सतत नवनवीन प्रयोग तो आपल्या कार्यक्रमात करत असतो. तो जरी स्वतःला ‘झिरो टीआरपी अँकर’ म्हणत असला तरी त्याला हिंदी न्यूज चॅनलमधील सर्वात लोकप्रिय, सर्वात भरवशाचा आणि सामान्य लोकांशी नाळ जुळलेलं सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. मॅगसेसेपासून ते रामनाथ गोयंकासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला हा पत्रकार आपल्या देशातील असंख्य लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
बिहारमधल्या एका छोट्याशा खेड्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक मुलगा आपल्या किलकिलत्या डोळ्यात ‘आयुष्यात काहीतरी करायचं’ हे स्वप्न घेऊन पुढच्या शिक्षणासाठी आपलं गाव सोडतो. नंतर दिल्ली विद्यापीठात इतिहासात पदवी मिळवतो. पुढे जर्नालिझमचा डिप्लोमा करतो. अफाट वाचन, अतिशय संवेदनशील व क्रिएटीव्ह व्यक्तिमत्व, काव्यात्म पद्धतीनं लिहिण्याची शैली आणि अन्यायाविरोधात लढण्याची वृत्ती – यामुळे तो चारचौघांपेक्षा वेगळा आहे हे दिसतं.
त्याने लिहिलेली उत्तरे वाचून त्याचे गुरुजी त्याला म्हणतात, “आपने लिखेवाले जबाब जब मैं पढता हुँ, तो मुझे उसमे संगीत सुनाई देता हैं।’’
गुरुजींनी उद्गारलेल्या एवढ्या मोठ्या वाक्याचा अर्थ त्याला त्यावेळी उमजत नाही. तो आपल्याच कोशात राहत असतो. त्या शहरातील ‘पॉलिश्ड’ इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या संस्कृतीमध्ये त्याची घुसमटच होत असते. पुढे त्याला त्या वेळच्या सर्वात प्रसिद्ध अशा प्रायव्हेट टीव्ही न्यूज चॅनलमध्ये नोकरी मिळते. पगार असतो 50 रुपये रोज! काम असतं, प्रेक्षकांनी पाठवलेल्या पत्रांचे विश्लेषण करणे. त्यावेळी प्रेक्षकसुद्धा फार जागरूक असायचे. आपल्या प्रतिक्रिया नोंदवायचे. देशभरातून आणि जगाच्या विविध भागातून सतत पत्रं यायची. त्यांचं वाचन करायचं. त्यांचं विश्लेषण करायचं. त्यावर रिपोर्ट तयार करायचा. म्हणायला गेलं तर अतिशय कंटाळवानं काम.
‘आपण कोण? अन् आपण करतो काय? आपल्याला पत्रकार व्हायचंय. आपल्याला रिपोर्टर व्हायचंय. आपणही टीव्हीवर दिसायला पाहिजे.’ – असे विचार कुणाच्याही डोक्यात येतील. तसंच काहीसं त्याचंही झालं असावं. पण ते कामही तो अतिशय प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे सामान्य लोक काय विचार करतात, त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, टीव्हीसारख्या माध्यमाकडून त्यांच्या काय अपेक्षा असतात, त्यांच्यासाठी एक टीव्ही चॅनल म्हणून आपली भूमिका काय असायला हवी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला आपसूकच मिळत असतात.
तो जास्तीत जास्त लोकाभिमुख होत असतो. पत्रकार म्हणून आपण नेमकं काय करायला पाहिजे हे त्याला उमजतं. सरकारला प्रश्न विचारणे, सरकारसमोर समस्या मांडणे, सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करणे, सरकारला जाब विचारणे अशा बेसिक गोष्टी तो मनोमन ठरवतो. सरकारनं जी चांगली कामं केलेली असतील त्याच्या प्रसारासाठी सरकारकडे स्वतंत्र यंत्रणा असते, स्वतंत्र बजेट असतं - असं त्याचं मत बनतं. आपण सरकारसमोर समस्या मांडल्या तर त्याचा फायदा सरकारलाच होईल, त्या त्रुटी दूर केल्या जातील, असं त्याला प्रामाणिकपणे वाटतं.
तो आपल्या मताशी ठाम असतो. ‘आपण एक पत्रकार आहोत, दुकानदार नाही’, याची त्याला पूर्ण जाणीव असते. गणेश शंकर विद्यार्थीसारखे पत्रकार त्याचे आदर्श असतात. तरीसुद्धा त्या टीव्ही चॅनलमध्ये काम करणारे इंग्रजी विभागातील ‘अँकर’ मंडळी त्याच्या हृदयाची धडधड वाढवतच असतात. कुठेतरी आपण कमी पडतो, असं त्याला सारखं वाटत असतं.
पुढे त्याला रिपोर्टर म्हणून काम करायची संधी मिळते. ‘हा माणूस वेगळा आहे. हा माणूस जबरा आहे.’ – एव्हाना हे सर्वांच्या लक्षात येऊ लागतं. आणि तो बनतो वरिष्ठ कार्यकारी संपादक. त्याला त्याच्या मालकाकडून कधीच प्रश्न विचारले जात नाहीत. त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असतं. त्यामुळे सतत नवनवीन प्रयोग आपल्या कार्यक्रमात करत असतो. तो जरी स्वतःला ‘झिरो टीआरपी अँकर’ म्हणत असला तरी त्याला हिंदी न्यूज चॅनलमधील सर्वात लोकप्रिय, सर्वात भरवशाचा आणि सामान्य लोकांशी नाळ जुळलेलं सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. मॅगसेसेपासून ते रामनाथ गोयंकासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला हा पत्रकार आपल्या देशातील असंख्य लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
Read Also : 'We produce news, we don't need TRPs' - Shekhar Gupta
त्याच्या फेसबुक पेजला 26 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण हे त्याच्या डोक्यात जात नाही. ‘मैं ही हूँ पत्रकार, टीव्हीवाला, अधुरा.’ त्याच्या इंट्रोमध्ये लिहिलेला शेवटचा शब्द हेच दर्शवतो.
त्याचं नाव आहे : रविश कुमार.
टीव्ही चॅनल : एनडीटीव्ही.
मालक : प्रणव रॉय.
शिक्षण, आरोग्य, अहिंसा, जातीय सलोखा, नोकरी-रोजगार, दंग्यांच्या विरोधात भूमिका असे अनेक विषय त्याच्या कार्यक्रमात असतात. काही दिवसांपूर्वी त्याने नोकरीवर कार्यक्रम केले होते. टीआरपी, रेव्हेन्यूचा विचार न करता मालिका चालवली होती. उद्देश हाच की युवकांना नोकऱ्या मिळाव्यात. रेल्वेच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. युवा मंडळीचं ‘सिलेक्शन’ झालं होतं. पण नोकरीचं पत्र मिळत नव्हतं. ‘दिन – महिने – साल’ निघून जात होते. नोकरीच्या आशेपोटी युवा मंडळीचे उमेदीचे दिवस निघून जात होते. कुणीही ऐकत नव्हतं. त्याने आपल्या ‘प्राइम टाइम’ मध्ये हा विषय लावून धरला. असे अनेक विषय होते. पुढे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. अनेक तरुण भारावलेल्या डोळ्यांनी त्याचे आभार मानत होते.
एकीकडे हे होत असताना, आपल्या सरकार विरोधी भूमिकेमुळे त्याला अनेक प्रकारच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागतंय. आर्थिक स्तरावर कंपनीवर पडणारे छापे, सामाजिक स्तरावर केले जाणारे ट्रोल हल्ले, जाहिरातदारांकडून कमी कमी होत जाणाऱ्या जाहिराती, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडून त्याच्या कार्यक्रमावर झालेला बहिष्कार अशा असंख्य समस्या घोंगावत असताना ही ‘पत्रकार’ म्हणून त्याचं जिवंत राहणं, या काळात अतिशय महत्त्वाचं आहे.
या अनोख्या पत्रकाराची नोंद घेऊनच विनय शुक्ला यांनी ‘While We Watched’ नावाची एक डॉक्युमेंटरी बनवली. ‘नमस्कार, मैं रविश कुमार’ हे त्याचे हिंदी नाव. विशेष म्हणजे कॅनडामध्ये ‘टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ [TIFF] मध्ये ही डॉक्युमेंटरी धुमधडाक्यात प्रदर्शित झाली. लोकांना तो माहितीपट/चित्रपट आवडला आणि रविशचं अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं पत्रकारितेतलं काम आवडलं. त्या माहितीपट/चित्रपटाला ‘Amplify Voices Award’ हा पुरस्कारसुद्धा मिळाला. आता 8 ऑक्टोबर 2022 ला साउथ कोरियामध्ये बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल BIFF मध्ये दर्शवला जाणार आहे. आणि काही दिवसांत युट्यूबवरही.
इंग्रजी भाषेबद्दल थोडीशी भीती सतत बाळगणारा हा पत्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या पत्रकारितेच्या कामगिरीबद्दल गौरवला जातोय, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. पण सरकार विरोधी भूमिकेमुळे त्याचा विरोध करणारे अनेक लोकही तयार झाले आहेत.
एनडीटीव्हीवर लवकरच अदानी उद्योगसमूहाचा कब्जा होणार, अशी बातमी पसल्यावर, या बातमीमुळे खुश झालेला एक मित्र म्हणाला, ‘लई माजला होता, बस आता बोंबलत. अदानी काढतो तुला नोकरीवरून. लई ‘नोकरी-नोकरी – बेकारी-बेकारी’ वर ‘प्राईम टाइम’ चालवत होता ना! झिरो टीआरपी अँकर! सरकारचं एकही काम चांगलं दिसत नव्हतं त्याला. सतत टीका.’
त्या मित्राचं रविश कुमारबद्दल डोक्याला झोंबणारं वाक्य ऐकून रविश कुमारचा ‘नमस्कार, मैं रविश कुमार!’ बनण्यापर्यंतचा पत्रकारितेतला प्रवास आठवला.
- दिलीप लाठी, पुणे
diliplathi@hotmail.com
‘नमस्कार, मैं रविश कुमार’ चा ट्रेलर :
Tags: main ravish kumar ravish kumar documentary Load More Tags
Add Comment