‘ऑपरेशन’ न्यूज क्लिक!

इन्कमटॅक्स, इओडब्ल्यू, इडी, स्पेशल ब्रांच आता सीबीआय! आता फक्त उरले एनआयए, डीआरआय आणि नार्कोटीक्स..

प्रबीर पूरकायस्थ

एक पत्रकार आपल्याकडे आलेली माहिती 
आपल्या वाचकांना, आपल्या प्रेक्षकांना देण्यासाठी 
धडपडत असतो. 
त्यांनी जर राष्ट्रविरोधी कृत्य केलेलं असलं 
तर ते सर्वांनाच दिसलं असतं.     
म्हणजे तसे असेल तर ते यांच्या 
कार्यक्रमात दिसायला पाहिजे. 
याचा अर्थ नेमकं प्रकरण काय आहे? – 
याची माहिती घेणं आवश्यक आहे.

एक मित्र सांगत होता. 
‘बरं झालं. 
चीनी लोकांकडून पैसे खाऊन 
त्यांच्या बातम्या छापणाऱ्या 
पत्रकारांवर छापे पडले. 
देशद्रोही कुठले! 
टाकायला पाहिजे जेलमध्ये, 
एकेकांना!’ 

‘न्यूज क्लिक’ प्रकरणात 
अनेक पत्रकारांवर 
दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या छाप्याबद्दल 
तो बोलत होता.
तो बऱ्यापैकी चिडलेला होता. 
त्याला विचारलं, 
‘तू अभिसार शर्माचे प्रोग्राम पाहिलेत का रे कधी?’ 
तो म्हणाला, ‘कोण अभिसार?’
उर्मिलेश, भाषा सिंग, परंजय गुहा ठाकुरता?
त्याला काहीच माहीत नव्हतं. 
काही जाणून घ्यायची त्याची इच्छाही नव्हती. 
तो परत परत हेच बोलत होता, 
‘चीनकडून पैसे घेतात देशद्रोही साले आणि 
चीनचा अजेंडा राबवतात 
आपल्या देशाचा विरोधात कट कारस्थान करतात...’   
व्हाटसअ‍ॅप युनिवर्सिटीकडून मिळालेलं ज्ञान 
त्याच्यासाठी पुरेसं होतं. 

***

एकीकडे अशाप्रकारे बोलणारे असंख्य लोक 
सोबतीला व्हाटसअ‍ॅप सेना आणि मुख्य धारेतील टीव्हीवाले
तर दुसरीकडे भारतातील पत्रकारांच्या अठरा संघटना 
मा. मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रचूड यांना पत्र लिहितात 
आणि आपल्या देशातील पत्रकारितेला 
वाचवण्याची कळकळीची विनंती करतात.  

***

खरं सांगायचं म्हणजे 
ज्यांच्या घरावर छापे पडले त्यापैकी 
बऱ्याच पत्रकारांचे कार्यक्रम 
मी बघत आलेलो होतो. 
त्यांच्या प्रत्येक गोष्टी पटत होत्याच, असे नाही 
पण सध्याच्या कॉर्पोरेट पत्रकारांपेक्षा 
सामान्य लोकांसाठी पत्रकारिता करणारे असल्यामुळे, 
सरकारला प्रश्न विचारणारे असल्यामुळे, 
त्यांचं वेगळेपण जाणवायचं. 

***

उर्मिलेश यादव 

आता उर्मिलेशजींचे पाहा. 
सामाजिक चळवळीशी 
आपली नाळ तुटू न देता 
काम करणारा पत्रकार.  
‘हिंदुस्थान’, ‘नवभारत टाइम्स’ 
अशा अनेक हिंदी दैनिकांत 
त्यांनी वैशिट्यपूर्ण पत्रकारिता केली. 
‘राज्यसभा टीव्ही’चे संपादक असताना 
‘मिडिया मंथन’ हा त्यांचा कार्यक्रम 
अत्यंत लोकप्रिय झाला होता.  
सतत वाचन, लेखन, मनन, चिंतन आणि 
सामाजिक दायित्वाची भूमिका यातून 
‘झारखंड जादुई जमीन का अंधेरा’, 
‘बिहार का सच’, ‘काश्मीर : विरासत और सियासत’ 
असे अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहून 
त्यांनी महत्त्वाचे दस्तऐवज निर्माण केले.   
दिल्ली शहरापासून दूर अशा 
वार्तालाप सोसायटीमध्ये 
असलेलं दोन खोल्यांचं छोटंसं घर, 
हीच त्यांची ऐहिक अर्थाने कमाई.                 
खऱ्या अर्थाने हाडाचा पत्रकार. 
त्यांचं रूपही प्राचीन काळातील ऋषीमुनीसारखं. 
पण या ‘सिनियर सिटीझन’ला 
सकाळी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला जायच्या वेळेला 
दिल्ली पोलिसांनी गाठलं. 
त्यांचे लॅपटॉप, मोबाइल, कॅमेरा 
आणि घरात असलेली पुस्तकं 
जप्त करून 
त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 
आणि तपास सुरु झाला 
युएपीए [Unlawful Activities Prevention Act] 
या कायद्याअंतर्गत. 
दहशतवाद्यांसाठी, अतिरेक्यांसाठी असलेला कायदा!
थोडक्यात,   
आयुष्यभर निष्ठेने पत्रकारिता करून 
ताठ मानेने जगलेल्या 
व कुणापुढेही गुडघे न टेकवणाऱ्या या पत्रकारावर 
अशी वेळ यावी, 
हा त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, 
सर्वांसाठीच धक्का होता. 
कारण काय तर ‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेसाठी 
त्यांनी काही कार्यक्रम केले होते. 
‘फ्री लान्सर’म्हणून लिखाण केले होते. 
त्यासाठी त्यांना मानधन मिळाले होते.

***

परंजय गुहा ठाकूरता.
निष्ठेने पत्रकारिता करणारं व्यक्तिमत्त्व. 
‘बिझनेस इंडिया’, ‘बिझनेस वर्ल्ड’, ‘टेलिग्राफ’, 
‘इंडिया टुडे’, ‘पायोनिअर’, अशा अनेक 
प्रतिष्ठित वृत्तसंस्थांमध्ये 
त्यांच्या पत्रकारितेची झलक आपण पाहिली.   
‘इंडिया टॉक्स’ हा सीएनबीसी इंडिया चॅनलवरचा 
त्यांचा ‘टॉक शो’ प्रसिद्ध होता.  
त्यांनी लिहिलेल्या 
‘गॅस वॉर्स : क्रोनि कॅपिटलिझम’ या पुस्तकामुळे 
त्यांना अंबानीच्या रिलायंस उद्योग समूहाकडून 
नोटीस मिळाली होती.    
पुढे ते ‘इपीडब्ल्यू’  या जगप्रसिद्ध नियतकालिकाचे 
संपादक झाले. 
‘समीक्षा ट्रस्ट’च्या मालकीचे साप्ताहिक. 
गोष्ट 2017 ची.
त्यात त्यांचा लेख छापून आला. 
लेखाचे शीर्षक होते : 
‘Modi Government’s Rs 500 Crore Bonanza to Adani Group Company’ 
झालं. 
अंबानी नंतर अदानी बरोबर दुष्मनी. 
समीक्षा ट्रस्टला नोटीस मिळाली. 
संपादकाला नोटीस मिळाली. 
ट्रस्टवाली मालक मंडळी घाबरली. 
लेख ‘ऑनलाईन एडिशन’मधून काढा, 
माफी मागा, 
वगैरे फर्मान निघाले. 
संपादक ऐकायला तयार नव्हते. 
शेवटी व्हायचं तेच झालं. 
मालकांनी लेख काढला. 
संपादकाची नोकरी गेली. 
आणि नशिबात मिळाले 
गुजरातमधील पाच आणि 
राजस्थानमधील एका न्यायालयात 
अदानी समूहाकडून यांच्या विरोधात 
दाखल झालेले अब्रूनुकसानीचे खटले. 
वेळ, पैसा, सुख-समाधान-शांती, इज्जत 
सर्वच गोष्टींचा बळी देऊन 
होणारी कुतरओढ. 
घरातले लोक म्हणाले, 
‘तुम्हाला गांधी बनायचा फार शौक आहे का?  
कधीतरी आमचा विचार करा.’
पण त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. 
हिंडनबर्ग रिपोर्टने अदानीचं साम्राज्य 
अर्ध्यावर आणलं होतं. 
लाखो कोटी रुपयांचं नुकसान केलं होतं. 
त्या रिपोर्टमध्येही परंजय गुहा ठाकुरता यांचा 
विशेष उल्लेख होता.   
परंजय गुहा ठाकुरतासुद्धा 
‘न्यूज क्लिक’साठी काही कार्यक्रम करायचे. 
मानधन मिळायचं. 
त्यांनाही दिल्ली पोलिसांचा दणका बसला. 
न बोलावलेले पाहुणे सकाळी सकाळी घरी. 
नंतर लॅपटॉप, मोबाइल, वगैरे साहित्याची जप्ती. 
आणि पोलीस स्टेशनला रवानगी.                   

***


अभिसार शर्मा. 
एनडीटीव्ही, झी न्यूज, बीबीसी, एबीपी न्यूज, टीव्ही टुडे 
अशा अनेक टीव्ही चॅनल्समध्ये काम करत 
त्याने आपले वेगळेच स्थान निर्माण केले. 
त्याच्या कडक पत्रकारितेचा त्रास 
त्याच्या सरकारी अधिकारी असलेल्या पत्नीलाही झाला. 
सरकारला प्रश्न विचारणे, 
सरकारच्या धोरणावर टीका करणे, 
अशा अनेक कारणांमुळे 
त्याला टीव्हीची दुनिया सोडावी लागली. 
आपली नोकरी गमवावी लागली. 
आता त्याचे स्वतःचे यु ट्यूब चॅनल आहे. 
आयुष्यभर आपल्या पद्धतीने 
पत्रकारिता करणाऱ्या अभिसारला 
त्याची मुलं सकाळी सकाळी शाळेत जात असतानाच 
दिल्ली पोलिसांनी घेरलं.   

***

भाषा सिंग 
अमर उजाला, नवभारत टाइम्स, आउटलुक, नई दुनिया 
अशा अनेक वर्तमानपत्रात त्यांनी काम केलेले. 
कार्यकर्ता पत्रकार अशी त्यांची ओळख.
डोक्यावर मैला वाहून नेण्याची अमानवी प्रथा 
नष्ट करण्यासाठी 
त्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. 
असे काम करणाऱ्या 
सफाई कामगारांच्या वेदना, दुःख आणि समस्या 
त्यांनी ‘अदृश्य भारत’ या पुस्तकाद्वारे मांडल्या. 
शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करणे, 
त्यांना मदत करणे, 
त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे 
असे काम त्या अनेक वर्षांपासून करत आहेत. 
महिलांचा बुलंद आवाज बनून 
त्यांनी महिला विरोधी मनुवादी व्यवस्थेविरुद्ध 
सतत लढा दिलाय. 
उत्कृष्ट पत्रकारिता केल्याबद्दल त्यांना 
रामनाथ गोयंका पुरस्कारही मिळालेला आहे.
त्यांनाही सकाळी सकाळीच दिल्ली पोलिसांचे दर्शन झाले.  

***

असे अनेक पत्रकार आहेत. 
काही ‘न्यूज क्लिक’साठी कार्यक्रम करतात, 
लिहितात. 
काही त्यांच्याकडे नोकरी करतात. 
काहींना मानधन मिळते. 
काहींना पगार मिळतो. 
त्याचे हिशोब त्यांनी इन्कम टॅक्स विभागाला 
दिलेले असतात. 
पण दिल्ली पोलिसांनी 
एकाच वेळी 46 पत्रकारांच्या घरी 
‘सर्च ऑपरेशन’ सुरु केलं होतं. 
त्यातील काही पत्रकारांनी तर 
पाच-सहा वर्षांपूर्वीच 
न्यूज क्लिकमधली नोकरी सोडली होती. 
तरीही त्यांच्या घरी छापा पडला. 
माहिती गोळा केली गेली.      

पण प्रत्येकासाठी प्रश्न तेच होते. 
दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवून 
त्यांना विचारण्यात आलं : 
तुम्ही किसान आंदोलन ‘कव्हर’ केलं का? 
तुम्ही दिल्ली दंग्याच्या बातम्या दिल्या होत्या का? 
तुम्ही ‘कोविड’वर बातम्या दिल्या होत्या का? 
तुम्ही सीएए आंदोलनावर काही लिहिलं होतं का? 
तुम्ही शाहीन बाग आंदोलनावर लिहिलं होतं का?

आता मला सांगा एखादा राष्ट्रीय पत्रकार 
किंवा कुठलाही पत्रकार/संपादक 
आपल्या देशात घडलेल्या 
सीएए आंदोलन, कोविड, 
किसान आंदोलन, दिल्ली दंगे 
अशा महत्त्वाच्या घटनाकडे दुर्लक्ष करू शकेल का?       
आणि अशा घटनांवर लिहिलं म्हणून 
‘युएपीए’ अंतर्गत चौकशी म्हणजे खूपच झालं. 
एखादा पत्रकार, एखादा फ्री लान्सर 
त्याच्या मालकाने कुठून पैसे आणले 
याची चौकशी कशी करू शकेल? 
तेसुद्धा सरकारी नियमाप्रमाणे 
रीतसर चालू असलेल्या संस्थेच्या मालकाची. 

पोलिसांनी प्रत्येकाचे मोबाईल जप्त केले.
आजच्या युगात मोबाईल प्रत्येकासाठी 
अतिशय खासगी वस्तू झालेली आहे. 
अनेक खाजगी संभाषण, छायाचित्रे, चॅट, वगैरे बाबी 
फोनमध्ये ठेवलेल्या असतात. 
जेव्हा आपला मोबाईल फोन पोलिसाच्या हवाली करतो तेव्हा 
आपलं सगळं खासगी आयुष्यच 
आपण कुणाकडे तरी सोपवतो, 
असा भास होणे स्वाभाविक आहे. 
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जप्त झालेल्या फोनमध्ये 
किंवा लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद पुरावे नंतरही 
टाकण्यात आल्याचे प्रकारही झालेले आहेत. 
त्यामुळे काही निरपराध व्यक्तींनासुद्धा 
विनाकारण तुरुंगात डांबले गेले, 
असेही लोक म्हणतात.                
पत्रकारांसाठी ही अतिशय क्लेशदायी बाब आहे. 
विशेषतः पत्रकार होण्याचं स्वप्न पाहणारी युवा मंडळी 
नाउमेद होण्याचीच शक्यता जास्त.       
यापैकी बऱ्याच पत्रकारांना आठ तासांच्या चौकशीनंतर 
सोडण्यात आले. 
काही पत्रकारांना परत बोलावण्यात आले. 
म्हणजे त्रास आहेच!

यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. 
खरंच चीनकडून पैसे घेऊन 
राष्ट्रविरोधी काम झाले असेल तर 
गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. 
आपलंही रक्त खवळायला लागतं.
एक पत्रकार आपल्याकडे आलेली माहिती 
आपल्या वाचकांना, आपल्या प्रेक्षकांना देण्यासाठी 
धडपडत असतो. 
त्यांनी जर राष्ट्रविरोधी कृत्य केलेलं असलं 
तर ते सर्वांनाच दिसलं असतं.     
म्हणजे तसे असेल तर ते यांच्या 
कार्यक्रमात दिसायला पाहिजे. 
याचा अर्थ नेमकं प्रकरण काय आहे? – 
याची माहिती घेणं आवश्यक आहे.       

***

न्यूज क्लिकच्या संपूर्ण प्रकरणामध्ये 
प्रामुख्याने जी दोन नावं समोर येतात 
त्यातलं महत्त्वाचं नाव आहे प्रबीर पूरकायस्थ आणि 
दुसरं नाव आहे नेव्हिल रॉय सिंघम.    
प्रबीर पूरकायस्थ यांनी ‘न्यूज क्लिक’ चालवण्यासाठी 
नेव्हिल रॉय सिंघमकडून पैसे घेतले व 
चीनचा ‘प्रपोगंडा’ राबवला असा आरोप आहे.   

प्रबीर पूरकायस्थ विद्यार्थी जीवनापासूनच चळवळीचा संबंधित. 
1975 मध्ये आणीबाणीच्या काळात 
काँग्रेसच्या राज्यात त्यांनाही अटक झालेली. 
डाव्या विचारसरणीचा प्रभाव. 
2002 मध्ये एनरॉन कंपनीच्या आणि 
भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधात 
त्यांनी लिहिलेल्या 
‘Enron Blowout: Corporate Capitalism...’ 
या पुस्तकाने खूप खळबळ माजली होती.     
जागतिक स्तरावर होणारी अमेरिकेची दादागिरी,  
विनाकारण लादलेले इराक-इराण युद्ध.  
त्यामुळे अस्थिर झालेले पश्चिम आशियातील देश. 
2006 नंतर तर ‘अण्वस्त्र करार’ वगैरे बाबीमुळे 
जगभरात सर्वत्र वाढणारा अमेरिकेचा दबाव. 
असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते. 
असे अनेक विषय आपल्या लोकांसमोर यावे, 
त्या प्रश्नांची साधक बाधक चर्चा व्हावी  
म्हणून त्यांनी एका वेबसाईट/पोर्टलची निर्मिती केली. 
यातूनच ‘न्यूज क्लिक’ची स्थापना झाली.
प्रबीर आणि त्यांचे काही मित्र 
घराच्या बेसमेंटमध्ये एकत्र जमायचे 
आणि अशा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करायचे. 
लोकांचा आवाज होण्यासाठी निर्माण झालेली 
‘न्यूज क्लिक’ ही वेबसाईट  
पुढे कामगारांचा संघर्ष, महिलांवरील अन्याय, 
दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समुदायांवर होणारे अत्याचार 
यावर बोलू लागली. 
आणि हळूहळू ‘सोशल मिडीया’च्या काळात 
त्यांचे जवळपास चाळीस लाख सभासद झाले.         
सरकारने केलेल्या कामाचे कडक मूल्यमापन करणे, 
सरकारच्या चुका दाखवणे, 
सरकारवर टीका करणे अशा बाबी 
‘न्यूज क्लिक’द्वारे प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात स्पष्टपणे जाणवायच्या. 
त्यांचे सरकार विरोधी धोरण दिसायचं. 
एक बंडखोर, विद्रोही, विचार घेऊन तयार होणारे कार्यक्रम दिसायचे. 
पण ‘डायरेक्ट’ बेकायदेशीर कृत्य, देशविरोधी कृत्य 
त्यांच्याकडून होईल असे वाटत नव्हते. 
पण गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी 
त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या घरादारावर 
आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांच्या घरी 
पोलीस आपल्या सोबत मोठा फौजफाटा घेऊन जातील, 
[जणू काही मोठ्या अतिरेक्यांना पकडायला चालले] 
असे वाटत नव्हते. 

पण हे धाडसत्र सुरु झाले. आणि संपलेही. 
आता तपास चालू आहे.  

***

खरं सांगायचं झालं तर
‘न्यूज क्लिक’चा तपास  
आधी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता.
नंतर इन्कमटॅक्स विभागाने तपास केला होता. 
नंतर ‘इडी’कडून तपास सुरु झाला. 

कोर्टकचेऱ्या चालू होत्या. 
दोन-तीन वर्षे निघून गेली. 
पण प्रबीर पूरकायस्थ यांना 
अटक करण्याची परवानगी कोर्ट देत नव्हते. 
रिझर्व बँकेने दिलेला रिपोर्ट सांगत होता की, 
आलेल्या फंडची माहिती त्यांनी वेळेत कळवली होती. 
म्हणून कोर्टाकडून 
पूरकायस्थ यांना अटक करण्याची परवानगी 
मिळत नव्हती.  
तसं पाहिलं तर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 
‘न्यूज क्लिक’वर 2020 मध्येच गुन्हा नोंदवलेला असतो. 
त्याआधी इन्कम टॅक्स विभागानेही चौकशी केलेली असते. 
पुढे 2021 मध्ये इडी ‘न्यूज क्लिक’च्या कार्यालयांवर छापेमारी करते. 
प्रकरण कोर्टात जातं. 
पण मा. न्यायालय इडीला 
पूरकायस्थ यांना अटक करण्याची परवानगी देत नाही. 
‘इडी’चं म्हणणं असतं की, ‘न्यूज क्लिक’ला एफडीआय अंतर्गत 
2018-19 मध्ये 9.59 कोटी रुपये मिळालेले आहेत. 
त्याचा तपास करायचा आहे. 
[आता आरोप होतोय 
अवैध मार्गाने 38 कोटी रुपये मिळाल्याचा.]
पण ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’तर्फे कळवण्यात येते की,  
FEMA च्या नियमाप्रमाणे 
वेळेतच ‘शेअर्स’ वगैरे देण्यात आलेले आहेत. 
पुढे मा. न्यायालय इडीला ECIRची प्रत [आरोपपत्र] 
‘न्यूज क्लिक’ला देण्याचा आदेश देते. 

दरम्यान ‘न्यूज क्लिक’ने प्रसिद्ध केलेल्या 
एका वेगळ्या बातमीपत्रामुळे  
अदानी समूहातर्फे ‘न्यूज क्लिक’च्या विरोधात
100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही 
दाखल करण्यात येतो.               

आणि सुरु असतो ‘तारीख पे तारीख’चा खेळ!

***

पुढे अचानक ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये बातमी येते की, 
एक अमेरिकन उद्योगपती 
चीनचा अजेंडा राबवण्यासाठी 
जगभरातील अनेक संस्थांना मदत करतो. 
त्याने भारतातील ‘न्यूज क्लिक’ला सुद्धा 
मदत केलेली आहे. 
झालं. 
आपलं सरकार कामाला लागतं. 
भाजपचे खासदार निशिकांत दुबे 
याबद्दल पहिल्यांदा संसदेत बोलतात. 
काही पत्रकारांची नावं घेतात. 
त्यात ते ‘न्यूज क्लिक’शी संबंध नसलेले पत्रकार 
रोहिणी सिंग आणि स्वाती चतुर्वेदी यांचेही नाव घेतात.      
पुढे कारवाई सुरु होते. 

तेव्हा पहिल्यांदा नेव्हिल रॉय सिंघम 
या अमेरिकेतल्या उद्योगपतीचं नाव समोर येतं.  
त्याचे वडील मुळचे श्रीलंकेतील.    
सिंघम हा एक आयटी अभियंता. 
1993 मध्ये अमेरिकेत ‘Thoughtworks’ नावाची 
एक आयटी कंपनी काढतो. 
जगभर त्याचा व्यापार वाढवतो. 
पंधरा देशांमध्ये त्याचे काम सुरु होते. 
हजारो आयटी प्रोफेशनल्स त्याच्यासाठी काम करतात.
कंपनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते. 
2017 मध्ये कंपनी सात-आठ हजार कोटी रुपयांना 
म्हणजे 78.5 कोटी $ ला विकून 
मिळालेल्या पैशातून 
तो ‘चॅरिटी’चं काम सुरु करतो. 
असं म्हटलं जातं की, त्याच्यावर 
माओच्या विचारांचा प्रभाव आहे.  
तो चिनी सरकारसाठी काम करतो. 
जगभरात चीनला फायद्याचा होईल 
असा प्रचार करतो. 
आरोप अनेक आहेत. 
पण अमेरिकन सरकारने 
त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही, हे विशेष!
त्याचे आणि ‘न्यूज क्लिक’चे संपादक प्रबीर पूरकायस्थ 
यांचे जवळचे संबंध आहे आणि 
त्याच्याच सांगण्यावरून यांनी 
‘प्रो-चायनीज अजेंडा’ राबवला, असा आरोप आहे. 
त्यानंतरच पत्रकारांच्या घरावर छापे टाकण्यात आलेत.              

पण सकाळी सकाळी अभिसार शर्माच्या 
‘दिल्ली पोलीस माझ्या घरी आलेत आणि 
माझा लॅपटॉप आणि फोन घेऊन चाललेत.’ 
या ट्वीटने सगळ्यांना खडबडून जागं केलं.
असंच काहीसं भाषा सिंगचं ट्वीट होतं.
‘या फोनवरून शेवटचं ट्वीट. 
दिल्ली पोलीसने फोन जप्त केलाय.’
या दुसऱ्या ट्वीटने प्रकरणाचं गांभीर्य वाढवलं.    

बऱ्याच दिवसांपासून 
कोर्टात ‘न्यूज क्लिक’चं प्रकरण चालू आहे, 
याची कल्पना पत्रकारांना होती. 
तरी अभिसार, भाषा अशा पत्रकारांच्या घरापर्यंत 
पोलीस पोहोचले, हे जरा जास्तच झालं. 
‘सो कॉल्ड क्राइम बीट कव्हर’ करणाऱ्या पत्रकारांना 
सर्वात मोठा झटका बसला जेव्हा त्यांना समजलं 
की, काही दिवसांपूर्वीच युएपीए अंतर्गत 
नवीन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.      
आपण सतत सतर्क असतो, 
शोध पत्रकारिता करतो, 
एक्स्क्लूजिव बातम्या आणतो आणि 
आपल्याला युएपीएमध्ये गुन्हा नोंदवला 
याची साधी खबरही नव्हती, 
म्हणून त्यांना वाईटही वाटलं.

छापे टाकणाऱ्या बऱ्याच पोलिसांना 
नेमकं काय करायचं आहे याची कल्पना 
ऐनवेळी देण्यात आली होती. 
इतकं हे ‘ऑपरेशन’ गुप्तपणे करण्यात आलं होतं.


हेही वाचा : अलविदा एनडीटीव्ही! - सुनील तांबे


प्रश्न असा निर्माण होतो की,
एवढं मोठं कलम लावून अटक केलंय म्हटल्यावर 
नक्कीच फार मोठ्या गोष्टींचा 
भविष्यात खुलासा होऊ शकतो. 
कारण अशा कायद्याखाली अटक झाली तर 
‘तपास प्रक्रिया’ हीच फार मोठी शिक्षा होऊन बसते. 
कित्येक महिने, कित्येक वर्षे 
तुरुंगात राहावे लागते. 
प्रबीर पूरकायस्थ आणि त्यांचे एच आर प्रमुख 
सध्या तुरुंगात आहेत. 

प्रबीरजीचं व्यक्तिमत्त्व, त्यांनी आजपर्यंत केलेलं काम 
आणि त्यांचं वय लक्षात घेता 
त्यांच्याकडून राष्ट्रविरोधी कृत्य केलं जाईल, 
असं कुणालाच वाटत नाही. 

काही लोक म्हणतात, 
मुख्य धारेचा मिडिया म्हणजे टीव्हीवाले पत्रकार 
यांच्यावरून लोकांचा विश्वास उडालेला आहे. 
सगळ्यात बलाढ्य आयटी सेलसुद्धा 
आता अपेक्षित ‘रिझल्ट’ देऊ शकत नाही. 
‘सोशल मिडिया’ अतिशय प्रभावी झालेला आहे. 
हजारो ‘यु ट्यूब चॅनल्स’ 
मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. 
विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या बातम्या 
व विश्लेषण ऐकण्यासाठी 
लोक यु ट्यूबवरच जास्त भरवसा ठेवतात. 
आणि मोबाईलवर पाहण्याची सवय झाल्यामुळे 
ते सहज आणि सोपंही असतं.   

टीव्हीवाल्यांनी बेकार केलेले 
करन थापर, रविशकुमार, पुण्यप्रसून वाजपयी, 
अजित अंजुम, अभिसार, दीपक शर्मा, ग्रीजेश वशिष्ट, 
असे असंख्य पत्रकार आपापले ‘यु ट्यूब चॅनल्स’ सुरु करत आहेत. 
ते सुरु करण्यासाठी 
जास्त पैशांची पण गरज पडत नाही, हे विशेष. 
सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम म्हणूनच की काय 
आपल्या देशाचे सर्वात लोकप्रिय नेते मा. नरेंद्रभाईंनासुद्धा 
स्वतःचे ‘यु ट्यूब चॅनल’ सुरु करून 
लोकांना विनंती करावी लागतेय की, 
‘मेरा चॅनल सबस्क्राइब करो. बेल आयकॉन दबावो.’                   

***

असंही बोललं जातंय की, 
सोशल मिडियावर नियंत्रण करण्यासाठी 
विशेष प्रयत्न केले जात आहे. 
त्या पत्रकारांना दबावाखाली ठेवण्यासाठी 
काही पावलं उचलली जात आहेत, 
हे जर खरं असलं तर मात्र    
डीबी लाइव, न्यूज ल़ॉन्ड्री, वायर, 
सत्य हिंदी, नॉकिंग न्यूज, फोर पीएम, 
वगैरे चॅनल्स 
आणि  
आनंद वर्धन सिंग, अजित अंजुम, अशोक वानखेडे, 
करन थापर, रविशकुमार, पुण्यप्रसून वाजपयी, 
मुकेश कुमार, दीपक शर्मा, साक्षी जोशी, 
अलोक जोशी, निखील वागळे, 
मयूर जानी, संजय शर्मा, प्रज्ञा मिश्रा,   
अशा अनेक पत्रकारांची काळजी वाटते. 

कारण युएपीए अंतर्गत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात 
‘न्यूज क्लिक’चे संपादक आहेत, 
एचआर प्रमुख आहेत,
तपास पण जोरात चालू आहे. 
पोलीस कोठडी आहे. 
न्यायालयीन कोठडी आहे. 
आणि लगेच बातमी येते 
आता सीबीआयने ‘न्यूज क्लिक’वर 
छापे मारणं सुरु केलंय.

इन्कमटॅक्स, इओडब्ल्यू, इडी, स्पेशल ब्रांच आता सीबीआय!

आता फक्त उरले एनआयए, डीआरआय आणि नार्कोटीक्स!     

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com  
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Tags: prabir purkayastha enforcement directorate journalism supreme court dilip lathi news click paranjay guhathakurta ravish kumar narendra modi youtube channel Load More Tags

Comments:

नम्रता

माहितीपुर्ण लेख. तुमची लेखन शैली मला आवडते .

Sonia

All have their own views, nice presentation.. thanks..

Niraj Mashru

अति संवेदनशील, माहिती पुर्ण लेख. धन्यवाद.

Nitin Kottapalle

अत्यंत माहितीपूर्ण लेख. मुळामध्ये लेखात म्हटल्याप्रमाणे बहुतांश लोक हे व्हाट्सअप वर पसरवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारे आपले मत बनवत असतात. चीनचा अजेंडा राबवला म्हणजे नेमके काय केले असा साधा प्रश्नही विचारावासा त्यांना वाटत नाही. खरे म्हणजे या लोकांवर छापे टाकण्यापूर्वी किंवा अटक करण्यापूर्वी हा अजेंडा राबवला म्हणजे काय केले हे आधी स्पष्ट व्हायला हवे होते. चीनच्या संस्थांकडून आर्थिक मदत घेणे हा गुन्हा असल्याचे ऐकिवात नाही. एकूणच काय की चीन, पाकिस्तान, राष्ट्रद्रोह, राष्ट्रभक्ती हे परवलीचे शब्द वापरून लोकांचे ध्रुवीकरण करण्याच्या प्रक्रियेला उत्तरोत्तर अधिक गती येत जाईल. हा सर्व त्या प्रक्रियेचाच एक भाग.

कविता

हा लेख कवितेसारखा ओळी तोडून का लिहिलाय? लेख म्हणून पूर्ण होत नव्हता का?

Add Comment