महिला पहिलवानांची आखाड्याबाहेरची लढाई

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका, ‘जाट’ मते, महिलांची मते, पब्लिक परसेप्शन असे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आता बरेचसे निर्णय घेतले जात आहेत..

मे 2023 मध्ये जंतर मंतर येथील निदर्शनांदरम्यान साक्षी मलिक

“हर महिला सम्मान से जिंदगी जीना चाहती है. 
इसलिये प्रधानमंत्री सर, 
मै अपना मेजर ध्यानचंद खेल रत्न और अर्जुन अवार्ड 
आपको वापस करना चाहती हूँ 
ताकि सम्मान से जीने कि राह मे 
ये पुरस्कार हमारे उपर बोझ न बन सके.” 
विनेश पोघाट या महिला पहिलवानाने 
पंतप्रधानांना लिहिलेल्या आपल्या पत्रामधील 
हे वाक्य आपल्या देशातील कुस्ती खेळणाऱ्या 
महिला खेळाडूंचं दुःख दाखवतं, 
समस्या दाखवतं, हतबलता दाखवतं. 

***

त्यापूर्वी ‘आपण युद्ध हरलो’ याची जाणीव करून 
आपले कुस्ती खेळण्याचे ‘शूज’ पत्रकारांसमोर 
टेबलवर ठेवून 
आपले अश्रू थांबवायचा प्रयत्न करत 
दाटून येणारे हुंदके आवरत साक्षी मलिक 
‘आयुष्यात कधीही कुस्ती खेळणार नाही’ 
अशी घोषणा करते. 

***

या महिलांना पाठिंबा देण्यासाठी 
बजरंग पुनिया नावाचा खेळाडू 
आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार 
पंतप्रधानांच्या घराजवळच्या रस्त्यावर ठेवतो 
आणि चुपचाप निघून जातो.  

***

वीरेंदर सिंग नावाचा दिव्यांग पहिलवानसुद्धा 
या महिलांना पाठिंबा देतो. 
त्यांना न्याय मिळेपर्यंत आपल्याला मिळालेल्या 
‘पद्मश्री’ पुरस्काराचा त्याग करतो. 
 
घटना नाट्यमयरित्या घडत असतात. 
ही पहिलवान मंडळी कुस्तीच्या आखाड्याबाहेरही 
कुस्ती गाजवत असतात. 
आपले दुःख, आपल्या वेदना, आपल्या समस्या, 
समोर आणत असतात.  
काय आहे कुस्तीची दंगल गाजवणाऱ्या 
महिलांच्या समस्या?

***

‘कुस्ती’ला आपण सगळेच 
एक मर्दानी खेळ समजतो. 
महिलांनी पहेलवानी करू नये, 
असंच बोललं जातं. 
पण खेड्यापाड्यातील काही गरीब कुटुंबातील मुली 
हा गैरसमज दूर करतात. 
त्या फक्त कुस्ती खेळून पहिलवानच होत नाहीत तर 
संपूर्ण जगभरात आपलं नाव कमावतात. 
असं असलं तरी  
एक महिला जेव्हा कुस्ती खेळू इच्छिते 
तेव्हा तिला फक्त मैदानावरच लढावं लागतं, 
असं नाही.
त्या आधी तिला सर्वत्र लढा द्यावा लागतो. 
आपल्या कुटुंबात, समाजात, बिरादरीमध्ये, गावात 
सर्वत्र ती लढत असते. 
बुरसटलेल्या सामाजिक मूल्यांशी ती लढत असते.  
पुरुषी व्यवस्थेशी लढा देत देत ती या खेळात शिरते.     
हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब येथे आजही 
अशा महिला पहिलवान तयार होत आहेत. 
जेव्हा तिकडे कुस्तीचे आखाडे रंगतात, 
‘दंगल’ घेतली जाते तेव्हा  
जो कुस्ती जिंकतो त्या पहिलवानाला बक्षीस म्हणून   
आजही पाच किलो तूप, किंवा दहा किलो तूप, 
किंवा गाय किंवा म्हैस दिली जाते. 
म्हणजे या खेळाकडे पाहण्याचा 
त्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो. 
पहिलवानांना ज्याची गरज असते 
त्या वस्तू बक्षीस म्हणून देतात.  
ते याकडे पैशाचा मोबदला म्हणून पाहत नाहीत. 
जेव्हा आयुष्याची अनेक वर्षे सराव केला जातो 
तेव्हा एखादा पहिलवान तयार होतो. 
यात संपूर्ण कुटुंब भरडले जात असते.               
आता कुस्तीसारख्या 
या पुरुषी वर्चस्व असलेल्या खेळामध्ये 
अनेक महिला खेळाडू 
आपले प्राविण्य दाखवत आहेत. 
आपल्या अतिशय उच्च दर्जाच्या खेळामुळे 
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात 
नाव कमावत आहेत. 
साक्षी मलिक 2016 मध्ये 
ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणारी 
आपल्या देशाची पहिली महिला पहिलवान बनते.  
यापूर्वीसुद्धा तिने 
ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये तसेच 
डोहा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 
विजय मिळवलेला असतो. 
साक्षी मलिकला तर मोदी सरकारतर्फे 
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या अभियानाची 
‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ केलं जातं. 
अनेक महिला पहिलवानांना प्रोत्साहन देणारी 
ही घटना असते. 
पुढे विनेश पोघाटला 
कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स 
या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांत 
सुवर्ण पदक मिळालेले असते.  
त्यांनी अनेक जागतिक स्पर्धा गाजवलेल्या असतात. 
अनेक पदके मिळवलेली असतात. 
आपल्या देशाची ‘आन बान शान’ झालेल्या 
अशा असंख्य महिला खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होऊ लागतं. 
म्हणूनच अनेक तरुण मुलीसुद्धा 
या खेळाकडे आकर्षिल्या जाऊ लागतात.

कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून 
खा. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याकडे 
त्या महिला खेळाडूंचे पालकत्व येणे स्वाभाविक असते.
पण तेच व्यक्तिमत्त्व संशयाच्या भोवऱ्यात अडकते. 
कोण आहेत हे अध्यक्ष महोदय? 
ज्यांच्या विरोधात आता 
सर्वच महिला पहिलवान उतरल्या आहेत.  

***

खा. ब्रिजभूषण शरण सिंग! 

त्याने राम मंदिर आंदोलनात 
महत्त्वाची भूमिका निभावली. 
अडवाणीजी जेव्हा रथ यात्रा करत होते 
तेव्हा त्याने ड्रायव्हर म्हणून तो रथही चालवला. 
जेव्हा बाबरी जमीनदोस्त करण्यात आली 
तेव्हा मुलायम सिंग सरकारकडून सुरुवातीला  
अटक करण्यात आलेल्या कार सेवकांमध्ये तो होता. 
सीबीआयकडूनही त्याला अटक झाली होती.     
मग त्याने समाजसेवा सुरु केली. 
तो राजकारणात आला. 
हिंदू चळवळीचा एक प्रमुख चेहरा झाला. 
निवडणुकीत उभा राहिला. 
एकदा नाही, दोनदा नाही तर सहा वेळेस 
लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आला. 
मग त्याने शेकडो शाळा, महाविद्यालये, 
क्रीडा अकादमी, हॉटेल्स, हॉस्पिटल्सचे 
आपले साम्राज्य उभे केले. 
हजारो शिक्षक, कर्मचारी आणि लाखो विद्यार्थ्यांची 
फौज तयार केली. 
त्याच्या मालकीची हेलिकॉप्टर्स, प्रायव्हेट जेट विमान 
सर्वत्र दिसू लागली. 
त्याचं एक मोठं साम्राज्य निर्माण झालं. 
उत्तर प्रदेशमध्ये किमान  
पाच-सहा खासदार त्याच्या शब्दावर निवडून येतात, 
असं बोललं जाऊ लागलं. 
लोकांचं प्रेम मिळत होतं. 
त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक 
भीतीयुक्त आदर निर्माण होऊ लागला.   
तो एक अनभिषिक्त सम्राट झाला होता. 
त्याने आपले लक्ष कुस्ती या खेळाकडेही वळवले. 
तो भारतीय कुस्ती महासंघाचा [WFI] अध्यक्ष झाला. 
मोदी-शहा यांच्या भाजपमध्ये 
त्याने आपले जबरदस्त असे अढळ स्थान निर्माण केले. 
त्याचे नाव आहे, ब्रिजभूषण शरण सिंग. 

***

साक्षी, विनेश अशा अनेक मातब्बर खेळाडूंकडून 
प्रेरणा घेऊन कुस्तीच्या आखाड्यात 
अनेक नवनवीन मुलींचं आगमन होत असतं. 
आणि अचानक एक दिवस महिला खेळाडू तक्रार करतात. 
पुरुषी वखवखल्या नजरांशी त्या मुलींचा सामना होऊ लागतो. 
जवळपास सहा-सात महिला खेळाडू लेखी तक्रार करतात. 
लैंगिक अत्याचाराच्या जवळपास 15 घटना सांगण्यात येतात. 
चुकीच्या पद्धतीने छातीला, पोटाला स्पर्श करणे 
बिनधास्तपणे सुरु असते. 
तुम्हाला जर काही प्रोफेशनल मदत हवी असेल तर 
लैंगिकदृष्ट्या समाधानी करा, 
अशी मागणी होऊ लागते. 
अनेक वर्षे हे चालते. 
वेगवेगळ्या ठिकाणी हे घडत असते. 
ऑफिसमध्ये. रेस्टॉरंटमध्ये. 
देशात. परदेशात. 
शेवटी कंटाळून विनेश पोघाट या गोष्टी 
पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई आणि क्रीडा मंत्री श्री. अनुराग ठाकूर 
यांना सांगतात. 
आपल्या वेदना, आपल्या अत्याचाराची कहाणी सांगतात. 
पण कारवाई होत नाही. 
उलट अध्यक्ष महोदयांनाच 
त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली, 
याची माहिती मिळते. 
मग अधिकच त्रास सुरु होतो. 
मानसिक आणि शारीरिक. 
‘इस को देखो. 
इस के कपडे देखो. 
इस की बॉडी देखो. 
कहा से ये औरत दिखती है?’ 
अशा कॉमेंटस् ऐकाव्या लागतात.  
महिला पहिलवान त्रस्त होतात. 
हतबल होतात. 
अन्यायाविरुद्ध संतापाची लाट निर्माण होते. 
‘आपण समाजाशी, 
इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेशी बंड पुकारून 
कुस्तीच्या मैदानात उतरलो, 
मुलगी मेली तरी चालेल, 
पण ‘इज्जत’ महत्त्वाची असं मानणाऱ्या 
रुढीप्रिय समाजातून आपण आलो, 
हे जर असंच चालू राहिलं तर 
इतर मुली या खेळामध्ये येणे अशक्य आहे’ 
हे त्यांच्या लक्षात येते.  
आणि सुरु होतो संघर्ष! 
एका अतिबलाढ्य व्यक्तीच्या विरोधात. 
एका प्रवृत्तीच्या विरोधात. 
पुरुषी मानसिकतेच्या विरोधात.   
सर्वच महिला खेळाडू 
दिल्लीतील जंतरमंतरवर जमा होतात. 
लोकशाही पद्धतीने उपोषण सुरु करतात. 
अतिशय हतबल होऊन 
रस्त्यावर पडलेल्या त्या महिलांना 
सरकार मदत करत नाही. 
उलट ते आंदोलन अतिशय क्रूरपणे चिरडण्यात येते. 
शेवटी कोर्टाने आदेश दिल्यावर 
पोलिसांकडून तक्रार एफआयआर नोंदवण्यात येते. 
तो एफआयआर आपण वाचला तर 
काळजाला चटका बसल्यासारखं होतं. 
आपल्या देशाचं नाव इतकं मोठं करणाऱ्या या खेळाडूंना 
काय काय सहन करावं लागतंय?  
विशेष म्हणजे अत्याचार झालेल्या पाहिलवानांमध्ये 
एक अल्पवयीन मुलगीही असते. 
त्यामुळे पोस्को (POSCO) अंतर्गत गुन्हा लागू झालेला असतो. 
अशा गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनही मिळत नाही. 
आरोपीला अटक करणे आवश्यक असते.  
पण तसे होत नाही. 
शेवटी सूत्र फिरतात आणि 
त्या मुलीच्या कुटुंबियांकडून 
तक्रार परत घेण्यात येते. 

विनेश पोघाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक

सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न निर्माण होत असतो
की इतक्या तक्रारी आल्यानंतरही  
कारवाई का केली जात नाही?  
खरंच मोदी-शहा सरकार इतकं हतबल आहे का?  
ब्रिज भूषण शरण सिंग हा इतका ताकदवान आहे का?     
दरम्यान अध्यक्ष महोदय माध्यमांसमोर येत असतात. 
कधी ते म्हणतात, “हां मै बाहुबली हु!” 
कधी कधी तर आपल्याकडून झालेल्या गुन्ह्याची 
जाहीर कबुली पण देतात. 
न्यायालयामध्ये पुरावा न मिळाल्यामुळे 
खुनाचा गुन्हा सिद्ध होत नाही आणि 
त्यांची निर्दोष मुक्तता होते, तो किस्सा सांगतात.     
“हा मेरे हातसे एक हत्या हुई है! मैने गोली मारी.”
महिलांवर झालेल्या अन्यायाबद्दल विचारल्यावर म्हणतात, 
“मै क्या रोज शिलाजित कि रोटी खाता हु क्या?”
अशी अनेक निर्लज्ज आणि असंवेदनशील वक्तव्य येऊ लागतात. 
हळूहळू त्यांचा भूतकाळ त्यांना घेरू लागतो. 
कपाटातून अनेक सांगाडे बाहेर पडू लागतात. 
त्यांच्या 23 वर्षांच्या तरुण मुलाने 
स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेली असते.  
आणि कारण सांगितलेले असते, वडिलांचा स्वार्थीपणा. 
दाउदच्या गुंडांना मदत केल्यामुळे 
त्यांना पूर्वी टाडा (TADA) अंतर्गत अटक करण्यात आलेली असते. 
त्या दाउदच्या गुंडांनी 
मुंबईत काही लोकांची हत्या केलेली असते. 
गँगवॉर केलेले असते.   
त्यावेळी ब्रिजभूषणला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी 
तत्कालीन पंतप्रधान अटलजीसुद्धा मदत करत असतात.   
चोरी, चपाटी, दरोडे, खून, अपहरण 
अशा प्रकारच्या आरोपामुळे 
त्यांच्यावर जवळपास 38 गुन्हे 
यापूर्वी नोंदवले गेलेले असतात.    
आता बहुतांशी गुन्ह्यांमध्ये ते मुक्त झालेले असावेत. 
पण आपल्या आयुष्यात घडलेल्या वादग्रस्त घटना 
आणि त्यांचे वादग्रस्त विचार मात्र ते 
टीव्हीवर येऊन बिनधास्त सांगत असतात. 
तरुणपणी त्यांनी एका जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाला 
म्हणजे एसपी साहेबांच्याच कानपटीला पिस्तुल लावून 
शिव्या दिल्या होत्या. 
एवढंच नाही तर एमआयएमचे नेते ओवैसी यांच्याद्दल 
त्यांनी केलेलं वक्तव्य आणि 
ओवायसीचा थेट प्रभू रामचंद्राशी जोडलेला संबंध 
अनेकांच्या धक्का देतो. 
ते म्हणतात :
“ओवैसी हमारे मित्र है, 
वो पुराने क्षत्रिय है और 
भगवान राम के वंशज है, 
इराण से नही आये.”
मधल्या काळात त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा 
अयोध्येत येण्यासाठी बंदी घातलेली असते.     
अशा अनेक गोष्टी समोर येऊ लागतात.  
भाजपला धोका देऊन त्यांनी एकदा 
काँग्रेस सरकारला पाठिंबा दिलेला असतो.  
त्यामुळे त्यांना भाजपमधून 
निलंबितही करण्यात आलेले असते.  
त्यानंतर ते समाजवादी पक्षामध्ये जातात.  
आणि परत खासदार म्हणून निवडूनही येतात. 
त्यांचा रुतबा, दबदबा आणि लोकप्रियता पाहून 
त्यांची भाजपमध्ये घरवापसी होते.   
मोदीजींचा एक फोन 
आणि नंतर अमित शहा यांची एक भेट.  
परत ते भाजपमध्ये येतात. 
पवित्र होतात.   

राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा 
अशा सर्वच क्षेत्रांत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या 
आणि सरकारचा ‘ब्लू आयीड बॉय’ असलेल्या 
या बाहुबली नेत्याबरोबर पंगा घेणे 
ही साधी गोष्ट नाही. 
एकतर मोदी सरकार 
कधीही दबावाला बळी पडत नाही. 
अजय कुमार मिश्रा उर्फ टेनी सारख्या मंत्र्यांचा 
राजीनामा सुद्धा त्यांनी घेतला नव्हता.  

असे असले तरीही पुढे 
खेळाडूंची सरकारसोबत चर्चा होते. 
क्रीडा मंत्र्यासोबत चर्चा होते. 
कुस्ती संघाचा पुढील अध्यक्ष एक महिला असेल, 
असं वचन दिलं जातं. 
आणि विषय संपतो. 
प्रकरण थंड होतं. 

पण काही दिवसांपूर्वी कुस्ती महासंघाच्या   
निवडणुका होतात. 
आणि नवा अध्यक्ष बनतो, संजय सिंग. 
कुणी म्हणतं, 
तो ब्रिजभूषण शरण सिंगचा चेला आहे. 
कुणी म्हणतं, 
तो ब्रिजभूषणचा बिजनेस पार्टनर आहे. 
कुणी म्हणतं, 
तो ब्रिजभूषणचा मुखवटा आहे. 
आणि दिसतंही तसंच. 
संजय सिंगपेक्षाही जास्त हारतुरे ब्रिजभूषणच्या गळ्यात. 
सर्वत्र पोस्टर्स लावले जातात. 
घोषणा दिल्या जातात 
‘दबदबा था, 
दबदबा है, 
दबदबा रहेगा 
ये तो भगवान ने दे रखा है!’ 
अशात नवीन अध्यक्ष परत स्पर्धेची घोषणा करतात. 
सर्व पहिलवानांना 
ब्रिजभूषणच्या भागात जायचे फर्मान निघते. 
आणि परत कुठंतरी भरत आलेल्या जखमेची खपली 
पटकन काढल्यासारखी होते. 
रक्त भळभळा वाहू लागतं. 
आणि महिला पहिलवानांचा संताप, 
नैराश्य वाढायला लागतं.  


हेही वाचा : अयोध्येच्या दुभंगलेल्या वर्तमानाचे चित्रण - आ. श्री. केतकर


आणि एकेक पहिलवान समोर यायला लागतात. 
‘युद्ध अटळ आहे’ याची जाणीव त्यांना असते. 
सुरुवातीला सरकारला यातलं गांभीर्य लक्षात येत नाही. 
सांगितलेल्या कामाचे धनी असलेली आय टी सेल सुद्धा 
‘टूल कीट’, ‘तुकडे तुकडे गँग’, ‘अवार्ड वापसी गँग’ 
असे परवलीचे शब्द वापरून 
भक्कमपणे ब्रिजभूषण सिंग 
यांच्या मागे उभे राहतात. 
दोन रुपयांची तंबाखू चघळत पहिलवानांनाच सल्ले देतात, 
“तुम सरकारी नोकरी छोड दो, 
पंधरा रुपये के अवार्ड हम लायेंगे.” 
पण पहिलवान मंडळी मागे हटत नाही. 
आंदोलन तीव्र होताना दिसतं. 
असं दबक्या आवाजात बोललं जातं की, 
या पहिलवानांना एक उद्योगपती 
‘जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स एक्सलंस प्रोग्राम’ 
अंतर्गत मदत करत असतो.  
पण त्यालाच हनी ट्रॅपमध्ये अडकवून 
बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 
त्याचे नाव आहे सज्जन जिंदाल. 
विनिता यादव सारखे खोजी पत्रकार 
हे जाहीरपणे सांगतात. 
या शिवाय बाबा रामदेव यांच्यासारखे संत उद्योगपतीही 
आपल्या विरोधात काम करत आहेत, 
असं स्वतः ब्रिजभूषण यांना वाटतं.   

काहीही असलं तरी 
एकीकडे काही महिन्यांवर आलेल्या 
लोकसभेच्या निवडणुका आहेत. 
एकेक खासदार महत्त्वाचा आहे. 
म्हणून ब्रिजभूषणलाही सांभाळायचं आहे.  
दुसरीकडे ‘जाट’ मतेही महत्त्वाची आहेत. 
महिलांची मतेही महत्त्वाची आहेत. 
‘पब्लिक परसेप्शन’ महत्त्वाचे आहे. 
म्हणून आता बरेचसे निर्णय घेतले जात आहेत. 
सर्व प्रथम कुस्ती महासंघाचे नवे पदाधिकारी 
निलंबित करण्यात आलेले आहेत. 
तीन सदस्यांची एक ‘अ‍ॅडहॉक समिती’ 
स्थापन करण्यात आलेली आहे. 
पण खेळाडूंचा अजूनही विश्वास बसत नाही. 
खा. ब्रिजभूषण भाजप अध्यक्षांची भेट घेतात. 
पक्षाकडून त्यांना नवी जबाबदारी मिळणार असते. 
मग ते जाहीर करतात, 
‘मी कुस्ती खेळामधून निवृत्ती घेतली आहे.’

सकाळी सकाळी त्यांच्या आखाड्यात जाऊन 
त्या पहिलवानांना भेटायला जातो एक नेता. 
त्यांना पाठिंबा देतो. 
आणि एक प्रश्नही विचारतो :  
‘सवाल सिर्फ एक है – 
अपने अखाडे कि लडाई छोड अगर 
इन खिलाडियो, 
भारत कि बेटियो को 
अपने हक और न्याय कि लडाई 
सडको पर लडनी पडे तो 
कौन अपने बच्चो को यह राह चुनने के लिये 
प्रोत्साहित करेगा?’
राहुल गांधींनी हा प्रश्न संपूर्ण देशाला विचारलेला आहे. 
त्याचं उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न झाला 
तर बऱ्याच समस्या नष्ट होतील. 

सर्वांसाठीच लवकरच चांगले दिवस येतील.
किमान आशा बाळगूया.   

- दिलीप लाठी    
diliplathi@hotmail.com 
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.) 

Tags: sakshi malik wrestling federation of india sanjay singh wrestling brijbhushan singh kushti कुस्तीगीर क्रीडा राजकारण भाजप कुस्ती कुस्ती महासंघ Load More Tags

Comments:

Nitin Mane

DilipSir, Devacha darbaramadhe nyay aahe, fakta to kadhi lavkar hoto ,nahitar thoda vel lagto.

Dr B S Valke

In the ultimate analysis," Might is Right." We've all kinds of laws but they turn to be impotant on account of a myriad faced Demon.. .....CORRUPTION. What can poor citizens do except wailing which is a drop in the ocean? अरण्यरुदनच. दुसरं काय?

Add Comment