखिळी झाली आहे,  
असं दृश्य निर्माण करण्यात भाजप यशस्वी होताना दिसतो. 

मोदी-शहा यांचं अर्जुनासारखं झालं.  
त्यांना फक्त लोकसभेच्या निवडणुका दिसतात. 
त्यानंतर परिस्थिती बदलू शकते. 
अडचणी निवळू लागल्या की,  
भावनिक अजित दादा साहेबांकडे परत येऊ शकतात. 

अर्थात काळाच्या उदरात काय आहे हे कुणालाच सांगता येणार नाही. 

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com 
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)  

Tags: राष्ट्रवादी शरद पवार भाजप देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राजकारण नरेंद्र मोदी ncp maharashtra sharadpawar shivsena ajitpawar congress supriyasule politics india bjp rohitpawar ncpmaharashtra sharadpawarspeaks mumbai ncpspeaksofficial pune marathi ajitpawarspeaks ajitpawarfc uddhavthackeray ajitdada ncpspeaks pawarsaheb saheb mahavikasaghadi baramati covid rohitpawarspeaks inc sharadpawarfc Load More Tags

Comments: Show All Comments

Savita Patil

Very correct analysis Dilip Lathi sir...

Sanjay Nana Bagal

सर विश्लेषण आवडले. निसर्ग नियमानुसार 'मोठा मासा लहान माशांना खात नाही तर गिळतो' हे मात्र खरे आहे. मी कुणाचा भाडोत्री कार्यकर्ता नाही. पण दोन्ही पवार एका माळेचे मणी आहेत हे मात्र आतापर्यंत दोघांचा प्रवास .....

Nitin Mane

सध्या असलेल्या परिस्थितीचे बरोबर वर्णन केलेले आहे. पुढे काय होईल, ते आत्ताच काही सांगता येत नाही आपल्याला, जे होईल ते बघत राहणे.

M A Shaikh

Astute n correct analysis of the present unenviable political rigmarole. Thnks for the fine writeup Dilipji.

Niraj Mashru

That true, God Knows what's there in future.. ALL NCP (including Saheb) + BJP Or Cong + NCP (without Dada group) + All Shiv Sena (Thakare + Shinde) Maha Yuti

Rajendra Tiwari

खुप सुंदर विशलेशन....

Add Comment