आपल्या देशात आणि आपल्या मनात
नदीसाठी फार महत्त्वाचं स्थान आहे.
कोणत्याही नदीच्या किनाऱ्यावर आपण
वाड्या, वस्त्या, गावं, शहरं तर पाहतोच.
नदीच्या काठाने फिरत असताना दिसणारी हिरवाई, शेती, जैवविविधता
आपल्याला मंत्रमुग्ध करतात. जिवंत करतात.
पण या सोबतच दिसणारे
मठ, मंदिर, घाट व इतर धार्मिक ठिकाणं
आध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या पावित्र्य निर्माण करतात.
आपल्या पुराणांमध्ये, धर्मग्रंथांमध्येसुद्धा
नद्यांचे ऋषीतुल्य व दैवी शक्ती असलेली वर्णने आहेत.
आपल्या आजूबाजूची पवित्र ठिकाणं बघा.
देहू, आळंदी असेल पंढरपूरचा विठोबा असेल,
किंवा गोदावरी किंवा इतर नद्यांच्या काठावरील अनेक मंदिरं असतील –
जेव्हा अशा धार्मिक स्थळांना आपण भेट देतो तर
आधी नाक बंद करून नदीमध्ये डुबकी मारतो.
नदीत आंघोळ झाली तर पाप धुतले जाते, असा समज.
मग आपोआप पवित्र वाटायला लागतं.
आध्यात्मिक अनुभूती येते.
आणि खऱ्या अर्थाने पवित्र होऊन
आपण देवाचं दर्शन घेतो.
आपल्या देशाचा विचार केला तर
गंगा नदीवरील काशीविश्वनाथ मंदिर,
हुगळी नदीवरील कालीमातेचं पवित्र मंदिर,
आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेले तुंगा नदीवरील शृंगेरी शारदा पीठ,
कावेरी नदीवरील श्रीरंगम,
नर्मदा नदीवर वसलेले ओंकारेश्वर मंदिर,
अशी कितीतरी धार्मिक आध्यात्मिक पवित्र तीर्थक्षेत्रं आहेत.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असतं
की अशा धार्मिक स्थळांना भेट द्यायची, पुण्य कमवायचं.
आयुष्याचं सोनं करायचं.
त्यापैकी एक आहेत, आमचे काळे गुरुजी.
रिटायरमेंटनंतर त्यांनी सहकुटुंब बऱ्याच तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या.
बरेच नगरसेवक, आमदार आपल्या मतदारासाठी असे देवदर्शन घडवत असतात.
गुरुजींनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला.
आता त्यांचं स्वप्न आहे, काशीला जायचं.
‘मा गंगा’चं दर्शन घ्यायचं.
‘गंगा-जमुना-सरस्वती’ असं ते नेहमी बोलत असतात.
नद्यांचा संगम असला
आणि अशा ठिकाणी आपण भेट दिली तर पुण्य शंभरपट वाढते,
अशी त्यांची श्रद्धा.
गुरुजी संक्रांतीच्या दिवशी भेटले.
म्हणायला लागले :
‘मोदीजींनी फार मोठं काम केलं.
एकाचवेळी गंगा, जमुना
अशा कितीतरी नद्यांमधून जाणारे जहाज सुरु केले.’
‘हो. एक्कावन दिवसांचा प्रवास आहे.
सत्तावीस नद्या-उपनद्यांमधून ते जहाज जाईल.’
गुरुजींचे डोळे चमकले. ‘इतक्या नद्या? त्यात कोणत्या कोणत्या नद्या आहेत, नाव सांग ना, जरा.’
आता मी मोबाईलवर जाऊन गंगा विलासची वेबसाईट उघडतो. कारण गुरुजीचे प्रश्न आता सुरु झालेत.
‘हो. नद्या-उपनद्या मिळून सत्तावीस.
गंगा. मेघना. ब्रम्हपुत्रा. भागीरती. हुगळी. बिद्यावती.
मालता. सुंदरबन. मेघना. पद्मा. जमुना. आणि परत ब्रम्हपुत्रा.’
‘काय म्हणता? फार मोठं काम झालंय.
दोन नद्यांचं संगम पाहण्यासाठी जीव तुटतो. इथं तर सत्तावीस नद्या.
हजारो वर्षांचा संघर्ष कामाला आला.
आता एकदम पावन झाल्यासारखं वाटतं.
आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटतं.
आपल्याला जायचंय ते बघायला.’
‘अहो गुरुजी, 3200 किलोमीटरचा प्रवास आहे, हा.
एक्कावन दिवस लागणार.
म्हणजे आता थंडीत गेलो की उन्हाळ्यात परत.
बनारसला देवाचं दर्शन घेऊन गंगेची आरती करून
प्रवासाला सुरुवात होते.
मग रस्त्यात अनेक ठिकाणं आहेत.
हेरीटेज साईट, नॅशनल पार्क, नद्यांवरील घाट, सारनाथचं बौद्ध मंदिर,
करत करत मार्चमध्ये दिब्रुगढला परत.
उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश फिरून मग आसामला पोहोचतील.
म्हणजे आधी भारतातली तीन-चार राज्ये. नंतर काही दिवस बांग्लादेशमध्ये.
आणि परत भारतात आसाममध्ये येतील.’
‘हो मान्य आहे. पण सगळा प्रवास नदीतूनच होणार आहे ना?’
‘तेव्हढं मात्र नक्की आहे. आणि तीच या प्रवासाची खासियत आहे.’
‘अरे, मग तर आपल्याला जायचंच आहे. गंगाआरती आहे. देवदर्शन आहे.
इतक्या पवित्र नद्यांचा मिलाप आहे.
आपण घरातल्या सगळ्यांना घेऊन जाणार.
बघ बरं मोबाईलमध्ये, काय ‘प्रोसिजर’ आहे.’
‘अहो गुरुजी, ही काही आपल्या नगरसेवक मंडळींनी सुरु केलेली मोफत यात्रा नाही.
हा खर्चिक कार्यक्रम आहे.’
‘अरे पण, हा तर सरकारचा उपक्रम आहे ना?
मोदी साहेबांनी सुरु केला म्हणजे काहीतरी असेल ना?
आणि मागे कुणीतरी सांगितलं होतं,
भारतात सर्वत्र जलयात्रा सुरु होणार आहे.
नद्यांना एकमेकांना जोडले जाणार आहे.
त्यामुळे खर्च वाचेल.
यात्रा स्वस्त होईल.’
‘गुरुजी, त्या वेगळ्या गोष्टी आहेत.
हा पूर्णपणे वेगळा प्रकल्प आहे.’
‘तू बघ, चार लोकांचे किती पैसे होतात? तिकीट किती?
एक दोन महिन्याची पेन्शन गेली तरी चालेल.
पण मला ही संधी सोडायची नाही.’
एक तर तिकीटाविषयी वेगवेगळी माहिती येत होती.
ते दर काही लाखो रुपयांमध्ये होते.
शेवटी मला हा प्रकल्प राबवणाऱ्या ‘अंतरा’ या कंपनीच्या
मालकाची मुलाखत ऐकायला मिळाली.
त्यांनी पन्नास हजार रुपये हा एका दिवसाचा तिकीट दर सांगितला.
म्हणजे संपूर्ण प्रवासाचे एका व्यक्तीचे तिकीट होते
पंचवीस लाख पन्नास हजार रुपये.
आवंढा गिळत मनातल्या मनात गुणाकार करून
मी तिकीटाची किंमत काढली.
असं बोललं जातं की, भारत सरकार आणि ‘अंतरा’ कंपनीचा
हा संयुक्त उपक्रम आहे.
आणि तिकिटाचे दर ठरवण्याचा अधिकार फक्त अंतरा कंपनीला आहे.
एवढं असूनही पुढील वर्षापर्यंतचं बुकिंग ‘फुल’ झालेलं आहे.
मला संक्रांतीच्या दिवशी गुरुजीला नाराज करायचे नव्हते.
त्यांना तिकिटाचे दर सांगायचे नव्हते.
‘गुरुजी पुढील वर्षापर्यंत बुकिंग फुल झालं आहे. तिकीट उपलब्ध नाही.’
‘वाटलंच मला. मास्टरस्ट्रोक आहे हा!
एवढा मोठा देवदर्शनाचा कार्यक्रम.
एवढा मोठा आध्यात्मिक अनुभव.
जो कोणी घेणार नाही त्याच्यासारखा कर्मदरिद्री कुणी नाही.
मला तिकीट किती आहे ते सांग.
चौघांचं तिकीट बुक करू.
एक दोन महिन्यांची पेन्शन गेली तरी चालेल.’
आता मात्र गुरुजींना जमिनीवर आणणे गरजेचे होते.
कारण बिचारे प्रत्येक वेळी महिन्या दोन महिन्यांची पेन्शन सांगून
त्यांची मानसिक व आर्थिक तयारी दाखवत होते
आणि
माझ्यावर दबावही निर्माण करत होते.
‘गुरुजी, एका व्यक्तीचे एका दिवसाचे तिकीट आहे पन्नास हजार रुपये.’
‘काय? काही पण बोलू नको. पन्नास हजार पूर्ण प्रवासाचे. महाग आहे.’
‘गुरुजी, मी काय बोललो.
एका दिवसाचे एका माणसाचे तिकीट पन्नास रुपये.’
‘बापरे! काही पण बोलू नको. चेक कर एकदा. पूर्ण प्रवासाचे असेल.’
‘ऐका गुरुजी, मी मोबाईलवर पाहतोय सगळं.
त्यांच्याच वेबसाईटवर.
खोटं कसं असेल?
एका माणसाचे एक्कावन दिवसाचे होतात
पंचवीस लाख पन्नास हजार रुपये.
तुमच्या चौघांचे होतील एक कोटी दोन लाख रुपये.
एक-दोन महिन्याच्या पेन्शनमध्ये भागणार नाही.
ही ट्रीप करायची असेल तर
घर दार, सोनं नाणं, सगळं काही विकावं लागेल.
आणि सोबत उरलेलं बँक बॅलंसपण जाईल!’
‘अरे बाप रे!
आपला वन बीएचके जरी विकला तरी
मोठ्या मुश्किलीने मी एकटाच जाऊन येईल.
आणि सगळं घर रस्त्यावर.
नाही हा आध्यात्मिक धार्मिक प्रवास नाही.
हा तर शंभर टक्के टुरिस्ट, चैन असलेला असा विलासी प्रवास आहे.’
गुरुजी बराच वेळ शांत.
त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर,
त्यांच्या चेहऱ्यावर हजारो वर्षांच्या संघर्षाची थकान!
विनाकारणच खूप काही गमावल्याचं दुःख.
सगळं काही ओंजळीतून निसटलं, असे भाव.
बराच वेळ शांतता.
तरी सुद्धा, मी बोललो.
‘तेच तर म्हणतो मी.
जगातील सर्वात लांब अंतर असलेलं ‘नदी पर्यटन’ आहे हे.
मोदीसाहेबांनी संपूर्ण जगाने दखल घ्यावी अशी सहल निर्माण केली.
जगभरातील लोक येतील.
आध्यात्मिक प्रवासही असेल आणि विलासी पर्यटनही असेल.
आध्यात्मिक सुख आणि ऐहिक सुख.
त्यागही असेल आणि भोग-उपभोगही असेल.’
गुरुजींना मी सांगितलेलं पटलं, असं जाणवत नव्हतं.
‘तू बोललेलं कळतंय मला. पण वळत नाही.
तिकिटाचे रेट ऐकून बारीक चक्कर आल्यासारखं वाटलं होतं.
पण एक सांग, एवढे पैसे घेऊन हे लोक करतात काय?
पन्नास हजार रुपये एका दिवसाचे!
देणारे देतात कशासाठी?’
आता कुठं गुरुजी जमिनीवर आल्यासारखं वाटायला लागलं.
मुख्य विषयावर आल्यासारखं वाटलं.
मी ‘अंतरा’ ची वेबसाईट बघत होतो.
https://www.antaracruises.com/ganges-voyager-2/
त्यावर दाखवलेली अनेक छायाचित्रे गुरुजी तोंडात बोट घालून पाहत होते.
त्या जहाजाचे छायाचित्र त्यांना एखाद्या महालासारखे वाटले.
‘Eat Drink Love’ हे त्यांचं ब्रीदवाक्य बघून ते थोडे चकाकले.
प्रत्येक पर्यटकासाठी एकेक सेवा करणारी व्यक्ती देण्यात आलेली आहे.
प्रत्येकाच्या पसंतीप्रमाणे ‘Choicest of Wines’ बघितल्यावर तर
गुरुजी एकदम कसनुसे झाले.
मसाज वगैरे करणाऱ्या व्यक्तीचा फोटो बघून आणखी हादरले.
Restaurant मध्ये दाखवण्यात आलेली डिश बघून परत भांबावले.
भारतीय मनाचा शोध घेऊ पाहणारे गुरुजी
जेव्हा त्या जहाजावरील अठरा वेगवेगळ्या खोल्यांचे नाव वाचायला लागले
तर त्यांना थोडंसं अवघडल्यासारखं वाटायला लागलं.
Viceroy Suite, Colonial Suite, Heritage Suite, Signature Suite
या नावांमध्ये त्यांना ‘मा गंगा’, ‘गंगा आरती’,
मंदिर, धार्मिक, आध्यात्मिक अनुभूती मिळणे शक्य नव्हते.
Cultural Programme च्या नावाखालील भारतीय मुलींचे नृत्य त्यांना विनाकारणच अस्वस्थ करून गेले.
‘अरे, मला वाटलं की तीर्थयात्रा सुरु केली गेली.
इथं तर जगभरातील लोक ऐश करायला आलेत असं दिसतंय.
एका आध्यात्मिक नगरीचं रुपांतर एका शुद्ध पर्यटनस्थळात होतंय, असं वाटतं.’
गुरुजी बोलून गेले.
तेवढ्यात त्यांचा ‘सतत देश विदेश फिरणारा मित्र’ आला.
तो बनारसला अनेक वेळा गेलेला आहे.
विषय बनारसचा होता.
विषय ‘गंगा मा’चा होता.
विषय तीर्थक्षेत्रांचा होता.
विषय पर्यटनाचा होता.
तो ही बोलायला लागला.
‘मी आतापर्यंत दहा वेळेस बनारसला गेलो.
ते एक छोट्या छोट्या गल्ल्यांचं शहर होतं.
छोट्या मोठ्या अनेक मंदिराचं शहर होतं.
तीच त्याची खासियत होती.
हजारो नावाडी तिथं असायचे.
मागच्या दहा वर्षांत चित्र बदललं.
ऑटोमॅटिक बोट्स आल्यात.
त्या नावाड्यांचा धंदा बसला.
ते परेशान आहेत.
आता ‘गंगा विलास क्रुज’ सुरु झालं.
सरकारबरोबर करार आहे.
पर्यावरण बिघडेल.
झाडे कापा, नद्या कापा, बंधारे बनवा, पाण्याची पातळी मेंटेन करा.
इतकं सोपं नाही.
जगभरातील विलासी श्रीमंत लोकांचे चोचले पुरवण्यासाठी ठीक आहे.
आपल्या देशाचं नाव मोठं होईल.
धंदा वाढेल. बट अॅट व्हाट कॉस्ट?’
बराच वेळ तो बोलत होता.
या प्रकल्पावर टीका करत होता.
पाण्याची पातळी कमी झाली तर नवीन अडचणी निर्माण होतील.
पर्यावरण, बेसुमार विकास, जोशीमठ, बऱ्याच गोष्टी
डोळ्यासमोर येऊ लागल्या.
गुरुजींप्रमाणे मलाही बारीक चक्कर येते की काय असं वाटायला लागलं.
आज अचानक बातमी आली.
तिसऱ्याच दिवशी ‘गंगा विलास क्रुझ’ बिहारमध्ये अडकले.
पाण्याची पातळी कमी होती, म्हणे.
त्यातून सुखरूप मार्ग काढला.
डॅमेज कंट्रोल व्यवस्थित झालं.
गंगा विलासचा प्रवास सुरु आहे!
- दिलीप लाठी, पुणे
diliplathi@hotmail.com
Tags: गंगा विलास क्रुझ जोशीमठ नदी पर्यटन ganga vilas cruise Load More Tags
Add Comment