‘डिग्री दिखाव कॅम्पेन!’

नरेंद्र मोदी यांचे शिक्षण आणि पदव्यांबद्दलच्या वादाच्या निमित्ताने..

9 एप्रिल 2023. 

आम आदमी पार्टी. 
भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांच्या आंदोलनातून  
निर्माण झालेला सामान्य लोकांचा पक्ष. 
आता राष्ट्रीय पक्षात रुपांतर. 
दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार.  
एक नवीन मोहीम हाती घेतो. 
‘डिग्री दिखाव कॅम्पेन’. 
त्यांच्या नेत्या व दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशी  
आपलं शिक्षण आणि आपले पदवीचे प्रमाणपत्र  
प्रेस कॉन्फरन्स घेऊन  
जनतेला दाखवतात. 
आता दररोज आम आदमी पार्टीचे नेते  
आपापली पदवी लोकांसमोर येऊन दाखवतील,  
अशी घोषणाही करतात. 
त्यांचं लक्ष्य स्पष्ट आहे.  
त्यांना पंतप्रधान श्री नरेंद मोदी यांना  
अडचणीत आणायचं आहे. 
त्यांचं म्हणणंच आहे की,  
मोदीजींच्या पदवीमध्ये काहीतरी घोळ आहे. 
बारा वर्षे मुख्यमंत्री आणि  
मागच्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान असलेल्या  
मोदीजींबद्दल 
खळबळजनक वक्तव्य करून  
त्यांनी भारतीय राजकारण ढवळून काढले आहे. 
पण हे प्रकरण काही आज सुरु झालेले नाही. 
याची मुळे 2016 मध्ये दडलेली आहेत.  
त्याआधी सर्वत्र मोदी लाट असतानाही  
आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये  
70 पैकी 67 आमदार निवडून आणलेले. 
त्यांचं सरकार स्थापन झालेलं. 
त्यांचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर 
यांना फेक डिग्री केसमध्ये अटक केली जाते. 
अतिशय अपमानास्पद परिस्थितीमध्ये  
राजीनामा द्यावा लागतो.  
केंद्र सरकारच्या अशा कारवाईमुळे  
आम आदमी पार्टी पूर्णपणे जखमी झालेली असते. 
पुढे असे अनेक इशू येतात. 
स्मृती इराणींच्या डिग्रीचा प्रश्न निर्माण होतो.   
पण कारवाई होत नाही.    

***

28 एप्रिल 2016 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आरटीआयअंतर्गत  
भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांना पत्र लिहितात. 
त्यात लिहितात,  
“आरोप लग रहे है कि श्री नरेंद्र मोदी जी के पास  
कोई डिग्री नही है.  
ऐसे मे पुरे देशकी जनता सच्चाई जानना चाहती है... 
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी की डिग्री से जुडी जानकारी  
सार्वजनिक करने कि हिम्मत दिखाए.”  
या पत्राची त्वरित दखल घेतली जाते. 
माहितीच्या कायद्याअंतर्गत दोन्ही विद्यापीठांना  
म्हणजे दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठ यांना  
सांगण्यात येते की,   
अरविंद केजरीवाल यांना मोदीजींच्या डिग्रीबद्दल  
योग्य ती माहिती देण्यात यावी. 
हे पत्र बघितल्याबरोबर  
त्यावेळचे भारतातील मोदीजींनंतरचे  
सर्वात शक्तिशाली दोन नेते अरुण जेटली आणि अमित शाह 
पत्रकार परिषद घेतात आणि  
मोदीजींचे बीए आणि एमएचे प्रमाणपत्र दाखवतात. 
पण ते प्रमाणपत्र समोर आल्याबरोबर वाद संपायच्या ऐवजी  
वाढायला लागतो. 
‘आप’चे प्रवक्ते आशुतोष पत्रकार परिषद घेतात. 
आणि सुरु होते आरोप-प्रत्यारोपांची मालिका. 
ते प्रमाणपत्र बोगस आहे,  
असे आम आदमी पार्टी जाहीर करते. 
त्या प्रमाणपत्रामध्ये मोदीजींच्या नावामध्ये तफावत आहे. 
‘University’चे स्पेलिंग चुकीचे आहे. 
1978 मध्ये हस्तलिखित प्रमाणपत्र दिले जायचे,  
मग संगणकाचा वापर कसा?  
जे फॉन्ट वापरले आहेत ते त्यावेळी नव्हते, वगैरे वगैरे. 
मोदीजींना ओळखणारा एकही वर्गमित्र कसा नाही? 
असे अनेक प्रश्न आपकडून विचारले जातात. 
मुख्य माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे       
गुजरात विद्यापीठाने जर माहिती जाहीर केली असती तर  
हे प्रकरण 2016 मध्येच संपलं असतं. 
पण गुजरात विद्यापीठ तसं करत नाही.  
ते हायकोर्टात जातात. 
त्यांचं म्हणणं असतं :  
एखाद्याचे ‘बेजबाबदार बालिश कुतुहल’  
[irresponsible childish curiosity] 
पब्लिक इंटरेस्टचा भाग होऊ शकत नाही.’   
हायकोर्ट फक्त मुख्य माहिती आयुक्तांचा आदेशच  
रद्द करत नाही तर  
अरविंद केजरीवाल यांच्यावर  
25000 रुपयांचा दंड लावतो. 
विद्यापीठातर्फे केस लढवण्यासाठी हजर होतात  
भारतातील सर्वात प्रसिद्ध वकील आणि  
देशाचे सॉलीसिटर जनरल श्री तुषार मेहता. 
त्यांची उपस्थितीसुद्धा बरेच काही सांगून जाते. 
यामुळे हे प्रकरण शांत व्हायच्या ऐवजी  
परत जोरात सुरु होतं. 
अरविंद केजरीवालांपासून ते संजय सिंगांपर्यंत आणि  
राघव चड्ढांपासून ते अतिशींपर्यंत  
प्रत्येक जण बोलायला लागतात. 
आणि ‘डिग्री’ बनते सर्वात मोठा राजकीय मुद्दा.   

***

तसं पाहिलं तर मोदीजींच्या शिक्षणाबद्दल  
बऱ्याचदा प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. 
2007 मध्ये  
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या डिग्रीबद्दल  
वाद निर्माण होतात. 
दिलीप पटेल ‘टाइम्स ऑफ इंडिया, अहमदाबाद’चे पत्रकार.                                                        
विद्यापीठाच्या रेकॉर्ड रूममध्ये जाऊन  
सर्व कागदपत्रे तपासतात.  
अर्थातच विषय असतो मोदीजींची डिग्री.  
त्यांना एका सेमिस्टरमध्ये काहीतरी घोळ दिसतो. 
बातमी प्रकाशित होते. 
अर्थातच सरकार नाराज होतं.  
मुख्यमंत्री नाराज होतात. 
तेव्हापासून विद्यापीठाचे ते रेकॉर्ड रूम सील झालंय,  
असं ते पत्रकार आज सांगत आहेत. 
म्हणजे प्रकरण तेवढं सोपं नाही.  

***

औपचारिक शिक्षण आणि राजकारण. 
औपचारिक शिक्षण आणि करिअर. 
औपचारिक शिक्षण आणि सरकार चालवणे.  
डिग्री असणे आणि सरकारची ध्येयधोरणे ठरवणे. 
या सर्व गोष्टींचा खरंच काही ताळमेळ असतो का? 
अनेक महान लोक समोर येतात. 
त्यांचे चेहरे समोर येतात. 
काही भारतातील.  
काही परदेशातील. 
त्यांनी भोगलेलं आयुष्य.  
त्यांचं शिक्षण.  
त्यांनी केलेलं काम.  
आणि त्यांच्यामुळे बदललेली दुनिया. 
आणि परत वाटतं औपचारिक शिक्षण किंवा  
हातात पदवी असणे, वेगळी गोष्ट आहे. 
आणि खरं ‘ज्ञान’ असणे वेगळी गोष्ट आहे.  

***

एक छोटीशी झलक. 

 

एक लहान मुलगा आपलं दप्तर घेऊन शाळेत जातो.  
त्याला ऐकायला थोडं कमी येत असतं. 
कानाला काहीतरी दुखापत झालेली असते.  
संसर्ग झालेला असतो.  
शिक्षक त्याला समजून घेत नाहीत.  
दोन-तीन महिन्यांतच त्याच्या आईला  
शिक्षकांचा निरोप मिळतो.  
‘तुमचा मुलगा फारच ‘ढ’ आहे, हो.  
त्याचं भविष्य काही बरोबर दिसत नाही. 
तो आयुष्यात काहीच शिकू शकणार नाही.’ 
त्यानंतर तो मुलगा शाळा सोडतो. 
त्याची आई त्याला घरीच शिकवायला लागते.                                                                   
त्याचं कुठलंच औपचारिक शिक्षण होत नाही. 
उभ्या आयुष्यात त्याच्याकडे कुठलीच पदवी नसते. 
पण तो शिकत राहतो. 
संशोधन करत राहतो. 
फोनोग्राफचा शोध लावतो.  
कॅमेऱ्याचा शोध लावतो.  
इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावतो. 
संगीत आणि फिल्म यांची दुनिया बदलतो. 
तुमचं माझं सगळ्याचं आयुष्य बदलतो. 
पूर्ण दुनिया बदलतो.  
त्याचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. 

***

एका गरीब शेतकऱ्याचा 
एक मुलगा. 
त्याचे आई आणि वडील.  
दोघेही अशिक्षित.  
त्यांना ना वाचता येतं. ना काही लिहिता.  
तो लहान असतानाच त्याची आई मरते. 
त्याला मिळेल ते छोटे-मोठे काम करून  
वडलांना मदत करायची असते. 
त्याची इच्छा असते खूप शिकायची.  
त्याला शाळेत जायचं असतं.  
लिहायचं असतं.  
शिकायचं असतं. 
पण गरिबीमुळे ते शक्य नसतं. 
मोठ्या मुश्किलीने पूर्ण आयुष्याच्या हिशोब केला तर   
तो फक्त वर्षभर शाळेत गेला असेल. 
पण जिथं मदत मिळेल अशा लोकांकडे तो जातो.  
त्यांच्या हातापाया पडून  
विनंती करून पुस्तकं आणतो.  
काही दिवसांसाठी. वाचण्यासाठी.   
खूप दूर पायी जावं लागतं.  
पण तो पुस्तकं मिळवतो.  
वाचतो.  
छोटी-मोठी कामं करत  
आपला अभ्यास करत असतो.   
आणि स्वतः ‘एकलव्य’ बनून  
वकिलीचं शिक्षण पूर्ण करतो. 
स्वयंअध्ययन करून सुप्रसिद्ध वकील बनतो.  
पुढे राजकारणात येतो.  
जगातील सर्वात बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो. 
आपल्या देशातील अमानवी ‘गुलामगिरी’ नष्ट करतो. 
एवढंच नाही तर अमेरिकेला नागरी युद्धातून वाचवतो.  
जगाच्या इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. 
त्याचं नाव होतं अब्राहम लिंकन.  

*** 

एका जमीनदाराचा मुलगा.  
तो 14 वर्षांचा असतानाच वडिलांचं निधन.  
कसंतरी शालेय शिक्षण पूर्ण करतो. 
त्यानेही कॉलेज लाइफ पाहिलेलं नसतं.  
ब्रिटीश सैन्यात भरती होतो.  
पुढे जुलमी ब्रिटीश कायद्याच्या विरोधात आंदोलन करतो.   
आणि अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनतो. 
त्याचं नाव जॉर्ज वॉशिंग्टन. 
पुढे त्याच्याच नावाने  
अमेरिकेला नवीन राजधानीचे शहर मिळते – वॉशिंग्टन डीसी. 

***

ज्यांनी जगाचा इतिहास बदलला  
पण ज्यांचं औपचारिक शिक्षण झालेलं नव्हतं,  
अशा महान लोकांची आठवण झाली. 
कारण आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या  
शिक्षणाबद्दल आणि त्यांनी मिळवलेल्या पदव्यांबद्दल  
सध्या चालू असलेले वादविवाद.     
पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा खासदार/आमदार होण्यासाठी  
आपल्या कायद्याप्रमाणे शिक्षण असणे गरजेचे नाही. 
आपल्या देशातही अनेक नेतेमंडळीनी  
औपचारिक शिक्षण घेतलेलं नसतानाही  
चांगल्या पद्धतीनं सरकार चालवलेलं आहे.  

***

इयत्ता सहावीतच शाळा सोडलेला मुलगा  
आपल्या काकाच्या दुकानात मिळेल ते काम करत 
जगत असतो. 
पुढे लोकांसाठी काम करायला लागतो.  
राजकारणात येतो. 
आणि मुख्यमंत्री होतो. 
त्याच्यासाठी ‘विकास’ म्हणजे असतं, गरीब मुलांना शिक्षण.   
सर्वांनाच शिक्षण मिळायला पाहिजे. 
शाळेसाठी खूप दूर जायला नको,  
म्हणून तो सर्वत्र शाळा सुरु करतो. 
गरीब-श्रीमंत असा भेदभाव नको.  
जातीपातीचा भेदभाव नको.  
तू छोटा, मी मोठा – असं काही नको.  
म्हणून तो सर्व विद्यार्थ्यांना सरकारतर्फे मोफत गणवेश देतो. 
खऱ्या अर्थाने समानता आणतो. 
त्याच्यासाठी ‘विकास’ म्हणजे असतं, पाणी.  
शेतीसाठी पाणी. लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी. 
अनेक मोठमोठी धरणं बांधतो.     
हजारो पाण्याच्या टाक्या बांधल्या जातात.  
स्वच्छ केल्या जातात.  
हजारो विहिरी खोदल्या जातात. 
शेतकऱ्यांना ऑईल इंजिन, पंप उपलब्ध करून दिले जातात. 
समृद्ध समाजाची निर्मिती केली जाते.  
अनेक मोठमोठे उद्योगधंदे आपल्या राज्यात आणले जातात.  
मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केला जातो.  
हाताला काम, प्यायला पाणी आणि  
समृद्ध जीवन करायचा प्रयत्न  
या सहावी नापास मुख्यमंत्राकडून केला जातो. 
त्यांचं नाव होतं के. कामराज. 
देशातील सर्वात मोठा नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने गौरवल्या जातं.   
‘कामराज मॉडेल’ म्हणून आदर्श मानलं जातं. 
त्यांच्या कामाची दखल संपूर्ण देश घेतो. 

***

पंजाबमध्ये जन्मलेला एक नेता.  
कसंतरी मॅट्रीकपर्यंत शिकतो.  
पुढे धार्मिक अभ्यास करायला लागतो.  
त्यात प्राविण्य मिळवतो. 
त्यामुळे त्याला ‘ग्यानी’ म्हटलं जातं. 
राजकारणात येतो.  
राज्यात मंत्री बनतो.  
पुढे मुख्यमंत्री होतो. 
देशाचा गृहमंत्री बनतो. 
आणि भारताचा राष्ट्रपती होतो.  
फारसं इंग्रजी येत नसलेल्या  
या नेत्याची कारकीर्द  
अतिशय वाखाणण्यासारखी आहे. 
राष्ट्रपतीपदाचं त्यांनी वेगळे महत्त्व दाखवलं. 
त्यांचं नाव होतं ग्यानी झैल सिंग.    

***

तामिळनाडूमधील दुसरं व्यक्तिमत्त्व. 
दहावीनंतर कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. 
अनेक कविता लिहितो.  
अनेक नाटकं लिहितो. 
अनेक पुस्तकं प्रकाशित होतात. 
एक विचारवंत म्हणून ओळख. 
राजकारणात प्रवेश.  
पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून  
अतिशय चांगली कामगिरी. 
सरकार चांगलं चालवतो. 
पक्ष बळकट करतो.  
त्यांचं नाव करुणानिधी.  

*** 

दक्षिण भारतातील एक हुशार मुलगी. 
दहावीत चांगले मार्क्स.  
स्कॉलरशिपसुद्धा मिळालेली.  
तिला वकील व्हायचं असतं.  
भरपूर शिकायचं असतं. 
पण भविष्यात वेगळंच लिहिलेलं असतं. 
ती रंगीबेरंगी फिल्मी दुनियेत जाते.  
लोकांच्या मनावर राज्य करते. 
पुढे खरोखर राज्यकर्ती होते. 
तामिळनाडूची मुख्यमंत्री म्हणून  
त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. 
त्यांचं नाव होतं, जे जयललिता.  
 
***

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ.  
जन्म झाल्यानंतर काही दिवसांतच 
आई-वडील प्लेगचे बळी.  
पुढे आजीच्या देखरेखीखाली. 
मोठ्या मुश्किलीने सातवीपर्यंत शिक्षण. 
स्वातंत्र्यलढ्यात सहभाग. 
पुढे राजकारणात प्रवेश. 
चार वेळा मुख्यमंत्रीपद. 
सतत विचार शेतकऱ्यांचा.  
विचार खेड्यापाड्यांतील लोकांचा. 
सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती.  
सहकारी संस्था.  
सहकार चळवळ.  
यावर भर.  
मुलींसाठी मोफत शिक्षण. 
पाणी अडवा, पाणी जिरवा – योजना. 
महाराष्ट्रातील मुलं-मुली इतर राज्यांत किंवा  
इतर देशात शिक्षणासाठी जातात. 
त्यांना इंजिनिअर व्हायचं असतं. 
त्यांना डॉक्टर व्हायचं असतं. 
आपल्या राज्यातलं टॅलेंट आणि पैसा  
विनाकारण बाहेर जातो. 
हे तो सातवीपर्यंत शिकलेला मुख्यमंत्री समजतो.  
सरकारचं धोरण बदलतो. 
अनेक विनाअनुदानित महाविद्यालयं सुरु होतात. 
अनेक गावांमध्ये कॉलेजेस निघतात.  
लोक टीका करतात.  
नावं ठेवतात. 
पण त्यांची भूमिका ठाम असते. 
त्यांनी भविष्य पाहिलेलं असतं. 
आपल्या भूमिकेवर ते ठाम असतात. 
पुढे वातावरण बदलतं.  
इथल्या मुलामुलींचे भविष्य बदलतं.  
अनेक विद्यार्थी इंजिनिअर होतात.  
डॉक्टर होतात. 
आपलं आयुष्य घडवू लागतात.                  
पुढे ते नेते राज्यपाल म्हणून काम पाहतात. 
त्या नेत्याचं नाव होतं, वसंतदादा पाटील. 

***

कर्नाटकातील एका कॉंग्रेस नेत्याचे ड्रायव्हर.  
शिक्षण नाही.  
कॉलेजची पदवी नाही.  
नेत्यांची गाडी चालवत चालवत  
राजकारण चालवायला शिकतात. 
पुढे खासदार आणि देशाचे रेल्वेमंत्री. 
त्यांनी त्या काळात बंगळूर येथे उभारलेली  
‘व्हील आणि एक्सेल’ निर्मितीची कंपनी आजही  
कर्नाटकमधील जनतेसाठी शान आहे.  
रोजगार निर्मितीचं प्रगतीचं साधन आहे. 
त्यांचं नाव आहे सी के जाफर शरीफ.     

***

बिहारमधील एक मुलगी.  
वयाच्या 14 व्या वर्षी लग्न.  
शिक्षण नाही.  
पती राजकारणात.  
घरदार, मुलंबाळं सांभाळत आयुष्य काढते.  
परिस्थिती असं काही वळण घेते की,  
भारतातील दुसऱ्या नंबरच्या मोठ्या राज्याचं  
मुख्यमंत्रीपद त्यांना स्वीकारावं लागतं.  
ते राज्यही काही साधं सरळ नाही.  
लोकसंख्या जास्त आणि गुन्हेगारी जास्त. 
लोक हसतात. म्हणतात,  
‘ह्या काय सरकार चालवणार?  
यांना तर शपथ घेतानाचा कागदही  
नीट वाचता येत नाही.’    
पण जादू झाल्यासारखं सरकार चालतं. 
एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा  
त्या मुख्यमंत्री बनतात.                                               
त्यांचं नाव आहे, राबडीदेवी.  
 
***

सात बहिणी आणि दोन भाऊ.  
त्याचा जन्म झाल्याबरोबर काही दिवसांतच  
वडील मुख्यमंत्री बनतात. 
एक अतिशय प्रभावशाली राजकीय घराणं. 
पण तो दहावीसुद्धा पास होत नाही.  
क्रिकेटच्या नादी लागतो. 
लोक म्हणतात, ‘बडे बाप की बिघडेवाली अवलाद!’ 
कधीकाळी आईवडील दोघेही मुख्यमंत्री असतात. 
पण परिस्थिती बदलते.  
वडील तुरुंगात आणि अतिशय आजारी.   
अशा बिकट परिस्थितीत तो पक्षाची सूत्रे हातात घेतो. 
समोर मोदी शहासारखे मातब्बर नेते  
परत त्यांच्या जोडीला नितीशकुमार सारखे  
सुशासन बाबू   
दहा वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले. 
मुकाबला तगडा.  
अशा स्थितीत हा तरुण नेता    
‘पढाई, दवाई, कमाई’ अशा घोषणा करत  
लोकांसमोर जातो. 
लोकांना ते पटतं. 
कुणीही त्याला त्याची ‘डिग्री’ विचारत नाही. 
‘क्रमांक एक’चा पक्ष म्हणून तो पुढे येतो.  
बिहारमधील सर्वात तरुण व  
सर्वात लोकप्रिय उपमुख्यमंत्री  
म्हणून लोक त्याला ओळखतात. 
त्याचं नाव आहे, तेजस्वी यादव. 

***

असे कितीतरी नेते आपल्या समोर आहेत.  
विरोधकांनी टीका करावी. ते त्यांचं कामच असतं. 
पण देशाचा पंतप्रधान असो की मुख्यमंत्री  
त्यांच्या शिक्षणावर टीका करण्याऐवजी त्यांच्या  
ध्येयधोरणांवर, त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर  
टीका व्हायला हवी. 
आपल्या कायद्यानुसारसुद्धा  
पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री-मुख्यमंत्री  
किंवा आमदार, खासदार होण्यासाठीसुद्धा  
शिक्षण आवश्यक नाही. 
असं असलं तरी विधान परिषदेसाठी  
पदवी मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ असतात  
हे विशेष.   

***

आता शिक्षण महत्त्वाचं की व्यवहारी ज्ञान  
अशी चर्चा हळूहळू सुरु होते. 
नवे-जुने, खरे-खोटे संदर्भ बिनधास्त दिले जातात. 
काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा  
सहजच बोलून जातात  
‘महात्मा गांधींकडे कुठे डिग्री होती?  
त्यांनी फक्त हायस्कूल डिप्लोमा केला होता.’ 
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही,के, सक्सेना म्हणतात,    
‘डीग्रीया तो पढाई कि रसीद होती है.’ 
म्हणजे आता मोदीजींचा बचाव करण्यासाठी  
घटनात्मक पदावर बसलेले महामहीमसुद्धा  
वादग्रस्त आणि चुकीची वक्तव्ये करू लागलेत.  
 
***

त्यामुळे मोदीजींच्या शिक्षणाबद्दल आणि  
त्यांसंदर्भात सादर केलेल्या शपथपत्राबद्दल शंका-कुशंका  
निर्माण होऊ लागल्यात. 
 
तसं सांगायचं झालं तर  
काहीही कारण नसताना आणि कायद्याप्रमाणे गरज नसताना  
उगीचंच कुणीही कशाला खोटं शपथपत्र दाखल करेल?  
 
आम आदमी पार्टीने पुढील मुद्दे मांडले :   
 
प्रमाणपत्रावर ‘University’चे स्पेलिंग चुकीचे आहे.   
‘v’च्या ऐवजी ‘b’ आहे, असं त्यांचं म्हणणं. 
पण तो त्या फॉन्टचा दोष आहे, हे ‘अल्ट न्यूज’ने दाखवले आहे. 

 

बीए आणि एमए दोन्हीही डिग्रींमध्ये मोदीजींच्या नावांमध्ये तफावत आहे. 
हा अतिशय किरकोळ मुद्दा आहे. 

 

त्यावेळी प्रमाणपत्र कॅलिग्राफी करून दिले जायचे.  
ज्या फॉन्टचा वापर केला आहे, तो फॉन्ट त्यावेळी अस्तित्वात नव्हता. 
कदाचित ते प्रमाणपत्र नंतर घेतले गेलेले असावे. त्यावर ‘Duplicate’ लिहिलेलं आहे. 

 

यांना ओळखणारा किंवा यांच्याबरोबर परीक्षा दिलेला यांचा एकही वर्गमित्र नाही. 
मोदीजी दिल्ली विद्यापीठात बीए करत असताना भारतात आणीबाणी लागू झाली होती. तसेच त्यांनी एक्स्टर्नल अभ्यासक्रम केला होता.   
‘Entire Political Science’ नावाचा विषय अस्तित्वात नाही. 
त्यावेळी एमएला शेवटच्या सेमिस्टरमध्ये ‘संपूर्ण राज्यशास्त्र’ असा विषय होता, हे बोललं जातं.  

 

इतकी मोठी व्यक्ती आपल्या संस्थेत शिकली, याचा त्या संस्थेला अभिमान वाटायला पाहिजे. त्यांनी पदवी अभिमानाने दाखवायला पाहिजे.    
आपण जर गुजरात विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेलो तर त्यांच्या अल्युमिनाय यादीमध्ये सर्वात आधी मोदीजींचे छायाचित्र आहे.  

असं असलं तरी  
शिक्षणाबद्दल वेगळंच जनमत तयार करण्यात  
आप बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे.  
दिल्लीमधील सरकारी शाळा  
त्यांनी जागतिक स्तरावर नेलेल्या आहेत. 
सर्वात जास्त महत्त्व त्यांनी शिक्षणाला दिलेलं आहे. 
भाजप शाळा बंद करत आहेत,  
असा प्रचारही ते करत आहे. 
 
आता मात्र हा वाद वेगळ्या वळणावर जात आहे. 
केजरीवालने सुरुवातीला वेगळी वक्तव्ये केलीत.   
‘अशिक्षित असणे काही गुन्हा नाही.  
पाप नाही.  
पण खोटे प्रमाणपत्र सादर करणे गुन्हा आहे.’ 
आणि त्यांचं म्हणणं सगळ्यांना पटतही होतं. 
 
आता त्यांनी नवं नरेटीव्ह  
तयार करायला सुरुवात केली.  
शिक्षण आवश्यक आहे.  
दररोज शेकडो फाइल्स येतात.  
त्यात बाबू लोक चुकीचे निर्णय  
घ्यायला लावू शकतात.  
हे बोलत असताना तो नोटबंदीवर बोलतो.  
तो जीएसटीवर बोलतो. 
सामान्य लोकांशी संवाद साधत असताना  
मोदीजींनी सांगितलेली उदाहरणं सांगतो.  
ते कसे अशास्त्रीय आहे हे दर्शवतो. 
‘नालीमेसे गॅस निकालना’, 
‘बादलोकी वजह से रडार कॅच नही करेंगा’ 
किंवा विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत असताना  
मोदीजींकडून ‘क्लायमेट चेंज’वर आलेलं वक्तव्य सांगून  
संपूर्ण जग ‘क्लायमेट चेंज’वर विचार करत असताना  
आपले पंतप्रधान किती अवैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून बोलतात,  
हे दाखवतो.      
 
शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगतो. 
आणि आता सुरु झालंय ‘डिग्री दिखाव कॅम्पेन’. 
अतिशी येते आपली पदवी दाखवते. 
दुसऱ्या दिवशी जस्मिन शाह येतो  
आपल्या आय आय टीच्या पदव्या दाखवतो. 
हा सिलसिला सुरु होतो.  
शिक्षणाचं महत्त्व, ‘अनपढ’ असल्याचे तोटे  
यावर भाष्य केलं जातंच.  
 
या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या  
पत्रकार परिषदा पाहिलेला  
भक्त मित्र थोडा गहिवरला.  
म्हणाला, “शिक्षण आवश्यकच आहे यार.  
आपने चांगले सुशिक्षित स्मार्ट तरुण राजकारणात आणले.” 
मी म्हणालो : मग काय पार्टी बदलता की काय? 
तो म्हणाला : छे छे! आपल्या देशात तसेही 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोक  
पदवीधारक नसतीलच.  
त्यांना आपला जास्त जवळचा प्रतिनिधी कोण वाटेल?  
‘आम आदमी’वाले नाव आम लोकांचं घेतात.  
पण असतात सगळे उच्चशिक्षण घेतलेले.  
आयआयटी काय, परदेशातील विद्यापीठ काय? 
सगळेच खासमखास. 
आयेगा तो ...!

- दिलीप लाठी 
diliplathi@hotmail.com  

Tags: degree prime minister AAP arvind kejariwal kamraj jaylalitha vasatdada patil tejaswi yadav rabadidevi Load More Tags

Comments:

Niraj Mashru

मस्त लेख, खर काय खोट काय देव जाणे.. पण दोन्ही बाजु स्पष्ट होत आहेत...

दिलीप लाठी

धन्यवाद राजश्री मॅडम. ‘मोदिजींची डिग्री बोगस आहेत किंवा नकली आहे’, हे आम आदमी पार्टीचे म्हणणे मला तरी पटत नाही. सुरुवातीला त्यांनी सांगितले कि मोदिजीकडे पदवीच नाही. पदवी दाखवल्यानंतर म्हणाले पदवी बोगस आहे. आता म्हणतात शिक्षण महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाकडे कुणीही आपल्या शिक्षणाबद्दल चुकीचं शपथपत्र दिलं तर आपली खासदारकी रद्द होऊ शकते. पर्यायाने पंतप्रधानपद सुद्धा जाऊ शकते. अशा पद्धतीने आपलं संपूर्ण राजकीय भविष्य एवढा मोठा नेता डावावर लावेल असे वाटत नाही. इतके मोठमोठे चाणक्य सोबत असताना आणि आरएसएस ची यंत्रणा सोबत असताना मोदिजी अशी खतरनाक चूक करतील असे वाटत नाही. तरीसुद्धा गुजरात विद्यापीठाकडून डिग्री ची सत्यता स्पष्ट करून हा प्रश्न संपवता आला असता. पण तसं केलं तर आणखी नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल वेळोवेळी दाखल केलेले शपथपत्र, वगैरे. त्यापेक्षा असल्या प्रश्नांची वैधताच नष्ट करणे, चांगले. मुळात ‘आम आदमी पार्टी’ची वाढ कॉंग्रेस ची जागा घेऊनच होत आहे. दिल्लीचे शीला दीक्षित सरकार असो किंवा पंजाबचे कॉंग्रेस सरकार. गुजरातमध्ये सुद्धा प्रवेश करून त्यांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळवून दिलं, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. बेरोजगारी, महागाई असे महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा ‘अडाणीके बीस हजार करोड किसके है?’ हा प्रश्न विचारून राहुल गांधीने मांडलेला कार्पोरेट भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल – हे सगळे विषय बाजूला पडत आहे. काहीही असलं तरी या निमित्ताने ‘औपचारिक शिक्षण’ हा मुद्दा ऐरणीवर आला. म्हणूनच आपल्याला माहित असलेल्या कथा/कहाण्यांची उजळणी झाली. एवढेच. निष्कर्ष वाचकांवरच सोडतो. आपली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. परत एकदा धन्यवाद. -दिलीप लाठी

Rajashri Birajdar

लेखात उदाहरणे भरपूर पण निष्कर्ष काही नाही.पदवीचा आणि कर्तृत्वाचा काही संबंध नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे .पण मोदींचे निर्णय आणि त्यांची काही वक्तव्ये ही बाळबोध आणि अज्ञानी निश्चितच आहेत.त्याबद्दल कोणी बोलायचे नाही का ? आणि नसेल शिक्षण तर तसे सांगायचे खरे खरे..त्यात लाज वाटायचे काय कारण?पदवी अहंकाराचा मुद्दा भाजपने बनवला तिथेच शंकेला वाव मिळतो.लेखकाने कोणाचीही बाजू न घेतल्याने लेख संदिग्ध वाटतो..

Add Comment