डोनाल्ड ट्रम्प!
तसे पाहिले तर ते एक मोठे उद्योगपती.
वडिलोपार्जित रियल इस्टेटचा धंदा.
प्रचंड पैसा कमावला.
जगभर धंदा वाढवला.
आणि २०१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
निवडून आल्याबरोबर त्यांनी
आधीच्या राष्ट्राध्यक्षांना दोष द्यायला सुरुवात केली.
‘इतर देशांना मदत करत करत
आपण आपल्यालाच विसरलो.
इतर देशांच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या नादात
आपल्या सीमा असुरक्षित झाल्या.
आपल्या देशात बेकारी वाढली.’
... वगैरे वगैरे.
लोकांनी त्यांचा कारभार पाहिला होता.
लोकांना त्यांचा चार वर्षांचा एककल्ली कारभार
आणि काहीसे विक्षिप्त वागणे आवडले नाही.
==================
पुढे २०२० ची निवडणूक त्यांनी परत लढवली.
‘यांच्या विरोधात दगड भी उभा राहिला
तरी चालेल पण हा माणूस नको’
असं म्हणून लोकांनी त्यांना पाडलं.
पण तोपर्यंत त्यांच्या भक्तांची एक मोठी फौज
निर्माण झाली होती.
‘पीसफुल ट्रान्सफर ऑफ पावर’
करायला ते तयार नव्हते.
धिंगाणा झाला. हिंसाचार झाला.
सहा जानेवारीचा ‘कॅपिटल हल्ला’ झाला!
मग सगळी महत्त्वाची सरकारी कागदपत्रे घेऊन
त्यांनी पद सोडले.
जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
==================
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची
अनेक लफडी बाहेर आली.
सहा जानेवारीचा ‘हिंसक हल्ला’,
आर्थिक फसवणूक, वगैरे.
अनेक महिलांनी ट्रम्पविरोधात
लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केल्या.
पण सगळ्यात गाजलेले प्रकरण होते
स्टॉर्मी डॅनियल या सिनेतारकेबरोबर असलेल्या
ट्रम्प यांच्या लैंगिक संबंधाचे.
ते लैंगिक संबंध उघड होऊ नयेत म्हणून
ट्रम्प यांचे सहकारी मायकल कोहेन यांनी
त्या महिलेला लाखो डॉलर्स दिले.
तिचे तोंड बंद व्हावे.
सत्य समोर येऊ नये.
बदनामी होऊ नये.
निवडणुकीवर परिणाम होऊ नये.
म्हणून हे सर्व ट्रम्प यांनीच केले, असा आरोप होता.
कोहेलने स्वतः गुन्हा कबुल केला.
तीन वर्षे जेलमध्ये काढले.
ती भुणभुण ट्रम्प यांच्याही मागे लागली.
नंतर कोर्ट कचेरी सुरु झाली.
कोर्टात दोषीसुद्धा सिद्ध झाले.
पण शिक्षा झाली नाही.
इतक्या भानगडी समोर आल्या तरीही
झालं वेगळंच.
अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांना पुन्हा निवडून दिलं.
कदाचित ट्रम्प यांच्या कारभाराची चार वर्षे
आणि बायडन यांच्या कारभाराची चार वर्षे
तुलना करण्यासाठी लोकांसमोर होती.
शेवटी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
यावेळी ट्रम्प यांनी आपला शपथविधी सोहळा
एकदम वेगळा करण्याचे ठरवले.
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच
दुसऱ्या देशांच्या प्रमुखांना बोलावयाचे ठरवले.
सगळ्यांना वाटले की पहिले निमंत्रण भारताला मिळेल.
एकतर मोदीजींची घनिष्ठ मैत्री आणि
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे
जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश
जगातील सगळ्यात मोठे मार्केट असलेला देश
याशिवाय चीन सारख्या देशाला काबूत ठेवण्यासाठी
अमेरिकेला भारताची मदत लागणारच!
विशेष म्हणजे मोदीजी आणि ट्रम्प
दोघेही सख्खे मित्र.
मोदीजींनी नेहमीच ‘माय फ्रेंड डोनाल्ड’ म्हटलेले आहे.
कोविडच्या काळातही आपल्या देशात ‘नमस्ते ट्रम्प’ हा
अतिशय भव्य दिव्य दिमाखदार सोहळा केला.
निवडणुकीच्या काळात अमेरिकेत जाऊन
सर्व प्रकारचे प्रोटोकॉल तोडून
‘अब की बार ट्रम्प सरकार’ चा नारा दिला.
बरेच लोक म्हणतात की
राजनैतिक शिष्टाचाराच्या दृष्टीने
ती फार मोठी चूक होती.
तरीही मोदीजींनी ते केले होते.
ट्रम्प यांनीही ‘माय फ्रेंड मोदी’ म्हणून
मोदीजींचा नेहमीच उल्लेख केला.
विशेष म्हणजे ट्रम्प निवडून येण्यासाठी आणि
निवडून आल्यानंतरसुद्धा आपल्याकडे
काही उत्साही कार्यकर्त्यांकडून होम हवन केले गेले.
==================
म्हणजे काहीही झाले तरी
भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण मिळणारच!
पण तसे झाले नाही.
याउलट चीनच्या राष्ट्रपतींना ट्रम्पने ‘न्यौता’ दिला.
मोदीजींच्या खास दोस्त असलेल्या इटलीच्या पंतप्रधान
जॉर्जिया मेलनी यांना ‘न्यौता’ मिळाला.
==================
त्याबद्दल चित्रविचित्र कहाण्या समोर येऊ लागल्या.
भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की
आपले परराष्ट्र मंत्री निमंत्रण मिळावे
म्हणून तिथं जाऊन बसले होते.
पण फायदा झाला नाही.
कुणी म्हणाले अदानीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला
म्हणून असं झालं- ‘तक्षक-इंद्र थिअरी’.
कुणी म्हणालं, अमेरिकेचा नागरिक असलेल्या
अमेरिकेतच पन्नूच्या हत्येचा कट रचला म्हणून असं झालं.
कुणी म्हणालं, मागच्यावेळी मोदी साहेब अमेरिकेत गेले
पण ट्रम्पला भेटले नाही, म्हणून असं झालं.
अर्थात भारतातील मीडियासमोर
मागचे अनेक दिवस ‘न्यौता’ हा मोठा इशू होता.
==================
यावेळीसुद्धा सत्तेवर आल्याबरोबर ट्रम्प यांनी
जुन्या सत्ताधाऱ्यांबद्दल वाईट साईट बोलणे सुरु केले.
आता अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरु झाला,
हे सांगायला सुरुवात केली.
इथल्या शहरांमधली ‘लॉ अँड ऑर्डर’
आता चांगली राहील.
आणि सगळ्यात महत्त्वाची घोषणा होती
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन!’
म्हणजे आपण कधी तरी ‘ग्रेट’ होतो.
या सत्ताधाऱ्यांनी आपलं सगळं वैभव मातीत मिळवलं
आता आपल्याला पुन्हा ग्रेट व्हायचे आहे.
आजच्या घडीला आर्थिक सत्ता म्हणून
अमेरिका एक नंबरचा देश आहे.
त्यांची सैनिकी ताकद जगात सगळ्यात जास्त आहे.
तंत्रज्ञानाचा विचार केला तर अमेरिकाच सर्वात पुढे आहे.
म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘ग्रेट’ आहे.
तरीही अमेरिकेतील लोकांसाठी
सगळ्यात महत्त्वाची घोषणा होती
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन!’
असो.
==================
आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले,
ही वस्तुस्थिती आहे.
पण त्यांचा unpredictable आणि
inconsistent स्वभाव पाहता,
ते नेमके काय काय करतील
काय काय निर्णय घेतील,
याबद्दल संपूर्ण जगामध्ये
एक वेगळीच धास्ती पसरलेली आहे.
==================
सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी आणि
घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी
त्यांनी खास आदेश काढले आहेत.
राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना
‘क्रिमिनल एलिअन्स’ संबोधण्यात येत आहे.
शोधून त्यांना देशाबाहेर पाठवण्यात येणार आहे.
‘कागद बताव’ मोहीम सुरु होणार आहे.
नागरिकत्व मिळण्यासाठी, व्हिसा मिळण्यासाठी
कडक कायदे बनवण्यात येणार आहेत.
त्याचा फटका भारतासहित अनेक देशांना बसणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना [WHO] मधून
अमेरिका बाहेर पडणार आहे.
पर्यायाने संशोधन व इतर कामासाठी
अमेरिकेकडून दिली जाणारी मदत बंद होईल.
==================
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन [NATO] या
युरोप व अमेरिकेच्या तीस देशांच्या सुरक्षेसाठी
स्थापन झालेल्या संघटनेवरसुद्धा बालंट येणार आहे.
त्यांना दिली जाणारी मदत आटण्याची शक्यता आहे.
यामुळे स्वाभाविकपणे युक्रेनचा जोर कमी होऊन
युद्ध बंद होण्याची शक्यता आहे.
तसेच इस्राइलला दिल्या जाणाऱ्या
मदतीबद्दल ही होणार आहे.
अर्थात यामुळे नाटो देशांमध्ये असंतोष, संभ्रम
आणि भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.
==================
पर्यावरण रक्षण करण्यासाठी झालेला
‘पॅरिस करार’ रद्द करून आता
डोनाल्ड ट्रम्प ‘drill baby, drill’ म्हणत
अमेरिकेतील तेल, कोळसा, वगैरे खनिजांचे
मोठ्या प्रमाणावर उत्खनन करणार आहेत.
पर्यावरण, प्रदूषण, कार्बन फूट प्रिंट, ग्रीन एनर्जी,
वगैरे बाबी बाजूला फेकल्या जाणार आहेत.
==================
याशिवाय एक ट्रम्प यांची साम्राज्यविस्तारवादी
भूमिकासुद्धा समोर येत आहे.
त्यांना आपल्या शेजारचा कॅनडा नावाचा देश
अमेरिकेत विलीन करायचा आहे.
कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य करायचे आहे.
तिथल्या पंतप्रधानांना गवर्नर करायचे आहे.
डेन्मार्कचे थोडेफार नियंत्रण असलेला
ग्रीनलँड नावाच्या प्रदेशावर कब्जा करायचा आहे.
पन्नास साथ हजार लोकसंख्या असलेला
ग्रीनलँड हा प्रदेश,
ते सहज विकत घेऊ शकतात,
असे जाणकारांना वाटते.
कॅरीबियन आणि पॅसिफिक समुद्रांना जोडणारा
खास तयार केलेला ८२ किलोमीटर लांबीचा
पनामा कालवा ट्रम्प साहेबांना परत
पनामा सरकारकडून आपल्या ताब्यात घ्यायचा आहे.
‘गल्फ ऑफ मेक्सिको’ चे नाव बदलून
आता त्यांना ‘गल्फ ऑफ अमेरिका’ करायचे आहे.
==================
एकीकडे जगभर कंपने निर्माण करणाऱ्या गोष्टी
करत असतानाच ट्रम्पने अमेरिकन सोसायटीलासुद्धा
गदा गदा हलवायचे ठरवलेले दिसते.
तेथील सामाजिक मूल्ये, आचार विचार, वागणे,
सामाजिक संकल्पना बदलताना दिसत आहेत.
सर्वात आधी त्याने फक्त स्त्री आणि पुरुष
असे दोनच लिंग प्रकार अस्तित्वात राहतील,
असे आदेश काढले.
सामाजात अस्तित्वात असलेले LGBTQ अशा
सर्व प्रकारच्या लोकांसमोर पुरुष किंवा स्त्री असे
फक्त दोनच पर्याय ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय ‘ट्रान्सजेन्डर’ लोकांचे दुःख, वेदना
समजावून घेण्याचा प्रयत्न होणार नाही.
त्यांना आपले लिंग परिवर्तन करता येणार नाही.
यामुळे अमेरिकेतील समाजातसुद्धा
वेगळा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
याची सुरुवात घरातूनच झालेली दिसते.
ट्रम्प यांचे सहकारी आणि ‘को-प्रेसिडेंट’ म्हणून
ओळखले जाणारे एलोन मस्क यांच्या मुलीने
जाहीर केले आहे की
‘या देशात माझे काहीच भविष्य नाही.
जरी तो फक्त चारच वर्षांसाठी असला तरी
ज्या लोकांनी त्याला आपल्या इच्छेने मत दिले आहेत
ते लोक इथेच राहणार आहेत.
त्यामुळे बदल होणे अवघड आहे.’
विशेष म्हणजे विवियन विल्सन हा
एलोन मस्क यांचा मुलगा होता.
ट्रान्सजेन्डर असल्यामुळे त्याने
आपले लिंग परिवर्तन केले होते.
ही फक्त एक चिंगारी आहे.
संपूर्ण अमेरिकन सोसायटीमध्ये काय होईल
हे लवकरच दिसेल.
==================
शांत असलेल्या तळ्याच्या
अतिशय पारदर्शी पाण्यात
कुणीतरी दगड मारावा आणि
सर्व काही स्वच्छ नितळ दिसणारा तळ
पूर्णपणे ढवळून निघावा
सर्वत्र लहरी पसराव्यात, गाळ वर यावा
आणि गढूळ पाण्यामुळे काहीच दिसू नये
तसेच काहीसे होत आहे.
थोडा वेळ लागेल
सर्व काही शांत होऊन चित्र स्पष्टपणे दिसायला!
==================
विशेष म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प
हे ७८ वर्षांचे आहेत.
हा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांचे वय ८२ असेल.
ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत.
यानंतर ते पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष होणार नाहीत.
म्हणजे ही त्यांची शेवटची संधी आहे.
ते अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत.
त्यांना शांततेचे नोबेल प्राइजसुद्धा पाहिजे आहे.
त्यांना अमेरिकेचा इतिहास बदलायचा आहे.
त्यांना जगाचा इतिहास बदलायचा आहे.
त्यामुळे ते जगाचा भूगोल ही बदलण्यासाठी
मागे पुढे पाहणार नाहीत.
समाज तर त्यांना बदलायाचाच आहे.
नाजी सलाम करणारा उद्योगपती
एलोन मस्क सोबत आहे.
साम्राज्यविस्तारवादाचे नवे रूप
आपण पाहणार आहोत.
-दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
Tags: अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रंप डोनाल्ड ट्रंप मोदी Load More Tags
Add Comment