फक्त कल्पना करा आपल्याला कुठेतरी दूर
एखाद्या निर्मनुष्य बेटावर आठ दिवस जाऊन राहायचे आहे
तेथे माणसे नाहीत, हॉटेल नाही, दुकानं नाहीत
आपल्याला कुणालाच प्रत्यक्ष भेटता येणार नाही
लोकांपासून आपण खूप दूर आहोत
तरीही आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे,
धाडसी काम करायचे आहे म्हणून आठ दिवसांपुरती
खाण्यापिण्याची कपड्यालत्त्याची सोय करून
आपण तिथं जातो.
आणि लक्षात येतं की आपली गाडी फेल झाली
आता आठ दिवसच नाही, आठ आठवडे पण नाही तर
आठ महिने तिथेच राहावं लागेल.
त्याच परिस्थितीमध्ये जगावं लागेल,
तर काय होईल?
कल्पना करा.
सध्या यापेक्षाही भयंकर परिस्थितीला तोंड देत आहेत
भारतीय मूळ असलेल्या सुनीता विल्यम्स या अंतराळवीर!
===
आठ दिवसांचा कार्यक्रम तयार करून
दोन अंतराळवीर ‘स्टारलाईनर’ या यानात बसून
अंतराळ प्रवासाला निघतात.
त्यांच्या प्रवासाचं ठिकाण पृथ्वीपासून दूर, खूप दूर
उंच अवकाशात असतं.
तिथं ना मानवी वस्ती असते, ना झाडं झुडपं असतात
ना हवा असते ना पाणी असतं!
एवढंच नाही तर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्तीही नसते
त्यामुळे उड्या मारत मारतच चालावे लागते
माणूस तरंगत असतो. उलटा-पुलटा होत असतो.
चित्रविचित्र वातावरणामुळे चित्रविचित्र भास होत असतात.
अल्ट्राव्हायोलेट किरणे असतात.
त्याचा शरीरावर परिणाम होत असतो.
नखं, केस एवढंच नाही तर शरीराची उंची सुद्धा वाढू लागते.
तेथे जाणारा माणूस फक्त शरीरानेच नव्हे तर
मानसिकदृष्ट्यासुद्धा अतिशय मजबूत असावा लागतो.
सगळं काही सहन करण्याची अंगात ताकद लागते.
जुन्या जमान्यात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींप्रमाणे
सोबत भूकलाडू, तहानलाडू घेऊन जावे लागतात.
आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा त्यांना
सतत सतर्क राहून अभ्यास करावा लागतो.
आपलं संशोधन करावं लागतं.
संपूर्ण मानवजातीचे कल्याण होईल,
असे शोध लावावे लागतात.
मग ते औषधांच्या बाबतीत असो, की शेतीसाठी असो,
पाण्यापावसाचे असोत, खगोलशास्त्र असो, मेंदूचे विकार असो,
वनस्पतीशास्त्राशी संबंधित अभ्यास असो
किंवा निरनिराळ्या व्हायरससंदर्भात असो.
थोडक्यात मानवी सृष्टीच्या भोवती असलेली गुंतागुंत
सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात.
मानवजातीच्या भल्यासाठी ते काम करत असतात.
आपला जीव धोक्यात घालून अशा मोहिमेवर जात असतात.
===
विशेष म्हणजे यानामध्ये असलेल्या दोन प्रवाशांपैकी
एक प्रवासी असते सुनीता विल्यम्स.
सुनीताचे वडील श्री. दीपक पंड्या हे मूळ भारतीय.
गुजरातचे. अमेरिकेत स्थाईक झालेले.
सुनीता विल्यम्स लहानपणापासूनच अतिशय धाडसी.
आधी त्यांचे काम सुरू होते अमेरिकन नेव्हीमध्ये.
पुढे हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण घेतले जाते. नंतर पायलट!
नंतर नासाच्या मोहिमेमध्ये.
निवृत्तीनंतरही त्या थांबत नाहीत.
नासामध्ये काम सुरु असते.
अनेक अंतराळमोहिमांमध्ये सहभाग.
आता वय वर्षे ५८. पण परत एक धाडसी अंतराळमोहीम.
आठ दिवस अंतराळात राहायचे.
अभ्यास करायचा. संशोधन करायचे. असा कार्यक्रम.
पुन्हा एक नवीन मोहीम!
===
पण ते यान पृथ्वीवरून निघाल्याबरोबर
त्यांच्या एक गोष्ट लक्षात यायला लागते.
काहीतरी चुकतंय, याची जाणीव व्हायला लागते.
हेलिअम नावाचा वायू आपल्या यानातून गळत आहे,
असं दिसायला लागतं.
ती अतिशय घातक बाब असते.
यान आपल्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर
उष्णता निर्माण करत असते आणि हेलीअम मुळे
यान थंड राहण्यास मदत होते, असं बोललं जातं.
म्हणजे खरोखर भयंकर दुर्घटना घडू शकते.
मागे एकदा यानात निर्माण झालेल्या बिघाडामुळे
अनेक अंतराळवीर मारले गेले होते.
त्यामध्ये मूळच्या भारतीय असलेल्या कल्पना चावला होत्या.
ती अतिशय दुःखद घटना संपूर्ण जगाने पाहिली होती.
अतिशय हतबल होऊन पाहिली होती.
हे होणार होते याची कल्पना होती.
पण कुणीच काही करू शकत नव्हते.
===
आता परत तसं होऊ नये म्हणून लोकांचे पॅनिक होणे,
समजू शकतो.
कारण यांची गाडी फेल झाली.
तिथपर्यंत ते यान गेलं म्हणजे
आपण सहज दुरुस्ती करू
असं नासाच्या शास्त्रज्ञांना वाटत होतं.
त्यांचे प्रयत्न चालू होते.
दरम्यान प्रवासाचे आठ दिवस संपले.
आज यान दुरुस्त होईल, उद्या दुरुस्त होईल
म्हणून दिवसांमागून दिवस निघू लागले.
एक भारतीय म्हणून सगळेच लोक परेशान झालेत.
अनेक टीव्ही चॅनल्स नेहमीप्रमाणे पुड्या सोडू लागले.
खळबळजनक बातम्या देऊ लागले.
काहीही बोलू लागले.
‘अब नासा वापस नही ला सकता सुनीता को!’
कल्पना चावलाच्या गोष्टी सांगण्यात येऊ लागल्या.
लोकांमध्ये हळहळ निर्माण करण्यात येऊ लागली.
लोकही विचार करू लागले ‘आज-उद्या- आज-उद्या’ करत
जूनचा पूर्ण महिना गेला, जुलै गेला ऑगस्ट गेला
आता सप्टेंबर पण चाललाय... विशेष म्हणजे
त्यांना अंतराळात घेऊन गेलेलं ‘स्टारलाईनर’ यान परतही आलं,
पण हे काही आले नाहीत.
काय भानगड आहे काय माहीत?
नासा मुद्दामून सांगत नाही.
मागच्या वेळीसुद्धा कल्पना चावलाचे असेच झाले होते!
-अधुरी माहिती असलेले लोक अशा चर्चा करू लागले.
टीव्ही चॅनलवाले आपला टीआरपी वाढवू लागले.
त्यांचं ठीक आहे पण प्रश्न पडतो की,
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार परत केव्हा येतील?
हे अंतराळवीर कुठं राहत असतील?
कसे जगत असतील? काय करत असतील?
याची माहिती आपल्यापैकी बऱ्याच लोकांना नसते.
===
खरं सांगायचं झालं तर नासा दुसरं यान पाठवून
त्या दोघांना परत आणू शकला असता.
त्यांना कपडे, वगैरे वस्तू पाठवण्यात आल्यात.
एलन मस्क सारखा उद्योगपती आता तर
हौशी लोकांना कोट्यवधी रुपये घेऊन
अंतराळात सहल घेऊन जात आहे.
तो दैवी अनुभव सामान्य लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणूनच बोईंग कंपनीचे स्टारलाईनर बिघडले तर
एलन मस्कची मदत घेऊन सुद्धा सुनीता विल्यम्स आणि बुच
यांना परत आणता आले असते.
पण नासाने तसे केले नाही. त्याचे साधे कारण होते की
तशी तातडीची गरज नव्हती.
कुठलीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अतिशय सुरक्षित ठिकाणी
आपलं संशोधनाचे काम करत आहेत.
===
अशा अंतराळवीरांसाठी काम करणे सोपे व्हावे म्हणून
अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि युरोपियन युनिअन
या देशांनी एकत्र येऊन अवकाशात एका वास्तूची निर्मिती केली.
त्याला ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ म्हणतात.
आजपर्यंत मानवाने निर्माण केलेल्या सर्वात महागड्या
वास्तूंमध्ये याचा समावेश होतो.
तो एक उपग्रह आहे.
त्यामध्ये सहा बेडरूम्स, दोन बाथरूम्स, जिम, प्रयोगशाळा
अशी व्यवस्था केलेली असते.
तेथे आलेले प्रवासी आपले यान त्या उपग्रहावर पार्क करू शकतात.
हे उपग्रह चोवीस तासांमध्ये सोळा वेळेस
पृथ्वीच्या भोवती प्रदक्षणा मारत असते.
म्हणजे तेथे असलेल्या लोकांसाठी दीड तासाचा दिवस
आणि दीड तासाची रात्र असते.
म्हणजे दिवसातून सोळा वेळेस सूर्योदय आणि सोळा वेळेस सूर्यास्त!
तेथे काही अंतराळवीर बऱ्याच दिवसांपासून राहत आहेत.
काही दिवसानंतर नासातर्फे अंतराळवीरांची
दुसरी तुकडी परत तेथे जाणार आहे.
त्यांच्यासोबतच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर
परत येतील अशी योजना करण्यात आली आहे.
परंतु हे शास्त्रज्ञ त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे
तेथे पाच-सहा महिने राहणार आहेत.
संशोधन करणार आहेत.
त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच त्यांच्यासोबतच
पुढच्या वर्षी फेब्रूवारीमध्ये पृथ्वीवर परत येतील.
तो पर्यंत त्यांना त्यांचे वाढदिवस, ख्रिसमस, न्यू इअर सर्व काही
तिथेच साजरे करावे लागणार आहे.
आपल्या दुनियेपेक्षा वेगळ्या दुनियेत ते असतात.
आपलं घरदार सोडून कुठंतरी त्रिशंकूसारखं लटकून
आपलं नवं घर वसवतात.
जिवाची जोखीम घेऊन समस्त मानवजातीच्या भल्यासाठी काम करतात
त्यांच्यासमोर सगळं जग असतं, एक छोटंसं घर
एक छोटंसं कुटुंब
तेथे कुणी हिंदू-मुसलमान नसतो
तेथे रशिया-युक्रेन भेदभाव नसतो
कुणी काळे-गोरे नसतात
इस्राइल-गाझापट्टीचा वाद नसतो.
एकमेकांची हत्या करणारे लोक नसतात.
त्यांच्यासमोर संपूर्ण मानवजातीचा एकच चेहरा असतो
म्हणूनच ते आपला जीव धोक्यात घालून लढत असतात
संपूर्ण पृथ्वीवरील जिवांचं भलं व्हावं म्हणून!
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
Tags: sunita williams nasa butch wilmore boeing starliner elon musk Load More Tags
Add Comment