अर्थसंकल्प आला. निर्मलाताईंनी षटकार मारला. बारा लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स सूट जाहीर झाली, आणि दिल्लीमधील सरकारी कर्मचारी आणि इतर कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक आपसूकच भाजपचे विधानसभेसाठीसुद्धा मतदार झाले. तसंही मोदी-शहा सरकारने आपच्या आर्थिक नाड्या बंद केल्या होत्या. आणि भाजपचा निवडणूक फार्म्युला ठरलेला होता. कुठल्याही परिस्थितीत त्यांना दिल्ली काबीज करायची होती.
एक काळ होता.
अण्णा दिल्लीत आले.
आंदोलन सुरु झालं.
इंडिया अगेन्स्ट करप्शन!
लोक अक्षरशः वेडे झाले.
त्यांच्या नादाला लागले.
अनेक इंजिनिअर, डॉक्टर, पत्रकार, कवी,
लेखक, प्राध्यापक, प्रोफेशनल्स, पोलीस अधिकारी,
मिलिटरीवाले, इतर व्यावसायिक -
सगळ्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडल्या.
कामधंदे सोडले.
आपल्याला देश बदलायचा आहे.
ही राजकीय व्यवस्था बदलायची आहे.
हे पक्कं ठरवलं.
जोपर्यंत 'कॉंग्रेसविरोध' एवढाच कार्यक्रम होता,
तोपर्यंत अण्णा सोबत होते.
===============
पण त्यांचाच शिलेदार अरविंद केजरीवाल
महत्वाकांक्षी झाला,
भाजपला मदत करत बसण्यापेक्षा
आपणच पक्ष स्थापन करू,
आपणच सत्ता स्थापन करू,
असं म्हणू लागला, तेव्हा अण्णा चिडले. संतापले.
हे काही आपलं काम नाही, असं बोलू लागले.
आपला विरोध दाखवला.
आणि हळूच बाहेर पडले.
आपल्या गावी आले.
निवांत बसले.
===============
पुढे आम आदमी पार्टीची स्थापना झाली.
आणि त्या पक्षाचा नेता बनला एकेकाळी
इन्कम टॅक्स कमिशनर असलेला अरविंद केजरीवाल.
पण गबाळे कपडे, पायात चप्पल,
कार्यकर्त्यांनी दिलेली छोटीशी मारुती कार, छोटंसं घर
आणि व्हीआयपी कल्चरला विरोध दाखवत
सामान्यातला अ(ति?)सामान्य अशी प्रतिमा निर्माण झाली.
===
आपल्याला सगळं काही बदलायचं आहे,
हे स्वप्न पाहत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण,
सिफोलॉजिस्ट योगेंद्र यादव, आयपीएस अधिकारी किरण बेदी,
कवी कुमार विश्वास, पत्रकार आशुतोष, शाजिया इल्मी असे
कितीतरी रथी - महारथी सोबत आले.
आपली भूमिका काय असावी,
व्हिजन काय असावे,
मिशन काय असावे,
अशा बाबींवर चर्चा करू लागले.
अभ्यास करून टिपणे तयार करू लागले.
ब्ल्यू प्रिंट, प्लान ऑफ अॅक्शन तयार करू लागले.
पण हळूहळू त्यांच्या लक्षात आले की,
अशा कुठल्याच गोष्टी हा माणूस ऐकत नाही.
त्याला जे करायचे आहे तोच ते करतो.
आपण एका कट्टर हुकुमशाही वृत्तीच्या व्यक्तीच्या
नादाला लागलोय आणि
‘क्रिमिनल वेस्टेज ऑफ टाइम’ करत आहोत.
===============
आपण भ्रष्टाचार संपवण्यासाठी आलोय,
आपण राजकारणातील गुन्हेगारी संपवण्यासाठी आलोय,
आपल्याला ही सडलेली व्यवस्था बदलायची आहे,
या गोष्टींना काही अर्थ राहिला नाही.
ज्या व्यक्तीच्या विरोधात
यांनीच भ्रष्टाचाराची तक्रार केली होती
त्यालाच अरविंदने तिकीट दिले.
गुन्हेगार, भ्रष्टाचारी, अतिश्रीमंत लोकांना
पदे देण्यात येऊ लागली.
काही बोलायला गेले तर
‘तुम्हाला राजकारण कळत नाही’
असं बोलण्यात येऊ लागले.
===============
मग काय?
हळूहळू एकेक व्यक्ती अरविंदची साथ सोडू लागले.
पण दिल्लीच्या सामान्य जनतेपर्यंत
या आतल्या बातम्या पोचत नव्हत्या.
आम आदमी पार्टी चे सरकार बनत होते.
अरविंद केजरीवाल एकदा नाही, दोनदा नाही,
तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत होते.
त्यांचे धोरण यशस्वी होत होते.
शाळा, मोहल्ला क्लिनिक, वीज बिल माफ
वगैरे गोष्टींची चर्चा घडवून आणली जात होती.
===============
केजरीवालने आपल्या पक्षाचे ध्येयधोरण ठरवताना
भाजपचा हिंदुत्ववादी मतदार समोर ठेवला होता.
आरएसएसच्या गुड बुक्स मध्ये
राहायचं ठरवलेलं होतं.
त्यामुळेच सतत गांधीजींचं नाव घेत
सुरु झालेल्या आंदोलनातून
निर्माण झालेल्या या पक्षाने
आपलं सरकार आल्याबरोबर
महात्मा गांधीजींचा फोटो काढला.
संदेश होता गोडसेबद्दल सुप्तपणे आदर बाळगणाऱ्या लोकांसाठी.
हे करत असताना फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि
भगतसिंग यांचे फोटो लावायला सुरुवात केली.
ज्यामुळे दलित मतदार आपल्याकडे येईल असे नियोजन.
असं असलं तरी यासोबतच धार्मिक तीर्थयात्रांचे आयोजन,
हनुमान मंदिर भेट, जाहीर हनुमान चालीसा वाचन,
एवढेच नाही तर चलनी नोटांवर हिंदू देव देवतांचे चित्र टाका,
अशी मागणी करायला सुरुवात केली.
आता बाबासाहेबांचे हिंदू कर्मकांडाबद्दल असलेले विचार,
आणि शहीद भगतसिंग यांचे नास्तिक तत्वज्ञान
आणि त्यांचे फोटो लावून
केजरीवाल यांच्याकडून केली जाणारी कृती
यांचा कुठेच ताळमेळ लागत नव्हता.
हे प्रकरण एक दिवस उलटणारच होते.
===============
पुढे सत्तेत आल्यानंतर पैसा मिळवणे आणि
मोठ्या प्रमाणावर निवडणुकांसाठी खर्च करणे सुरु झाले.
त्यामुळे भारतात कुठल्याही राज्यात निवडणुका असतील
तेथे केजरीवाल जाऊ लागले.
मग गोवा असेल, गुजरात असेल, हरियाना असेल
प्रत्येक राज्यात जाऊन कॉंग्रेसची मते खाणे आणि
मोदीजींच्या ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ योजनेसाठी मदत करणे,
जोरात सुरू झाले.
भाजपला हे हवेच होते.
पण किती काळ?
(द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात 9 फेब्रुवारी 2025 ला प्रसिद्ध झालेले सौम्यदीप सिन्हा यांचे व्यंगचित्र)
मोदी-शहांच्या डोळ्यात मात्र
या छोट्याशा राज्यात आपल्या नाकासमोर बसलेला
मुख्यमंत्री टोचत होता.
त्यांना तेथे आपला माणूस पाहिजे होता.
सुरुवातीला त्यांनी उपराज्यपाल हे हत्यार वापरले.
सतत कामात अडथळे आणले.
पण बोंबाबोंब करण्यात पटाईत असलेले केजरीवाल
मोदी-शहांना पुरून उरले.
मग एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली.
लोकांच्या हृदयात बसलेली अरविंद केजरीवाल यांची
कट्टर इमानदार असलेली प्रतिमा.
यांना जर हटवायचे असेल तर
त्यांची ती प्रतिमा कुस्करायला पाहिजे.
लगेच त्या दृष्टीने काम सुरू झाले.
===============
आम आदमी म्हणून छोट्याशा कारमध्ये फिरणारे केजरीवाल
गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरू लागले.
व्हीआयपी कल्चर नको म्हणत म्हणत
पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलीस अशी
‘डबल हाय सिक्युरिटी’ व्यवस्था लोकांसमोर येऊ लागली.
दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहणार,
असे सांगणारे केजरीवाल सरकारी पैशाने भव्य दिव्य असा
अलिशान शीशमहल तयार करू लागले.
नंतर ‘शराब घोटाळा’ समोर आला.
शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार समोर आले.
इडी, सीबीआय, एसआयटीची कटकट सुरु झाली.
एकामागून एक मंत्री जेलमध्ये जाऊ लागले.
स्वतः केजरीवाल यांनाही अटक झाली.
‘कट्टर इमानदार’ या प्रतिमेचे तुकडे तुकडे होऊ लागले.
त्यात मोदीजींनी ‘रेवड्या’ म्हणून हिणवलेल्या
केजरीवालच्या ‘फ्री योजना’ देण्याचे भाजपनेही जाहीर केले
आणि
‘हा माणूस नसला तरी चालतंय, काही फरक पडत नाही’
असं तिथल्या लाभार्थ्यांना वाटू लागलं.
त्याचवेळी अर्थसंकल्प आला.
निर्मलाताईंनी षटकार मारला.
बारा लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स सूट जाहीर झाली,
आणि दिल्लीमधील सरकारी कर्मचारी आणि
इतर कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक
आपसूकच भाजपचे विधानसभेसाठीसुद्धा मतदार झाले.
तसंही मोदी-शहा सरकारने
आपच्या आर्थिक नाड्या बंद केल्या होत्या.
आणि भाजपचा निवडणूक फार्म्युला ठरलेला होता.
कुठल्याही परिस्थितीत
त्यांना दिल्ली काबीज करायची होती.
केजरीवालच्या योजनांना ‘फुकटच्या रेवड्या’ म्हणून
स्वतः मोदीजींनी हिणवलेले असले तरी
त्या सर्व रेवड्या आम्ही पण वाटू,
असे जाहीर करण्यात आले.
हेही वाचा - काम की राजनीती काम करेगी? (केदार देशमुख)
आपच्या प्रत्येक चाली यशस्वी झालेल्या होत्या.
दिल्लीत तीन वेळा सरकार आले आणि
पंजाबमध्येसुद्धा बहुमत मिळाले
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली
म्हणून केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा वाढतच होती.
त्यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे होते.
आपल्याशिवाय भारतीय राजकारणात कुणीही
मोठी व्यक्ती नाही, याबद्दल त्यांच्या मनात शंकाच नव्हती.
राजकारण बदलण्याची ताकद फक्त आपल्यामध्येच आहे,
असं त्यांना नेहमीच वाटत होते.
===============
त्यामुळे दिल्ली निवडणुकीत
दोन चार जागा कॉंग्रेसला देऊन
‘इंडिया आघाडी’चे सामूहिक नेतृत्व स्वीकारावे,
असे त्यांना प्रशस्त वाटले नाही.
याउलट त्यांनी कॉंग्रेसला ताटकळत ठेवले.
राहुल गांधींचा फोटो भ्रष्टाचारी म्हणून प्रसिद्ध केला.
आघाडीच्या सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे कॉंग्रेसला
इंडिया आघाडीतूनच बाहेर काढा, अशी मागणी केली.
थोडक्यात इंडिया आघाडीचे नेतृत्व स्वतःकडे घेऊन
भविष्यात पंतप्रधान होण्याचे स्वप्न परत जिवंत केले.
===============
दिल्लीची जनता काहीही झालं तरी
आपल्यालाच निवडून आणील, हे त्यांचं पक्कं मत होतं.
पण मोदी-शहांच्या भाजपला आपला दिल्लीतील
सत्तावीस वर्षांचा वनवास संपवायचा होता.
शेवटी झालेही तसेच.
आम आदमी पार्टीच्या हातातून भाजपने सत्ता हिसकावून घेतली.
स्वतः केजरीवाल आणि त्यांचे महत्त्वाचे मंत्री
आपली आमदारकीसुद्धा वाचवू शकले नाही.
आणि रस्त्यावरील आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष
परत रस्त्यावर आला.
===============
आज केजरीवाल यांची परिस्थिती एकदम कठीण आहे.
निवडणुकीचे निकाल लागले - नाही लागले की पहिली घोषणा झाली,
ती विधानसभा आणि मंत्रालय सील करण्याची.
कोणतीही कागदपत्रे बाहेर जाणार नाही याची.
एसआयटी स्थापन करायची.
म्हणजे आधीच इतके दिवस जेलमध्ये काढलेले केजरीवाल
काही दिवसांतच पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतात.
भ्रष्टाचाराची अनेक प्रकाराने समोर येऊन
दिल्लीत मोठा धुराळा उडू शकतो.
===============
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पंजाबमधील
आम आदमी पार्टीच्या सरकारला सुरुंग लावला जाऊ शकतो.
तसेही मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचे रूपांतर
कधीही एकनाथ शिंदेमध्ये होऊ शकते.
भाजपचा तो अगदी यशस्वीपणे वापरलेला फॉर्म्युला आहे.
तसे झाले तर मात्र खऱ्या अर्थाने केजरीवाल रस्त्यावर येतील.
===============
यांपैकी काहीच झाले नाही तर मात्र
दिल्लीमध्ये आपल्याला
एक अतिशय आक्रमक विरोधी पक्ष पाहायला मिळेल.
जी आश्वासने भाजपने दिल्लीच्या मतदारांना दिलेली आहेत
ती आश्वासने पूर्ण करणे तितके सोपे नाही.
त्यासाठी केजरीवाल आणि कंपनीने ठरवले तर
मोदी-शहा यांचे जगणे मुश्किल करू शकतील.
===============
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
कॉंग्रेससारख्या पक्षाला इंडिया आघाडीतून काढण्याची योजना रद्द होईल.
भाजप विरोधी मतांचे विभाजन होणार नाही.
भाजपला परत-परत सत्तेवर येण्याचा मार्ग काटेरी होईल.
कारण मोदीजींनी दिलेला मंत्र आणि त्याचे महत्व
सर्वच विरोधी पक्षांच्या लक्षात आलेले असेल.
तो मंत्र आहे
‘एक हैं तो सेफ हैं!’
-दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
Tags: केजरीवाल अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 Load More Tags
Add Comment